धोंड्या - ३

Submitted by प्रकाश काळेल on 12 July, 2010 - 05:04

धोंड्या - १

धोंड्या - २

____________
तसं नावाला पंचायतीराज होतं गावात...पर गावच्या चावडीला अजूनबी जुन्या रितीनंच निवाडं व्हायचं. काही जुन्याजाणत्या लोकांची येक बैठक होती. मोठीपणा मिळिवण्यासाठी म्हना न्हायतर आजून कशासाठी...पर कसल्याबी मोबदल्याइना ही लोकं जीतंतीतं पुढाकार घ्यायची.गावातली लोकंबी त्यांचा निकाल मानायची. घरजमीनीवरनं वाद असोत, वाटण्या करायच्या असोत, समाईक हीरीच्या पाण्याचे वाद असोत, कुनाची लेक नांदवून घेत नसतील, समद्या खटल्यांची चावडीवरच सोडवण व्हायची. पोलीसांपतूर भानगड गेली म्हंजी लै कमीपनाचं! त्यो गावच्या इब्रतीचा सवाल हुता. गावात पोलीस हवालदार दीसायचा त्यो फकस्त यात्रंच्या येळंला. कुनाचं कसलंबी भांडाण असु दे , पाक डोस्की फुटस्तवर जरी कलागत झाली तरीबी कुनी कवा पोलीसात गेला न्हाई. काय काय वाद चावडीवर निकालात निघायचे....काय काय पिढ्यान-पिढ्याचा वारसा म्होरं चालवत हुते.

येक गोष्ट मातूर गावाची खास हुती ती म्हंजी गावातल्या गावात भले कितीबी फुटी अशीना.... गावाबाह्येरच्या भानगडीसाठी समदं गांव एकजुटीनं हुबं राह्यचं! त्यामुळं आसपासच्या भागात गावाचा दरारा होता. येकदा गावात चुकुन आलेल्या येड्याल्या गावकर्‍यांनी असला चोपला हुता की कनच्या चोराचाबी घास नव्हता किडबीसरीत चोरी करायचा. त्यो किस्सा असा झालता की, आसपासच्या गावांतनं चोर्‍या सुरु हुत्या आन नेमकं तंवाच गस्त चालू असताना, कवाच नदरं नं पडनारं येक परदेशी येडं गावात शीरलं. गस्त घालनारी मानसं बघुन बिथरून पळायला लागलं. ताणून धरला त्येला गस्तकर्‍यांनी! त्येला धड मराठीबी बोलता येत नव्हतं. 'तुझं जोडीदार कुटं हायती?' , 'किती जणं हायसा रं तुमी?' असं आन आजून आडवंतीडवं सवाल इचारल्यावर ती येडं, 'तीन...तीन' असं दोनी हाताची तीन बोटं दाखवून आरडायचं. तर कवा ' चार..चार' म्हणुन डोळं फिरवायचं. पार कोलदांडा घालून सुद हारपुस्तवर हाणला पोरांनी. सकाळच्याला सुका पंचानं येउन समदी शा निशा करुन त्येला खायला प्यायला घालून गावाबाह्येर सोडलं. वाटखर्चीला थोडं पैसंबी दीलं बरुबर.

तर अशी एकेक तर्‍हा!

*********

आज चावडीवर मिटींगीचा विषय हुता, 'लांडग्यांचा बंदोबस्त!' तसं काय लांडगी नवी नव्हती ह्या भागाला. मह्यन्या दोन मह्यन्यातनं कुटंतरी लांडगी डाव साधायचीच. पर ह्या पावटीच्या लांडग्यांची गत आगळी होती. रोज नेमानं येक दोन मेंढरू उचललं जात हुतं. मेंढकं कळपाच्या सोबतीला असताना त्येंच्या समोर लांडग्यांनी मेंढरू उचलून न्यायचं किस्सं घडलं होतं. रानात काम करणार्‍या येकल्या बाया बघुनबी लांडग्यांनी त्येंच्यावर चाल केलती. त्यात किरकोळ दुखापत सोडली तर झालं न्हाय कुनाला कायबी.पर येकट्या बाईमाणसानं पठारावरच्या शेतात कामाला जायचीबी सोय राह्यली न्हवती.गेल्या तीनेक मह्यन्यात धसकाच घेतला हुता समद्या गावानं ह्या लांडग्यांचा.

काल रातच्याला जाल्याच्या वस्तीवर जे घडलं त्यनं मातूर समद्या गावकर्‍यांची झॉपच उडीवली. जाल्याची वस्ती लांबूसोंड्या डोंगराच्या पायथ्याला लागूनच होती. वस्तीवर यीन मीन तीन घरं. त्यात शीवा पंचाचं घर जरा मोठ्ठं....बारा आखणी. चार भाउ आणि त्यंची बायकापोरं धरुन खंडीभर डोस्की हुती घरात. सगळ्यात मोठा शीरमा, त्येची पोरगी बाळातपणाला माह्येरी आलेली.येव्हढं मोठं कुटुंब असल्यानं ह्या घरात पाळणा कायम हलताच असायचा. बाळातणींसाठी सगळ्यात कोपर्‍यातल्या आखणात येक बारकी खोली खाईमसोरुपी केलेली होती. त्या खोलीचं दार नेमकं माळीच्या बगलंला होतं!

त्यादीवशी सांच्याला सोप्यात गडीमाणसांची पंगत बसली हुती. दोन कुत्री पाळलेली, तीबी सोप्याच्या बाह्येरच खाणार्‍यांच्या येकदा ताटाकडं येकदा तोंडाकडं बघत लाळ गाळत घुटमळत होती. नेमका त्याच वक्ताला टपून बसलेल्या लांडग्यानं नेम साधला! रंजानीच्या खोलीत शिरुन तान्ह्या मुलाला तीच्या नदरंदेखत बाळुत्यांसकट पाळण्यातनं उचललं. भ्यानं तीच्या नरड्यातनं आधी आवाजबी फुटनां...कसातरी जीव येक करून तीनं किकळी फोडली. आन डोळं पांढरं करून खाली पडली. घरात येकच गरबड उठली. काय झालं ते कळस्तवर लै उशीर झाला. बाह्येर टीप्पूर चांदणं असल्यानं रंजानीच्या आयला लांबूसोंड्याच्या आडसाराला वघळीत घुसणारं लांडगं वझरतं दीसलं..आन त्येच्या तोंडात पकडलेली बाळूत्याची गुंडाळीबी.

'बॉ बॉ बॉ बॉssssssss...आरं लाड्ग्यानं प्वार नेलं रंssss रंजानीचं! ' त्या दीशेनं हात दाखवत तीनं बोंब ठोकली.

चपल्या नं घालताच चंद्या आन तुक्या तीकडं धावून गेलं. हाताला घावील त्यो धोंडा आडसाराला भिरीरी मारत पळत सुटलं दोघजण.धोंडं मारणे ह्यो कुत्र्यांसाठी इशारा होता. त्येंची दोन कुत्री आन वस्तीवरची अजून दोन-चार कुत्री डोंगराच्या दीशेनं भुकत पळत सुटली.' आरं मूल हाय लांडग्याच्या तोंडात..दगाड नगा मारू' हे रंजानीच्या आयीचे शब्द कुनाला ऐकूबी गेलं न्हाईत! बाकीची घरातली माणसं आन वस्तीवरची बाकी मानसंबी काठ्याकुर्‍हाडी घेउन त्यांच्या मागं सुटली! अर्धा पाऊण तासात समद्यांनी लांबुसोंड्या पार पालथा घातला.लांडग्याचा मागमूसबी कुनाला लागला नाही. शेवटाला मधल्या कड्यापाशी एका बोराटीच्या झुडपात अडकलेलं पोराचं बाळूतं चंद्याला घावलं. पोरगं त्यात नव्हतं!

"आबा, ती कुराड आणा हीकडं...आज घावूंदेलच निस्तं...कातडंच सोलतू !" चंद्यानं शीरमाच्या हातातली फरशी कुराड हिसडूनच घेतली. चंद्या रागानं लटालटा उडत हुता आन डोळ्यात इंगाळ उतरलं हुतं. शीरमानं त्येला कवळा घालून कसाबसा सावरला.
"आरं आरं...जरा दम काड रं चंद्या....काय सुचुंन तर दी की! आता अंधारचं कुटंशी घावणार हाय लांडगं तुला..ल्येका वर पठाराला लागलं अशील तर त्येला हजार वाटा हायीत रं निसटायला......कातडं सोलायला निघालाय उंडगीचा!" डोक्याला हात लावून शीरमा खाली एका दगडावर बसला. मग खाली पडलेलं बाळूतं ब्याटरीच्या उजेडात तपासायला लागला.'रगात तर लागलेलं न्हाय कुटंच!' शीरमा सोताशीच पुटपुटला. मंग येकदम आवसान आल्यासारखं ताडकन उठून हुबा राह्यला.
"आरं पोरांनू, मला वाटतंय प्वार निसाटलं अशील बाळुत्यातनं...जरा कालवा कमी करचीला तर आवाज बिवाज येतूय का कुठनं त्येचा अंदाज घिवया...असलं तर हीतंच कुटंतर अशील प्वार."
मंग समदेजन येका जागी गोळा होउन शांत झाले आन काय चाहूल लागत्या का त्ये पाह्यला लागले. फकस्त कुत्र्यांच्या भुकण्याचं आवाज लांबुसोंड्याच्या आडसाराला घुमत राह्यले.

शीरमाचा अंदाज खरा निघाला...खालनं वस्तीच्या बाजूनंच वघळाटातनं तान्ह्या मुलाचा रडायचा बारीक आवाज येत होता! लांडग्यानं वघळीच्या वरनं उडी टाकताना बाळुत्याच्या गुंडाळीतनं पोरगं निसटलं आणि खाली पडलं. खाली नेमकं त्याच जाग्याला वघळीत दाट गवत असल्यानं पोराला खरचटलं सुदीक नव्हतं!

फक्त दैवगती!

***************
.
.
.

"तीच्या मायला...लांडगंच हायती का लांडग्याचं कातडं पाघरुन वाघ फीरायला लागल्यात....हां? हॅ हॅ हॅ!"
उगा आपलं वातावरण निवळायचं म्हनुन सुका पंच बोलला आन शिरमाच्या पाठीवर एक थाप टाकून उगाच हसला. शीरमा काय हसला न्हाय...त्येनं घुडघ्यावर हाताची घडी घालून त्यावर टेकीवलेली मान शुन्यात बघत निसतीच हलीवली. एका मांडीवर हात चोळत सुका पंचानं मांडी घातलेला दुसरा पाय सरळ केला आणि बाजुला वळत खुर्चीवर बसलेल्या पाटलांकडं बघुन भिवया उंचावल्या
"पाटी...ल, समश्या लै गंबीर होत चालल्या आता..आपल्यास्नीच कायतरी तोडगा काढाय पायजेल."
पाटील गप्पच. सुकानं मग धनगराच्या बयज्याकडं बघत इचारलं, " असं हायती तर किती म्हणं रं लांडगं ?"
"आगा दोनच हायीत नीस्तं"
"काय बोलतुयंस ल्येका..दोन लांडग्यांचा एव्हढा घास न्हाई रं...टोळी अशील त्येंची...मोठीलाठ टोळी!"
"आगा न्हाई गा....वट्ट दोनच हाईती!"
"आता रं! दोन लांडगी दीसाला दोनदोन मेंढरं खात्यात म्हन की....?"
तसा सुकाचा सवालबी बरुबरच हुता...पर कुनाकडंच त्येचं उत्तर न्हवतं.
"कुतली पिशालत्यात... तश्ची लांदगी पीचालली बीचालली तल नशत्याल!"
बोबडं हाणम्या जवा त्वांड उघडील तंवा कितीबी गंबीर मुद्दा असला तरी त्येचं हसं व्हायचंच.
"आगा लईच कडू बोड्याची दीसत्यात गा लांडगी....मी तर म्हंतो फारीस्टखात्यात तक्रार नोंदीवली पायजेल."
येवढा येळ कोपर्‍यात गप्प बसलेला शीताराम बोलला. त्यो बोलायचा नेमानं रास्तच, पर सुकाचा आन त्येचा छत्तीसचा आकडा हुता. त्यामुळं सुका चारचौघात त्याचं मत कसंबी करून हाणून पाडायचाच.
"व्हय व्हय...फारीस्ट्खात्यात जावा... फारीस्ट्खातं काय करणार हाय म्हनं?...त्यो येक वाचमल ठीवलाय त्येंनी....गतकाळीचा जवा बघील तवा पिउन फीस हून पडलेला असतूय गावात!"
तोंडात मारल्यावानी शीताराम गप्प बसला.
"आरं ऐssss" येवढ्या वेळ गप्प बसलेलं पाटील कायतरी बोललं. त्यामुळं समद्यांच्या नदरा त्येंच्याकडे वळल्या.
लाकडी खुर्चीतली सोताची बैठक ठीक करत मग पाटील बोलले." आरं ती पोरगं पान आणायला गेलेलं कुटंशी उलाथलं बगा बरं !...आन त्यो जगन्या आला न्हाई कसा अजूनबी धोंड्याला बोलवायला पाटीवलेला."

"आरं व्हय की...धोंड्या अजून कसं काय आलं न्हाई बरं....आता त्या जगन्याला बोलवाय गुत्त्यावर लोकं पाटवावी का?....काय त्येच्या मायला हारवाळ मानसाला पाटीवलाय!" सुका पंच यायेळंलाबी येकटाच सोताच्या बोलण्यावर हसला.
"आरं धोंड्याकडं किती जणांची मेंढरं हायीत आता राखणीला?"
"आगा चारेकजणांची तर हायीत आता...दीड्शेएक तरी असत्याल बगा!" घोळक्यातनं कुणीतरी सुका पंचाला माह्यती दीली.
"आन त्येच्याकडचं येकबी मेंढरु आजवर गेलेलं न्हाय...न्हवं?"
"व्हय राखणीवरनं तं नाय गेलेलं येकबी!"
"आरं ती कुत्री कसली हाय त्येची...मानुस फाडून खायील जित्ता!"

चावडीवर मग जंबेलचा आणी धोंड्याचा विषय रंगला. तेवढ्यात धोंड्या आन भगवान नाना तीथं पोचले. "शंबर वर्स जगनार बघ तू धोंड्या...आ लेका भगवान!.. तू कवाशी आलास?"
"आज सकाळीच आलूय बग सुका...काय म्हनं आन काय इशेस ?"
"चाल्ल्याती की रं येपं...याक असतंय व्हय गावाचं!...बस की."
भगवान नाना सुका पंचाजवळच मांडी घालून खाली बसला.बसताबसता त्येनं पाटलास्नी रामराम घातला. पाटलांनी मग भिताडाला पाट तेकवून बसलेल्या धोंड्याकडं बघत येक हात वर करुन त्येच्या रामरामाचं उत्तर दीलं.
"जेवाण झालं का रं धोंडीबा ? " हुब्या गावात फक्त केशव पाटील येकच मानुस हुता, ज्यो धोंड्याला धोंडीबा असं पुरं नांव घिवून आदरानं बोलवीत अशील. आन धोंड्याला त्याची सावलीबी सहन व्हायची न्हाई!

**********
क्रमशः
धोंड्या - ४

गुलमोहर: 

काय हे प्रकाश अजुन किति अन्त बघणार आहात आम्हा प्रेषक वर्गाचा.
हे बरे नाही राव.
पुढची कथा कधी पोस्ट करताय ते सान्गा...............

समस्त वाचकांचं मनापास्नं आभार ! Happy
कथेचा म्होरचा भाग लैच लांबणीवर पडला..त्याकरता क्षमा! आजकाल हीकडं फिरकायला जमना झालंय.
तरीबी येळंत येळ काढून कथा फुडं सरकीवायचा वायदा! Happy
लोभ असावा!

प्रकाश, काय झाले रे? घोड कुठे अड्लय?
तुमचि दुसरि कुठे शाखा आहे का? असल्यास तसे सांगा, आम्हि तिथे येऊ वाचायला.
खुप, खुप दिवस झाले, तुम्हि पुढ्चा भाग नाहि पोस्ट्ला म्हणून आपल सहज विचारल.