« | »




हैदियाल

ती मला प्रथम भेटली ते आर्यक च्या school bus stop वर. आम्ही रहायला एडिसन न्यू जर्सी मधे, त्यामुळे सगळीकडे देशी पब्लिक पहायची सवय. त्यात डोक्याला पूर्ण झाकणारा स्कार्फ़ बांधलेली, गोरीपान, सरळ नाक, किन्चित भेदक डोळ्याची ती (कोण बरं असेल इराणी, अफ़गाण?) मला लक्षात राहिली तशी, पण सुरुवातीला फ़ार परकी वाटली.

तिची मुलगी हॅना आणि मुलगा ओमर. हॅना आर्यक च्याच वर्गात. एकदा काही कारणाने शाळा अर्धाच दिवस होती. मी बस स्टॉप वर आर्यक ला पिक अप करायला गेले, पहाते तर हॅना आपली कावरी बावरी होऊन आईला शोधत होती. हैदी बहुधा शाळा लवकर सुटणार असल्याचे विसरली होती. आता मला तिचं घर माहीत नव्हतं की फोन नंबर पण नव्हता! मग बरीच शोधाशोध, कुणा कुणाला फोन असे केल्यावर सापडला आणि हैदीला निरोप दिला एकदाचा! होतं असं कधीतरी.. मला काही खास वाटलं नाही या प्रकाराचं. पण नवल मला दुसर्‍या दिवशी वाटलं, जेव्हा हैदीला मी स्कूल बस ड्रायव्हरशी भांडताना पाहिलं! 'माझ्या मुलीला मी स्टॉप वर नसतांना तू उतरूच कसं दिलंस? नियमाप्रमाणे KG मधल्या मुलाला कुणी स्टॉप वर घ्यायला आलं नाही तर बस ड्रायव्हर ने तिथे सोडायला नको!' तिचं चूक नव्हतं पण मी तिच्या जागी असते तर मला 'आपण मुलाला आणायला यायचं विसरलो' याबद्दल इतकं ओशाळवाणं वाटलं असतं की बस ड्रायव्हर ला काही बोलायचं मला सुचलंच नसतं! पण या पठ्ठीने नुस्ते सोडून न देता पार school transport office ला तक्रार पण केली! तेव्हा मनातून वाटलं जरा 'ऍटिट्यूड'च दिसतोय हिला!

अशी हळू हळू आमची ओळख वाढत गेली. ती आणि तिचं कुटुंब बर्‍याच वर्षांपूर्वी इजिप्त मधून इथे US मधे आले होते. आता रीतसर इथलं नागरिकत्व पण होतं. तिचं, तिच्या पोरांचं बोलणं नुस्तं ऐकलं तर वाटावं अमेरिकन्सच आहेत म्हणून. पण तेवढं सोडलं तर अतिशय पारंपारीक धार्मिक मुस्लिम आहे ती.
कपडे कायम सैलसर, चुकूनही कधी शरीराला न चिकटणारे, शरीराची बाह्यरेषाही कळू नये असे, पायघोळ, डोक्याला कपाळही झाकणारा तो विशिष्ट रुमाल(हिजाब)! मला आपलं तो अवतार पाहिला की वाटतं हिला कधी छान कपडे, छान hair cut, hair style करून बाहेर जावेसे वाटत कसं नाही! जरा सुरुवातीची भीड चेपल्यावर मी तसं विचारलं पण होतं अप्रत्यक्षपणे! तिचं आपलं शांतपणे उत्तर, 'आमच्या धर्मात जसं सांगितलय तसेच कपडे आम्हाला घालावे लागतात.' लगेच मी, 'अगं पण का असं? तेव्हा सांगितलं ते सगळं आज relevant कसं? बदलावं असं नाही का वाटत?' तिचं तेच, ' धर्मात जे सांगितलय त्यावर माझा विश्वास अन श्रद्धा आहे, मला काही तक्रार नाही त्याबद्दल' माझा अज्ञानमूलक आणि भोचक प्रश्न 'मग हॅनाचं काय? ती कशी jeans -Tshirt घालते?'
' ती वयात आली की तीही माझ्यासारखेच कपडे घालेल!'
मला निरागस हॅना कडे पाहून आत्ताच वाईट वाटायला लागलं! वाटलं यांना इथे कोण pressurize करणार आहे! का असल्या गोष्टी पाळाव्या यांनी!
पण खरी गोष्ट नंतर माझ्या लक्षात आली की हैदी आणि तिच्या परिवारालाच या सर्वांवर विश्वास, श्रद्धा आणि अभिमानही आहे!

मला तिचं, त्यांच्या चालीरितींचं कायम कुतुहल वाटायचं. खूप घोर अज्ञानी आणि भोचक वाटावे असे प्रश्न मी नेहमीच तिला विचारायचे आणि तिची तशीच शांत उत्तरं! तोवर माझी कल्पना की जगात सगळे मुस्लिम ईद ला शीर - खुर्मा करून खातात! रमझान च्या महिन्यात मी तिला तसं विचारलं पण! तिला बिचारीला तो प्रकार ऐकून पण माहीत नव्हता! अर्थात तिचंही भारताबद्दल अगाधच ज्ञान होतं म्हणा! माझ्या इतर भारतीय मैत्रिणींशी मी इन्ग्रजीतून का बोलते, 'हिन्दू'तून का बोलत नाही असा तिला प्रश्न पडायचा! मग तिला कळलं की इथे चारही भारतीय बायकांच्या चार पूर्णपणे वेगळ्या भाषा अहेत, त्यात पुन्हा south indian ना हिन्दी पण येत नाही वगैरे!

रमझान मधे अर्थातच ती अगदी श्रद्धेने उपवास करते. मला आठवतंय, त्या दिवशी ईद होती. तिने मुलांना शाळेत पाठवलं नाही. आता आम्हाला आश्चर्य वाटायला नको होतं, पण वाटलं! कारण आमची आणि इतकी सगळी देशी मुलं दिवाळीच्या दिवशी मुकाट्याने शाळेत जात होती! इथे अमेरिकेत दिवाळीला सुट्टी हवीशी वाटली तरी मिळणार कशी, मग उगाच शाळा कशाला बुडवा! हा झाला आमचा विचार! पण हैदीचं थोडीच आमच्यासारखं असणार! ती म्हणते, 'मी नाही पाठवत! सगळ्यात मोठा सण आहे ईद! तरी आज सगळ्या celebrations ला का मुकावं मुलांनी?' इथेच ती थांबली नाही तर शाळेत फोन करून ते एक आठवडा आधी तिने कळवले होते. आणि वर माझ्या मुलांना त्या दिवशी गैरहजर मांडणे हे कसे unfair आहे यावर शाळेच्या authorities ना जाऊन सुनावले!

आता आम्हीही आपले सगळे भारतीय सण घरात आणि मित्रमंडळात साजरे करतोच. पण हैदी आमच्याहून दोन का, चार पावले पुढे आहे! दर वर्षी ईद च्या आदल्या दिवशी ती मुलांच्या शाळेत जाते. तिथे एक छोटेसे presentation शिक्षकांच्या परवानगीने करते, ईद चे महत्त्व मुलांना समजेल अशा पद्धतीने सांगते. त्याला साजेसे एखादे art project , कन्दील वगैरे मुलांकडून करून घेते, सर्व वर्गमित्रांना,शिक्षकांना छोटीशी भेटवस्तू, खाऊ देते!

अजून एक असाच किस्सा, scholastic तर्फे दर महिन्यात शाळांमधून मुलांसाठी पुस्तके विकायला येतात. त्यात त्या त्या महिन्यात Holidays असतील तर त्याबद्दलची पुस्तके विकायला येतात. तर त्या scholastic च्या authorities शीही हैदीचा झगडा गेली कित्येक महिने सुरू आहे! का तर ख्रिसमस, सिन्को दि मायो, हनुक्का, सगळी पुस्तके येतात पण ईद च्या महिन्यात ईद बद्दल पुस्तक का नाही येत विकायला?
मी तेव्हा तिला म्हटलं की तू जरा जास्त अपेक्षा ठेवतेयस असे नाही का वाटत या लोकांकडून! यातून काही होणार आहे असं वाटतय का खरच तुला!कशाला जिथे तिथे झगडतेस!
इथे ती एक क्षण थांबली, मग म्हणाली ,'बरोबर आहे, या लोकांना कदाचित नाही फरक पडणार! पण सांगू का, माझ्या मुलांना पडतो फरक! माझी मुलं ख्रिसमस ला अन् हनुक्काला इतरांना विश करतात, मग त्यांना ही अधिकार आहेच ना ईदला त्यांनाही इतरांनी शुभेच्छा द्याव्यात! जेव्हा ईदच्या दिवशी शाळेत मी presentation करते तेव्हा हॅना, ओमर चे चेहेरे जे अभिमानाने फुलतात! ते पाहिलं की कळतं Yes it makes a difference! and only I can do it! .
मला म्हणाली. 'तू तरी खूप भाग्यवान आहेस! तुमची इथे केवढी community आहे! तुला धर्माच्या आधारावर इथे कुणी अपमानास्पद वागणूक देत नाही कधी! पण माझी गोष्ट वेगळीय गं! मी एक साधीसुधी धार्मिक स्त्री आहे. माझाही धर्म मला प्यारा आहे, जसा इतरांना त्यांचा प्रिय असतो तसाच! पण माझ्या धर्मातल्या काही वाईट लोकांमुळे माझा आख्खा धर्मच आज बदनाम आहे! मला पदोपदी अनेक डोळ्यात तिरस्कार दिसलाय, केवळ माझ्या धर्मामुळे! माझ्या धर्माबद्दल ज्यांना काहिही माहिती नाहीय अशा लोकांना इस्लाम बद्दल अपमानास्पद बोलताना ऐकलय मी! तरी माझी श्रद्धा, माझा विश्वास नाही हलला! पण माझी मुलं लहान आहेत अजून, अजाण आहेत! माझ्या मुलांना फ़क्त हा सगळा तिरस्कारच दिसत राहिला तर? त्यांना स्वतबद्दल, आपल्या धर्माबद्दल काय वाटेल? काय होईल त्यांच्या आत्मविश्वासाचं? मला नाही चालणार त्यांच्यात कुठला न्यूनगंड आलेला! मला त्यांच्या आत्मविश्वासाला बळ द्यायचेय, धर्म पाळून आपण चूक करत नाहीय, आपला पण धर्म इतरांच्या धर्मासारखाच सन्माननीय आहे हे मला त्यांना सांगायचय, त्यांच्यात स्वाभिमान जागवायचाय!
म्हणून ही सगळी धडपड बघ! यात काही लौकिकार्थाने फळ न का मिळेना, ती धडपड करणं हेच महत्वाचं! चूक आहे का माझं काही, सांग!' मी यावर काय उत्तर देणार? हॅना आणि ओमर चे बोट धरून नेहमीप्रमाणे ताठ मानेने निघालेल्या हैदीकडे मी बघत राहिले!


- मैत्रेयी