पमकीन-जिंजर ब्रेड

Submitted by रूनी पॉटर on 12 November, 2008 - 17:35
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

१७५ ग्रॅम बटर किंवा तूप (पातळ करुन दीड वाटी)
१४० ग्रॅम मध (अर्धा ते पाऊण वाटी)
१ फेटलेले अंडे
२५० ग्रॅम पमकीन/कोहळा किसुन (साल-बिया असतांना अर्धा किलो वजन भरायला हवे)
१०० ग्रॅम साखर (१ वाटी)
३५० ग्रॅम सेल्फ रायझीग फ्लावर चाळुन (पावणे ३ वाट्या)
१ चहाचा चमचा आलेपूड ( किंवा सुंठ)

क्रमवार पाककृती: 

१. ओव्हन आधी १८० C ला (साधारण ३६०F) गरम करुन घ्या. फॅन ओव्हन असेल तर १६० C ला गरम करुन घ्या.
२. ब्रेड बनवण्यासाठी जे भांडे वापरणार असाल त्याला बटर चा हात लावुन घ्या. या साठी १kg किंवा २lb वाला ब्रेड टीन असेल तर उत्तम, नसेल तर नेहमीचे ओव्हन मध्ये चालणारे भांडे वापरावे.
३. एका भांड्यात पातळ केलेले बटर, मध आणि फेटलेले अंडे एकत्र कालवा. नंतर त्यात किसलेला कोहळा घाला.
४. वरील मिश्रणात साखर, आलेपूड आणि पीठ घालुन सगळे मिश्रण एकजीव करा
५. हे मिश्रण भांड्यात ओतुन ओव्हन मध्ये ५०-६० मि. बेक करा. बेक केल्यावर सुईने किंवा टुथपिक ने ब्रेडला टोचुन बघावे, जर सुईला काहीही पीठ लागले नसेल तर तो तयार झाला असे समजावे. नसेल तर अजुन ५-७ मि. बेक करावा.
६. बेक झालेला ब्रेड ओव्हन बाहेर काढुन १० मि. निवु द्यावा आणि मगच भांड्याच्या बाहेर काढुन थंड व्हायला ठेवावा.

वाढणी/प्रमाण: 
या लोफचे मोठे असे ११/१२ तुकडे होतात. ४-५ जणांना आरामात पुरेल
अधिक टिपा: 

१. सेल्फ रायझींग पीठ नसेल तर ३५० ग्रॅम मैदा (पावणे ३ वाट्या) + तीन टी स्पुन बेकींग पावडर + एक टी स्पुन मीठ या प्रमाणात साहित्य मिसळुन घ्यावे.
२. मी वापरलेली वाटी नेहमीच्या आमटीच्या वाटीपेक्षा थोडी मोठी होती.

माहितीचा स्रोत: 
बीबीसी कुकबुक (आणि मी स्वतः थोडाफार केलेला बदल)
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आहा! हे सगळं बघायला मस्त वाटतं. मनुचा लो-कॅलरी ब्रेड, मृणच्या कूकीज वगैरे.. ओव्हन नसल्याने नुस्त्या बघताच येतात Sad पुढे-मागे मायक्रोवेव्ह ओव्हन घेतला, तर त्यात हे करता येईल का? का पारंपारिक ओव्हनच हवा?
-----------------------------------
मैं जहाँ रहूँ, मैं कहींभी हूँ, तेरी याद साथ है..

रुनी, लाल भोपळा चालतो का? कोहळ्याचा किस पाव किलो घ्यायचा का? (म्हणजे मला असं विचारायचंय की अर्धा किलो कोहळ्यात सालं आणि बीयांचं वजन पाव किलो भरतं का? म्हणजे अर्धा अधिक कोहळा फुकटच जात असेल..... )

पुढे-मागे मायक्रोवेव्ह ओव्हन घेतला, तर त्यात हे करता येईल का? का पारंपारिक ओव्हनच हवा?
पूनम, सेम पिंच. खरंच ह्या प्रश्नाचं उत्तर कोणीतरी द्या.... कारण इथले ओव्हन आणि उसाअवातले ओव्हन ह्यात बराच फरक असतो असं ऐकलंय. मी ह्या बेकिंगच्या रेसिपीज् आईला देते. तिच्याकडे तो राऊंड ओव्हन आहे.

---------------------------------------------
उपास-तपासाच्या मी विरोधात आहे, पण 'फराळाच्या' नाही.... Happy

पूनम आणि मंजू, गोल आवनात पण होईल ही ब्रेड फक्त आकार गोल येईल कारण गोल आवनाचे वेगळे असे पात्र नसते. पण त्यातही होईल ही ब्रेड.

माझ्याकडे grill असलेला मध्यम आकाराचा आवन आहे. त्यात सर्व काही करता येत.

बी, राऊंड ओव्हनमध्ये ठेवायचे वेगवेगळ्या आकाराचे डबे मिळतात. गोल, चौकोनी, त्रिकोणी, षटकोनी वगैरे....
---------------------------------------------
उपास-तपासाच्या मी विरोधात आहे, पण 'फराळाच्या' नाही.... Happy

पुनम, मंजु,
इथले ओव्हन वेगळे असतात. त्याच्यावर बेक, ग्रील, तापमान असे सगळे ऑप्शन असतात. मी तसे भारतात बघीतले नाहीयेत.
मी कधी भारतात मायक्रोवेव्ह मध्ये केक करुन बघीतला नाहीये पण वाचलय की नेहमीच्या मायक्रोवेव्हमध्ये केक करायचा असेल ५-७ मि. लागतात (मायक्रोवेव्हच्या क्षमतेप्रमाणे थोडे कमीजास्त) पण तो खरपुस ब्राउन रंगाचा होत नाही. आतुन होतो आणि वाफेमुळे बाहेरुन नीट होत नाही. थोडासा ओलसर रहातो.
भारतात मायक्रोवेव्ह + ग्रील/कन्व्हेन्शन ओव्हन असे combination असलेले मायक्रोवेव्ह मिळतात त्यातले ओव्हनचे सेटींग वापरुन करता येतो आणि साधारणपणे पाककृतीत दिलाय तेवढाच वेळ लागतो.
अर्थात ही मी वाचलेली माहिती आहे प्रत्यक्ष अनुभव नाही त्यामुळे तिथल्या कोणाला तरी तुम्हाला विचारावे लागेल.
मंजु
मला वाटते चालेल लाल भोपळा कारण त्यांनी pumpkin, butter squash आणि अजुन ऑप्शन सांगीतले होते. जे शक्य आहे तो वापरावा. मी आणतांना वजन करुन अर्धा किलो आणला होता त्यामुळे मग साल काढुन किसल्यावर वजन करुन नाही बघीतले, पावकिलो पेक्षा थोडे जास्त असेल ही Happy

भारतात एक बाट्या करायला वेगळा अवन मिळतो ना ? त्यातही केक छान होते असे ऐकुन आहे.

रुनि, ब्रेड मस्तच दिसतो आहे.

इथे ज्याला Toaster Oven म्हणतात तसे भारतात मिळतात. त्यात होऊ शकतात असे पदार्थ. मी इथेही तोच वापरते कमी प्रमाणात काही करायचे असेल तर कारण तो तसा लहान असतो. तरी 8x8 किंवा 9x9 चा बेकिन्ग पॅन बसू शकतो.

इथे भारतात ओटीजी(ओव्हन टोस्टर ग्रिलर) असतात. त्यात सर्व प्रकारचे केक ब्रेड उत्तम होतात.

वरती ममम३३३ ने लिहिलेय ना ओटीजी मध्ये सर्व छान होते , भारतात माझी आई हेच वापरायची.

कन्वेक्शन ओव्हन (मायक्रो + ग्रिल + कनवेक्शन) घेतले तर त्यात सगळेच करता येते. कन्वेक्शन मोड अगदी पारंपरिक ओव्हन सारखा काम करतो.
मी केक नानखटाई करते अगदी सेम होते.
मायक्रोवेव्ह च्या रेसिपिज (आणि मुख्यता भांडी) वेगळ्या असतात त्या मायक्रो मोड वर करता येतात.
ओटिजी मधे मायक्रो मोड सोडून बाकी सगळे आहे बहुतेक.
इथं जे दिलंय तसंच सेम कन्वेक्शन मोड वर होईल. प्रिहीट, तापमान, वेळ सगळे ऑप्शन्स आहेत.

रूनी अगं हे लिहायचं विसरलंच वर सल्ले देण्याच्या नादात. ब्रेड अगदी खरपूस दिसतोय. टेंप्टींग. करून बघेन.

तु वापरलेले भांडे काचेचे आहे का मेटलचे?

अल्पना,
मी केक/ब्रेड लोफ बनवण्यासाठी मेटलचे केक पॅन (cast aluminum with premium nonstick coating) वापरते. काचेच्या भांड्यात पण केक होतो.

कन्व्हेक्शन ओव्हनच्या कन्व्हेक्शन मोड मधे aluminum ची भांडी वापरली तर चालत का? आणि टेंपरेचर, वेळ नॉर्मल ओटीजी प्रमाणे ठेवायची का?

माय्क्रोमोड मधला केकला बेकींग इफेक्ट येत नाही पण तो कच्चा कींवा ओलसर रहात नाही, आणि लागतो ही चांगला

फक्त मिश्रण जास्त पातळ नको आणि मिश्रण काचेच्या बोल मधे ओतल्यावर मधे जरा खळ केल्या सारख करायच. टेंपरेचर सेटींग खालील प्रमाणे ठेऊन मला रिझल्ट चांगला मिळाला आहे.

१.माय्क्रो मोड
२. प्रेस हाय पॉवर (१००% किंवा ९०० पॉवर) + ३मिनीट+७५० / ८०% + २ मिनीट = स्टार्ट

ह्या सेटींग मुळे पहीली ३ मि. केक हाय पॉवर वर शिजेल आणि नंतर ८०% वर २ मि.

गरज वाटली तर पुन्हा १ मि. साठी हाय पॉवर वर लावायचा.