आजोळ (भाग १)

Submitted by क्रांति on 25 July, 2010 - 09:53

"अरे किती वेळ लावताय पोरांनो गुच्छ करायला! माझे बघा बरं सहा गुच्छ तयारही झाले." रत्नामावशीचा उत्साह अगदी सळसळून वहात होता! कॉफी घेऊन आलेल्या केतकीला तिनं लहान मुलाच्या कौतुकानं मुलांनी बनवलेले गुच्छ दाखवले. सगळी तयारी अगदी जय्यत झाली होती. आज रत्नामावशीच्या पाळणाघराचा 'आजोळ'चा पहिला वाढदिवस होता. साठीच्या घरातली रत्नामावशी अगदी लहान मूल झाली होती! तिला असं आनंदानं रसरसलेलं पहाताना केतकी खूप खूप मागे गेली.

रत्ना, केतकीच्या आईची दूरच्या नात्यातली बहीण. आठ बहिणी आणि एक भाऊ यांच्यातली सगळ्यांत धाकटी. बालपण असं तिला लाभलंच नाही. जरा कुठं समज येईतो वडील गेले, आईची आजारपणं काढण्यात, बहिण-भावाच्या लग्नकार्यात धावपळ करण्यात रत्नाचं बालपण हरवूनच गेलं. आजारी आई गेल्यावर तर रत्नाला अक्षरशः भावंडांच्या दयेवरच जगावं लागलं. लग्नकार्य, सणवार यांत अगदी हक्काची कामवाली म्हणूनच सगळ्यांनी तिचा उपयोग करून घेतला. तिचं वय उलटून गेलं लग्नाचं, तरी कुणी विषय म्हणून काढला नाही! एक तर पुढाकार कुणी घ्यावा, खर्च कुणी करावा, हा प्रश्न आणि दुसरं म्हणजे हक्काची मोलकरीण गेली असती हातातून! अखेरीस केतकीच्या आजीनं तिच्या भावंडांना अक्षरशः दटावलं, तेव्हा कुठं त्यांचे डोळे उघडले.

वय वाढल्यानं प्रथमवर मिळणं महागात पडलं असतं, म्हणून रत्नाच्या थोरल्या मेहुण्यानं आणलेलं बिजवराचं स्थळ बघायचं ठरलं. तीर्थाच्या ठिकाणी रहाणारं कुटुंब, आई, चार भाऊ, त्यांच्या बायका, लेकरं. घरात उपाध्येपण वंशपरंपरागत चालत आलेलं. येणार्‍या यात्रेकरूंना रहायला जागा, त्यांची पूजा-नैवेद्याची सोय करणं हा व्यवसाय. रोजचं १००-१५० पान जेवायला. पुरण-वरणाचा स्वयंपाक. घरच्याच सुना सगळं करायच्या. रत्नासाठी पाहिलेला सगळ्यात मोठा भाऊ. चाळिशी गाठलेला. त्याची पहिली बायको अपघातानं गेली म्हणे, पण तिनं आत्महत्या केली अशी गावात चर्चा. खरं-खोटं देव जाणे! त्याला एक मुलगा ५-६ वर्षांचा. असेना! त्याच्याशी काय देणं-घेणं? रत्नीला उजवली, म्हणजे झालं! तिला विचारायचाही प्रश्न नव्हताच. कसंबसं उरकायचं म्हणून लग्न उरकलं आणि रत्ना त्या खटल्यात येऊन पडली. एक दावं सोडून गरीब गाय दुसर्‍या दाव्याला बांधली, भावंडांचं कर्तव्य संपलं!

रत्नाच्या जावा तिच्यापेक्षा मानानं धाकट्या असल्या तरी वयानं मोठ्या असल्यानं त्यांनी अगदी साळसूदपणे सगळी कष्टाची कामं आल्याबरोबर तिच्या गळ्यात घातली. सासू तिखट, खवीस, नवरा तिरसट, पण त्याची नाटकं फक्त बायकोपुढेच चालायची. आई आणि भावांपुढे अगदी भिजल्या मांजरासारखा मुका व्हायचा तो. रत्ना लहानपणापासून फक्त सोसणं शिकली होती, त्यामुळे समोर येईल त्याचा मुकाट्यानं सामना करणं हेच तिला ठाऊक होतं. तिनं कुठल्याही गोष्टीची कधी तक्रार केली नाही, आणि चेहर्‍यावरचं हास्य मावळू दिलं नाही.
केतकीला लहानपणापासून रत्नामावशी सगळ्यात जास्त आवडायची. ती जेव्हा आजीकडे यायची, तेव्हा सगळी भावंडं सोडून रत्नामावशीसोबतच रहायची. तिच्याकडून खूप काही शिकण्यासारखं असायचं. रत्नामावशी पुस्तकांच्या शाळेत जरी कमी शिकली असली, तरी अनुभवाच्या शाळेत खूप शिकली होती. तिच्या लग्नानंतर केतकीचा आणि तिचा संपर्क बराच कमी झाला होता. एकदाच केव्हातरी देवीची पूजा करायला म्हणून केतकी आईबरोबर रत्नामावशीकडे गेली होती, त्यावेळी तिला पाहून केतकीला रडूच फुटलं होतं! काय बारीक झाली होती रत्नामावशी! अगदी म्हातारीच दिसायला लागली होती! तशी दिसायला ती दहाजणींत उठून दिसणारी होती, पण आता तिची पार रया गेली होती. त्या भेटीनंतर मात्र केतकी तिला कधीच भेटली नाही. बाबांच्या बदलीमुळे पार संपर्कच तुटला तिच्याशी. केतकीच्या लग्नातही रत्नामावशी येऊ शकली नव्हती. कधीतरी आईकडून तिची थोडीफार माहिती मिळत होती.

रत्नाच्या दिरांनी मोठ्या भावाला फसवून घराबाहेर काढलं, मिळकतीतला कणभरही वाटा दिला नाही. वडिलोपार्जित संपत्तीत खोट्यानाट्या कागदपत्रांच्या आधारे त्याचं नावही लावलं नाही. अचानक आलेल्या या संकटानं त्यानं हाय खाल्ली आणि तो आजारी पडला. या परिस्थितीतही डगमगून न जाता रत्नानं भावंडांची, गावकर्‍यांची थोडी मदत घेऊन बाजूच्या गावात चार स्वैपाकाची कामं धरली. नवर्‍याच्या खाण्यापिण्याची, औषधपाण्याची आबाळ होऊ नये, एवढी तरी कमाई मिळायला लागली तिला. सोबतच थोडं शिवण-टिपण, विणकाम असं जमेल तसं करून वादळातल्या नावेला किनार्‍यावर न्यायची तिची धडपड सुरू झाली. कशीबशी ती सावरत होती, त्यात कमी झालं म्हणून की काय, तिच्या सासूला अर्धांगाचा झटका आला, आणि दिरांनी तिला रत्नाच्या दारात आणून सोडून दिलं! तिच्या पोराला मात्र स्वतःकडे ठेवून घेतलं होतं हक्काचा नोकर म्हणून! रत्नानं कसलीही कुरकूर न करता दोन्ही आजारी जिवांची मन लावून सेवा केली. मुलाला शाळेतून काढलं, त्याला वेडीवाकडी संगत लागली, तो बिघडतोय असं तिच्या कानावर येताच शांतपणे त्याला घेऊन आली आणि भाऊ-मेहुण्यांच्या मदतीनं त्याला दूर बोर्डिंग शाळेत घातलं शिकायला. एव्हाना तिच्या गुणांची तिच्या नवर्‍याला आणि सासूला खात्री पटली होती, आणि आपल्या वागण्याचा पश्चातापही झाला होता. रत्नासाठी तेही कमी नव्हतं. जन्मजात असलेल्या पाककौशल्यानं तिची कामं वाढली होती आणि नवरा-सासूच्या आजाराच्या खर्चासोबत पोराच्या शिक्षणाचीही सोय झाली होती. तिनं वेळोवेळी जमवलेल्या गंगाजळीतून एक लहानशी जागाही विकत घेतली. आता कुठं तिचे बरे दिवस आले होते. पहिल्याच वर्षी पोरानं चांगले मार्क मिळवून तिच्या कष्टांचं सार्थक केलं आणि नातवाची प्रगती पाहून तृप्त मनानं तिची सासू तिला उदंड आशिर्वाद देऊन देवाघरी गेली. त्यापुढच्या वर्षी पोरानं अजून चांगली भरारी घेतली आणि सवतीचं पोर असूनही त्याच्या भलेपणासाठी झटणार्‍या आपल्या बायकोला धन्यवाद देत तिच्या नवर्‍यानं जग सोडलं. आता रत्नासाठी फक्त मुलाचं शिक्षण महत्त्वाचं होतं. आता तिला रिकामा वेळही बराच होता, दोन बायका सोबत घेऊन तिनं पापड-लोणची वगैरे करायला सुरुवात केली. पुढं तिचा मुलगा शिकून चांगल्या हुद्द्यावर नोकरीला लागला, परदेशात गेला, त्यानं आपल्यासोबत आईलाही तिकडे नेलं असं उडत उडत कळलं होतं, पण का कोण जाणे, केतकीला काही वेगळीच हुरहूर वाटत होती. तिला सतत रत्नामावशीची आठवण येत होती.

[क्रमशः]

गुलमोहर: 

http://www.maayboli.com/node/18117 ड्रिमे इथे आहे भाग २

क्रांती लिंक दे ना एका भागात दुसर्‍याची म्हणजे पटकन मिळेल पुढचा भाग Happy