कांगोरी चुकला आणि कावळ्या हुकला!

Submitted by आनंदयात्री on 31 August, 2010 - 12:46

१५ ऑगस्ट! भारताचा स्वातंत्रदिन! मागच्या तब्बल ८ महिन्यांत एकही ट्रेक नाही! तेच तेच रुटीन करून कंटाळलेलो होतो.. खूप म्हणजे खूपच कंटाळा आला होता.. १५ तारखेला एका घरगुती कार्यक्रमाचे निमंत्रण होते. पण तो कार्यक्रम संध्याकाळनंतर असल्यामुळे दिवस मोकळा होता. आदल्या दिवशी १४ तारखेला मी रात्री ७ ते ९ चं लेक्चर घेऊन घरी गेलो. मयूरही त्या दिवशी working होता. पावणेदहा वाजता श्रीकांत आणि सुजय मोहिमेसाठी तयार असल्याची खातरजमा केली आणि (नेहमीप्रमाणे) मी आणि मयूरने किल्ला ठरवला - कांगोरी उर्फ मंगळगड आणि कावळ्या! वरंधा घाट उतरून गेल्यावर कांगोरी आहे आणि वरंधा घाटाच्या सर्वोच्च टोकावर जिथे भज्यांच्या गाड्या उभ्या असतात त्या खिंडीत कावळ्या आहे. खरंतर कावळ्या फोडूनच वरंधा तयार केलेला आहे.

१५ तारखेला सगळे सव्वासहाला जमलो. सुजय (अर्थातच नेहमीप्रमाणे) पावणेसात वाजता आला.. आणि मग तुझे घर सापडत नाही, कुठे खोपचीत राहतोस इ इ आम्हाला पटतील अशी कारणे सांगून गाडीत बसला.. Happy पण येताना आमच्यासाठी सुकामेवा घेऊन आला होता.. म्हणून ते आधीच्या कंसामध्ये लिहिलेलं तुम्ही वाचलं नाही तरी चालेल! Happy

भोर मध्ये नाष्ट्यासाठी थांबलो तेव्हा साडेआठ झाले होते. महाड मार्गाने पुढे निघालो. सगळीकडे बाजूला दऱ्यांमध्ये, झाडांवर, डोंगर-उतारांवर भारताच्या झेंड्यातला केवळ सर्वात खालचा रंग दिसत होता. अतिशय कंटाळवाणा तो वळणावळणाचा रस्ता संपवून अखेरीस कावळ्याच्या पायथ्याशी (भज्यांच्या गाड्यांजवळ) आलो. तिथे एक आजीबाई भेटल्या. त्यांना बिरवाडीला जायचे होते. त्यासाठी त्या ST ची वाट पाहत होत्या. त्यांनी lift मागितली आणि आम्ही दिली. मग पुढचा सगळा प्रवास फक्त त्या बोलत होत्या आणि आम्ही ऐकत होतो (मयूर गाडीही चालवत होता). त्यांच्या मुलाच्या खुनाची करूण कहाणी त्यांनी सगळी ऐकवली. आजी शूर वाटल्या. मग पावसामुळे जंगलं गच्च झाली आहेत, पायवाटा निसरड्या झालेल्या आहेत, नीट जा, असे सगळी मायेची ताकीदही दिली. माझेरीमध्ये आम्ही मंगळगडाच्या फाट्याबद्दल विचारण्यासाठी थांबलो. ज्याला विचारले तो पांढरे कपडे-टोपी घातलेला, गंधधारी मनुष्य या आजींच्या भावकीतला निघाला. त्याने उभ्या हयातीत मंगळगडाचे नाव ऐकले नाही असे म्हणायला लागला. (दूर कुठून पुन्यावरून आलेल्या ह्या कालच्या पोरांना मंगळगड माहित आहे या बातमीने काहीसा हैराण भासला Happy ) मग बोलता बोलता कांगोरीगड माहितेय, पण मंगळगड नाही असं म्हणाल्यावर आम्ही हुश्श केले. कांगोरी हे मंगळगडाचेच दुसरे नाव. मग पुढे निघालो. माझेरीपासून साधारण १० किमी वर ढालकाठी गावाला डाव्या हाताला पिंपळवाडीकडे फाटा जातो. तिथे त्या आजीबाईंना निरोप दिला. तिथून १४ किमी वर पिंपळवाडी वसलेले आहे. पायथ्याला पोचलो तेव्हा साडेअकरा वाजून गेले होते. वेळेचा हिशेब सोपा होता. उशीरात उशीर साडेचार वाजता पिंपळवाडीतून निघायचे होते. कारण कावळ्या चढून उतरायला एक तास पुरेसा होता.

गावातून कांगोरी दिसत नव्हता. गडाच्या वाटांबद्दल नेटवर माहिती मिळाली होती. पण खरं सांगायचं तर अशा वाटांबद्दल भटक्यांना फार विस्ताराने समजावून सांगता येत नाही. कारण तिथे अंतरे फसवी असतात. त्यामुळे, गडाच्या आधीच्या डोंगरावरच्या पठारावर जायचं आहे, तिथून मग डाव्या हाताच्या वाटेने (गड उजव्या हाताला ठेवून) वरच्या दिशेने जात राहणे एवढ्या वाचीव माहितीवर आम्ही निघालो. गावातल्या एका छोट्या मंदिरापाठीमागून वाट आहे. पावसाळ्यात ट्रेक करण्याचा एक तोटा असा की खऱ्या पायवाटा बऱ्याचदा झाकल्या जातात. उरलेल्या गुरांच्या असतात किंवा आपल्याच चालण्यामुळे तयार झालेल्या असतात. चार वर्षांपूर्वी कात्रज-सिंहगड ट्रेकच्या वेळी मी चौदा जणांच्या ग्रुपमध्ये सर्वात शेवटी चालत असताना पुढच्या तेरा जणांच्या पावलांमुळे तयार झालेली गवतातील वाट मला original च वाटली होती. तीन डोंगरांना वळसा घातल्यावर जेव्हा एका दरीच्या तोंडाशी पोचलो तेव्हा कळले की आपण वाट चुकलो आहोत! आणि मग आम्ही अख्खी रात्र त्या रानात हरवलो होतो. Lol त्या ट्रेकला आलेल्यांपैकी कुणी हा लेख (चुकून) वाचत असेल, तर नंतर भटक्या बैलाच्या हल्ल्यामुळे thrilling झालेली ती रात्र त्यांना नक्की आठवेल. अर्थात चार वर्षांपूर्वी त्या जंगलात भटकताना आणि नंतरही अनेकदा पडलेला प्रश्न अजूनही तसाच आहे - सुटी निवांत घालवायची सोडून हा जीवावरचा उपद्व्याप कशासाठी? अर्थात त्याचं उत्तर खूप सोपं आहे आणि ते पटवून देणं खूप अवघड आहे, हे सर्वात चांगलं आहे! Happy असो.

यावेळी चढताना अत्यंत काळजीपूर्वक चढत होतो. प्रत्येक फाट्यावर थांबून, दिशेचा अंदाज घेऊन पुढे निघत होतो. अर्धा-एक तास अशा प्रकारे चालल्यावर अखेर ती अटळ घटका आलीच- वाट न सुचणे. वाट सापडणे आणि वाट सुचणे या दोन गोष्टी वेगळ्या आहेत, हे आता अनुभवांती समजले आहे. आधी वाट सुचते, मग आपण त्या वाटेने जातो आणि मग वाट सापडते! सध्यातरी वाट सुचत नव्हती! अचानक, डोंगराच्या वरच्या अंगाला एका गुराखीबाबांची हाळी ऐकू आली! इतक्या लगेच वाट दाखवणारा भेटला म्हणून आनंद झाला. अर्थात त्यात आश्चर्याचा भाग अधिक होता! त्याने मग आम्ही ज्या वाटेला गेलो असतो, त्याच्या बरोब्बर उलट दिशेच्या वाटेने नेले. २-३ मिनिटांत आम्ही एका पठारावर आलो. सुरुवातीला उल्लेख केलेले पठार ते हेच! ’पावसाळ्यात रान गच होतं, त्यामुळे गडावर कोणी जात नाही. आता असं करा, हीच पायवाट धरा. कुठंही अजिबात सोडू नका. वरच्या त्या डोंगरापाशी डाव्या वाटेला लागा आणि जात रहा, गडावर पोचाल. आणि उतरतानाही या इथल्या खालच्या वाटेने उतरा. सरळ गावात पोहोचाल’-इति गुराखी. मग त्याचे आभार मानून निघालो. त्या पठारावर डोंगराची एक सोंड चढत गेली होती. आम्हाला ती follow करायची होती. साधारण अर्धातास तसे चढल्यावर वाट एका १५-२० फूट उंचीच्या मोठा कातळाजवळ आली. इथून गडाचा बुरुज, तटबंदी स्पष्ट दिसत होती. फक्त दरवाजा (आम्हाला) दिसत नव्हता. इथून दोन वाटा फुटल्या होत्या. डावीकडची - स्पष्ट, गडाला वळसा मारणारी. उजवीकडची - अस्पष्ट, पण सर्वांच्या बोलण्यात, लिखाणात आलेली नेमकी हीच ती वाट होती. इथपर्यंत मयूर आणि श्रीकांतचा पुरता डॉबरमॅन झाला होता. (डॉबरमॅन होणे - दम लागल्यामुळे जीभ बाहेर काढून श्वास घेणे). Lol त्यांनी त्या कातळाच्या पायथ्याला पूर्ण शरणागती पत्करली आणि डोळे मिटून चक्क झोपून गेले.

एव्हाना दोन वाजून गेले होते. अजून गडाचा पत्ता नव्हता. मी आणि सुजय त्या डाव्या वाटेने जमेल तेवढे पुढे जाऊन आलो. तिथून पुढे ती थोड्या अंतरावर कंबरेहून उंच अशा गवतात हरवली होती. अशा प्रकारच्या प्रसंगात वाट शोधण्याचं मयूरचं कौशल्य वादातीत आहे. जिथून वाट असू शकत नाही, नेमकी तिथूनच असलेली वाट त्याला बरोबर दिसते. त्यामुळे मागे येऊन पुन्हा त्याला उठवण्याचे २-३ निष्फळ प्रयत्न केले. पण कौतुकालाही गडी बधला नाही. शेवटी, खालच्या अंगाला येऊन वाट शोधू लागलो. एव्हाना त्या दोघांची झोप वगैरे झाली होती. शुक्रवारी कंपनीतल्या लोकांबरोबर ताम्हिणीमध्ये केलेल्या दंगामस्तीचा शीण मयूरवर अजून टिकून होता. मग पुन्हा वर येऊन त्याच कातळाजवळच्या डाव्या वाटेने मी आणि मयूर वाट शोधत राहिलो. त्या अर्धापाऊण तासात आम्ही आजवरचा सर्व अनुभव वापरला. सरळसोट कातळ तसाच चढत गेलो, पण पन्नाससएक फूट चढाई सोडली, तर फारसं काहीच साध्य झालं नाही. पण ती चढाई मात्र amazing होती. अजिबात वाट सापडत नसतांना कातळ चढून अथवा केवळ झुडुपाला धरून सरळ चढून जाण्याचे प्रकार अनेकवेळा केले आहेत. मागच्या वर्षी कैलासगड उतरतांना ज्या वाटेने उतरलो होतो, ती वाट म्हणजे अजून फक्त १० अंश सरळ असती, तर भिंत म्हणायच्या योग्यतेची होती. ही वाट अशी नव्हतीच, तर केवळ वर चढण्यासाठी वाट सापडेल या आशेवर पायाखाली लपलेली कातळांची रांग होती! पायाखाली, झाडीत दुपारच्या वेळी लांबरूंद काही लपलेलं असू नये, अशी देवाजीची प्रार्थना करत होतो. खाली बसून श्रीकांत आणि सुजय फक्त बघत होते. अखेर खूप वेळ वर चढण्याचा प्रयत्न केल्यावर कांगोरीचा नाद सोडायचे ठरवले. एव्हाना साडेतीन वाजून गेले होते. आता वेळीच उतरायला लागलो नसतो तर कावळ्याही वेळेअभावी राहिला असता. येताना त्या पठारापर्यंत आलो परंतु गुराख्याने सांगितलेल्या वाटेने न उतरता आम्ही चढलो त्याच वाटेने उतरलो आणि चक्क जिथून चढायला सुरूवात केली होती त्याच ठिकाणी परतलो. हा प्रसंग विरळाच!! कारण नेहमी चढण्याची सुरूवात आणि उतरण्याचा शेवट वेगवेगळ्या ठिकाणी होणे हाच आमचा लौकिक आहे! Wink असो.

उतरतांना फार वाईट वाटत होते. सलग दुसऱ्या वर्षी गड सापडला नव्हता. मागच्या वर्षी १६ ऑगस्टलाच कैलासगडाने अशीच हुलकावणी दिली होती. कैलासगडाच्या माथ्यावरच्या सपाटीवर ३-४ वेळा चकरा मारूनही बांधकामाचे अवशेष सापडले नव्हते. बाकी सगळ्या दिशा, खुणा बरोब्बर match होत होत्या. त्यामुळे १५ ऑगस्ट आपल्या ट्रेकसाठी lucky नाहीये असा निष्कर्ष मी आणि मयूरने कांगोरी उतरताना काढला. Wink उतरतांना श्रीकांतला पित्ताचा त्रास व्हायला लागला आणि बऱ्याच उलट्याही झाल्या. वाटेतही गाडी थांबवून तो पोटातल्या असहकाराला तोंडावाटे वाट करून देत होता. या सगळ्या रामायणामध्ये वरंधा गाठायला सव्वासहा वाजले. कावळ्या करायचा ठरवलं असतं तर अजून एक तास गेला असता. मग तो कंटाळवाणा वरंधा ओलांडून भोर, मग जेवण आणि मग पुणे-४५किमी! श्रीकांतच्या उलट्या बघता घरी लवकरात लवकर पोचलो तर बरे असा विचार करून त्या भज्यांच्या गाडीवर शेंगा घेतल्या आणि मुकाट निघालो. उतरतांना उलटीसाठी गाडी थांबवल्यावर कातरवेळेची शोभा बघायला १-२ वेळा खाली उतरलो. पण अंधारात वरंध्यामध्ये गाड्या लुटतात हे ऐकले असल्यामुळे तसले प्रकार पुन्हा केले नाहीत.

निकालाच्या दृष्टीने म्हणाल तर दिवस फुकट गेला होता.. एकही किल्ला झाला नव्हता. उलट जंगलवाटा अजून शोधता येत नाहीत, हीच भावना घेऊन (मी तरी) घरी निघालो होतो. वाटा वाचता येणे असा एक शब्दप्रयोग भटके लोक करत असतात. त्याचा अर्थ आज पक्का समजला होता. जुलै ते सप्टेंबर अशा ओल्या ऋतुमध्ये माहित नसलेल्या वाटांवर अजिबात XXX घालायला जायचं नाही (पाय म्हणायचंय मला, तुम्ही पण ना!! Proud ) हा धडा घेऊन परत येत होतो, ही कमाईच होती! Happy

नचिकेत जोशी (२७/८/२०१०)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किल्ला नाही झाला म्हणून काय्..दिवस झकास झाला ना?
रच्याकने, पुढच्या वेळी यायला आवडेल तुमच्याबरोबर.

शेवटी साधना महत्वाची, साध्य नाही.
वाट चुकण्याचा अनुभव मीपण अनेकवेळा घेतलाय.
पावसाळ्यात सहसा पित्ताचा त्रास होत नाही. पण आवळासुपारी नेहमी असावी जवळ.

मस्त वर्णन.... आणि सगळया smilies चे विनोद तर सहीच...(डॉबरमॅन होणे - दम लागल्यामुळे जीभ बाहेर काढून श्वास घेणे)... पोट धरून हसलो....

एवढी भटकंतीची मेहनत केलीत ना? मग झालं तर ! नाही मिळाला गड तर काही बिघडत नाही, कुठे पळून जात नाही तो. पावसाळ्यानंतर परत जा.

अरे तुम्ही बरोबर गेला होतात की.
नचिकेत कतळकड्यावरून डाविकडची वाट बरोबर गडावर घेऊन जाते. आजिबात कसरत न करता.

गवत मात्र ३-४ फुट उंचीचे असते तिथे त्यामुळे वाटा शोधणे खरच अवघड काम आहे.

सर्वांचे आभार! Happy

आशु, तुमचा blog पाहिला. अट्टल भटके वाटता.. नक्की जाऊ...

सचिन, हो ना राव... GS सुद्धा त्याच वाटेबद्दल म्हणाला होता.. असो.. आम्हाला नाही सापडली वाट.. पण अनुभव भारी होता... Happy