धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ५

Submitted by अर्धवट on 2 September, 2010 - 10:16

धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग १
धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग २
धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ३
धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ४

त्या जंगलात फिरण्यासाठी स्वतःची गाडी असणे आवश्यक होते.. तिथल्या गाड्या नाहीयेत.... झालं.. एवढ्या कष्टावर बोळा फिरणार असं वाटलं क्षणभर. थोडी आजुबाजूला चौकशी केल्यावर शेजारच्या गावात भाड्याने गाडी मिळू शकेल असा सुगावा लागला.

एकट्यासाठी एवढे पैसे द्यायला जिवावर येत होतं. पण माज करायचाच तर दात टोकरून कशाला असा अस्सल विचार करून, थेट टोयोटाची, उघड्या छताची, फोर व्हील ड्राइव्ह, स्टेशन वॅगन ठरवली दोन दिवसासाठी, तिथल्याच एका रेंजरला चालक म्हणुनही ठरवून टाकला.. आणि क्षणाचाही विलंब न करता जंगलात घुसलो...आत शिरल्यावर सर्वप्रथम काय झालं असेल, तर जंगल ह्या संकल्पनेला जोरदार धक्का बसला.

पण हा धक्का सुखद होता. हे काही सदाहरीत जंगल नव्हे. हा तर सॅव्हाना प्रदेश. चारही बाजुला क्षितीजापर्यंत पसरलेलं पिवळंधम्मक गवत, चार ते बारा-पंधरा फूट उंचीचं... अधुनमधुन 'जागते रहो' असं सांगत रामोशासारखे उभे असणारे वृक्ष... नजर जाइल तिथपर्यंत फक्त पिवळा सोनसळी प्रकाश... मावळत्या प्रकाशात नववधुसारखं सामोरं आलेलं हळदीच्या माखल्या अंगाचं रान... वाह.. काय बेहोषी पहिल्या भेटीतच...

मी भारावल्यासारखा तो पिवळा-तांबूस सोहळा पाहात होतो. ती मावळतीची छटा, पिवळ्या गालिचावरून अस्तंगत होणारा तो लाल गोळा.. रंग बघावेत.. की आकार.. की सावल्या पहाव्यात.. की नुसते आवाज ऐकावेत.. गवताच्या पात्याची ती तळपत्या तलवारीसारखी सारखी सळसळ्..त्या पात्यावरून प्रकाशाची तिरीप चमकुन होणारा भास्..कधि ते चकाकतं सळसळतं गवत पाण्यानं भिजुनंच चमकतय असं वाटतं..

आणि ह्या सगळ्यावर आपल्या आरस्पानी सौंदर्यानं मुक्त बागडणारे ते पशुपक्षी. कधी शेकडो हरणांचे, काळवीटांचे कळप तर कधी एखादाच हत्ती, तर कधी लगबगीनं जाणारा एखादा जिराफ किंवा झेब्रा.

एखादा निवांतपणे गवत खाण्यात गुंग झालेला शेकडो हरणांचा अथवा काळविटांचा कळप म्हणजे तर साक्षात काव्यच.. ती झोकदार, अवखळ चाल, जराशा आवाजानं टवकारणारे कान.. तुमच्याकडं पाहुनही न पाहिल्यासारखं करणारी ती मोहक नजर.. आणि अचानक, अगदी अनपेक्षीत उधळणारा तो संपुर्ण मुक्तछंद....पाण्यावर दगड मारल्यावर अचानक जशा लहरी चौफेर उसळाव्यात तशी चपळ, त्वरीत पण लयबद्ध हालचाल..
एक एक चित्र म्हणजे अक्षरशः एकेक कविताच...

आमच्या करंट्या प्रतिभेला सीमा आहे.. सौंदर्याला नाही. आपली गाडी दिसायला लागल्यापासून दिसेनाशी होइपर्यंत टक लावून मान किंचितही न झुकवता दोन-तीन नर सतत आपल्याकडे बघत असतात. त्या नजरेचं संमोहन जबरदस्त असतं.. खेचलेच जातो आपण.. यालाच रानगारूड म्हणत असावेत का..

आम्हाला झेब्रा माहीती आहे तो, RTO च्या जाहिरातीतला, पण खरा झेब्रा जेव्हा रस्ता ओलांडतो तेव्हा जनजागृती मोहीम, शिट्टी, लाल दिवा कश्शाचीही आवश्यकता नसते. गाड्या आपोआप बंद होतात. नजर थबकते. जिराफ वगैरे भारदस्त मंडळींची तर काय ऐट विचारता, आपला घास खाता खाता मान तिरकी करून असं रोखुन बघतील की आपल्यालाच ओशाळल्यासारखं व्हावं, आणि आपण अनाहुतपणे बोलुन जावं 'चालुदे, चालुदे.. सावकाश'

पण हे सगळं, बघायला ओपन ४*४ असेल तरच खरी गंमत. छत उघडं टाकून, उभं राहुन, मोकळा, भणाणता वारा कान सुन्न होइपर्यंत तोंडावर घ्यायचा. चारीबाजुला नजर फिरवुन, त्या अथांग पिवळ्या कॅनव्हासवर एखादा फटकारा जिकडे दिसेल ती दिशा चक्रधराला ओरडुन सांगायची... की निघाले त्या दिशेने सुसाट.. चांगली गाडी, चांगला चालक आणि चांगली नजर असेल तर सफारीत मजा आहे.. नाहितर थोडं अडचणीचंच काम आहे ते... माझ्या बरोबर एक युरोपियन जोडपं बिचारं छोट्या कारमधुन आलं होतं.. प्रत्येक ठिकाणी हे पोहोचेपर्यंत प्राणी पसार व्हायचे.. प्रत्येक वेळेला हे त्यांच वरातीमागुन घोडं बघुन मलाच दया आली.

सॅव्हाना मधे पाहायचे ते 'बिग फाइव्ह' म्हणजे सींह, हत्ती, चित्ता, बफेलो, आणि गेंडा.. यापैकी हत्ती, बफेलो उदंड दिसले.. गेंड्यानं पण लांबुन दर्शन दिलं.. चित्त्याचा काही योग आला नाही.. आणि वनराजांच काय झालं हे पुढच्या लेखात..

काही प्रकाशचित्रे टाकतोय.. अगदी साधा कॅमेरा नेला होता, पॉइंट अँड शूट... काही फोटो चांगले आले असतील तर ती रानाची जादू, माझी कला नाही.. काही नसतील आले तर ते काव्य मला लक्षांशानेही टिपता आलं नाही हा साधा निष्कर्श.

इथल्या फोटोंचा एक वेगळा संग्रह कलादालनात प्रकाशीत करावा म्हणतो.. म्हणजे अजुन बरेच फोटो टाकता येतील..


गुलमोहर: 

आमच्या करंट्या प्रतिभेला सीमा आहे.. सौंदर्याला नाही.>>> जबरदस्त वाक्य!!!!
फोटोज काय मस्त आहेत आणि शेवटच्या फोटोत दिसतायत ते तुम्ही का?
आजचं वर्णन फार आवडलं Happy

सकाळी भाग -४ वाचून दिवस बरा गेला; आता भाग -५ वाचून झोपच उडाली. हेवा वाटून ! अप्रतिम -तुम्ही पाहिलेलं, लिहीलेलं व कॅमेरात टीपलेलं !!

छान आहे वर्णन. इथले सेरेंगेटी चे मास मायग्रेशन बघायला खास टुर्स निघतात. इथल्या रस्त्याचा काही भाग मसाई मारामधून जातो, आणि झेब्रा, हरणे जिराफ दिसणे नेहमीचेच. चेस इन युअर बॅकयार्ड, अशी जाहीरात करतात. सिंहाच्या बाबतीत काय झाले असेल, त्याची कल्पना करु शकतो !! तरीपण पुढच्या भागाची वाट बघतोय.

मस्त रे.. लहानपणी पाहिलेले बॉर्न फ्री,हतारी सारखे सिनेमे भर्रकन डोक्यात फ्लॅश करून गेले!!
चला.. आता तुझ्या डोळ्यांनी तरी आफ्रिकेचं दर्शन घडतंय .. थँक्स!!

वाव.... हेवा वाटतोय हो तुमचा Happy वर्णनही अगदी मस्तच.. फक्त फारच छोटे लेख येताहेत त्यामुळे.....

फोटो तर अप्रतिम.. फोटो काढणा-या तज्ज्ञांना त्यात त्रूटी दिसतीलही, माहित नाही, पण मला तरी तिथले मुक्तपणे बागडणारे प्राणीच दिसताहेत. देव करो आणि ह्या प्राण्यांना कायमचेच असे बागडायला मिळो.

(जंगलातुन नॅशनल हायवे काढल्यामुळे माणसांना स्वतःची प्रगती होत असल्याचा आभास होतोय तर त्याचवेळेस निसर्गाला आणि त्यात राहणा-या इतर प्राण्यांना मात्र त्रास होतोय. माणसांना होणारा त्रास माणसांना लगेच दिसत नाही कारण माणुस निसर्गाच्या खुप लांब गेलाय, ह्या प्राण्यांसारखा तो निसर्गाच्या कुशीत रमला नाही)