मनोगत....संयोजकांचे !!!

Submitted by संयोजक on 22 September, 2010 - 08:49

गणेशोत्सव संयोजक मंडळाची घोषणा झाली आणि एक वेगळंच वातावरण तयार झालं. यावर्षीच्या संयोजक मंडळातील सदस्यांनी याआधी गणेशोत्सवात कधीच काम केलेलं नसल्याने सगळ्यांमध्येच एक वेगळाच जोश होता. स्पर्धा-कार्यक्रम ठरवण्याचा उत्साह, नवनवीन कल्पना, त्या प्रत्यक्षात आणण्यासाठीची धडपड, गणेशोत्सव दरवर्षीइतकाच उठावदार तरीही नाविन्यपूर्ण व्हावा यासाठीची खटपट आणि या सगळ्याबरोबर अपरिहार्यपणे येणारी, सगळं नीट पार पडेल ना ही धाकधुक या सगळ्याचीच आज सांगता होत आहे. हा गणेशोत्सव यशस्वी करण्यामागे अनेकांचे योगदान आहे, त्यामुळे कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा कार्यक्रम गणेशोत्सव संपल्यावर होत असला तरी अत्यंत महत्वाचा.

गणेशोत्सवातील सर्व स्पर्धा-सांस्कृतिक कार्यक्रमांत उत्साहाने सहभागी झाल्याबद्दल सर्व मायबोलीकरांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. तुमची मनमोकळी दाद-प्रतिसादच संयोजकांचा उत्साह वाढवत होते. मागच्या वर्षी सुरु झालेल्या प्रकाशचित्रांच्या झब्बूला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहून याही वर्षी हा प्रकार ठेवण्यात आला होता. त्याला मायबोलीकरांनी याही वर्षी भरभरून प्रतिसाद दिला. तर मागच्या वर्षी पाककृती व STY ला मिळालेला प्रतिसाद बघून यावर्षी हे कार्यक्रम न ठेवता त्याऐवजी 'कथाबीज' हा मुद्यांवरून गोष्ट लिहिण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.

गणेशोत्सव संयोजक मंडळासाठी हा एक अतिशय वेगळा आणि सुरेख अनुभव ठरला. आम्हां सर्वांना या उपक्रमात काम करायची संधी दिल्याबद्दल मायबोली प्रशासनाचे मनःपूर्वक आभार. अ‍ॅडमिनवेबमास्टरांच्या मदत व सल्ल्यांमुळेच आम्हांला काम करणे सोपे झाले. सल्लागार रुनी पॉटर यांनी प्रसंगी मंडळाला धीर दिला, कौतुक केले तर जिथे गरज होती तिथे आमचे कानही उपटले त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. रुनी पॉटर तसेच मागच्या वर्षीच्या गणेशोत्सवाच्या मुख्य संयोजक पन्ना यांचा अनुभव आम्हाला अत्यंत मार्गदर्शक ठरला. त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद. काही जुन्या-जाणत्या मायबोलीकरांनीही आम्हांला वेळोवेळी अमूल्य मार्गदर्शन केले त्यांचेही मनापासून आभार. गणेशोत्सवात सगळ्या जाहिराती व पोस्टर्स 'किरण फॉन्ट' शिवाय पूर्ण होणं शक्यच नव्हतं. त्यामुळे किरण फॉन्टच्या निर्मात्यांचेही अनेक आभार.

परंपरेप्रमाणे हा गणेशोत्सव देखिल श्राव्य व लिखित सांस्कृतिक कार्यक्रमांनी भरगच्च होता. श्राव्य कार्यक्रमांमध्ये मो, अगो, हिम्सकूल व उपासक यांनी प्रीतिची गाणी देऊन गणेशोत्सव सुरेल केला. योग यांनी त्यांच्या नवीन अल्बम 'गण गण गणांत' मधील गाणी उपलब्ध करुन दिली. या सुरेल योगदानाबद्दल मो, अगो, हिम्सकूल, उपासकयोग यांचे खूप खूप आभार. गणेशोत्सवात वाजवण्यासाठी 'नाशिक ढोल'ची क्लीप उपलब्ध करून दिल्याबद्दल केदार जोशींचेही आभार.

लिखित विभागात राफा यांनी आयशॉटची वही शोधून त्याच्या गणेशोत्सवाच्या आठवणी मायबोलीकरांपुढे मांडल्या. सई केसकर यांनीही त्यांच्या बालपणीचा गणेशोत्सव सगळ्या मायबोलीकरांसमोर सादर केला. या गणेशोत्सवासाठी प्रिया पाळंदे यांनी ॐ नमोजी आद्या हा मराठी चित्रपटातील गणेशावर आधारीत गाण्यांचा लेख देऊन जुन्या मराठी गाण्यांच्या आठवणी जाग्या केल्या. याबद्दल राफा, सई केसकर, प्रिया पाळंदे यांचे आभारी आहोत.

याव्यतिरिक्त कहाणी व मखराची बखर, एक्झिक्युटीव्ह मॅचमेकींग, नावानंतर काय आहे, गौरीचा गणपती हे लेख दिल्याबद्दल अनुक्रमे अरुंधती कुलकर्णी, मंजूडी, पौर्णिमाजेलो यांचे तर स्वप्ना_राजने खास तिच्या शैलीत जुन्या हिंदी चित्रपटांतील काही अधुर्‍या राहिलेल्या प्रेमकहाण्यांची आठवण करून देऊन मायबोलीकरांना भूतकाळात नेलं त्याबद्दल स्वप्ना_राज यांचे संयोजकातर्फे अनेक आभार.

सावली यांनी दिलेल्या 'ओरिगामी गणेश' मुळे या गणेशोत्सवात बर्‍याच जणांना नवीन काहीतरी शिकायला मिळालं. चिनूक्सच्या डॉ. तात्याराव लहानेंवरील लेखामुळे मायबोलीकरांना त्यांच्या अफाट कार्याची थोडीशी ओळख झाली. सावलीचिनूक्स यांचेही संयोजक मंडळ आभारी आहे.

मोठ्या मायबोलीकरांबरोबरच छोट्या बच्चेकंपनीला म्हणजेच छोट्या मायबोलीकरांनाही त्यांच्या अंगी असलेल्या नाना कला इतरांनाही दाखवता याव्यात या एकमेव उद्देशाने यावर्षी 'किलबिल' हा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत ठेवला होता. त्याला या छोट्या मायबोलीकरांनी भरघोस प्रतिसाद देऊन यशस्वी केले व 'हम भी कुछ कम नहीं' हेच दाखवून दिले. या छोट्या दोस्तांचे आणि त्यांच्या मायबोलीकर पालकांचे मंडळ मनःपूर्वक आभारी आहे. याचबरोबर छोट्या बच्चेकंपनीकरता कथाकथन दिल्याबद्दल हेमांगी वाडेकर यांचेही मंडळ आभारी आहे.

आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून या गणेशोत्सवातील टाकाऊतून टिकाऊ, प्रकाशचित्र स्पर्धा व शब्दांकुर या स्पर्धांच्या परीक्षणाची जबाबदारी घेतलेल्या परीक्षकांचे मनापासून आभार.

याखेरीज प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे या गणेशोत्सवात सहभागी असलेल्या कोणाचा उल्लेख अनवधानाने राहिला असेल तर त्यांनाही मंडळातर्फे अनेक धन्यवाद.

अरे हो, पण हे झाले मंडळाचे हितगुज. इतर मायबोलीकरांना वाचक, स्पर्धक म्हणून हा गणेशोत्सव कसा वाटला हे जाणून घ्यायलाही आम्हाला खूप आवडेल. काय त्रुटी होत्या, काय आवडलं, काय सुधारणा करता येतील, एखाद्या कार्यक्रमाऐवजी हे हवं होतं किंवा हे नसतं तर चाललं असतं या आणि अशा प्रकारच्या सर्व सूचना/मते/टीका यांचे स्वागत आहे. आपले प्रतिसाद पुढच्या गणेशोत्सवासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरतील याची आम्हाला खात्री आहे.

धन्यवाद,
संयोजक मंडळ - मायबोली गणेशोत्सव २०१०

ता. क. स्पर्धांच्या मतदानासाठी ह्या दुव्यावर पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्यावेळी प्रथमच गणेशोत्सव मिसला बर्‍यापैकी, पुण्यातलाही आणि मायबोलीवरचाही.
पण आता हळूहळू वाचत, ऐकत आणि पहात आहे. उत्तम झाला असेल, ह्यात शंकाच नाही! आत्तापर्यंत जेवढं पाहिलं, आणि वाचलय ते छानच आहे. Happy आरत्या अजून ऐकायला मिळालेल्या नाहीत.
संयोजकांचे आणि संबंधितांचे अभिनंदन !!

संयोजकांचे अभिनंदन आणि आभार.
माझा हा माबोवरचा पहिला गणेशोत्सव. त्यामुळे माझ्यासाठी खास आणि स्मरणीय. Happy

संयोजकांचे अभिनंदन आणि आभार!!! माझ्यासाठी हा माबो गणेशोत्सव पहिलाच होता, त्यामुळे सगळंच नवीन होतं. मजा आली. खास म्हणजे प्रकाशचित्रांचे जे काही झब्बू येत होते ते पाहून डोळे निवाले!!
छोट्यांच्या कलाकृती व गाणी/स्तोत्रांनी अजूनच बहार आली. येथील हौशी कलावंतांच्या टातुटि पाहून थक्क झाले. कसले हरहुन्नरी लोक असतात!!! आणि वेगवेगळे लेख, गाणी यांनी अजूनच रंगत वाढली.

पुढील गणेशोत्सवासाठीही भरघोस शुभेच्छा! Happy

उत्तम गणेशोत्सवाबद्दल सर्व संयोजक मंडळाचे हार्दिक अभिनंदन.. आणि आभारही...

दरवर्षीच्याच उत्साहात यंदाचाही गणेशोत्सव दिमाखात पार पडला... पण माझी एक तक्रार आहे... गणेशोत्सवात इतक्या गोष्टी नविन आल्या की सगळीकडे जाऊन बघायला जमलेच नाही अर्थात हळूहळू सगळे बघितले जाईलच पण मग ती जी गणेशोत्सावासाठी नविन म्हणूनची रंगत असते ती नक्कीच थोडीशी कमी असेल...
पुढच्या वर्षी शक्य झाल्यास संख्या कमी ठेवल्यास आवडेल.. जेणेकरुन आलेल्या सगळ्या गोष्टींना योग्य न्याय देणे जमू शकेल...

मायबोली गणेशोत्सव संयोजक मंडळाचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे.

अभिनव पोस्टर्सद्वारे जाहिराती, सर्व स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम ह्यांनी गणेशोत्सवात अगदी धमाल उडवून दिली होती. गणेशोत्सवाचे पूर्ण १२ दिवस मायबोलीवर अगदी सळसळतं वातावरण होतं.

तुमचे मनःपूर्वक आभार!!

हा नेटवरचा गणपति आहे, असे न वाटता, आपल्या घरातीलच वाटत होता. (रोजची आरती आणि प्रसादच, काय तो कमी होता.)

यावेळेस प्रकाशचित्रांच्या झब्बूने खरी मजा आणली. अनेक नवनवीन कलाकार पुढे आले. (एकावेळी एकच झब्बू, हि अट, अत्यावश्यक होती, तरी काहि जणांना जाचक ठरली. मलासुद्धा. अगदि डु आय घ्यायचा मोह झाला होता.)
वेळेअभावी मला छोट्या दोस्तांच्या कलाकृति नीट बघता/ऐकता आल्या नाहीत. नवीन लेखनमधेच खास गणेशोत्सवाच्या खास फलकांचा समावेश झाल्याने ( आणि नेहमीप्रमाणेच, तिथे बाकिची भाऊगर्दी असल्याने) ते उठून दिसत नव्हते. नवीन लेखनाचा वरचा अर्धा भाग, खास गणेशोत्सवाच्या फलकांसाठी असायला हवा होता. किंवा त्यांच्यासाठी वेगळा फाँट / रंग / चिन्ह वापरायला हवे होते.

खास लेखांसोबत गणेशाची रेखाटने अप्रतिम होती. (त्या कलाकाराची ओळख करुन द्या.)

तेव्हा संयोजकांचे अभिनंदन आणि कौतुकही !!

यन्दाच्या जाहिराती खूपच छान होत्या, त्या बनविण्यात कोण कोण सहभागी होते?
त्यान्चे खास अभिनन्दन Happy
बाकी सन्योजक मण्डळाचे अभिनन्दन आहेच आहे!
उत्सवाचा दर्जा नुस्ता टिकूनच नव्हे तर दरवर्षी चढत्या आलेखाने अत्युत्कृष्टतेकडे वाटचाल करतोय, व विशेष म्हणजे, सन्योजक सभासद बदलले तरी त्याचा फरक पडत नाही! मायबोलि परिवारास ही बाब भूषणास्पद आहे.

संयोजकांचे, स्पर्धकांचे आणि सगळ्या कलाकारांचे खूप खूप अभिनंदन Happy
अतिशय सुरेख आयोजन होतं. अगदी आपल्या घरचाच गणपती वाटत होता.
मज्जा आली खूप Happy

मायबोली गणेशोत्सव संयोजक मंडळाचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. इतक्या नीट नेटकेपणे संयोजन, कल्पक जाहिराती, सगळे कार्यक्रम आणि विविध स्पर्धा ठेवून गणेशोत्सव सुंदर आणि स्मरणीय केल्या बद्दल प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या संयोजन आणि योगदान देणार्‍यांचे मनःपूर्वक अभिनंदन..!

गणपति बाप्पा मोरया!!

संयोजक मंडळ नवीन असूनही यशस्वीरित्या गणेशोत्सव पार पाडल्याबद्दल सर्वांचंच अभिनंदन. झब्बू आणि छोट्या भावी मायबोलीकरांच्या कलागुणांनी ११ दिवस धमाल उडवून दिली. त्यांचंही कौतुक करावं तेवढं थोडंच.
आज पहिल्या पानावर गणेशोत्सवाचे कार्यक्रम, झब्बू,किलबिल काहीच न दिसल्यावर जरा चुकल्याचुकल्या झालंच.

>>आज पहिल्या पानावर गणेशोत्सवाचे कार्यक्रम, झब्बू,किलबिल काहीच न दिसल्यावर जरा चुकल्याचुकल्या झालंच.
अगदी अगदी.

संयोजक मंडळ , त्यांना मदत करणार्‍या सगळ्यांचे अभिनंदन आणि आभार.

अप्रतिम झाला गणेशोत्सव. Happy घरातील गणपती गेल्यावरही आपल्या मायबोलीवरचा गणपती होता त्यामुळे ते एवढं जाणवलं नाही. पण आज सायो म्हणत्ये तसं चुकचुकल्यासारखं होतय खरं.
वरील मनोगतही छान झालय. ते वाचुन कळलं की अजुन काही लेख वाचायचे राहिले आहेतच. Wink

सर्व संयोजकांच मनापासुन कौतुक. Happy

सुंदरच झाला कार्यक्रम! संयोजकांचे अभिनंदन!! Happy

जाहिराती, पोस्टर्स, झब्बूचे विषय हे सर्व खूप आवडले. लेखांसोबतची गणपतीची रेखाटने देण्याची कल्पना आणि ती रेखाटनेही छान होती. रोज एक श्रवणीय कार्यक्रम, एक लेखनप्रकार आणि एक झब्बूचा विषय, बाकी काही दर ३ दिवसांनी ही विभागणी आवडली. सगळे ऐकायला/वाचायला मला तरी व्यवस्थित वेळ मिळाला. कित्येक श्रवणीय कार्यक्रम मी पुनःपुन्हा ऐकले.

पुन्हा एकदा संयोजकांचे आणि सर्व संबंधितांचे अभिनंदन!

गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला..

दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील सुंदर आयोजन. सर्व संयोजकांचे अभिनंदन, त्यांनी फार मेहनत घेतली ह्याबद्दल मायबोलीकर त्यांचे ऋणी आहेत.

मस्त झाला गणेशोत्सव. उत्सव यशस्वी व्हावा यासाठी संयोजक मंडळाचे भरपूर मेहनत घेतली त्यामुळे त्यांचे खास अभिनंदन. संयोजकांच्या श्रमपरिहारासाठी एक पार्टी ठेवायला हवी.

संयोजक मंडळात सगळेजण नवीन होते असं अजिबात जाणवलं नाही यावरुनच लक्षात येतंय गणेशोत्सव किती यशस्वीपणे पार पडला. माझ्या नजरेत प्रकर्षाने भरल्या त्या या वेळच्या जाहिराती! अत्यंत कल्पक, कलापूर्ण आणि नेमक्या होत्या. आत्तापर्यंत आम्ही दोघांनी कधी मायबोलीवर आम्ही काढलेली छायाचित्रं प्रकाशित केली नव्हती... केवळ यावेळ्च्या रोजच्या झब्बूच्या जाहिरातींमुळे हे धाडस केलं.

आणखी एक प्रचंड आवडलेला विभाग म्हणजे किलबिल. मायबोलीवरची ही पुढची पिढी किती गुणवान आहे! मुख्य म्हणजे या विभागाला प्रतिसाद खूप छान मिळाला.

घरच्या गणपतीचं विसर्जन करुन आल्यावर जे एक रितेपण येतं तसं आज वाटतंय...

सर्व संयोजकांचं मनःपूर्वक अभिनंदन. तुमचं जितकं कौतुक करावं तितकं थोडंच आहे! आमच्यातर्फे तुम्हांला ही छोटीशी भेट. Happy

with_love.jpg

आता वेध दिवाळी अंकाचे...

फार मस्त झाला यावेळचा गणेशोत्सव. खुप आवडला.
मला आवडलेल्या गोष्टी :
जाहिराती
झब्बूचे नाविन्यपुर्ण विषय
प्रत्येक दिवशी वेगळा कार्यक्रम(कथा , गाणी) सादर करण्याची कल्पना खुप आवडली.
भरपुर विषय ,स्पर्धा.
सगळ्यात आवडले आणि जाणवले म्हणजे प्रत्येक ठिकाणी , संयोजकांची प्रतिसाद देण्याची तत्परता.
संयोजकांचे एकमेकात जबरदस्त को-ऑर्डीनेशन असल्याशिवाय शक्यच नाही हे.

मंडळाचे अनेक आभार.

Pages