« | »




ये कहाँ आ गये हम...

- सोनचाफा

जर एक ऑस्ट्रियन, एक रशियन, एक अमेरिकन, एक इटॅलियन आणि एक इंडियन अशा पाच मुली फ्रांसमध्ये एकाच घरात रहात असतील तर काय होईल? नाही, मी तुम्हाला कुठलंही कोडं घालत नाहिये किंवा एखादा विनोद सुद्धा सांगत नाही आहे. मी माझा स्वत:चा अनुभव सांगते आहे. नाही विश्वास बसत? अहो, हे खरंच घडलं आहे आणि ह्यात एकाही शब्दाची अतिशयोक्ती नाही. ऑस्ट्रियन नदिन, रशियन लिलिया, अमेरिकन लॅडेल, इटॅलियन अलिचा आणि भारतीय मी..!

परदेशात मराठी माणूस जातो. तो ऑफिसमध्ये अनेक परदेशी माणसांबरोबर हसत खेळत काम करतो, पण घरी परततो तेव्हा तो त्याच्या भारतीय रुममेट्स बरोबर गप्पा मारतो, एकत्र भटकतो नाहीतर त्याच्या कुटुंबात रमून जातो. एखादा हॉस्टेल वर राहणारा
आजुबाजूच्या लोकांशी दोस्ती करतो आणि पुन्हा स्वत:च्या खोलीत बंदिस्त होतो. मराठी मंडळ असेल तर तिथे जाऊन सण साजरे करतो. पण मी अशी भाग्यवान की मी फ्रांसमध्ये राहत असताना फ्रेंच सहकार्‍यांबरोबर काम करत होते आणि गरमागरम चहा घ्यायला परतत होते ते चार वेगवेगळ्या देशांच्या संस्कृतीची ऊब देणार्‍या घरात...

एक मात्र खरं! फ्रांसमध्ये मराठी माणूस म्हणून फ्रांसच्या संस्कृतीशी ओळख करून घेत असतानाच इतरही देश आणि तिथली संस्कृती जाणून घेणं आणि त्यांची फ्रेंच संस्कृतीबद्दलची मतं जाणून घेणं हा एक विलक्षण अनुभव होता. अनेकदा तर असं झालं की त्यांच्यात मिसळून राहताना कधी कधी मी माझे मराठीपणही विसरून जात होते किंवा खरं म्हणाल तर मला ते विसरणं भाग पडेल अशीच तिथली परिस्थिती होती.

इंग्लिश असिस्टंटच्या पार्ट्-टाईम नोकरीसाठी ऑक्टोबर २००५ ते जून २००६ फ्रांसमध्ये रहाण्याची संधी मला मिळणार होती. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस भारतातून निघताना माझी रहायची सोय कुठे होणार, तिथून नोकरीची ठिकाणे किती दूर असणार वगैरे गोष्टींची काहीच माहिती नव्हती. व्हिसा मिळण्यासाठी फ्रेंच सरकारकडून आलेलं, माझी ज्या शाळांत नेमणूक झाली होती त्यांची नावं असलेलं एक अपॉइंटमेंट लेटर काय ते फक्त माझ्या हातात होतं. भारतातून निघण्या आधी फ्रांसमधल्या राहण्याची सोय झालेली असली तर बरं असं वाटत असल्यामुळे त्या दृष्टीने माझ्या कोऑर्डिनेटरशी संपर्क हळूहळू चालला होता. हळूहळू म्हणण्याचं कारण असं की फ्रेंच माणूस काँप्युटर वापरायच्या फंदात फारसा पडत नाही असा मला अनुभव आला. परदेशातल्या वास्तव्याचं नियोजन करताना बरीकसारीक गोष्टींकडे किती लक्ष द्यावं लागतं आणि असं असताना जेव्हा साधं एका ई-मेल ला उत्तर यायला दिवस दिवस लागतात तेव्हा सहनशक्तीचा अंत बघणे म्हणजे नेमकं काय हे कळतं. त्यामुळे इथून निघेपर्यंत , 'अजून काही सोय झालेली नाही' इतक्या माहितीवर मी आणि माझ्याच गावापासून जवळ असलेल्या इतर गावातल्या शाळांमध्ये नेमणूक झालेला प्रशांत असे आम्ही दोघं एकमेकांना, 'बघू रे काहीतरी होईल' असा विश्वास देत बसलो होतो. फ्रांसमध्ये Valenciennes ला आम्ही पोहोचण्याच्या वेळेचा फक्त अंदाज कोऑर्डिनेटरला देऊन मी घरातून निघाले होते. आणि हे असं सगळं असताना घरून मला जायला परवानगी मिळाली हे माझं मोठं नशीबच मानलं पाहिजे.

फ्रांस म्हणजे पॅरीस हे समीकरण आपल्यापैकी बहुतांशी लोकांच्या मनात असणं अगदी स्वाभाविक आहे. पॅरीस तसं आहेच सुंदर शहर! परंतु फक्त पॅरीस म्हणजे फ्रांस असं निश्चितच नाही. पर्यटनाच्या हेतूनी जाणारे सगळेच जण आयफेल टॉवर, लुव्र म्युझियम, युरोडिस्ने वगैरे निवडक पर्यटन स्थळं बघून फ्रांस पाहिल्याचं समाधान करून घेतात. पण खरं फ्रांस समजतं ते छोट्या गावात राहून, तिथल्या माणसांशी जवळीक झाल्यावरच. आणि हे मला स्वत: अनुभव घेतल्यावर प्रकर्षाने जाणवलं. Lyon, Grenoble, Lille अशा मोठ्या शहरांचा उतरत्या क्रमाने माझी निवड सांगून सुद्धा माझी Lille पासून साठ-सत्तर कि. मी. वरच्या दोन छोट्या गावात नेमणूक झाली हे पाहून मी सुरुवातीला खट्टू झाले होते. युनिव्हर्सिटीत जाऊन पुढचं शिक्षण नोकरीबरोबरच करायची माझी इच्छा होती आणि त्यामुळेच शैक्षणिक दृष्ट्या महत्वाची ही शहरे मी निवडली होती. पण फ्रांसला जायला निघण्याच्या तीन आठवडे आधीपर्यंत माझं अपॉईंटमेंट लेटर सुद्धा माझ्या हातात पडलं नव्हतं. त्यामुळे मी कोणत्या शहरात जाणार ह्याचीच कल्पना नसल्याने मी कोणत्या युनिव्हर्सिटीत एम्. ए. करू शकते आणि त्यासाठी तिथे मला कोणी प्रोजेक्ट गाईड मिळू शकतो किंवा नाही ह्यासाठी प्रयत्नच करता येत नव्हते. मला Valenciennes ह्या Lille पासूनसुद्धा दूर अशा छोट्या गावात जायचे आहे हे कळल्यावर माझी मोठी निराशा झाली. त्यातून माझ्या Valenciennes च्या युनिव्हर्सिटीशी ई-मेलने संपर्क साधण्याच्या प्रयत्नालाही यश आलं नाही. मुळातच फ्रांसमध्ये शिक्षण घेणं ही मध्यमवर्गीय माणसाला सोपी गोष्ट नाही. अमेरिकेत शिक्षणासाठी मिळणार्‍या aids मुळे तिथे शिक्षण घेणं काही अंशी सोपं होतं परंतु अशी मदत फ्रेंच युनिव्हर्सिटीत मिळत नसल्याने तिथली फी आणि राहण्याचा खर्च आपल्यालाच करावा लागतो. ह्याचमुळे इच्छा असूनही ह्यापूर्वी मी तिथल्या शिक्षणाचा विचार कधी केला नव्हता. जमल्यास फ्रांसमध्ये पोहोचल्यावर त्या दृष्टीने प्रयत्न करायचे असं ठरवून मी निघाले. फ्रांसमध्ये तिथल्या युनिव्हर्सिटीत शिकायचे असेल तर सगळी सर्टिफिकेट्स फ्रेंचमध्ये सर्टिफाईड भाषांतरकाराकडून अनुवादित करून न्यावी लागतात. आणि त्यावर फक्त भाषांतरकाराचा स्टॅंप असून पुरत नाही तर त्यावर फ्रेंच कॉन्स्युलेटमधून स्टॅंप मारून घ्यावा लागतो. मॅनेजमेंटचे खाजगी शिक्षण देणार्‍या संस्थांबद्दल माहिती नाही, परंतु युनिव्हर्सिटीत इंग्रजी सर्टिफिकेट्स वर विश्वास ठेवला जात नाही हे खरं! इंग्रजी कळत नाही हे ह्यामागचं खरं कारण आहे की आणखी काही हे देवच जाणे.

प्रशांतबरोबर पॅरीसहून आधी Lille आणि मग तिथून पुढे दुपारच्या वेळेस Valenciennes ह्या गावी जाऊन पोहोचले. आमच्या येण्याची वेळ आमच्या कोऑर्डिनेटरला माहीत असल्यामुळे ती आम्हाला घ्यायला स्टेशनवर आली आहे हे पाहून अगदी रस्त्यावर रहायची वेळ येणार नाही ह्याची खात्री पटली. दुपारी साडेतीन वाजता एक घर; घर म्हणण्यापेक्षा विद्यार्थ्यांना रहायला खोल्या, भाड्यावर देणार्‍या एका घरमालकाला भेटायला जायचं आहे असं सांगून मार्टिनने तिच्या गाडीत आमच्या बॅग्स टाकल्या आणि एका मीटिंगसाठी ती निघून गेली. जाताना म्हणाली, "जरा भटकून घ्या शहरात आणि मला भेटा तीन वाजता ह्याच सर्कलपाशी!"

पुढचे नऊ महिने ज्या शहरात रहायचे, त्या शहराशी पहिली झालेली ओळख म्हणजे केवळ एक अपेक्षाभंग! शहरात ट्रॅम्स सुरू करण्यासाठी सर्वत्र रस्ते खणून ठेवलेले. त्यामुळे आपण एक भारत सोडून दुसर्‍या भारतात आलो आहोत, केवळ वर्ण काय तो भिन्न असे वाटल्यावाचून राहिले नाही. दुपारची वेळ असूनही त्या भागात बर्‍यापैकी गर्दी होती बहुतकरून शॉपींगसाठी बाहेर पडलेल्या त्या फ्रेंच ललनांची! बाटा, मॅकडोनल्ड सारखी दुकाने तिथेच शहराच्या मध्यभागी मेअरी पाशी होती. बरीचशी लहानमोठी रेस्टॉरंट्स होती. धूळ वगळता शहर बर्‍यापैकी स्वच्छ होते. युरोपिय बांधणीच्या इमारती, वाईनची, चीझची दुकानं पहात असताना एकीकडे मनात मात्र कुठेतरी हे शहर आवडूनही गेलं होतं.

मार्टिनने सुचविलेल्या ह्या वकील माणसाकडच्या फार काही सोयी नसलेल्या दोन खोल्या, माझ्यासाठी पहिल्या मजल्यावर आणि प्रशांतसाठी दुसर्‍या मजल्यावर आम्ही नाईलाजाने पक्क्या केल्या आणि प्रवासाने दमलेले आम्ही विसावलो. सहा पैकी दोन खोल्यांत दोन फ्रेंच मुलगे आधीपासूनच राहत होते. कॉमन टॉयलेट्स आणि बाथरूम, दुसर्‍या मजल्यावर दोन कॉमन फ्रिज. मी पहिल्या चार दिवसातच मनापासून कंटाळले. एका हॉटप्लेटवर दोन वस्तू बनवायच्या तर आधी बनवलेली वस्तू कधीच थंड होऊन जायची आणि जेवणातला मूडच निघून जायचा पार.. शनिवार, रविवार म्हणजे अगदी नको व्हायचे कारण मुख्य वस्तीपासून पंधरा-वीस मिनिटांच्या अंतरावर आम्ही राहत होतो. रविवारी एकही दुकान चालू नसायचे आणि साधा बागेत फ्रेन्च ब्रेड सुद्धा मिळणे कठीण असायचं. पूर्ण दिवसात एकही व्यक्ती त्या गल्लीतून जाताना दिसायची नाही आणि मुंबईच्या गर्दीला सरावलेले डोळे मग समोरच्या घरातली मनीमाऊ छपरावर दिसली तरीही सुखावायचे.

शहर मुळातच लहान असल्यामुळे तिथली एक मोठी बाग, दोन चर्चेस आणि एक इवलंसं म्युझियम पहिल्या आठवड्यातच फिरून झालं. शहरात मराठीच काय पण भारतीयही कोणी नसावा त्यामुळे भारतीय म्हणता येईल असे काहीच नव्हते. शहरात देऊळ नव्हते पण मोरोक्कन वस्ती असल्यामुळे छोट्याशा घरात का होईना एक मशीद होती. नऊ महिने फिरून फिरून कुठे फिरायचे आणि वीकएंडला करायचे तरी काय असं मनात आल्यावाचून राहिलं नाही. त्यातच राहत्या घराजवळ फार मनुष्यवस्ती नसल्याने घरी आले की नकोसं होऊन जात असे. ह्याच मुळे जेव्हा Lycé¥ Wallon मधल्या अपार्टमेंटबद्दल कळलं तेव्हा तिथे जाऊन ते घर बघून यायची इच्छा निर्माण झाली. Valenciennes मधल्या ह्या हायस्कूल मध्ये वेगवेगळ्या भाषा शिकवायला जे असिस्टंट्स आले होते त्यांच्यासाठी असलेल्या मुलांसाठीच्या आणि मुलींसाठीच्या दोन फ्लॅट्स मध्ये प्रत्येकी
एक जागा शिल्लक होती. ह्या हायस्कूल मधले सगळे लोक एवढे चांगले होते की आम्ही तिथे नोकरी करत नसूनसुद्धा तिथे आमची राहयची सोय त्यांनी आनंदाने केली. खरं तर इतर सर्व असिस्टंट्स फक्त सात महिन्यासाठी राहणार होते पण प्रशांत आणि माझे काँट्रॅक्ट नऊ महिन्यांसाठी होतं. इतर सगळे परत गेले तरी आम्ही तिथे राहणार आहोत ह्याचीही त्यांना अडचण नव्हती. हे वेळेवारी कळल्यामुळे वकील घरमालकाबरोबर कॉन्ट्रॅक्ट न करता फक्त पहिल्या महिन्याचं भाडं जागा ठरवताना दिलेलं असल्याने अगदी दिवस मोजत मोजत आम्ही एक महिना ह्या जुन्या घरात काढला. घर सोडताना दु:ख जरी झालं नाही तरी वकील माणसाच्या तावडीतून सुटताना त्रास मात्र थोडाफार झालाच. कारण आम्हाला दुसरा इलाज नसल्याने नऊ महिन्यांसाठी दोन भाडेकरू मिळाल्याने तो आनंदातच होता.

प्रत्यक्ष घरात रहायला जाण्या आधीच त्या घरी एक-दोन खेपा झाल्या. त्या खेपांतच ते घर आपलं वाटू लागलं आणि त्यासाठीही विशेष कारण घडलं. फ्रांसमध्ये पोहोचल्यावर लगेचच माझा वाढदिवस होता. अर्थातच त्याची कोणालाच कल्पना नव्हती. आणि आपणच आपल्या वाढदिवसाबद्दल काय जाहिरात करायची? म्हणूनच मार्टिनने जेव्हा नेमकं त्याच दिवशी आम्हाला तिच्या घरी जेवायला बोलावले तरी आम्ही आमंत्रण नाकारले नाही. प्रशांत, माझ्याच शाळांमध्ये असलेली एक जर्मन असिस्टंट नदिन आणि मी. आम्ही ती संध्याकाळ मर्टिन, तिचा नवरा फ़िलिप, आणि त्यांचे तीन मुलगे ह्यांच्याबरोबर मौजमजेत घालवली. वाढदिवस म्हणून औक्षण होऊन जरी नसला तरी खाण्या-पिण्याची चंगळ होऊन दिवस साजरा झाला हे नक्की. त्यानंतरच्या वीकएंडला मला आणि प्रशांतला ह्या सगळ्या मुलींनी घरी जेवायला बोलावले. प्रशांत ज्या असिस्टंटबरोबर रहाणार होता तो निकारागुआचा डेनीस, नवीन ओळख झालेला कॅनडचा डेव्हिड अशी आणखी काही जण सुद्धा आली होती. इटॅलियन पास्ता खाऊन झाल्यावर ह्या मुलींनी मला माझी प्लेट सुद्धा उचलू दिली नाही असे सांगून की मी अजून तिथे रहायला गेले नव्हते त्यामुळे त्या दिवशी मी त्यांची पाहुणी होते. पण खरे कारण वेगळं होतं. जेवण होताच टेबल वरून प्लेट्स जाऊन केकने भरलेली प्लेट आली आणि Muscadet Pink वाईनने भरलेले पेले आणले गेले. माझ्या ध्यानीमनी नसताना नदिन म्हणाली
" कोणाचातरी इथे आल्यावर वाढदिवस झाला आणि तिने तो इथे साजरा केला नाही. म्हणून आज आपण तिचा इथे वाढदिवस साजरा करत आहोत. We give her a toast !"
रोख अर्थातच माझ्याकडे होता. तर फ्रांसमधला माझा वाढदिवस हा अशा पाश्चात्त्य पद्धतीने साजरा झाला. पुढचे सहा महिने ह्याच गोतावळ्यात राहिल्याने सगळ्यांचेच वाढदिवस अशा पद्धतीने साजरे केले गेले. आणि त्यामुळेच मराठी पद्धती विसरून जरी गेले नाही तरी थोड्या काळासठी त्या बदलल्या नक्कीच गेल्या.

Valenciennes हे छोटं गाव असलं तरी तिथे रेल्वे स्टेशन होतं. आजुबाजूच्या छोट्या गावांना ही सोय नसल्याने तसंच इथे युनिव्हर्सिटी, अनेक शाळा आणि कॉलेजेस असल्याने वर्दळ भरपूर होती. सुरुवातीच्या घरापासून जवळच म्युझियमच्या आवारात दर बुधवारी आणि शनिवारी आठवड्याचा बाजार भरत असे. सुरुवातीचे काही दिवस भाज्या, फळं अशा काही वस्तू घेण्यासाठी मी तिथे फेरफटकाही मारत असे. परंतु हा बाजार नंतर दूर पडू लागल्यामुळे तिथे जाणं कमी झालं. एकतर नंतर थंडीत सकाळी लवकर उठून शनिवारी तिथे जाण्याचा आळस येऊ लागला आणि दुसरे म्हणजे नव्या घरापासून जवळच एक सुपरमार्केट असल्यामुळे घरी कामावरुन परतताना गरजेनुसार वस्तू घेऊन येणं सोयीचं होतं. सगळी खरेदी डेबिटकार्डवर होत असल्याने बाजारात जाताना जवळ रोख पैसे ठेवायचीही गरज त्यामुळे राहिली नाही. फ्रांसमध्ये एक जाणवलं, अगदी चार युरोच्या खरेदीसाठीही कार्डचा वापर सर्रास केला जातो. जर्मनीतही तेच डेबिट कार्ड वापरताना अडचण आली नाही. पण इटलीत अगदी युथ हॉस्टेलचे पैसे सुद्धा रोख द्यावे लागत होते.

भरल्या घरात रहायला आल्यावर दिवस असे काही पळू लागले की विचारता सोय नाही. दर रविवारी संध्याकाळी एक जण आपल्या देशातली काही खासियत इतर सगळ्यांसाठी बनवित असे. इटॅलियन पास्ता, रशियन चिकन, चिझमध्ये बटटा आणि मश्रुम्स, औस्ट्रियन चिकन, अमेरिकन लॅडेलनी पिझ्झा बेससकट घरी बनविलेला पिझ्झा, मी बनवलेली पावभाजी, छोले, खीर, डेनीसनी चिकन घालून बनविलेला राईस, अवोकॅडो पासून बनवलेलं सॅलड, लॅडेलनी Thanksgiving साठी बनवलेले पॅनकेक्स. किती म्हणून पदार्थ चाखले असतिल! अगदी रात्री जेवणानंतर लॅडेलने बनवलेली फ्रेंच पद्धतीची डार्क कॉफ़ी थोडीशीच प्यालेली असेल पण त्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे.

वर जरी उल्लेख आम्हा पाच जणींचा होता तरी सुरुवातीला आम्ही प्रत्यक्षात सहा जणी होतो. दोन दोन ऑस्ट्रियन नदिन आमच्या घरात होत्या. एक हायस्कूल मध्ये शिकवायची आणि दुसरी माझ्याच शाळांमध्ये जर्मन शिकवायची. गमतीचा एक भाग असा होता की ह्या दोघीही ऑस्ट्रियन असून आणि एकाच शहरातील असून त्यांची एकमेकींशी ओळख इथे फ्रांसमध्ये आल्यावर झाली होती. परंतु माझ्याबरोबरच्या नदिनचे एकंदरीत सूर कुठेच जुळले नाहीत. ती बुद्धिबळात नुसतीच निपुण नव्हती तर ज्युनियर्सची चॅंपियन म्हणून ऑस्ट्रियाचे नेतृत्व करीत होती. शाळांमधून जर्मन बरोबर चेस शिकवताना वरवर रमली असे वाटले तरी प्रत्यक्षात ती काही तिथे तग धरून राहू शकली नाही. तब्येतीवर परिणाम तर दिसू लागलाच पण घरातही चिडचीड सुरु झाली. डिसेंबरच्या सुटील ती घरी गेली ते परत आली सगळे सामान बांधून घरी परत नेण्याच्या उद्देशानेच. घरात एवढे छान वातावरण असताना असं का व्हावं ह्याचा आम्हाला विचार तर पडलाच पण लक्षात आलं की स्वभाव जुळवून घेऊन, एवढ्या जणांत मिसळून राहताना, नव्या जागेशी जुळवून घेताना, रूम दुसर्‍या कोणाबरोबर शेअर करताना तिला कठीण गेलं होतं. त्यामुळे फ्रेंच संस्कृतीला तशी जवळची असूनही, तसंच भौगोलिक दृष्ट्या जवळचे देश, सारखे तापमान असं सगळं ओळखीचं असून पुरत नाही ह्याची खात्री पटली. दुसर्‍या बाजूला अम्ही पाच जणी थोड्याच काळात एक कुटुंब बनून गेलो होतो. रोज एकत्र जेवायला का नसेना पण शिळोप्याच्या गप्पा मारायला का होईना घरी एकत्र असायचो. कधी कोणाच्या रुममध्ये लागलेल्या संगीताने आकर्षित झाल्यामुळे असेल, कधी कोणी केलेली खरेदी बघायला गेल्याने असेल पण एकमेकींच्या खोलीत आमच्या गप्पांच्या मैफिली रंगायच्या. घराची साफसफाई मिळून मिसळून केली जायची. कामचुकारपणा करायची कोणाला लहर आली तरी पुढच्या वेळेस जास्तीची जबाबदारी घेण्याचीही तयारी दाखवली जायची. एक दोन्-चार गरमागरम संवाद सोडल्यास कधी मोठी भांडणे झाल्याचीही आठवण नाही. एकमेकांच्या सुखदु:खात तिला सांभाळून घेऊन समजूत काढण्यापर्यंतही जवळीक आमच्यात कधीच निर्माण झाली होती. एकमेकांच्या सवयी सुद्धा थोड्या अंगवळणि पडल्या होत्या. माझे आपल्यासाठी नॉर्मल म्हणता येईल एवढेच तिखट खाणे पाहून सुद्धा घाबरून जाणारी अलिचा आठवली की इथे माझ्या हातून कमीच तिखट घातलं जातं. पण सवय झाली आहे त्याची. नेहमी म्हणायची
" कसे गं एवढे सगळे मसाले खाता एकत्र? आणि त्यातून म्हणतेस की भारतात खूप ऊष्ण हवामान आहे. तरीसुद्धा एवढे मसाले, एवढे तिखट? 1d

भारतात परत आल्यापासून माझी खासियत असणार्‍या पदार्थांना चव नाही असं म्हणण्याचं धाडस सर्रास कोणीही करून जातो. पण " किती मसाले खाते आहेस? " असं अलिचा दरडावून म्हणत असल्याचा मला भास होतो, पदार्थात कमी तिखट घातलं जातं आणि स्वयंपाकाची सवय गेली आहे ह्या सबबीखाली मी वेळ मारून नेते.

पाश्चिमात्त्य आणि भारतीय संस्कृती किती वेगळ्या आहेत हे मला एकदा शाळेत शिकायला मिळालं. शाळेत एका लहान मुलांच्या वर्गात इंग्रजीची थोडीफ़ार सुरुवात करताना मी आपलं नाव कसं सांगायचं किंवा कुठे राहतो ते कसं सांगायचं हे शिकवत होते. हे शिकवणं पूर्णपणे तोंडीच असे. त्यामुळे उच्चार हा सर्वात महत्वाचा. तर त्या वर्गात एक मुलगी वारंवार एका शब्दाचा उच्चार चुकीचा करत होती आणि त्या प्रकारने दुसरी मुलगी अस्वस्थ झाली होती. त्यामुळे ती दुसरीला योग्य उच्चार सांगायचा प्रयत्न करीत होती. फ्रेंचमध्ये 'ट, ड, थ' हे वर्ण नसल्यामुळे त्यांचा उच्चार त्यांना सुरुवातील कठीण जात असे. मी थोडं दुर्लक्ष करून पुढच्या मुलाकडे वळणार होते कारण ती तर सुरुवात होती आणि अचूक उच्चार हे सवयीनेच येणार ह्याची मला खात्री होती. पण तिथल्या वर्गशिक्षिकेनं त्या मुलीला चार शब्द सुनावले.
" तू तिच्याकडे लक्ष देऊ नकोस. तू तुझ्या उच्चाराकडे लक्ष दे. तिने चूक केली तर तिचा तोटा आहे. ती चूक करतच शिकेल. "
इथपर्यंत ठीक होतं. पण पुढच्या एका गोष्टीनं माझ्यावरचे संस्कार, माझी वागणूक हे चुकीचे आहेत की काय असच मला वाटून गेलं.
" नेहेमी स्वत:चा विचार आधी करावा. आपल्याला काय हवं ते आपल्याला मिळालं आहे ना हे बघावं. आणि मग दुसर्‍याची गरज काय आहे आणि, त्याला जे हवं आहे ते आपल्याला देता येणार आहे का हे बघायला जावं. आधी आपण मग दुसरा.. !"

इतरांचा विचार आधी करायला शिकवणारी आपली संस्कृती नसती तर आपल्यापैकी सगळेच जण केवळ आपल्याला जे हवं ते मिळवून मोकळे झाले असते असं मनात आलं. विमानात सेफ़टी मेजर्स सांगताना एअरहोस्टेस जेव्हा 'स्वत:चा ऑक्सिजन मास्क आधी लावा आणि मग इतरांना मदत करा' असं सांगते तेव्हाही हीच गोष्ट नेमकी माझ्या मनात येते. त्या प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेता स्वत:चा मास्क आधी लावून घेतला तरच दुसर्‍याला मदत करता येईल हे पटतं पण मग फ्रेंच गोष्टीत सुरुवातीलाच स्वत:चं पिल्लू पायाखली घेऊन स्वत:चा जीव वाचवणारी माकडीण नाकातोंडात पाणी जायला लागल्यावर कसला आधार घेत असेल अस प्रश्न मला पडल्यावाचून राहत नाही. फक्त फ्रेंच असंच नाही पण एकूणच पाश्चिमात्त्य संस्कृती माणसाला आत्मकेंद्री तर बनवत नाही? तिथल्या पेस्ट्री किंवा कुकीचा तुकडा, आपल्या कागदात बांधलेल्या पेढ्याच्या तुकड्याप्रमाणे आईच्या पर्समधून घरापर्यंत कधी प्रवास करीत असेल का?

(भाग १ समाप्त)


ये कहाँ आ गये हम .... (भाग २)