« | »




चुटकीसरशी....

लहानपणापासून ह्या शब्दाचं मला भारी आकर्षण. हा शब्द मला जादूसारखा वाटतो अगदी. काही लोक काही गोष्टी अगदी चुटकीसरशी करतात. एखाद्याला एखादं काम करायला खूप वेळ किंवा प्रयत्न करावे लागतात, तेच काम काही लोक अगदी चुटकीसरशी करून टाकतात. अलीकडे, आशाकडे ऑफिसमधून येताना थांबले होते. म्हणजे तिचंच काम होतं. घरी जाता जाता थांब गं जरा म्हणाली, म्हणून गेले तिच्याकडे. " आलीस, बस जरा. मी चहा टाकते गं तुझ्यासाठी." म्हणाली खरी, पण जागची हलेना. म्हटलं काय गं एवढं घाईघाईने बोलवलंस? तर म्हणे थांब चहा घेत घेत बोलू. पण जागची हलेना आणि जेव्हा हलली, तेव्हा गजगतीने चालत. पण बोलणं मात्र एक्स्प्रेस सारखं चालू. नो वंडर, ही दिवसभराची कामं संपतच नाहीत, म्हणून नेहमी तक्रार करत असते. त्याउलट दीपा. कधी घरी गेलं, की बोलता बोलता चहा आणि गरम-गरम भजी कधी करून समोर आणून ठेवेल ते समजणार पण नाही. अगदी चुटकीसरशी....

कधी कधी तुम्हाला असं होतं का? साध्या साध्या गोष्टी जमतच नाहीत. मी कॉलेजमध्ये असताना टॅटिन्गची फुलं, लेस वगैरे करायचं वेडच निघालं होतं. चिमट्यासारखं दिसणारं शटल असतं आणि त्याने भराभर दोर्‍याची फुलं वगैरे करता येतात. ते शटल उजव्या हाताने भरभर डाव्या हाताच्या बोटांवर गुंडाळलेल्या दोर्‍यातून काढून सरकत्या गाठी मारायच्या असतात आणि त्या गाठी मारताना दोर्‍याचं लूप चारच्या आकड्यासारखं दिसलं की सरकती गाठ बसते, नाहीतर चुकीची घट्ट गाठ बसते आणि मग उसवाउसवी करत बसावी लागते. कित्येक दिवस मला ती चारची गाठ कुठे बघायची आणि कशी करायची ते समजलंच नाही आणि जेव्हा समजली, तेव्हा टॅटिन्ग अगदी यायला लागलं, ते चुटकीसरशी....

म्हणजे कधी कधी काय होतं, फंडामेन्टल्सच क्लिअर नसले तर किती समजवा समजतंच नाही, नाहीतर चुटकीसरशी प्रॉब्लेम समजून जातो. एकदा मी बेसिक अल्जिब्राचा क्लास शिकवत होते. सहज प्रश्न विचारला, " डॅलस जर इथून सहाशे मैलावर आहे आणि तुम्ही साठ मैलाच्या स्पीडने जात असाल, तर तुम्हाला डॅलसला पोहचायला किती वेळ लागेल? प्रश्न संपता संपता एकानं उत्तर दिलं, आठ तास. म्हटलं, " कसं काय? " तर म्हणे, " गेल्याच आठवड्यात गेलो होतो डॅलसला ड्राईव्ह करून आणि मला आठ तास लागले. " म्हणजे तो विद्यार्थी मूर्ख होता अशातला भाग नाही, पण चुटकीसरशी उत्तर देताना, प्रश्न काय विचारला आहे ह्याकडे लक्षच नव्हतं. कारण जेव्हा मी सिम्पल प्रॉब्लेम " क्ष " घेऊन कसा सॉल्व्ह करता येतो हे सांगायला लागले तेव्हा बिचारा चेहरा टाकून बसला होता.

आमची सेक्रेटरी तर अगदी टेलेपथी असल्यासारखी क्लायंटचा फोन आला, की न विचारता नेमक्या लागणार्‍या फाईल्स् चुटकीसरशी हजर करते. अगदी सर्जन जेव्हा सर्जरी करताना स्कॅल्पल म्हणतो, तेव्हा ज्या तत्परतेनं त्याची असिस्टंट स्कॅल्पल देते, अगदी तितक्याच इफिसिएन्सीने.

लहानपणी पोटात दुखत असलं की आई म्हणायची, " थांब हं पोटावरून हात फिरवते, एका चुटकीत बरं वाटेल. " आईच्या हाताचा स्पर्श म्हणून असेल, पण खरंच चुटकीत बरं वाटायला लागायचं. अर्थात चुटकीची लांबी प्रत्येक वेळेवर किंवा गोष्टीवर अवलंबून असते हे तेवढंच खरं.

काम करत असताना डे ड्रिमिंग चालू असलं की टेलीफोनची घंटा चुटकीसरशी आणतेच की आपल्याला वर्तमानकाळात. कित्येक निर्णय आपण चुटकीत घेतो. किती भांडणं आपण चुटकीत मिटवतो. कित्येकदा तरी आपण चुटकीत जुन्या आठवणीत स्वतःला विसरून जातो. चुटकीत वय विसरून लहान मुलांसोबत मूल होऊन जातो आणि आनंद उपभोगतो. केवढं महत्त्व आणि सुख आहे नं ह्या चुटकीत?

- आर्च