मीमीची गोष्ट

Submitted by अरुण मनोहर on 22 September, 2010 - 22:13

मीमी एका भरल्या कुटुंबातली मुलगी. ह्या कुटूंबाचा एक असा काही पत्ता सांगता येणार नाही. शोधले की कुणीही सांगेल. प्रत्येक पेठेत अशी घरे आणि घरा घरात अशी माणसे दिसतील. विविधतेत एकता म्हणा हवे तर! घरी आजोबा-आजी, बाबा-आई, लग्न झालेला मोठा भाऊ-वहिनी, त्यांचे छोटे बाळ, आणि ताई, असे मीमीचे भरगच्च कुटुंब. आजोबा, आजी, भाउ वगैरे नाती त्या त्या लोकांविषयी बोलतांना काही नावे द्यायची म्हणून दिलेली नावे. नाहीतर मीमीचे कोणाशी खास असे नाते नाही. नेहमी आपल्या आपल्यामधेच गुरफ़टून असते ती. मात्र ह्या सगळ्यांची मीमी ही एक अतिशय लाडावलेली मैत्रीण. अगदी वाया गेलेलीच म्हणा ना! पण नको. तसे नाही म्हणुया. मीमीला नाही तसे वाटत. ती म्हणते, आजोबा आजी पासून बाळापर्यंत घरातील सगळ्यांची मी लाडकी मैत्रीण. हो सगळ्यांची मैत्रीणच. आजी-आजोबांची मैत्रीण, आई-बाबांची, भाऊ वहिनीची, ताईची, इतकेच काय बाळाची देखील मीमी मैत्रीणच. सख्खी मैत्रीण. मीमी शिवाय कोणाचे पान हलत नाही. जेव्हा तेव्हा मीमीचा जप करतात सगळे. आता परवाचेच पहाना.
घराला नुकताच रंग लावून झाला होता. “कसा मस्त रंग सिलेक्ट केला आहे ना मी” बाबांनी भिंतीवर हळुवार हात फ़िरविला. पुसटसा लागलेला रंग कोणाच्या लक्षात येण्याआधीच त्यांनी हात पॅंटीला पुसला.
लगेच आई- “अहो, पॅंटीला काय पुसताय? तुम्हाला काय! मला कपडे धुवावे लागतात. आणि तुम्ही कसला रंग सिलेक्ट केला? त्या चीप ब्रॅंडमधे चार तर शेड होत्या. चार खोल्यांना चार वापरल्या. आता हाताला लागतोय. रोज रंगपंचमी खेळा. मी कपडे धुतेच आहे सारखे.”
भाऊ- तू कपडे धुते? मी वॉशिंग मशीन आणलेय येवढे पैसे खर्च करून. आणि म्हणे मी कपडे धुते!
आई- वॉशिंग मशिनमधे कपडे काय आपले आपच जाऊन पडतात? तुझे लग्न झालेय, तरी अजून मीच सगळ्यांचे कपडे जमवून धुवायला लावते. आणि त्यात ह्यांचे पॅंटीला हात पुसून रंगवणे!
वहिनी- आई अहो कितीदा तुम्हाला सांगीतल, मी लावीन मशीन. आता मला आणि ह्यांना सकाळी उठून लगेच कामावर जाव लागतं. आल्यावर मी लावतेच की. एखादे वेळी विसरले तर लावले असेल तुम्ही. बहुतेक वेळा मीच लावते.
आजी- जाऊदे गं स्वाती. आजकालची तुमची पिढी वेगळीच आहे. आमच्या वेळेस, मी एकटीने पूर्ण घरदार आणि शिवाय बाहेरची म्हणजे नोकरचाकरां कडून करून घ्यायची कामे सांभाळली आहेत. ह्यांना काय, हे सारखे फ़िरतीवर जाऊन बसायचे. पूर्ण संसार मी एकटीने चालवला होता. आता तुम्ही दोघी सास्वा सुना आणि भरीला मशीन असून देखील काही सुधारत नाही तुम्हाला.
आजोबा- काय बोलतेय ही! म्हणे हे सारखे फ़िरतीवर बाहेर जाऊन बसायचे! येवढे मोठे खटले काय हवेवर चालले? नकद पैसा कमावून आणायचो मी. जो अजून पर्यंत नातवंडांना देखील पुरतोय. माझ्या फ़िरतीमुळेच चालला ना येवढा मोठा गाडा!
असे सगळे अगदी रंगात येऊन मीमीचे कौतूक करत होते. त्यावेळी छोटे बाळ म्याम्यांम्यांम्या, ब्याब्याब्याब्या करीत सगळ्यांकडे पहात होते. बहुदा त्यालाही मीमीची आठवण आली होती. तरी त्याच्याकडे कोणी लक्ष दिले नाही. मीमी सगळ्यांच्या जवळून उठली आणि बाळाच्या जवळ जाऊन बसली. मग मात्र सगळे मीमीला सोडून थोडा वेळ बाळात गुंतले. सगळे बाळाशी खेळत होते. त्यामुळे मीमीची आपोआपच मज्जा झाली. कारण ती बाळाला खेटूनच बसली होती. बाळ इतके लबाड, की मीमी त्याच्या पाशी आहे हे त्याने कोणाला कळूच दिले नाही.
त्यामुळे बाळ जरी थोडा वेळ सगळ्यांचे लाडके बनले, तरी, मीमी्ने केव्हा कोण जाणे पुन्हा सगळ्यांच्या मनात जागा करून घेतली.
आजी- “हसतोयं पहा कसा माझ्याकडे पाहून. ओले ओले, बाळाला काय हवं? पणजी कडून न्हाऊ न्हाऊ कलून घ्यायचीयं?”
आजोबा- “न्हाउ न्हाउ नाई, आम्हाला पणजोबां कडून गोष्त ऐकायचीय!”
आई- त्याला आजीच हवी, हो किनई रे?
भाऊ- आज तो कोणाचाच नाही हं. आज मला सुट्टी आहे. आज फ़क्त माझा हक्क बाळावर.
सगळे मी बाळाला घेणार मी घेणार म्हणून त्याला ओढू लागले. त्यांच्या ओढाओढीत मीमी कधी थोडी सुखावली, कधी दुखावली. शेवटी सगळ्यांकडे फ़िरून बाळ वहिनीच्या, म्हणजे त्याच्या आईच्या कडेवर आले. तेव्हा मीमी एकदम तृप्त झाली. “कसे गं माझे सोन्यासारखे बाळ! मला सोडून दुसऱ्या कोणाकडेच त्याला रहायला आवडत नाही!” मीमीने खूप वेळ वहिनीचा हात धरून ठेवला.

मीमीचे एक बरे होते. तिचा लाड जिथे होईल त्याच्याकडे ती जायची. त्यामुळे नेहमीच तिला सतत इकडून तिकडे उड्या मारायला लागायच्या. तिला त्या बद्दल तक्रार मुळीच नव्हती. अडचण ही होती की, आई मीमीचे कौतूक करायला लागली, की बाबा लगेच तिला स्वत:कडे ओढून घेत. ती जायला तयार असायची, पण आई तिला सोडायचीच नाही. अशावेळी, आईच्या कडेवर बसलेल्या मीमीला बाबांकडून तिरकस बोलणी खावी लागत. हे तिला मुळीच आवडायचे नाही.
आई- “मी सांगीतल ना एकदा तुम्हाला. सकाळी फ़क्त एकदाच चहा मिळेल.
बाबा- “मघाशी दिला होता तो चहा होता कां? तरी मला वाटल सकाळी सकाळी कोल्ड ड्रींक का बर दिलय.”
आई- “तुम्हाला जेव्हा बोलावल तेव्हा यायला नको. कोल्ड ड्रींक वगैरे टोमणे मारले की मी देतेच आहे पुन्हा उकळून. तुमची सुट्टी. मला मेलीला एक तरी सुट्टी मिळते का?”
बाबा- “एक तरी सुट्टी काय म्हणते? तुझी तर रोजचीच सुट्टी.”
आई- म्हणून मी चारदा चहा करून देऊ? मला कोण चारदा जाउदे, एकदा तरी चहा विचारतो?” इथे आई सुनेकडे कशाला पहाते कोण जाणे! पण त्यामुळे मीमी ला बाबा-आईच्या भांडणातून निसटून वहिनीकडे जायचे निमीत्य मिळते.
वहिनी- “आई अहो माझी पण किती धावपळ होत असते रविवारी. बाकी दिवशी रात्री आठ वाजतात घरी यायला. किती काम असते मला ऑफ़ीसात. मी म्हणूनच करू जाणे असली तारेवरची कसरत!” मीमी वहिनीचा हळूच पापा घेते.

मीमीचे अस्से सुरू असते. सगळ्यांकडून ती आपले कौतूक करून घेत रहाते. तिला स्वत:च्या कौतुकाची इतकी सवय झाली आहे, की दुसऱ्या बद्दल कोणी एक चांगला शब्द बोललेला तिला खपत नाही.
मीमी आईजवळ बसली आहे. आई- भाईने लिहीलेला नविन लेख वाचते आहे. “किती छान लिहीतो ना आपला भाई! लहानपणी मी त्याला गोष्टी वाचून दाखवायची, म्हणून आज त्याला लिहीण्याची आवड आहे.”
ताई लगेच- “मी टेबलक्लॉथवर इतके छान कशिदाकाम केले, त्याचे तुला काहीच नाही. सतत भाईचे कौतूक.”
भाई- “घरच्यांना कौतुक असून काय? अजून पर्यंत एक-दोन अपवाद सोडता एकाने तरी म्हटले का “चांगले लिहीलेय म्हणून? मुद्दाम कोणाला विचारले, तर म्हणतील, “अजून वाचलेच नाही हो!”.... मी कुठे म्हणतोय की चांगलेच म्हणा. निदान आवडले नसेल तर तसे सांगा ना!”
ताई- “येवढच ना? मी सांगते- मला मुळीच आवडले नाही तू लिहिलेले.”

मीमी उदास होते. सहसा हे लेखक, चित्रकार वगैरे म्हणवणारे लोक विचित्रच असतात. आपल्याला उघडपणे कधी जवळ घेत नाहीत, उलट असे दु:खी करतात हे तिला चांगलेच कळते. भाईच्या मनांत मात्र आपल्यासाठी खूप ऐसपैस जागा आहे. आता भाईचा मूड ठीक नाही म्हणून. उद्या त्याला एखाद्या नविन बीजाचे झाड कागदावर फ़ुलवू दे. मग पहा कसा मीमीला हाका मारीत बसेल. मीमी देखील अलगदपणे त्याच्या बरोबर आतल्या खोलीत एकटी गप्पा मारीत बसेल. असे क्षण सोडले तर एरवी मीमी भाईबरोबर नसतेच. ती आपली त्याच्या लिखाणातील शब्दा शब्दात खेळत बसली असते. त्या शब्दांशी ती इतकी समरस होते, की इतरांना मीमी दिसतच नाही. त्यांना दिसतो सुगंधी झुळूक पसरवणारा वेडा मोहर. डोंगरावरील निळाईची पखरण. त्यांना ऐकू येते कधी पक्ष्यांचे कुजन, तर कधी राधेचे आर्त स्वर. ते वाचून (कदाचित) लोक (स्वत:शीच) म्हणाले (असतील)- “भाईंची शैली एकदम गुंगवून टाकणारी आहे.” पण हे मीमीला कधीच ऐकू येत नाही, आणि मग ती उदास होऊन बसते. अगदी आजच्या सारखी.

म्हणून सध्या ती ताईचा हात धरते.
ताई- “अग आई, मी केलेला टेबलक्लॉथ स्पर्धेमधे ठेवण्यासारखा आहे असं राजेश म्हणाला.”
भाई- “राजेश! तो टेबलक्लॉथच काय, तू वापरलेले पायपुसणे जरी ठेवलेस तरी “किती कलात्मक डाग पाडले आहेत म्हणेल.”
तितक्यात वहिनी येऊन मीमीला सोडवते. “अहो लहान मुला सारखे भांडत काय बसला आहात? आपल्याला किटी पार्टीला जायचं आहे नां”
भाई- “मला मुळीच नाही आवडत तिथे जायला. पार्टीच्या वेळी सुद्धा सगळे तिथे ऑफ़ीस ऑफ़ीस खेळत बसतात. प्रत्येकाचे आपलेच गुणगान. मी यंव आहे, मी त्यंव आहे. मला कशी तीन अ‍ॅक्सलरेटेड प्रमोशन मिळाली. माझा बॉस कसा मला टरकून असतो. माझी कंपनी मला कसे नेहमी बिझीनेस क्लासनेच पाठवते. ब्लाह ब्लाह ब्लाह.”
वहिनी- “मग तुम्हालाच काय होते तोंड उचकटायला? तुम्हाला ऑफ़ीसमधले सांगण्यात इंटरेस्ट नाही, तर लेख वगैरे लिहीता तेच सांगाना सगळ्यांना.” मीमीला थोडा वेळ आशा वाटते. आजची पार्टी एन्जॉय करता येईल. पण भाई मीमीला घेऊन जाण्याच्या मुड मधे नसतो.
भाई- “हूं! मी काही येणार नाही. नुसती प्रोफ़ेशनल म्याऊ म्याऊ चालते तिथे”

अशा काही वेळेस मीमीचे चालले नाही, तरी एकूण तिची घरी काय किंवा दारी काय, बऱ्यापैकी वट असते. मीमी इतकी लोभस आहे, की ती जवळ असली की माणूस सगळी नाती विसरून जातो आणि फ़क्त मीमीला जवळ करतो. हे मीमीला चांगले ठाऊक असल्यामुळे एकूण मीमी खुषीत असते.

मीमीच्या गोष्टीत कुणीच खलनायक किंवा खलनायिका नाहीत असे मात्र समजू नका. घरात एकच नाते असे असते, जे मीमीला दूर दूर ठेवते. आई म्हटले की मीमीचा आनंदी चेहरा एकदम पडतो. इथे आपली डाळ शिजणार नाही हे तिला आता माहीत झाले आहे. आई जेव्हा आई असते, त्यावेळेस तिला नवरा काय, भाऊ काय, अगदी एरवी लाडकी असलेली मीमी सुद्धा नकोशी होते.

पण मीमी मोठी हुशार आहे हेच खरे. सर्व कामे उरकून वहिनीनी भुकेल्या छोट्या बाळाला मांडीवर घेतले आणि त्याचे लाड करू लागली. लगेच मीमी बाळाच्या कुशीत शिरली. आता तिला इकडून तिकडे उड्या मारीत बसाव्या लागणार नव्हत्या. बाळ त्याच्या बाबांकडे म्हणजे भाईकडे पाहून टुकू-टूकू करू लागले. भाईला बहुदा चुकू-चुकू असे ऐकू आले. म्हणजे आता आपली डाळ इथे शिजणार नाही. पण हा बदमाष चुकू-चुकू का म्हणाला? बाळाजवळ असलेल्या मीमीने भाईलाच ऐकू जाईल अशा आवाजात विचारले. उत्तर लिहीण्यासाठी भाईने कंप्युटर कीबोर्ड जवळ ओढला.
*******

गुलमोहर: 

मस्त लिहिलेय...

मीमीचे घराघरात भरपुर लाड होतात हे जरी खरे असले तरी मीमी ला अगदीच हद्दपार केले तर मग सगळे अगदीच मिळमिळीत वाटायला लागेल.... मीमी घराघरातल्या संवादांना मस्त खमंग फोडणी देत जाते, अर्थात जोपर्यंत घरचे तिला तिच्या मर्यादेत ठेवतात तोवरच....

आई जेव्हा आई असते, त्यावेळेस तिला नवरा काय, भाऊ काय, अगदी एरवी लाडकी असलेली मीमी सुद्धा नकोशी होते.
अगदी खरेय.... Happy

छान Happy

खरच की. मला आवडलं, "आई जेव्हा आई असते, त्यावेळेस तिला नवरा काय, भाऊ काय, अगदी एरवी लाडकी असलेली मीमी सुद्धा नकोशी होते."

'मीमी' पार मेंदुचा 'बट्ट्याबोळ' करुन घेतलो, तुमच्या 'मीमी' ची कथा वाचुन....!!!

मीमी म्हणजे मांजर की काय पाळलेले पायात लुडबुडणारे, असे वाटले होते पहिल्यांदा.
मग परत नीटपणे वाचली तेव्हा थोडीफार कळली. Happy
मीमी, मीमध्येच मश्गुल असते तेव्हा अडचण नसते, पण मीमी चारचौघात उधळू लागते, तेव्हा अनर्थ ओढवतो. Happy
माबो म्हणजे मीमीचे माहेरघरच का?