« | »




"दैव जाणिले कुणी...?" (भाग २)

७.

मी नेहाकडे बघितलं. तिचा चेहरा आधीच पांढराफटक पडला होता. ती भीतीने थरथरत होती.
" सिद्धीने सांगितलेलं भविष्य खरं आहे.. ते भविष्य खरं आहे. " तिच्या तोंडून कसेबसे शब्द फुटले.
" नेहा... नेहा... रिलॅक्स. ते एक वेष्टण आहे फक्त. कुठल्यातरी टुकार प्रेमकथेचं पान वाटतंय. बघा ना... मागची पुढची वाक्यं वाचली तर कळतंय की कोणीतरी ज़िम कुणातरी कॅरेनला उद्देशून ते वाक्य म्हणतोय. प्लीज... अहो अशा घाबरून जाऊ नका. कूल डाऊन. "

नेहाला तरीही अस्वस्थच वाटत होतं. मी श्वेताला हाका मारल्या. तिने माझ्याकडे ' तुम्ही नेहाला का इतकं डिस्टर्ब करता आहात? ' अशा अर्थाचा एक कटाक्ष टाकला आणि ती नेहाला आधार देऊन तिच्या खोलीत घेऊन गेली.

नेहाला समजावण्यासाठी जरी मी ते वाक्य निरर्थक म्हणवून उडवून लावलं होतं; तरी माझ्या मनातून ते वाक्य जाईना. घडणार्‍या या घटना केवळ योगायोग नव्हत्या खास. त्यामागे नक्कीच काहीतरी होतं. अशी कुठली गोष्ट होती की ज्यामुळे नेहाच्या जिवालाच धोका उत्पन्न झाला होता?

श्वेता नेहाच्या खोलीतून बाहेर आली. तिला मी नेहासंदर्भात विचारलं तेव्हा तिने ' झोपल्यात त्या ' असं त्रोटक उत्तर दिलं आणि शेजारच्या सोफ्यावर बसून ती समोरची पुस्तक मासिकं चाळू लागली. हिच्याशी आता स्पष्ट बोलायलाच हवं होतं.

" श्वेता, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. जरा इकडे येऊन माझ्यासमोर बसाल का? "

श्वेता एखाद्या कळसूत्री बाहुलीसारखी उठून समोर येऊन बसली. चेहरा निर्विकार.

" श्वेता, मी नेहा भागवतांची नातेवाईक नाही. मी एक डिटेक्टिव्ह आहे. आणि मला त्यांनीच त्यांच्या मदतीकरता बरोबर आणलंय. "
डिटेक्टिव्ह या शब्दाने श्वेता जरा चमकली. पुन्हा चेहरा पूर्ववत करत तिने विचारलं..
" कसली मदत? "
" नेहा भागवतांच्या जिवाला धोका आहे म्हणून... " मी सावकाश एकेक शब्द उच्चारत म्हणाले. श्वेताच्या चेहर्‍यात अचानक बदल झाल्यासारखा वाटला पण क्षणभरच.
" कुणाकडून? "
" माहीत नाही या क्षणी तरी. पण मी नेहांची जबाबदारी घेतलीय तेव्हा मी त्या व्यक्तीचा छडा लावेनच. "
" पण हे सर्व तुम्ही मला का सांगताय? "
" तुम्हाला माहिती असावी म्हणून! तुमची मालकीण... "
" नेहा माझी मालकीण नाहीये.... " श्वेताचा सूर एकदम बदलला.
" ओहो... त्या तुम्हाला मैत्रिण मानतात नाही का? सॉरी. अर्थात, त्या तुम्हाला काय मानतात याचा मला काही फरक पडत नाही. तुम्हाला एकच सांगते, माझ्या गैरहजेरीत नेहावर जर काही हल्ला झाला तर.... "
" तुम्ही माझ्यावरदेखील संशय घ्याल? "
" स्मार्ट आहात.... " मी हसले आणि पायात बूट चढवून बाहेर पडले. पुन्हा मी श्वेताकडे वळून पाहिलं नाही पण तिचे काळेभोर डोळे माझा दिसेनाशी होईपर्यंत पाठलाग करत आहेत असं मला वाटत राहिलं.
माझा पुढचा प्लॅन होता नंदिनी मेहताला भेटण्याचा. कोडाईसारख्या ठिकाणी नंदिनी मेहतासारख्या व्यक्तीचा पत्ता शोधून काढणं अवघड नव्हतं. त्याप्रमाणे मी थोड्याच वेळात तिच्या बंगल्याजवळ पोचले.

बंगल्यापाशी बरीच वर्दळ दिसत होती. बहुधा कसलीतरी पार्टी चालू असावी. नंदिनी मेहता आत्ता भेटण्याची शक्यता शून्य होती म्हणजे! मी परत फिरले. तोच आतून एक मध्यमवयीन स्त्री एका माणसासोबत बोलत बोलत बाहेर आली. माझ्याकडे त्यांचं लक्षच गेलं नाही.

" पण मिसेस मेहता, मी प्रयत्न केले होते, अजूनही करतोय. पण.... " तर ही स्त्री होती नंदिनी मेहता. नंदिनी मेहताचा चेहरा संतापाने लाल झाला होता.
" मला कुठलीही excuses नकोयत, प्रशांत. तुला जे काम दिलं गेलंय ते तू करू शकत नाहीयेस. I am disappointed. एवढी सोन्यासारखी जमीन! I won't let Aditya or Neha to have it. The land will be ours.... Let whatever the cost be!"

अचानक तिचं बोलणं तुटलं. मी बघितलं. पार्टीला येणारं एक जोडपं गाडीतून उतरत होतं.
"Oh, hello Mr. and Mrs. Krishnan... What a pleasure to see you here....." नंदिनी मेहता त्यांना आदबीने आत घेऊन गेली. जाता जाता तिने मागे वळून प्रशांतकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला. तो क्षणभर ती गेली त्या दिशेला बघत राहिला आणि गोंधळल्यासारखा रस्त्याने चालू लागला.
नंदिनी मेहता खरोखरच अभिनयकुशल होती. तिची दोन रुपं मला अवघ्या काही मिनिटांच्या अंतराने बघायला मिळाली होती. आणि तिची वाक्यं मला अजूनही आठवत होती.
'I won't let Aditya or Neha to have it. The land will be ours.... Let whatever the cost be!'

नेहा भागवत मला काही माहिती द्यायला नक्कीच विसरली होती... की ती तिने लपवून ठेवली होती?


८.

मी नेहाच्या घरी परतले तोवर ती जागी झाली होती. तिच्या रूममध्ये मी गेले तेव्हा नुकतंच तिचं जेवण आटोपत होतं. श्वेता कोर्‍या चेहर्‍याने
तिला मदत करत होती जेवायला. नंतर तिने कपाटातून कसलीशी औषधं काढून नेहाला दिली.
" श्वेता, सुनीतांचं जेवण वाढून इकडेच घेऊन ये. "

प्रचंड अनिच्छेने श्वेता नेहाच्या जेवणाची ट्रॉली ढकलत रूममधून बाहेर गेली.
" कुठं गेला होतात, सुनीता? "
" नंदिनी मेहताला भेटायचा प्रयत्न केला. पण आज तिच्याकडे कसलीशी पार्टी होती, म्हणून तिची भेट घेता आली नाही. "
यावर नेहा जराशी हसली.
" नंदिनीचं नेहमीचंच आहे ते. आठवड्याला चार पार्ट्यांचा कोटा आहे तिचा. "
" तुमची मैत्रीण आहे ती? "
"oh, I don't know. नंदिनी कधीही कुणाचीही मैत्रीण असू शकते. आणि म्हटलं तर कुणाचीच मैत्रीण नसते. she could change herself totally within a day. माझंच उदाहरण घ्या ना! "

मी लक्ष देऊन ऐकू लागले. मला हवी असलेलीच माहिती कदाचित नेहाच्या तोंडून आपसूक बाहेर पडत होती.
" माझी आणि आदीची कोडाईशी आता बर्‍यापैकी attachment झालीय. हा भाग पर्यटकांनी गजबजलेला असतो नेहमी तेव्हा एक side business म्हणून आम्ही इथे एक resort उभारायचं ठरवलं. त्यामुळे मलादेखील स्वतःला काहीतरी कामात गुंतवून घेता आलं असतं. आम्ही जमीन शोधली. आमच्या आवडीची जमीनदेखील आम्हाला सापडली. वाटाघाटी पूर्ण झाल्या. तेवढ्यात आम्हाला कळलं की मेहतांनादेखील त्याच जमिनीत रस होता.

आम्हाला कुठल्याही परिस्थितीत आम्हाला मिळालेलं चांगलं लोकेशन गमवायचं नव्हतं. मेहतादेखील त्याच जमिनीसाठी इरेला पेटले होते. एक दिवस नंदिनी मेहता आमच्या घरी येऊन आदी आणि माझ्याशी खूप भांडून गेली. पण शेवटी ती जमीन तिला मिळाली नाही ती नाहीच! यावरूनही मेहतांनी खूप गदारोळ केला.

आश्चर्य म्हणजे दोन महिन्यांपूर्वी नंदिनी पुन्हा आमच्या घरी आली. आधीच्या सगळ्या वादळाची तिच्या वागण्यात पुसटशीदेखील खूण राहिली नव्हती. तिने माझी नि आदीची माफी मागितली. आम्हालाही झालं गेलं विसरून जा, म्हणून विनंती केली. हळूहळू आम्ही पुन्हा तिच्या पार्ट्यांना हजेरी लावू लागलो. "

नंदिनी मेहताचं बोलणं मी नेहाच्या कानावर घातलं नाही. आत्ताच तिला एक मानसिक धक्का बसला होता. त्यातच हे कळलं असतं तर नेहाने हाय खाल्ली असती.
श्वेताने दिलेल्या औषधाने नेहाला गुंगी यायला लागली असावी. डोळ्यांवर हात घेऊन ती श्रांत होऊन झोपली होती.

..... " आदित्य सरांना तुमच्याशी बोलायचंय. " श्वेता माझ्या मागे येऊन कधी राहिली कळलंच नाही. तिच्याकडचा फोन घेऊन मी कानाला लावला आणि नेहाला disturb होऊ नये म्हणून मी मांजराच्या पावलांनी हॉलमध्ये येऊन बसले.

" तुम्ही ही नेहाला कसली मदत करताय, सुनीता वर्मा? " आदित्यच्या आवाजात रागीटपणाचीदेखील झाक होती.
" नेहा भागवतांनी मला जे सांगितलंय त्याच संदर्भात. "
" ओह कमॉन. असल्या फालतू भविष्यावर विश्वास ठेवून नेहा असं वागू शकेल; मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. म्हणे, कुणीतरी तिच्या जिवावर उठलंय आणि हे ती कोण बाई हिला सांगतेय. I have no faith in such bullshit."
" कूल डाऊन, मि. आदित्य. नेहाला जर अशी भीती वाटत असेल तर तिने हायर केलेली डिटेक्टिव्ह या नात्याने ती भीती दूर करणं हे माझं कर्तव्य आहे. " मी आवाज शक्य तेवढा शांत ठेवत म्हटलं.
" ओह गॉड. हे सगळंच हाताबाहेर चाललंय आता. मी उद्या सकाळी कोडाईला येतोय. जरा नेहाला फोन द्या. "

नेहा बराच वेळ आदित्यशी बोलत होती. नंतर तिने फोन ठेवून दिला आणि थकून जाऊन ती सोफ्यावर बसली. आदित्यला हे कुणाकडून कळलं असावं, याचा अंदाज येणं फारसं कठीण नव्हतं. मी काहीसं चिडून श्वेताकडे बघितलं. तिचा चेहरा पूर्वीसारखाच निर्विकार होता.

" आता काय करायचं, सुनीता? आदित्यपासून हे लपवून ठेवायचा प्रयत्न केला मी. पण आता... "
" काळजी करू नका, नेहा. त्याने फारसा फरक पडत नाही. मी हे काम झाल्याशिवाय इथून जाणार नाही. आदित्यला फक्त थोडं उशिरा कळलं असतं तर बरं झालं असतं.. पण असू दे. "

बाकीचा दिवस तसा रूटीन गेला. नेहा भागवतच्या ड्रायव्हरला मी बरंच खोदून खोदून शनिवारच्या प्रसंगाबद्दल विचारलं; पण मला त्याने आधीचीच कथा जशीच्या तशी सांगितली. ते औषधही त्याने मला दाखवलं. मी त्याला शेवटी जायला सांगितलं. शनिवारची नंदिनी मेहताच्या घरची पार्टी, नेहाला सिद्धी नावाच्या त्या बाईने भविष्य सांगणं, नेहाच्या ड्रायव्हरचं मेहतांच्या बंगल्याजवळ सापडणं, नेहाच्या गाडीचे ब्रेक्स फेल होणं... सगळ्या गोष्टी बर्‍याच गूढ होत्या. मेहतांवर लक्ष ठेवायला लागणार होतं.
दुसर्‍या दिवशी सकाळी ९.३० च्या सुमारास आदित्य भागवत आला. आल्यावर त्याने मला औपचारिक नमस्कार केला आणि नेहाला बोलावलं.
" नेहा, काय चाललंय हे असं? कशाला एवढी घाबरलीयस राणी? " त्याचा आवाज अगदी हळुवार झाला होता. नेहा रडत रडत त्याला बिलगली.
" आदी, प्लीज... याबाबत काही बोलू नकोस. मला माहितीय, मी काहीशी मूर्खासारखी वागतेय त्या भविष्याला घाबरून... पण फक्त एकदाच माझी शंका पुरती फिटू दे... प्लीज... "
" ओके, हनी... ओके... ठीक आहे... ठीक आहे. " तो तिच्या डोक्यावर हळुवारपणे थोपटत म्हणाला.

मग त्या दिवसभरात त्याने माझ्याशी काहीही बोलायचं टाळलं. केवळ नेहाच्या हट्टामुळे तो मला तिथं राहू देतोय हे मला कळत होतं. दुपारी जेवण झाल्यावर मी फिरायला बाहेर पडले. अचानक वळणावरच्या झाडीकडे मला श्वेता जाताना दिसली. मी काही अंतर राखून सावधपणे तिचा पाठलाग सुरु केला. ती झाडीमध्ये शिरली.मीही सावधपणे तिच्या मागोमाग जायला लागले. आतमध्ये झाडी दाट होत गेली होती. श्वेता जिथून जात होती, ती बहुधा एकच पायवाट असावी. मला मात्र त्या झाडीतून चालणं अशक्य होत होतं. एक दोन मिनिटांतच मला श्वेताचा कानोसादेखील घेता येईना. नक्कीच मी चुकले होते किंवा ती फार भराभर पुढे निघून गेली होती. निरुपाय होऊन मी परतायचं ठरवलं. आलेल्या रस्त्याने परत येऊन मी पुन्हा मुख्य रस्त्याला लागले. काही अंतर गेल्यावर एका बर्‍याच आडोशाला असणार्‍या खडकावर बसले. काही वेळ असाच वेळा. झाडीमध्ये काहीतरी हालचाल जाणवली म्हणून मी नीट बघितलं. आदित्य भागवत त्या झाडीतून बाहेर पडत होता. मी बसलेला खडक बराच बाजूला होता त्यामुळे मी दिसले नाही त्याला. तो आपल्याच नादात बंगल्याच्या दिशेने निघून गेला. त्यानंतर काही मिनिटांतच श्वेता तिथून बाहेर पडली आणि तीही बंगल्याकडे निघून गेली.

... नेहाच्या प्रकरणाने अजून एक गूढ वळण घेतलं होतं.


९.

दुसर्‍या दिवशी एक अनपेक्षित गोष्ट घडली. ब्रेकफास्ट आटोपल्यावर श्वेताने सर्वांना एक धक्का दिला. तिने नोकरी सोडायचं ठरवलं होतं.

" माझ्या कुटुंबाला गरज आहे माझी. I have some family affairs to take care of. जास्त डिटेल्स सांगू नाही शकणार पण मला गेलंच पाहिजे. " इतकंच ती वारंवार सांगत राहिली. खोदून खोदून विचारूनही तिने काहीच सांगितलं नाही. नेहाने कशीबशी तिला जायची परवानगी दिली. श्वेताने त्याच दिवशीच्या संध्याकाळच्या बसचं तिकीट बुक केलं होतं. जाताना ती नेहाचा निरोपही घ्यायला आली नाही. कुणालाच काही न सांगता श्वेता निघून गेली होती.

संध्याकाळी नेहा बागेत खुर्चीवर डोळे मिटून बसली होती. मी तिच्याजवळ जाऊन बसले. माझी चाहूल लागून तिने डोळे उघडले.
" सुनीता, का केलं असेल श्वेताने असं? "

आदल्या दिवशी बघितलेलं सर्व नेहाच्या कानावर घालायची मला जबरदस्त इच्छा झाली. पण मी स्वतःला आवर घातला. माझ्यासमोर त्यापेक्षा मोठं आव्हान होतं. आज मी पुन्हा नंदिनी मेहताला भेटायचं ठरवलं. अर्थातच मी नेहाला सोबत घेऊन गेले.
नंदिनी मेहताने आमचं अघळपघळ स्वागत केलं. नेहाशी आणि माझी ओळख करून दिल्यावर माझ्याशी गप्पा मारल्या. आधी बघितलेलं नंदिनीचं रूप आणि आत्ताचं यात काहीच ताळमेळ नव्हता. बोलता बोलता सिद्धीचा विषय निघालाच!

" नेहा, सिद्धी मला म्हणत होती की तिने सांगितलेल्या भविष्यामुळे तू जरा डिस्टर्ब झाली होतीस म्हणून! अर्थात तिने मला काय भविष्य ते सांगितलं नाही म्हणा! तसं सांगताही येत नाही. तरीही... आता ठीक आहेस ना तू? "
" ही सिद्धी कोण? " मी मुद्दाम अज्ञान पांघरत म्हणाले.

नंदिनी मेहताला तेवढी किल्ली पुरली. ती भराभर बोलत सुटली. दिल्लीतली मिसेस शर्मांची पार्टी, तिथे सिद्धीचं भेटणं, नंदिनीशी चटकन जुळवून घेणं, तिचं अचूक भविष्य सांगणं.... सांगून झाल्यावर जरासं थबकत ती म्हणाली.

" मी एवढं बोलण्यापेक्षा सिद्धीलाच बोलवते ना! " तिने इंटरकॉमवरून सिद्धीला बोलावलं. पाच मिनिटांत सिद्धी हॉलमध्ये, आम्ही बसलो होतो तिथं प्रवेशली.
जवळपास साडेपाच फूट उंची, नितळ सावळा रंग, काळेभोर रेखीव डोळे, आणि सगळ्या चेहर्‍याला महिरपीसारखे दिसणारे कुरळे केस. वयाने ती नेहाइतकीच असावी पण तिचं वय चटकन सांगणं अवघड होतं. सिद्धी एक चालतंबोलतं सौंदर्य होतं. ती नंदिनी मेहताजवळ येऊन बसली आणि तिने आमच्याशी गप्पा सुरु केल्या. नेहाची चौकशी केली.
" सिद्धी, तुम्ही भविष्य सांगता म्हणे? " मी बोलता बोलता पृच्छा केली. त्यावर तिने होय अशा अर्थी मान डोलावली. मी अजून डिटेल्स सांगायचा आग्रह केल्यावर जवळपास पंधरा मिनीट ती तिच्या विद्येविषयी बोलत होती. समारोप करताना म्हणाली,
" मला माहितीय की लोकांचा ह्यावर सहसा विश्वास बसत नाही. त्यामुळे मी प्रत्येक व्यक्तीची; ज्यांना मी भविष्य सांगितलंय त्यांची फ़ाईल मेंटेन करते. लोक केव्हाही त्या लोकांशी संपर्क साधून माझ्या भविष्याची अचूकता पडताळून पाहू शकतात. "
" मला मिळू शकेल का ती माहिती? म्हणजे मला केवळ उत्सुकता आहे म्हणून... "
उत्तरादाखल सिद्धीने नोकराला हाक मारून तिच्या रूममधून एक फ़ाईल आणायला सांगितली. त्या फ़ाईलमध्ये बर्‍याच ' केसेस ' ची सविस्तर माहिती सिद्धीने नोंदवून ठेवली होती.
ती फ़ाईल चाळताना मला एक गोष्ट लक्षात आली. बरेच पत्ते दिल्लीतले होते. सिद्धी बराच काळ दिल्लीत राहिली असावी. दिल्लीची एक चक्कर करून या माहितीचा खरेखोटेपणा लगेच पडताळून पाहता आला असता. पण मला नेहाची काळजी होती. तिला एकटीला तिथे सोडून मी जाऊ शकत नव्हते कोडाईबाहेर. मी तिलाही सोबत घेऊन जायचा विचार करू लागले. तिला येण्यात काही अडचण तर दिसत नव्हती. अर्थात, माझा हा समज टिकला फक्त दुसर्‍या दिवशीपर्यंत. आदित्य भागवतने सकाळी ब्रेकफास्टच्या टेबलावरच नेहाला सांगितलं,
" नेहा, आपल्या resort चं काम आजपासून सुरु करतोय contractor . तुला त्यावर लक्ष ठेवावं लागेल कारण मला बंगलोरला परत जाणं भाग आहे. "

नेहाने त्यावर हताश नजरेने माझ्याकडे पाहिले.
" अरे पण आदी, ते भविष्य... "
" ओह, फॉर गॉडस् सेक.... कम आऊट ऑफ इट, नेहा. असं काही नसतं. अशा गोष्टींवर माझा विश्वास नाहीये आणि तूही ठेवू नकोस. आणि कामामध्ये जरा मन गुंतव. रिकामं मन आणि सैतानाचं घर म्हणतात ना, त्यातली गत झालीय तुझी. "
तो उठून गेला.
" तो माझं काही ऐकणार नाही. " ती माझ्याकडे बघत म्हणाली. म्हणजे दिल्लीला जाण्याआधी मला नेहाला इथेच सोडून जावं लागणार होतं. तिच्यासाठी मी चोवीस तास private security ची व्यवस्था केली आणि मी लगोलग कोडाई सोडलं.


१०.

दिल्लीला पोचल्यावर मी सिद्धीने वर्तवलेल्या भविष्यांचा खरेखोटेपणा शोधण्याची मोहीमच हाती घेतली. आश्चर्य म्हणजे तिची एकूण एक भविष्यं खरी ठरली होती. तिची विद्या खरोखरची असल्याचा प्रत्यय येत होता. कदाचित नेहाबद्दल सांगितलेलं भविष्यदेखील खरं ठरलं असतं. त्यावर काहीतरी सुटकेचा उपाय असेल का हा एकच विचार मला सतावू लागला.

मी पुन्हा कोडाईला परतले. नेहाला मी दिल्लीत मिळवलेली सर्व माहिती दिली. ती अजून बेचैन झाल्याचं मला जाणवत होतं. पण तिच्यापासून ही माहिती लपवून ठेवणंही मला पटलं नसतं. भविष्य वगैरेसारख्या गोष्टींवर काडीचाही विश्वास न ठेवणारी मी या भविष्याच्या कोड्यापुढे हरल्यासारखी झाले होते.

मी बंगलोर सोडल्याला आता दहा दिवस होऊन गेले होते. कोडाईमध्ये सतत नेहाच्या जवळ राहून तिला संरक्षण देणं यापलिकडे मी फारसं काही केलं नव्हतं. या काळातली सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे नेहाचं मानसिक स्थैर्य आता हळूहळू ढासळत चाललं होतं. तासंतास ती एकटीच आपल्या रूममध्ये शून्यात बघत बसून राहायची. एकदम रात्रीबेरात्री दचकून उठे, कधी कधी श्वेताच्या नावाने हाका मारत सुटे. आदित्य भागवत कोडाईमध्ये परतला होता. त्यानेही नेहाची ही अवस्था बघून हाय खाल्ली होती. रोज बंगल्यावर डॉक्टरांच्या फेर्‍या चालू झाल्या. ते नेहाला झोपेची औषधं देत. पण त्यांचा प्रभाव जाताच नेहा पुन्हा depression आणि भीतीच्या चक्रात अडके. एक दिवस आदित्यने चक्क हात जोडून मला या प्रकरणाचा छडा लावण्याची विनंती केली. त्यालादेखील नेहाची ही अवस्था पाहवेनाशी झाली होती.

मी पुन्हा सिद्धीची गाठ घेण्याचा प्रयत्न केला; परंतु ती निघून गेल्याचं समजलं. ती कुठे गेली होती हे नंदिनी मेहताला देखील माहीत नव्हतं. सिद्धीला तिथून जाऊ द्यायला नको पाहिजे होतं, असं मला प्रकर्षाने वाटून गेलं. पण आता काहीच उपयोग नव्हता.

एका गोष्टीची मात्र मी आतुरतेने वाट बघत होते. मी निघण्याआधी केलेल्या व्यवस्थेमधून मला आता माहिती मिळायला सुरुवात व्हायला हवी होती. आणि अखेर माझ्या वाट पाहण्याला काहीतरी फळ आलं... मला एक मोठं पुडकं पोस्टाने आलं. अनिकेतकडून! त्याने मला एका पुस्तकाची काही पानं फोटोकॉपी करून पाठवली होती. अनिकेत माहिती मिळवण्यात यशस्वी झाला होता तर! मी अधीरतेने ती माहिती वाचू लागले.
या भविष्यकथन पद्धतीचा उगम कसा झाला हे त्यात सविस्तर दिलं होतं. गुप्त साम्राज्य लयाला गेल्यानंतरच्या अस्थिर काळात ही विद्या उदयाला आली होती. एका पंधरा वर्षांच्या मुलीला खेळता खेळता गूढ पद्धतीने ही विद्या सापडली होती. तिच्या अचूकपणामुळे ती त्या कालखंडात लोकप्रियही झपाट्याने झाली. पण पुढे असं लक्षात यायला लागलं की, या विद्येने कळणारी बहुतांश भविष्य भयंकर असत. घडणारं वाईट फार अचूक असे. आणि या पद्धतीत वापरले जाणारे पत्ते ह्यात फार महत्त्वाची भूमिका बजावत. त्यांना पुढे cards of doom म्हटलं जाऊ लागलं. आणि ह्या एका ' दुर्गुणा ' मुळे ही विद्या कुणी शिकेनासं झालं.
सध्या तर जगभरात ही विद्या शिकवण्यासाठी एकच पाठशाळा होती. ही विद्या फक्त मुलींनाच शिकवली जात असे. त्यांना प्रवेश घेण्यापूर्वी बर्‍याच कठीण परीक्षांतून जावं लागत असे. मी पाठशाळेचा पत्ता वाचला.

माझं destination आता होतं, काठमांडू, नेपाळ.

मी लगेचच कोडाई सोडलं. त्याच संध्याकाळी मी बंगलोरला जायला निघाले. कोडाई मागे पडू लागलं. तेवढ्यात उलट दिशेने एक कार मला कोडाईला जाताना दिसली. माझं अचानक त्या कारकडे लक्ष गेलं. I couldn't have failed recognizing that beautiful face.
कशासाठी माहीत नाही, पण सिद्धी कोडाईला परतत होती.



११.

बंगलोरमध्ये पोचून सगळ्यात आधी मी माझ्या सहकार्‍यांची खरड काढली. अनिकेतने पुरवलेली माहिती वगळता इतर कुठलीही माहिती माझ्यापर्यंत पोचली नव्हती. यात चूक माझ्या सहकार्‍यांची नव्हती खरं तर पण त्यावेळी गेलेला प्रत्येक क्षण मला अस्वस्थ करत होता.
या अस्वस्थ मनःस्थितीतच मी काठमांडू एअरपोर्टवर उतरले. ती पाठशाळा काठमांडू शहरापासून ५० किलोमीटर उत्तरेला होती. मी ताबडतोब एक टॅक्सी बुक केली आणि त्या पाठशाळेकडे निघाले. मला तिथे पोचायला एक तास लागला असावा. दुपारचे दोन अडीच वाजत होते.

पाठशाळेभोवतालचा परिसर त्या पाठशाळेला साजेसा गूढ होता. मी टॅक्सीवाल्याला जवळच दिसलेल्या एका खेड्यापाशी थांबायला सांगितलं आणि मी पाठशाळेच्या मुख्य प्रवेशदारापाशी गेले. ते बंद होतं. मात्र आतमधल्या एका खोलीची खिडकी बाहेर उघडत होती. त्या खिडकीमध्ये एक मुलगी मला बसलेली दिसली.

" काय काम आहे आपलं? " तिने मला इंग्रजीत विचारलं.

मी तिला थोडक्यात माझं काम सांगितलं. " पण अशी माहिती आम्ही कुणालाही देऊ शकत नाही. आम्हाला आमच्या विद्येचा असा वापर करता येत नाही. "

माझं डोकंच फिरलं संतापाने. मी तिच्याशी भांडू लागले. मला काय झालं होतं देव जाणे! तेवढ्यात हा गलका कानावर गेल्याने की काय माहीत नाही, पण एक वयस्कर बाई त्या रूममध्ये प्रवेशल्या. त्यांचा एकंदरीत रुबाब आणि पेहराव बघता त्या या पाठशाळेच्या मुख्य असाव्यात हे सहज कळत होतं. त्यांनी आधी मला आणि तिलाही शांत केलं आणि माझ्याशी बोलायला म्हणून त्या स्वतः बाहेर आल्या. त्यांनी माझी विचारपूस केली आणि त्या मला त्यांच्या मुख्याध्यापिकांसाठी असलेल्या खोलीत घेऊन गेल्या.

" प्लीज... मला फक्त इतकंच सांगा नेहाच्या वाचण्याची शक्यता कितपत आहे? प्लीज... मला माहीत आहे की तुमचं शास्त्र अचूक आहे. आणि वाईट भविष्य १०० टक्के खरी ठरतात... तरीही... तरीही एखादी जरी शक्यता असली... कितीही अंधुक का असेना... पण प्लीज.... "

मला पुढे बोलवेना. त्यांनी बोलायला सुरुवात केली.

" खरं तर अशी माहिती देणं हे आमच्या शास्त्रात बसत नाही. पण जर एखाद्याला अपुरी माहिती दिली गेली असेल तर ती माहिती त्या व्यक्तीला पूर्णपणे देणं आमचं कर्तव्य ठरतं. आणि जर ती व्यक्ती माहिती स्वतः विचारू शकत नसेल तर त्या व्यक्तीला ओळखणारी कुठलीतरी एकच व्यक्ती ती माहिती मिळवू शकते.
मी विचारते त्या प्रश्नांची आता नीट उत्तरं द्या. कारण यावरून मला समजेल की माहिती पूर्णपणे दिली गेली आहे की नाही?
पहिला प्रश्न : कार्डस् काय काय होती? "

मी नेहाने मला दिलेली माहिती बिनचूक सांगितली.

" फाशांचे आकडे? "
" तीन, एक, एक..... "

त्यांचा चेहरा क्षणभरच अतिशय उत्तेजित झाल्यासारखा वाटला. स्वतःला चटकन सावरत त्या म्हणाल्या....
" भविष्य काय सांगितलं? "
" नेहाच्या जिवाला धोका आहे. कुणीतरी नेहाला संपवू इच्छितं. "
" बस इतकंच? अजून काहीही नाही? "
मी नकारार्थी मान हलवली.
" वेल, सुनीता... नेहाचं नशीब अतिशय उच्चीचं आहे. तिला जे भविष्य सांगितलं गेलं ते अचूक आहे. पण कुठल्यातरी कारणाने तिला या भविष्याचा उरलेला भाग तिला सांगितला गेला नाहीय. ते कारण काय आहे, हे मी सांगू शकत नाही. ते शोधणं मी तुमच्यावरच सोपवते. पण त्या भविष्याचा उरलेला भाग मी तुम्हाला सांगू शकते. कार्डस्अच्या त्या combination ला The combination of doom असं म्हणतात. सगळ्यांत वाईट, सगळ्यांत भयंकर. इतर कॉम्बिनेशन्स मध्ये फाशांच्या काही कॉम्बिनेशन्स मुळे भविष्यात बराच फरक पडू शकतो. वाईटातले वाईट पत्त्यांचे कॉम्बिनेशन्स त्यासरशी एकदम चांगलं भविष्य दाखवू शकतात. त्यामुळे त्या कॉम्बिनेशन्स मध्ये पत्त्यांइतकेच फासेही महत्त्वाचे असतात.

फक्त हेच एक combination आहे ज्यात फासे आपला प्रभाव दाखवूच शकत नाहीत जवळजवळ. The combination of doom is that powerful. म्हणून तर एकदा combination of doom चे पत्ते दिसले तर आमच्यातल्या बहुतांश जणी फाशांकडे बघतच नाहीत. कारण combination of doom ला किंचित सौम्य करू शकेल असं एकच फाशांचं कॉम्बिनेशन आहे.... ३, १, १... २१६ कॉम्बिनेशन्स मधून हे एकच कॉम्बिनेशन येणं किती अवघड आहे हे तुम्हाला कळलं असेलच. म्हणूनच तर combination of doom च्या वेळी फासे सहसा दुर्लक्षिलेच जातात. आणि म्हणूनच मी म्हटलं नेहा भागवत यांचे ग्रह उच्चीचे आहेत.
उद्या, भविष्य सांगितल्यानंतरची पहिली पौर्णिमा आहे. Combination of doom will have the maximum power that day. नेहावर शेवटचा हल्ला याच दिवशी होईल. पण ३, १, १ मुळे नियती तिला बचावाची एक संधी नक्की देईल. If... only if she could fight... she will defeat the combination of doom. If she wants to live, she has to fight... She has to fight against the combination of doom.

मला अचानक कुठेतरी अंधारात आशेचा अंधुक किरण दिसावा तसं झालं. नेहा वाचू शकणार होती. मी त्यांचे आभार मानून काठमांडूला परतले. तिथे पोचून मी लगोलग नेहाच्या कोडाईतल्या घराचा नंबर डायल केला. पण फोन डेड झाला होता बहुधा. हिवाळ्यात दिवसांत कधीतरी तिथलं हवामान बिघडतं. त्याने फोन लाईन्स दिवस दिवस डेड होऊ शकतात. तसंच काहीतरी झालं होतं बहुधा. नेहाला कसं कळवू मी हे? मला उमगत
नव्हतं.

रात्री १ वाजता जवळजवळ तीन तास लेट झालेल्या फ़्लाईटने बंगलोरच्या दिशेने झेप घेतली. बंगलोरमध्ये पोचून ताबडतोब कोडाईच्या दिशेने निघायची वाट बघणार्‍या माझ्या हातात वाट पाहण्यापलिकडे काही नव्हतं.

राहून राहून माझ्या मनात एकच प्रश्न येत होता,
' नेहा आपल्या नियतीशी झुंज देईल का? '


१२.

बंगलोरला पुन्हा पोचले तशी मी पुन्हा नेहाच्या घरचा फोन नंबर ट्राय केला. अजूनही फोन डेड होता बहुतेक. मी ताबडतोब कोडाईला जायचं ठरवलं आणि माझ्या एका सहकार्‍याला मिळेल ते बुकिंग करण्यासाठी पिटाळलं.
नंतर ऑफिसमध्ये गेले तर माझे अजून दोन सहकारी माझी वाटच बघत होते. नुकतेच आले होते ते बहुधा. त्यांना सर्व माहिती मिळाली होती कदाचित; कारण त्यांच्या चेहर्‍यावरून आनंद आणि अधीरता दोन्ही ओसंडून वाहात होती.

त्यांनी बोलायला सुरुवात केली. ते जे काही सांगत होते, त्या एकेका रहस्योद्घाटनासरशी माझं मन सुन्न होत होतं. आपण काही काही गोष्टी वेळीच ओळखायला चुकलो याचं तर जास्तच वाईट वाटत होतं. सगळं बोलून झाल्यावर त्यांनी मिळवलेले पुरावे माझ्यासमोर ठेवले आणि ते निघून गेले. संध्याकाळ होत होती. माझं मन आता पूर्ण अस्वस्थ झालं होतं. भरीला मी बुकिंगसाठी पिटाळलेला माणूस एक वाईट बातमी घेऊनच परत आला.

" कोडाईची एकही गाडी थेट कोडाईपर्यंत जाऊ शकत नाहीये मॅडम. वेदर भयंकर बिघडलंय तिथलं. त्या घाटात दोन तास गाडी चालवायला कुणीही तयार होत नाहीये.
तरीही मी तुमच्यासाठी रात्रीच्या बसची तिकिटं आणलीयेत. "

मला लगेच निघायला हवं होतं. जाण्याआधी शेवटचा प्रयत्न म्हणून मी नेहाला फोन लावला. रिंग वाजायला लागली.

" हॅलो.... " मी चमकले. आदित्य भागवत.

" हॅलो.... "
" ओह सुनीता... सुनीता वर्मा... बोला. लागला का काही तपास? मी फार काळजीत पडलोय हो. "
" जास्त हुशारी दाखवू नका, मि. आदित्य. तुमचं खरं रूप आता कळलंय मला. पण तुम्ही अभिनय छान केलात. एका गुणी, प्रेमळ नवर्‍याचा. मानलं तुम्हाला. "
" ओहो. मिळाली तुम्हाला माहिती? पण किती उशिरा मिळाली ना? तुम्ही बंगलोरमध्ये, नेहा इथे कोडाईत. कसं होणार हो तिचं? कसं वाचवणार तुम्ही तिला?
बाकी एक चूक होता होता टळली म्हणा. नेहा आत्ताच बाहेर गेली आणि मी हा फोन घेतला नाहीतर तिला आधीच कळलं असतं ना! तुम्ही सावध केलं असतंत तिला.... "
" हे तुम्ही तिच्या काकांनी तिच्या नावावर केलेल्या पैशांच्या मोहापायी करताय हे कळलं मला. पण ती तशीही तिची सर्व मालमत्ता तुमच्या नावे करून द्यायला तयार होती ना? "
" अं हं... तेवढं कारण नाहीये, सुनीता, त्यामागचं. त्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे सिद्धी. "
" काय? "
" होय.. आयुष्यात मी ज्या एकाच व्यक्तीवर भरभरून प्रेम केलं ती. तिचं खरं नाव अरुणिमा दत्ता. आमची कॉलेजात पहिल्यांदा भेट झाली आणि आम्ही एकमेकांच्या प्रेमातही पडलो. आयुष्यात सेटल झाल्या झाल्या तिच्याशी लग्न करायचा माझा विचार पक्का होता. पण सिद्धी जराशी विक्षिप्त होती. तिला गूढ विद्यांमध्ये बराच रस होता. आमचं शिक्षण संपत आलं असताना तिला Cards of Doom बद्दल कळलं. तिला त्याचं प्रचंड आकर्षण वाटलं. आणि मी नको, नको म्हणत असतानादेखील ती त्या पाठशाळेत दाखल झाली. माझ्याशी संपर्कही तिने तोडून टाकला.

मी निराश झालो. त्या शहरात मला तिची आठवण सतत यायची म्हणून मी बंगलोरला आलो आणि स्वतःचा व्यवसाय सुरु केला. बर्‍यापैकी जम बसला माझा. मी सगळ्यांशी मैत्रीपूर्ण रिलेशन्स ठेवून होतो. त्यामुळे मला मदत व्हायची.
नेहाच्या त्या accident चा किस्सा तुम्ही ऐकलाच असेल. त्या काळात मी नेहाला खरोखर एक चांगला मित्र म्हणूनच मदत करत होतो. तेवढ्यात तिचे काका वारल्याची खबर आणि त्यांचं विल एकदमच येऊन थडकले. कोट्यावधींची मालमत्ता त्यांनी नेहाच्या नावावर केली होती. तिला काही झालं असतं तर ती सर्व तिच्या वारसाला, तिने नॉमिनेट केलेल्या माणसाला मिळाली असती. एवढी संपत्ती बघताच माझं मन चळलं. ही संपत्ती मिळवण्याचा एकच मार्ग मला दिसत होता. नेहा तर जगण्याची शक्यता दिसत नव्हतीच. मी तिला लग्नाची मागणी घातली.
अर्थातच तिच्या काकांच्या विलची गोष्ट मी तिच्यापासून लपवून ठेवली. तसंही नेहा जगली असती तरी फारसा फरक पडला नसता, कारण अरुणिमा मला सोडून गेल्यावर माझा लग्न इत्यादी गोष्टींमधला रस संपला होता. आयुष्य नेहासोबत रेटता आलं असतं. पण ते व्हायचं नव्हतं.
नेहा कोडाईला राहायला गेल्यावर एक दिवस अचानक अरुणिमा मला येऊन भेटली. तिला माझ्या आयुष्यात पुन्हा परत यायचं होतं. माझ्या आनंदाला आता पारावार राहिला नाही. पण आता नेहा आमच्यातला अडसर ठरणार होती.
नेहा हळूहळू बरी होत गेली आणि माझ्या संतापात भर पडत गेली. नेहाला जर मी घटस्फोट दिला आणि नंतर तिला मी तिचे पैसे कसे हडपले याचा सुगावा लागला तर? मला ती रिस्क नको होती... तसंच नेहाच्या वडिलांचा business दुसर्‍याला विकून आलेल्या पैशांचा मोठा वाटा माझ्याकडेच होता. नेहाला संशय येऊ नये म्हणून काही रक्कम मी तिच्या नावावर केली होती.
हळूहळू मी आणि सिद्धीने नेहाला संपवण्याचा प्लॅन बनवला. सगळी तयारी नीट करायला हवी होती कारण हा मृत्यू फार फार तर एक अपघात वाटायला हवा होता. आत्तापर्यंत घडलेल्या घटनांची तुम्ही संगती लावली तर ते कळेलच तुम्हाला.
गाडीचे ब्रेक थोडेसे फेल होणं आणि ड्रायव्हरचं झाडीत सापडणं या गोष्टी मीच प्लॅन केल्या होत्या. बंगलोरमधला ट्रक मी प्लॅन केला नव्हता.. तो खरोखर एक अपघात होता, पण त्याने नेहाच्या मनातली भीती आणखीच वाढवली.....
त्या पुस्तकाचं वेष्टण... "
" मला माहितीये ते... तुम्हीच ते त्या दुकानदाराला नेऊन दिलं होतंत.
आणि पण श्वेताचं काय? तीही तुम्हाला यात सामील होती ना? त्यादिवशी मी तिला झाडीतून बाहेर पडताना बघितलं होतं तुमच्यापाठोपाठ... "
" ओह नो... तिचा या सर्वाशी काही संबंध नाही. तिचा नेहावर जीव होता... आणि वेल... तिचं माझ्यावर प्रेम बसलं होतं. तिला मी हवा होतो. त्यादिवशी तिने मला स्पष्ट विचारलं आणि मी नाही म्हटलं. आणि नेहाशी ती विश्वासघात करतेय असं तिला जाणवून दिलं. ती बोच असह्य होऊन ती लगोलग निघून गेली. "
" पण हे सिद्धीचं भविष्य?..... "

" सिद्धीचा तिच्या विद्येवर प्रचंड विश्वास आहे. म्हणूनच तिने नंदिनी मेहताच्या घरी नेहाचं भविष्य बघितलं. आणि ते आमच्या अपेक्षेप्रमाणेच असल्याने.... "

फोन कट झाला. मी पुन्हा दातओठ खाऊन नंबर फिरवला. पुन्हा फोन डेड झाला होता. मी मिळेल ती गाडी घेतली आणि कोडाईला निघाले. पहाटे चारच्या सुमारास मी कोडाईच्या घाटाच्या पायथ्याशी पोचले. कुणीच तसल्या धुक्यात आणि खराब हवामानात गाडी चढवायला तयार होईना. शेवटी पैशाची लालूच दाखवून एकाला सोबत घेतलं.

मी कोडाईत शिरले तेव्हा साडेसहा वाजत होते. किंचित पहाट झाली होती. मी ताबडतोब पोलिस स्टेशन गाठलं. तिथे मी गेले तेव्हा बरीच लगबग चालू होती.
बाहेर पोलिसांची जीप उभी होती. माझ्या कानावर एका हवालदाराचं बोलणं पडलं.
" साला इस सीझनमे डेव्हिल्स किचनमे एक तो accident होता है.. पता नही लोग उधर क्यू मरनेको जाते है? "
मी चरकले. ड्रायव्हरला मी गाडी ताबडतोब डेव्हिल्स किचनकडे घ्यायला सांगितली. माझ्या मनात असंख्य प्रश्न थैमान घालत होते. नेहाने झुंज दिली असेल का? की आदित्य आणि सिद्धीवर नियती मेहरबान झाली असेल? नेहाला सत्य कळल्यावर झुंजायची ताकद तरी राहिली असेल का?
डेव्हिल्स किचनचा स्पॉट दृष्टीपथात आला तसं मी बघितलं... तिथे बर्‍यापैकी गर्दी जमली होती, पोलीस दिसत होते. धुकं दाट होतं म्हणून शोधकार्याला गती येत नव्हती बहुधा. गाडी थांबली. मी जवळपास धावतच त्या स्पॉटकडे निघाले.... आणि जागीच थबकले.

एका बाजूच्या कट्ट्यावर गुडघ्याला हातांची मिठी घालून नेहा बसली होती. अंगावर विटकी, मळकी जीन्स, चेहर्‍यावर प्रचंड थकल्याचे भाव, गालावर सुकलेले अश्रू.... मी सुटकेचा श्वास सोडला.

तिने माझी चाहूल लागून माझ्याकडे बघितलं. आणि स्वतःशीच बोलल्यासारखी ती बोलू लागली...
" काल मी घरी आले तेव्हा आदी घरी नव्हता. मध्यरात्र उलटून गेली तरी तो आला नव्हता, अचानक एक माणूस, पोलिसांचा ड्रेस घातलेला, मेसेज घेऊन आला की आदीच्या गाडीला डेव्हिल्स किचनपाशी अपघात झालाय. मी घाबरले... कसलाही विचार न करता डेव्हिल्स किचनकडे यायला निघाले.
इकडे आल्यावर कळलं की तो एक ट्रॅप होता... आदीचा आणि...... सिद्धीचा. त्यांनी मला सांगितलं.. मला सांगितलं.... "
" मला ठाऊक आहे ते... पुढे? "
" आम्हा तिघांमध्ये खूप झटापट झाली. माझ्या अस्थिर मानसिक अवस्थेचा फायदा घेऊन त्यांना माझ्या मृत्यूला आत्महत्येचं रुप द्यायचं होतं. पण मी झगडले. एकदा मृत्यूच्या दारातून खेचून आणलेला जीव मला असा सहजासहजी गमवायचा नव्हता. यातच कसा कोण जाणे, सिद्धीचा तोल गेला आणि ती.... आदीने ते बघितलं आणि दुःखातिरेकाने पाठोपाठ उडी टाकली.... दोघंही.... पोलीस त्यांच्या बॉडीज मिळवण्याचा प्रयत्न करतायत.. पण डेव्हिल्स किचनमध्ये असलं काही सापडणं मुश्किल आहे.... "

नेहा भागवतने अखेर combination of doom शी यशस्वी झुंज दिली होती. माझी केस संपली होती. मी फारसं काही न करता. अनोखी केस होती ती. मी बरंच काही शिकले त्यातून. गुन्हे शोधण्याच्या पद्धतीतही मी बरीच सुधारणा केली त्यानंतर. आणि मुख्य म्हणजे भविष्य वगैरेंसारख्या माझ्यालेखी वीअर्ड गोष्टींवरही जरा विश्वास ठेवायला शिकले.

---------------------------------------------------------

सुनीता वर्मांचं बोलणं थांबलं होतं. त्या मनाने पुन्हा त्या काळात गेल्या होत्या बहुधा.

" येते मी. " मी म्हणाले आणि त्यांनी होकारार्थी मान डोलावताच त्यांच्या बंगल्यातून बाहेर पडले.

समाप्त.

-Shraddhak