अंतरातली व्यथा अंतरी जपायची

Submitted by मिल्या on 24 September, 2010 - 05:07

भेट आपली अशी वादळी असायची
आत आत खोलवर... वीज लखलखायची

स्पर्श केवडा तुझा ... श्वास चंदनी तुझे
देह सळसळायचा अन मिठी डसायची

सांत्वनास तू मला... मी तुला असायचो
रात्रभर दवांमधे आसवे भिजायची

ह्या तिच्या जुन्या स्मृती... मौनराग छेडती
श्वास रोख! अन्यथा... शांतता ढळायची

दाखवू नकोस तू दु:ख सारखे तुझे
प्रेरणा मिळायची... वेदना सुचायची

दिवस पाहिले असे... रोज अवस व्हायची
आणि भास्करासही सावली गिळायची

एक नीळकंठ तर सर्व माणसांमधे
अंतरातली व्यथा अंतरी जपायची

मी अखेर जाणले मर्म जीवना तुझे
सत्य ओघळायचे... स्वप्नं साकळायची

एक हेच साकडे घातले मनाकडे
सोड शेवटी तरी लालसा जगायची

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मी अखेर जाणले मर्म जीवना तुझे
सत्य ओघळायचे... स्वप्नं साकळायची>>>
हे फार आवडले.

बाकी गझल,
व्वा!!!!!!!!!!!!!

मिलिंद,

नेहमी प्रमाणेच गुणी व सुबक गझल! अभिनंदन! काही किरकोळ फ्लॉज जाणवले.

रात्रभर दवांमध्ये आसवे भिजायची - यात 'मधे' असे हवे होते. हा टायपो आहे.

स्वप्नं - असे अनेकवचन होत नसावे. पण पोहोचत आहेच. त्यामुळे हरकत घेतली जाऊच नये.

वेदना सुचायची व सावली गिळायची हे शेर मस्तच! खूप आवडले.

काहीशी लाघवी रचना पण काही ठिकाणी माहिती सांगीतल्याप्रमाणे भासली.

आपल्या गझलांमधे नेहमी जाणवणारे दोन चांगले घटक म्हणजे..

१. आक्रमकतेचा पूर्ण अभाव / अनुपस्थिती

२. स्मूथ शब्द व सुबक शब्दांची निवड!

चु.भु.द्या.घ्या.

-'बेफिकीर'!

व्वा.... मिलींदराव.... तुम्ही वाट खूप पहायला लावता...पण त्यानंतर वाट पहाण्याचा शीण निघून जाईल अशी रचना देता....

अप्रतिम गझल...

भेट आपली अशी वादळी असायची
आत आत खोलवर... वीज लखलखायची

दाखवू नकोस तू दु:ख सारखे तुझे
प्रेरणा मिळायची... वेदना सुचायची

मी अखेर जाणले मर्म जीवना तुझे
सत्य ओघळायचे... स्वप्नं साकळायची

हे तीन शेर खू....पच आवडले.

सुंदर गझल मिल्या. Happy

स्वप्नं - असे अनेकवचन होत नसावे.>>> माझ्या मते, 'स्वप्नं' हे अनेकवचन बरोबर आहे. बाकी जाणाकार सांगतीलच. Happy

सुरेख गझल, मिल्या !
सगळेच शेर सुरेख आहेत. नेहमीप्रमाणेच, उत्तम गझल.

मात्र हा शेर हासिले गझल आहे, फार आवडला- तसेच पटलासुद्धा.

मी अखेर जाणले मर्म जीवना तुझे
सत्य ओघळायचे... स्वप्नं साकळायची

सध्या याच्यावर विचार करतो आहे. Happy

फारच छान गझल आहे मिल्या.

भेट आपली अशी वादळी असायची
आत आत खोलवर... वीज लखलखायची
या ओळींमुळे काही जुन्या गोष्टींची आठवण झाली.

सही रे...
नीळकंठ फार आवडला...

सत्य ओघळायचे... स्वप्नं साकळायची
ज्ञानेशप्रमाणेच मीही विचार करतोय.. Happy

प्रेरणा मिळायची... वेदना सुचायची
वा व्वा!!!

मतलाही आवडला...

मी अखेर जाणले मर्म जीवना तुझे
सत्य ओघळायचे... स्वप्नं साकळायची

एक हेच साकडे घातले मनाकडे
सोड शेवटी तरी लालसा जगायची

wah wa Milya bahot badhiya.....

ह्या तिच्या जुन्या स्मृती... मौनराग छेडती
श्वास रोख! अन्यथा... शांतता ढळायची

>>> सुंदर गझल.. खूप आवडली !

सुंदर नेहमीप्रमाणेच...
प्रत्येकच शेर खास अगदी Happy

'मध्ये' ही टायपो का आहे ते कळले नाही.

मिल्या,
गझल सुंदर आहे.

"टायपो दुरुस्त केला आहे मध्ये वाला"
'मधे' हे रूपही वापरात असले तरी अचूक रूप 'मध्ये' हेच आहे.
मोल्सवर्थमधून :
मधें (p. 629) [ madhēṃ ] ad (Properly मध्यें) In the middle. 2 prep In, into, amidst, among.

मध्यें (p. 630) [ madhyēṃ ] ad (मध्य) In the middle: also in or within. 2 or मध्येंच In the mean while; before or without the arriving or taking place (of some connected person or event). Ex. मी नसतां मध्येंच मामलेदार ह्यांनीं केलें. 3 prep In, into, amidst, amongst.

नवनीत शब्दकोशात 'मध्ये' हा शब्द आहे तर 'मधे' नाही.

क्या बात है मिलींद... अगदी सुबक बांधणीची गज़ल.
पहीले चार शेर मस्त नखरेल झालेयत.... नंतरचे तीन वेगळाच खुमार देतात अन मग शेवटी समेवर येणंही मस्तच झालय. जियो !!!

सर्वांचे खूप खूप आभार... लोभ असाच असू द्यावा...

मिलिंद : तुमच्याशी १००% सहमत... मध्ये हेच बरोबर रूप आहे मधे हे त्याचे अशुद्ध रूप आहे पण कवितांमध्ये ते अनेकवेळा वापरले जाते .. इथे मध्ये वापरले असते तर वृत्तभंग झाला असता म्हणून मी जाणूनबुजून 'मधे' वापरले .. पण गझल टाईप करताना मात्र सवयीनुसार 'मध्ये' टाईप केले म्हणून तो 'टायपो' झाला Happy

मंजू वरील स्पष्टीकरणातून तुलाही तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळेल असे वाटते...

Pages