Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
मालवणी कथा

Hitguj » Language and Literature » इतर साहित्य » मालवणी कथा « Previous Next »

Neelu_n
Friday, June 02, 2006 - 10:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केला ता... आंगट ईला
लेखक - प्रभाकर भोगले

उन सोसेनासं झालं तसं भिक्या घरी परतला. त्याची बायको ऒट्यावर तांदूळ आसडीत बसली होती. तो आत यायला आणि तिने सूप मारायला एकच गाठ पड्ली.. त्याच्या नाकातोंडात कोंडा गेला.
" गो काय ह्या मी येवच्या येळाक?"
"काय म्हंजे? गिळाक नुको तुमका?"
"गो पन वायच आदी आसडूचा होतस." भिक्या करवाद्त म्हणाला.
"माका काय ठावक तुम्ही लवकर येतालास ते, ठावक असता तर मी आसडूचा पाठी ठेवून पायघड्ये घालून तळी ऒवाळूक पुढे ईले आसतंय."
तिचं हे खवचट बोलणं ऎकून त्याने रागानेच बायकोकडे पाहिले, पण काही न बोलता तो पंचा घेऊन विहिरीवर आंघोळीला गेला. त्याचे लक्ष समोर गेले.
हाकेच्या अंतरावर आंब्याखाली सुरग्या, बबन्या, पांडू आणि रघल्या एकत्र जमून काहीतरी बोलत होते.
"काय करतहंत गो ते थय जमान?" सारा राग विसरुन त्याने बायकोला विचारले.
" तुमका दिल्यान ह्त तसेच डोळे माका पन दिल्यान हत देवान. पेसल देवक नाय ह्त ते थय काय करतहत ता माका इतक्या लांबसून दिसाक."
तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि वाढलेल्या दाढीवरुन हात फिरवत स्वत:शीच म्हणाला."काय झाला असात? माका कसो कोन काय बोल्लो नाय?"
तिने ते ऎकले आणि सुपातले तांदूळ घोळवत ती म्हणाली," तुमका कोन सांगताहा कधी? तुमी नेभळट, तुमक कित्या सांगतित? काय झाला तरी त्या चौघांकाच सांगतत."
बायकोने आपल्याला नेभळट म्हणावे हे त्याला आवडले नाही.
"कोनाक नेभळट म्हणतसं गो तू?"
"तुमक आनि कोनाक?" तिने न घाबरता उत्तर दिले.
"तु समाजतस तितको मी नेभळट नाय आसयं, समाजला मा?"
"तर किती आसास?"
बायकोने असो विचारताच त्याला आपल्याला बोल्ण्यातील चूक कळली.
"अजिबात नाय" शब्दांवर जोर देत त्याने सांगितले.
"मी जर मनार घितलय ना तर काय करीन बघ. सगळे वाडकारी अगोदर माकाच साद घालतीत. माझ्या विचाराशिवाय पान पन हलवूचे नायत. मगे कळात तुका माझी हुशारी."
" अगे बाय ! इतके शाने होतालास तुमी?"
"मगे?" ताठ उभा रहात तो बोलला,"वाटला काय तुका?"
"होवा होवा !, कदीपासून होतालास?"
"होतालास म्हणजे?" त्यानो चमकून विचारले," आधीचोच आसय, पन आता चारचौघांका दाखवून देतलय."
"ताच ईचारतय? कदी पासून?"
"आताच जातय, ते थय रवान कसलो ईचार करत हत ता बघतय. येका मिनिटात त्यांचो प्रस्न सोडवून येतय." असं सांगून तो जायला निघाला.
"आता दोपार झाली. न्हावा, जेवा नि मगे जावा. प्वाट भरलला असला मगे परस्न सोड्वुक जोर येता." ती ह्सू दाबत म्हणाली.
"नुको, तवसर तेंचो परस्न तेच सोडवतीत. मगे मी काय सोड्वु?"
"बरा बरा, जावा पन आदी आशीर्वाद तरी घेवा."
"बायकोचो आशीर्वाद घेवक मिया काय खुळो आसय? भगल करतस माझी?" त्याने रागाने विचारले.
"माझो न्हय वो, तुमच्या बापाशीचो, आजपासून शानपन दाखवूक सुरुवात करताहास ना? पूर्वजांचो आशीर्वाद असलेलो बरो."
देवाच्या ऒवरीत जाऊन त्याने हात जोड्ले. 'यास दी ' म्हणून तो ताठ मानेने बाहेर पड्ला.
त्याला तस चालताना पाहून तिला गालातल्या गालात ह्सू फुटले.

क्रमश्:



Rupali_rahul
Friday, June 02, 2006 - 11:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नीलुताई अगदी तसाच उतरवला काय गो.... प्रसंग अगदी जितो केलस गो..

Mrdmahesh
Friday, June 02, 2006 - 11:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चलांदेत निलू... प्रसांग दोल्यांसमोर उभा रवला.. :-)
मस्तच..


Neelu_n
Friday, June 02, 2006 - 7:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते चौघेही अजून तिथेच उभे होते
" कसलो रे इचार करता हास मघासपासून? " त्यांच्याजवळ जाऊन भिक्याने रुबाबात विचारले.
"मसुरकरांच्या सुलग्याचो रे" पांडूने सांगितले.
"मेल्यानू तुमका काय लाज सरम आसा की नाय? आता लगीन ठरला हा त्याचा. आता तरी नाद सोडा तेचो." भिक्या म्हणाला.
" आमी त्याच्या नादाक लागलव?" रघलो चिडलो.
"ता माका ठावक नाय. पन बघतास की नाय ता वाटेने जावक लागल्यार?"
"आनि तू काय डोळे ढापून घेतस काय?'
"मिया डोळे ढापून नाय घेतयल तरी माझ्या नजरेत पाप नाय."
"आनि आमच्या नजरेत पाप आसा? काय मेल्या सांगतस."
"बरा ता जावं देत.. सुलग्याचो कसलो ईचार करी हुतास?" भिक्याने विचारले.
"अरे सुलग्या नंदूबरोबर पळान गेला.' बबलो म्हणालो.
"मेल्यानू सांगतास काय!" भिक्याने आ वासला.
"खोटा सांगतव की काय? ही तार ईली आसा बघ." पांडूने तार पुढे केली.
"ईतक्याच लिवला हा तारेत?" तार हातात न घेता भिक्याने विचारले.
"तर मग? तार म्हंजे तुका काय आंतर्देशीय पत्र वाटला की काय टोपलीभर लिवाक. तारेत शब्दाक पैशे पडतत." बबन्याने समजावले.
"आणि तार वाचली कॊणी?" २६.मग पांडू त्याला घडलेली हकीकत सांगू लागला.

ते चौघे पिंपळावरच्या पारावर गजाली करत होते. तेव्हा पोस्टमनने त्यांना विचारले,"मसुरकर आसत काय घरात? की भायर गावी गेले आसत?"
"आसत, आसत. कित्या?"
"तेंची तार ईली हा."
"कोनी पाठवल्यान हा?"
"कोनाक ठावक?"
तारेचे नाव ऎकताच चौघे गंभीर झाले. पुढच्याच महिन्यात त्यांच्या सुलग्याचे लगीन ठरले होते. लग्न मुंबईत ठरल्याने तिला न्यायला तिचा मामा मुंबईवरुन लवकरच येणार होता. मसुरकर बायकोला घेऊन लग्ना आधी आठ दिवस जाणार होते. आणि अचानक तार.. त्यांना काही सुचेना.
"पांडू आसा करुया. तार आपुणच घेवया. तसाच काय आसात तर वेळ काळ सांगून सांगाक गावात." बबन्या म्हणाला. सर्वांनी एकमताने तार आपल्याकडे घेतली.
"अवो पोस्टमन तुमीच वाचून दाखवा भूतूर काय लिवला हा ता?"
पोस्टमन हसत म्हणाला,"नागड्याकडे ऊघडा गेला आअणि कुड्कूडून मेला तश्यातली गत हा. माका ईंग्लीस खय येता॔?"
"ईंग्लीस येना ना? मगे पत्रावैले पत्ते कसे वाचतास?"पांडूने विचारले.
"ईंग्लीस पत्ते आसतत ते पोस्ट्मास्तर मराठीत लिवान देतत."
"तर मगे तार कोण वाचतलो?" रघलो काळजीत पडलो.
"ईश्वासाक सांगूया, तो मुंबईवालो आसा" बबन म्हणाला.
"मुंबईवालो झाला म्हणजे काय झाला ईंग्लीस वाचूक येता काय? शाळा आमच्याबरोबर सोड्ल्यान त्याने" सुरगो म्हणालो.
"येता म्हंजे? परवा एस्टी स्टॆंड्वरचो ईंग्लीस बोर्ड एका फटक्यात वाचल्यान त्याने.. तुका मराठी वाचूचा असला तरी आदी तासभर अक्षर लावूचा लागता."
आपल्या अब्रूचे केलेले खोबरे पाहून तो रागाने म्हणाला,"बरा बरा बघूया ईश्वास किती ईंग्लीसचो पापड आसा तो."
चौघे तार घेवून ईश्वासकडे गेले.
"अरे तार ईली हा मसुरकरांची, तूया ईंग्लीस वाचनारो म्हणान ईलव आमी" पांडू त्याच्या शेजारी बसत म्हणाला.
"ईंग्लीस?" आवंढा गिळत ईश्वास्ने विचारले. त्याने तार हातात घेतली. उल्टीसुटी करुन पाहिली आअणि बघतच राहिला.
"काय रे? अक्षर लागना नाय?"
"अक्षर लागते ते पण अस कस झाल रे?"
चौघे घाबरले. " काय झाला ता तरी सांग?"
"तारेत लिहलय, सुलोचना नंदूबरोबर पळून गेली."
चौघे आश्चर्याने बघत राहिले २६
"तरीच म्हटलय ह्यो नंदू मधीच कसो ईलो? मी ईचारलय तर सांगितल्यान कंपनीच्या कामासाठी ईलय" बबन्याने गुप्त माहिती पुरवली.
"आता सगळा माझ्या ध्यानात ईला" पांडू रहस्य उलगडल्याप्रमाणे सांगू लागला,"परवा नंदू सकाळ्च्या एस्टीने मालवणाक जावसाठी कणकवलेक गेलो. आनि तेच दिवशी सुलग्या दोपारच्या एस्टीने मामाथय गोव्याक जाण्यासाठी गेला, दोघाव खोटी कारणा सांगान कणकवलेत भेटली आणि पळान गेली."
"तार खयसून ईली हा?" त्याने विचारले.
"मुंबईसून"
"बरोब्बर" तो आनंदाने ओरडला,"ती दोघा पळान गेली आनि आदी मुंबईच्या मामाक तार केल्यानी. त्यानेच लगीन ठरवला होता. त्याका तार मिळाल्याबरोबर त्याने मसुरकरांक डे तार केली, झाला सुटला गणित"
"आता दुसरा गणित कोण सोडवतलो? मसुरकरांकडे सांगतलो कोण?"

क्रमश्:


Lopamudraa
Friday, June 02, 2006 - 8:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नीलु, मस्त ग...!!!.. .. .. .. .. .. ..

Shivam
Saturday, June 03, 2006 - 5:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नीलू, :-) कथा मस्तच!! पण थोडक्यात संपवलीस.

Chinnu
Saturday, June 03, 2006 - 10:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नीलु, बोलीभाषेत लिहील्यामुळे मजा येतेय. येवु द्या फ़ुडचं! :-)

Zakki
Sunday, June 04, 2006 - 8:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिवाय ज्यांना मालवणि कळत नाही त्यांना काही समजत नाही. त्यामुळे त्यांना काही पण शिव्या दिल्या तरी कळणार नाही हा आणखी एक फायदा.


Neelu_n
Monday, June 05, 2006 - 12:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

‘असा हा’ सगळी हकीकत ऎकून घेतल्यावर भिक्या त्यांना म्हणाला, ‘ आबा पन नाय घरात म्हणजे पंचायतच आसा.’
‘तेचोच आमी ईचार करतोव.मसुरकराक सांगतला कोन आनि कसा? आपनाक बाबा नाय जमाचा!’ पांडूने माघार घेतली. या जोखमीच्या कामाला कोणीच तयार नव्हते.
कुणीच तयार नाही हे पाहिल्यावर भिक्याला सुरसुरी आली. जे चौघांना जमत नाही ते आपण केल्याने आपली हुशारी सिद्ध होईल असे त्याला वाटू लागले. त्याने हे आव्हान स्वीकारायचे ठरवले.
‘अरे, काळ्जी कित्या करतास? मी सांगान मसुरकराक.’
चौघे आश्चर्याने त्याच्याकडे बघू लागले. त्यांना हसूदेखील आले.
‘हसतास कित्या? मसुरकराचा चेडू पळाला ही काय हसन्यासारकी गोष्ट आसा?’
‘ता झालाच? पन तुया सांगत्लस?’ पांडूने विचारले.
‘ मी सांगतलय म्हंजे? मिया वयान मोठो आसय तुमच्यापेक्षा.’
‘ नाय कोन म्हनताहा? पन हयसर वयाचा काय काम नाय हा? अकलेचा आणि विचाराचा हा.’
आपली अक्कल त्यांनी काढावी हे भिक्याला चांगलेच झोंबले.
‘ ता काय नाय. आबा पन घरात नाय तेव्हा ता काम तुम्ही माझ्यावरच सोपवा.’ त्याने फर्मानच काढले.
चौघेही चकित होऊन त्याकडे पाहू लागले. ईतक्या आत्मविश्वासाने तो कधीच बोलला नव्हता.
सुरग्या रघूच्या कानात काहीतरी कुजबुजला.
रघू भिक्याला म्हणाला,’ भिक्या वायच त्वांड हयसर कर’
‘कित्या?’ तो तोंडात मारतो की काय अशी भिती त्याला वाटली.
‘कर म्हणतय ना मगे कर.’ रघूने त्याला दटावले.
सावध राहून त्यानो त्यांच्या जवळ आला.
‘नाय रे, ह्येने दारुबिरु काय खावक नाय.’ रघू बोलला.
‘मेल्यांनू मिया दारु पिलय असा तुमका वाटला. जलामल्यापासून मिया कधी दारुक आपडलय?’
‘ता आमका ठावक हा रे. पण आज तू वेगळोच दिसतस. रोजच्यासारखो नाय दिसनस.’
‘रोज कसो दिसतस मी?’
‘रोज ना? कालच बापूस मेल्यासारखो चेरो दिसता तुझो.’
‘आनि आज?’ भिक्याने स्वत:वरच खुष होत विचारले.
‘आज? मेलेलो बापुस भरपूर डबुला पाठी ठेवून गेल्यासारखो.’ भिक्या मनापासून हसला.
‘ ता रवांदेत. मिया जातय मसुरकरांकडे’ त्याचा चेहरा तेजस्वी दिसू लागला.
‘भिक्या, जा पन सहज ईल्यासारख्या दाखव. ती सगळी जेवली काय हेची आदी चौकशी कर आनि जेवली असतलीच तर त्यांका सांग.’ पांडूने सूचना केली.
‘हे भिक्याच्या ध्यानातच आल नव्हत. पण तसे न दाखवता तो म्हणाला,’ ह्या काय सांगाक व्ह्यया. माका काय कळ्ना नाय?’
‘तसा न्हय रे, तुझी पयलीच वेळ आसा ना?’
‘ व्हय व्हय. तार खय आसा.’
‘तार कित्या व्हयी? तुका वाचूक येता?’ बबन्याने आस विचारताच सगळे हसू लागले.
‘मेल्यानू, लिवाक वाचूक येना नाय म्हनान माझी भगल करतास? अगदीच कशी अक्कल नाय तुमका ? त्यांका तार दाखवूक नको? असोच हात हलईत जाव?’ भिक्याने आपली अक्कल काढताच ते गोंधळले.
‘बरोच हुशार आसस रे भिक्या’ बबन्याने सर्टिफिकेट दिले.
‘आजून तुमका खय कळ्ला हा, मी किती हुशार आसय तो.’
‘ बरा बरा हुशारी मगे दाखव. आदी ही तार घी.’ भिक्याने सुरग्याकडून तारेचा कागद घेतला.
’जातय तर.’
भिक्याने ही जबाबदारी अंगावर घेतली खरी पण जसजस मसुरकरांच घर जवळ येऊ लागल तस त्याच काळीज धडधडू लागले. काळ्या खडकाजवळ आल्यावर त्याने तिथेच उभ राहून रंगीत तालीम केली. मग निश्चयाने पाऊल पुढे टाकले. भिक्या मसुरकरांच्या परड्यात शिरला.
मसुरकर अंबाडीची दोरी वळत ऒट्यावर बसले होते. आणि मसुरकरीण जवळ्च बसून तांदूळ निवडत होती.
‘काय गे, मसुरकारनी जेवलास?’ माच्यावर बसत त्याने विचारले.
‘ही दोरी थोडी रवली हा. ती वळून झाली की मगे जेवतलो. जेवान खय पळताहा.’ मसुरकर बोलले.
‘अवो दोरी कसली वळताहा. जावा जेवून घेवा. तुमची तार ईली हा.’
‘तार?’ दोघेही घाबरले.
‘कसली तार? कोनाचा काय झाला?’ मसुरकरीण रडायलाही लागली.
‘गे रडतस कित्या? झाला ता येका द्रिष्टीन बरा झाला. आयत्या येळाक कळला आसता तर काय केला असता तुमी?’ भिक्या म्हणाला.
‘रे पन कसली तार? काय झाला भिक्या?’ मसुरकरांनी गोंधळून विचारले.
‘अवो तुमचा चेडू नंदूबरोबर पळान गेला..’
‘काय? काय सांगतस भिक्या? सुद्दीत आसस मा तू?’ मसुरकरांनी रागाने थरथरत विचा्रले.
‘’माझ्यावर कित्या चिडतास? तारेत लिवला हा ता मी तुमका सांगलय.’
‘खय आसा तार?’
भिक्याने तार मसुरकरांकडे दिली. त्यांनी ती न कळणार्या इंग्लीश मधली तार पाहिली आनि मटकन खालीच बसले. मसुरकरीण डोक्यावर हात मारुन नव्याने रडू लागली. आपल्या मुलीच्या आणि नंदूच्या नावाने बोटे मोडू लागली.
तिची ऒरड ऎकून वाडीतली मंडळी जमली. मसुरकरांच घर भरुन गेल. मसुरकर वाचा गेल्यागत बसले होते. आणि मसुरकरीण झालेली हकीकत सांगून रडत होती. सगळेच ही बातमी ऎकून हबकले होते.
तोवर पांडू, सुरग्या, बबन्या आणि रघु पन तिथे आले. त्यांच्याबरोबर भिक्याची बायको पण आली. त्यांना पाहताच भिक्या ऊठून त्यांच्याकडे आला.
त्यांनी त्याची पाठ थोपटली, ‘ भिक्या मानलव हा तुका. आबांचे पाठी चालवशील तू.’
भिक्याच्या बायकोलाही नवर्याच्या कर्तबगारीचा अभिमान वाटला.
भिक्याच्या अंगावरही मूठभर मांस चढले. मान आणखी ताठ झाली.
ईतक्यात आपल्या गावी जायला निघालेले शाळेचे मास्तर सायकल थांबून मसुरकरंच्या घराकडे पाहू लागले. मसुरकरंच्या घरी काहीतरी झाले आहे त्यांनी ऒळखले. आणि चौकशी करण्यासाठी ते पुढे आले. जमलेल्या मंडळींनी झालेली हकीकत सांगितली.
ते मसुरकरांकडे गेले. त्यांना पाहून मसुरकरांची मान खाली गेली. मास्तरांनी त्यांच्या खांद्यावर थोपटले. ‘धीर धरा मसुरकर, बदलत्या जमान्याचे भोग आहेत हे. हल्ली सगळीकडे हेच चालत.’
बोलता बोलता त्यांच लक्ष मसुरकरांच्या हातातल्या तारेकडे गेले. त्यांनी सहज तो कागद हाती घेतला वाचू लागले. आणि वाचून चकित झाले. ‘अहो मसुरकर रडताय कशाला?
‘वाचलास ना तुमी तार?’ मसुरकर क्षीण आवाजात बोलले.
‘हो, वाचली. म्हणूनच विचारतोय! यात रडण्यासारखे काय आहे?’
‘म्हणजे?’ मसुरकर गोंधळून पाहू लागले.
‘हे राजा काणेकर कोण?’
‘माझो मिवणो, हिचो भाव, मुंबईचो.’
‘ते गावाला येणार होते?’
‘होय होय, सुलग्याक मुंबईक नेवक येणार हुतो.’
‘हो ना मग त्यांनी तारेत लिहलय. No leave. Send Sulochanaa with Nandu.
म्हणजे मला रजा मिळत नाही तेव्हा सुलोचनाला नंदूबरोबर पाठवा.’
हे ऎकताच भिक्या चाट पडला. त्याने मागे वळून चौघांकडे पाहिले. त्यांनी तर केव्हाचाच पोबारा केला होता. भिक्याचे पाय लटलटू लागले. तोच मसुरकर ऊठले,’ मायझया भिकल्या, हकडे ये, तुझा मुस्काट फोडतय.’
हे ऎकताच पाय लावून भिक्या घराच्या दिशेने पळाला.
आपला बाप धावतोय हे पाहून त्याची जाणती पोरं खेळ सोडून पुढे आली. ‘ बाबा काय झाला? धावतास कित्या?’ थोरल्याने विचारले.
भिक्या काही न बोलता ऒट्यावर बसला. आणि धापा टाकु लागला.
पोर समोर उभी राहून बापाला पाहू लागली. त्यांच्या तश्या बघण्याचा त्याला राग आला.
‘जा हैसून. बघतास काय? बापाशीक बगलास नाय कधी?’
‘बगल्यानी’ तरातरा येत त्याची बायको म्हणाली,’ त्यांचो बापूस आज अतिशानो होवान ईलो हा म्हणान पुन्हा बगतत.’
भिक्या तोंडात मारल्यासारखा गप्प बसला.
‘ह्यो शानपना तुमचा ? शिरा पडली करनेवर तुमच्या ती. वायच गावात जावन बघा. लोका कशी हसतत ती. तुमका लाज सरम नाय. आता माकाव गावात तोंड दाखवूक नुको.’
‘अगो त्यांनी माका फसवल्यानी’
‘त्येनी फसवल्यानी? साने न्हय तुमी? तुमी कशे फसलास? सोताची अक्कल नसतत तेच फसतत.’
‘तु पुना पुना माझी अक्कल काढू नुकोस हा. सांगान ठेवतय’
‘आक्काल आसा खय ती काढतलय?’
दातऒठ चावत तो बायकोकडे पाहू लागला.
आसडून ठेवलेल तांदूळ उचलून आत जाता जात ती म्हणाली,’ न्हान थोर सगळ्यांनी तुमची अक्कल काढ्ल्यानी. माझ्यासारक्या आस्ता तर घरात येन्या परास त्वांड घेवन गेला असता.’
‘मी ताच करुचा आसा तुका वाटताहा ना? जातय, उपाशी पोटी जातय.’
‘जावा, कोन नाय अडायना’
‘जातय, सकाळपासून पेजेचा पानी खावक नाय हय. तसल्यानीच जातय.. होवंदे माझा काय होवचा ता. पोस मगे पोरांका.’ यावर ती काही बोललीच नाही.
पोरांना पोसाव लागेल या भीतीने तरी आपला शब्द मागे घेईल. म्हणून तो पुन्हा म्हणाला,’ मी जातय त्वांड घेवन.. मगे पोस मगे पोरांका येकटा’
‘आयकलय, आयकलय,’ ती आतून म्हणाली,’ जावा खय जातास ते’ काय चार पावला पोचून येव्काय?’
हे ऎकल्याव्र त्याने बायकोच्या सात पिढ्याचा उद्धार केला आणि रागाने बाहेर पडला.
तो पाणंदीत दिसेनासा झाल्यावर त्याचा थोरला खेळ सोडून आईकडे आला,’ आये, बाबा खरोखरच गेले.’
‘जावंदे, आशे किती पावटी गेले आनि किती पावटी ईले. पोटात आग पडल्यार येतले घराक.
घर सोडून जावक पन हिंमत लागता. ती आसा तुमच्या बापाशीजवळ.’
‘कोनाक ठावक’ थोरला म्हणाला.
‘माका ठावाक आसा. जा आता. गिळाचा आसा तर भावंडाक बोलव.’

क्रमश्:

Mrdmahesh
Monday, June 05, 2006 - 12:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निलुगे चलांदेत... मजा येत असा... :-)

Vinaydesai
Monday, June 05, 2006 - 2:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे व्वा.. निलू चालू ठेव... मजा वाटता वाचूक..

भोगल्यांची एक दोन पुस्तका मी पण वाचलंय..


Chinnu
Monday, June 05, 2006 - 8:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भिक्याच्या बायकोचे dialogue एकदम ठसक्यात असा बर नीलु. खरच मजा येतय वाचताना! :-)

Bhagya
Tuesday, June 06, 2006 - 1:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निलग्या.... निलग्या माका हसवलस गो!!

Neelu_n
Tuesday, June 06, 2006 - 7:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दोन दिवस आणि दोन रात्री भिक्याने मडवाच्या मांगरात काढल्या. भुकेला रानातले आंबे, फणस खाल्ले. त्याने पोट भरत होते पण जेवल्याचे समाधान नव्हते. घरी जावे आणि ढीगभर पिठी भात ऒरपावा असं वाटतं होतं. मान अपमान बाजूला ठेवुन आपण घरी जावं अशी तीव्र ईच्छा त्याला सकाळपासुन होत होती. सुर्य डोक्यावर आला तरी त्याचा निर्णय होत नव्हता. अजुन थोड्या वेळाने गेलो तर बायको पोरे जेवुन घेतील म्हणुन शेवटी तो घरी जायला निघाला.
भुकेने पुरता कासावीस होवुन तो घरी आला तर दाराला कुलुप. तो वैतागला.
"गेली खय ही अवदसा! आणि पाठसुन घराचे भिंती पडलेहत आणि फुडसून कुलपा कसली लावताहा ही. कुलाप बघून चोराने घर फोडल्यान तर माका दुनियेक त्वांड दाखवुक नको." असे बडबडत असताना आखंड्याची काठी काढल्याचा आवाज आला. त्याने पाहिले त्याचा मुलगा बाबु येत होता. 'येतत आमचे कुलदीपक येतत. '
"बाबानू तुम्ही ईलास."बाबूने बापाला पाहून विचारले.
"मी ईलय त्याचा तुका बरा नाय वाटलासा दिसता? "
"तसा न्हय!, तुम्ही गेलास त्याका आज तिसरो दिवस ना? "
"माझे दिवस मोजतस? म्हंजे धायेक दिवस नाय ईल आसतय तर तेराया घालून मोकळे झाला आसतास." भिक्या रागाने बोलला.
"काय तरी काय बोलतास बाबानू, माका वाईट वाट्ता. काय तरी बरा बोला. "
" बरा बरा, ह्या खय गेला? "
" ह्या म्हंजे? "
" आता तुका ह्या म्हंजे ठावक नाय? "
" सर्वनामात नुको, विशेषनामात बोला. "
" खेतूर बोला " भिक्या गोंधळला.
" तुमी शाळेत गेल्लास? "
" गेल्लय मगे? दर पाच वर्शांनी जातय मत देवक "
" तसा नाय, शिकासाठी " बाबूने विचारले.
" शिकासाठी? माका काय कामधंदे नाय हुते? मी साळेत गेल आसतय तर माझ्या बापाशीची नि तुझ्या आज्याची ढोरा कोनी राखली आस्ती. " भिक्या चिडून बोलला.
" मगे तुमका व्याकरणातला काय कळ्ता ... धोंडे? "
" नुको कळांदेत, मी ईचारलय त्याचा उत्तर दी. आदीच मिया भुकेवून ईलहय. " तो चिडीला येत म्हणाला, " तुझी आये खय गेली हा? "
" काय काम हा? '
"अरे? "भिक्या पुरता वैतागला, " तुका कित्या सांगू? "
" आयेनच सांगल्यान हा. "
" आयेनच सांगल्यान हा? म्हंजे पार्वतीन आंघोळेक जाताना गणपतीक बसवलेल्यान तसो तुका तुझ्या आवशीन बसवल्यान हा की काय? " हे ऎकून बाबूला हसू आले.
" हसतस काय दाताचे फळ्ये काढून? माका भूक लागली हा नि ही फिराक गेली हा. "
" तुमका भूक लागली हा? "
" मगे मघासपासुन मिया काय सांगतय? कोल्ह्याचा लगीन? "
" मगे असा सांगा, आयेन सांगल्यान हा .."
" काय सांगल्यान हा?" भिक्या मधेच बोलला.
" सांगल्यान हा हे म्हंजे तुम्ही .. "
" कळला, पुढे सांग "
" हे ईले आणि त्यांच्या पोटात आग पडली आसात तर चुलीवैलो भात आनि वायलावैली पिठी घेवन गिळाक सांग. "
" गिळाक? मेल्या, साळेत जातास मा? मास्तर ह्याच शिकवता? "
" ह्या मास्तरांनी नाय शिकयला. आवशीन शिकयला."
"धन्य ती जिजाबाय नि तू शिवाजी!. शिरा पडो तुझ्या तोंडार ती. आता म्हेरबानी कर नि कुलुप काढ. "
बाबूने कुलुप काढुन दिलं. भिक्याने विचारल "तू येतस? "
" खय? "
" ऎकदम गिळाया. "
बाबूने नकारार्थी मान हलवली, " आयेने सांगल्यान हा आमी सगळी येकदम जेवया. " भिक्या आत गेला.
" आजूबाजूची मडकी सोदू नका.. आयेन सांगल्यान हा. "
" आनि काय काय सांगल्यान हा तुझ्या आयेन ता येकदम सांग. म्हंजे मी गिळाक मोकळो झालय. "
" काय नाय इतक्याच. " अस म्हणून बाबू अभ्यासाला बसला.
थोड्या वेळाने भिक्या पोटावरुन हात फिरवत, ढेकरा देत ऒट्यावर आला, " तुमी मगे जेवतालास ना? "
" होय."
" जेवा जेवा, मी वायच आडवो होतय. "
माच्यावर झोपताना भिक्याच्या चेहर्यावर बायकोचा सूड घेतल्याचे समाधान होत. जास्त झालेले जेवण आणि मनाचे समाधान यामुळे त्याला लगेच झोप लागली.
भिक्याची बायको आपल्या चुलत बहीणीला घेऊन घरी आली. बाबूला अभ्यास करताना बघून ती त्याचे कौतुक करु लागली.
"आका कसलो गो आवाज येताहा मघासपासून?जवळ खय चिरकाम चलला हा की काय. "
"चिरकाम न्हय गो. हे घोरतत. हे काय माच्यावर निजलेहत., चल तू तुका भूक लागली आसात ना? माझी पोरा पन भुकेली आसतली. " धृपतीने खळ्यात खेळ्णार्या मुलांना हाक मारली.
पोरं ऒट्यावर आली आणि बापाला बघून "बाबा इले, बाबा ईले " म्हणून नाचू लागले. या गडबडीने भिक्याची झोपमोड झाली. त्याने डोळे किलकिले करुन पाहिले. मेव्हणीला बघून त्याने पुन्हा झोपेचे सोंग घेतले.
"खय गेल्ले भावोजी? " बहीणीने गोंधळून विचारले.
आपला नवरा तीन दिवस बाहेर होता हे बहीणीला कळू नये म्हणून ध्रुपती म्हणाली, "अगो माळावर गेल्ले वाशे हाडूक पाटफटी ऊठान. तु चल जेवाक. "
" पन भावोजी? " बहीणीने विचारले.
" ते जेवले आसतीत. नाय रे बाबू? '
" होय आये. गिळल्यानी. "
" काय म्हणता ह्यो? " बहिणीला काय ते नीट कळले नाही.
" काय नाय गो, तेंचो गळो फुल्लेलो. काय खावक गावायचा नाय म्हणून बोलता तो असो. आता बरो हा गळो " अस म्हणून ती बहिणीला आत घेऊन गेली. आणि.....
" बाबूSSS " ध्रुपती चवताळून बाहेर येत म्हणाली " तू हेंका खयचा जेवण घेवक सांगलस. "
"तू सांगला ताच. चुलीवैलो भात आणि पिठी "
"मेल्या, ता जेवान तसाच हा. हेनी मावशीसाठी करुन ठेवलेले घावने नि कवटाची भाजी खाल्ल्यानी. सगळीच्या सगळी. ह्यो माणूस आसा की बकासुर. " ती नवर्याकडे रागाने पाहू लागली. आणि भिक्या मनात हसत होता.
" घावने मोजल होतस मा रे बाबू? "
" होय आये. सदोतीस. "
" तेतूरलो एकपन नाय ठेवल्यानी. आणि पाच कवटाची भाजी. ...ता आपल्या नंदेकडे ईल्ला मी मोठेपनाने बोलवून घेवन ईलय. आता त्याका घालू हेंची हाडा " ध्रुपतीचा राग अनावर झाला.
तणतणत ती माच्याजवळ गेली आणि नवर्या गदागदा हलवलं. तरी तो ऊठला नाही.
" ही काय हेंची नीज ... शिरा पडली ती "
" आये, सदोतीस घावने आणि पाच कवटाची भाजी खाल्लेलो माणूस लवकर कसो ऊठात? "बाबू म्हणाला
" तू गप रव.... वायच तुझो घरात लक्ष नसता. " अस म्हणून तिने पुन्हा नवर्याकडे मोर्चा वळवला. ," आता ऊठतास की पाटो घालू कपाळावर? "
ही धमकी खरी करुन दाखवायची धमक आपल्या बायकोत आहे हे माहीत असल्याने तो जाग आल्यासारखे करुन उठला.
.. "काय गे ?"
" टोपले बुडी ढाकून ठेवलेले घावने आणि भाजी तुमी खाल्लास? "
" व्हय. "
" व्हय काय तुमच्यासाठी केल्ले ते? ".....हा गलबला एकत असलेली बहीण आतून बाहेर आली.
तिला बघून भिक्या म्हणाला , " अगो माझो गळो फुल्लो ना. रोज तू नरम नरम करुन कायतरि करुन घालतस ना. म्हणून माका वाटला हे घावने पण माझ्यासाटीच आसत. "
" जावंदे गो, भावोजीनीच खाल्ल्यानी ना. कोणी बाहेरच्य नी तर नाय मा? भावोजी गळो कसो हा तुमचो? "
भिक्याने मिश्कीलपणे बायकोकडे पाहिले. म्हणाला, " अजून शाप बरो नाय झालो हा. आनकी चार दिवस तरी घावने खावचे लागतले. "
" चार कित्या? आठ दिवस घालतय. " बायको दातॊठ खात त्याच्याकडे पाहू लागली.
" बगलस. ही तुझी भैनीची माया. "
" आसाच तशी माझी भैन. सभावच आसा तो तिचो. जीवाक जीव देयत." बहीणीने तिची बाजू घेतली.
" आणि जीव घेवक पण पाठी येवचा नाय." भिक्या पुटपुटत म्हणाला.
" काय म्हणालास? "
" काय नाय, गळो शाप केलय. "
" तुमचो गळो बरो नाय ना. आका, फनस अळंब्या आसा काय घरात? " बहीणीने विचारल.
" आसा, कित्या गो? "
" घेवन तरी ये. आनि सान आनि पानी पन आण. "
" कित्याक गे माझे बाय? " भिक्याने घाबरुन विचारले.
" फनस अळंब्या उजळून भूतूरसून लावला की गळो घटकेत बरो होता. "
" नुको नुको, बरो हा आता माझो गळो. "
" माका फसवू नका भावोजी. तुमचो चेरो बघून कळता तुमका किती त्रास जाता तो. "
" तेंचो मूळ चेरोच तसलो " सगळे सामान बहीणीकडे देत ध्रुपती बोलली.
आपली हुशारी आताही अंगलट आली पाहून करंगळी दाखवत भिक्या म्हणाला, " येतय जरा." आनि घरामागे गेला. त्याच्या मागोमाग बाबू पण गेला.
" गेSS आये धाव " बाबू ऒरडला, " बाबा पळान जातहत. "
" थांब येतय, पळान पळतले खय? " ध्रुपती ताडकन ऊठत बोलली, "सदोतीस घावने आणि पाच कवटाची भाजी खावन कसा पळाक जमता ता मिया बगतय "
ध्रुपतीने आणि बाबूने त्याला धरुन घरात आणले.
" औषदाक भियान पळतास कसले भावोजी? कडू आणि झोंबणारा आसला तरी रामबाण आसा औषद " बहीण बोलली, " आका भावोजींका आडये कर.करशीत. की मी येव. "
" नको मी करतय, हेंका आड्ये करुक माका येळ नाय लागूचो, " अस म्हणून ध्रुपतीने नवर्याचे केस पकडून त्याला आडवा केला.
"त्वांड उघडा भावोजीनू, लवकर.. नाय तर औषदाचो दळ जायत " औषधाची वाटी घेऊन मेव्हणी त्याला सांगू लागली.
" ही शानपनाच नडतहत. बघ कशी दातकडी आवळून धरल्यानी हा. बाबू जा जात्याचो खुटो घेवन ये. " ध्रुपती बोलली. बाबू खुंटा घेऊन आला.
"मी त्यांचा नाक धरतय, मगे हे त्वांड उघडतले. "
" होय आये .. शाळेत पण हीच म्हन शिकवली हा. नाक दाबले की तोंड उघडते. "
" ती साळा मरांदेत. ह्या खेपेक मी सांगतय ता कर. हेनी त्वांड उघडला की पटकन खुटो घाल. "
" मगे मी औषध घालतय तोंडात. " बहीण बोलली.
ध्रुपतीने भिक्याचे नाक दाबले. त्याने तोंड उघडल्यावर बाबूने पटकन खुंटा घातला. बाकीची पोरं पुढे आली, दोघांनी दोन पाय दोन हात वाटून घेतले ...आणि घट्ट धरुन ठेवले. भिक्याची हालचाल थांबल्यावर मेव्हणीने शांतपणे औषध भिक्याच्या तोंडात घातले.
भिक्याला मनात एकच वाटत होतं .... केला तुका नि झाला माका.

समाप्त:-)

सगळ्यांच्या प्रतिक्रियांसाठी धन्यवाद..
मालवणी कथांमधले संवादच जास्त मजेशीर असतात. वाचताना मी तर खुप हसले. ही कथा वाचली तेव्हा मला मायबोलिवरच्या गजालींची आणि गजालीकरांची खुप आठवण आली. म्हटलं ही कथा तुम्हाला सांगायालाच हवी. :-)


Moodi
Tuesday, June 06, 2006 - 8:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी आल्याशिवाय आभारप्रदर्शन करतेस काय गों नीलू? अतिशय सुरेख!! विशेषता गजालीवर आल्याने मालवणी कळली पण, यात तुमचो सगळ्यांचो हातभार लागलो. मालवणी म्हंटले की मच्छिंद्र कांबळी अन संजीवनी जाधव डोल्यासमोर येतात. माका ते नाटक खुप आवडले होते " पांडगो इलो रे बा " एकदम नैसर्गीक अभिनय.
प्रभाकर भोगलेंचे लिखाण मी लोकसत्तात जास्त वाचले होते, इथे नवीन खाण मिळाली.


Chinnu
Tuesday, June 06, 2006 - 10:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी, सही असा ते पांडगो इलो रे! मला त्याचे शिर्षक गीत भारी आवडायचे.
नीलु, तुला कितीतरी धन्यवाद!


Mrdmahesh
Wednesday, June 07, 2006 - 8:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आभार कित्याक मानतंस गो निलगे? आमकाच तुजा आभार मानूक होया.. :-) आशेच कायतरी वाचत रव.. अन् हडे लिवत रव.. माका मजा इली

Rupali_rahul
Friday, June 09, 2006 - 7:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गो नीलुताई एकदम फ़क्कड
मुडीताई, महेश तुम्ही दोघांनी पुलंचे "व्यक्ती आणि वल्ली" वाचले आहे का? त्यात "अंतु बर्वा" ह्य व्यक्तीचे व्यक्तीचित्रण होते. त्यात लिहिल्याप्रमाणे मला कोकणतील माणसे वाटतात. "बाहेरुन फ़णसासारखे काटेरी आणि आतुन गोड, रसाळ..." गावाल गेल्यावर हाच अनुभव नेहमी येतो...
गे नीलुताई असेच छान छान वाचुन हयसर लिहित रव..


Mrdmahesh
Friday, June 09, 2006 - 8:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो रुपल्या, मिया वाचलव तां पुस्तक... तु म्हणतंस तां १००% खरा हा... :-)

Moodi
Friday, June 09, 2006 - 8:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुपाली आमच्याकडे सीडी आहे त्याची, मी ऐकलय ते, फारच छान आहे.



Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators