मुंगळा, माशी आणि माकड

Submitted by अरुण मनोहर on 10 July, 2010 - 23:02

मुंगळा, माशी आणि माकड
एका झाडावर उंच ठीकाणी मधाचे एक पोळे होते. त्यातून अधुनमधून मधाचे थेंब, पोळ्याचे छोटे तुकडे खाली पडत होते. झाडाखाली एक मुंगळा ते गोळा करून हळुहळू एका ओंडक्याखाली नेऊन ठेवत होता. प्रत्येक खेपेला थोडा थोडा करून असा बराच मध त्याने ओंडक्याखाली जमवला होता. त्याचे कार्य अगदी शांतपणे आणि नेटाने सुरू होते. एक आळशी माशी त्याचा हा उद्योग पाहून तिकडे आकर्षित झाली. मुंगळ्याच्या प्रत्येक खेपेबरोबर माशी त्याच्या डोक्यावरून गुणगुण करीत उडत उडत झाडापासून ओंडक्यापर्यंत जात होती. अशा खूप खेपा झाल्या. मुंगळ्याचे काम अविरत सुरू होते.
माशीची गुणगुण ऐकून एक माकड तिथे आले. त्याला पाना पानांखालून जाणारा बारीकसा मुंगळा काही दिसला नाही. पण त्याने पाहीले, ही माशी झाडापासून ओंडक्यापर्यंत खेपा मारीत काहीतरी करीत आहे. त्याने माशीला विचारले "तुझे हे चालले तरी काय आहे?" त्याच्या मोठ्या आकाराकडे पाहून माशीला वाटले ह्याला आपल्या बाजूने करायला हवे. ती माकडाला म्हणाली, "मी कष्ट करून मध जमवत आहे. पण एक मुंगळा त्या मधावर डाका घालत आहे." असे सांगून तिने माकडाला नुकताच ओंडक्यापासून झाडापर्यंत जाणारा मुंगळा दाखवला. माकडाला ती गोष्ट खरीच वाटली. त्याने एका फटक्यात मुंगळ्याला उडवून दिले. त्यानंतर ओंडक्या खालच्या मधाचा आस्वाद घेऊन, माशीकडे ढुंकूनही न पहाता माकड तिथून चालते झाले.
बोध-
१) होणारे काम जरी द्रष्य असले तरी काम करणारा सहसा अद्रष्य असतो.
२) उंच जागेवरून काम करणारे दिसत नसले, तरी आपण काम केल्याचा डंका पिटणारे आवाज नक्कीच ऐकू येतात.
३) उंच जागी बसलेल्याला बारीक सारीक गोष्टींकडे दुर्लक्ष करुन फक्त मलाई खाता येते.

गुलमोहर: