' स्वच्छतेच्या बैलाला...!! ' संदर्भाने..

Submitted by नीधप on 4 November, 2008 - 10:31

दिवाळी अंकातल्या माझ्या लेखाच्या विषयासंदर्भाने अनेकांना आपलं म्हणणं मांडायचं आहे. साहजिक आहे कारण प्रॉब्लेम सगळ्याच आयाबायांचा आहे.
हा धागा तुमचं म्हणणं मांडण्यासाठी सुरू करतेय.
मी लेख लिहिला तेव्हा निश्चितच माझ्या डोळ्यासमोर पुढची कृती नव्हती. पण एकुणात मिळालेला प्रतिसाद बघता आपण काही करू शकतो का याबद्दल असा विचार सुरू होतोय.
माझा लेख इतर अनेक ठिकाणी देण्याबद्दल मला अनेकांनी विनंती केलीये पण एकदा इथे प्रसिद्ध झाल्यावर परत इतर ठिकाणी कोणी घेतील की नाही याची मला कल्पना नाही. कुणाला माहित असेल तर जरूर कळवावे.
माझ्याकडून होण्यासारख्या या तीन गोष्टी आहेत. ज्या माझ्या आवाक्यातल्या आहेत आणि मी त्या यशस्वीरित्या करू शकेन.
१. एका कव्हर लेटरसहीत या लेखाची प्रत मुंबईच्या महापौर शुभा राउळ यांना पाठवणे आणि त्यांना ह्या समस्येत लक्ष घालायला लावणे.
२. या विषयावर अजून अभ्यास करून मग अर्धा तासाचा एक माहितीपट तयार करणे. जो अनेक ठिकाणी लोकांवर आदळवणे (हॅमर चे भाषांतर..)
३. हाच विषय घेऊन किंवा या लेखातून २५-३० मिनिटाचा प्लॅटफॉर्म परफॉर्मन्स तयार करणे जो वेगवेगळ्या संस्थांच्या कार्यक्रमांच्या वेळी त्या त्या ठिकाणी जाउन सादर करणे. जेणेकरून कुठल्यातरी स्त्री समस्यांशी संबंधित कामे करणार्‍या संस्थेला ह्याचा पाठपुरावा करण्याची इच्छा व्हावी.

प्रशासकीय पातळीवर करायचे प्रयत्न करण्याची माझी ताकद वा अनुभव नाही. पण हे वरचं मी नक्की करू शकते. यात कुणाला माझ्याबरोबर यायचं असेल, मला मदत करायची असेल तर तुमचं स्वागतच आहे.

तुम्ही स्वतःहून या संदर्भात काही उपक्रम हाती घेत असाल तर तेही इथे मांडा म्हणजे कोण काय करतंय याची माहिती आणि चर्चा दोन्ही घडेल.

तसेच कुणाला काही सूचना करायच्या असतील या संदर्भात तर त्याही जरूर कराव्यात.

या सगळ्या संदर्भात अजून काही माहीती असेल कुणाला. तर तीही कृपया इथे द्यावी.

सत्यजित याने काही शोधाशोध करून माहिती मिळवली आहे ती त्यानेच इथे टाकावी अशी मी त्याला विनंती करते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्याच कल्पना चांगल्या आहेत पण आता कोण कुठली जबाबदारी घेउ शकतंय त्याबद्दलही बोला.
साखळी इमेल तयार करणे हे कुणीतरी अंगावर घ्या.

मी ज्या गोष्टीं करणारे त्यातली तिसरी गोष्ट 'प्लॅटफॉर्म परफॉर्मन्स' या संदर्भात सुहिताशी बोलणं झालंय आणि सुहिता या सादरीकरणाचा भाग असणार आहे. तेव्हा सध्या मी ज्या डॉक्युवर काम करतेय ते हातावेगळं झालं की लगेच आम्ही या कामाला सुरूवात करणार आहोत.

-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

तसेच या डॉक्यु च्या आर्थिक मदतीविषयी..
ज्यांनी ज्यांनी तयारी दाखवली आहे त्यांचे आभार. गरज पडली तर या डॉक्युसाठी बिनदिक्कत हात पसरीन तुमच्यापुढे. पण त्या आधी प्रोजेक्ट प्रपोजल तयार करून NGOs, काही कंपन्या, डॉक्यु फंडींग करणार्‍या entities यांच्याकडे हात पसरणार आहे. तो मार्ग जास्त योग्य ठरेल वैयक्तिक मदतीतून funding उभारण्यापेक्षा.
डॉक्युच्या संदर्भात मी आधी सांगितल्याप्रमाणे रिसर्च साठी मला मदतीची गरज आहे. आर्थिक नाही मॅनपॉवर या स्वरूपात. पण बहुतांशी खरंतर सगळाच रिसर्च हा भारतातच असेल. कारण ही आपली समस्या भारताची आहे. मला तरी परदेशात जेवढी फिरले तिथे ह्या समस्येला तोंड द्यावे लागले नाही.

आर्च,
तुझ्या मैत्रिणीचा मुद्दा रास्त आहे. ती आणि तिच्यासारखे अनेक परदेशी पर्यटक या संदर्भात काहीतरी करू शकतात. आपल्याकडे तसंही पाश्चात्य म्हणण्याला जास्त महत्व द्यायची मानसिकता आहे. तर असे परदेशी पर्यटक जे भारतात येऊन गेले आहेत आणि त्यांना ह्या गोष्टीला तोंड द्यावे लागले आहे त्यांनी प्रत्येकाने पर्यटन महामंडळाला/ शासनाला पत्रे लिहिली तर अजून एका काडीची भर होऊ शकते. अश्या लोकांना एकत्र करून किंवा त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना बोलते करणे आणि त्यांना एक पत्र लिहायला भाग पाडणे ही जबाबदारी तू उचलू शकशील का?

आर्चच असं नाही परदेशातल्या कुणीही ही जबाबदारी घ्यायला हरकत नाही..

come to think of it... परदेशात असलेल्यां ज्यांना रिसर्चमधे मदत करता येणं शक्य आहे त्यांनी अश्या सगळ्या पर्यटकांचं म्हणणं डॉक्युमेंट करून पाठवायला हरकत नाही.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

अज्जुका सर्वप्रथम हा लेख लिहिल्याबद्दल आणि नुसते लिहून न थांबल्याबद्दल तुझे अभिनंदन व धन्यवाद! हा प्रश्न फक्त स्त्रियांसाठी मर्यादित नक्कीच नाहीये. पुण्यासारख्या शहरात मला स्वतःला सार्वजनिक रेस्टरूम्सच्या अतिशय गलिच्छ वातावरणाचा अनुभव आहे. काही वर्षांपूर्वी एका ख्यातनाम गायकांच्या कार्यक्रमाला जाण्याचा योग आला. सगळी जनता गुलाबी थंडीत ठेवणीतले झब्बे पायजमे, साड्या व शाली पांघरून आलेली. पण एवढ्या हजारो लोकांच्या गर्दीसाठी स्वच्छतागृहाची सोय म्हणजे काय? पुरुषांसाठी त्या पटांगणाच्याच एका बाजूला आडोशाला जाणे. तिकडे ही गर्दी. काहीही ताळमेळ नाही. पाण्याची वगैरे तर सोयच नाही. पुढे लिहेन ते कदाचित पटणार नाही, आवडणार नाही पण तिथले हे चित्र पाहून "भारत देश विकसनशील देश नसून अजूनही मागासलेलाच आहे" असेच वाटले. Sad या मूलभूत सोयीशिवाय कार्यक्रमाच्या आयोजकांना तो करण्याची परवानगी तरी कशी मिळाली? मुळात स्वच्छतेची, दुसर्‍या व्यक्तीच्या existence ची कदर नसणे यामुळेच हे सगळे घडते. रस्त्यावर कचरा फेकणे, पचापचा कुठेही थुंकणे, एक ना अनेक विषय घेता येतील पण इथून सुरुवात करायला हरकत नाही.

आर्चने वर म्हटलंय की प्रश्नाबरोबरच उपायही सुचवावा. त्याबद्दल असं वाटलं की भारताबाहेर राहणारे (अमेरिकेत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया इत्यादी) अनेक मायबोलीकर आहेत. तर या बाकीच्या देशांमधे या सोयी कशा कार्यान्वयित केल्या जातात याची माहिती पाठवता येईल. इथल्या सुविधांचे फोटो, व्हीडीयो वगैरे घेऊन त्यांचा वापर डॉक्युमेंटरीमधेही करता येईल व स्थानिक प्रशासनालाही दाखवता येईल. हे उपयोगी होईल असं वाटतंय का?

अज्जुका.. मी माझ्या ब्लॉगवर टाकलं आहे पोस्ट..
सद्ध्या तरी मला इतकंच करता येण्यासारखं आहे त्याबद्दल क्षमस्व.. पुण्यात असते तर अजुन काही करू शकले असते..

बाकीच्या साईट्स वर टाकून पाहू का? मिसळपाव,मनोगत,उपक्रम ??

अज्जुका,
या साठी मी काहि Web site/software related मदत करु शकते.
शिवाय काहि सर्वे वगैरे करण्यास मदत करु शकते.
एख्यादा वीकंएडला तुळशी बागेत (पुणे) चक्कर मारली तर बरेच स्त्रियां कडुन
comments / suggestions / माहीती मिळु शकेल.

साखळी इमेल असेल तर please मला Add करा.
-मनी.
The strength of a nation derives from the integrity of the home.

मनिची कल्पना उत्तम आहे. बाहेरच्या स्त्रियांकडूनही याबाबतीत त्यांना काय वाटतं असे प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे. आणि हे सर्व लघुपटात समाविष्ट करायला पाहिजे. बहुतेक हे अज्जुकाच्या मनात असेलच. आणखि इतरांना ही documentary कशी असावी याबाबत सुचना देऊ शकलात तर त्या इथे उपयुक्त ठरतील.

Documentary ला मराठी शब्द लघुपट होईल का?

फारच स्तुत्य उपक्रम. याचा दुवा माझ्या अनुदिनीवर दिला आहे. आणखीही शक्य ती मदत करायला तयार आहे.
राज

हे पान आपण एक वेगळा गृप तयार करून हलवू शकतो. त्याचे फायदे असे होतील
१. जी मंडळी वेगवेगळी कामे हातात घेत आहेत ते वेगवेगळे धागे सुरू करून त्यात प्रगती करू शकतील.
२. वेगळी ईमेल साखळी करण्याची गरज पडणार नाही. ज्यानी गृपचे सभासदत्व घेतले त्याना आपोआप ईमेल ने सूचना मिळवायची सोय आहे. कुणाला वेगळे मेंन्टेन करत बसावे लागणार नाही.
३. सगळ्या इमेजेस, इतर फाईल्स एका जागी ठेवता येतील. कामाची यादी एकाच जागी ठेवून ताजीतवानी ठेवता येईल.

गझल कार्यशाळा, दिवाळी अंक असे उपक्रम राबवताना आम्हाला गृपची खूप मदत झाली. अज्जुकाची आणि तुमची सगळ्यांची हरकत नसेल तर गृप तयार करून तिथे हे हलवता येईल.

(या पानाची लिंक तीच राहील म्हणजे गृप मधे हलवले तरी बाह्य जगातल्या लिंक बदलायची गरज नाही).

वेगळ्या गृप वर हलवलं हे सगळं तर तिथे sign-in कसं करायचं ह्या सूचना वगैरे इथेच दिल्या तर बरं होईल .. मी हल्ली regularly मायबोलीवर येत नाही त्यामुळे पटकन समजत नाही ..

अज्जुका वर तू सूचवल्याप्रमाणे मी इकडच्या लोकांकडून जे भारतात प्रवास करून आले आहेत त्यांच्याकडून लेखी पत्रं मिळवायचा प्रयत्न करीन तसंच documentary संदर्भात research मध्ये काही मदत लागल्यास (e.g. questionnaire, data analysis, report writing etc.) मी करायला तयार आहे ..

अज्जुका
एक चांगला प्रकल्प हाती घेतल्याबद्दल अभिनंदन.
इतर अनेक मायबोलीकरांप्रमाणेच मी पण खारीचा वाटा उचलायला तयार आहे. भारताबाहेर राहुन मला यात काय मदत करता येईल ते सांग.
जर काही ऑनलाइन रीसर्च, त्या संबंधित नोट्स काढणे, तसेच अजुन काही काम करता येण्याजोगे असेल तर सांग.

अज्जुका सगळ्यांच्या मनातलं लिहीलस.
भारताबाहेर राहून मलाही यात काही मदत करता आली तर नक्की सांग.

अज्जुका, जरूर सांगते पत्र लिहायला. पर्यटन महामंडळाचा पत्ता दिला तर मी सगळी पत्र एकत्र करून स्वतःच पाठवीन. हवं तर तुला त्याची कॉपी पाठवीन.

भारताचा टुरिझम वाढवायला ही एक अत्यंत महत्वाची गरज आहे. देशात केवढ्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत पण इथून कोणला न्यायच म्हटल तर हा मोठ्ठा प्रश्ण उभा रहातो.

घरून निघताना सांगितल ह्या लोकांना की टॉयलेटला जाऊन चला रे तर म्हणे अजून लागली नाही तर काय करणार. पण एक दोन दिवसात बरोबर ही सवय लागते त्यांना. चक्क पुण्याला फर्ग्युसन कॉलेज रोडवरच्या वादिलालला गेलो होतो तर तेथेही पाणी नव्हत.

सुलभ सौचालयाबाबत न बोलणच उत्तम. तिथे तर enuch (मराठीत तृतीयपंथीय) लोकानी घाण केली असते. अंघोळी करत पोरे नागडी असतात. कधी रुपया तर कधी चक्क दोन रुपये(प्रश्ण पैसे देण्याचा नाही तर व्यवस्थेचा आहे). हे लिहून कोणाला discourage करायचा प्रयत्न नाही तर नुसते सौचलय उभे करून ती maintain करणे सुद्धा शासनाला जड जाते आहे नी हे मुद्दे विचारात घेतले गेले आहेत का वा नीट पाळले जात नाहीयेत असे दिसते.

मी ही पुर्ण पान वाचलेले नाहीये. इथून (अमेरीकेत बसून) काहि करण्यासारखे असेल तर कळवावे. लिहिण्यात तशी मी बरी आहे. Happy

अडमिन,
तुम्ही ज्या सोयी सांगितल्यात त्या नक्की कश्या कश्या वापरायच्या असतात आणि कोण कोण वापरू शकते याचं एक ट्युटोरियल द्या गरिबासाठी...
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

जी लोक आपापल्या ब्लॉगवर अज्जुकाच्या लेखाची लिंक देत आहेत त्यांनी त्यांचे स्वतःचे असे काही त्यात वाढवून आणि मग मधे अज्जुकाच्या लेखाची लिंक देऊ नये असे मला वाटते. त्या ऐवजी, जर अज्जुकाच्या लेखातील पहिला परिच्छेद घेतला आणि मग पुर्ण लेख इथे वाचा असे म्हणून लिंक दिली तर सर्व ब्लॉग वरील या लेखाला एकसारखेपणा येईल. आणि लेखाच्या शीर्षकाचे नाव देखील बदलू नका. असे केल्यास अनेकांना ही उत्सुक्ता होइल की अरे हा एकच एक लेख आपण अनेक ब्लॉगवर का वाचतो आहे. चला पाहू तर आतमधे असे काय आहे. बघा पटते का? वर उल्लेखलेले ब्लॉग मी वाचले. पण मला ते आवडले नाही. अज्जुकाच्या लेखामधे सर्वच काही आहे तेंव्हा तुमच्याकडून त्यात झालेली भर अयोग्य वाटली.

चु. भू. दे. घे.

लेखाच्या शीर्षकात 'स्वच्छतेच्या बैलाला..!!' संदर्भाने, निमित्ताने असं असलं की पुरेसं आहे. जेणेकरून हे सगळेजण एकाच समस्येबद्दल बोलतायत असं कळायला मदत होईल. परंतु ब्लॉगच्या नोंदीमधे काय असावं, माझ्या लेखातलाच मॅटर असावा की नसावा हे त्या त्या ब्लॉगधारकांवरच असूदे. अगदी भर असली म्हणून काय बिघडले? उलटं चांगलंच आहे. माझ्या लेखात सगळं काही असायला माझा लेख महाभारत नाही आणि मी व्यास नाही..
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

एक गोष्ट मला इथे नमूद कराविशी वाटते की बाफ वर इतक्या सजेशन्स आल्यात. त्यातल्या सगळ्यांचा नुसता फॉलोअप घ्यायचा मी असं ठरवलं तर मला माझी बाकीची सगळी कामं सोडून पूर्णवेळ ऑफिस थाटून हेच काम करावं लागेल. तुम्हाला सगळ्यांनाच माहीतीय की हे आपल्यापैकी कुणालाच शक्य नाहीये. पण जे प्रत्यक्ष उतरू शकत नाहीयेत कामात त्यांनी इथल्या इथे आपल्याला जी ग्रुपची सुविधा अडमिन देणार आहेत त्याचा फायदा घेऊन आलेल्या सूचना आणि कोण कोण काय काय काम करणार आहे हे थोडं विषयवार लावून ठेवलं तर कदाचित फायदा होईल. एकट्या दुकट्याने नाही ४-५ जण मिळूनही हे करू शकता.

मुळात तुमची यासंदर्भातली कमिटमेंट तुमच्या स्वतःशीच असेल. तेव्हा तुम्हाला वेळ, शक्यता, ताकद असेल तेव्हा तुम्ही जमेल ते करा. आणि करताय त्याची नोंद इथे टाका. म्हणजे ज्यांना तुमच्या प्रयत्नांत सामील व्हायचंय त्यांना होता येईल. काय काय पातळ्यांवर प्रयत्न चालू आहेत याचा एक आढावा इथे मिळेल.

मी काही लीडर वगैरे नाही चळवळ सुरू करणारी इत्यादी. आणि चळवळ इत्यादी हा माझा पिंडही नाही. त्यामुळे मी मला झेपेल ते काम माझ्या पेसने करणार आहे. मदत लागेल तशी हाक घालणारे. येतील तशा कल्पना समोर मांडणारे.

प्रत्येकाने स्वतःला झेपेल ते काम स्वतःचा Initiative घेऊन आणि स्वतःच्या डोक्याने ठरवूनच करायचे आहे. आपण आपल्या स्वतःलाच जबाबदार आहोत या सगळ्या कामात.

नवीन कल्पना इथे मांडताना. किंवा सूचना देताना त्यातलं काही काम आपण करू शकतो का? कितपत करू शकतो? याचा प्रत्येकाने विचार करावा अशी एक विनंती आहे.

-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

बी, तू स्वतः काही करत आहेस का?

आरती मी फक्त दोनच गोष्टी करू शकतो -

१) साखळी ई-मेल पाठवू शकतो. पण ती कोण लिहिणार हे मला माहिती नाही.
२) आर्थिक मदत.

तू काय काय करणार आहेस?

१. नवीन गृप सुरु केला आहे, "सार्वजनिक स्वच्छता" या नावाने. दुसरे काही नाव बदलायचे असेल तर तसे सांगा. मूळ लेखाचे पान "स्वच्छतेच्या बैलाला...!! ' संदर्भाने.. " इथे हलवले आहे. त्याची लिंक तीच (जुनीच आहे).

डावीकडे सगळ्यात वर "स्वगृह" आहे. त्यावर टिचकी मारली तर तुम्हाला गृपच्या मुख्य पानावर जाता येईल.

२. या पानावर लिहीणार्‍या सगळ्यांना गृपचे सभासदत्व दिले आहे. हे सभासदत्व खुले आहे. कुणालाही गृप जॉईन करता येईल.

३. ज्याना नेहमी इथे यायला जमत नसेल ते सभासद वर डाव्या बाजूला " माझे या गृपचे सभासदत्व" मधे जाऊन हवे असल्यास मला ईमेल पाठवा असे सांगू शकतील. त्याना नवी घडामोडी इमेलद्वारा कळतील.

४. अज्जुका, तुम्हाला गृपचे व्यवस्थापक/प्रशासक बनवले आहे. या गृपमधले कुठलेही पान (तुम्ही लिहिले असो वा नसो) तुम्हाला संपादित करता (किंवा काढून टाकता येईल) येईल. प्रत्येक पानावर फक्त तुम्हाला (जशी लेखकाला दिसते) तशी संपादन टॅब दिसेल.

तुम्हाला अजून कुणाला व्यवस्थापक करायचे असेल तर तो ही अधिकार तुम्हाला आहे. वर डाव्या बाजूला किती सभासद आहेत त्या यादीतून तुम्हाला हे करता येईल (किंवा आम्हाला कळवलेत तर आम्ही मदत करू).

५. कोणीही सभासद संभाषणाचा नवीन धागा सुरू करू शकतात. किंवा असे वेगळे विषयवार धागे सुरु केले तर इथल्या कल्पनांचे व्यवस्थापन सोपे जाईल. उदा. एक धागा " कामाची यादी" , दुसरा " लघुपटाची पूर्वतयारी", "आर्थिक मदत" इत्यादी. धाग्याला योग्य त्या शब्दखुणा वापरल्या तर आपोआप ते धागे त्या त्या शब्द्खुणांच्या कप्प्प्यात जातील आणि विषयवार यादीत सापडवणे सोपे जाईल.

६. सर्वसाधारणपणे सगळे धागे फक्त सभासदांना दिसतात. पण धागा करणारा लेखक किंवा गृपचे व्यवस्थापक तो धागा सार्वजनिक करू शकतात. (जसे हे पान सार्वजनिक केले आहे). सार्वजनिक पाने कुणालाही (मायबोलीचे सभासद नसले तरी) पाहता येतात. फक्त मायबोलिकर त्या पानावर प्रतिक्रिया देऊ शकतात.

एक सूचना आहे. हा लेख जर इंग्रजी आणि हिन्दी मध्ये भाषांतरित केला तर त्याचा प्रसार भारतभर होण्यास मदत होईल.. साखळी मेलसाठी सुद्धा मराठीबरोबरच या इतर भाषा सुद्धा प्रभावी ठरतील.
डॉक्युमेंटरी साठी माझी आर्थिक मदत करण्याची तयारी आहे.
तसेच प्रत्येकाने आपले मनोगत एखाद्या व्हिडिओवर रेकॉर्ड करून जर यूट्युबवर अपलोड केलं तरी ही एक मोठी चळवळ होईल. स्थानिक प्रशासनाला याची दखल घ्यावीच लागेल. पुणे मुंबई मिरर वगैरे अशा बातम्या प्रभावीपणे लोकांपर्यंत पोचवू शकतात.
खेड्यापाड्यांमधली परिस्थिती किती दारूण आहे हे सांगायलाच नको. आमच्या मूळच्या खेडेगावामध्ये अजूनही शेताकडे जावे लागते..

तसेच प्रत्येकाने आपले मनोगत एखाद्या व्हिडिओवर रेकॉर्ड करून जर यूट्युबवर अपलोड केलं तरी ही एक मोठी चळवळ होईल. >> ही कल्पना खूपच चांगली आहे आणि परदेशात राहणारेही अमलात आणू शकतात.

माझा लेख महाभारत नाही आणि मी व्यास नाही.. >> Happy असे एक तरी वाक्य वाचल्या शिवाय अज्जुकाला वाचल्याचे समाधान मिळत नाही. असो,

मी मदत करायला तयार आहे, funds, NGOs, राजकिय आधार, emails, कुठल्याही स्वरुपाचे काम असेल तर मला सांग.

ज्या काय ओळखी आहेत त्या वापरुन जे काय शक्य असेल ते मी करेन.

काही ठिकाणि सोय नसते मन्य आहे पण, असते तिथे काय ? पाणि असुनही न टाकणार्‍या मुलींची यादी केली तर वेळ पुरणार नाही. मी आत्ता पर्यत जिथे जिथे नोकरी केली तिथे तिथे मी अनेक मुलींना email लिहुन request केली आहे की बायांनो, मागच्यांचा विचार करा.

हाच प्रकार जवळ जवळ सगळ्याच सार्वजनीक ठिकाणी आढळतो.

surprisingly, ट्रेक च्या निमीत्ताने वापरलेले बर्याच गावातले 'गाडगेबाबा अभियान' मात्र लख्ख होते. बाहेर पाण्याची सोय होतीच पण ते टाकले जावे म्हणुन बायका आग्रही पण होत्या.

अगदी घरातल्यासुद्धा वस्तु बघितल्यातर लक्शात येते. एक ओटा आणि तिथले सिन्क सोडले तर बाकी सगळ्या वस्तुन्ची माप पुरुसान्च्या मापानेच असतात. माझ्या घरी महागडे लाकडाचे फर्नीचर बनवून घेतल्यावरसुद्धा माझ्या आईला त्यावर बसताना उडी मारूनच बसावे लागते, पाय खाली टेकत नाहीत. कार आणि स्कूटर चालवताना आपल्या बुटल्या बायकान्चे अगदी हाल होतात, पण म्हणून अजून कोणी त्यान्चे आकार बदलून मागितले नाहीयेत. बुटकी स्कूटर पुरुश चालवू शकतो पण उन्च स्कूटर बुटकी बाई चालवू शकत नाही.
स्त्रियान्ना आपले हक्क मागावेच लागतील. ते कोणी आपणहून देणार नहीये. त्यासाथी प्रत्येक वेळी लढा द्यायची गरज नाही. फक्त हक्काचे हक्क हट्टाने मागत राहीले पाहीजे, न थकता, न कन्टाळता आणि कदाचित न रागावताही.
मूळ लेखात मान्डलेल्या मुद्द्याच्या अनुशन्गाने प्रत्येक स्त्रिपुरुशाने सुधारणा करत रहायला हवी. समाधानी व्यक्ती आसपासच्या सगळ्यान्नाच समाधानी होण्यास मदत करते.

[१] लेख उत्तम आहे. प्रश्न सगळ्या आया-बायांचा जिव्हाळ्याचा आहे हे तर खरंच पण तो काही फक्त आया-बायांचा नाहीये. संपूर्ण समाजाचा आहे. आर्थिक क्षेत्रात जागतिक महासत्ता होण्याची स्वप्नं पहाणार्‍या आणि गप्पा मारणार्‍या समस्त मंडळींना अगदी मूलभूत बाबतीत आपला देश अजून किती मागसलेला आहे आणि आमच्या प्राचीन संस्कृतीचे गोडवे गाणार्‍यांना आपण अद्याप किती असुंस्कृत आहोत याची चांगली कल्पना देणारा आहे.

[२] नोकरी करणार्‍या स्त्रीयांचे काही वेगळे प्रश्न असू शकतात याविषयी अगदी परवा-पर्वा पर्यंत बरंच अज्ञान [आणि बेपर्वाईसुद्धा] शासनांत आणि खाजगी क्षेत्रात होतं. मग थोडाफार विचार सुरु झाला पण तरीहि पाळणाघरांची सोय दिली पाहीजे यापलीकडे विचारांची झेप जात नव्हती. माझा स्वतःचा अनुभव असा आहे की, सुमारे दहा वर्षांपूर्वी, एका सार्वजनिक क्षेत्रातल्या प्रतिष्ठित कंपनीत असताना, मी स्त्री-सहकार्‍यांच्या बरोबर तिमाही बैठक घ्यायला सुरुवात केली. त्यामध्ये जे प्रश्न समोर आले त्यांपैकी बर्‍याच प्रश्नांची 'वरिष्ठ व्यवस्थापना'ला अजिबात कल्पना नव्हती! कित्येक प्रश्न अगदी सहज सोडवता येण्यासारखे होते. एक साधी गोष्ट. स्त्रीयांच्या प्रसाधनगृहाचं लोकेशन काय असावं? अशा अनेक समस्या पुढे आल्या. त्यावर आम्ही जमतील तेवढ्या सुधारणाहि करू शकलो. उदा. 'फ्लेक्सिटाईम' चा प्रयोग, जो सुरुवातीला कठिण वाटला होता पण प्रत्यक्षात खूप यशस्वी झाला! मला वाटते की अशा बैठका सर्व कार्यालयातून नियमितणे होणं आवश्यक आहे. त्यामुळे केवळ स्वच्छतागृहांचाच नव्हे तर स्त्री-सहकार्‍यांच्या इतर अनेक लहान-मोठ्या प्रश्नांची सोडवणूक सहजरित्या होऊ शकेल.

[३] मी ह्या लेखाची ई-मेल प्रशासनातील माझ्या काही उच्च-पदस्थ मित्रांना पाठवतो आहे. काही उपयोग होतो का पहायचे!

[४] मिडीयाचं प्रबोधन कसं करायचं हा एक मोठाच प्रश्न आहे! मिडीयाची तकद प्रचंड आहे पण दुर्दैवानं तिथली माणसं बहुदा फारच मठ्ठ किंवा बधीर असावीत.

एका महत्वाच्या सामजिक प्रश्नाला तोंड फोडल्याबद्दल अभिनन्दन.मायबोलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद खूप उत्साहवर्धक वाटतोय.

बापू करन्दिकर

सगळ्या सूचना चांगल्या आहेत.
साखळी इमेल हे माझ्यासारख्या समोर कायम इनबॉक्स असणार्‍या माणसाला सोपं वाटणारं माध्यम आहे.
ऍडमिन ने साखळी इमेल चा थोडा वेगळा अर्थ घेतलाय बहुधा. याहू गृपसारखा.
तर ज्यांना असं वाटतंय त्यांच्यासाठी.
साखळी इमेल म्हणजे एक मेल लिहून ते आपल्या नेटवर्क मधल्या सगळ्यांना पाठवायचं. मग त्याला पुढं पाठवायचं आवाहन वगैरे.
यानं या गोष्टी अज्जुका म्हणतेय तशा आदळत रहातील.
आता मुख्य भाग म्हणजे यातले कंटेंट्स.
मोठे पॅराग्राफ्सवर पॅराग्राफ्स लिहीले तर सगळेच वाचतील असं नाही.
तर हे प्रभावी होण्यासाठी सुरूवातीला तरी फक्त पॉईंट्स लिहीणं गरजेचं आहे.
किंवा कसंही करून अशा कमी शब्दांत की तेवढं तरी सगळं समोरचा वाचेल.
हे एखाद्या ऍडसारखं असलं पाहिजे.
नाहीतर चांगला उद्देश असलेल्या आरंभी धडाक्याच्या पण नंतर कंटाळून कोपर्‍यात पडलेल्या उपक्रमासारखी याची अवस्था होईल.
मी हे साखळी इमेल लिहायला तयार आहे.
अज्जुकाच्या लेखातले आणि इतर काही सूचनांमधले काही मुद्दे घेऊन मी पहिलं मेल फॉर्मॅट करून इथं टाकते. ते ज्यांना हवं ते तसंच्या तसं, बदल करून पुढं नेटवर्क ला पाठवू शकता. अजून कुणीही असं फॉरमॅट तयार करत असेल तरी चांगलं आहे पण अजून कुणी म्हटलं नाही मी मी, म्हणून मी म्हटलं.

संघमित्रा छान.
मी इमेल केलय सकाळला. काही उत्तर आले तर लिहिते इथे.

महाराष्ट्र सरकारच्या या लिंकवर सर्व deptsच्या लिंक्स आहेत.
http://www.maharashtra.gov.in/english/webRing/webRingAll.php

त्यातल्या water supply & sanitation deptच्या लिंकवरल्या सर्व ईमेल idना मी इमेल पाठवला आहे. लेखाच्या लिंकसकट. बघूया काही उत्तर येतंय का.
बाकी depts नाही मेल करणारच आहे.

आत्तातरी इमेल फक्त मराठीतच लिहिलाय. बघूया रिप्लाय येतात का. नाहीतर इंग्रजीमध्येही पाठवीन. काही नावं non maharashtrian दिसली.

Pages