सि...

Submitted by हेरंब ओक on 13 August, 2010 - 01:51

मी जे ट्राय करणार आहे तो प्रॉपर वे आहे का, ती प्रोसेस राईट आहे का, खरंच असं होईल का, झालं तरी मला हवे तसे रिझल्ट्स मिळतील का, काहीतरी विअर्ड होणार नाही ना, हा माझा क्रेझीनेस तर नाही ना असे ब्रेनमधले थाउजंडस ऑफ क्वेश्चन्स फर्मली साईडट्रॅक करून मी माझ्या डेस्कवर बसलो. उजव्या रिस्टवरचं बटन दाबून ब्रेनटॉप ऑन केला. लेफ्टआय व्हयू थोडा अ‍ॅडजस्ट करावा लागला नेहमीप्रमाणेच.. "काही झालं तरी हा लेफ्टव्हयू रिपेअर करायचाच उद्या" गेल्या टेन डेजमध्ये फिफ्टी टाईम्स केलेलं सेल्फप्रॉमिस मी फिफ्टीफर्स्ट टाईम केलं. एव्हाना पूर्ण रूममध्ये एकदम ब्राईट ब्लु लाईट पसरला होता. एकदा लास्ट टाईम यस/नो यस/नो च्या ड्युएलशी फाईट देत देत आईज मिटून घेतले. ऑलमोस्ट टेन मिनिट्स तसाच बसून जरा करेज आल्यावर फायनली ती 'माईंड-चेट'ची स्टिक ड्रॉवरमधून बाहेर काढली आणि रिस्ट-स्टिकला जोडली आणि........ त्यावरचा रेड स्वीच ऑन केला.. ब्रेनमध्ये फ्यु अ‍ॅंटस पळाल्यासारखं वाटलं आधी. नंतर त्या अ‍ॅंटस वाढत गेल्यासारखं वाटलं.. पण कपल ऑफ मिनट्सच.. मग सगळं शांत झालं. नंतर ग्रेट डिफिकल्टीने लक्षात ठेवलेले ते सिक्स वर्ड्स व्हिस्पर केले. "शिरीष आगत्, शिरीष ये, शिरीष आओ." फ्यु मिनिटस काहीच झालं नाही. सम टाईमनंतर अगेन त्या अ‍ॅंटस हलल्यासारखं फील झालं आणि सडनली त्या ब्लु लाईटला कट करत करत एक ग्रीन रे समोरच्या व्हाईट वॉलवर पडला. आधी वॉलवर ग्रीन डॉट दिसला आणि तो हळू हळू मोठा होत गेला. इन्स्ट्रक्शन्सप्रमाणे एक्झॅक्टली यावेळी मी अगेन आईज क्लोज केले. एक्झॅक्टली आफ्टर थ्री अ‍ॅंड हाफ मिनटस आईज ओपन केले आणि डायरेक्ट समोरच्या वॉलकडे बघितलं. एका ओल्डीचा चेहरा वॉलवर दिसत होता. तो खूप टायर्ड वाटत होता. बाल्डी, खूपच विक, आईजखाली डार्क सर्कल्स.. पुअर चॅप. अ‍ॅन ओल्ड पुअर चॅप. आय वॉज नॉट शुअर वेदर ही कुड हेल्पड मी.. बट तरीही मी तसं काही दिसु दिलं नाही. ओल्डी एकटक माझ्याकडे बघत होता.

**

"तू काय डिसाईड केलं आहेस फायनली?"
"कशाबद्दल?"
"यु नो मी कशाबद्दल बोलते आहे ते."
"?"
"ऑफ कोर्स तुझ्या थिसीस बद्दल, डॅम इट."
"आय थिंक मी तुला ऑलरेडी कल्पना दिली आहे. माझा डिसिजन फायनल आहे."
"देन आय होप तुझ्याही हे लक्षात असेल की यु आर ऑल अलोन. ऑल बाय युअरसेल्फ. नोबडी इज ऑन युअर साईड ऑफ द टेबल."
"नो वरीज. आय नो ते कसं हँडल करायचं. आय रिअली नो!!"
"का हा क्रेझीनेस? कशासाठी? यु टू नो की या टॉपीकवर इनफ रिसर्च झालेला आहे. एव्हरीबडी नो द रिझल्ट्स. हाऊ इज युअर सो कॉल्ड रिसर्च इज गॉन्ना चेंज द डॅम हिस्टरी. मला तर नीट आयडियाही नाहीये की तू यावर रिसर्च कसा करणार आहेस. इम्पॉर्टंट ऑफ ऑल थिंग्स, तुला गाईडही मिळणार नाही त्या डॉ. वाँग शु शिवाय इतर कोणी. अ‍ॅंड यु नो ही इज द क्रेझीएस्ट क्रिएचर अलाईव्ह.
"माईंड युअर लँग्वेज.. प्लीज !!"
"सॉरी. पण या क्रेझीनेसपायी तू तुझं करिअर स्पॉइल करू नयेस एवढीच इच्छा आहे."
"डोंट वरी. आय वोन्ट. पण माझा डिसिजन पक्का आहे."
"गुड बाय देन."
"गुड बाय."

**

"गुड मॉर्निंग, डॉ. वाँग शु"
"ओह, नीच, कम ऑन इन"
"नॉट नीच,सर.. नीश"
"या या व्हॉटेव्हर.. ओके लिसन. आय डोंट हॅव मच टाईम. रशिंग फॉर अ लेक्चर. आपलं माईंडफोनवर झालेलं डिस्कशन तुझ्या लक्षात असेलच. हे ते डिव्हाईस, हे त्याचं मॅन्युअल व्हिच आय अ‍ॅम शुअर यु वोन्ट नीड. तरीही जस्ट इन केस... ही इंटरप्रिटर स्टिक. धिस इज मस्ट.. या सगळ्या थिंग्स नीट कनेक्ट झाल्या आणि तू म्हणतोस त्याप्रमाणे 'तो' जर खरोखर एक्झिस्ट करत असेल तर तो नक्की येईलच. तो आला की माझी रिस्पोन्सिबिलिटी संपली. तो आल्यावर काय करायचं, त्याच्याशी काय बोलायचं हे टोटली तुझ्यावर आहे. यावर तुझा मन्थ्स ऑफ स्टडी, रिसर्च डिपेंड आहे.. त्यासाठी नेसेसरी असणारी इन्फर्मेशन त्याच्याकडून कशी एक्स्ट्रॅक्ट करायची, तुझ्या थिसीसमधले इन्फर्मेशन लुपहोल्स फील करण्यासाठी ती कशी युज करायची, अनअ‍ॅन्सर्ड क्वेश्चन्स कसे क्लिअर करून घ्यायचे हे सगळं सगळं अपटू यु आहे. इथे गाईड म्हणून माझं काम संपतं. तुला जे काही करायचं आहे ते कर बट बी क्विक."
"थँक्स अ टन्स डॉक.."
"आय रिपीट, बेटर बी क्विक.. तुझ्याकडे फक्त टू मन्थ्स आहेत.. आय विश यु अ लक दो... कीप इन माईंड युअर थिसीस सबमिशन डेट इज स्टील जून फर्स्ट २५१०.... नॉट २५११... हे हे हे"
"हो सर.. लक्षात आहे."

**

आय वॉज नॉट शुअर वेदर ही कुड हेल्पड मी.. बट तरीही मी तसं काही दिसु दिलं नाही. ओल्डी एकटक माझ्याकडे बघत होता.

"हाय"
".."
"आर यु अ 'शिरीष' ड्युड?"
".."
"कॅन यु हिअर मी?"
"तू कोण आहेस?"
"सॉरी. व्हॉट?"
"हे काय चाललंय?"
"व्हॉट?? ओह शूट !!! वेट.. जस्ट अ सेक.. लेट मी इन्सर्ट दॅट डॅम इंटरप्रिटर स्टिक." एवढी इम्पॉर्टंट थिंग मी कशी विसरलो असा विचार करत मी ती इंटरप्रिटर स्टिक रिस्ट-स्टिकला कनेक्ट केली. फॉर अ मोमेंट ब्रेनमधल्या अ‍ॅंटस पुन्हा हलल्यासारख्या वाटल्या. पण सगळं लगेच नॉर्मलही झालं.
"नमस्कार, हाय.. तुम्ही शिरीष आहात का?"
"अं? हो.. सॉरी माझं डोकं जरा जड झाल्यासारखं वाटतंय."
वॉव. द इंटरप्रिटर स्टिक वॉज इंडीड वर्किंग..
"तुम्हाला त्रास होतोय का?"
"थोडा.. पण आता ठीक आहे. हे सगळं काय आहे नक्की?"
"सांगतो. मला तुमची मदत हवी आहे. खूप महत्वाचं काम आहे माझं तुमच्याकडे."
"मदत? मी काय मदत करणार?"
"सगळं सांगतो. पण त्यापूर्वी एक. तुम्हाला आता माझं बोलणं व्यवस्थित कळतं आहे ना?"
"हो आधीपेक्षा कैक पटींनी उत्तम. आधीचं ते इंग्लिश, चायनीज, उर्दू किंवा अशा अनेक विचित्र भाषांचं मिश्रण वाटत होतं. काहीच कळत नव्हतं."
"सॉरी. हल्ली या सगळ्या भाषा इतक्या मिसळल्या गेल्या आहेत ना एकमेकीत की आपोआपच इंग्लि-चायनीज भाषाच जास्त वापरली जाते. आणि आता मलाही तुमचं बोलणं अगदी नीट कळतंय. तुम्ही बोलताय ती कुठली भाषा आहे नक्की?"
"अरे ही मराठी भाषा आहे. माझी मातृभाषा." त्याचा फेस स्लाईटली शाईन झाल्यासारखा वाटला. "आणि तुझीही बहुतेक."
"ओक्के.. ठीके.. आता मी तुम्हाला पहिल्यापासून सगळं सांगतो. मी नीश उर्फ रजनीश चाफेकर. 'हिस्टरी युनिव्हर्सिटी ऑफ अर्थ' मधून प्राचीन इतिहासावर पीएचडी करतो आहे. त्यासाठी मला तीन प्रबंध सादर करायचे आहेत. पहिल्या दोन प्रबंधांचं काम झालं आहे. त्यासाठी मला भरपूर स्टडी मटेरियल मिळालं, गाईड्सही चांगले लाभले. तिसर्‍या प्रबंधासाठी एक विषय माझ्या डोक्यात होता पहिल्यापासून. डॅडकडून ऐकलं होतं थोडंसं. पण त्याचीही माहिती ऐकीवच. म्हणून बरीच माहिती शोधायचा प्रयत्न केला. बरीच माहिती मिळालीही पण विसंगत. मी या विषयाचा जेवढा अभ्यास केला आहे किंवा जेवढा त्याच्या मुळाशी गेलो आहे त्यानुसार मला ही माहिती अपूर्ण, अर्धवट किंवा एकसुरी वाटली. का त्याची कल्पना नाही. कदाचित मी चूकही असेन पण तरीही. त्यामुळे मी अजुनअजून माहिती शोधत गेलो. असंख्य ग्रंथ धुंडाळले. थोडेफार धागेदोरे हाताशी लागले. या विषयासाठी गाईड म्हणून मदत करायलाही कोणी तयार होईना. सर्वांच्या मते हा एक डेड सब्जेक्ट होता. एक दिवस अचानक मला डॉ. वाँग शुं चं नाव कळलं. फोनवरून त्यांची अपॉइंटमेंट घेऊन मी त्यांना भेटायला जाऊन थडकलो. त्यांना सगळं एक्स्प्लेन केलं. मला काहीही झालं तरी हाच विषय कसा घ्यायचा आहे आणि त्यासाठी मला गाईड कसा मिळत नाहीये हे मी त्यांना सांगितलं. त्यांनीही सगळं ऐकून घेतलं. त्यांच्याकडची या विषयावरची १०-१२ पुस्तकं दिली आणि म्हणाले...
"ही पुस्तकं तू वाचच पण तरीही सांगतो. त्याने विशेष काही फायदा होणार नाही. तुला हवी असलेली माहिती तुला कुठल्याच पुस्तकात मिळणार नाही. जी मिळेल ती अर्धवट, बनावट, निखालस खोटी असेल. त्या माहितीच्या आधारावर जरी तू प्रबंध लिहिलास तरी तो म्हणजे अशा ऐकीव, अर्धवट माहितीवर आधारित असंख्य प्रबंधांमध्ये फक्त एक भर टाकणारा ठरेल. तुला डॉक्टरेट मिळेल पण त्या विषयाला, त्याच्या अवाक्याला अजिबात न्याय मिळणार नाही."
"अशक्य. मी हे करू शकत नाही. तुम्ही चुकीची, अर्धवट माहिती कुठे मिळेल हे सांगितलंत. पण त्याची काहीच आवश्यकता नव्हती. ती मला कुठेही मिळाली असती. मी तुमच्याकडे आलोय ते खास कारणासाठी. ते कारण म्हणजे तुम्ही ही जी खरी माहिती म्हणता आहात ती फक्त तुम्हीच पुरवू शकता असं मला अनेकांकडून कळलं आणि म्हणूनच मी इथपर्यंत आलो. त्या माहितीशिवाय माझ्या प्रबंधाला काहीही अर्थ नाही. मी खोट्या माहितीच्या आधारे प्रबंध लिहिणार नाही. प्लीज मला ती माहिती द्याल का? प्लीज.. प्लीज.."
"माझ्याकडेही ती माहिती नाही."
"काय?? म्हणजे?"
"हो. ती माहिती माझ्याकडेही नाही पण ती कशी मिळवायची याचा उपाय मात्र आहे. तो उपाय मी तुला सांगू शकतो."
"चालेल. तो उपायही चालेल. काय करावं लागेल मला?"
"नीट लक्ष देऊन ऐक. मी तुला जे सांगतो आहे ते तुला चमत्कारिकही वाटू शकतं. पण त्याला इलाज नाही."
"चालेल. चमत्कारिकही चालेल."
"नीट ऐक. सुमारे साडेपाचशे-सहाशे वर्षांपूर्वी त्यावेळच्या आशिया खंडात एक जरा विचित्र वाटणारी अशी पद्धत अस्तित्वात होती. लोक आपल्या मृत झालेल्या नातेवाईकांशी, त्यांच्या आत्म्यांशी संभाषण साधू शकत असत."
"काय? म्हणजे?"
"म्हणून मी तुला आधीच म्हटलं की हे जरा चमत्कारिक वाटेल. असो. तर त्या क्रियेला ते प्लान्चेट म्हणत असत. अनेकांचा त्यावर विश्वास नव्हता. बरेचजण त्याला 'प्लान करून चिट करणे' असंही म्हणत गंमतीने. पण तरीही अनेकांचा त्यावर विश्वास होताच. कालांतराने ती प्रथा बंद पडली. काही वर्षांपूर्वी त्या प्रथेविषयी माहिती देणारं एक पुस्तक अपघातानेच माझ्या हाती लागलं. ते पूर्ण वाचून आपल्यालाही असं काही करता येईल का असं वाटून मी ती पद्धत थोडी मॉडीफाय करून नवीन पद्धत शोधून काढली. ब्रेन-चेट नावाची. काही आत्म्यांना बोलावून मी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा यशस्वी प्रयत्नही केला. इट वर्क्ड.. इट वर्क्स.. !!"
"वॉव !! काय सांगता काय.. !!"
"पण या पद्धतीत दोन छोटे बग्स आहेत ते मला सॉल्व्ह करता आले नाहीत. एक म्हणजे माझ्या या पद्धतीनुसार फक्त ब्लड रिलेशनमधल्या व्यक्तीशीच संपर्क साधता येऊ शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त पाचशे वर्षंच मागे जाता येतं. थोडक्यात पाचशे वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या आणि तुझ्या ब्लड रिलेशन मध्ये असलेल्या कुठल्याही व्यक्तीशी तू ब्रेन-चेट मार्फत संवाद साधू शकतोस. पण अशी विचित्र पद्धत एका पीएचडी थिसीसचा बेस म्हणून वापरणं हे कसं योग्य/अयोग्य आहे याची मला कल्पना नाही. पण तुझा थिसीस लिहिण्यासाठी आवश्यक ती खरी.. लक्षात घे खरी माहिती मात्र या पद्धतीतून नक्कीच मिळेल. अर्थात हा माझा प्रयोग मी कोणालाही सांगितलेला नाही कारण कोणालाच ते पटणार नाही किंवा कोणी त्यावर विश्वासही ठेवणार नाहीत. असा काही प्रयोग मी करणार होतो, केला होता अशी कुणकुण काही लोकांना लागली होती. पण त्या बातम्यांविषयी मी कधीच काहीच भाष्य केलं नाही. त्या बातम्या स्वीकारल्या नाहीत की नाकारल्या नाहीत."
"थँक्स डॉक.. थँक्स अ टन..!!"
"ऑल द बेस्ट, माय बॉय..!"

"पण तू कसला एवढं रिसर्च करतो आहेस? तुझ्या रिसर्चमध्ये मी तुला काय मदत करणार? तुझ्या रिसर्चचा विषय काय आहे? आणि त्या रिसर्चशी माझा कसा आणि काय संबंध?"
"मी तुम्हाला तेच सांगणार होतो..... अं .. व्हॉट शुड आय कॉल यु?"
"आय वुड प्रिफर आजोबा."
"वॉव.. यु नो इंग्लिश?"
"यस. ऑफ कोर्स.. व्हॉट डू यु मिन?? पण तरीही मला मराठीतून बोललेलं जास्त आवडेल."
"ओके आजोबा. तुम्ही म्हणाल तसं. तुम्हाला हवी ती लँग्वेज मी इंटरप्रिटर स्टिकवर सेट करू शकतो." मराठी ऑप्शन सिलेक्ट करता करता मी म्हणालो. "आता मी तुम्हाला माझ्या थिसीसविषयी थोडक्यात सांगतो आणि तुमची मदत कशी होईल तेही सांगतो. माझ्या थिसीसचा विषय आहे 'सिवा, द वॉरियर : लाईफ अ‍ॅंड मिस्टरीज'.. सतराव्या शतकातल्या एका सरदाराबद्दल आहे."
"एक मिनिट. तू छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतो आहेस का?"
"म्म्म्म... यस.. सिवा... सिवा भोसला."
"तू छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलत असशील तर तू तुझ्या थिसीसबद्दल काही ऐकण्यापूर्वी प्रथमदर्शनीच मला त्यात दोन मोठ्या चुका दिसताहेत. एक.. ते सिवा नव्हते. शिवाजी होते. शिवाजी महाराज होते. शिवराय होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते सरदार नव्हते. अभिषिक्त राजा होते. छत्रपती होते. तू तुझ्या थिसीसमध्ये काय लिहावंस हा तुझा प्रश्न आहे पण माझ्याशी बोलताना तरी तुला त्यांचा उल्लेख शिवाजी महाराज असाच करावा लागेल."
"सॉरी आजोबा. माझा त्यांचा अपमान करायचा उद्देश मुळीच नव्हता. किंबहुना तुमच्याकडून अशाच अनेक महत्वाच्या गोष्टींविषयीची माहिती मला हवी आहे जी माझ्या प्रबंधासाठी अत्यावश्यक आहे. मला अनेक प्रश्न पडले आहेत ज्यांची समाधानकारक उत्तरं मिळालेली नाहीत"
"पण मी तुला काय माहिती सांगणार? मी काही इतिहासतज्ज्ञ नाही किंवा संशोधक नाही. मी एक सामान्य माणूस आहे. अरे हो.. आता होतो म्हंटलं पाहिजे नाही का. आणि तू हे मला कुठे घेऊन आला आहेस? कुठलं साल आहे हे?"
"२५१०. आजची तारीख एप्रिल १०"
"काय????? म्हणजे जवळपास साडेचारशेपेक्षाही जास्त वर्षं मी या अशा अवस्थेत आहे तर."
"हो आजोबा. माझ्या या प्रयोगाच्या ५०० वर्षं मागे जाण्याच्या अटीनुसार मी जेव्हा 'चाफेकर ट्री' मध्ये शोध घेतला तेव्हा त्यात मला तुमचं नाव मिळालं. तुमचा कालखंड साधारण ४७५ ते ५२५ वर्षं पूर्वीचा आहे. म्हणूनच या प्रयोगासाठी मी तुमची निवड केली. कारण मला अतिशय ऑथेंटीक, फर्स्ट हँड, मूळ स्वरूपातली, आणि अगदी खरीखरी माहिती हवी होती."
"अरे पण मूळ मुद्दा राहिलाच. मी तुला काय मदत करणार? मी इतिहाससंशोधक नाही."
"आजोबा, मला इतिहाससंशोधकाचं मत नाही तर तेव्हाच्या सामान्य माणसाचं मत हवं होतं. खरं तर मला महाराजांच्या काळात मागे जाता येईल असं काहीतरी करायचं होतं. परंतु या प्रयोगाची लिमिटेशन्स ते करू देत नाहीत. त्यामुळे तुम्ही द्याल ती सगळी माहिती माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. आणि राहिला प्रश्न इतिहास संशोधक असण्याचा. मी इतिहासावरचे इतके संशोधनात्मक ग्रंथ वाचले आहेत की मला त्या बनावट मतांचा तिटकारा आला आहे. म्हणून मला सामान्य माणसाचं मत हवं आहे. त्या दृष्टीने तुम्ही त्या व्याख्येत अगदी चपखल बसता उलट. अर्थात मी तुमच्याविषयीही अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. पण 'शिरीष सदानंद चाफेकर' या तुमच्या नावाव्यतिरिक्त अन्य कुठलीही माहिती माझ्या हाती लागली नाही. पण ते ठीक आहे. विशेष महत्वाचं नाही ते."
"बाप रे. बरीच शोधाशोध केलीस तर तू... बरं. बोल तुला काय माहिती हवी आहे?"
"बरेच प्रश्न आहेत. एकेक करत सांगतो. शिवाजी महाराज फक्त ... म्म्म्म काय बरं ते? एक मिन..." मी माझ्या नोट्समध्ये पीप करून मला हवा असलेला वर्ड फाईंड करायचा ट्राय करायला लागलो. "ओह या.. फक्त मराठ्ठा जातीचे होते तर मग त्यांनी त्यांचे नोकर ब्राह्मण्ण जातीचे कसे ठेवले? त्यांना शिकवणारे शिक्षक ब्राह्मण्ण कसे होते? त्यांचे गुरु ब्राह्मण्ण कसे काय होते? त्यावेळी जातीपातीचं प्रस्थ फार होतं ना. मग त्यांना हे कसं काय शक्य झालं?"
ओल्डी आय मिन आजोबा काहीच बोलत नव्हते.
"आजोबा... ??"
"काय बोलू राजा. चार-पाचशे वर्षं सरली तरी तेच पोकळ आरोप, त्यांना एकाच जातीला बांधण्याचे अपमानास्पद प्रयत्न. छे !!"
आजोबांनी वन्स मोअर एक लॉंग पॉझ घेतला.
"अरे राजे म्हणजे तुम्हाआम्हासारखे जातीपातीच्या क्षुद्र कल्पनांत स्वतःला बांधून घेणारे कोत्या मनाचे नव्हते रे. त्यांनी त्यांचे लोक निवडले ते त्यांच्या जातीवरून नाही... तर त्यांच्या कर्तृत्वावरून. आणि दादोजींना तर स्वतः साक्षात शहाजीराजांनी जिजाऊ आणि शिवाजी राजांबरोबर पाठवलं होतं. मदतनीस म्हणून, माहितगार म्हणून, आधार म्हणून. शिवाजीराजांनी समर्थ रामदासांना गुरुस्थानी मानलं ते ते ब्राह्मण होते म्हणून नव्हे तर समर्थांची तेवढी योग्यता होती म्हणून."
"ह्म्म्म मला याची साधारण कल्पना होती. पण अनेक पुस्तकांत परस्परविरोधी मतं वाचल्याने थोडा संभ्रमात पडलो होतो."
"हम्म्म"
"एका साध्या सेवकाच्या पोटी जन्माला येऊनही आपल्या सरदार घराण्याच्या वडिलांचं नाव लावायला मिळाल्याचा शिवाजीला खूप फायदा झाला ना?"
अचानक माझ्या ब्रेनमध्ये क्रेझी साउंड्स झाल्यासारखे वाटले. ते हळूहळू वाढतच गेले. आजोबांचा फेस एकदम रेडीश झाला होता.
"तू काय बडबडतो आहेस नीश? शुद्धीवर आहेस का? सेवकाच्या पोटी काय? सरदार घराण्याच्या वडिलांचं नाव काय?"
"शिवाजी... आय मिन शिवाजीराजे हे जिजाबाई आणि दादोजी यांच्या ...."
"गप्प बस नीश. हलकट. हरामखोर. शट युअर डॅम फ*ग माउथ अप. यु बास्टर्ड. तू काय मुर्खासारखा बडबडतो आहेस? तुझं डोकं ठिकाणावर आहे का?" आजोबा प्रचंड डिस्टर्ब झाले होते. ही वॉज ऑलमोस्ट स्पिटींग अ फायर.. !! त्यांचा तो अचानक बदललेला मूड पाहून आय वॉज स्टण्ड.
"आजोबा, काय झालं?"
"अरे काय झालं काय? हे खोटं आहे. धादांत खोटं. चुकीचं आहे."
"जस्ट अ मोमेंट, आजोबा" असं म्हणून मी उठलो आणि माझ्या ओल्ड रेफरन्स बुक्सचं कलेक्शन असलेली एक मोठी बॅग घेऊन आलो. माझ्या कलेक्शनमध्ये नंबर ऑफ व्हेरी ओल्ड आणि रेअर अशी बुक्स होती. ती एकेक करत बॅगमधून बाहेर काढून मी आजोबांच्या समोर टाकायला लागलो.
"हे बघा आजोबा..
'सिवा भोसला : द ग्रेट मराठा सोल्जर' बाय 'जॉन टोनीओ'
'सिवा : ब्रेन बिहाईंड मराठा वॉर टेक्निक्स' बाय 'निकोलस टीमसन'
'हाऊ मराठा वॉरियर्स फॉट' बाय 'जिमी हॉकीन्स'
'सिवा स्पिक्स : द ट्रू स्टोरी ऑफ हिंदू किंग' बाय 'खुर्शीद अलीम'
'न्यू डिस्कव्हरीज अबाउट द बर्थ ऑफ सिवा' बाय 'फेनिल व्हिमनी'
'सिवा अगेन : वॉज ही रिअली अ भोसला' बाय पीटर लेन

हे काही ऐतिहासिक ग्रंथ. महाराजांच्या आयुष्यावर लिहिलेले. प्रचंड संशोधन करून, मेहनत करून लिहिलेले. त्या प्रत्येकात शिवजन्माचा उल्लेख तसाच आहे जसा मी तुम्हाला आत्ता सांगितला. तुमच्या दृष्टीने ते चूक असेल पण मला आणि माझ्या आधीच्या निदान दहा पिढ्यांना तरी हाच इतिहास शिकवला गेलाय. आणि ही पुस्तकं निदान दोनशे वर्षं जुनी आहेत. गेल्या शंभर वर्षांत तर शिवाजीमहाराज खरंच एवढे महान होते का?, ते फक्त मराठा जातीसाठीच लढले मग ते पूर्ण हिंदु धर्माचे राजे कसे? ते तर फक्त मराठ्यांचे राजे.... फक्त मराठा जात आणि मराठी लोक राजांना मानतात पण भय्ये, दाक्षिणात्य, पूर्वेच्या राज्यातल्या लोकांच्या दृष्टीने त्यांना एवढं महत्व कुठे आहे? मग ते राष्ट्रपुरुष कसे ते तर फक्त मराठ्यांचे राजे.. महारथी, शूर, धिप्पाड अफझलखानाच्या छावणीत शिरून त्याला ठार करणं शक्य होतं का? ती घटना खरंच तशी घडली आहे का?, लाखोंचं सैन्य पहारा देत असलेल्या लाल महालात जाऊन साक्षात मोगल सम्राटाचा मामा असलेल्या शास्ताखानाची बोटं कापणं शक्य तरी आहे का? आणि तसं असतं तर त्यांनी फक्त बोटंच का कापली, अफझलखानाप्रमाणे शास्ताखानालाही सरळ ठार का केलं नाही? यात नक्कीच काहीतरी काळंबेरं आहे, महान मोगल सम्राट औरंगजेबासारख्या कसलेल्या आणि मुत्सद्दी बादशहाच्या नजरकैदेतून सुटून, लहान मुलाला घेऊन, हजारोंचा कडक पहारा चुकवून पेटार्‍यातून किंवा वेषांतर करून बादशाहाच्या तावडीतून पळून जाणं इतकं सोपं होतं का.. हेही खरं तर अविश्वसनीय आहे असे अनेकानेक प्रश्न उपस्थित केले गेले. अखेरीस जन्मापासूनच इतकी संशयास्पद कारकीर्द असलेल्या राजाला नवीन पिढीच्या इतिहासाच्या पुस्तकात स्थान कशाला, उगाच नवीन पिढीवर चुकीचे संस्कार व्हायला नकोत असं म्हणून त्यांचं नाव पुस्तकातूनच वगळलं गेलं. त्यामुळे आताच्या पिढ्यांना तर शिवाजी भोसले हे नावही माहित नाही. ज्यांना माहित्ये त्यांच्या दृष्टीने हा एक डेड सब्जेक्ट आहे. बोरिंग हिस्टरी.."
"बास कर रे बास कर.. खरंच.. तुझ्या पाया पडतो मी हवं तर. पण माझ्या राजावर हे घाव घालणं बंद कर आता. ऐकवत नाहीये. सहन होत नाहीये !!"
"आजोबा, सॉरी अगेन. मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं फक्त तुमच्या राजांना आजच्या युगाच्या नजरेत काय किंमत आहे हे मला तुम्हाला दाखवायचं होतं. प्लीज रागावू नका. अर्थात यातल्या कित्येक गोष्टी मला मान्य नाहीत. पण त्याला पुरावे नाहीत. जे पुरावे आहेत ते डायरेक्ट/इनडायरेक्टली राजांच्या अस्तित्वावर, पराक्रमावर, शौर्यावर, धैर्यावर, असामान्यत्वावर प्रश्नचिन्हच उमटवतात. पुन्हा सांगतो. मला यातल्या अनेक गोष्टी मान्य नाहीत. मलाही राजांबद्दल आत्मियता आहे, आदर आहे. पण या एवढ्या ढीगभर पुराव्यांमुळे कधीकधी आपोआपच शंका यायला लागते. त्यात पुन्हा त्यांच्यावर होणारे जातीपातींचे आरोप, त्यांच्या जन्माबद्दलचे प्रश्न, त्यांच्या जन्मतारखेबद्दलची अनिश्चितता अशा अनेक गोष्टींमुळे नक्की कशावर विश्वास ठेवावा या संभ्रमात पडायला होतं."
"नाही रे नीश. प्लीज शंका घेऊ नकोस. मी तुला एक गोष्ट सांगतो. साधारण २००० सालच्या आसपास जेम्स लेन नावाच्या अमेरिकन लेखकाने-जो पुढे महान इतिहासतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध पावला- राजांवर एक पुस्तक प्रसिद्ध केलं. 'शिवाजी : हिंदु किंग इन इस्लामिक इंडिया'. त्यात सर्वप्रथम त्याने राजांच्या जन्माबद्दल आक्षेपार्ह विधानं करून खळबळ उडवून दिली. तू वाचलं आहेस ते पुस्तक?"
"हो वाचलं आहे."
"गुड. तर ते विधान करताना त्याने 'असं गंमतीने म्हंटलं जातं' किंवा 'पीपल जोक अबाउट इट नॉटीली' असं लिहिलं होतं."
"एक मिनिट.. पण मी वाचलेल्या पुस्तकात तर मी 'पीपल जोक अबाउट इट नॉटीली' असं कुठेच वाचलं नाही. उलट पूर्ण संशोधन करून ते वाक्य लिहिल्याचं मला तरी वाटलं."
"ह्म्म्म.. वाटलंच मला. मी त्या विषयावर येतोच हळूहळू. तर अर्थातच त्यामागे कुठलाही तर्कशुद्ध अभ्यास, संशोधन, सत्य शोधण्याची/जाणून घेण्याची इच्छा किंवा त्यादृष्टीने केली गेलेली मेहनत नव्हती. फक्त एक खळबळजनक वाक्य टाकून पुस्तकाचा बोलबाला करून पुस्तकाची विक्री वाढवण्याचा एक अमेरिकन प्लान होता. त्यापूर्वीही कित्येक अमेरिकनांनी आपापली आत्मचरित्रं, पुस्तकं खपवताना या मार्गाचा वापर यशस्वीपणे केला होता. पण लेनने ती चूक राजांसारख्या ऐतिहासिक महापुरुषाच्या संदर्भात केली. त्या पुस्तकावरून रणकंदन माजलं. राजांना जातीपातीत अडकवणार्‍या काही ब्रिगेडी संघटनांनी त्याचं निमित्त करून एका महत्वाच्या प्राचीन संशोधनसंस्थेची तोडफोड करून प्रचंड नासधूस केली. अखेरीस सरकारने त्या पुस्तकावर बंदी आणली. बंदीच्या विरोधात न्यायालयात खटला चालू झाला. परंतु सरकारने आपली बाजू अतिशय हलगर्जीपणाने मांडल्याने किंवा अन्य काही कारणांनी सरकार खटला हरलं."
"पण सरकार असं मुद्दाम करेल? का बरं?"
"मुद्दाम केलंच असेल असं नाही परंतु बंदी कायम राहण्यासाठी कुठलेही विशेष प्रयत्न घेऊन खटला लढवला गेला नाही एवढं मात्र नक्की. अरे ज्या लोकांनी शिवाजीराजांची 'शिवाजी म्हणजे एक वाट चुकलेला देशभक्त, एक बंडखोर सरदार किंवा एक लुटारू' अशी संभावना केली त्या लोकांच्या पुढच्या पिढ्यांमधली टाळकी सरकार म्हणून आपल्या शिरावर बसवली गेल्यावर असल्या सरकारांकडून दुसरी अपेक्षा तरी काय ठेवणार? न्यायालयाच्या निर्णयावर दोन्ही बाजूंची अनेक मतं आली. अनेक सुशिक्षित, बुद्धीजीवी, पत्रकार, कलाकार यांना बंदी मान्य नव्हती. त्यांच्या मते कुठल्याही कलाकृती (!!) वर बंदी येता काम नये. बंदी म्हणजे एखाद्याच्या 'फ्रिडम ऑफ एक्स्प्रेशन' वर घाला घालण्यासारखं आहे. अनेक पत्रकारांनी बंदीला विरोध दर्शवला. त्यातल्या निम्म्यांना तर शिवाजी महाराजांच्या अपूर्व लोकोत्तर व्यक्तीमत्वाची धड माहितीही नव्हती पण असे लोक बंदीच्या विरोधात हिरीरीने बोलत होते."
"बरोबरच आहे की ते. कोणी काय बोलावं हे ज्याचं त्याचं मत आहे. त्याचं त्याला स्वातंत्र्य आहे. तुम्हाला एक खूप जुनं पुस्तक माहित्ये का? मला वाटतं तुमच्यावेळीच प्रकाशित झालं होतं ते. 'द दा विंची कोड' नावाचं.. डॅन ब्राऊन नावाच्या लेखकाचं. त्यात तर जिझस ख्राईस्टच्या देवत्वावर आक्षेप घेतले गेले आहेत. त्याच्या पुढच्या पिढीविषयी माहिती दिली आहे. पण त्यावर कधी कोणी बंदी घातली नव्हती. मग लेनच्याच पुस्तकावर बंदी का?"
"हो मला ते पुस्तक माहित आहे. मी वाचलंही होतं ते. पण एक लक्षात घे. या दोन गोष्टींची तुलनाच होऊ शकत नाही. डॅन ब्राऊन हा काही कोणी इतिहासतज्ज्ञ किंवा संशोधक, इतिहासाचा जाणकार नव्हता. ते पुस्तक निव्वळ एक मनोरंजन म्हणून लिहिलं आहे. पण लेनच्या बाबतीत तसं नाही. पुस्तक खपवायचं म्हणून का होईना पण त्याने इतिहासतज्ज्ञ असल्याचा आव आणलेला आहे. याउपर म्हणजे जे अमेरिकेने केलं तो त्यांचा प्रश्न आहे. ते जे करतील ते सरसकट सगळंच योग्य असतंच असं नव्हे आणि त्यामुळे त्यांचं अंधानुकरण केलंच पाहिजे असं काही नाही. असो. विषय तो नाहीये. तर जे लोक बंदीच्या विरुद्ध होते त्यांनाही 'फ्रिडम ऑफ एक्स्प्रेशन' चं महत्व मान्य होतंच परंतु 'फ्रिडम ऑफ एक्स्प्रेशन' जपण्याच्या नादात एखाद्या महापुरुषावर अन्याय होता कामा नये, त्यांची चुकीची प्रतिमा जनमानसात रूढ होता कामा नये एवढंच सर्वांचं म्हणणं होतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लेनने काढलेला राजांच्या जन्माचा निष्कर्ष हा कुठल्याही अभ्यासाविना, संशोधनाविना काढलेला होता. त्याने फक्त गंमतीने काय बोललं जातं एवढंच सांगितलं होतं. हेच वाक्य जर एखाद्या सामान्य माणसाने लिहिलं असतं, बोललं असतं तर त्याला किंचितही किंमत न देता त्या माणसाकडे मुर्ख म्हणून निश्चितच दुर्लक्ष केलं गेलं असतं. पण जेव्हा एखाद्या 'तथाकथित' इतिहासकाराच्या/लेखकाच्या, इतिहासाचा आव आणून एखाद्या ऐतिहासिक महापुरुषावर लिहिल्या गेलेल्या पुस्तकात विनोदाने म्हणून का होईना जर त्या महापुरुषाला उद्देशून अपमानास्पद लिहिलं गेलं तरी त्या पुस्तकाकडे त्यातल्या उल्लेखांकडे कालांतराने इतिहास म्हणूनच बघितलं जातं. पुढे हा मुद्दा खुपच पेटत गेला. लेनने आणि प्रकाशकांनी पुढच्या आवृत्त्यांमध्ये तो उल्लेख वगळण्याचं मान्य केलं. वाद तात्पुरता थांबला. पुढच्या आवृत्त्यांमध्ये उल्लेख वगळले गेले तर नाहीतच उलट 'पीपल जोक अबाउट इट नॉटीली'हे एवढेच शब्द वगळले गेले. पुन्हा वाद पेटवून बंदी घालण्यात ना सरकारला उत्साह होता ना लोकांना. त्यामुळे लेन आणि कंपनीचं फावलं. त्या पुस्तकात जे लिहिलं आहे ते खरं आहे असा समज कालांतराने दृढ होत गेला. थोडक्यात त्याला इतिहास म्हणून मान्यता मिळाली. त्याच्या सत्यासत्यतेची परीक्षा करण्याची कोणालाच गरज वाटली नाही. 'पीपल जोक अबाउट इट नॉटीली' वाली सुरुवातीची आवृत्ती तर केव्हाच गायब झाली होती. उरल्या होत्या त्या या अशा नवीन 'सुधारित' आवृत्त्या.. बघता बघता इतिहास बदलला गेला."
"तरीही दोन प्रश्न उरतातच. एक म्हणजे लेन एवढेच त्याला जाणूनबुजून चुकीची माहिती देणारेही दोषी नाहीत का? लेनने छापायच्या आधीही लोक उघडउघडपणे हे बोलतच असणार म्हणून तर लेनला ते कळलं ना. आणि दुसरा प्रश्न म्हणजे इतिहासाच्या नेहमीच दोन बाजू असतात. जेत्यांची इतिहासाची आवृत्ती आणि पराभूतांची इतिहासाची आवृत्ती यात कायमच तफावत असतेच मग त्यात खरी कुठली आणि खोटी कुठली ते आपण कसं ठरवणार?"
"तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तरं मी आधीच दिलं आहे. "हेच वाक्य जर एखाद्या सामान्य माणसाने लिहिलं असतं, बोललं असतं तर त्याला किंचितही किंमत न देता त्या माणसाकडे मुर्ख म्हणून निश्चितच दुर्लक्ष केलं गेलं असतं." समाजात असे अनेक सडके मेंदू असतातच त्यांच्याकडे दुर्लक्ष करणंच योग्य. पण एखाद्या इतिहासकाराने ती चुकीची विधानं कुठलाही अभ्यास न करता तशीच्या तशी आपल्या पुस्तकांत चिटकवून देणं हे हे सर्वथा गैर आहे. त्यात पुन्हा अजून एक मुद्दा आहेच. लेनला ती चुकीची माहिती खरंच कोणी सांगितली आहे का हे आपल्याला कुठे माहित्ये? तो तसं म्हणाला आणि आपण विश्वास ठेवला. पण प्रत्यक्षात हा त्याच्याच डोक्यातला किडा नसेल कशावरून? पुरावा नाही पण संशयाला नक्कीच वाव आहे नाही का? आणि कुठलंही विधान करताना पुरावे देत नसणार्‍या लेनच्या बाबतीत विधानं करताना पुराव्यांची काय गरज?... आता दुसरा प्रश्न.. इतिहासाच्या बाबतीत तू म्हणतोस ते अगदी खरं आहे. पण कुठल्याही संशोधनाला इतिहास म्हणून मान्यता मिळण्यासाठी त्या अनुषंगाने केलं गेलेलं संशोधन दाखवणं, लोकांना अज्ञात असलेले पुरावे समोर आणणं अपेक्षित असतं. तरच तो इतिहास म्हणून गणला जातो. लेनच्या पुस्तकाच्या बाबतीत यातली कुठलीही गोष्ट संभवत नाही. त्याने कुठलंही संशोधन केलेलं नाही. पण तरीही त्याने इतिहासावर लिखाण केलं आहे त्यामुळे त्याला तथाकथित इतिहासतज्ज्ञ समजून त्याच्या 'जोक अबाउट इट नॉटीली' ला आपण प्रत्यक्ष इतिहास समजून, त्याचं फ्रिडम ऑफ एक्स्प्रेशन जपायला गेलो हा आपला करंटेपणा झाला आणि त्याहीपेक्षा शिवाजीराजांसारख्या महापुरुषाच्या वाट्याला हे यावं याचं वाईट वाटतं."
"ओह ओ.. आता मला एकेका गोष्टीचा उलगडा होतोय आजोबा.. मला वाचल्याचं आठवतंय की लेनच्या पुस्तकातल्या उल्लेखांचा संदर्भ देऊन त्या विधानाच्या आधारावर इतर पुस्तकं निघाली. अनेक तथाकथित इतिहासकारांनी आपापली मतं मांडली. पुन्हा काही वर्षांनी जेम्स लेनचंच अजून एक पुस्तक निघालं. 'हाऊ राईट आय वॉज अबाउट शिवाजी' नावाचं. त्यात त्याने अशाच एका इतिहासतज्ज्ञाच्या पुस्तकातल्या त्याच्या काही मतांचा, काही वाक्यांचा हवाला देऊन त्याने आधीच्या पुस्तकात मांडलेलं मत कसं योग्य होतं हे दाखवून दिलं. जेम्स लेननंतर त्याच्या त्या दोन्ही पुस्तकांचा संदर्भ देऊन त्याच्याच पीटर लेन नावाच्या नातवाने 'सिवा अगेन : वॉज ही रिअली अ भोसला' नावाचं पुस्तक लिहिलं. तेही मी वाचलं आहे."
"हं !!! कठीण प्रसंग आहे रे खरंच. सहन होत नाही.. या अशा पद्धतशीर प्रयत्नांनी लोकांच्या मनात संशय उत्पन्न केले जातात. वारंवार, सतत कानावर पडणारी एखादी खोटी गोष्टही कालांतराने खरी वाटायला लागते. दुसर्‍या महायुद्धात हिटलरच्या सैन्यातील डॉ गोबेल्स याने या पद्धतीचा सर्वोत्तम वापर केला होता. तुझ्यासारख्या इतिहासाच्या विद्यार्थ्याला 'गोबेल्स नीती' म्हणजे काय ते नक्कीच माहित असेल."
"अर्थातच... !"
"त्याच नीतीचा वापर करून हळूहळू शिवजन्मासंबंधीचे प्रश्न जनतेच्या मनात निर्माण केले गेले असावेत. होता होता लोकांचा विश्वास बसायला लागला असणार. या थिल्लर पुस्तकांमधल्या कुठल्याही विधानांना मूळ संशोधनाचा आधार नाही हे लोक विसरले. शिवप्रेमी हळहळले. हळहळत राहिले. इतिहासात हेच शिकवलं गेलं. मूळचा इतिहास बदलला गेला. असंच घडलं असणार. आमच्या वेळीही हे असंच घडलं होतं. आधी एका समाजाला मान्य नाही म्हणून शिवाजीमहाराजांनी अफझुल्ल्याचा कोथळा बाहेर काढल्याचा खराखुरा घडलेला इतिहास इतिहासाच्या पुस्तकांतून वगळला गेला, नंतर एका जातीला मान्य नाही म्हणून शिवाजीमहाराजांच्या गुरूंना जातीपातीच्या गुंत्यात अडकवून त्यांनाही इतिहासाच्या पुस्तकातून हद्दपार केलं गेलं, त्यांच्या नावाचे शासकीय पुरस्कार बंद पाडले गेले आणि तुमची पिढी तर इतकी पुढे गेली की तुम्ही प्रत्यक्ष साक्षात शिवाजी महाराजांनाच इतिहासातून आणि इतिहासाच्या पुस्तकांतून बेदखल केलंत. वा रे !!!! जेव्हा ही जेम्स लेनची मुक्ताफळं आमच्या माथी मारली गेली तेव्हाच खरं तर आमचे डोळे उघडायला हवे होते कारण ती पुढे घडणार्‍या अराजकाची नांदी होती. पण तसं झालं नाही. ही विषवल्ली बघता बघता फोफावणार याची कल्पना असूनही ते रोखण्याच्या दृष्टीने माझ्या पिढीने विशेष काहीच केलं नाही. आम्ही होतो तसेच राहिलो. शांत, स्वस्थ, थंड, निवांत.. पण आता वाईट वाटून घेऊन उपयोग नाही. आता मी काहीही बदलू शकणार नाही.!! हुं !!!

सडनली आजोबा क्वायट झाले. इतक्या वेळ सतत बोलल्याने ते वन्स अगेन टायर्ड वाटायला लागले होते.
"आजोबा !!"
"असो. चालायचंच. पण आता मला निघायला हवं."
अचानक त्यांचा चेहरा किंचित थरथरल्यासारखं वाटायला लागला.
"आजोबा, पुन्हा कधी भेटाल?"
वॉल वरचं पिक्चर एव्हाना गोल फिरत फिरत त्या ग्रीन रे मधून बाहेर पडायला लागलं होतं. तेवढ्यात आजोबांचं साउंड एको झाल्याप्रमाणे आला.
"राजा, आता पुन्हा येईनसं वाटत नाही रे. तुझ्याशी एवढं बोललं, तुला सगळं सांगितलं आता एकदम हलका झालो. बहुतेक यासाठीच इतकी वर्षं भटकत राहिलो होतो. पण आता सुटका झाली. आता चाललो मी. मी सांगितलेलं सगळं नीट लक्षात ठेव. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचव. राजांच्या नावावरचा बट्टा पुसला गेला पाहिजे. तुझ्या पिढीची जवाबदारी आहे ती. वचन दे मला."
"नक्की आजोबा नक्की. मी वचन देतो... मी वचन देतो.. !!!!" एकाएकी आईज टीअर्सनी भरून गेले. कशामुळे ते माझं मलाच कळलं नाही.

--समाप्त

टीप : छत्रपती शिवाजीमहाराजांबद्दलच्या वेळोवेळी झालेल्या आक्षेपार्ह उल्लेखांबद्दल क्षमस्व. ते प्रत्येक वाक्य, प्रत्येक शब्द लिहिताना मला अनंत यातना झाल्या. परंतु वेळीच ही विषवल्ली ठेचली नाही तर भविष्यात किती भयानक प्रसंगांना सामोरं जावं लागेल याचं चित्र रंगवताना तसे उल्लेख येणं अपरिहार्य होतं. त्याबद्दल क्षमस्व. राजे क्षमा करा !!!

गुलमोहर: 

परंतु वेळीच ही विषवल्ली ठेचली नाही तर भविष्यात किती भयानक प्रसंगांना सामोरं जावं लागेल याचं चित्र>>> अगदी तंतोतंत उभं केलंत..

>>आधी एका समाजाला मान्य नाही म्हणून शिवाजीमहाराजांनी अफझुल्ल्याचा कोथळा बाहेर काढल्याचा खराखुरा घडलेला इतिहास इतिहासाच्या पुस्तकांतून वगळला गेला, नंतर एका जातीला मान्य नाही म्हणून शिवाजीमहाराजांच्या गुरूंना जातीपातीच्या गुंत्यात अडकवून त्यांनाही इतिहासाच्या पुस्तकातून हद्दपार केलं गेलं, त्यांच्या नावाचे शासकीय पुरस्कार बंद पाडले गेले

हे तर झालंच आहे. आता दादोजींचा पुतळा लालमहालातून हटवा ही मागणी करताहेत हे हलकट लोक. Angry

>>आणि तुमची पिढी तर इतकी पुढे गेली की तुम्ही प्रत्यक्ष साक्षात शिवाजी महाराजांनाच इतिहासातून आणि इतिहासाच्या पुस्तकांतून बेदखल केलंत.

हे होऊ नये ही इच्छा Sad

छान लिहीलं आहे.

>> अनेक सुशिक्षित, बुद्धीजीवी, पत्रकार, कलाकार
फ्रीडम ऑफ स्पीचच्या आय......
कोणाबद्दल बोलताय विचार करा. औकाद आहे का म्हणाव बोलायची?

आणि ब्रिगेड.... नमस्कार त्याना तर...

चिमुरी, तृष्णा, सोनि, मंदार, हिम्सकूल, निवांत पाटील, ऋयाम, गुड्डु सगळ्यांचे आभार..

भुषण, एकांकिका कधी लिहिली नाहीये आत्तापर्यंत.. प्रयत्न करून बघतो.

अरे! आय्डी बदलला?

छान लिहिल आहे. Happy

आधी मी जाम वैतागले होते वाचताना. इंग्रजी शब्द जरा जास्तच म्हणुन. पण नंतर लिंक लागली.

तु लिहिलस तस व्हायला नको पण आपण (म्हणजे सगळेच) जर आपापल्या मुलांशी चांगल्या मराठीत बोललो नाही, त्यांना मराठी लिहा वाचायला शिकवल नाही तर अस व्हायची शक्यता नाकारता येणार नाही. मुलांना मराठी मधे लिहिलेला इतिहास, साहित्य वाचताच नाही आलं, तर इंग्रजी साहित्य/ इतिहास हाच पर्याय त्यांच्यासमोर असेल. मग तु म्हणतोयस तस पुढच्या १०० वर्षात सुद्धा होऊ शकतं. Sad

रच्याकने तु जो इंटरप्रिटर म्हणतोयस ना, तसाच असावा असा मी इथे जपान मधे आल्यापासुन विचार करतेय. वा!काय धमाल येईल असा खरच तयार झाला तर Happy

भूषण Happy

सावली, बदलला म्हणजे वरिजनल नाव लिहिलं ग..

ते इंग्रजी शब्द लिहिताना मलाच जाम त्रास झाला. परंतु प्रसंग वास्तव वाटावा म्हणून तसं करावं लागलं.

वत्सला, पुन्हा एकदा प्रयत्न करून बघा Happy .. इतक्या इंग्रजी शब्दांची खरंच आवश्यकता होती हे तुम्हालाही पटेल.

लेनला विचारांनी विरोध करा म्हणणार्‍यांनी हे एकदा वाचावे.
अरे जर एखादा सत्याच्या कसोटीवर घासला गेलेला, तत्वनिष्ठ विचार असेल तर ते ठीक आहे. लेनच्या या आचरटपणाला आत्ताच कठोर विरोध केला नाही तर काय होईल याचे भीषण चित्र हेरंबने उभे केले आहे.

संत्या, आभार..
>>ते एकांकिचे मनावर घ्या भाऊ!
प्रयत्न चालू आहे. पण जाम अवघड काम वाटतंय.. बघू..

रच्याकने, म्हणजे रस्त्याच्या कडेने, अर्थात बादवे चा मराठी अवतार..

ashuchamp, आभार.. दुर्दैव म्हणजे हा आचरटपणा आहे हेच अनेकांना मान्य नाही... काय बोलणार यावर? Sad

हेरंबा... विषय मस्त आहे रे... Happy भविष्याची चांगली मांडणी केली आहेस...

ते एकांकिकेचे काही करणार असलास तर कळव रे बाबा... कुवतीप्रमाणे मदत करायची इच्छा नेहमीच असेल... Happy