डेझी

Submitted by निबंध on 29 August, 2010 - 00:50

वार सोमवार वेळ दुपारी बारा साडेबाराची. सखी डेझी डेझी म्हणुन ओरडत होती. डेझीला बेसमेंटमध्ये जायला सांगत होती. डेझी जायला तयार नव्ह्ती. शेवटी ती स्वतः दोन-तीन पायर्‍या खाली उतरली. डेझीला बोलावलं ती आत येताच फट्कन बेसमेंटचे दार लावुन घेतलं. 'सखी आज डेझीला ही कैद कशासाठी?' माझं बोलणं न कळाल्यामुळे सखी बुचकळ्यात पडली. तरी उत्तर दिलं. ' आज सूझी येणारे' 'बापरे! डेझी काय कमी पडली म्हणुन आता ही सूजी?' माझं वाक्य पुरं होण्यापूर्वीच सूझी आता आली. अरेच्या! ही तर मानवजातीत मोडणारी. सखीन माझी ओळख करुन दिली. ओळख करुन देताना तिला झालेला आनंद डोळ्यातुन आणि 'व्हाउ' आणि 'आह'च्या उच्चारातुन व्यक्त झाला. मग ती कामाला लागली. कुठतरी सरकारी नौकरी करायची आणि आमच्याकडे पार्टटाइम. आल्टरनेट सोमवारी म्हणजे दोन आठवड्यातुन एकदा. सूझी वयस्कर होती पण फार वयस्कर नव्हती. उंच होती पण फार उंच नव्हती. रोड होती पण फार रोड नव्हती. भराभरा काम करायची पण फार भराभरा नाहि. ती गेली की सखीन डेझीला बेसमेंट मधुन बाहेर काढली. दिडशे वर्ष पारतंत्र्य भोगुन स्वातंत्र्य मिळाल्यावर व्हावा एवढा आनंद डेझीला झाला.
मला वेगळीच काळजी पडली दोन आठवड्यानंतर येणार्‍या सोमवारचं काय? नितीन-मंजू ऑफिसमध्ये, सखी-निबंध शाळेत. घरी माझ्या गळ्यात पडलेली डेझी आणि मी. डेझी माझं ऐकेल का? की मलाच बेसमेंटमध्ये ढकलुन देइल ?
आज कोणता वार? मंगळवार, बुधवार की गुरवार ? कुठला का असेना मला सगळे वार सारखेच. इथं येउन दोन आठवडे होउन गेलेत. दोन पानं सुध्दा लिहिली नाहीत. रोज वही उघडतो. डोळ्यावर चचचचचचचचष्मा चढ्वतो. हे असं का? चष्मा हुडकायला थोडा वेळ लागतो ना. हाती पेन घेतो. पण मेंदुचे दार मात्र उघडता उघडत नाही . कश्याबश्या दोन तीन ओळी खरडायच्या. आवडल्या नाही म्हणुन खोडायच्या. किती दिवस चालणार ही अशी खोडाखोडी? तेवढ्यात डेझीची डरकाळी कानावर आदळते. कपाळावर आठ्या पडतात. कसं समजावुन सांगावं या डेझीला ? तिच्या भुंकण्याचा काही फायदा आहे का? ए.सी चालु, दार खिडक्या बंद. ही आपली उगीच खिडकीच्या काचेतुन कार दिसली की चवताळून भुंकते . कार गेली की कुंइकुंइ करत माझ्याजवळ येते. आता कसल् लिहिणं अन् काय ! डेझीला माझी भाषा कळत नाही मला तिची भाषा कळत नाही. पण आम्ही आमच्या अंतर्मनाची कवाडं उघडुन एकमेकांना समजुन घ्यायचा पुरेपुर प्रयत्न करतो. पण प्रत्येकवेळी पालथ्या घागरीवर पाणी.
'डेझी तुला कसं कळत नाही गं? तुझ्या भुंकण्याचा काही फायदा आहे का? ' मी अगदी कळवळून विचारलं. 'माझ्या भुंकण्याचा फायद्याशी काय संबंध? काहीतरी फायदा व्हावा म्हणुन का भुंकते मी? भुंकण माझं कर्तव्य आहे . फळाची आशा न बाळगता मी माझे कर्तव्य पार पाडते. तुला मात्र त्याची थोडीसुध्दा जाणीव नाही. दिवसातनं ५०-६० वेळा भुंकून भुंकून घसा कोरडा होतो. चकलीचा एखादा तुकडा किंवा घोटभर लेमनेड तरी देतोस का ? ' डेझी.
'डेझी डेझी काय हे? विषय कुठल्या कुठे नेतेस ! तुझं तुला फुड आहे ना ?' 'हो, आहे नं! कडाकडा चावुन खायच्या गारगोटीसारख्या हाडाच्या गोळ्या ! बारा महिने चोवीस काळ एकच खाद्य. तु खाशील फक्त पोळी किंवा भात महिनाभर? ' 'तसं नाही डेझी देवानं आपल्यासाठी वेगवेगळं खाद्य निर्माण केलंय तेच खायला हव.
'स्वधर्मे निधनं श्रेय:'
'पुरेपुरे मला नको संस्कृत शिकवूस. शेजारच्या टॉमीकडे बघ ना, त्याला ब्रेड मिळते, चिकन मिळतं.'
'आधी हे सांग विषय का बदललास?'
'सांगते. आधी एक कार येतेय तिच्यावर भुंकून येते.'
'जा जा. तुला येतं काय भुंकूण्याखेरीज?'
डेझी कारवर भुंकून आली. आरामशीर माझ्या मांडीवर लोळण घेत माझ्या उजव्या पायाचा अंगठा चाटू लागली .
'शी! शी! शी! घाणेरडी कुठली! ' डेझीला खाली ढकलत म्हणालो.
'आहे. मग ? '
'मग काही नाही. आता मला मुळ मुद्यावर येउ दे. मी काहीतरी लिहायला बसलो की तुझे भुंकणे सुरु. 'पाच पाच दहा दहा मिनिटाला भुंकून सारं घर डोक्यावर घेतेस, माझा मुड घालवतेस.'
'मूड ! व्हाऊ ! म्हणजे तुला लिहायला मूड लागतो. नाचता येइना अंग वाकडे ! लिहिता येइना, मूड धडपडे ! मला लागतो का मूड भूंकायला ? '
मी कपाळावर हात मारुन घेतला. डेझीबाई, चुकलो आम्ही!

=============
लेखक :- भाकु

हे ललित माझ्या सासर्‍यांनी लिहिलेले आहे ते इथे मी फक्त टाइप केले आहे. हा माझा लेख नाही याची नोंद घ्यावी.
==============

गुलमोहर: 
शब्दखुणा: