Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
&anaoXvarI

Hitguj » Religion » साहित्य » &anaoXvarI « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through February 18, 200720 02-18-07  9:52 am

Mansmi18
Sunday, February 18, 2007 - 5:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रशान्तदादा,

शतशहा धन्यवाद,

आपल्यावर सद्गुरुन्चि पुर्ण क्रुपा आहे. अत्यन्त सुन्दर स्पश्टिकरण. अर्थ नीट कळला.

||श्री सद्गुरुनाथ महाराज कि जय्||
||परमपुज्य गुरुदेवता श्री कलावती माता कि जय्||


Prashantnk
Thursday, February 22, 2007 - 1:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मोगरा फ़ुलला-

इवलेसें रोप लाविलें द्वारीं ।
त्याचा वेलु गेला गगनावरी ॥ १ ॥
मोगरा फ़ुलला मोगरा फ़ुलला ।
फ़ुलें वेचितां अतिभारु कळियांसी आला ॥ २ ॥
मनाचिये गुंतीं गुंफ़ियेला शेला ।
बापरुखमादेविवरु विठ्ठलीं अर्पिला ॥ ३ ॥


सद्गुरु श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांच्या साहित्याचा आस्वाद घेत असता, अंत:करणाला भिडलेल्या,जिवाला भावलेल्या सुंदर, गोड , अवीट, अभंगापैकी हा एक! थोडक्या, मोजक्या शब्दांत, शब्दांच्या पलीकडले कवेत घेण्याचा आनंद म्हणजे अभंग !!

श्रीमाउली या मार्मिक अभंगाद्वारे सांगतात की,

"माझ्या चित्त-वृत्तीचे इवलेसे रोप, इंद्रिय-द्वारामध्ये लावले आणि बघता बघता त्याच्या संकल्प-विकल्परुपी शाखा आकाशाला गवसणी घालू लागल्या!

श्रीसद्गुरुंनी मला कृपावंत होऊन युक्तीसहित-शक्ती दिली, त्यामुळे, बघा कसा त्याच वेलाला सद् भावनांचा,विवेकाचा बहर आला आहे. जस-जसे त्याचे स्मरण करावे, तसतसे ते अधिकच प्रफ़ुल्लित होते आहे.

मनाच्या मूळच्या गुंत्याचाच आता सुरेख गुंफ़ून, सद् वृत्तींचा शेला झाला आहे. हे श्रीगुरुराया, आपण ज्या परमेश्वरी शक्तीच्या स्वाधीन मला केलेत, तिला शरण जाऊन, तिलाच तो शेला समर्पित करतो आहे!"


Mansmi18
Friday, February 23, 2007 - 6:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

anakhi ek
"avachita parimalu zulakala alumalu".

arth sangal ka please?

dhanyavaad.

Prashantnk
Friday, March 02, 2007 - 6:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अवचिता परिमळु झुळकला अळुमाळु-

अवचिता परिमळु झुळकला अळुमाळु | मी म्हणें गोपाळु आला गे माये |
चांचरती चांचरती बाहेरी निघालें | टकचि मी ठेलें काय करूं || १ ||
मज करा कां उपचारू अधिक तापभारु | सखिये सारंगधरू भेटवा कां || धृ. ||
तो सावळा सुंदरु कासे पीतांबरु | लावण्य मनोहरु देखियेला |
भरलिया दृष्टी जंव डोळां न्याहाळी | तंव कोठे वनमाळी गेला गे माये || २ ||
बोधुनी ठेलें मन तंव जालें आन | सोकोनी घेतले प्राण माझे गे माये |
बापरुखमादेविवरु विठ्ठल सुखाचा | तेणें कायामनेंवाचा वेधियेलें || २७५.३ ||


सद्गुरु श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज, आपल्या भगिनी श्रीसंत मुक्ताबाई महाराज यांना, आतुन ज्ञानोत्तर-प्रेमाचा अनिवार गहिवर येऊन, श्रीभगवंताचे एक अप्रतिम सुंदर, मनवेधक वर्णन करत आहेत.

श्रीमाउली म्हणतात,

मुक्ताई माये ! अचानकच,अवचितच सुंदर,मोहक,दिव्य अशा सुगंधाची झुळुक आली.ह्या नित्य परिचयाच्या चंदन,तुलसी,केशर,कस्तुरीचा भास देणार्यापरिमळामूळे मी जाणले,की ते श्रीभगवंतच कृपाळू होऊन आलेले आहेत.

अनिवार आनंदाने,अत:करणात सात्विकतेचा पूर येऊन,चाचरी मुद्रा होऊन दृष्टीशी-जाणीव तदाकार झाली आणि ही जाणीव चांचरत-चांचरत श्रीभगवंताना बघू गेली,अन काय सांगू सगळ्या जाणिवाच लोभावून त्या रुपात दृष्टीद्वारे स्थिर झाल्या.
श्रीभगवंत समोर असूनही विरहतापाने सर्वांग पोळू लागले,हृदय भेटीसाठी तडफ़डू लागले, ' कूणीतरी तो शारंगधर मला भेटवा हो ! '
हृदय असे आक्रंदत असतानच परत जाणीव त्या सावळ्या सुंदर,लावण्यमनोहर अशा, पीतांबर नेसलेल्या श्रीस बघू लागली.
सगळ्या जाणिवा एकवटून जेव्हा ते अनुपम रुप दृष्टी अनुभवत होती, तेव्हाच अचानक ते वनमाळी कोठे गेले तेच कळेना.

त्यांच्याशी मन तदाकार होऊन स्थिर झाले आहे, तोच त्या अद्वयबोधासहित ते वेगळे होऊन परत विरह अनभवू लागले.माझे सर्व प्राणच जणू त्यांनी शोषून घेतले.

माये तुला कसे सांगू ! श्रीसद्गुरुकृपेने श्री भगवती उर्ध्व होऊन, जीवासकट सुषुम्नेत प्रवेशल्यामूळेच सुखस्वरूप अशा श्रीभगवंताचा अनुभव सहज आला.आता तर त्यांनी माझे कायावाचामन संपूर्णच वेधून घेतले आहे.


Prashantnk
Friday, March 02, 2007 - 7:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



श्रीमाउलींनी सांगितलेले नामाचे महत्त्व -

श्रीसद्गुरुज्ञानेश्वर महाराजांचा एक अभंग पाहू,

पदपदार्थसंपन्नता | व्यर्थ टवाळी कां सांगतां |
हरिनामीं नित्य अनुसरतां | हें सार सर्वार्थी || १ ||
हरिनाम सर्वपंथीं | पाहावें नलगे ये अर्थी |
जे अनुसरले ते कृतार्थी | भवपंथा मुकले || २ ||
कुळ तरले तयांचें | जीहीं स्मरण केलें नामाचें |
भय नाही त्या यमाचें | सर्व ग्रंथीं बोलियले || ३ ||
नलगे धन नलगे मोल | न लगती कष्ट बहूसाल |
कीर्तन करितां काळ वेळ | नाहीं नाहीं सर्वथा || ४ ||
हरि सर्व काळ अविकळ | स्मरे तो योगिया धन्य केवळ ||
त्याचेनि दर्शनें सर्व काळ | सुफ़ळ संसार होतसे || ५ ||
ज्ञानदेवीं जप केला | मन मुरडुनी हरि ध्याईला |
तेणे सर्वागीं निवाला | हरिच जाला निजांगे || ज्ञा.गा.८५.६ ||



अहं ब्रह्मास्मि , तत्वमसि आणि सर्वखल्विदं ब्रह्मा , ह्या महावाक्यांचा अर्थ, आपण आपल्याला पाहीजे तसा,पाहीजे तेव्हां लावतो, त्यावेळी आपण कायम शास्त्र काय सांगत ह्या कडे दुर्लक्ष करतो.ही एक आतून होणार्‍याबोधाची स्थिती आहे.शास्त्र अस सांगत की, आपण जो भगवंत आयुष्यभर बाहेर शोधतो, तो असतो खरा आपल्याच शरिरात. मग प्रश्न असा पडतो की, आपल्याच शरिरात त्याला शोधायचा कसा?

श्री माउली सर्व जनांस उद्देशून एक महत्त्वाची गोष्ट सांगत आहेत-

प्रत्येक मनुष्य हा सुखासाठीच धडपडत असतो,मग त्याला हे सुख का सापडत नाही? तर त्याचे कारण प्रथम सांगून,ते सुख कसे व कोणत्या मार्गाने प्राप्त करून घ्यावे? हे ते नंतर सांगतात.शेवटी आपला अनुभव ते सांगतात की,या मार्गाने मी स्वत: गेलो व सुखरुप झालो.

या अभंगाचा अर्थ श्रीसद्गुरुकृपेने थोड्क्यात पाहू-

पदपदार्थसंपन्नता | व्यर्थ टवाळी कां सांगतां |

चार वेद,सहा शास्त्रे,यांच्या प्रत्येक पदापदाचा तर्कदृष्ट्या अभ्यास करून,पंडित बनलेल्यांची गोष्ट सांगताना, श्रीमाउली म्हणतात, त्यामूळे ते सुखरूप न होता, गटांगळ्या खातात.आपल्या तुटपुंज्या पुंजीवर ते उड्या मारीत बसतात, पण सुखरुप अशा परमात्म्यास विसरतात,म्हणजे पर्यायाने श्रीपरमात्म्याची व्यर्थ टिंगल-टवाळी सांगत असतात.माउली श्रीज्ञानेश्वरीच्या १३.११ व्या अध्यायात म्हणतात, कर्मकांडापासून तर्कशास्त्रापर्यंत सर्वासर्वात प्रवीण,परंतू अध्यात्मज्ञानात मात्र जर जो जन्मांध असेल,आणि अध्यात्मशास्त्रावाचून इतर शास्त्रात, शास्त्रसिंध्दात निर्माण करण्यात तो ब्रह्मदेव जरी असला,तरी त्या त्याच्या सर्व ज्ञानाला आग लागो.

ते एकवांचूनि आघवां शास्त्रीं | सिध्दांत निर्माणधात्री |
परि जळो तें मूळनक्षत्री | न पाहें गा || श्रीज्ञानेश्वरी.१३.११.८३५ ||


पुढच्या कडव्यात यावर उपाय सांगताना ते म्हणतात-

हरिनामीं नित्य अनुसरतां | हें सार सर्वार्थी || १ ||
हरिनाम सर्वपंथीं | पाहावें नलगे ये अर्थी |
जे अनुसरले ते कृतार्थी | भवपंथा मुकले || २ ||
कुळ तरले तयांचें | जीहीं स्मरण केलें नामाचें |
भय नाही त्या यमाचें | सर्व ग्रंथीं बोलियले || ३ ||


हे वरिल श्रीमाउलींनी अनुभवांती सर्वांना सांगितलेले साधन,सुलभ-सोपे आहे.श्रीप्रभूचे प्रेमाने घेतलेले नाम हेच सारसर्वस्व आहे. कोणत्याही पंथात हे नाम घेऊ नका असे सांगितलेले नाही. उलट सर्व पंथानी आवर्जून सांगितले आहे की 'हेच श्रीवेदाच सार आहे '. त्या त्या पंथाच्यासंस्थापकांनी-सद्गुरुंनी सांगितल्यानुसार, ज्यांनी-ज्यांनी ते प्रेमाने घेतले, ते भवपंथामधून मुक्त झाले.इतकेच काय त्यांचे कूळही उध्दरून गेले, हे विशेष!

आता हे नाम घेण्यासाठी लागत काय? हे पुढे सांगतात-

नलगे धन नलगे मोल | न लगती कष्ट बहूसाल |
कीर्तन करितां काळ वेळ | नाहीं नाहीं सर्वथा || ४ ||
हरि सर्व काळ अविकळ | स्मरे तो योगिया धन्य केवळ ||
त्याचेनि दर्शनें सर्व काळ | सुफ़ळ संसार होतसे || ५ ||


हे नाम घेताना धन द्यावे लागत नाही, मोल देवून ते कोणाकडून करवून घेता येत नाही.बरे कष्टतरी काय आहेत काय? किंवा वेळेच बंधन आहे,असेही नाही,ते केव्हांही घेता येते. मग हे अमृताहूनी गोड असलेल साध-सोप नाम, आपल्या मुखात का येत नाही? कारण आपल्याला खर्‍यासुखाची तळमळ नसते.

श्रीमाउली म्हणतात, हरिनाम हे सर्वकाळ-काळातीत असून, अविकल आहे. परंतू जो योगाच्या साधनेद्वारा,म्हणजेच दिव्य-सिध्द-नामाचा जप करतो, त्याच्या वासना जळून जातात, व त्याचा संसारही सुफ़ळ होतो.

शेवटच्या कडव्यात श्रीमाउली मुद्दाम स्वत:ची अभ्यास करण्याची पध्दती व मिळालेले फ़ळ सांगत आहेत-

ज्ञानदेवीं जप केला | मन मुरडुनी हरि ध्याईला |
तेणे सर्वागीं निवाला | हरिच जाला निजांगे || ज्ञा.गा.८५.६ ||


मन मुरडुनी हरि ध्याईला याचा अर्थकळण्यासाठी श्रीमाउलींचा एक अभंग पाहूया.

मन हें राम जालें, मन हें राम जालें |
प्रवृत्ति ग्रासुनि कैसें निवृत्तीसी आले || १ ||
श्रवण कीर्तन पादसेवन कैसें विष्णूस्मरण केलें |
अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन केलें || २ ||
यम नियम प्राणायाम प्रत्याहार संपादिलें |
ध्यानधारणा आसन मुद्रा कैंसे समाधीसी आलें || ३ ||
बोधीं बोधलें बोधितां नये ऐसें जालें |
बापरखुमादेविवरु विठ्ठ्लें माझें मीपण हारपलें || स.सं.वा.१.३०३.४ ||


असे हे नाम-महत्व सर्व साधूसंतांनी सर्व व्यक्ती करता सांगितले आहे.

आपल्या हरिपाठात श्रीमाउली म्हणतात, गगनाहूनि वाड नाम आहे.ज्याप्रमाणे गवसणी तंबोर्‍यापेक्षा मोठी असते,त्याप्रमाणे नाम हे आकाशाहूनी मोठे, आणि तितकेच सुक्ष्मही आहे.

|| श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ ||



Prashantnk
Thursday, March 08, 2007 - 8:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा-

रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा | सांडी तूं अवगुणु रे भ्रमरा || १ ||
चरणकमळदळु रे भ्रमरा | भोगीं तूं निश्चळु रे भ्रमरा || २ ||
सुमनसुगंधु रे भ्रमरा | परिमळु विद्गदु रे भ्रमरा || ३ ||
सौभाग्यसुंदरु रे भ्रमरा | बापरखुमादेविवरु रे भ्रमरा || ९२६.४ ||



Music
Saturday, July 14, 2007 - 3:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्या बात है
प्रशांत दादा तुमचे आभार मानायला शब्द अपुरे आहेत
गेल्या कित्येक दिवसांपासून "मोगरा फ़ुलला" चा अर्थ शोधण्याची धडपड चालू होती इतक्यांदा गाणं गायलं पण दर वेळी वाटायचं की आपल्याला अजून पूर्ण अर्थ कळलेला नाही

ग़ो. नि. दांचं "मोगरा फ़ुलला" वाचायची उत्सुकता पण ताणली गेलीये आता



Chyayla
Saturday, July 14, 2007 - 8:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रशान्त दा, अतिशय उत्तम.. मनाचे सर्व संदेह फ़िटत आहेत खरच ज्ञानेश्वरीच्या एक एका ओवीमधे किती मोठा अर्थ भरला आहे. थेम्बान्मधे समुद्रच साठवला जणु. त्याचा तुम्ही ईथे केवळ एक साक्षात्कार करवीला मी कोणत्याच प्रकारे तुम्हाला धन्यवाद देउ शकत नाही. तरी अंतकरणापासुन धन्यवाद.

मला पण ज्ञानेश्वरी वाचायची हुरहुर लागली आहे, ईकडे गिनिदांचे पुस्तक मागवता आले तर मी नक्कीच मागवुन वाचेल. अर्थात नुसते वाचन नाही कामाचे त्यासाठी हवा भक्तिभाव हे मात्र पुरते लक्षात येत आहे.

तरी अजुनही वाचायला मिळण्यास हे मन आतुर आहे. खरच... "एक तरी ओवी अनुभवावी"


Mansmi18
Thursday, July 26, 2007 - 1:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार,

सर्वाना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

आज एक दोन अभन्ग ऐकले त्यातील अर्थ कळला नाही.

हाचि नेम आता या तुकोबांच्या अभन्गात
"घररिघी झाले पट्टराणीबळे" हे वाक्य आहे..याचा अर्थ काय?

तसेच
भेटीलागी जीवा या अभंगात
"दिवाळीच्या मुळा लेकी आसावली" हे वाक्य आहे.

या दोन्हीचा अर्थ कोणी सांगाल का?

धन्यवाद.


Ksha
Thursday, July 26, 2007 - 10:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुकोबा म्हणतात,

हाचि नेम आता न फिरे माघारी| बैसले शेजारी गोविंदाचे||
घररिघी जाले पट्टराणी बळे| वरिले सांवळे परब्रम्ह||
बळीयाचा अंगसंग जाला आता| नाही भय चिंता तुका म्हणे||

आता मी गोविंदाच्या संगाची आस मनात धरली आहे, तेव्हां परत मागे फिरणे नाही. एकदा कृष्णाच्या प्राप्तीची ओढ लागली की तिचा विसर पडू न देणे हाच माझा नेम. हेच माझे कर्तव्य.
ज्याच्या घरात येऊन मी बळेच पट्टराणी झालेय, त्या सावळ्या परब्रम्हांला मी माझे सर्वस्व मानून बसले आहे.
हा बळाचाच संग झाला खरा, पण त्याने माझे भय, चिंता पूर्ण दूर झाल्या आहेत.

नीट पाहील्यांस तुकोबांनी इथे परमार्थ सुरू केल्यापासून पुढच्या प्रवासाचे वर्णन केले आहे. बळियाचा अंगसंग म्हणजे विचारपूर्वक घेतलेला निर्णय. परमार्थाची सुरूवात आपसूक होत नाही. माया, मोहपाश आणि षडरिपू प्रत्येक पावलावर आपल्याला मागे ओढण्यासाठी तयार असतात. हे "बळ" जे सांगितले आहे ते त्यांच्याविरुद्धचे बळ. गोविंदाविरुद्ध नाही.
असे त्या पुरूषोत्तमाला जेव्हा आपण आपले सर्वस्व बनवण्याचा नेम धरतो, तेव्हांच आपले संसारभय, चिंता दूर होतात.


*************

भेटीलागी जीवा या विरहिणीमध्ये ही विरहयातना किती तीव्र आहे हे समजावून सांगताना तुकोबा हा दृष्टांत देतात. पूर्वी सासरी असलेल्या मुलीची आईवडीलांशी भेट महिनोन् महीने होत नसे. तेव्हां दिवाळीचे (भाऊबीजेचे) निमित्त साधून भाऊ तिच्या घरी येऊन तिला माहेरी घेऊन जायचा. दिवाळीची दिवस येऊ लागले की त्या सासुरवाशिणीचा जीव कासावीस व्हायचा की माझा भाऊ कधी येईल आणि कधी मला माहेरी घेऊन जाईल. अशीच अवस्था तुकोबांनी सांगितली आहे. की हा मृत्युलोक, संसार सोडून कधी एकदा माझा विठू मला माझ्या हक्काच्या घरी घेऊन जाईल आणि कधी मला माऊलीची भेट घडेल. तिकडेच माझे डोळे लागून राहीले आहेत ...



Mansmi18
Friday, July 27, 2007 - 3:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्ष,

धन्यवाद. छान अर्थ सांगितला. पण "घररिघी" म्हणजे काय?


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators