« | »




लखलखता पाऊस

गरजत आलेले मेघ
न बरसताच निघून गेले
मेघ - गर्जनेला घाबरून
विजेचे दिवे विझून गेले

टेलिफोन अंधारतही येतो
त्याला उजेड लागत नाही
कितीही दुरून आला तरी
तो अंधारतही ठेचकाळत नाही

थरथरत्या मेणबत्या
चरचर कापू लागतात
जेव्हा अवाढव्य आकृत्या
भिंतीवर नाचू लागतात

पुन्हा एकदा कडाडते
आता फोनही पुरता घाबरतो
कसलाही आवाज न करता
फोन गुपचुप मरतो

मेलं माणूस येत नाही
पण फोन मात्र येतो
मी जिवंत आहे का
आम्हालाच विचारतो

भिंतीवरती नाचून नाचून
सावल्याही दमतात
मग अंधारत रेंगाळायला
पावलं बाहेर निघतात

पंखा बंद असतो म्हणून
आता गार वारा असतो
सिने तारकांना सोडून
आज आपण खर्‍या तारका बघतो

आता रेंगाळलेली पावलं
फतकल मारून गप्पा रचतात
उजेडाला रुळलेली आता
अंधाराशी सलगी करतात

पावसाची हवा अजूनही
जोर धरून असते
वार्‍यावर हेलकावणार्‍या दिव्यांना
जणू पावसाचीच भीती असते

अंधारलेल्या आभाळा जातो
प्रकाशाचा तडा
रिमझिम पाणी बरसू लागतं
फुटतो कृष्णमेघांचा घडा

निमिषात दिसे सारे
निमिषात सारे विझे
थोपावल्या चंद्रकिरणांचे
नभास होत असे ओझे

इतक्यात चौकोनी झरोके
चमचम करीत लखलखतात
वारूळ सोडलेली पावलं
पुन्हा वारूळात घुसतात...

-सत्यजीत.