नावानंतर काय आहे? - पौर्णिमा

Submitted by संयोजक on 31 August, 2010 - 00:43

2010_MB_GaneshaForK_small.jpg
साहेबाची भाषा कशी आहे पहा-

"Hi, I am John Abraham, you can call me John.."
"Yes John, sure..."

आता मराठी पाहूया-
"नमस्कार, मी जनार्दन अगरवाल.. मला जनार्दन म्हटलंत तरी चालेल.."
"बरं बरं, तर जनार्दनराव.."

अर्र! राव? बरं, राव नाही, तर जनार्दनाला पुढे 'दादा', 'जी', 'भाऊ' असं काहीतरी लागणारच.. त्याला नुसत्या त्याच्या नावानं हाक मारणं आपल्या 'संस्कृतीत' बसणारं नाही ना.. अगदीच दोस्तीखातं असेल, तर जनार्दनचं 'जन्या' होणार. पण पालकांनी जे नाव ठेवलं आहे, त्याच नावात किंचितही बदल न करता, त्याला कोणतंही बिरूद वा शेपूट न जोडता त्याला संबोधणं हे आपल्या संस्कृतीत कदापि बसत नाही! आदर दाखवायचा म्हणून, नुसतंच कसं नावानी हाक मारायची म्हणून, अशी काही ना काही कारणं देऊन नावानंतर काहीतरी लागतंच.

बरं, हे नावानंतर काय लागतं, त्यावर आपला स्वत:चा काहीच कन्ट्रोल नसतो हो.. म्हणजे नाव आपलं, पण ते कसं म्हणायचं हे समोरचा ठरवणार. तो समोरचा आपल्या वयाचा, हुद्द्याचा, मानाचा, समाजातल्या त्याच्या आणि आपल्या स्थानाचा सारासार विचार करणार आणि मग ठरवणार आपली लायकी- मग कधी पुढे लागणार दादा, कधी काका, कधी सर! हे अर्थातच स्त्रियांनाही लागू आहे..त्यांना तर अनंत शेपटं- ताई, मावशी, काकू, वहिनी, आजी वगैरे.. एखादा रिक्षावाला 'अगं ए मावशे, नीट बघ की समोर' असं म्हणेल, तर त्याच स्त्रीला ऑफिसमधले लोक 'मॅडम' म्हणतील.. आजकालच्या फॅशनीप्रमाणे झोपडपट्टीत रोज एक नेता निर्माण होत असतो.. सहाजिकच त्याचे अनुयायी त्याला 'दादा' म्हणतात, आणि तो ज्यांच्या प्रभावाखाली आहे ते सगळे 'साहेब' आपोआपच होतात!

लग्न झाल्यानंतर मुलींना अपरिहार्यपणे चिकटणारं शेपूट म्हणजे 'काकू'! जणू काही लग्न करणार्‍या सर्व जणी ह्या 'काकूबाई' कॅटॅगरीच असतात! पण त्याला इलाज नाही! कालची 'ताई' आज लग्न झाल्यावर 'काकू' होते.. हे मी माझ्यावर गुदरलेल्या त्या हृदयद्रावक प्रसंगानंतर शपथपूर्वक सांगू शकते! लग्न झाल्याच्या दुसर्‍या दिवशी मला सासरच्या शेजारणीची चांगली कॉलेजमध्ये जाणारी कन्या 'काकू' म्हणली होती! आणि कहर म्हणजे ज्याच्यामुळे मी 'काकू' झाले, त्याचं प्रमोशन नाही झालं! तो मात्र 'दादा'च!! आम्ही काही मैत्रिणींनी मात्र आमच्या मुलांना ट्रेन केलंय- ते आम्हाला संबोधतांना 'मावशी' म्हणतात, 'काकू' नाही! 'मावशी' कसं गोड वाटतं, जवळीक दाखवतं आणि वयदर्शकही मुळीच नाही.. शिवाय ते नातं आईकडूनचं आहे. 'काकू' म्हणजे अगदी 'वडिलांच्या भावाची/ मित्राची बायको' असा लांबचा वळसा घालून येतं आणि अजूनच नकोसं होतं!

लहान मुलं मात्र समोरच्याचं बरोब्बर मूल्यमापन करतात- ते त्यांच्या अँगलने लोकांकडे बघून त्यांचं वय ठरवून हुद्दाही ठरवतात. आम्ही लहानपणी वाड्यात रहात असताना वाड्यातल्या ताईच्या २ वर्षीय मुलानी सर्वप्रथम माझ्या आईला 'आजी' केलं होतं! आम्हांला तेव्हा फार गंमत वाटली होती.. पण हेच मी चांगल्या कळत्या वयात केलं होतं!! मी पेईंग गेस्ट म्हणून ज्या बाईंकडे रहायला गेले त्या टिपिकल गोर्‍या, घार्‍या आणि पांढर्‍या केसांच्या अंबाडा घालणार्‍या एकारांत होत्या. सहाजिकच मी त्यांना 'आजी' म्हटले.. मी असं म्हटल्याबरोब्बर तिथल्या आधीचा मुली फिस्सकन हसल्या.. मला कारण कळलं नाही! सत्तरीच्या बाईला 'आजी' नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? तर त्या म्हणल्या त्यांना सगळे 'काकू' म्हणतात. तूच पहिली 'आजी' म्हणणारी! त्यांनाही ते आवडलं नव्हतंच.. 'आजी?? बरं बरं. झालेच आहे आता वय! आजीच म्हण हो!' असा शेलका आलाच होता, पण मी त्यांना तिथे असेपर्यंत 'आजी'च म्हणत राहिले!
असं थेट वयदर्शक बिरूद लागलं की एकट्या बायकांनाच वाईट वाटतं असा समज असेल तर काढून टाका.. पुरुषही आपल्या इमेजबद्दल किती 'हळवे' असतात हे नुकतंच समजतंय.. आमच्या इथे गाड्या धुणारे, इस्त्रीचे कपडे नेणारे, दूधवाला, पेपरवाला हे सगळे जसे मला 'काकू' म्हणतात, त्याच ओघात माझ्या नवर्‍याला राजरोसपणे 'काका' म्हणतात आणि दर वेळी ते त्यांच्याकडून निमूटपणे ऐकून घेताना त्याच्या हृदयाला घरंबिरं पडतात! दरवेळी त्याने 'काका' ऐकलं की तो स्वत:चीच समजूत काढतो-"आजकाल मला सगळे 'काका' म्हणतात चक्क! मी काही इतका मोठा दिसत नाही.. अजूनही मला लोक विचारतात, 'इंजिनिअरिंग करून पाचसात वर्षच झाली असतील नाही तुम्हाला?' म्हणून! ह्या लोकांना काही कळत नाही! काका म्हणतात शहाणे. शहाणे कसले वेडे आहेत झालं!' मीही 'च्च, खरंच लोक ना..' असं म्हणत त्याच्या समर्थनार्थ मान हलवते, असा विचार करत, की नक्की कोणाला जास्त कळतं ते दिसतंच आहे की!!

तसंच, आमचे काही अविवाहित मित्र आहेत, त्यांचा असा आग्रह आहे, की जोवर त्यांचं लग्न होत नाही, तोवर त्यांना 'काका' म्हणण्यात येऊ नये.. जोवर ते बॅचलर आहेत, तोवर ते वयाने लहानच आहेत आणि त्यांना 'दादा'च म्हणण्यात यावं! त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही म्हाटल्यावर तर चक्क 'अंकल मत कहो ना..'चा टाहोही फोडतात ते! आता ह्यांनी चाळिशी गाठेस्तोवर लग्न नाही केलं तरी 'दादा'च रहाणारेत की काय!! त्यांचं पाहून मला माझ्या आजीचं वाक्य आठवतं- माझ्या बहिणीला मुलगा झाल्यानंतर कोणीतरी माझ्या वडिलांना गंमतीनं म्हणालं- "तुम्ही आजोबा झालात, म्हणजे म्हातारे झालात आता!" त्यावर आजी लगेच, "जोवर मी जिवंत आहे, तोवर माझ्या मुलाला कोणी म्हातारं म्हणायचं नाही!" काहीकाही गोष्टींना लॉजिकच नसतं हेच खरं!

थोडक्यात, एखादा आपलं नाव कसं प्रेझेन्ट करावं हे ठरवू शकतो- आडनाव लावायचं की नाही, आईचं नाव मध्ये लावायचं की वडिलांचं, नावामागे श्री. लिहायचं की रा.रा., सौ., की कु., की श्रीमती. की काहीच नाही, पण आपल्या नावानंतर लागणारं शेपूट मात्र अपने हाथमें नही बाबा. लोकांना काही सांगायला जावं, तर 'आँटी मत कहो ना' सारखा विनोद होतो आणि जे नकोय ते हट्टानं मागे चिकटतं. त्यामुळेच शेक्सपियरही इतकंच म्हणून गेला, की 'नावात काय आहे?' 'नावापुढे काय आहे?' हा प्रश्न मात्र ऑप्शनलाच टाकला त्यानेही!

ही तर साध्या माणसांची कहाणी झाली.. खुद्द गणरायाला तरी आपण कुठे सोडलंय? गजाननाच्या स्तुतीपर शेकडो श्लोक आहेत, आरत्या आहेत, गाणी आहेत, विशेषणं आहेत आणि सगळी अगदी यथोचित आहेत. तरीही प्रेमाने हाक मारायची असता, आपण 'बाप्पा' च म्हणतो ना! ह्या 'बाप्पा' मधून आपल्याला वाटणारा सर्व आदर आणि प्रेम अगदी स्वच्छपणे दिसतं.. पण खुद्द बाप्पाला आवडत असेल का बरं असं आपण त्याला एकेरी हाक मारणं? त्याची इच्छा असेल की त्याच्या भक्तांनी त्याला आदरार्थी हाक मारावी, तर? दरवर्षी गणपतीउत्सव 'श्रीमान विघ्नहर्ता, लंबोदर, रत्नजडित, मुकुटमंडित गजाननराव ह्यांचा उत्सव' ह्या भारदस्त नावाने साजरा झाला असता तर? छे बुवा! काहीतरीच वाटतं, नाही? 'बाप्पा' ही आमची लाडकी उपाधी आहे.. आम्ही तेच वापरणार!

तर, जिथे खुद्द गणपतीलाही चॉईस नाही देत आपण, तिथे आपणासारख्या मर्त्य मानवांना काय असणार? जे काही शेपूट लागेल ते निमूट ऐकून घेऊ, अगदीच काहीच्याकाही असेल, तर दोन सेकंद हसू आणि सोडून देऊ.. (तरीपण जाताजाता माझी एक प्रायव्हेट प्रार्थना रे बाप्पा- जास्तीतजास्त लोक मला 'ताई' म्हणूदे, 'काकू' माझ्या नावामागे मी पन्नास वर्षाची झाल्यानंतरच लागू दे रे बाबा!) बोला 'गणपती बाप्पा, मोरया!'

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्याच्यामुळे मी 'काकू' झाले, त्याचं प्रमोशन नाही झालं! तो मात्र 'दादा'च!!>>>> Lol

तसंच, आमचे काही अविवाहित मित्र आहेत, त्यांचा असा आग्रह आहे, की जोवर त्यांचं लग्न होत नाही, तोवर त्यांना 'काका' म्हणण्यात येऊ नये.. जोवर ते बॅचलर आहेत, तोवर ते वयाने लहानच आहेत आणि त्यांना 'दादा'च म्हणण्यात यावं! >>>>> Rofl

अगदी टवटवीत लेख... विषय सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा. त्यामुळे अगदी खुसखुशीत झाला आहे. Happy

छान. Happy

माझ्या आईला मात्र सगळे नातु लोक (मावस, आत्ते, चुलत वगैरे नातु लोक्स ) मावशी/ मामी असलंच काही म्हणतात. त्याचा तिला लैच अभिमान आहे.. माझ्या बहिणी मुद्दाम 'मावशी' नाही 'आज्जी' म्हणुन शिकवतात, पण नातु लोक्स बलोब्बल 'काकु' , 'मावशीच' म्हणतात.. Happy

>तसंच, आमचे काही अविवाहित मित्र आहेत, त्यांचा असा आग्रह आहे, की जोवर त्यांचं लग्न होत नाही, तोवर त्यांना 'काका' म्हणण्यात येऊ नये.. जोवर ते बॅचलर आहेत, तोवर ते वयाने लहानच आहेत आणि त्यांना 'दादा'च म्हणण्यात यावं!
--> हे खरं आहे. उगाचच मला, मित्रांना आजकाल काहीकाही लोक अजाण मुलांकरवी काका म्हणवतात.... Uhoh
तरुण ब्याचलर लोक्स ना दादाच म्हणावं यासाठी एखादी चळवळ उभारली पाहिजे.. खराय, छिद्रे पडतात हो... Sad

मस्त लिहिलेय. अगदी रोजचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे हा......

आणि ते लग्नानंतरचे काकूप्रकरण खरेच अगदी भयाण आहे. माझे लग्न झाल्यावर एकदा नवरा मला जोरात ओरडुन म्हणाला, शेजारचा मुलगा कधीचा हाक मारतोय तुला, लक्ष कुठे आहे तुझे??? आता तो मुलगा काकू काकू म्हणुन ओरडत होता ते मलाच उद्देशुन हे मला काय माहित??? मला त्या आधी कोणी कधीच काकू केलेच नव्हते..... Happy

माझ्यापेक्षा वयाने मोठे भाजीवाले भैया आणि मुर्ख रिक्षावाले मला आंटी म्हणतात तेव्हा मला भयानक राग येतो.

दरवर्षी गणपतीउत्सव 'श्रीमान विघ्नहर्ता, लंबोदर, रत्नजडित, मुकुटमंडित गजाननराव ह्यांचा उत्सव' ह्या भारदस्त नावाने साजरा झाला असता तर? छे बुवा! काहीतरीच वाटतं, नाही? 'बाप्पा' ही आमची लाडकी उपाधी आहे.. आम्ही तेच वापरणार!

एकदम पुल आठवले Happy

माझ्या घरी माझ्या आधी कोणावरही ऑफिसात काम करण्याचा प्रसंग गुदरला नव्हता, त्यामुळे ऑफिसातील वातावरणाची काहीच माहिती नव्हती. माझ्या ऑफिसच्या पहिल्या दिवशी मला माझ्या आजुबाजुच्या लोकांना काय नावाने हाक मारावी हा प्रश्न मला पडला. नशिबाने ऑफिसात मराठीही लोक होते. त्यातल्या एकाकडे जाऊन हळुच 'कानिटकर काका' अशी हाक मारली. त्यांनी माझी अडचण समजाऊन घेतली आणि मग मला सांगितले की ऑफिसात कोणी काका-मामा नसतात, बॉस लोकांना सर म्हणायचे आणि इतरांना एकतर मिस्टर अमुकतमुक नाहीतर सरळ नावाने हाक मारायची. एमेन्सीचे ऑफिस असल्याने बॉसलाही बरेच जण नावाने हाक मारत. मला सुरवातीला लोकांना नावाने हाक मारणे खुप जड गेले.

दर वेळी ते त्यांच्याकडून निमूटपणे ऐकून घेताना त्याच्या हृदयाला घरंबिरं पडतात >>>> Lol
तसंच, आमचे काही अविवाहित मित्र आहेत, त्यांचा असा आग्रह आहे, की जोवर त्यांचं लग्न होत नाही, तोवर त्यांना 'काका' म्हणण्यात येऊ नये.. जोवर ते बॅचलर आहेत, तोवर ते वयाने लहानच आहेत आणि त्यांना 'दादा'च म्हणण्यात यावं! >>>>>>>>> Rofl आयला! ऋयाम, चळवळीला पूर्ण पाठिंबा Proud
शीर्षकसुद्धा सही आहे.

मस्तच Happy
त्यातल्या एकाकडे जाऊन हळुच 'कानिटकर काका' अशी हाक मारली. <<<<<साधना, कानिटकर काका खुर्चीसकट कोसळले नाहीत ना? Proud

छोटा, नाजूक आणि मस्त विषय!
आणि ते सारं बाप्पाच्या समेवर आणून संपवणं आवडलं. Happy

>>'मावशी' कसं गोड वाटतं, जवळीक दाखवतं आणि वयदर्शकही मुळीच नाही.. शिवाय ते नातं आईकडूनचं आहे. 'काकू' म्हणजे अगदी 'वडिलांच्या भावाची/ मित्राची बायको' असा लांबचा वळसा घालून येतं आणि अजूनच नकोसं होतं!

अनुमोदन. मी तर कटाक्षाने "मावशी"च म्हणते.

एकदा मित्राच्या एका मुलीने मला "मासी" म्हटल्यावर मला सॉलिड धक्का बसला होता. मग त्याच्या बायकोने "उसे दीदी बोलो" असं तिला दटावलं. पण मित्राच्या बायकोला मीच "दीदी" म्हणत असल्याने ती मुलगी मला "मासी" म्हणणार हे लॉजिकलच ना. त्यामुळे मीच तिला "मासी" म्हण म्हणून सांगितलं. Happy तरी २-३ दिवस आता आपण "मासी" झालो ह्याचा शॉक राहिला Happy

>> लहान मुलं ... त्यांच्या अँगलने लोकांकडे बघून त्यांचं वय ठरवून हुद्दाही ठरवतात
अगदी बरोबर... माझ्या बायकोच्या चुलत बहिणीच्या २ वर्षाच्या मुलीने मी तिच्याबरोबर बर्‍यापैकी खेळायला लागल्यावर 'काका' सोडुन चक्क 'दादा'च म्हणायला सुरवात केली!

शॉर्ट बट स्वीट...

तसंच, आमचे काही अविवाहित मित्र आहेत, त्यांचा असा आग्रह आहे, की जोवर त्यांचं लग्न होत नाही, तोवर त्यांना 'काका' म्हणण्यात येऊ नये.. जोवर ते बॅचलर आहेत, तोवर ते वयाने लहानच आहेत आणि त्यांना 'दादा'च म्हणण्यात यावं!>> ह्या वाक्याची प्रेरणा कोण कोण आहेत ते माहिती आहेत.. त्यांच्यातल्या एकालाच दादा म्हणलं जातं, बाकीचे बिच्चारे... Proud

'मावशी' कसं गोड वाटतं, जवळीक दाखवतं आणि वयदर्शकही मुळीच नाही.. >>>>>>> अगदी अगदी. आणि आत्या तर अजिबात नको. ............ Rofl

पौर्णिमा : मावशी आणि काकू पेक्षा वैनी हे कसं सुटसुटीत वाटतं ना ????????? Lol

बाकी लेख मस्त जमला आहे. आणि काका बाबतीत पुर्ण अनुमोदन ..... Happy

आणि कहर म्हणजे ज्याच्यामुळे मी 'काकू' झाले, त्याचं प्रमोशन नाही झालं! तो मात्र 'दादा'च!! >>> Lol
एकदम बरोबर लिहिलंयस Happy

त्यामुळेच शेक्सपियरही इतकंच म्हणून गेला, की 'नावात काय आहे?' 'नावापुढे काय आहे?' हा प्रश्न मात्र ऑप्शनलाच टाकला त्यानेही! >>> वा!!! अतिशय मुद्देसूद लेख. खुप आवडला. Happy

पूनम, मस्त जमलाय लेख. Biggrin

मी शाळेत असताना समोरच्या घरात नविन जोडप आलं. खरतर त्यांना नुकतीच मुलगी झाली होती. पण पहिल्या भेटीतच तिने आम्हाला सांगितल की मला दीदी म्हणा. पण आम्ही मात्र तिच्या मुलीच्या मासी झालो. Proud तरी तु म्हणतेस तसं मासी एकवेळ ठिक पण आंटी, काकू नको. Wink

पुरुषही आपल्या इमेजबद्दल किती 'हळवे' असतात हे नुकतंच समजतंय.. >>>>> माझ्या एका मित्राने तर एका गलेगठ्ठ पोरिकडून मिळालेला 'अंकल' या शब्दाचा धक्का सहन न झाल्याने सरळ मिशी काढून टाकली,
बाकी लेख छान झालाय हो पौर्णिमाकाकू!proud.gif

Pages