« | »




निरभ्र - भाग २



- प्रसंग तीन -

( मकरंद घरामध्ये एकटा. दुपारची वेळ. बाहेर तुफ़ान पाऊस सुरू. तो फोन फ़िरवतो. )

मकरंद: (काळजीपूर्ण स्वरात ) हॅलो, कुठे आहेस ? हुं... हुं... तासापुर्वीच निघणार होतीस ना ?... हं... ओ के.... (थोडा आवाज चढवून ) अगं किती तुफ़ान पाऊस पडतोय... हं.. हुं... कम ऑन... बास झाल्या तुमच्या डेड्लाईन्स ... गेले दोन तास भीषण पाऊस पडतोय . तुला माहितीये गेल्यावर्षी अशाच पावसात काय राडा झाला होता ते. ... हे बघ प्रेडिक्ट कोणीच काही करू शकत नाही. .... तू आटप लवकर आणि लगेच घरी निघून ये... ट्राय टू अंडऱस्टँड... मला काळजी वाटतीये तुझी... ओके?...... ठीके, निघ लवकर..... काय? ..... तुला मगाशीच निघ म्हणत होतो ना... आता काय करणारेस? ... नाही नाही आता रिस्क घेऊ नकोस. कमरे एवढ्या पाण्यातून अजिबात यायच नाही.... आधीच निघायला पाहिजे होतस गं.... नो नो... अजिबात रिस्क नको..... शिवाय टॅक्सी रिक्षा काही काही नसेल.... आणि माहीत नाही की फ़क्त तुमच्या एरिआ मध्ये पाणी शिरलय का वाटेत अजून कुठे आहे ते.... तू थांब... पाणी ओसरल की मग निघ ... आवाज कसला येतोय?..... बॅटरी डाऊन आहे का? कम ऑन.... चार्जर आहे का? ...... लाईट्स पण कट ऑफ़? ... काय ग शिल्पू? ... कसा काँटॅक्ट करू मी तुला आता? कोण कोण आहे ऑफ़िसमध्ये ....ओके ओके..... फ़क्त दोघच? ..... हॅलो. हॅलो... डॅम इट....

(तिचा फोन कट होतो मकरंद फोन लावायचा प्रयत्न करतो. लागत नाही. वैतागतो. लँडलाईन वरून प्रयत्न करतो. पुन्हा लागत नाही. खुपच वैतागतो. त्याचा मोबाईल वाजतो. म्हणून धडपडत जाऊन तो उचलतो. फोन वर शिल्पाची आई असते.)

मकरंद: बोला आई.... हो हो... फ़ारच भिषण पाऊस आहे आमच्याकडे ... तुम्हाला कसं? .... ओह .. टी व्ही वर दाखवतायत का? ओके ओके.... नाही मी घरीच आहे.... होहो.... तिचा नाही लागत आहे फोन.... मीही ट्राय करतोय.... बॅटरी डाऊन आहे बहुदा... ती ऑफ़ीसमध्येच होती... नाही निघू शकली वेळेत... डोंट वरी ... मी पाचच मिनीटांपूर्वी बोललोय तिच्याशी.... शी इज सेफ.... ऑफिसभोवती भरपूर पाणी साठलय म्हणे. ... मीच सांगितल तिला की आता बाहेर पडू नकोस... कोणीतरी आहे ऑफीसमध्ये सोबतीला.... अजिबात काळजी करू नका.. या शहरात हे होतंच एकदातरी दर पावसात..... पाणी उतरल की ती निघेल... होहो लगेच मी तुम्हाला फोन करीन.... ओक टेक केअर..

(पुन्हा फोन ट्राय करतो.. लागत नाही. मकरंद एक पेग भरून घेतो. काही घोट घेऊन झाल्या नंतर... )

सांगत होतो तिला वेळेत निघ म्हणून.... ऐकलं नाही... कधीच ऐकत नाही माझं... परवाच तिला सांगत होतो की हा जॉब सोड म्हणून. विचार करायला वेळ हवा म्हणाली. काय विचार करायचाय त्यात? सोड म्हणलं की सोडायचा... अरे काय मूर्ख आहे का मी? फार शहाणी समजते सतःला .... पण काय महत्वाचं आहे हे बिलकूल समजत नाही... कसल्या आल्यायत त्या छपरी डेडलाईन्स. काय दिवे लावणारे त्यातून... श्या... चुकलच माझं... लग्नाच्या वेळीच मी अट घालायला पाहीजे होती की जॉब बीब काही चालणार नाही. .. गुमान घरात बसायच आणि घर सांभाळायचं .. ही असली लफ़डी निस्तरायला लागली नसती आत्ता..

लग्नाच्या वेळी मी काहीच अटी घातल्या नाहीत.. कारण मला सुचल्या नाहीत.. तिनीही घातल्या नाहीत कारण ती कधीच अटी घालत नाही... ती फ़क्त स्टेटमेंट्स करते. plain, simple, strong स्टेटमेंट्स.. !आणि जी स्टेटमेंट्स करते त्याला चिकटून रहाते.. ती म्हणाली होती तुझं घर सावरीन, सावरलं! तुला सांभाळीन ,सांभाळती आहे! करीयर करीन , करते आहे... किती छान ,सुरेख, आखीव रेखीव संसार सुरू होता आपला...

(घड्याळ बघतो, पुन्हा फोन फिरवतो)

हॅलो .. थँक गॉड! काय स्टेटस आहे? येस आय नो, फोन बंद पडायच्या आत बोल... ओके ओके .. प्लीज टेक केअर.. (फोन बंद होतो. दुसरा फोन लावतो)

हॅलो आई,........ हो आत्ताच शिल्पाशी बोललो.. त्यांच्या इथलं पाणी अजुनही हटलेलं नाहीये.. रात्रभर रहायला लागेल म्हणतीये... डोंट वरी.. तिचा बॉस पण आहे ऑफ़िसमध्ये .. काय करणार आता आपण.. ती सेफ आहे हे महत्वाचं... उद्या सकाळी आल्या आल्या तुम्हाला फोन करायला सांगीन... ओके? ठेवतो आता... येस येस ... आय वील...

(फोन ठेवतो... बार पाशी जातो, दुसरा पेग भरायला लागतो. भरता भरता मधेच थांबतो.)

ओह येस, आता समजलं मला... आता सगळी गेम समजली... हा सगळा त्या अवस्थीचा प्लान आहे... सिस्टीमॅटीक ट्रॅप... सगळ्यांना एक एक करून घरी पाठवून दिलं आणि शिल्पाला अडकवून ठेवलं ... शिल्पू तुला सांगत होतो. हे पुरुष असेच असतात म्हणून.... त्यांच्या मनात फक् ०द्त black & white definitions असतात. सांग आता सांग समजावून त्याला तुझ्या नात्याच्या छटांची गोष्ट...

(हातातला पेग गटागट संपवून टाकतो)

मी तुला आवडतो असं म्हणतेस... माझ्यासाठी इतकं काही करतेस.... तर तुला इतर कोणी का आवडायला हवं गं? तुला फक् ०दत मी एकटा नाही का आवडू शकत? त्रास होतो गं मला... हे अवस्थी, अभि का असतात तुझ्या आयुष्यात? माणसानी कसं एकदम स्पष्ट, मोकळं असायला हवं... clarity हवी.... स्पष्ट भावना, स्पष्ट विचार, स्पष्ट वागणं.... प्रत्येकाशी... शून्य आणि एक सारखं स्पष्ट...

नाही... नाही पटत मला तुझे विचार... आणि नाही झेपत तुझं वागणं.... तुला बदलायलाच हवं.... तुला तुझं वागणं माझ्यासाठी बदलायलाच हवं....

(मकरंद दारूने आऊट होऊन सोफ्यावर कोसळतो.... फोन वाजायला लागतो पण तो घेण्यासाठी मकरंद शुध्दीत नसतो... black out )


- प्रसंग चार -

(दुसर् ०दया दिवशीची सकाळी सात साडेसातची वेळ, घर अस्ताव्यस्त . मकरंद सोफ़्यावर विमनस्क अवस्थेत बसलेला. बेल वाजते. तो धावत दार उघडायला निघतो. दारातून शिल्पा आत येते. प्रचंड दमलेली, तरीही चेहर् ०दयावर प्रसन्नता. चपला काढून ती सोफ़्याकडे येते. मकरंदकडे पाहून त्याला हाक मारते.)

शिल्पा: मकरंद.... ए मकरंद.... ( मकरंद डोळे उघडून तिच्या कडे बघतो) हा स्स

मकरंद: शिल्पू... तू कधी आलीस?

शिल्पा: आत्ताच.

मकरंद: ठीक आहेस ना?

शिल्पा: हो ठीके की.... हं... काय रे... पीत बसला होतास ना रात्री.... इथेच काय झोपलास... जेवलास का काही? का तसाच झोपलास

(मकरंद थोडा सावरून बसतो शिल्पा त्याच्याशी बोलत बोलत घर आवरायला लागते. तिच्या वागण्यानी मकरंद अस्वस्थ व्हायला लागतो. त्याला तिच्याशी काहीतरी बोलायचं असतं पण तिच्या वागण्यामुळे बोलता येत नसतं)

मकरंद: शिल्पा ते राहू दे गं... बस जरा तू...

शिल्पा: नको रे.. नंतर कंटाळा येईल... (दारूची रिकामी बाटली दाखवत) ही बाटली टाकून देऊ ना रे

मकरंद: शिल्पा तू ठीक आहेस ना?

शिल्पा: हं... ठीकच आहे की... दूधवाला नाही आला का रे आज? .

मकरंद: उं... नाही.... तू.. तू ऑफिसातच होतीस ना पूर्ण वेळ ?

शिल्पा: हो... ए अरे भाज्या बिलकुल नसतील आज... जेवायचा प्रॉब्लेम होणारे...

मकरंद: ऑफिसमधे लाईट्स होते ?

शिल्पा: नाही .. काल दुपारी जे गेले ते अजून आले नव्हते..

मकरंद: फोनही लागत नव्हता ऑफिसचा..

शिल्पा: हो .. सर्व एरिया मध्ये पाणी होतं. कमरे एवढं.. लाईट्स , फोन सगळं बंद होतं

मकरंद: ऑफिसमध्ये सोय होती का नाही.. आय मीन इमर्जन्सी लाईट्स, चहा - कॉफी.. कुठे रिलॅक्स व्हायला काही...

शिल्पा: इन्वर्टर दोनेक तास चालला. मग मेणबत्त्या ... कॉफी मशिन बंद होतं .. रिसेप्शन मध्ये एक सोफा आहे ना.. जरा वेळ आडवं होता आलं..

मकरंद: आणि तो अवस्थी ?

शिल्पा: अं .. तोही ऑफिसमध्येच होता..

मकरंद: अजून कुणी होतं?

शिल्पा: नाही.. आम्ही दोघच

मकरंद: काय झालं काल रात्री ?

शिल्पा: म्हणजे?

मकरंद: तुम्ही दोघच जण होतात ऑफिसमध्ये ... कोणीही तिथे येणं शक्य नव्ह्तं त्यानी काही तुला ..? ओह शिट... ! कसं विचारू... त्यानी काही वेडं वाकडं...?

शिल्पा: मकरंद .. प्लीज हे प्रश्न थांबवतोस का ? असं काही झालेलं नाहीये...

मकरंद: (तिच्याकडे अविश्वासानी बघतो.. काही पावलं दूर चालत येतो. शून्यात बघत बोलतो. )

हं नाही सांगायचं तुला .. नको सांगूस ... पण मला कळायचं ते कळेलच .. नाही नाही .. पत्ता लावीनच मी बरोबर .. हे बघ , उगाच मला काय वाटेल .. मी काय करीन.. मला काय सहन होईल असा काही विचार न करता जे काही झालं ते सगळं स्पष्ट सांग मला. .मी ते ऐकू शकतो.. पचवू शकतो. आणि शांतही राहू शकतो. .. बोल... बोल.. प्लीज शांत राहू नकोस अशी.

शिल्पा: मकरंद, तू मला हे प्रश्न विचारशील हे मला माहीत होतं.. ऐक.. काय ऐकायचय तुला ? काल दिवसभर तांडव करणारा पाऊस .. किडा मुंग्यांसारखी पण्यातून वाहून जाणारी माणसं.. ? पत्त्यांच्या बंगल्यासारखी अस्ताव्यस्त झालेली घरं.. सर्वस्व वाहून गेल्यावर जीवाचा आकांत करणारी माणसं आणि या सर्व बॅकग्राउंडवर जीव मुठीत धरून ऑफिसमध्ये जागून काढलेली माझी रात्र..

मकरंद: शिल्पा...

शिल्पा: नाही.. तुला नाही ऐकायचं हे काही .. असल्या किरकोळ तपशिलात तुला फार रस नाही...

मकरंद: हे बघ तुझा काहीतरी ...

शिल्पा: नाही .. माझा काहीही गैरसमज नाही . मला माहीतीय तुला काय विचारायचय ते .. रादर तुला एक्झॅक्टली काय प्रश्न आहे तो.. एक सांग .. पटेल तुला मी जे सांगीन ते आणि पचेल?

मकरंद: शिल्पा असं काय अगं .. मी कधीतरी..

शिल्पा: मकरंद , तू आजपर्यंत माझ्यावर कधीच अविश्वास दाखवला नाहियेस .. पण तुझा विशासही डळमळीत असतो.. एक स्त्री आणि एक पुरुष जेव्हा रात्रभर एका ठिकाणी अडकून पडलेले असतात ..त्यात ते दोघही तरूण आणि आकर्षक तेव्हा त्या रात्री त्या दोघांमध्ये काही झालं का आणि नेमकं काय झालं हा प्रश्न कोणालाही पडणं स्वाभाविक आहे.. त्या स्त्रीच्या नवर् ०दयाला तर नक्कीच..! म्हणूनच मला माहीत होतं की तू हा प्रश्न नक्की विचारणार

मकरंद: वा! .. हे तुझं नेहमीचच आहे.. तुला काहीही प्रश्न विचारला, तुला काहीही बोलायचं असलं की जो मुख्य मुद्दा असतो तो बाजुला ठेवायचा आणि त्या प्रश्नाला जनरलाईज करायचं ..जनरलाईज केलं की तो प्रश्न किती मोठा आहे असं सांगत सांगत किती किरकोळ आहे हेही सांगायचं .. म्हणजे आम्ही चिल्लर .. आम्ही मुर्ख सगळे...

शिल्पा: ए तू त्रागा करू नकोस रे.

मकरंद: त्रागा? का करू नको? रात्रभर तुझ्या काळजीत मी ही तडफडत होतो. तू आणि तो... दोघंच अडकून पडला होतात तिथे... त्यानी तुला काही केलं असतं तर?

शिल्पा: काय होणारे मला? स्त्री आणि पुरुष फक् ०दत नर आणि मादी नसतात रे... त्यांचं एकत्र येणं, एकत्र असणं आणि एकत्र अडकून पडणं यातून फक् ०दत वासनाच जन्माला नाही येत. आधार असतो.... मैत्री असते... खूप वेगवेगळ्या भावना आणि experiences असतात रे... राजा तू please समजून घे... माझ्या आयुष्यात तू सोडून इतरही पुरुष असणार आहेत. त्या प्रत्येक व्यक् ०द्तीचा माझ्या व्यक् ०दतिमत्वाला स्पर्श होत रहाणार आहे. हे आपलं नातंही असणार आहे. आणि त्यावर आपला ठाम विश्वास असेल तर ते बहरतही जाणार आहे.

मकरंद: हुं... तू परत मूळ प्रश्न बाजूलाच ठेवलास...

शिल्पा: तुला black & white मधेच ऐकायचं असेल तर ऐक... काल रात्री आमच्यात काही झालं नाही हे सांगितलं तर तुला पटणार नाही.. आणि काही झालं हे सांगितलं तर तुला पचणार नाही.. आणि तूच नाही तर इतर कुणाचही असच होईल .. पण अरे काही घडलच नाही याला कुठलाच पुरावा नाही. ते कधीच कसच सिद्ध होऊ शकणार नाही म्हणून उत्तर हे माझ्याकडून यायच्या ऐवजी तुला तुझ्याकडे सापडायला हवं... रादर .. तुझ्याकडे जे उत्तर तुला सापडेल त्यावरच तू विश्वास ठेवणार आहेस..

माझ्याकडून मी इतकच सांगते की मी जिथे होते आणि जशी होते तिथे आणि तशीच आहे .. कालच येऊन गेलेलं वादळ तुझ्या मनात रेंगाळत असेल अजूनही .. शांत होणारच आहे ते.. फक्त ते तुझं तुला सांभाळावं लागणार आहे....

(काही क्षण शांत रहाते...) चल रे .. मी जरा फ़्रेश होते आणि झोपते मस्त.. तू प्लीज जेवणाच काहीतरी मॅनेज करना..

(आत निघून जाते.. मकरंद गाढ विचारामध्ये ..हळूहळू ब्लॅक आऊट)

- प्रसंग पाच -

(रंगमंचावर उजेड येत असता असता मकरंदचा आवाज यायला लागतो. शिल्पा मकरंदने तिला दिलेलं एक पत्र वाचत आहे. )

मकरंद: प्रिय शिल्पा,

चकित झालीस ना पत्र बघून? प्रश्नही पडला असेल की 'आता ही काय नवी भानगड'... तुला खूप काही सांगायचं होतं.. आहे... मला जे वाटतंय ते तुला समोरासमोर सांगणं जमत नव्हतं म्हणून पत्रच लिहायचं ठरवलं... गेल्या काही दिवसांत माझं वागणं, माझं बोलणं खूप खूप बदललंय हे तुझ्या लक्षात आलं असेल कदाचित. खूप प्रयत्न करावे लागले गं बदलायला पण आता माझं मलाच खूप बरं वाटतंय.

त्या वादळी रात्री नंतर काही दिवस मी पूर्णपणे हुकलो होतो. डोक्यात अनंत विचार यायचे, मी प्रचंड अस्वस्थ व्हायचो... मी घुम्यासारखा, तुसड्यासारखा वागायचो... तासन तास एकटा बसून रहायचो. तुझ्याकडे, घराकडे, धंद्याकडे... स्वतःकडेही खूपच दुर्लक्ष केलं... आणि अचानक एक कुठलातरी क्षण आला... Realization चा... जाणीवा जाग्या होण्याचा.... आयुष्य बदलून जाण्याचा.

मी पूर्वी सतत black & white मधे... किंवा शून्य आणि एक मधे विचार करायचो. कुठल्याही व्यक् ०दतीची, नात्याची किंवा प्रसंगाची व्याख्या शून्य किंवा एकात झाली पाहिजे असा माझा आग्रह असायचा. कुठल्याही प्रश्नाचं ठाम उत्तर फक् ०दत काळ्या किंवा सफेद रंगात मिळावं असा माझा हट्ट असायचा.

पण शून्य आणि एक मधे अनंत संख्या असतात याची आता मला जाणीव झाली आहे. या दोघांमधल्या अनेक अपूर्णांकाच्या बेरजेतूनच कुठलीही व्यक् ०दती अथवा नातं बनलेलं असतं... आपल्या प्रश्नांची उत्तरं ही केवळ black & white मधे न मिळता वेगवेगळ्या रंगांचा एक spectrum आपल्याला मिळत असतो. आपल्या दोघांच्या व्यक् ०दतिमत्वातले असंख्य अपूर्णांक आणि आपल्या नात्यातल्या वेगवेगळ्या छटा ओळखणं आणि त्या स्वीकारणं जमायला लागलंय आता मलाही....

म्हणूनच आता मलाही असतो तितकाच अतूट विश्वास आपल्या नात्यावर जितका तुला असतो आणि मलाही मलाही वाटत असतं भरभरून आपल्या दोघांसाठी जितकं तुला वाटत असतं...

कदाचित हे सगळं तु्ला जाणवलं असेलही... तरीही सांगावंसं वाटलं... माझ्या मनातलं स्वच्छ मोकळं निरभ्र आकाश तुझ्या समोर मांडावंसं वाटलं... बस्स... इतकंच...

तुझाच,

मकरंद

(शिल्पा पत्र वाचत असतानाच मकरंद स्टेजवर येतो. तिचं पत्र वाचून होईपर्यंत तिच्या कडे बघत असतो. पत्रावरच्या तिच्या प्रतिक्रियेविषयी तो anxious असतो... शिल्पा पत्र वाचून छान हसते आणि स्वतःशीच विचारात गढते)

मकरंद: शिल्पू... ए शिल्पू...

शिल्पा: अं... बोला महाराज.... तुमचा खलिता आत्त्ताच वाचला...

मकरंद: आणि?

शिल्पा: 'आणि' काय येडोबा! मला माहितीये रे राजा... कळतंय सगळं... त्या रात्रीनंतर काही दिवस मी ही अस्वस्थच होते रे... तुला होणारा त्रास, तुझी घुसमट सगळं सगळं बघत होते... आणि तुला मदत करण्यासाठी मी काहीच करू शकत नाही याचा मलाही त्रास होत होता... आता खूप खूप छान वाटतंय...

मकरंद: (थोड्या नाटकी गंभीर आवाजात) शिल्पा, पत्रामधे एक सांगायचंच राहिलं

शिल्पा: काय रे

मकरंद: सांगू का आत्ता?

शिल्पा: ए ठोंब्या बोल की...

मकरंद: (अजून थोडा गंभीर होत...) तू आवर पटकन... आपल्याला बाहेर जायचंय....

शिल्पा: (काळजीने) काय रे काय झालं?

मकरंद: (तिच्याकडे मिश्किलपणे बघत) एका सिनेमाची संध्याकाळच्या शो ची तिकिटं काढली आहेत... Extra Marital Affair वरचा धमाल विनोदी सिनेमा आहे....

(दोघंही हातात हात घेऊन खळखळून हसतात)

(पडदा)



(या एकांकिकेचा प्रयोग करायचा असेल तर लेखकाची परवानगी घ्यावी (किंवा निदान लेखकाला कळवावं तरी!) अशी अपेक्षा आहे परवानगीसाठी prasad.shir [at] gmail.com वर संपर्क साधावा)