सचिन आणि चेन्नई

Submitted by फारएण्ड on 15 December, 2008 - 22:10

मराठी माणूस मुंबईपेक्षा चेन्नई मधे जास्त 'कम्फर्टेबल' असेल खरे वाटत नाही ना? रजनीकांत चे ठीक आहे, त्याचा जन्म तिकडेच गेला आहे. पण आपला सर्वात लोकप्रिय मुंबईकर खरा 'दिसतो' तो चेन्नईत.

सचिन तिकडे खेळणार असला की काहीतरी चांगले बघायला मिळणार हे नक्की असते. मद्रास मधल्या त्याच्या पाचही सेन्च्यूरीज जबरदस्त आहेत. १५ वर्षांपूर्वी ज्या इंग्लंडविरुद्ध त्याने पहिली मारली, त्या टीमपैकी आता कोणीच खेळत नाही. पण तेव्हा पाटा पिचवर इतर हजार जण भरपूर रन करायचे त्यात सचिन च्या शतकाचे काय असा प्रश्न पडेल. तर त्याचे महत्त्व म्हणजे टेस्ट खेळायला लागल्यापासून भारता बाहेर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि द आफ्रिका वगैरे ठिकाणी शतके मारल्यावर त्याचे हे पाचवे शतक भारतातील पहिले होते. त्या दौर्‍यातील इतर शतकवीर आणि सचिन यात हा फरक होता.

१९९५ हे वर्ष भारतीय क्रिकेट फॅन्स च्या दृष्टीने सर्वात बोअरिंग वर्ष असेल, फारसे काहीच विशेष आठवत नाही या वर्षातले. न्यू झीलंड विरुद्ध टेस्ट मॅच चेन्नई ला ठेवली होती ती ही जेव्हा तेथे हमखास पाउस पडतो तेव्हा. त्यामुळे त्या टेस्ट मधे ५२ वर सचिन असताना पुढे खेळच झाला नाही.

नंतरची लक्षात आहे ती १९९८ सालची ऑस्ट्रेलियाविरुद्ध ची. वॉर्न मोठा गाजावाजा करत भारतात आला होता, कारण तोपर्यंत सगळ्या टीम्स ना त्याने नेस्तनाबूत केलेले होते. सचिनही १९९६ व ९७ मधे कॅप्टन म्हणून फेल गेल्यावर नुकताच बॅटिंग मधे 'परत येत' होता. दौर्‍यतल्या पहिल्याच मॅच मधे (मुंबई वि. ऑस्ट्रेलिया) सचिन ने वॉर्न ला धू धू धुतला. पण चेन्नईला पहिल्या इनिंग मधे वॉर्न ने त्याला ४ वर काढले. लगेच हाकाटी सुरू झाली की वॉर्न ने आपली खरे शस्त्रे अजून काढली नव्हती म्हणून, नाहीतर त्याला एवढा मारला नसता कोणी. पण ऑस्ट्रेलिया ने घेतलेली ९० रन्स ची आघाडी दुसर्‍या डावात सिद्धू ने आधीच मोडीत काढली (वॉर्न अजूनही सिद्धूला 'मानतो'), पण मॅच अजूनही ओपन होती. त्यानंतर वॉर्न च्या लेगस्पिन ला पुढे येऊन मिडविकेटच्या डोक्यावरून भिरकवणारा सचिन आणि जेथे बॉल जाईल तेथे दिसणारा प्रेक्षकांचा दंगा, आणि मग शतक झाल्यावर एका हातात हेल्मेट आणि दुसर्‍या हातात बॅट उंचावणारा सचिन अजूनही डोळ्यासमोर आहेत. सचिन १५५ वर असताना अझर ने डाव घोषित केला त्याचे एक विशेष कारण होते. त्या मॅचच्या साधारण १० वर्षांपूर्वी बोर्डर ने भारतापुढे मद्रासलाच ३४८ रन्स चे चॅलेंज दिले होते आणि भारताने डेअरिंग चेस केल्यावर शेवटी गडबड होउन ती मॅच 'टाय' झाली होती. तेव्हा "आता तुम्ही ३४८ करून दाखवा" चे चॅलेन्ज जबरी होते. अपेक्षेप्रमाणे आपण जिंकलो व नंतर इडन गार्डन्स ला ही त्यांना हरवून सिरीज ही जिंकलो. १९९८ मधे सचिन इतका फॉर्म मधे होता की त्या २-३ महिन्यांत ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने सगळ्या मॅचेस मिळून हजार एक रन्स केले होते.

पण १९९८ मधे आणखी एक गडबड झाली. केनिया, झिम्बाब्वे वगैरेंविरुद्ध अनेक मॅचेस भारताने खेळल्या आणि सचिन ला नेहमीच खेळायचे असते त्यामुळे आणि कदाचित सचिन शिवाय भारत खेळणे त्यावेळी कोणत्याही क्रिकेट मंडळाला, मैदानावर बघायला येणार्‍या लोकांना आणि स्पॉन्सर्स ना मान्य नसल्याने तो खेळतच राहिला. त्यातून त्याची पाठदुखी आली आणि त्याचा परिणाम त्याच्या पुढच्या मॅचेस वर झाला.

१९९९ जाने. मधली पाक विरुद्धची पहिली टेस्ट त्यातलीच. चौथ्या इनिन्ग मधे भारताला २७१ हव्या असताना पहिले ५ लौकर आउट झाले. ५ आउट झाले असतील तर उरलेला बॅट्समन द्रविड असतो ही मागची काही वर्षे असलेली स्थिती अजून यायची होती. आम्ही ऑफिस मधून जेवायला बाहेर गेलो असताना सचिन अजून आहे कळल्यावर तसेच मित्राच्या घरी जाउन बसलो ठाण मांडून (बॉस नवीन होता, त्याला दुसर्‍या दिवशी कळाले. आधीचा बॉस मॅच च्या दिवशी मी दिसलो तर आश्चर्य व्यक्त करायचा आणि "आमल्या, घरी जा आणि चांगला खेळ" म्हणून सांगायचा. कारण त्या आधी मी एक दोन दा बघितलेल्या मॅचेस आपण जिंकल्या होत्या Happy ). सचिन व मोंगिया जसे भारताला जवळ आणू लागले तशी अक्रम वगैरेंची चरफड दिसू लागली. पण एक शॉट चुकला आणि १७ रन्स हवे असताना सचिन आउट झाला. आणि पुढचे बघून तानाजी पडल्यावर "दोर मी कापलाय" वगैरेच्या आधी कड्याकडे कशी पळापळ झाली असेल त्याची आयडिया आली. सचिन समोर असताना सहज सिक्स मारणारा सुनील जोशी एकदम सगळी बॅटिंग विसरला, बाकीच्यांना तर काहीच झेपत नव्हते. एवढ्या जवळ जाउन १२ रन्स ने हरलेली ही मॅच सचिन कधीही विसरला नाही आणि त्याचे चाहतेही. या मॅच पासून त्याची पाठदुखी मात्र जोरात सुरू झाली आणि पुढे अनेक वर्षे अनेक इतर दुखापतींमुळे त्याच्या खेळावर मर्यादा आल्या. त्यानंतर एकच आठवड्यात दिल्लीला भारताने पाक ला २१२ रन्स नी हरवले, पण हा पराभव त्याने पुसला गेला नाही.

त्यानंतर बरेच काय काय मधे झाले. १९९९ चा वर्ल्ड कप झाला, त्यात मार खाल्यावर अझर ची उचलबांगडी होउन सचिन पुन्हा कॅप्टन झाला, पण ऑस्ट्रेलियात ०-३ ने हरल्यावर त्याने सरळ राजीनामा दिला आणि "दादा" कडे सूत्रे गेली.

इकडे १६ टेस्ट्स सरळ जिंकून नवा विक्रम करणारी स्टीव वॉ ची टीम २००१ ला भारतात आली आणि तिसरी टेस्ट चेन्नई मधे होती. चेन्नई ला दोन्ही टीम्स आल्या, पण तोपर्यंत तो कलकत्त्याचा विजय भारताने मिळवला होता. या सिरीज मधे सचिन मुंबईत चांगला खेळल्यावर (७६, ६५) कलकत्त्याला अपयशी ठरला होता (१० आणि १०). त्यामुळे तो आता तिसर्‍या टेस्ट मधे नक्कीच सेन्चुरी मारणार हे ऑस्ट्रेलियन्स ना माहीत होते आणि त्यांच्या कोचने नंतर सांगितले त्याप्रमाणे त्यांनी मॅचचे प्लॅनिन्ग ते गृहीत धरूनच केले होते. आणि सचिन ने मारलीच. ऑस्ट्रेलियाच्या ३९१ रन्स झाल्यावर सचिन च्या शतकाने आपले ५०१ झाले. त्या 'दिवशीचा' पूर्ण खेळ आम्ही येथे एका मित्राकडे रात्रभर बसून बघितला. एक मिनीट ही कंटाळा आला नाही. मॅकग्राथ त्याला डिवचायचा प्रयत्न करत होता अणि सचिन शांतपणे त्याला करायचे तेच करत होता.

आणि आता ही पाचवी सेन्चुरी चेन्नई मधली. दहा वर्षांपूर्वी पाकविरुद्ध केवळ १२ धावा कमी पडल्याने पूर्ण करायची राहून गेलेली कामगिरी त्याने काल पूर्ण केली. मागच्या वर्षी पाक विरुद्ध चौथ्या डावात नॉट आउट राहून भारताला जिंकून देण्याची कामगिरी त्याने (दिल्लीत) केली आणि आता हे ही केले. ती जानेवारी १९९९ ची मॅच पाहणार्‍यांना आज जुने हिशेब चुकते केल्यासारखे वाटले असेल!

मला वाटते त्या संस्कृत कथेतील हत्तीप्रमाणे सचिन चे आहे. काहींना त्याची फक्त मागच्या मॅचमधली कामगिरी दिसते, काहींना फक्त त्यांनी पाहिलेल्या काही मॅचेस मधली. काहींना तो सुरूवातीचा '4+6 10Dulkar' सचिन आठवतो तर काहींना फक्त तो अपयशी ठरलेल्या मॅचेसच लक्षात राहतात. हे झाले फक्त खेळाबद्दल. जवळजवळ वीस वर्षे खेळून पहिल्या मॅचपासून प्रचंड लोकप्रियता आणि पैसा मिळून त्यातले काहीही डोक्यात न गेलेला आणि कालच्या एवढ्या प्रचंड विजयानंतर ही जे मुंबईत झाले त्याच्या पुढे क्रिकेट नगण्य आहे याची जाणीव ठेवणारा सचिन आपल्याला पूर्णपणे कळणे सध्या अशक्य आहे. आपण फक्त त्याचा खेळ एन्जॉय करायचा!

१९ मार्च २०११
आज सचिन बर्‍याच दिवसांनी चेन्नईला खेळणार आहे. हा वरचा लेख लिहीला तेव्हा त्यात व्हिडीओ नव्हते टाकले त्याची लिन्क खाली देतो आहे.

हा पहिला मार्च १९९८ चा. तेव्हाचा - म्हणजे पाठदुखीच्या आधीचा- सचिन यात ठळकपणे दिसतो. लॉन्ग हॅन्डल, आक्रमकता आणि फटक्यातला "पंच" सर्व काही. त्याकाळात तो आणि संजय मांजरेकर चटकन सारखेच वाटायचे (शॉट मारेपर्यंत Happy ) ते ही आठवते. हा व्हिडीओ साधारण ४:३० पासून पुढे तर जबरी आहे. वॉर्न ने लेग साईड मारा चालू केल्यावर सुरूवातीला बॉल तटवला सचिनने. मग मात्र ही चाल लक्षात आल्यावर एक जो चाबकासारखी बॅट फिरवून अक्षरशः वॉर्न ला फेकून दिलाय प्रेक्षकांत त्याला तोड नाही.

मग ही जाने. १९९९ ची पाक विरूद्धची. सचिन या मॅचनंतर इतक्या खुलेपणाने फटकेबाजी करताना पुढे ३-४ वर्षे दिसला नाही. कारण येथेच त्याची पाठदुखी सुरू झाली. बॅट फिरवताना एक जो तडाखा दिसतो त्याच्या शॉट मधे त्यात पुढे बर्‍याच मर्यादा आल्या. याआधी वर्षभर वन डे मधे बरेच (अनावश्यक) सामने खेळून त्याने १८०० च्या वर रन्स केले होते, आणि टेस्ट्सही बर्‍याच खेळल्या होत्या, बहुधा त्याचाच परिणाम असावा.

माझ्या स्वतःच्या आठवणीप्रमाणे या मॅचनंतर अगदी आत्ता आत्तापर्यंत इतका मोकळेपणाने फटकेबाजी करताना तो फारसा दिसला नव्हता.

ही २००१ मधली ऑस्ट्रेलियाविरूद्धची. त्याच्या फलंदाजीच्या स्टाईलमधे झालेला फरक थोडा दिसेल यात.

आणि ही २००८ ची इंग्लंड वि. या दोन्ही व्हिडीओज मधे फटके मारण्यात आलेल्या मर्यादा सांभाळून केलेली बॅटिंग जाणवते.

पण एक मोठे आश्चर्य म्हणजे टेस्ट्स मधे एवढे करूनही वन डे मधे त्याने फारसे काहीच केलेले नाही चेन्नईला. एकही शतक नाही आणि लक्षात राहण्यासारखी कोणती इनिन्गही नाही. आज विंडीज विरूद्ध तो शतक नं १०० तेथे करून त्याने त्याची भरपाई करावी असे वाटते Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमोल, शब्द न शब्द पटला!
तो बॉस आहे रे.. मनसोक्त खेळु द्या फक्त त्याला..त्याला त्याचा खेळ एन्जॉय करु दिला तर आपली शतपटीने एन्जॉयमेंट होईल Happy

वा फारेंड, छान लिहिलयंस...

मला सहसा मॅचेस लक्षात राहत नाहीत... पण ती १२ रन्स नी हरलेली मॅच मात्र कायमची लक्षात राहिली... ती मॅच हरल्यानंतर सचिन मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी स्टेजवर आला नाही (बहुतेक तो ड्रेसिंग रूमच्याच बाहेर आला नाही) असं काहीतरी मला आठवतंय.....

सुरेख रे सुरेख!!!
>>> जवळजवळ वीस वर्षे खेळून पहिल्या मॅचपासून प्रचंड लोकप्रियता आणि पैसा मिळून त्यातले काहीही डोक्यात न गेलेला आणि कालच्या एवढ्या प्रचंड विजयानंतर ही जे मुंबईत झाले त्याच्या पुढे क्रिकेट नगण्य आहे याची जाणीव ठेवणारा सचिन आपल्याला पूर्णपणे कळणे सध्या अशक्य आहे. आपण फक्त त्याचा खेळ एन्जॉय करायचा!
अगदीच ! एका मित्राची टिप्पणी देत आहे -
So much pressure from media and fans. So loud cries about not seeing the old tendulkar again. So many opinions that he should be dropped. But make no mistake, that man is completely at peace with himself and with the world. That's much much more remarkable than the cricket that he plays.

    ***
    उसके दुश्मन हैं बहुत
    आदमी अच्छा होगा

    फरेंडा, सुरेख रे सुरेख.. (माझा दुसरा अतिशय आवडता खेळाडू, द्रविडचा खेळ मात्र बघवत नाहिये सध्या)..

    सचिनचे सर्वात पहिले कसोटी शतक हे चौथ्या डावात (की तिसर्‍या?) केलेले होते. मनोज प्रभाकरबरोबर त्याने कसोटी सामना वाचवला. त्यानंतर ९९चे ते अतिशय दर्दभरे शतक पाकिस्तानविरुद्ध.. आणि कालचे.. तिनही शतके महान..

    ..

    फरेंडा, मस्तच रे...
    सचिन हा भारतीय क्रिकेटचा अत्त्युच्च आविष्कार आहे. या सगळ्या गोष्टींची पुन्हा उजळणी करुन दिल्याबद्दल मनापासुन धन्यवाद.
    मला पण राहुल द्रविड आवडतो, दुर्दैवाने तो बॅडपॅचमधुन जातोय. पण येइल बाहेर लवकरच आणि पुन्हा वॉल बनेल.

    सस्नेह...

    विशाल.
    ____________________________________________

    http://maagevalunpahataana.blogspot.com

    थोडे विषयाला सोडून पण, विशालने वर म्हटल्याप्रमाणे द्रविड ह्या बॅडपॅचमधून बाहेर येइल असे वाटत नाही. त्याचा ह्यापूर्वी एकच बॅडपॅच आला होता (कलकत्त्याच्या त्या महान सामन्याच्या आधीचे ७-८ कसोटी सामने.. कलकत्त्यातसुद्धा त्याला दुसर्‍या डावात ५व्या क्रमांकावर पाठवले होते.. शतक झाल्यावर द्रविडने प्रेसबॉक्सकडे बॅट दाखवली होती) पण तेव्हा द्रविडचे वय त्याच्या बाजूला होते. द्रविड वयाने सचिनपेक्षा मोठा आहे. मुख्य म्हणजे द्रविडला सिद्ध करुन दाखविण्यासाठी काही रहिले नाही (दोन्ही प्रकारच्या सामन्यात १०००० पेक्षा अधिक धावा, घराबाहेरील सामन्यात घरातील सामन्यांपेक्षा अधिक सरासरी आणि मुख्य म्हणजे भारताबाहेर जिंकुन दिलेले सामने)..

    द्रविड ह्या बॅडपॅच मधून लवकरात लवकर बाहेर पडावा हीच इच्छा...

    अवघड आहे... इतक्या अवघड सिच्युएशन्स ना जशी टिच्चून बॅटिंग केलिये तसंच त्यानी बॅड पॅच विरुद्ध टिच्चून उभा रहायची गरज आहे... पण सध्या तो दुभंगलेला दिसतो...
    बी सी सी आय नी त्याचा 'अ' दर्जा कायम ठेऊन त्याला पाठबळ दिलंय... फॅन्स तर आहेतच.. आता गरज आहे ती त्यानी परत सॉलिड व्हायची...

    कमॉन राहुल... सगळे तुझ्या पाठीशी आहेत... तुझ्या बरोबर आहेत... आत्मविश्वास उंचाव... तू करू शकतोस... आणि करशीलच...
    लढ पठ्ठ्या...
    _______
    लक्ष्य तो... हर हाल में पाना है...!

    जवळजवळ वीस वर्षे खेळून पहिल्या मॅचपासून प्रचंड लोकप्रियता आणि पैसा मिळून त्यातले काहीही डोक्यात न गेलेला आणि कालच्या एवढ्या प्रचंड विजयानंतर ही जे मुंबईत झाले त्याच्या पुढे क्रिकेट नगण्य आहे याची जाणीव ठेवणारा सचिन आपल्याला पूर्णपणे कळणे सध्या अशक्य आहे. आपण फक्त त्याचा खेळ एन्जॉय करायचा!
    >>>>
    १०० मोदक फारेंडा!
    ------------------------------------------
    हवे ते लाभले असूनी निजेची याचना..
    असे मी मोठमोठ्यांचे दिवाळे पाहिले..

    सचिन आपल्याला पूर्णपणे कळणे सध्या अशक्य आहे. आपण फक्त त्याचा खेळ एन्जॉय करायचा >> लै भारी.

    माझ्या बॉसनेतर टिव्हीच आणून ठेवला होता ऑफीसात. आम्ही सर्वजन (फक्त शिल्पा नावाची मूलगी सोडून) ते तिन वर्ष एकत्रच मॅच पाहायचो. त्या बदल्यात इतर दिवशी एक तास जास्त काम करायचे अशी अभिनव कल्पना माझ्या बॉसने लढवली होती. मग ऑफीस बॉय कडून बाहेरून समोसे किंवा कचोर्‍या आणायचा आणि सतत चहा प्यायचा. सहि दिवस होते ते पण.

    वाह.. मस्त लिहिलय एकदम.. !!
    ९६ च्या आणि २००३ च्या वर्ल्ड कप मधल्या सचिन च्या कामगिरी बद्दल पण लिही एकदा... Happy

    आपण फक्त त्याचा खेळ एन्जॉय करायचा! >> चोक्कस !!!

    ९८ चे शारजाह record करून ठेवलय. गेल्या काही वर्षांमधे हातातल्या matches आपण hopelessly घालवल्या कि उपयोगी पडते उतारा म्हणून. Happy

    तेंडल्याने त्याच्या interview मधे म्हटलय कि "I cleared my mind and played on". सेहवागची inning रात्रभर बघत होता बहुधा Happy

    ९६ च्या आणि २००३ च्या वर्ल्ड कप >> ९६ ची आठवण नको अजिबात. मला फक्त Eden Gardens वर match abandon झाल्यावर सुतकी चेहरा करून बसलेले सचिन नि मांजरेकर आठवतात Sad

    अमल्या -- मस्त लिहिलंयस रे .... तू नळीचे दुवे शांतपणे बघतो नंतर.
    (बाय दि वे... तुझ्या जुन्या बॉसला स्पेशल धन्यवाद दे तुझी क्रिकेटची आवड जोपासण्यासाठी आणि 'अमल्या' ह्या नावासाठी!!!)
    च्यायला ... लोक त्याच्या निवृत्तीच्या मागे का लागतात? तो खेळतो तेवढं डोळ्यांत आणि मनात साठवून घ्या ना भौ !!!

    मस्त लिहीलंय रे फारेंड. वाचत रहावं असं.
    मला हे असे इथं हे घडलं वगैरे रेकॉर्ड गेम्स आठवत नाहीत पण शांतपणे खेळत रहाणारा, सोळाव्या वर्षापासूनच मॅच्युअर खेळणारा आणि वागणारा पण खेळानं मोठा होत गेलेला, स्थितप्रज्ञ सचिन भारतीय क्रिकेट सगळ्यात महान खेळाडू आहे असं माझं ठाम मत आहे.

    फारेंड,
    मी फार क्रिकेट बघत नाही पण सचिनला खेळतांना बघीतलय आणि तो खूप मला आवडतो. तू लिहीलेला हा लेख पण आवडला.

    नवीन सदर छन आहे. शुभेच्छा !!

    नवीन सदर छन आहे. शुभेच्छा !!

    सुंदर लिहिलंय फारेंड एकदम. अगदी मनापासून लिहिलंय ना!

    आपण फक्त त्याचा खेळ एन्जॉय करायचा!>>>>>>>>
    सही बोला!!!!!!!!!!!!!!!!!
    लेख मस्त लिहिला आहेस रे. Happy

    मस्त लिहिलंय.. आवडलं एकदम!!

    डिश टी व्ही वर क्रिकेट प्लस नावाच्या प्रोग्राम मध्ये सचिन ते पाकिस्तान विरुद्दचे एम ओ एम का घ्याय्ला आला नव्ह्ता त्याचे कारण सांगितले होते. फक्त १७ धावांसाठी हरल्याचे त्याच्या जिव्हारी लागले होते आणि ड्रेसिन्ग रूम मध्ये तो अश्रू गाळत होता.

    मित्रानो.. मलापण यात भर घालाविशी वाटले म्हणून लिहित आहे...
    मी आणि माझा मित्र किशोर आम्ही हे वाक्य खूपदा वापरले आहे...
    ईग्रंजी मध्ये आहे पण रहावले नाही हे वाचून...

    Sachin should retire now...
    Sachin can not win matches for India...
    Sachin plays only for record...
    blah blah blah...
    Come on people.. 'What is next allegation against GOD?'

    आज सचिन बर्‍याच दिवसांनी चेन्नईला खेळणार आहे. हा वरचा लेख लिहीला तेव्हा त्यात व्हिडीओ नव्हते टाकले त्याची लिन्क वर थोडे वर्णन या लेखात वाढवले आहे.

    चेन्नईला आत्तापर्यंत न केलेले वन डे शतक आज व्हायला हवे.