आज !

Submitted by राफा on 5 August, 2010 - 02:25

'आज'चा दिवस रोज येतो.

पण 'आज' त्याच्यासारखा तोच !

कालच्या 'आज' पेक्षा वेगळा आणि उद्याच्या 'आज'पेक्षाही.

कारण आज ह्या दिवशी तो राजा आहे. उगवतानाच तो आपला स्वभाव दाखवून देतो. येतानाच तो स्वत:चा 'मूड' बनवून येतो. आपल्याला त्याच्या मूड प्रमाणेच वागायला लावतो.. निदान काही वेळ तरी.

कधी सुंदर अतिशय आवडत्या अश्या गाण्याने उठवतो (आपणच लावलेल्या मुझिक सिस्टीमच्या किंवा मोबाईलच्या 'गजरा' ने ) तर कधी काही कारणाने अलार्म झालाच नाही म्हणून धडपडत उठवतो..

अगदी आपल 'रुटीन' असलं तरीही 'आज' त्यात आपले रंग मिसळतो. कधी कधी तर त्याच्याच आजच्या वेगळेपणाचा रंग व्यापून राहतो दिवसभर.. आपलं जणू अस्तित्वच नसतं.

एके दिवशी नेहमीपेक्षा थोडी उशिराच जाग आल्यासारखं वाटतं आणि सरसावून थोडं उठावं तर लक्षात येतं की आज सुट्टी आहे .. आह ! हे 'फिलींग' मुद्दाम ठरवून उशीरा उठण्याने कधीही येत नाही .. मग त्या आनंदात उशीवर पुन्हा डोकं टेकताना आठवतं... काल नाही का, तो सुंदर चित्रपट पाहून आपण किती उशिरा झोपलो. हं चला, म्हणजे 'आज' चा मूड सुखद धकका देण्याचा दिसतोय. त्याच्या पोतडीत दिवसभरासाठी काय काय जमती आहेत ते हळूहळू दाखवेल तो.. छान मैफल जमवेल दिवसभर..

मग पडल्या पडल्या 'नवरे' नावाच्या वेठबिगारांच्या मनात असेच काहीसे प्रगल्भ विचार : आह ! आज सुट्टी ! आता उगाच लहान कारणांवरून चिडचिड करायची नाही आपणही. ते सिलींगवर कोपऱ्यात लहानसं जळमटं दिसतयं.. त्या विषयी नापसंती नकॊ दर्शवायला उठल्या उठल्या. किंबहुना आपणच काढू ते चढून.. शाब्बास ! थोडी साफसफाई, बागकामात बायकोला मदत, व्यायामाला पुन्हा एकदा सुरुवात वगैरे. मग संगीतमय आंघोळ, मग आपणच उत्कृष्ट सा. खिचडी करु. बायकोभी क्या याद रखेगी ! खादाडीची अशी पारंपारिक सुरुवात करून ते पार कुठेतरी एक्झॉटीक डिनर पर्यंत 'आज' चे प्लान्स ! लगे रहो ! आता १० मिनिटात उठायचे !

'बायको' ही जमातही असाच काहीसा विचार करते : जरा नवऱ्याला आरामात उठू देत.. अजून ५ मिनिटानी उठवूच.. मग जरा प्रापंचिक कटकटी सांगण्याऐवजी त्याच्या आवडीच्या विषयावर आपणहून बोलू. म्हणजे फायनान्स, भारतीय क्रिकेट संघ वगैरे.. आपणहून ब्रेकफास्ट करतो म्हणाला तर करु देत. ( नंतर लंच आणि डिनर चांगली होतील त्यामुळे 'कॉम्पनसेट' होईल..) खरचं.. पण 'आज' चा जमलेला मूड सांभाळला पाहिजे, टिकवला पाहिजे. पाच मिनिटे झाली. उठवाव ह्याला आता ! किती वेळ झोपायचं सुट्टी असली तरी..

वगैरे..

ह्या उगवलेल्या सुट्टीच्या 'आज' ने दिलेले शुभसंकेत पाळण्याचा मग सर्वजण प्रयत्न करु लागतात. आणि मग ही साठा उत्तराची कहाणी..

पण ह्या 'आज' चं काही सांगता येत नाही. तो आज असा आहे.. उद्या ?

कधी नव्हे ते सकाळी पाणी गेलं किंवा भलत्याच कुणीतरी चुकून आपल्या दारावरची बेल सकाळी सकाळी कर्कश्य वाजवून आपल्याला उठवलं की समजावं की 'आज' चा मूड काही ठीक नाही. सुरुवातीला तरी त्याच्या कलाकलाने घेतलं पाहिजे. जरा तबियत जमली की मग दोस्ती होईल (बरं, ह्या प्राण्याला आपण 'काल' भेटल्याचं आठवत नाही कधीच.)

कधी कधी 'आज' नुसताच आपला फुरंगटून येतो. परकरी मुलीसारखा. म्हणजे नक्की काय बिनसलेलं असतं कळत नाही. काही नेमकं त्रासदायक, तापदायक अस काही होत नसतं. ज्याकडे बोटं दाखवता येईल अशी नापसंत गोष्टही घडलेली नसते पण तरिही काहीतरी चुकतं असतं.. एकूण 'आज' चं एकदंर लक्ष नाहीये एव्हढं आपल्याला कळत राहतं. 'बात कुछ जमी नही' असं रात्री झोपेपर्यंत वाटत राहतं

कधी कधी 'आज' असतो अगदी कृष्ण धवल.. अगदी शार्प कॉन्ट्रास्ट ! म्हणजे पहिला अर्धा दिवस रखरखीत गेल्यावर उरलेल्या दिवसात आनंदाचे एव्हढे शिडकावे होतात की पहिल्या अर्ध्या दिवसाची आठवणही राहत नाही. अशा 'आज' चं 'दुभंग व्यक्तिमत्व' पाहून आपण चकित होतो.

असे कितीतरी 'आज'...

म्हणजे रात्रीशी भांडून आलेला अगोदरच वैतागलेला 'आज'..

जाता येता दोन्ही वेळा ट्रॅफिकमधे दमवून हवा काढणारा किंवा,

बरेच दिवस राहिलेली बरीच कामं एकाच दिवशी सटासट करून देणारा,

फ्रिज पासून ते गाडी पासून ते ऑनलाईन अकाऊंट पर्यंत सगळ्या 'यंत्रणा' एकाच दिवशी बिघडवणारा,

निरर्थक.. वांझोटा.. ओशट.. डोक्यातून आरपार जाणारा,

अचानक बऱ्याच वर्षांनी गाठी भेटी घडवून आणणारा,

सकाळच्या 'त्या' बीभत्स बातमीचं सावट दिवसभर प्रत्येक गोष्टीवर असणारा,

एकदम 'स्पॉट लाईट'मधे आणणारा आणि दिवसभर कौतुकाचा वर्षाव करणारा,

'प्रिय व्यक्तींचा सहवास लाभेल' किंवा 'प्रसन्नता वाटेल' असे काहीतरी छान छान छापील का होईना 'भविष्य' असणारा

'आज' !

चला 'आज' शी मैत्री करुयात ! 'आज'च्या आज ! Happy

- राफा

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

ए, राफा बर्‍याच दिवसांनी तुझा लेख वाचायला मिळाला. मस्त लिहिलस.

"आज" या शब्दावर किती किती विचार केला आहेस. मस्त वाटलं वाचून.

इस आज पे तो ही कायम है मेरा आनेवाला कल..

बरं, ह्या प्राण्याला आपण 'काल' भेटल्याचं आठवत नाही कधीच.. >> अगदीच. 'काल'चा धसका घेऊन 'आज' ला घाबरत घाबरत अंथरुणातून जागे व्हावे, तर सुखद धक्के बसतात..

मस्त लिहिलंस रे. Happy

राफा, छान लिहिलंय.... ह्या ''आज''च्या पोतडीत काय काय दडलेलं आहे आपल्यासाठी ह्याचा अदमास घ्यायचाही, स्वतःशीच खेळायचा एक थ्रिलिंग खेळ होऊ शकतो! Happy

राफा, मस्तं.

माझा आजचा आज अगदी आत्ता आत्ता पर्यंत बरा होता... हे तुझं वाचल्यावर त्याच्या अंगात आलय Happy