माझा बसप्रवास

Submitted by ज्योति_कामत on 28 August, 2010 - 16:00

तुमच्यापैकी जे मुंबईकर असतील, ते म्हणतील, “हॅः बसचा प्रवास ही काय लिहिण्यासारखी गोष्ट आहे? एकदा विरार फास्ट लोकलने जाऊन दाखवा. पुणेकर म्हणतील, “आमची पी.एम. टी. लै भारी. बसमधून सगळ्या हाडांसहित नीट चढून किंवा उतरून दाखवा.” पण माझ्या मित्रांनो, तुम्ही कधीच आमच्या गोवेकर खाजगी बसमध्ये बसले नसणार. मुंबैहून बदली होऊन आलेल्या साहेबलोकांनीसुद्धा शरणागती लिहून दिल्ये की “तुमच्या गोव्याच्या बसमधून प्रवास करणे हे येरागबाळ्याचे काम नोहे.”

तुम्हाला थोडी पार्श्वभूमी सांगणं आवश्यक आहे नाही का? कारण असं की, तुम्ही गोव्यात येता, २ दिवसांची टूर करता आणि परत जाता. आम्ही नेहमी इथे रहाणारे लोक खाजगी बसवाल्यांच्या तावडीत सापडलेले असतो, कारण सरकारी मालकीच्या कदंबा बस फारच कमी आहेत. त्यात अनेक पुढार्‍यांच्या मालकीच्या बस आहेत, ते येन केन प्रकारेण कदंबाच्या बसेस धड चालूच देत नाहीत! ते असो.

हे खाजगी बसवाले म्हणजे परमेश्वरासारखेच असतात, अवर्णनीय! कंडक्टरने गणवेष घातला पाहिजे वगैरे नियम आहेत, पण ते कागदावरच. तिकिट मागितलंत, तर “कोणत्या झूमधून आलंय हे?” अशा नजरेनं बघतील. उर्मटपणे वागता येणे हे कंडक्टर होण्यासाठीचं एकमेव क्वालिफिकेशन आहे. ड्रायव्हर ही आणखीच वेगळी जमात आहे. “आपण खरे म्हणजे जेट पायलट असायचे” असा काहीतरी त्यांचा गैरसमज असतो. ८०/९० च्या स्पीडने गाडी चालवणे, अचानक ब्रेक मारून उभी करणे इ. गोष्टीत यांची कर्तबगारी दिसते. महाराष्टृ एस. टी. ला “हात दाखवा, गाडी थांबवा” इ. नवीन घोषणांचा अभिमान असेल, पण गोव्यात ही भानगड नाहीच, कारण हात दाखवताच बस थांबतेच, भले 20 फूट आधी थांबलेली का असेना! त्यामुळे, जेव्हा गोव्यात कोकण रेल्वे सुरू झाली तेव्हा सुरूवातीला हात दाखवताच तीपण थांबेल की काय असा बर्‍याच लोकांना संशय होता.

गोव्यातल्या या खाजगी बसमध्ये, “२३ बसणारे, ९ उभे राहाणारे” असा बोर्ड असतो, पण उभे रहाणारे निदान ३५ तरी असलेच पाहिजेत, असा या बसवाल्यांचा समज असतो. बस कितीही भरलेली असली, तरी आणखी थोडी जागा आत आहे असा कंडक्टरचा समज असतो, आणि तो आतल्या सर्वांना “जरा दुसर्‍याच्या आणखी जवळ उभा रहा” असा प्रेमळ आग्रह करत असतो. गोव्यातले लोक बिचारे हाडाचे गरीब. ते शक्यतः भांडणं टाळतात. पण मराठी बाणा माझ्या रक्तात मुरलेला. या बस कंडक्टरला उत्तर देतेच, “काय रे, तुझ्या बहिणीला असंच सांगशील का?” यावर न चुकता, प्रतिउत्तर येतेच, “तुला बसमधून यायला कोणी सांगितलं होतं?”

मंडळी, गोव्यात लोकसंख्येपेक्षा वाहनांची संख्या जास्त आहे, कारण प्रत्येक घरात एक तरी कार असलीच पाहिजे असा अलिखित नियम आहे. अगदी आमच्या बॅंकेतले शिपाईसुद्धा कार बाळगून आहेत. त्याव्यतिरिक्त घरात जेवढे लोक लायसेंस मिळवू शकतात, तेवढ्यांच्या दुचाक्या असल्याच पाहिजेत असा दुसरा नियम आहे. शिवाय शाळेत जाणार्‍या मुलांच्या सायकली असल्याच पाहिजेत, हा जागतिक नियम आहेच. मात्र मला अशी शंका आहे, की या बसवाल्यांच्या जाचाला कंटाळूनच लोक एवढ्या गाड्या बाळगत असावेत. खरा गोंयकार गोव्याच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत स्कूटर/मोटरसायकलने जातो पण बसने जायचं टाळतो, पण मी काही खरी गोवेकर नव्हे, आणि त्यातून निश्चय केलेला, “न धरी चक्र करी मी” आता नोकरीसाठी रोज फोंड्याहून पणजीला जाणे तर भाग आहे. हे अंतर आहे फक्त ३० कि.मी. म्हणजे गाडीने गेलं तर ३५ मिनिटं. पण खाजगी बसला एक ते दीड तास कितीही वेळ लागू शकतो.

म्हणजे असं बघा, मी बसस्टॅंडवर येते. एक बस पणजीला जाणारी उभी असते. कंडक्टर “पणजी, डायरेक पणजी” असं ओरडत असतो. ड्रायव्हर जागच्या जागीच बस पुढे मागे करत असतो. मी बसमध्ये खडकीशेजारची जागा पक़डून एक झोप काढते. हे चित्र १५ मिनिटे असंच रहातं. फक्त मधेच पाठीमागे दुसरी बस आली की दोन्ही कंडक्टरांचं भांडण पेटतं, अगदी हमरीतुमरीवर येऊन. थोड्या वेळात नवीन बसचा कंडक्टरसुद्धा आधीच्या बससाठी प्यासिंजर गोळा करू लागतो! मग बस फुल्ल भरली की पणजीच्या दिशेने रवाना होते. आणखी एक पेश्यालिटी म्हणजे कंडक्टर काही ठराविक ठिकाणी, जसं की रोड जंशन, औद्योगिक वसाहती इ.इ. च्या बस स्टॉपवर बसमधून खाली उतरून प्यासिंजर गोळा करतो! वाटेत थांबत थांबत बस सुशेगाद पणजीला पोचतेदेखील. याला साधारण एक ते सव्वा तास लागतो. आता हे सगळं रोजच घडतं.

पण कधी कधी अगदी रोमहर्षक(!!??) प्रसंग घडतात. गेल्याच आठवड्यातली गोष्ट. मी सकाळी साडेनऊच्या सुमारास बसस्टॅंडवर पोचले. सुरूवातीचे सगळे सोपस्कार पार पडून बस पणजीच्या दिशेने कूर्मगतीने चालू लागली. फोंड्याहून साधारण १० एक किलोमीटर्स अंतरावर कुंडई नावाचं गाव आहे. तिथे दुसर्‍या गावाहून येणार्‍या रस्त्याचं जंक्शन आहे. झालं. आमच्या बसचा कंडक्टर तिथे खाली उतरून प्यासिंजरं शोधू लागला. एकीकडे तोंडाने “पणजी, पणजी” चा गजर सुरू होताच. एवढ्यात त्याची नजर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका माणसाकडे गेली. त्याच्या हातात जिवंत खेकड्यांची माळ होती. कंडक्टरच्या तोंडाला पाणी सुटलं. त्याने ड्रायव्हरबरोबर काहीतरी कानगोष्ट केली, आणि खेकडेवाल्याबरोबर भाव करायला सुरुवात केली. पाचेक मिनिटं झाली, त्यांची बोलणी काही संपेनात. गोव्यात हे भाव करण्याचं प्रकरण् जबरदस्त आहे. देणारा सांगतो,” शंभर”. घेणारा सांगतो, “दहा” शेवटी ३०/४० ला सौदा ठरतो. हे अगदी मोठ्या मोठ्या दिसणार्‍या दुकानांतसुद्धा चालतं. इथे तर काय दोघेही रस्त्यावरचे पटाईत सौदेबाज!

मधेच कंडक्टरसाहेब बाजूला फेरी मारून “पणजी, पणजी” ओरडायचं काम करून आले. परत खेकड्यांचा सौदा सुरू झाला. एव्हाना बसमधे उभे असलेले दुर्दैवी जीव चुळबुळ करू लागले. कोणी दबलेल्या स्वरात कंडक्टरच्या आई माईचा उद्धार करू लागले. मी खिडकीतून बाहेर डोकं काढून, कंसक्टरला विचारण्याचा एक क्षीण प्रयत्न केला, ”बाबा आम्ही अकरा वाजेपर्यंत पोहचू ना?” तो कुठला लक्ष देतोय! मी मनाशी विचार करतेय, ही बस आता इथून निघणार कधी? पणजीला पोचणार कधी? त्यात सध्या पाऊसपाण्याचे दिवस! पणजीला बसस्टॅंडसमोर पाण्याचं हे तळं साचलेलं असणार. त्यामुळे सॉलिड ट्राफिक जाम झालेला असणार. वाहतुक पोलीस त्या जामचा अगदी पक्का मुरांबा करण्याच आपलं काम चोख बजावत असणार. या सगळ्या अडचणीमधून बाहेर पडणं आपल्यासारख्या मर्त्य माणसाला काही शक्य नाही. तेव्हा मला ऑफिसात वेळेवर पोचवण्याची जबाबदारी मी “आकाशातल्या बापावर” सोपवून दिली आणि आपण निदान राहिलेली झोप तरी पुरी करावी अशा उद्देशाने आपले डोळे मिटून घेतले!

गुलमोहर: 

ग्रेट तरी त्यात गोयकार कमी वाटला पणजी हे फार शुद्ध झाले ते पोणजे पोण्जे पाहीजे. कण्ड्क्टर 'वच रे' म्हण्ल्याशिवाय बस नीघत नाही. तो एकाच वेळी ऊभ्यानासुद्धा 'माशे फुड्ल्यान वच' असे सान्गत असतो त्याच वेळी एकदम 'वच रे' असे ओरड्तो.ड्रायवरला कुठ्ले 'वच' कोणासाठी आहे ते कसे समजते कुणासठाऊक. शिवाय शहरान्ची ईन्ग्रजी नावे एक व गोय्न नावे वेगळीच मी दोन वर्षे गोव्यात काढली पोण्जे ला कामाला होतो व राहात होतो Santacruz ला आता santacruz ला गॉय्न मध्ये कालापूर म्हण्तात हे कळायला काही दिवस गेले आणी सुरवतीला कित्येक्दा मला पोण्जे ते कालापूर का Santacruz चालत जावे लागले होते

छान लेख आहे, आवडला....

जेव्हा गोव्यात कोकण रेल्वे सुरू झाली तेव्हा सुरूवातीला हात दाखवताच तीपण थांबेल की काय असा बर्‍याच लोकांना संशय होता>>>>>>> हा अनुभव मी घेतलाय, दोनवेळा, एकदा आपट्याला ट्रेन स्लो झाली होती, आणि एकदा खोपोलीला ट्रेन हात करून थांबली होती

ज्योति, मी गोव्यात ३ वर्षे काढलीत, आणि सगळ्या प्रकारच्या बसेस मधून भरपूर भटकलो आहे. (ज्या बसमधे माझे डोके छताला सारखे आपटत रहायचे, अश्या बसेसमधूनसुद्धा ) मजा यायची. या सगळ्या प्रकाराला गोव्याचा खास सुशेगात पणाचा, सहनशीलतेचा गंध आहे.

मस्तच लिहिलयस Happy
गोंयच्या ग्रेट बससेवेची आठवण करुन दिलीस. 'राव रे' अशी हाक दिल्यानंतर बस थांबलीच पाहिजे. मी फार्मागुडी ते पणजी असा एकेकाळी रोज प्रवास करे त्यावेळी सगळे ड्रायव्हर आणि कंडकटर ओळखीचे झाले होते. अगदी बसच्या नावासकट, तेव्हा बस कितीही भरलेली असली तरी अगदी हमखास प्रवेश मिळे Happy

मध्यंतरी मी गोव्याला गेलो होतो. बसचे प्रवासाचे दर अतिशय कमी आहेत. फक्त तक्रार एकच की सायंकाळी बसेस फिरण्याच्या बंद होतात. असे का? काहीतरी करा बाहेर येणा:या प्रवाशांना नक्कीच याचा फायदा होईल. बाकी लेख मस्त लिहीलाय. गोव्यातील बोली भाषेविषयी सुद्धा छान टिपण्णी आल्या आहेत.

मस्तच लिहीलय. खरे पाहिले तर लोकांना वाटते की साधा बसचा प्रवास तो, त्यात काय विषेश. पण विशेष यातच असते की प्रत्येक दिवस हा काहीतरी नवीन अनूभव, मज्जा आणी आठवणी घेऊन येणारा असतो.