बंदीवान

Submitted by नितीनचंद्र on 4 September, 2010 - 01:13

प्रथमच गझल बांधतो आहे. कार्यशाळा वाचुन छंद समजला नाही.

खात्रीने ही गझल छंद बध्द नसणार
जाणकारांना आवाहन, मार्गदर्शन करावे.
काल सुचलेला हा विचार इतका प्रभावी होता की गझल
लिहावीच लागली.

--------------------------------------------------

भोगुनी प्राक्तने सारी मी बंदीवान झालो
माझ्याच पिंजर्‍याला मी शिकार झालो

छ्प्पन्न भोग सारे राशीत रस मधाळ
भोगुन त्या रसांना मी उष्ट्या महाग झालो

स्पर्श शब्द गंध मैफिली अपार झाल्या
भोगुन त्या क्षणांना मी तृप्तीस महाग झालो

राजस महाली माझ्या मुजरे हजार पडले
नौबतीस ऐकता मी चाकरा महाग झालो

ना धर्म- दान केले, यात्रा कशी घडावी
मोजीत पाप राशी मी स्वर्गा महाग झालो

गुलमोहर: 

गझलेतले छंद वगेरे मलाही समजत नाही... पण पुढच्या ओळी मात्र .. खरच जबरदस्त ... बाकी नि३ उडी मारलीयेत तर पोहायला नक्कीच शिकाल.. !

नाही धर्म- दान केले, यात्रा कशी घडावी
मोजीत पाप राशी मी स्वर्गा महाग झालो ...

मस्त.... आवडली मला..

नाही धर्म- दान केले, यात्रा कशी घडावी
मोजीत पाप राशी मी स्वर्गा महाग झालो ...>>>> अगदी खास..

छान!!!
<< नाही धर्म- दान केले, यात्रा कशी घडावी
मोजीत पाप राशी मी स्वर्गा महाग झालो >> क्या बात है!!!

धन्यवाद भुंगा,

यात, "नाही" ऐवजी "ना" वापरले आहे

माझ्याच पिंजर्‍याला मी शिकार झालो हे बरोबर वाटते आहे. आपण हा बदल का सुचवता आहात. अर्थात काही फरक पडतो का ?

""माझ्या माहितीप्रमाणे मराठी गझलेत ''अ'' कारान्त काफिया चालत नाही.""
ही माहिती कुठून मिळाली?

ही न मंजूर वाटचाल मला
दे भविष्या तुझी मशाल मला
---
जगलो असाच कसातरी ओठातल्या ओठात मी
आता कुठे बोलायला केली खरी सुरवात मी!
----
आपापल्या सुखाशी केला करार त्यांनी
मी बोचताच माझी केली शिकार त्यांनी
----
तू माझ्या गीतांनी डवर दूर
ने माझा घमघमता बहर दूर
----
आञुष्य बेचिराख तरीही मजेत मी
आली व्यथा कवेत व्यथेच्या कवेत मी!
........ अर्थातच सुरेश भट

व्वा! सुरवात चांगली आहे. मस्तच !
नितीन असं वाटतं ना की केवळ लेखनच केलं असतं तर किती बरं वाटलं असतं ?

होय... '' अ'' कारान्त स्वरकाफिया म्हणायचे होते.

पद्मजाजी... आपण दिलेल्या उदाहरणांत काफियातील शेवटचे अक्षर समान आहे...अलामत पाळली आहे.

वाटचाल मला ,अलामत = आल
मशाल मला

ओठात मी ,अलामत = आत
सुरवात मी

करार त्यांनी, अलामत = आर
शिकार त्यांनी

मजेत मी,अलामत = एत
कवेत मी

परंतु नितिन चिंचवड यांचे काफिये पहा...

बंदिवान झालो ,अलामत = ? (अ)
शिकार झालो

महाग झालो

असो....

श्री नितीन यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांनी गझल बांधायचा हा पहिलाच प्रयत्न आहे. त्यांना गझलेचा आकृतिबंध कळलेला नाही, असे त्यांनी स्वत:च म्हटले आहे. त्यांच्यासाठी हे संदर्भ :
http://www.sureshbhat.in/gazalechibarakhadi
http://smriti.com/urdu/ghazal.def.html

श्री कैलास, आपण वर दिलेले स्पष्टीकरण वाचून माझा मात्र गोंधळ उडाला आहे.
माझ्या समजुतीप्रमाणे रदीफ =अंत्ययमक्=शेरातील (अर्थात मतल्यातील दोन्ही ओळीत , तर नंतरच्या शेरांमधील दुसर्‍या ओळीत येणारा) आणि न बदलणारा शब्द, जो प्रत्येक गझलेत असेलच असे नाही.
ही न मंजूर वाटचाल मला
दे भविष्या तुझी मशाल मला
यात मला हा रदीफ किंवा अंत्ययमक आहे.
काफिया अर्थात रदीफ हे अन्य वृत्तबध कवितांप्रमाणेच आहे. वर वाटचाल आणि मशाल हे काफिये/कवाफी आहेत.
अलामत अर्थात स्वरचिन्ह हा एक स्वर असेल; आपण म्हटल्याप्रमाणे आल, आत ,आर असा अक्षरसमूह नाही.
काफियात शेवटच्या न बदलणार्‍या अक्षराआधी (वाटचाल, मशाल यातील ल) /अक्षरांआधी येणार्‍या अक्षरातील न बदलणारा स्वर. वाटचाल, मशाल मधील 'ल' च्या आधीच्या अक्षरातील 'आ' याला अलामत म्हणतात.
माझे चुकत असल्यास सांगावे.

आपण योग्य आहात....
अलामत हा स्वरचिन्ह आहे.... पण काफिया हा अक्षरसमूह असावा लागतो....
नितिन्जींच्या गझलेतील काफिये पहा....

बंदिवान
शिकार यात अलामत आणि कोणता अक्षरसमूह काफिया म्हणून घ्यायचा?
बंदिवान झालो (अ झालो)
शिकार झालो (अ झालो)

खरं तर गझलेचं सौंदर्य स्थळ हे ''काफिया''च असतं

''अ'' ने अंत होणारा काफिया वापरुन झालेली गझल ,गझल म्हणून वेगळी वाटणार नाही.

म्हणून मी म्हणालो की मराठी गझल ''अ'' कारान्त स्वर काफिये स्वीकारत नाही.

मला वाटते मी आता क्लीयर आहे...

पद्मजाजी,

आपण लिहीलेले आहे ते तंतोतंत बरोबर आहे परंतु श्री. नितीन यांच्या प्रस्तुत रचनेत झालो मधील 'झा' हे अक्षर बदलत नाही...म्हणून,

बंदीवान
शिकार
महाग

ह्या न्+अ, र्+अ, ग्+अ अशी 'अ' कारान्ती अक्षरे येतात ज्यात अलामत सुद्धा 'अ' मानावी का? असा प्रश्न उपस्थित होतो......असो, हे सर्व 'नितीन चिंचवड यांना नाऊमेद करण्यासाठी नक्कीच नसून त्यांना गझलेचे शास्त्र नेमके लक्षात यावे म्हणून सुरु आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते.
चूभुद्याघ्या

--विजय दि. पाटील

श्री विजय आणि श्री कैलास, आपल्या हेतूविषयी शंका नाही, पण श्री नितीन यांना पहिलीच्या वर्गात एकदम पदवीचा अभ्यासक्रम शिकवल्यासारखे वाटु शकेल.
गझलेचे वृत्त, रदीफ, काफिया आणि अलामत हे पहिल्या शेरात अर्थात मतल्यात स्पष्ट होतात, आणि त्यानुसार पुढले शेर यायला हवेत, हे बहुधा त्यांच्या लक्षात आलेले नाही.

माझ्या मते मला गझलेचे तंत्र ५% सुध्दा समजलेले नाही. केवळ मनात येणारा विचार मांडण्यासाठी मी सर्व तांत्रीक विचाराचा भाग बाजुला ठेऊन ही गझल लिहली.

सर्व जाणकारांसाठी प्रश्न आहेत.

१) तांत्रीक बाजु आणि सर्जनशीलता संभाळताना आपल्या मनात निर्माण होत असलेले विचार आपल्याला गझलेत मांडताना खुपच प्रयास पडत असतील नाहीका ?

२) अस कधी झालय का की तांत्रीकतेत बसत नाही म्हणुन विचार चांगला असुनही ती गझल अपुर्ण राहिली ?

३) गझलेचा उगम भारतीय नाहीत त्यामुळे मतला, काफिया हे शब्द व त्याचे नियम रास्त आहेत. मुळात उर्दु किंवा अन्य अरबी भाषेत किती स्वर आहेत ?

४) मराठी इतके स्वर आहेत का ?

५) मराठीतील स्वरांचे नियम मराठी गझल अस्तीत्वात आल्यापासुन निर्माण झाले आहेत का ?

इथेच उत्तरे लिहावीत असे नाही. एखादा स्वतंत्र बाफ निर्माण केल्यास माझ्यासारख्यांना मार्गदर्शन मिळेल.

पदमजाजी, पाटील साहेब आणि डॉ. कैलासजी मार्गदर्शनाबद्द्ल आभार
अजुनही मला समजुन घ्यायला आवडेल.

मला कोणी नाउमेद करतय असे वाटले नाही. किंबहुना अजुन जाणुन घेण्याची इच्छा आहे.

श्री नितीन, मी गझल लिहिण्याचा प्रयत्न केलेला नाही; वाचल्या, ऐकल्या मात्र आवडीने. मार्गदर्शनाचा अधिकार मला नाही, पण मला असलेली माहिती द्यायला नक्कीच आवडेल.
मराठीत गझल आणली कवी माधव ज्युलियन यांनी, पण रुजवली अर्थातच सुरेश भट यांनी. त्यामुळे गझलचे तंत्र समजण्यासाठी त्यांच्या पुढे किंवा मागे जाण्याची गरज नसावी. आपण मी दिलेली लिंक किंवा त्यांचे कवितासंग्रह वाचलेत तर मदत होऊ शकेल. चक्क इंग्रजीतही गझल लिहिता येते !
आणखी एक गंमत :
कुसुमाग्रजंची कोकिळा नावाची एक रचना आहे, तीत गझलेचे वृत्तबद्धता सोडले तर कोणतेही गुण दिसत नाहीत, तरीही शीर्षकाखाली कंसात गझल असे लिहिले आहे.
कोकिळा जेव्हा सुरांचा
फ़ुलविते पंखा निळा
आम्र लेउनि पंख तेव्हा
होउ बघते कोकिळा
कोकिळा जेव्हा स्वरांचे
उघडते अबदागिरी
जंगले शाहीर होती
शब्द होते मंजिरी.
प्रत्येक दोन (की चार) ओळीत एक पूर्ण विचार मांडणे असे स्वरूप यात दिसते खरे.

"तांत्रीक बाजु आणि सर्जनशीलता संभाळताना आपल्या मनात निर्माण होत असलेले विचार आपल्याला गझलेत मांडताना खुपच प्रयास पडत असतील नाहीका"-------
हे प्रत्येकाला स्वत:च्याच अनुभवावर ठरवावे लागेल, नाही? आपल्या मनातले विचार व्यक्त करण्यासाठी कोणता फ़ॊर्म जास्त योग्य हे ठरवणेही महत्त्वाचे. गझल हाच कवितेचा एक फ़ॊर्म नाही, आणि कविता हाही लेखनाचा एकच फ़ॊर्म नाही आणि लेखन हे अभिव्यक्तीचे एकच माध्यम नाही.(बापरे, खूप जड लिहिले का मी?)
तुमच्या रचनेला गझल म्हणता येत नसेल, पण ती वृत्तबद्ध कविता तर आहे की.
"अस कधी झालय का की तांत्रीकतेत बसत नाही म्हणुन विचार चांगला असुनही ती गझल अपुर्ण राहिली"
बहुतेक गझलकार एक मतला किंवा एखादा रदीफ़/काफ़िया सुचला की त्याला जुळतील असे काफ़िये शोधून मग त्यात कोणता विचार (?) बसवता येईल ते पहातात ! इथेच अन्यत्र एका गझलेवर...जुळणारे आणखी काफ़िये सांगून त्यावर शेर लिहिता येतील असे लिहिल्याचे वाचनात आले. म्हणजे विचार आधी शब्द नंतर असे नाही तर बहुतकरून शब्द आधी विचार नंतर असा प्रकार दिसतो. अर्थात सन्माननीय आणि अत्यंत सुखद अपवाद आहेतच

प्रत्येक दोन (की चार) ओळीत एक पूर्ण विचार मांडणे असे स्वरूप यात दिसते खरे.>>>
पद्मजा खरेय गं अगदी. आणि तेच हल्ली पहायला नाही मिळत, चालायचंच.
बाकी छान अभ्यास आहे तुझा गझलेबाबत, थोडक्यात काव्यशास्त्र ई. ई. त.
शिकायला मिळालं, धन्स गं. Happy

गझल यमकानुसारी असतेच. त्यामुळे ती कृत्रिम म्हंटली जाणे सहज शक्य असते. कृत्रिमतेमधूनही शेर नैसर्गीक वाटावा असा रचला जाणे ह कौशल्य !

यमकानुसारीत्वापासून जाणीवपुर्वक दूर राहणे व्यक्तीशः पटत नाही. नैसर्गीकरीत्या दूर राहिले गेले तर अर्थातच चांगले! शराब, हुबाब, जवाब वगैरे कवाफी हजारोवेळा येऊनही शेर नावीन्यपूर्ण वाटत राहिले.

सदर रचना तांत्रिक निकषांवर गझल ठरत नाही. वृत्तबद्ध कविताही ठरत नाही. कविता मात्र आहेच! कार्यशाळा व बाराखडी या माध्यमांमधून 'गझल लेखनाशी अजिबात परिचय नसलेली' व्यक्ती गझल करणे कठीण आहे. वृत्तांची माहिती बाराखडीत नाही व मायबोलीवर झालेल्या कार्यशाळांमधे आहे की नाही पाहिलेले नाही. गझल परिचय कार्यक्रमात ती असते. गझलेच्या शेराचे महत्वाचे तांत्रिक भाग (काफिया, रदीफ वगैरे) जाणण्यापुर्वी वृत्तात लिहिता यायला हवे.

आशय, प्रतिमा, रुपके व पावित्रा या गोष्टींचे जमीनीसकट अनुकरण करण्यापासून काही मंडळी दूर राहिलेली आहेत हे फार बरे झालेले आहे. अशा सात, आठ मंडळींमधे माझेही नाव आहे असे मी सांगणे हा दुराभिमान नाही. किंवा अज्ञानही नाही.

सरावाने तंत्रावर हुकुमत येते. सगळ्यांचीच येऊ शकते. प्रश्न त्यानंतर निर्माण होतो.

अवांतर - मराठी गझल हे बर्‍याच प्रमाणात एक 'सोंग' आहे अशा निष्कर्षावर यावेसे वाटत आहे.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

नितीन चिंचवड,

आपला गैरसमज होऊ नये म्हणून हा प्रतिसाद मुद्दाम देत आहे. (कुणाचाच होऊ नये.)

मराठी गझल हे बर्‍याच प्रमाणात सोंग वाटते हे विधान मी माधव ज्युलियनांपासून आजवर झालेल्या गझलेबाबत मांडलेले आहे. या रचनेबाबत नाही.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

नितीन
पद्मजा आणि बेफिकीर ह्यांनी तुम्हाला आधीच भरपूर माहिती दिली आहेच...

मायबोलीवरच्या दोन्ही कार्यशाळा आणि तिथे गझलकारांनी लिहिलेल्या गझल वाचा... बाराखडी वाचा... सरावाने तंत्र हळूहळू जमू लागेल

केवळ शब्दजुळवणी म्हणजे गझल नव्हे...
तंत्र सांभाळून गझल लिहिणे हा माझ्या मते त्यातला खरा आनंद आहे...
अन्यथा ती कायम कविता असतेच...

नितीनजी, आपल्या रचनेत भावी गझल दिसते आहे.
शुभेच्छा!

पद्मजाजी, आपल्या अभ्यासाला दाद!!

नितीनचंद्र , आपली गझल सदृश रचना वाचली . छान आहे .

मी सुद्धा तुमच्यासारखीच गझल न करता येणारी पण आपल्याला कधी गझल जमेल
असे स्वप्न पाहणारीच आहे .
आता या समूहाशी संलग्न झाल्यावर काही तरी जमेल अशी अशा बाळगते
कारण इथे बरेच गझलेतले जाणकार आहेत आणि त्यांचे मार्गदर्शन मिळाले तर ते
आपल्यासारख्यांना हवेच आहे