कळसूआईच्या दर्शनाला या रं या

Submitted by आशुचँप on 28 July, 2010 - 08:28

जीप ताकेदला पोहोचली आणि समोरचे दृश्य पाहून धसकलोच. जिथे जिथे जागा मिळेल तिथे लोकांनी आपली वहाने पार्क केली होती आणि अक्षरश लाखोंच्या संख्येने भाविक लोक मंदिराच्या दिशेने चालले होते आणि चालणे सोडा पाऊल ठेवायलाही जागा मिळणार नाही अशी परिस्थिती होती. आता करायचे तरी काय अशा विचारात असतानाचा मागून आलेल्या लोंढ्याने आम्हाला ढकलायला सुरूवात केली आणि पाहता पाहत आणि तिघे तीन दिशांना विभागले गेलो......
http://www.maayboli.com/node/17732
==============================================
पुढे चालू...

जिथे एरवीही अशा गर्दीत हाल होतात तिथे आमच्या अवजड सॅक घेऊन जाताना आमची काय हालत झाली असेल याची कल्पना करू शकता. पावलोपावली आम्हाला ज्यांनी ज्यांनी म्हणून ताकेदला जाण्याचा सल्ला दिला त्यांना मनोमन लाखोल्या वाहत आम्ही तिघे एकमेकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू लागलो. मोबाईल फोन चोरीला जाऊ नये यासाठी ते आणि अन्य मौल्यवान वस्तू याआधीच आम्ही खबरदारी म्हणून सॅकमध्ये नीट पॅक करून ठेवल्या होत्या आणि या रणधुमाळीत सॅक काढून मोबाईल शोधणे ही अशक्यप्राय गोष्ट होती. या यात्रेत हरवलो असतो तर ट्रेकचा बट्ट्याबोळ झालाच असता पण घरी जायचेही वांदे होते. पण केवळ देवाची कृपा म्हणून मला अमेयची हॅट दिसली. गांधी टोप्या आणि मुंडाश्यांच्या गर्दीत छानपैकी उठून दिसत होती.
जीवाच्या कराराने गर्दी कापत मी कसाबसा त्याच्याजवळ पोचलो तर त्याच्याच थोडा पुढे स्वप्नीलपण दिसला. त्या ढकलाढकलीतच आम्ही पुन्हा चुकामुक झाली तर कुठे भेटायचे हे निश्चित करून निश्चिंत मनाने पुढे घुसलो. गर्दी मागून ढकलत असल्याने चालण्याचा प्रश्नच नव्हता, फक्त तोल जाणार नाही आणि मागची माणसे आपल्या सॅकवर भार देणार नाही एवढे पहावे लागत होते.
रेटत रेटत आम्ही त्या कुंडापाशी आलो आणि थोडा मोकळा श्वास घ्यायला फुरसत मिळाली. ज्या कुंडात १२ तीर्थांचे पाणी येते तिथे स्नान करायला इतकी झुंबड उडाली होती की पाणी प्रयत्न करूनही दिसून येत नव्हते.

पण तिथून शेजारच्याच तलावात पोहणाऱ्या मुलांचे फोटो काढण्यावर समाधान मानले.

आमची एकंदर वेषभूषा, सॅक आणि कॅमेरे (एसएलआर) पाहून आम्ही वेगळे असल्याचे कळत होते. त्यातच एकाने कुठूनशान आला म्हणल्यावर मी ठोकून दिले
"च्यानेलकडून आलोय. ताकेदवर डॉक्यूमेंट्री करायचीय. त्याचे फोटो काढून नेतोय,"
असे म्हणल्यावर त्याला एकदम भरते आले.
"चला चला तुमची पुजाऱ्यांशी भेट घालून देतो. ते समंदी माहीती देतील."
"नाही आधी थोडे फोटो काढून होऊदेत. काम पहिले. तुम्हीपण उभे रहा. तुमचा पण फोटो काढतो."
"आसं कसं, थांबा मोठे पुजारी कामात असतील, पण दुसरे कोनी असेल तर मी घेऊन येतो थांबा."
असे म्हणून तो गर्दीत गायब झाला. पण एकदंरीत संभाषणावरून आम्ही कोणतरी बडी मान्स आहोत हे आजूबाजूंच्याना कळले. मग काय सगळ्यांचीच कॅमेरात येण्याची धडपड. आणि त्या ढकलाढकलीत आम्हीच कुंडात पडायची वेळ आली तेव्हा आवरते घेतले आणि जसा रस्ता मिळेल तसा माघारी मोर्चा वळविला.
जाताना मुख्य रस्ता टाळून दुकाने, पाले यांच्यामधून जाणारी वाट पकडली आणि जेव्हा तासाभराने ताकेद फाट्यापाशी आलो तेव्हा घामाने चिंब होऊन गेलो होतो. तिथल्याच एका गावठी दारूच्या दुकानाशेजारी लिमकाच्या बाटल्या दिसल्या. वाहवा म्हणत त्यावर धाड टाकली आणि बाटलीत लिमकाच आहे ना याची खात्री करून घेत घसा ओला केला. (देवाशपथ्थ सांगतो, दुकानात देण्यात येणारे द्रव्य आणि आमच्या हातातील द्रव्य यांचा रंग अगदीच सारखा होता.)
आता संध्याकाळ होत आली होती. तिथून बारीला जाण्याची काहीतरी सोय पहावी लागणार होती. पण तासभर गेला तरी कोणीच तयार होत नव्हते. घोटी ते ताकेद आणि ताकेद ते घोटी असा मीटर सुरू असताना आजच्या सुगीच्या दिवशी कोण बारीला जाणार. शेवटी एकाने बारी फाट्यापर्यंत सोडायचे कबूल केले. भराभर टपावर जाऊन बसलो. (आता आम्हालाही सवय झाली होती. सुरुवातीला थोडा त्रास होतो पण आपण म्हणजे हाडांनी भरलेली एक पिशवी आहोत अशी कल्पना केली म्हणजे बाकीची पोती आपल्याला त्यांच्यात सामावून घेतात. :स्मित:)

फाट्यावरून पुन्हा एका जीपच्या टपावरून बारी गावात पोहोचलो. (हुश्श).

बारी गावाचे पहिलेच दर्शन फार सुरेख झाले. संधीप्रकाशात समोर कळसूबाईचे शिखर चमकत होते, त्याच्या कुशीत वसलेल्या बारी गावातली कौलारू घरे सावलीत गेली होती आणि वातावरणात एक सुखद गारवा आला होता. दिवसभरच्या घामट गर्दीनंतरची ती संध्याकाळ खूपच प्रसन्न भासली.

आता पुन्हा आमच्यासमोर तिढा होता. रात्रीच कळसूबाई चढायचे का मुक्काम करून पहाटे पहाटे असा प्रश्न होता. पण गावात चौकशी केल्यानंतर कळले की रात्री कळसूबाईला जाण्याचा पर्याय फारसा चांगला नाहीये. (गावकऱयांच्या मते रात्रीची जनावरे असतात) अर्थातच त्याला घाबरण्याचे कारण नव्हते पण त्यांनी सुचविलेला दुसरा पर्याय म्हणजे कळसूआईच्या खालच्या मंदिरात मुक्काम करण्याचा प्रस्ताव चांगला होता.
(माहीतीसाठी - कळसूबाई देवीची दोन मंदिरे आहेत. एक शिखरावर आणि दुसरे बरेच खाली. पण बारी गावापासून उंचावर. खालचे मंदिर त्यामानाने प्रशस्त आहे.)
त्यामुळे रात्रीच कळसूबाई चढण्याचा प्रस्ताव २-१ अशा मताने फेटाळला गेला. तरीदेखील खालच्या मंदिरापर्यंत पोचताना हाश हुश झालेच. मग मला सॅकांपाशी बसवून स्वप्नील आणि अमेय पाणी शोधायला निघाले. जवळपास अर्ध्या तासाने उगवले ते उड्या मारतच.
"अरे एक लईच भारी काम झालेय."
"काय?"
"सांगतो चल," म्हणत माझी उत्सुकता वाढवली.
थोडे पुढे जाताच एक झोपडीवजा घर लागले. घराभोवतीचे अंगण छान शेणाने सावरलेले, त्यातच एक लोखंडी खाट टाकलेली आणि बाजूलाच एक मोठा ओंडका जळत होता. ती झोपडी एका महादेव कोळी कुटुंबाची होती आणि पाणी आणायला जात असताना कुटुंबप्रमुखांनी दोघांना पाहिले आणि मुक्काम त्यांच्याइथेच करावा असा छानपैकी आग्रह केला.
"अरे त्यांनी तर सांगितलेय की तुम्ही रात्रीचे जेवण आमच्याबरोबरच करा." इति अमेय.
अरे वा मग काय झकासच, म्हणत आम्ही त्या अंगणात ऐसपैस पसरलो. ते मामा कामानिमित्त मुंबईला रहायला होते आणि आठवड्यातून एखादी चक्कर घरी मारायचे.
"बरका पोरांनो, औदांला मी लई दिसांनी घरी आलोय. म्हणूनशान रात्रीच्याला कोंबडं हाय. चालंल ना तुम्हास्नी?"
खल्लास, अस्सल गावरान कोंबडी आणि तीही अदिवासी पद्धतीने बनविलेली. त्या विचारानेच तोंडाला पाणी सुटले. पण तोंडदेखले आम्ही आपले अहो कशाला आम्ही जेवणाचे सगळे आणलेय. फक्त पाणी द्या आणि स्वयंपाक करतो इथेच. असे म्हणून पाहिले.
पण मामा ऐकेनात.
"खाता ना तुमी, मगं झालं तर."
तेवढ्यात डोक्यात किडा चावला, अरे आज तर महाशिवरात्री, आणि हे तर महादेव कोळी. मग आज उपास करायच्या ऐवजी कोंबडी.
पण म्हणलं जाऊ दे, ही देवाची ईच्छा असेल तर आपण काय करणार.
दरम्यान, त्या मामांचा एक तरूण पुतण्या बाहेर आला. ओळख-पाळख झाली. त्याच्या एकंदर बोलण्यावरून औषध प्राशन झालेले कळत होते. त्यामुळे आमचे संवाद भारीच पातळीवर चालले होते.
आधी त्याने आम्हाला काय काय शिकलाय ते विचारले. आम्ही सांगितले जर्नालिझम, ऍरानॉटीकल इंजिनिअर इ इ.
त्यावर तो उत्तरला, "वा वा म्हणजे सगळे सुशिक्षित आहात तर. मी पण आहे. फार नाही शिकलो पण आपण एकदम भारी बोलू शकतो."
मग त्यावरून गाडी शिक्षणव्यवस्था, बाजारीकरण, कुटुंबव्यवस्था यावर आली.
"आता माझ्याकडे पहा. मी यांचा पुतण्या पण आपण एकदम फ्री आहोत. आमी आतमध्ये ड्रींक्स घेतली. असा मोकळेपणा पाहीजे. नाहीतर काय खरं नाही."
आम्ही आपले हूँ हुँ करत ऐकत बसलो. मध्येच त्याला काय वाटले देव जाणे
"इथे जवळच एक पिकनिक स्पॉट आहे, हरिश्चंद्रगड म्हणून. गेलाय का कधी?"
भगवान, हरिश्चंद्रगड म्हणजे स्वप्नीलचे तिर्थस्थान. तो तिथे आठवडा आठवडा जाऊन राहीलेला. विशेष म्हणजे इंद्रवज्रही त्याने अनुभवलेले. त्यामुळे त्या भव्य गडाला पिकनिक पॉइँट म्हणल्यानंतर आम्हाला स्वप्नीलकडे पाहवेना.
पण त्याने पियेला आदमी आहे करत सोडून दिले. तेवढ्यात यजमानबाईंचा पुकारा आला.
"या रं पोरांनो, बसा ताटावर"
पटापट उठून आत चुलीपाशी जाऊन बसलो. सुदैवाने पुतणे महाराज बाहेरच्या बाहेरच कटले. त्यामुळे आनंद द्विगुणीत झाला. आणि मग चुलीच्या उजेडात भाकरीबरोबर तो तिखटजाळ कोंबडी रस्सा चापला. त्यात मामांनी आम्ही आगदी आग्रह करकरून खायला घातले. शेवटी म्हणजे हात टेकून उठायची पाळी आली. त्या गृहदेवतेला पोटभरून धन्यवाद देत बाहेर आलो तेव्हा छानपैकी थंडी पडली होती. मग पटापट तंबू उभारला. दरम्यान आम्हाला शेकासाठी म्हणून मामांनी अजून एक ओँडका शेकोटीत टाकला.
आहाहा..त्या वातावरणात काय शाही झोप लागली.
बर एवढ्यावरच थांबलं नाही. सकाळी उठल्या उठल्या तोंड खंगाळण्यासाठी चुलवणावर तापवलेले गरम पाणी तयार होते. इतक्या आदरतिथ्याची सवय नसल्याने आपल्याला अगदीच लाजल्यासारखे होते. त्यामुळे नाष्टा करून जाण्याचा आग्रह नम्रपण नाकारत आम्ही कळसूआईच्या दिशेने सुटलो.

सकाळची वेळ असल्याने चढणीचा त्रास झाला नाही आणि भराभर बरेच अंतर चालून गेलो. पण शिड्यांच्या मार्गावर मात्र दमछाक व्हायला सुरूवात झाली.

जितक्या लवकर शिखरावर पोहचू तितके बरे म्हणत पाय ओढत राहीलो. आता आलंच अस म्हणत एकेक पाऊल कष्टाने उचलले पण एका ठराविक मर्यादेनंतर तेही त्राण संपले. तोल जाऊन पडणार असे वाटायला लागले. डोळ्यांसमोर अंधारी आल्यासारखी झाली. एकदम झांझावल्यासारखे झाले. तहानेने जीव व्याकूळ झाला होता आणि पाणी संपत आले होते. वर आता ऊनपण चांगलेच तापले होते. माझी इतकी वाईट अवस्था कोणत्या ट्रेकमध्ये झालेली आठवत नव्हती.
अमेय आणि स्वप्नील तर हाक मारण्याच्या अंतरापलिकडे गेले होते. जवळपास कोणी नाही.
मी तसा देव-बिव फारसा मानत नाही. पण त्यावेळी मनापासून कळसूमातेला प्रार्थना केली. तुझ्या दर्शनाला येऊ दे बाय. आणि एका खुरट्या झुडपाच्या सावलीत अंग टाकून दिले.
किती वेळ गेला आठवत नाही. पण मी दिसत नाही म्हणून अमेय मागे आल्याचे जाणवले. त्याने एक उत्साहवर्धक बातमी आणली होती. थोड्याच पुढे एक विहीर आहे. तिथे छान थंडगार पाणी मिळेल.
अंगातली सगळी ताकद एकवटून उठलो. खरोखरच थोड्या अंतरावर एक विहीर होती आणि त्याचे पाणी निव्वळ थंडगार आणि जीव थंडावला. थोडा वेळ विश्रांती घेऊन कळसूबाईच्या शिखराकडे जाणारा शेवटचा टप्पा पार केल आणि पाहता पाहत आम्ही महाराष्ट्राच्या सर्वोच्च ठिकाणी होतो.

बाजूला पाताळस्पर्शी दरी आणि डावीकडे कुलंग-मदन-अलंग लक्ष वेधून घेत होते.

हा स्वप्नीलचा शंभरावा किल्ला होता. त्यामुळे तो विशेष खुशीत होता. इट वॉज अ पार्टी टाईम.
मग येताना बरोबर आणलेले मुंबई भेळेचे सामान, शेंगदाणा लाडू आणि त्यावर कोकम सरबत असा नामी बेत होता.

मग थोडे फोटोसेशन करून खाली उतरलो.

स्वप्नील आणि अमेय त्यांचा ट्रेक तसाच पुढे चालू ठेवणार होते. त्यांना शुभेच्छा देऊन मी परतीच्या मार्गाला लागलो. एका भल्या माणसाने त्याच्या गाडीतून कल्याणपर्यंत लिफ्ट दिली. आणि मग खचाखच भरलेल्या सह्याद्री एक्प्रेसमध्ये जीवाच्या कराराने घुसलो. बसायला सोडा उभे रहायला पण जागा नव्हती. तसाच संडासच्या दारासमोर अंग चोरून उभा राहीलो. चार दिवसाच्या ट्रेकनंतर असा उभा राहून प्रवास म्हणजे शिक्षा होती.
त्यातच मित्राचा फोन आला.
"कुठे आहेस?"
"मी गाडीत आहे, पुण्याला यायला निघालोय,"
"मी न्यायला येतो तुला, कदाचित रिक्षा मिळणार नाही."
"का काय झाले?"
"अरे वाईट बातमी आहे. पुण्यात स्फोट झालाय, जर्मन बेकरीमध्ये. आठ-दहा जण गेलेत. सगळीकडे टेन्शन आहे."
ती तारीख होती १३ फेब्रुवारी २०१०.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच वर्णन आणि यावेळचे फोटोही छानच. गावातल्या लोकांची माणुसकी अजून शिल्लक आहे हे बघून आपल्याला शरमल्यासारखं होतं नाही?

आम्ही कळसूबाईला सप्टेंबर महिन्यात गेलो होतो. प्रचंड धुकं आणि भन्नाट वारा. आजुबाजूचं काहीही दिसलं नाही. शेवटच्या शिडीच्या आधी एक ताकवाला होता मात्र, त्याचा सॉल्लिड धंदा केला हे वेगळं सांगायला हवं कां? Wink

धन्यवाद आडो.
गावातल्या लोकांची माणुसकी अजून शिल्लक आहे हे बघून आपल्याला शरमल्यासारखं होतं नाही?

खरंय.

छान फोटोज ! मस्त लिहीलयस..

बाकी ते अलंग मदन नि कुलंगच त्रिकुट दिसल की कसबस होतं.. एकदा जावुन आलोय.. पुन्हा पुन्हा जावेसे वाटते तिथे...

छान आहेत फोटो. मी पण त्या घरात पाणी प्यायलेलो आहे. त्या देवळाच्या आवारातून, वरपर्यंत वाट दिसते.
शिड्या नव्याने बसवलेल्या दिसताहेत, आम्ही गेलो होतो, त्यावेळी पार मोडकळीला आल्या होत्या.
अगदी शेवटच्या चढाजवळ, ती विहिर आहे ना अजून. मस्त थंडगार पाणी होते तिला.

मस्त फोटो आणि वृतांत!

परवाच्याच रविवारी आम्ही कळसूबाइ चढून आलो. भन्नाट वारा, जोरदार पाउस आणि हिरवा निसर्ग. ग्रेट अनुभव! मस्त ट्रेक आहे हा. अर्थात खूपच धुके आणि पाउस असल्याने वरती पोहोचल्यावर बाजूचे डोंगर वगैरे काहीच दिसल नाही.

छान लिहीलयं..
सुरुवातीला थोडा त्रास होतो पण आपण म्हणजे हाडांनी भरलेली एक पिशवी आहोत अशी कल्पना केली म्हणजे बाकीची पोती आपल्याला त्यांच्यात सामावून घेतात. >>>>>> Happy

म हा न!

मस्त फोटो - तो कड्यावर बसलेला फोटो एकदम भारी आहे, ते छोटं बाळ पण झकास! सावलीतल्या बारी गावाचा फोटो मस्त आलाय. कुत्र्याला तुमचे सॉक्स हुंगवून जागं करताय काय? Wink जन्मात इथे जाणं कठिणच असणार्‍या माझ्यासारख्यांवर मंदिराचा फोटो टाकून उपकार केले आहेत तुम्ही.

मस्त वृत्तांत - उदा. सुरुवातीला थोडा त्रास होतो पण आपण म्हणजे हाडांनी भरलेली एक पिशवी आहोत अशी कल्पना केली म्हणजे बाकीची पोती आपल्याला त्यांच्यात सामावून घेतात. Happy

१०० किल्ले करणार्‍या स्वप्नीलला तर दंडवत!

रच्याकने, 'विशेष म्हणजे इंद्रवज्रही त्याने अनुभवलेले' म्हणजे काय? बावळट प्रश्न असेल पण मला खरंच माहित नाही. Sad खुलासा कराल का?

आता आम्हालाही सवय झाली होती. सुरुवातीला थोडा त्रास होतो पण आपण म्हणजे हाडांनी भरलेली एक पिशवी आहोत अशी कल्पना केली म्हणजे बाकीची पोती आपल्याला त्यांच्यात सामावून घेतात
>>:D

छान लिहिलय..

स्वप्ना, माझ्या बुद्धीप्रमाणे तुझ्या प्रश्नाला उत्तर देते (जाणकारांनी खुलासा करावा), इंद्रवज्र म्हणजे इंद्रधनुष्य पण ते पूर्ण गोलाकार दिसतं.

छान आहे वृत्तांत आणि फोटोजही!
गावकर्‍यांचे फोटोतले चेहरे कसले जिवंत दिसतात! त्या बाळाचा फोटो, कुत्र्याला मोजे हुंगवण्याचा फोटो, सर्वांच्या पायांचा फोटो, बारीतल्या कुंडाजवळच्या गर्दीचा फोटो वगैरे खासच! Wink

धन्यवाद मंडळी...
यो - माझापण तो ड्रीम ट्रेक आहे. पुन्हा कधी जाणार असशील तर सांग. मला जाण्याची प्रचंड इच्छा आहे.
दिनेशदा - त्या विहीरीचे अनंत उपकार आहेत माझ्यावर. तिथे विहीर नसती तर अवघड होते माझे पुन्हा खाली येणे.
माया, सुकि, नानबा, हबा, अकु तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद

स्वप्ना - इंद्रवज्र हा एक अदभुत चमक्तार आहे निसर्गातला. पावसाळ्याच्या सुरूवातीला ज्यावळी आपण उंचावर असू आणि ढग खालती असतील अशा वेळी ते दिसण्याची शक्यता असते. (शंभरात एकदा) त्यावेळी आपल्याला पूर्ण वर्तुळाकृती इंद्रधनुष्य दिसते. आणि विशेष म्हणजे ढगांवर आपली सावली आणि त्याभोवती इंद्रवज्र असा अद्भूत प्रकार असतो.
मला आता नक्की आठवत नाही पण बहुदा इंग्लिश कर्नल स्पाईक्स (चूभूदेघे) याने ते कळसूबाईवर पाहिल्याची नोंद केली आहे. गोनीदांनीही त्याचे वर्णन केले आहे.
स्वप्नील इतका भाग्यवान कि त्याला फोटो मिळालाय त्या इंद्रवज्रचा.

आहाहा.... कसला भारी ट्रेक झाला होता...
आशुदादा,फार चान शब्दात वर्णन केल आहेस..
सगळ्या आठवणी ताज्या झाल्या... धन्यवाद!

(परत अलंग, मदन आणि कुलंगच दर्शन झाल, राहवत नाहीये आता फार दिवस, लवकरात लवकर योग यावा हि कलसुबाई चरणी प्रार्थना.........)

चॅम्प वर्णन मस्तच Happy

परवाच्याच रविवारी आम्ही कळसूबाइ चढून आलो. भन्नाट वारा, जोरदार पाउस आणि हिरवा निसर्ग. ग्रेट अनुभव! मस्त ट्रेक आहे हा. अर्थात खूपच धुके आणि पाउस असल्याने वरती पोहोचल्यावर बाजूचे डोंगर वगैरे काहीच दिसल नाही. >>> अगदी अगदी...
KGD1 050.jpg

स्वप्नील इतका भाग्यवान कि त्याला फोटो मिळालाय त्या इंद्रवज्रचा.>>> फोटो टाक की राव...

आम्ही पण इंद्रवज्र दिसतं म्हणून जुलै मधे गेलो होतो... पण ऐव्हढ्यावरच समाधान मानाव लागलं...
KGD1 030.jpg

इंद्रा- मस्त फोटो. अजून फोटोची लींक पाठवशील का.
अरे तो इंद्रवज्रचा फोटो फार रेअर आहे. त्यामुळे तो कोणाला देत नाही. अशी पब्लिक फोरमवर तर नक्कीच टाकणार नाही.
http://www.raanvata.com/
या साईटवर छोट्या साईजमध्ये आहे. तो पहाता येईल.

कालच मायबोली वर आलो. आल्या-आल्या पहिले दुर्गभ्रमंती किंवा भटकंतीवर काही लिखाण आहे का शोधले... आपण सापडलात.. Happy फोटो उत्तम आहेत.

स्वप्नील पवार याची ठाण्यात हल्लीच भेट झाली. आम्ही गेले २ वर्ष एकत्र ट्रेक करायचा प्लान अजून करतोच आहोत... Happy बघुया कधी शक्य होतंय... !!! भेटत राहूच..

भटक्या धन्यवाद...
तुझा ब्लॉग पाहीला..झकास आहे...पुढचा कुठला ट्रेक असेल तर मला सांग...
तुझे एक वाक्य मला फार आवडले...
आम्ही एकदम निवांतपणे ट्रेक करतो..
बास, मलाही असाच ट्रेक करायाला आवडतो.

स्वप्नीलबरोबर मी तीन ट्रेक केलेत. हरिष, कळसूबाई आणि कोयना भटकंती. पुढच्या ट्रेकचा योग अजून आलेला नाही. बघु आपण सगळेच जाऊ कधी एकत्र.

भारी...

btw, अरे महाराजा, त्या कड्याच्या टोकावर अजून थोडिशी पुढे जागा होती की बसायला... कशाला एवढ्या मागे बसलात??? Proud

आशु बाळा झोप्लेल्याला त्रास देऊ नये.
बर सांग , मोजाच्या वासाने कुत्रा बेशुध्द पडला कि बेशुध्द कुत्र्याला मोजाच्या वासाने जाग॑ करताय?:)

Pages