« | »




ग्रहण

कुठल्याश्या ग्रहणाच्या संध्याकाळी,
विटाळलेला चंद्र डोक्यावर घेऊन
" दे दान, छूटे गिर्‍हान " अशी बोंब
मारणार्‍या फकिराचा आवाज कानी आला,
की काळीज कसं थिजून जातं...

तुळशीवृंदावनाच्या कोनाड्यात
नित्यनेमाने दिवा ठेवणारी...,
अल्लड हसून पापण्या फडफडवणारी...,
परडीत पारिजाताच एकेक फूल
तन्मयतेने टाकणारी मुग्धा पाहिली,
की काळीज कसं थिजून जातं...

मग थरथरत्या कंदिलाच्या
काचेवरल्या काजळीला साक्षी ठेवून
त्या फकिराच्या पायावर डोकं ठेवावसं वाटतं...
समोरच्याच कल्लोळात उडी टाकावी की काय?
असाही विचार येतो...
पण यातलं काहीही न करता,
मी भकास खिडकीत बसतो -
गुढगे पोटात ढकलून...

ग्रहणात विटाळलेले कपडे,
अन्न - सगळं दान करता येतं
अंघोळ करून शुद्धीकरणही करता येतं...
पण तरीही...
तरीही, एक प्रश्न कुरतडत असतो, जीवघेणं...

विटाळलेल्या मनाचं काय...???

" दे दान, छूटे गिर्‍हान "
" दे दान, छूटे गिर्‍हान... "

-सारंग.