Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
प्रणव प्रियांका प्रकाश ...

Hitguj » Language and Literature » पद्य » प्रणव प्रियांका प्रकाश « Previous Next »

Yuvrajshekhar
Wednesday, December 27, 2006 - 10:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चित्रात तुझेच रंग
तुझेच अभंग
माझिया ओठी;
नात्यांस मारुनी टाका
मारतो हाका
बांधूनी गाठी.

ही मनास झाली जखम
लाव ना मलम
तुझ्या ओठांचे;
वसू दे ना सुक्या पात्रांत
पुन्हा गात्रांत
गाव लाटांचे.

तव अंग जणू मोगरा
तुटो पिंजरा
उडू दे पक्षी;
ओठांनी सुक्या मातीत
पुन्हा अंगणात
उमटू दे नक्षी.

व्याकूळ तुझ्या प्रेमात
तुझ्या मेघात
चांदणे माझे;
तू रुसली आहे जरी
तुझ्या अंतरी
नांदणे माझे.Yuvrajshekhar
Wednesday, December 27, 2006 - 10:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इतका वेळ अश्रूंना दाखवलेला लाल सिग्नल हिरवा होतो, तुझी गाडी सुटताना
आणि
मनसुद्धा फरफटत जातं तुझ्या गाडीमागे
आता तू येशील तेव्हाच ते परत येईल!

तू जेव्हा पोचशील ना तुझ्या शहरात
तेव्हा उचलून घे जखमी मनाला ओंजळीत
आणि
टेकव तुझे साईचे ओठ प्रत्येक जखमेवर!
मग त्या रात्री
ते मिसळून जाईल तुझ्या श्वासात ऑक्सिजनसारखे...
मग थोड्या दिवसांनी तुला गर्भ राहील माझ्या आठवणींचा
आणि तू फॉरवर्ड करत रहाशील
माझ्या डोहाळ्यांची कॅसेट
तेव्हा माझं मन
तुझ्या पोटात फिरत असेल
लाथा मारत असेल...
मग तुझे पाय वेगाने वळतील माझ्या शहराकडे
तेव्हा गाडीत माझं मन
कळा होऊन ढुशा मारत असेल तुझ्या ओटीपोटात!

तेव्हा प्लीज
लवकर येऊन माझ्या मनाचं बाळ मला परत कर!Yuvrajshekhar
Wednesday, December 27, 2006 - 11:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

' वाळु इतकीही
धरायची नसते घट्ट
की सटकून जाईल
हातातून
तिला ठेवायचं असतं
तळहातांवर
बोटं आभाळागत मोकळी करून! '
हे कळल्यापासून
मी तुझ्यावर प्रेम करू लागलोय!'

Yuvrajshekhar
Monday, February 26, 2007 - 9:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ढग भरून येताना, मन हुंदक्यांचे झाले
तुझ्या आसवांचे थेंब जणू पावसात आले

ढग भरून येताना,काळ्या आभाळाच्या वाटा
कागदावरी नभाच्या जश्या अश्रूंच्या कविता!

ढग भरून येताना,आठवणींचा शहारा
तुझा वाळूमध्ये पाय माझा धावता किनारा!

ढग भरून येताना,वेळ घुस्मटून जाई
दोन-चार थेंबांसाठी श्वास अडकून राही

ढग भरून येताना,ढग पापण्यांच्या कडा
कसा लगाम घालावा वाहे आसवांचा घोडा

ढग भरून येताना,डोळे होतात पुराचे
तुझ्या दु:खाने गं होते रान हिरवे मनाचे!


Yuvrajshekhar
Monday, February 26, 2007 - 9:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लाटा किनारी लागता दूर निघुनिया जाती
थोडा ओलावा सोडता काय किना-याच्या हाती!

काय शोधायाच्यासाठी मासा पोचतो तळाला
एका चुकीपायी का गं गळ रुततो गळ्यात?

येते सावली पायाशी ऊन डोक्यावर येता
मागे राहिलो एकटा... पुढे पुढे गेला जथा!

पाणी शोधत फिरतो जेव्हा विझवाया जाळ
तेव्हा पाण्याच्याऐवजी तिथे निघे मृगजळ!

बैल निकामी ठरतो घाणा ओढल्यानंतर
किती आत रडे झाड कळी खुडल्यानंतर

इथे हरवली माती नको आभाळात झोके
मेणबत्तीच्या पाठीला बसे मेणाचे चटके


Yuvrajshekhar
Monday, February 26, 2007 - 9:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाय मनाचे फुटले भेगा भेगा फाटलेल्या
शहरास कशा सांगू माझ्या जखमी सावल्या?

गाठ गाठ सोडताना झाला जीवघेणा गुंता
पाय हरवून आलो रस्ता शोधता शोधता...

देह उन्हाने तापला आलो तुझ्या दारापाशी
सारा थंडावा देऊन राहे सावली उपाशी...!

ज्योती विझू विझू आल्या तुझा उजेडाचा हेका
उंच आभाळात जाता मध्ये तुटला गं झोका...


Yuvrajshekhar
Monday, February 26, 2007 - 9:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१.
संध्याकाळी थकलेला उजेड
घरभर पसरतो
आणि अंधार
तोंड धुऊन फ्रेश झालेला...
पक्षांच्या आकृत्या आभाळात
मनावर उमटलेल्या
जुन्या ओरखड्यांसारख्या

मी थकलेला उजेडाचे पाय चेपताना
अंधार हट्ट करतो खेळण्याचा
एखाद्या लहान मुलासारखा...

तू कुठे आहेस
तू ये
आणि लख्ख कर
काळवंडलेला उदास दिवस
तुझ्या उजेडाने...

२.
सकाळी उठल्या उठल्या
हातात टूथब्रश घ्यावा
इतकी तुझी आठवण
सहज येते आणि
जगण्याच्या फटींमध्ये
अडकलेले निराशेचे सगळे कण
घासून पुसून लख्ख करते!


Yuvrajshekhar
Monday, February 26, 2007 - 9:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सांज उतरल्यावर
खूप थकून गेलेला असतो कवी
हातात काहीच नसतं
रिकामेपणाशिवाय
तो धडाधड वाचून दाखवतो कविता
तोंडावर पचकन थुंकाव्या तश्या...

शब्दांचा उबग आल्यावर
त्याला कळतं-
आपल्याला जोराची मुतायला लागलीय
तो घुसतो मुतारीत
त्याला वाटतं,
आपण कविताच मुततोय...
थेंबाथेंबातून पडताहेत शब्द...
आपण कितीही मुतलो तरी,
संपणारच नाहीये
आपलं तुंबलेपण...

तो धावत पकडतो ट्रेन
रिकामी असूनही
लटकत नाही दरवाज्यावर
एकदम आत्महत्या कराविशी वाटली तर...
तो बसतो
आजूबाजूची माणसं,
त्याला वाटतात फसलेल्या कवितांसारखी

तो लाईट करतो सिग्रेट
हलके हलके सोडतो रिंग
आकाशाकडे तोंड करत
तर त्याला वाटतं,
प्रत्येक रिंगेत आपली एकेक कविता अडकलीय

झुरक्या झुरक्याच्या निकोटीनमधून
रक्तात भिनत चालले आहेत आपले शब्द-
जे उद्या आपल्या
गुवातूनही बाहेर पडणार नाहीत-
आपटत राहतील रक्तवाहिन्यांत
बॉल-बेअरिंग सारखे

रोज तेच तेच डेली सोप पाहून
कंटाळा यावा
तसा त्याला कवितांचा कंटाळा येतो
डोक्यात क्लिक होतो
'तिचा' आयकॉन
तो व्याकूळ होऊन
पाकिटात चाचपडू लागतो पैसे
तिला फोन करण्यासाठी

पाकिट रिकामंच असतं
त्याच्या हातांसारखं
आणि
कवितांचे कागद
अस्ताव्यस्त पडलेले...


Yuvrajshekhar
Monday, February 26, 2007 - 9:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आई
तू चालून चालून
रिक्षाचे पैसे वाचवून
जेव्हा मला आईसक्रीम आणायचीस
तेव्हा मला कळलं-
'इकोनॉमिक्स' म्हणजे काय?

आई
तू फाटक्या
चपलेचा अंगठा शिवून
मला स्पोर्टस शूज घ्यायचीस
तेव्हा मला कळलं-
'मॅनेजमेंट' म्हणजे काय?

आई
भांडी घासून घासून
राठ झालेल्या, फाटलेल्या
तुझ्या हातांवरून जेव्हा
मी हात फिरवला
तेव्हा मला कळला-
आयुष्याचा खरा अर्थ
कुठल्याही पुस्तकात न सापडणारा!


Yuvrajshekhar
Monday, February 26, 2007 - 9:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तू ज्या रानाला जाशी नको सांगू त्याचा पत्ता
आई असल्याचा मग मी बसीन गिरवत कित्ता

शब्दाच्या पेनामध्ये दु:खाची भरली शाई
ती ज्या वाटेने गेली ती नव्हती माझी आई

या कानामध्ये घुमती माझेच श्वास अश्रूंचे
ती निघता निघता लावे दारास कुलूप भितीचे

पाऊल घरी येताना मग मनास बसतो धक्का
गर्भास स्वत:च्या आई नाळेने मारे विळखा

हा रक्त रंग साकळे क्षितीजाच्या छातीमध्ये
ती आईपणास पुरते बाईच्या मातीमध्ये


Yuvrajshekhar
Monday, February 26, 2007 - 9:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुली-
तुला खरंच कळत नाहीये का-
तुझ्या तळव्यांवरच्या मेंदीची किंमत
एक लाख रुपये आहे
आणि
ही मेंदी
तुझ्या बापाच्या रक्ताने
अधिकच लालबुंद झाली आहे ते!

तुझ्या साखरपुड्याच्या अंगठीत
आयुष्यभर घेतेलेले शिक्षण
आणि संस्कारांना चिणून,
त्यांचा गळा दाबून
त्याचे थडगे बांधले आहे!

लग्नासाठी घेतलेल्या साड्यांमधून
तू तुझ्या आईच्याच
लक्तरांचा वारसा
यापुढे चालवणार आहेस
आणि
साडीच्या काठावर आपल्या स्वप्नांचे मोर
जेरबंद करून,
पिंज-यात बांधून ठेवणार आहेस!

पहिल्या रात्रीपासूनच तुला
गोंदवून घ्याव्या लागतील
ओरबाडल्या नंतरच्या खुणा!
तो तुझ्या जमिनीतून काढेल
वंशावळीचं भरघोस पीक-
तू पूर्णत: नापीक होईपर्यंत!

मुली-
तुला कळते आहे का-
तुझ्या नव्या आयुष्याचे पहिलेच बी
ओसाडलेपणाचे आहे...!


Yuvrajshekhar
Monday, February 26, 2007 - 9:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ्रस्ट्रेशनची तेज लोकल
धडधडत जातेय माझ्या आतून
कुठल्याच स्टेशनवर न थांबता!
स्टेशनवर माझीच गर्दी, माझेच चेहरे
हताशपणे पाहत-
धावत जाणा-या ट्रेनकडे!
काय करावं? रेलरोको?
ट्रॅकवर झोपावं?
पण
कसलीच तमा न बाळगता
ट्रेन धडधडत गेली अंगावरून तर?
आपले तुकडे उचलायला कोण येणार?
पोलीस पंचनामाही करणार नाहीत
म्हणतील-
'अशी झुरळं रोज मरतात!'

'फ्रस्ट्रेशनची जलद लोकल
अस्तित्वाच्या प्लॅटफॉर्मवरून जाणार आहे
कृपया कोणीही रेल्वेलाईन ओलांडू नये...!'


Yuvrajshekhar
Tuesday, February 27, 2007 - 8:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उन्हांच्या इमारती
वाढत चालल्या आहेत
सावल्या मरत चालल्यात
शहरात!
मनावर कितीही घाव झाले
तरी पॉश दुकानातल्या
फ्लोअरसारखं
गुळगुळीत रहायचं
मी आता शिकलोय!
'फ्लॅट' नावाच्या घरात
मी असतो
एखाद्या दुर्गम भागातील बसस्टॉप-
जेथून एकही बस जात-येत नाही!
मी असतो-
एक रुपयाच कॉईन
पी.सी.ओ. च्या डब्यात अडकलेला!
माणसांच्या मनाला कॉल लावला
तर ऐकू येतो एंगेज टोन
भणभणत राहतो
मेंदूच्या बंदिस्त खोलीत!

कानात हेडफोन घालून
फिरताहेत प्रेतं शहरभर
त्यांना ऐकूच येत नाहीये
एकमेकांचे आवाज!
या गर्दीचा झालाय एक्सप्रेस हायवे-
जिला कुणासाठी,कुठेच थांबायचं नाहीये!
मित्रांनो,
माणूसकीचे स्पीड-ब्रेकर बांधायला हवेत.
Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators