« | »




बदल

"अरे देवा, वैताग आला ह्या कामाचा.. आमचं टेबल सांभाळाच पण काय तर म्हणे दुसर्‍या टेबलावरचाही "कचरा" तुमचाच.. आणि देणार काय तर जास्तीत जास्त १०%.. त्यात ही नवीन कॉम्प्युटर शिकण्याची भुणभुण..त्यातून पुढे स्टाफ कमी करणार आहेत म्हणे.. कठीणच आहे एकंदर.." सरकारी हापीसात सव्वा एकतीस वर्षे मुरलेल्या (प्रामाणिक आणि पापभीरू) वसंतकाकांचे ऑफिसातल्या एका लांबलेल्या संध्याकाळचे हे हताश उद्गार... सर्वसाधारणपणे बदल म्हटलं की कपाळावर आठी येणारी, ठेविले अनंते तैसेची रहावेच्या रसायनावर वाढलेली पिढी..

" That's really exciting.. Not a problem Sir.. as IT professional I have to be flexible. .I am on my toes and will accept this opportunity with my both hands.. I am ready for the move.. thanks again.. " ठप्प.. फोन ठेवला जातो.. एखादी नवीन गोष्ट करायला, शिकायला मिळणार म्हणून अमितच्या चेहर्‍यावरचा उतावीळपणा स्पष्ट दिसतोय.. आणि त्याचबरोबर नवीन ठिकाणी जाण्याची नवीन माणसांना भेटण्याची अधीरताही..

काय दिसतो फरक आपल्याला ह्या दोन प्रसंगात.. नवीन पिढी आणि जुन्या पिढी चा दृष्टिकोन, इतकाच?

प्रातिनिधीक दृष्ट्या ते बरोबर असेलही पण त्याहीपेक्षा नवीन आव्हानास, बदलास सामोरे जाण्याची वृत्ती विशेषत्वाने आजच्या नवतरूण पिढीत जाणवतेय! बदलते सामाजिक, आर्थिक वातावरण आणि शिक्षणाच्या सोयी - सुविधा, स्पर्धात्मक युग आणि त्यात टिकण्याची धडपड ह्या सगळ्यातून बदल स्वीकारण्याची इतकेच नव्हे तर तो जिंकण्याची मनोवृत्ती आजच्या पिढीत निर्माण होतेय.

हे सगळं आज सांगायचं कारण हेच की जागतिकीकरणाने जग खूप जवळ आलंय, दळणवळण सुधारलंय आणि आता वैश्विक स्पर्धेचं युग सुरु झालंय. आपल्या सभोवातलच्या अनेक लहान मोठ्या बदलांना सामोरे जाण्यासाठी, नव्हे त्यांना पचवण्यासाठी स्वतःमध्ये, विचारांमध्ये काही अनुषंगिक बदल करायला हवेत, किमान त्या बदलांची अपरिहार्यता मान्य करायला हवी आणि मिळणार्‍या ह्या सुसंधींचा आपले, कुटुंबाचे आणि समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी लाभ करून घ्यायला हवा.

मागील पिढीस सांभाळणे आणि पुढील पिढीस सुसंस्कारीत करणे ह्या दोन्ही गोष्टींचे भान ठेवत ह्या बदलांना सामोरे जाणे हे आजच्या पिढीपुढे खरे आव्हान आहे. चांगल्या बदलांचे स्वागत करून त्यांविषयी सकारात्मक दृष्टी ठेवणे ह्यासाठी फार गरजेचे आहे. दुसरी तितकीच महत्वाची गोष्ट म्हणजे जागरूकता. एखादा बदल आपल्यावर लादला जाऊ नये म्हणून त्याविषयी सदैव सतर्क रहाणे हा एक उत्तम उपाय ठरतो. म्हणजे तो बदल स्वीकारण्यासाठी मानसिक, कौटुंबिक वा इतर दृष्टीकोन तयार करण्यात पुरेसा अवधी मिळतो. बरेचदा ह्याचा सकारात्मक फायदा घेता येऊ शकतो. ह्यात तरबेज असणार्‍या व्यक्तींना आपण द्रष्टा असे म्हणतो. तात्पर्य हे की स्थैर्याच्या कालावधीत शैथिल्य येऊ न देता बदलाची चाहूल घेत सतर्क रहाणे अंगी बाणवणे अतिशय महत्वाचे ठरते. " Who moved my cheese? " ह्या लहानशा पुस्तकात बदलांचे महत्व, परिणाम आणि जागरुकता ह्यांविषयी छान ऊहापोह केला आहे. या धावत्या युगात सतर्क राहूनही काही वेळा गोष्टी अचानक सामोर्‍या येतात, अशा वेळी बदलास ठामपणे सामोरे जाऊन हतबल न होता सकारात्मक दृष्टीकोन ठेवून परिस्थितीचा जास्तीत जास्त सदुपयोग कसा करून घेतला जाईल हे बघितले पाहीजे.

पूर्वी घराच्या जवळपास नोकरी धंदा बघणारी मुले आज भारताच्या आणि जगाच्याही कानाकोपर्‍यात जाऊन नशीब आजमावू पहात आहेत. त्यांच्या धिटाईचे आणि उत्साहाचे कौतुक करावे तितके थोडेच. परंतु जसे कोणत्याही गोष्टीचा विपर्यास आणि अतिरेक वाईट तसाच बदलाचाही. नाविन्याचा ध्यास हा हवाच पण त्यातूनही काही वेळा केवळ हौस म्हणून किंवा हव्यासापोटी लघु दृष्टीकोनाने दर काही महिन्यांनी नोकर्‍या बदलणार्‍या अस्थिर मुलांकडे पाहिलं की कुठे थांबावं हे कधी ह्यांना कळेल का ह्याची काळजी वाटते.

जसं नोकरीचं तसंच विवाहाचं. विवाह हा मुलगी, मुलगा तसेच दोन्ही घरे ह्यांमधील एक बदल आहे. नवीन माणसे जोडणे आणि सामावून घेणे ही कला आहे आणि ह्या बदलास उत्तमरीतीने आणि दक्षतेने सामोरे जाण्यासाठीच शुभमंगल "सावधान" असे म्हटले जात असावे. सांगायचा मुद्दा हा की विवाह हा आयुष्यातला बदल जितक्या सहजतेने हाताळला जाईल तितके ते दांपत्य आणि दोन्हीकडील परिवार अधिक सुखी आणि समाधानी होतील.

निवृत्ती हा सर्व सामान्य माणसाच्या आयुष्यातला अजून एक बदल. जितके पूर्वतयारीने आणि शांतपणे तुम्ही ह्यास सामोरे जाल तितके तुमचे उत्तर आयुष्य आरोग्यदयी, आनंददायी आणि समाधानी होऊ शकेल, तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठीही.

परराज्यात आणि परदेशात राहून काम करणार्‍या, सामाजिक आणि कार्यालयीन वातावरणाच्या बदलातून नेटाने पुढे वाट काढत मायबोली तसेच इंटरनेटच्या माध्यमातून आपली संस्कृती आणि घरपण जपणार्‍या युवक युवतींचे विशेष कौतुक करावेसे वाटते. असे अनेक बदल, स्थित्यंतरे डोळस पणे बघत, ओलांडत पुढे जाताना मी ही ह्या बदलाचा एक भाग झालोय हे लक्षात येतं किंवा " आमच्या वेळी असं नव्हतं " असं म्हणणार्‍या आत्या, काक्या, माम्यांकडून लक्षात आणून दिलं जातं तेव्हा मनात येतं.. " Change is the only constant thing.. you change it or get ready for the change ".

- उपास