« | »




पाऊस, ती आणि बाकी सारं

काल तुझ्या गावात येऊन गेलो.
तसा एकटाच येणार होतो, पण इच्छा नसतानाही पाऊस सोबत म्हणून आला.
हल्ली तो सहसा मला एकटं राहूच देत नाही.
सारखा रिप-रिप करत असतो माझ्या कुठल्या-कुठल्या गोष्टींवर.
माझ्या घरात, अंगणात, गाण्यांत, आठवांत, शब्दांत.... अगदी सगळीकडेच.
पण आता तो जरा जास्तच हट्टी झालाय.
ही सगळी ठिकाणं सोडून वेडा सरळ डोळ्यांतूनच बरसणं जास्त पसंत करतो.


मलाच आता त्याच्या या रोज-रोज पडण्याचा कंटाळा आलाय.
चिखलाने माखलेला मी, वैतागून त्याच्यावर खूप-खूप रागवतो, चिडतो.
मग तो मूर्ख अजूनच जोरात बरसतो.
काय तर म्हणे, " चिखल साफ करायला पाणी हवंच ना. " - या स्पष्टीकरणासकट.
काय म्हणायचं आता याला. तूच सांग.
ते म्हणतात ना - धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं.
जाऊ दे.
नाहीतरी तुझी आणि पावसाची जातकुळी एकच - अन्प्रेडिक्टेबल
त्याला नाव ठेवायचं म्हणजे,...
... म्हणजे तूही....
आणि सुक्यासोबत ओलं जाळणारी माझी जात नाही.
असो.


बाकी तुझा गाव मात्र अजूनही तितकाच सुंदर आहे. जितका मागल्या खेपेला भावला होता.
फरक इतकाच जाणवला की, यावेळी तुझ्या गावाने मनापासून स्वागत नाही केलं. मलाही फार काही वाईट वाटलं नाही.
फक्त दिवसभर सलत राहिलं मध्ये-मध्ये. पायात रुतलेल्या तरी डोळ्यांना न दिसणार्‍या काट्यासारखं.
नीवेज्, फक्त तुझा गाव या नात्याने मी त्याचं असं तिरसट वागणंही सहन केलं. नाहीतरी त्याचं-माझं देणं-घेणं नाहीच.
खरं तर मी...
...मी आलो होतो तुला भेटायला. गाव तर फक्त निमित्त.
नाही....
नाही; फक्त तुला पहायला, तेही दुरूनच.
कारण तुला भेटण्यासाठी आता एकही घडी शुभ नाहीये, आणि आता कदाचित, यापुढेही नसणारेय - नशीब नावाच्या एका ज्योतिषाने माझा हात बघूनच तसं सांगितलं गेल्या आठवड्यात.


एक मात्र खरं- आजही तुला फक्त काही क्षण बघायला माझी नजर किती आसुसलेली.
गावातल्या रस्त्यांवर तुझ्या पाऊलखुणा शोधायचा खूप प्रयत्न केला.
तुझ्या सावलीचा एखादातरी तुकडा रुजला असेल कुठेतरी, या आशेने, तू विसावून गेलेल्या सगळ्याच जागा पुन्हा-पुन्हा चाचपून पाहिल्या.
भटकून आलो कुठे-कुठे;
होत्या-नव्हत्या त्या सर्वच शक्यतांच्या प्रदेशातून.
...पण आठवणींच्या निसरड्या शेवाळाखेरीज काहीच सापडलं नाही.
पाय घसरून पडलोही त्यावरून.
...आणि इथे तुझ्यामागे दरवळणार्‍या गंधाने भांबावलेला मी, अजूनच पिसाटासारखा इथे-तिथे भटकत राहिलो.


नंतर खूप चौकशी केल्यावर कळलं की, तू गाव सोडून, नव्या शहरात गेली आहेस.
तू आहेस तिथे जाऊन तुला गाठणं, मला अशक्यकोटीची गोष्ट.
मलाच एक जन्म उशीर झाला, तुझ्यापर्यंत पोहचण्यासाठी.
...ठीक आहे.
पुढच्या जन्मी असा उशीर नाही होणार.
किती तगमगावा जीव एखाद्याच्या नसण्यानं; तेही उभ्या हयातीत आपलं कधीही नसलेल्यानं.


कधीशी, मोठ्या मुश्कीलीने पावसाला मुसक्या बांधून ठेवला होता.
शेवटी मलाच त्याची दया आली.
फक्त डोळ्यातल्या बाहुल्यांना वेळी-अवेळी पाण्यात भिजवायचं नाही, या एकच अटीवर त्याला मी सोडलयं.
झिंगलेला तो, सोडल्याबरोबर थयथयाट करून आला सगळीकडे.

गाव तुझा सोडताना,
पावसालाही कळला होता तुझ्या मौनाचा अर्थ.
आणि समजून, सावरून अगदी शहाण्यासारखा
त्याने माझा निरोप घेतला.
- कायमचा.
आता तो वस्तीला आहे, तुझ्या गावात.
- नेहमीसाठीच.
परतून आलीसच कधी तुझ्या गावात
तर बघ-
गावच्या वेशीवर आजही,
माझा पाऊस तुझीच वाट पाहतोय!

- मी_वर्षा_ऋतू