« | »




बालपणीच्या फॅशन्स सुखाच्या

"'बंटी और बबली' सूट्स देखना, दीदी, आज कल बहुत डिमांड है उसकी!"

गेल्या वर्षीच्या भारत दौर्‍यात खरेदी करताना तो सिंधी बुटिकवाला मला कन्व्हीन्स करत म्हणाला. पण माझं मात्र लक्ष गेलं होतं एका काळ्या ड्रेस मटेरिअल कडे. ते मटेरिअल पाहिलं आणि एकदम बालपणीचा माझा आवडता फ्रॉक आठवला .. असाच काळा भोर, सॅटीनचा फ्रॉक, त्यावर शेवाळी रंगाच्या चांदण्या. आईने तो फ्रॉक शिवायला टाकताना टेलरला सांगितलं होतं, "गुड्डी बाह्या शिवा, छान दिसतात तिला".

मलाही त्या झालरसाख्या दिसणार्‍र्या उडत्या बाह्या भारी आवडायच्या! पण याला आई गुड्डी बाह्या का बरं म्हणते, नेहमी प्रश्न पडायचा. मग आईकडून कळलं की ही गुड्डी म्हणजे आईच्या जमान्यातली लोकप्रिय अभिनेत्री जया भादुरी, तिने तशा स्टाईलच्या बाह्या लोकप्रिय केल्या म्हणून असंच नाव पडलं! त्या वेळी घरोघरी टी.व्ही. अजुन इतका कॉमन नव्हता पण तरी शेजारच्या काकूंना सांगून ठेवलं होतं मी की गुड्डी टी.व्ही. वर आली की मला हाक मारा!

तर हे नवीन फॅशन्सचं निरीक्षण करण्याचं आणि नटण्या - थटण्याचं वेड मला नक्की कधीपासून लागलं आठवत नाही, पण बहुधा अगदी लहानपणापासून असावं!

तशी राशी भविष्यावर मी अजिबात विश्वास ठेवत नाही पण 'राशीचक्र' च्या एकपात्री प्रयोगात उपाध्येंनी सांगितलेल्या वृषभ राशीच्या स्त्रियांचे वर्णन ऐकून मात्र मला माझी रास वृषभ का आहे ते एकदम पटले ..!!

माझ्या आठवणीत अगदी मॉंटेसरीत असल्यापासून मला बाईंच्या साड्या, नेलपेंट, चप्पल, कुंकु, हेअरस्टाईल किंवा पर्स पहायची फार उत्सुकता असायची. मॉंटेसरीमध्ये तर अभ्यासही असा काय असतो! त्यामुळे आवडत्या बाई त्याच असायच्या ज्या रहातात छान! बाईंच्या साडीला हात लाऊन त्याचा 'फील' घेणे हा आवडता उद्योग असायचा. तेव्हा कुठल्या साडीचा प्रकार किंवा टेक्शचर समजण्याची अक्कल अर्थातच नव्हती पण तरीही त्यातल्या त्यात त्या साड्यांच्या फीलवरून मला बाईंच्या साड्यांचे वर्गीकरण करायची सवय लागली होती! चुरचुरीत, सुळसुळीत, कडकडीत, खरखरीत असे मी साड्यांचे प्रकार मनातल्या मनात ठरवून टाकले होते. बहुधा चुरचुरीत म्हणजे नायलॉन किंवा शिफॉन, सुळसुळीत म्हणजे सिल्क, कडकडीत म्हणजे कॉटनच्या कडक साड्या, खरखरीत म्हणजे खादी किंवा रॉ सिल्क सारखा काहीतरी फिनिश असावा.

तर अशी ही फॅशनची आवड नकळत कधी लागली कळलेच नाही. त्या वेळी मी ठराविक रंगांच्या छटांना दिलेली स्पेसिफिक नावे अजुनही मी वापरते! तेव्हापासून तोंडात बसलेल्या रंगछटा म्हणजे "श्रीखंडाच्या गोळीचा केशरट बदामी रंग, काजुकंदाचा गुलाबी रंग, कांद्याच्या सालाचा जांभळट मोतीया रंग, बोगनवेलीच्या फुलांसारखा राणी कलर" हे रंग मी अजुनही नेरोलॅक च्या जाहिरातीतल्या "मेरा वाला क्रिम" मधल्या चूझी मॉडेल सारखे वापरते ..!

शाळेत खास समारंभ असतील त्याच्या आदल्या दिवशी मी माझ्या आवडत्या टीचरना आधीच त्यांच्या साडीचा रंग विचारून घ्यायची आणि शक्यतो त्यावर मॅंचिग़ फूल आणून द्यायचा प्रयत्न करायची!

लहानपणीची अगदी लोकप्रिय एकदम 'हॅपनिंग' फॅशन म्हणजे खणाचे परकर पोलके आणि केसांचा साधना कट. हे खणाचे परकर पोलके प्रत्येक मुलीकडे असायलाच हवे .. अगदी 'मस्ट' म्हणा ना! म्हणून मग गॅदरींगला नाचात भाग घेणार्‍या मुलींचा ड्रेस कोड खणाचे परकर पोलके हा हमखास असायचा! माझी आई पण आम्हा बहिणींना एकदम छान तयार करायची! स्वतः खूप फॅशनेबल नसूनही आम्हाला अगदी लेटेस्ट फॅशनचे आणि इतरांपेक्षा वेगळे, मुद्दाम शिवून घेतलेले कपडे असावेत असे आईला नेहेमी वाटे (अजुनही वाटते आणि आता त्यात आम्हां बहिणींबरोबर आईच्या सुनेचीही भर पडली आहे)! तर जेव्हा इतर मुलींकडे खणाचे परकर पोलके असायचे तेंव्हा माझ्याकडे परकर पोलक्यांची खूप व्हरायटी होती. त्यात खण, सॅटिन, नायलॉन, जरीचे - सगळ्या प्रकारची परकर पोलकी होती माझ्याकडे! आई क्रिएटीव्हीटी वापरायची ... आहेरात आलेले जरीचे किंवा खास वेगळे असे ब्लाउज पिस मुद्दाम बाजुला ठेउन एखादा छान पॅचवर्क चा फ्रॉक शिवून घ्यायची आमच्यासाठी! आईने टेलरपण अगदी पारखून घेतला होता आमच्यासाठी!

मिनी मॉंटेसरी ते बालगट, शाळेच्या नाटुकल्यांमध्ये परीचा रोल करायचा माझा हातखंडा होता, कारण माझ्याकडे इतरांपेक्षा वेगळ्या अशा एक से एक मॅक्सीज होत्या. आई मग नाटकांसाठी हौसेने त्या मॅक्सींना टिकल्या लाऊन द्यायची, आईची हस्तकलाही छान त्यामुळे सुंदर कटवर्कचे कलाकुसर केलेले सोनेरी पंखपण आईच बनवायची .. मॅक्सीची फॅशन पण लहानपणची आवडती आणि लक्षात राहिलेली फॅशन. माझी निळी सॅटिनची, पांढरी नायलॉनची, पिस्ता रंगाची विमलची मॅक्सी माझ्या खास आवडत्या होत्या.

चौथीपर्यंत हिंदी सिनेमे पाहणे फारसे प्रिय नव्हते पण काही नाही तर सिनेमात दिसणार्‍या तमाम बायका कपडे काय घालतात ते पहायची जाम हौस! मॅक्सी घातलेल्या हिरॉईन्स बर्‍याच दिसायच्या एटीजच्या जमान्यात. बिंदिया गोस्वामी, झीनत अमान, नीतु सिंग, परवीन बाबी, पद्मिनी कोल्हपुरे, सारीका यांनी मॅक्सीची स्टाईल खूप लोकप्रिय केली होती.

लहानपणी अजुन एक फॅशन एकदम खूप दिसायची, बेल बॉटम ट्राउझरची ... म्हणजे आत्ताच्या भाषेत फ्लेअर लेग जीन्स. कॉलेजला जाणार्‍या मुलींना खूपदा बघायची बेल बॉटममध्ये. माझ्या मोठ्या बहिणीचा गुलाबी शर्ट आणि बॉटल ग्रीन रंगाची बेल बॉटम अजुन आठवते. नीतु सिंगला बेल बॉटम जीन्स छान दिसायची!

लहानपणीची अजुन एक आवडती फॅशन, ती म्हणजे 'मिडी'! एकदा आम्ही दिवाळीची खरेदी करायला, नवीन फ्रॉक घ्यायला लक्ष्मी रोडच्या ' टिप टॉप ' मध्ये गेलो होतो तेव्हा पहिल्यांदा ही फॅशन दिसली. त्या वेळी मला वाटले असे काय सगळ्या फ्रॉकची उंची मला मोठी होतेय .. पण मग त्या सेल्समननी सांगितले की याला 'मिडी' म्हणतात. मग काय, लेटेस्ट फॅशन ची ती लाल रंगाची मिडी लगेच घेतली. बॉलीवूडच्या झीनत अमान, खूबसूरत मधली रेखा, पूनम धिल्लो, विजेता पंडित, टिना मुनीम यांना मिडीज मस्त दिसायच्या! 'घोडागाडी' नावाचे एक नवीन फॅब्रिक तेंव्हा बाजारात खूप दिसायचे. थोडे धूप छाँव चमक असलेले हे self string चे कापड छान दिसायचे. माझ्याकडे असलेली सिंगल कॉलर ची घोडागाडीची गडद निळी मिडी मी कधीच विसरु शकणार नाही.

त्यावेळी अजुन एक फॅशन मला खूप आवडायची ती म्हणजे निकोबॉकस किंवा पॅडल पुशल्स्ची .. थोडक्यात कॅपरीजची! 'तेरी कसम ' मध्ये पूनम धिल्लो ची लाल कॅप्री तेव्हा पहिल्यांदा पाहिली. त्यावर हेअरस्टाईल पण वेगळीच असायची .. सगळे केस एका बाजुला घेउन त्याची एका साईडला वेणी घालायची. शिवाय त्या वेणीमध्ये कॅप्रीवर मॅचिंग असा गोफ पण असायचा आणि डोळ्यावर रंगीत सन ग्लासेस. मला ती फॅशन खूप आवडली होती तेव्हा .. नंतर रीना रॉय पण दिसली अशा गेट अप मधे, 'सनम तेरी कसम' मधे.

मला सलवार कमीझची फॅशन पहिल्यांदा लक्षात राहिली ती मिनाक्षी शेषाद्रीला हीरो मध्ये पाहिले तेव्हा. तेव्हाचे सलवार कमीझ पण वेगळेच काहीतरी असायचे. टाईट फिटिंगचा टॉप, त्यावर सामोशाच्या घडीची ओढणी आणि कधी कधी तर सलवार कमीझ वर कंबरपट्टा किंवा डेकोरेटीव्ह बेल्ट! नंतर अनिता राज, रती अग्निहोत्री, रीना रॉय याही बरेचदा सलवार कमीझ मध्ये दिसायच्या बर्‍याच चित्रपटांमधून. मला स्वतःला मात्र आठवी - नववीमध्ये जाईपर्यंत सलवार कमीझच्या फॅशनचे काही वेड नव्हते, त्यात ओढणी सांभाळणे महाकठिण वाटायचे!

कधी चुकून शाळेत नाचात भाग घेताना सलवार कमीझ घालायची वेळ आली तर ताईचे सलवार कमीझ आईकडून टाचून घ्यायची पण सलवार कमीझ मला स्वतःला अज्जिबात आवडायचे नाहीत .. सलवार कमीझ म्हणजे मोठ्या मुलींनी किंवा बायकांनीच घालायचे असा ठाम समज होता माझा!

अजुन एक समज होता की अमिताभ म्हणजे कोणी गुंड मवाली .. कारण काय तर न्हाव्यांच्या दुकानावर नेहेमी त्याचे फोटो असायचे .. भडक कपड्यांमधले आणि हिप्पी कटमध्ये .. काळ्या सन ग्लासेसमध्ये! त्यामुळे मला तो व्हिलनच वाटायचा!

हेअरस्टाईलमधली अजुन एक फॅशन मी पाचवी सहावीत असताना लोकप्रिय होती , ' सागर चोटी' घालायची. डिंपलची ती स्टाईल कॉलनीमधल्या सगळ्या कॉलेजमध्ये जाणार्‍या मुली कॉपी करायच्या. सागर चोटी घातल्या की सगळ्या स्वतःवर जाम खुष असायच्या!

त्या वेळी गुडघ्यापर्यंत स्कर्टची फॅशन आली होती, मला खूप आवडायचे डेनिम, क्वाड्रा, ऍसिड वॉशचे कडक स्कर्ट घालायला!

त्या वेळी अजुन एक फॅशन होती स्लीव्ह्जमध्ये 'कब तक चुप रहूंगी स्लीव्ह' ची! या नावाचा एक टुकार सिनेमा आला होता त्यातली हिरॉइन 'आमला' काही खूप लोकप्रिय झाली नव्हती पण तिने घातलेल्या सगळ्या सलवार कमीझ च्या स्लीव्ह्जची स्टाईल मात्र खूप लोकप्रिय झाली होती. थ्री फोर्थ साईझच्या बाह्या आणि खांद्यावर भरपूर चुण्या असलेल्या बाह्या तेव्हा बर्‍याच बोकाळल्या होत्या.

त्यानंतर मात्र मी सातवी आठवीत असतानाच्या फॅशन्स अगदीच चित्र विचित्र आल्या होत्या. तेव्हा सोनम, मंदाकिनी, नीलम, संगीता बिजलानी या बायका खरंच भयानक कपडे घालायच्या .. बलुन स्टाईल स्कर्ट किंवा फ्रॉकची तेंव्हाची फॅशन मला अज्जिबात आवडायची नाही!

नंतर मात्र नववीत असताना आलेली एक फॅशन मला खूप आवडली, घागरा चोलीची! जुही चावलानी 'कयामत से कयामत' मध्ये घातल्या त्या स्टाईलच्या घागरा चोलीज तेव्हा खूप पॉप्युलर होत्या.

शिवाय भरपूर मॅचिंग बांगड्या घालणे, ऑक्सिडाईज्ड बांगड्या ही फॅशन पण मला जाम आवडली होती. ड्रेसच्या रंगाच्या दोन डझन मॅचिंग बांगड्या घालून मिरवायला मला फार आवडायचं. जोग क्लासला मी व्हेकेशन बॅचला असताना सगळे फिश पॉंड मला बांगड्यांवरून मिळायचे!

त्या वेळी मिरर वर्कचे योक असलेले ड्रेस घालायची फॅशन पण आली होती. माझ्याकडे खूप होते असे गुर्जरी ड्रेसेस. माझा एक केशरी आरशांचा ड्रेस सगळ्यांना फार आवडायचा. या केशरी ड्रेस ची एक गंमत .. त्या ड्रेसचे मिरर वर्क एकदम खास होते. मी आणि माझ्या बहिणीने खास वंडरलॅंड मधून आणलेले होते ते आरसे! त्या ड्रेसचा एक आरसा कुठेतरी पडला, पण दुसर्‍या दिवशी कोण्या एका कॉलनीमधल्या अनोळखी मुलानी चक्क तो घरी आणून दिला, म्हणे हा घे तुझ्या ड्रेसचा आरसा! फार गंमत वाटली होती तेव्हा ...

दहावीत असताना फ्रॉक स्टाईल टॉपच्या सलवार कमीझची फॅशन पण बरीच लोकप्रिय झाली होती. मी आणि माझ्या बहिणीने त्यावेळी आईच्या वापरात नसलेल्या साड्या फाडून ड्रेस शिवायचे फॅड काढले होते. दहावीच्या सुट्टीमधली सर्वात लोकप्रिय होती ती 'मैने प्यार किया' मधल्या 'भाग्यश्री ड्रेसेस' ची. मला मात्र ते duplicate कपडे अजिबात आवडायचे नाहीत!

नंतर कॉलेज्मध्ये गेल्यापासून ते अगदी आत्ताच्या फॅशनपर्यंत सगळ्या फॅशन्स लक्षात आहेत पण शालेय जीवनातल्या फॅशन आठवण्याची मजाच वेगळी असते. कारण त्या फॅशन बरोबर लक्षात आहेत त्या ड्रेसमधल्या आठवणी !! कधी आई बाबांनी केलेली हौस, कधी शाळेतल्या टीचरनी केलेलं कौतुक, तर कधी मित्र मैत्रीणींनी दिलेल्या compliments!! कधी एखाद्या ड्रेसमध्ये गॅदरींगला केलेला नाच, कधी परी राणीचा माझा आवडता रोल तर कधी एखाद्या ड्रेसमध्ये स्टेजवर घेतलेले बक्षीस ..

कितीतरी फॅशन्स आल्या आणि गेल्या पण तरी 'बालपणीच्या फॅशन सुखाच्या' वाटतात ते कदाचित या नॉस्टेलजिआमुळेच!

- दीपाली देशपांडे.