Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 02, 2007

Hitguj » Language and Literature » पद्य » चंद्रशेखर सानेकर » Archive through February 02, 2007 « Previous Next »

Yuvrajshekhar
Monday, January 15, 2007 - 9:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जन्मला आहे नव्याने आज राखेतून तो
बघ, उद्या येईल पुन्हा आणखी बहरून तो

तो कुठे भयभीत झाला होऊनी घायाळही
मनगटाला राहिला आहे उभा परजून तो

या तमाचा वेध त्याने घेतला होता कधी
आजही जाणार आहे हा तमस भेदून तो

घेतली आहे भविष्यानेच त्याची काळजी
वर्तमानालाच आहे चालला समजून तो

घातली आहे कुठे त्याने दग्यांना भीकही
चालला आहे दिशांनाही दिशा देऊन तो

कोरतो आहे युगावर तो उद्याचा दिग्विजय
झुंजतो आहे पराभव आजचा पचवून तो


Yuvrajshekhar
Monday, January 15, 2007 - 9:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाणी तवंगलेले बदलायला हवे
दुनियेस एकदा या उपसायला हवे

लागेल जंगलाला वणवा हळूहळू
एकेक झाड आधी पेटायला हवे

क्षण एकही न माझा ते वाचती कधी
आयुष्य मात्र माझे चाळायला हवे

आपापल्या व्यथांचे होतील सूर्य ते
आतून रक्त आधी तळपायला हवे

टाकून कात आता झालीस तू नवी
डोळे अता मलाही बदलायला हवे


Yuvrajshekhar
Monday, January 15, 2007 - 9:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हरवलेली वाट माझी मी अशी शोधायचो
एकटा तंद्रीत माझ्या दूरवर भटकायचो

जो दिवस उगवे मला फेकायचा चुरगाळुनी
सांज झाली की मला मी रात्रभर हुडकायचो

ही तिची तक्रार की मी सापडत नाही तिला
चूक माझी एवढी की मी तिला शोधायचो

भ्यायचो मीही स्वत:चे एकटेपण पाहुनी
जाऊनी बाहेर मग गर्दीमध्ये मिसळायचो

एक हिम्मत घेऊनी मी जायचो झुंजायला
अन घरी ठिकय्रा हजारो घेऊनी परतायचो

चेहय्रांची खूप भीती सारखी वाटायची
उत्तरे शोधायला मी पुस्तके वाचायचो


Yuvrajshekhar
Monday, January 15, 2007 - 9:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नेमके समजे न मजला मी कसा आहे खरा
मीच आहे नाव आणि मीच आहे भोवरा

थांबलो नाही कधी पण धीर खचतो सारखा
चालतो आहे तरीही जीव होई घाबरा

कोण तो आहे प्रवासी? कोणती त्याची दिशा?
श्वास ज्याचे वावटळ अन पाय ज्याचे भोवरा

थांबतो मग काळ माझा वाट बघताना तुझी
अन तुझ्या एका क्षणाचा जन्म मागे आसरा

शोधतो आहेस तेथे तू भविष्याच्या खुणा
वर्तमानालाच जेथे राहिला ना चेहरा

सावरु शकलो न आपण तोल दोघांचे कधी
गाठही होती चुकीची,दोरही नव्हता खरा

भेद दृष्टीचाच आहे,सर्व सृष्टी सारखी
आंधळ्याला तीर दिसतो,डोळसाला भोवरा


Yuvrajshekhar
Monday, January 15, 2007 - 10:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुठेतरी मग भरकटलेला वणवणणारा प्रवास होतो
तुझी आठवण येते तेव्हा तुझी शपथ मी उदास होतो

दिसूनही मी दिसलो नाही,जवळ तुझ्या मी होतो इतका
बघूनही तू नजर फसावी असा तुझ्या आसपास होतो

श्वास करावे मुक्त मोकळे,लाख लाख मग गुंतून घ्यावे
जुळले नाही सूर असे तर जन्म उभा बंदिवास होतो

धीर समजलो ज्या हाकेला केवळ तो आवाज निघाला
सदैव स्वप्ने बघणाय्राचा असाच का भ्रमनिरास होतो

जुळूनही जुळणारच नाही,तुटूनही तुटणारच नाही
तुझासुद्धा हा कयास आहे,मलासुद्धा हाच भास होतो

स्वप्ने बघता बघता सारी हयात अमुची सरुन जाते
चण्याफुटाण्यांमध्येच सगळा पगार अमुचा खलास होतो

किती किती ते जिवंत होते जगणे माझे झपाटलेले
मनात नव्हते तवंग कुठले,भणंग पण दिलखुलास होतो


Yuvrajshekhar
Monday, January 15, 2007 - 10:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तरळले डोळ्यांत पाणी, पापणी झुकवू नको
अंतरीच्या पावसाच्या तू सरी लपवू नको

मी उन्हांच्या पाकळ्यांचा एक जळणारा ऋतू
सावली देऊन माझी आग तू विझवू नको

सोबती आहेस तोवर हात हाती राहू दे
दूर गेल्यावर उगाचच हात मग हलवू नको

मी मुळी आहे सुखाने हासणारा हुंदका
मी स्वत:ला जाणतो पण तू तुला फसवू नको

एक मी आहे उतरणीतून सुटलेली शिळा
दूर राहूनी पहा तू, पण मला अडवू नको

आंधळी आहेत सगळी माणसे वस्तीतली
तू असे समजून अपुले काजवे खपवू नको

मी कसा बेचैन आहे... तू जरा समजून घे
जे मला पटणार नाही ते कधी सुचवू नको


Yuvrajshekhar
Monday, January 15, 2007 - 10:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सावरु शकलोच नसतो मग तुला स्पर्शून मी
याचसाठी चाललो नाही तुला बिलगून मी

आरशाच्या सारख्या भेटी मला देऊ नको
पाहिला आहे स्वत:चा चेहरा जवळून मी

वाळवंटी वाढलेले एक आहे झाड मी
जन्मभर तृष्णाच माझी घेतली शोषून मी

राहिला नाही अता आवाजही माझा नवा
एक किंकाळी मघाशी पाहिली फोडून मी

एकदा मी पाहिला अंधार माझ्या आतला
मग कधी ना पाहिले माझ्यात डोकावून मी

दोस्त जेव्हा आपले खोट्यात सामिल पाहिले
अर्थ सत्याचाच तेव्हा घेतला बदलून मी

मी कधी भेटेन आता हे कसे सांगू तुला
आजवर नाही कुणाला भेटलो ठरवून मी

तू दरी होतीस आणि मी कड्यावरती उभा
यात माझे काय चुकले जर दिले झोकून मी

नग्न झालेली मला तेव्हा खरी दिसलीस तू
पाहिले जेव्हा शरीराला तुझ्या नेसून मी


Yuvrajshekhar
Monday, January 15, 2007 - 10:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डोळ्यांतुनी मनाचे सांगायला मला
ती रोज रोज येते भेटायला मला

आहे विखूरलेला दाही दिशांस मी
एकांत गाठ माझा वेचायला मला

कुठल्याच मी फुलाचा झालो न सोबती
होताच वाव कोठे बहरायला मला

मजला रडायचीही आहे मुभा कुठे
एकेक दु:ख येते हसवायला मला

समजू नकोस काही इतक्यात तू खरे
लागेल वेळ थोडा ठरवायला मला

आहेस आरसा तू, मी बिंब त्यातले
जाणून घे तुला तू समजायला मला

जाईन साथ अंती सोडून मी तुझी
लावू नकोस इतके धावायला मला

असतो तिच्याच जेव्हा मी मैत्रिणींसवे
ती त्या क्षणीच येते भेटायला मला

चाखून तोवरी घे गाभूळली मिठी
दे ओठ अर्धकच्चे पिकवायला मला


Yuvrajshekhar
Monday, January 15, 2007 - 10:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाहिले नव्हते तिला पण मी तिला माहीत होतो
मी कधी काळी तिच्याही यौवनाचे गीत होतो

खूप काही हारलो पण काय हरलो नेमके मी?
हे तरी कळले कुठे की काय मी मिळवीत होतो

सोबती होता खरा तो, त्यास का नाकारले मी?
नेमका तेव्हा कुणाचा हात मी शोधीत होतो?

पाहिजे होती जराशी ऊब मायेच्या घराची
पण घराच्या कल्पनेने जन्मभर मी भीत होतो

हेही झाले जन्मभर तू सोबती होतीस माझी
हेही झाले जन्मभर मी सोबती शोधीत होतो


Yuvrajshekhar
Monday, January 15, 2007 - 10:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लाविला नाही दिवा मी पण कुठे अंधार नाही
वेदना आहे अघोरी पण मुखी चित्कार नाही

शोधतो आहे दिशा,जी पाऊले समजेल माझी
सारखी तडजोड वाटांशी मला जमणार नाही

शेवटी फोडून टाहो फेकूनी देईन ओझे
सोसण्यासाठी मुक्याने मी कुणी अवतार नाही

याचसाठी थांबलो की तो तुझा आवाज होता
अन्यथा थांबेन जेथे मी... असे हे दार नाही

व्यर्थ सारे सिद्ध झाले बोललो जे जे तुझ्याशी
शेवटी इतकेच कळले मीच समजूतदार नाही

पाहिजे आहे तुला तो,जो तुझी राखील मर्जी
अन तुझे दुर्दैव हे की मी तसा लाचार नाही

प्रश्न नाही हा कि तेव्हा नेमके चुकले कुणाचे
प्रश्न आहे त्या क्षणाचा जो परत फिरणार नाही

खूपसे दिसतात हल्ली भोवती अस्वस्थ टाहो
पण नभाला भेदणारा एकही उदगार नाही


Yuvrajshekhar
Monday, January 15, 2007 - 10:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी लागलो बोलायला तू बोल वा बोलू नको
हाती तुझ्या हा फैसला तू बोल वा बोलू नको

मी जाणतो आहे तुझ्या डोळ्यातल्या हिरव्या खुणा
पण शब्द दे ओठांतला तू बोल वा बोलू नको

विसरुन तू जाशीलही माझे ऋतु, माझे बहर
होतोच मी कोठे भला तू बोल वा बोलू नको

बोलेन मी रंगातुनी हृदयातली भाषा तुझी
आहे तुझा मी कुंचला तू बोल वा बोलू नको

आता नको मागे वळू, आता न मी तो राहिलो
दे हाक ती माझी मला तू बोल वा बोलू नको

सांगुनिया माझी व्यथा मी मोकळा झालो अता
मज साधली माझी कला तू बोल वा बोलू नको


Yuvrajshekhar
Monday, January 15, 2007 - 10:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भुकेसारखी सोबत असते तुझी आठवण धगधगणारी
होऊन जातो मीच भिकारी जेव्हा येतो माझ्या दारी

सगळ्या मित्रांसाठी अंती होऊन गेलो गहाणखत मी
ज्याची त्याची होती माझ्या नावावरती खूप उधारी

मुळी न याची खंत मला की तहान माझी शमली नाही
पण आशेने आलो होतो तहानलेला तुझ्याच दारी

कधी न त्याची उमेद जगली ज्याच्या डोळां अश्रू येती
ज्याच्या डोळां असती स्वप्ने त्याची जगते उपासमारी


Saavat
Tuesday, January 16, 2007 - 8:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>टाकून कात आता झालीस तू नवी
डोळे अता मलाही बदलायला हवे<<<

व्वा! युवराज,सुंदर संग्रह!!धन्यवाद!







Yuvrajshekhar
Tuesday, January 16, 2007 - 8:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुन्हा वाटते की तुला गुणगुणावे
तुला गुणगुणाया तुझे ओठ व्हावे

तुला पाहिजे तो मला रंग दे तू
तुला पाहिजे ती मला ठेव नावे

दिले कोवळे स्वप्न मी जीवनाला
तुझे स्वप्न माझ्या उशाला असावे

असा आज एकांतही गप्प आहे
जणू काय बोलायचे ते न ठावे

दिव्याला जसे छळावे वादळाने
तुझे श्वास देती तसे हेलकावे

इथे वाहतो गंध बदनाम माझा
फुलांनी जरा वेगळे दरवळावे

कुठे राहिलो मी मला ओळखीचा
अता टाळतो मी तुझेही सुगावे

मला जीवना तू नको साथ देऊ
तुझे मानले मी कधीही न दावे

मला पाहिजे ती दिशा लाभली, पण
अता वाटते की दिशाहीन व्हावे

अशी रात्र आहे जिला सूर्य नाही
अता काजव्यांनी निखारेच व्हावे


Yuvrajshekhar
Tuesday, January 16, 2007 - 8:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी खरा आहे, असे मी म्हणत नाही
पण कधी माझे कुणाशी पटत नाही

खूप वेळा चूक नसते आपली, पण
ऐनवेळेला खुलासा सुचत नाही

फटकळांचे मौनही समजून येते
साळसूदांचीच भाषा कळत नाही

आपला संबंध म्हणजे एक पत्ता
जो तुला आणि मलाही मिळत नाही

चेहरे असले जरी गर्दीत लाखो
चेहरा गर्दीस केव्हा असत नाही

तू फसव आता मला सावधपणाने
मी अता पहिल्याप्रमाणे फसत नाही

सोसण्याने घडत जाते जिंदगी, पण
सोसण्यासाठीच कोणी जगत नाही

दे खबर आता मला दुनिये तुझी तू
मी घराबाहेर हल्ली पडत नाही


Yuvrajshekhar
Tuesday, January 16, 2007 - 8:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

करपुन गेले स्वप्न फुलांचे संपुन गेले गीत मनाचे
हिशेब चुकते झाले सारे देणे फिटले ज्याचे त्याचे

जीवन नसते इतके साधे गाता येईल आनंदाने
वैर स्वरांशी होऊन जाते ओठी आलेल्या गाण्याचे

बांधुन भिंती ज्याने त्याने आडोसे नात्यांचे केले
तेव्हापासुन वणवण फिरती बेघर होऊन पाय घराचे

वसंत होता ज्याकाळी, तो किंचीतही सळसळला नाही
अखेर गुलमोहर झाला पण झाले जेव्हा रान जिवाचे

कातरवेळी अशी जिवाला टोचू लागे घोर निराशा
भरदिवसाही जळणाय्राला भय वाटावे अंधाराचे

वाय्रावरती उडताउडता जीवन झाले भटका वारा
आणि भटक्याला मग काही वाटत नाही घरदाराचे

दिशादिशांना भोवळ येई इतकी वणवण केली कोणी?
वाटेलाही ठणका लागे इतके थकले पाय कुणाचे?


Yuvrajshekhar
Tuesday, January 16, 2007 - 8:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी तुझा आकांत नाही की मुका आघात नाही
कोरडा मी थेंब आहे जो तुझ्या डोळ्यात नाही

एवढे मी चाललो की वाटती रस्तेच साथी
कोणत्याही सोबतीच्या मी अता शोधात नाही

मागता आली न आम्हां दाद प्रेषीताकडेही
एक साधा हुंदकाही आमच्या कंठात नाही

ठीक झाले, सर्व काही मी जुने विसरुन गेलो
अन तुझ्याही आज काही मागचे लक्षात नाही

एकटी असशील तेव्हा तू स्वत: ऐकव स्वत:ला
जो तुझी ऐकेल गाणी तो ऋतू शहरात नाही

जर म्हणावे एकटा तर सोबती आहेत लाखो
अन पहावे तर स्वत:चा हातही हातात नाही

जर कुणी जगले इथे तर ते जुने आश्चर्य आहे
जर कुणी मेले इथे तर तो नवा अपघात आहे


Yuvrajshekhar
Wednesday, January 17, 2007 - 8:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्पंदने या माणसांची येऊ दे शब्दात माझ्या
चांदणे संवेदनांचे राहू दे रक्तात माझ्या

मी तुझे आरोप तेव्हा मान्यही केलेच होते
भेटली तेव्हा तुलाही उत्तरे प्रश्नात माझ्या

वागलो तेव्हा तुझ्याशी मी खरे परक्याप्रमाणे
राहिली होतीस तेव्हा तू कुठे लक्षात माझ्या

घेतल्या नाही भराय्रा मी जरी तेव्हा दिशांनो
एक मी आभाळ आहे ठेविले पंखात माझ्या

व्यर्थ मी सांगू कशाला खूण तुजला ओळखीची
दे तुझा तो हात गोरा एकदा हातात माझ्या

लाभली मज वाट माझी हेच त्यांना मान्य नाही
आडवे येतात काही पांगळे रस्त्यात माझ्या

रोज हल्ली ऐकतो मी हाक एका सावलीची
कोण जाणे कोण आहे सारखे शोधात माझ्या

झेलल्या झुळका तुझ्या मी अन मला तेव्हा कळाले
धूळ होती वासनेची केवढी देहात माझ्या

सारखी करती प्रशंसा लोक माझ्या चेहय्राची
पण कुणीही देत नाही आरसा हातात माझ्या


Yuvrajshekhar
Wednesday, January 17, 2007 - 8:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओळखीचा वाटल्यावर वाट तो बदलून गेला
तो तसा घाईत नव्हता पण मला टाळून गेला

एकटा आहे मुळी मी हीच सोबत खूप आहे
अन कुणा मग दोष देऊ हात जर निसटून गेला

तो कधी झाला न माझा, जो कधी नव्हता कुणाचा
एक होता चेहरा जो आरसे चुकवून गेला

वाटले त्याला, बघावे एकटा जगतो कसा मी
एवढ्यासाठीच मजला तो घरी भेटून गेला

जो तुझा आहे दिवाणा तो तुझ्या शहरात आहे
सांग मग तो कोण होता जो शहर सोडून गेला

टाळला मी आरसा तर चेहरा विसरून गेलो
पाहिला, तर सर्व पारा आतला निखळून गेला

आजही सांगू न शकलो त्यास माझी यातना मी
आजही जखमेवरी तो आसवे बरसून गेला

शेवटी अश्रूंत माझ्या चेहरा माझाच दिसला
जो दिलासा भेटला तो आरसा देऊन गेला

तो तुझा नव्हता कुणी तर का तुला मंजूर होता?
तो तुझा होता कुणी तर का तुला जाळून गेला?

प्रश्न मी साधेच केले टाळले ज्यांना असे तू
की खुलाशांचाच साय्रा अर्थ मग बदलून गेला


Swaatee_ambole
Friday, February 02, 2007 - 9:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा.. बरंच काम केलंस की युवराज. छान आहेत या गज़ल.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators