डी.एन.ए. की मुलांवरचे संस्कार?

Submitted by सावली on 6 July, 2010 - 22:45

निंबुडाची "चिऊताई चिऊताई दार उघड" गोष्ट वाचली आणि बरेच महिने माझ्या मनात असलेले काही प्रश्न परत टोचायला लागले. इतके दिवस नवऱ्याबरोबर बोलायचेच पण इथे माबोवर कदाचीत अजूनही काही वेगळी मत ऐकायला मिळतील, नवीन दृष्टी मिळेल अस वाटल्याने लिहितेय.

आपण लहान मुलांना कितीतरी गोष्टी सांगतो. बऱ्याचदा लहानपणी ऐकलेल्या , कधी आपण बनवलेल्या, रामायणातल्या, महाभारतातल्या, गणपतीच्या, कृष्णाच्या. अगणित गोष्टी आहेत आपल्याकडे. मी अगदी भारतातून येताना पुस्तक , सीडी सगळ घेऊनही आले होते.

मग जसजस मुलीला गोष्टी सांगायला सुरुवात केली तस तस मलाच त्रास व्हायला लागला. यातल्या जवळ्पास सगळ्या गोष्टी कोणत्यातरि राक्षसाच्या मरणाने संपतात.

२/३ वर्षाच्या मुलांना कळत का हे? त्यांना साध मारण (धपाटा वैगेरे) आणी ठार मारण यातला फरक कळतो? मग या गोष्टी ऐकुन कधि ते बाळ म्हणाले की मारल्यावर मरुन जाणार कीवा मी राक्षसाला मारते, मग तो मरुन गेला गेला. अस ऐकून की कसतरिच वाटायला लागलं.
राक्षस वाईट आहेत म्हणून त्यांना मारून टाकायचं हे आपल्याला पटतं. राक्षस म्हणजे वाईट प्रवृत्ती हेहि आपल्याला जाणवत, पण ते समजावून सांगणे मला फार कठीण वाटत. मी तरी सध्या सगळ्या राक्षसांना पळुन लावतेय. पण हे कितवर करणार?

एकीकडे आपणच म्हणायचं जगातली युद्ध बंद झाली पाहिजेत सगळीकडे शांतता राहिली पाहिजे आणि दुसरीकडे आपणच या मारून टाकायच्या गोष्टी सांगायच्या याला काय म्हणायचं?
एकीकडे व्हिडियो गेम्स मध्ये मारून टाकायचे खेळ खेळण्याने मुलांवर वाईट परिणाम होतो म्हणायचं आणि दुसरीकडे आपणच गोष्टीमाधला वाईट कोणीतरी मेला म्हणून छान म्हणायचं?
बर आपण ज्याला वाईट म्हणतो तोच खरा वाईट हे हि कशावरून नाही का? आपण म्हणतो म्हणून?

साधी गणपतीची गोष्ट घ्या. शंकर देव असूनही त्याने एका लहान मुलाचे डोके उडवले? यात हा मुलगा लहान होता, काय वाईट केल होत त्याने? त्याने त्याच्या आईची आज्ञाच पाळली होती ना?
मग आईला वाईट वाटल म्हणून दुसऱ्या कोणाचे तरी डोकं कापून लावायचा पण क्रूरपणाच नाही का? आपल्या लहानपणी आपण हि गोष्ट नुसती ऐकली. आता पुस्तकात रंगीत चित्र असतात. सीडी लावली तर अगदी समोर बघता येत हे. काय परिणाम होत असेल हि दृश्य बघून मुलांवर? माझी मुलगी सीडीवर हि गोष्ट लागली कि या भागात माझा हात घट्ट धरून ठेवते आणि मला सांगते तू पण बघू नकोस. हे जवळपास सर्व राक्षस कथांमध्ये होतं.
मग शंकर चांगला कि वाईट?

कार्तिकेयाच आपल्या आईवर रागावून निघून जाणं पण नक्की कुठल्या प्रकारात बसत आणि त्या पासून उदबोध काय घ्यायचा? त्याच्या आई बाबांनी पक्षी शंकर पार्वतीने त्याची समजूत घालायचा प्रयत्न केलाच नाही? तो एवढासा मुलगा आई असताना आईशिवाय राहिला?

कुठल्या कुठल्या देवांचे काही ठराविक गोष्टी केल्या नाहीत म्हणून रागावणे आणि शाप देणे कसे काय चांगले आणि समर्थनकारक? आपण मुलांना यातून काय शिकवतो? आपण चुकलो कि देव रागावतो म्हणून आपण चुकीच वागायचं नाही? आयुष्यभर मग तो हे ओझे वागवणार का? आणि ज्या क्षणी त्या मुलाची देवाची भीती जाईल तेव्हा तो नक्की कसा वागेल? मी तरी मुलीला सांगते कि वाईट वागल्याने देवाला, आई बाबांना वाईट वाटते, बाकीच्यांना त्रास होतो म्हणून वाईट वागायचं नाही. ममं फेकून दिल कि देवबाप्पाला खूप वाईट वाटत कारण कितीतरी लोकांना ममं मिळतच नाही मग ते लोक उपाशी असतात आणि तू ममं फेकतेस. म्हणून ते चुकीच आहे अस सांगते. आपण मुलांवर या कसलाश्या भित्या (भीतीचे अनेकवचन) घालून त्या भीतीपोटी चांगल वागायला का शिकवायच? मग मोठ झाल्यावर जेव्हा जेव्हा कायद्याची भीती नसते , तो तोडून शिक्षा न होता राहता येईल अस वाटत तेव्हा ते तसच वागतात. शिक्षा नाही मग कसेही मनमानी करा. मनाची भीड नाहीच कारण आपणच ती कधी शिकवली नाही.

पंचतंत्रामधल्या बर्‍याच गोष्टिपण लबाडि, खोटे बोलणे शिकवतात अस नाहि का वाटत तुम्हाला? म्हणजे त्यात चलाखी कशि करायची, जगात कसा टिकाव धरायचा हे सांगितल असते पण शेवटि चलाखी आणि लबाडि मधे कीती सुक्ष्म फरक आहे. तो कसा देणार समजावुन? गोष्टीमधला ससा मरण वाचवण्यासाठी खोट बोलतो ते चालत पण घरात आईशी मार वाचवण्यासाठी खोट बोललेलं चालत नाही. यातला फरक कसा आणि कधी समजावून द्यायचा?
बगळा आणि कोल्हाच्या खिरीच्या गोष्टीमध्ये बगळापण नंतर कोल्ह्याला जेवता येणार नाही अशी खीर वाढतो. जशास तसे वागलच पाहिजे का? त्याशिवाय जगात खरच टिकाव लागणार नाही का?
त्या कोल्हा आणि बकऱ्याच्या गोष्टीमध्ये विहिरीत पडलेला कोल्हा बकऱ्याला फसवून विहिरीत पाडतो आणि त्याच्या अंगावर पाय ठेऊन बाहेर पडून निघून जातो. मग तो पडलेला बकरा काय करतो? यातून काय शिकवायच? दुसऱ्याचा गैरफायदा घ्या आणि स्वतला सुखात ठेवा?

कोणी लहान मूल उंबरठ्याला अडकून पडले कि त्याची आज्जी, आई उंबरठ्याला एक चापटी मारतात.का तर म्हणे त्याने पाडलं बाळाला म्हणून त्या उंबरठ्याला आपण मारायचं. मग बाळाला आनंद होतो. म्हणजे तो दुसऱ्याला त्रास देऊन त्यातून आनंद घ्यायला शिकवत नाही का आपण? आणि आपली चुक शोधायला कशी लावायची बाळाला मग? का पडला हे सांगितलच नाही तर तो पुन्हा नाही का तसाच पडणार? आपल्या चुकांवर, दुख्खावर हसायलाहि कस येणार मग? आपल्याला त्रास झाला कि दुसऱ्याच्या डोक्यावर खापर फोडायच, धडा न शिकता तेच जून पुराण उगाळत राहून, त्या दुसऱ्याला कसा त्रास द्यायचा हेच बघत राहायचं. जशास तसे !
यावर आम्ही काढलेला उपाय म्हणजे पडलं कि सरळ हसायचं. अशीकशीना धुप्प्कन पडली म्हणायचं. मग उंबरठा दाखवायचा आणि सांगायचं अरेच्या हा तुला दिसला नाही ना म्हणून पडलीस बर तू. पुढच्या वेळेला बघ हा नीट. पुढच्या वेळेलाही ती तेच करते आणि हसते. केव्हातरी कळणारच आहे तिला काय केल कि पडायला होत नाही ते.

मग कधितरि वाटत यामधेच तर आपल्या प्राप्त स्थितीची मूळ नाहीत ना?
फक्त स्वतःची तुंबडी भरणे. कायद्यातून पळवाटा काढणे. घरात कचरा काढून मागल्या खिडकीने फेकून देणे, मग तो दुसऱ्याच्या दारात पडला तर त्याच तो बघून घेईल असे वाटणे. देवळातल्या , बसच्या रांगेत उभ न रहाता रांग तोडून धक्के मारून पुढे घुसणे. रस्ता साफ करायची जबाबदारी तर राहूच द्या पण त्यावर कचरा "न" टाकायची जबाबदारी सुद्धा आपली नाही असे वाटणे. आपल्यावर झालेल्या अन्यायाचे दुसऱ्यावर खापर फोडणे आणि सतत फोडत राहणे. दुसऱ्याच्या घरात(देशात) काहीका होईना , माझ्या घरात(देशात) जोपर्यंत मला त्रास होत नाही तो पर्यंत मी अजिबात बघणार नाही. हे सगळे वागणे जन्मजात असते?? आपल्या डी.एन.ए.मध्ये हे लिहिलेले असते?? कि आपल्यावर झालेल्या संस्कारांचा हा परिपाक आहे?
तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघतेय.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy मलाही खुपदा असंच वाटतं.

गोष्टी सांगायच्याच नाहीत किंवा भारतीय गोष्टी सांगायच्या नाहीत हे मला तरी जमत नाही, आणि पटतही नाही. मग त्या tweak करुन सांगणे एवढाच एक पर्याय उरतो. संस्कृतीची तेवढीच मुळं उरलीत, ती तरी बरीवाईट कशीही का असेना पोचावीत असं मला वाटतं. कुठल्याही संस्कृतीतील पारंपारिक/ पौराणिक कथा अशाच असतात. दुसरे, शक्यतोवर शब्दांमध्ये, पुस्तकांच्या आधारे सांगणे बरे वाटते, त्या कृष्ण वगैरे सीड्या कलामुल्यांच्या दृष्टीने अगदीच सुमार आहेत, विकट हास्य जास्तीच विकट, ठणठण आवाज, बेक्कार पार्श्वसंगीत वगैरे...
टॉम अ‍ॅंड जेरी वगैरेतही कमी हिंसा नाही. तर सुवर्णमध्य म्हणुन सर्वच सांगणे / दाखवणे हेच आणि एवढेच मला जमते. मुलांसाठीचे अमेरिकन व्हिडीयो, पुस्तक, भीषण कार्टुन, बीबीसीचे प्रोडक्टस आणि आता खेळा नाचा, सर्व दाखवते, सांगते (limits मध्ये).

सगळे काही गोड गोड शिकवणे यातही धोके आहेतच. तेही कमी नाहीत. हिंसा आपण कितीही नाकारली तरी ती असते. Baser instincts ज्याला म्हणतात तेही. फक्त कितव्या वर्षी त्यांची ओळख मुलांना करुन द्यायची ते पालकांच्या आणि मुलांच्या मॅच्युरीटी आणि कुवतीवर अवलंबुन आहे. पंचतंत्र म्हणजे खरोखर Practical Guide to survival in the big bad world Wink लहान मुलांमध्ये नाही का posessiveness वगैरे दिसुन येत ? Dom Moraes म्हणतो Children have a natural Judas in them. ते पटतं निरीक्षणांती.

मला फक्त एकाच प्रश्नाच उत्तर सापडत नाही. मुलं ही तथाकथित संस्काराने घडतात ? मनुष्यप्राणीही? की त्यांना त्यांची एक जन्मजात कुवत असते, आंतरीक समज असते, झेपही ? Modern Psychology ने conditioning वर बर्‍यापैकी rabid भर दिला आहे.

मला तुमच्या दोघींचंही पटलं. सावली तू खूप विचार करत्येस गं.

मला असं वाटतं, की गोष्ट सांगून त्याचं तात्पर्य सांगावं. म्हणजे जसं तू वर उदाहरणादाखल गणपतीची गोष्ट दिलीयेस. त्यात शंकराचं कृत्य वाईट होतं प्रश्नच नाही. पण मग असं सांगितलं की रागावून पुढचा विचार न करता कोणतीही गोष्ट करणं वाईट. ज्याला आपण अविवेकी म्हणू.

रैना, सहमत Happy पण मुळातच भारतीय संस्कृती जशी आहे तशी आहे, आपण गोष्टीतली रुपकं बदलू इच्छितो पण ज्या कार्टूनफिल्मस् मध्ये कधीच कुणी मरत नाही त्या कार्टून चॅनेलस बघण्यावरनं पोरांना ओरडतोच की. आता हे खरय की आपण ओरडतो ते अति करण्याला, पण मग गोष्टींबद्दलही हाच न्याय लावता येईल ना.

पंचतंत्राच तूम्ही दिलेलं उदाहरण अस्थानी आहे, पं विष्णुशर्मांनी स्वतःच्या जीवाची पैज लावून राजपुत्रांना व्यावहारीक शहाणपण शिकवण्यासाठी रचलेला ग्रंथ आहे. तो त्याच रेफरन्सनने वाचावा.

जगण्यासाठी लागणारं शहाणपण हे आपल्याला पूर्वी घडलेल्या चुकां वाचूनच मिळेल. सगळ्या चुका आपनच करायच्या ये योग्यही नाही आणि शक्यही नाहि. हिंसा वाईटच पन ती अयोग्य असेल तीथेच. चाकू तर सर्जनहि हातात धरतो, फक्त त्याचे हेतू खून्याच्या हेतूपेक्षा वेगळे असतात.

आता मला लिहावस वाटणारा मुख्य भाग. आपण सर्वच एका मर्यादेपर्यंत संस्काराने घडतो. "जे आत जातं तेच बाहेर येतं" हा निसर्गनियम आहे. आत गेलेल्यावर प्रोसेस व्हायची क्रिया पूर्णपणे आंतरीक आहे. एखाद्या गोष्टीला कशा प्रकारे प्रतिक्रिया द्यायची एव्हढच संस्कार शिकवू शकतात. इनहेरिटेड ट्रेटस् तूम्ही कशाने कशाप्रकारे ट्रिगर होता हे ठरवतात.

एक सोप्प उदाहरण देतो, दारुड्या बापाची दोन मुलं सारख्याच वातावरणात आणि परिस्थितीत वाढलेली. एक बापासारखाच व्यसनी, जुगारी. त्याची कारणममिमांसाही सोपी, लहानपणापासून हेच बघतोय, मग मी दुसरं काय करणार? याउलट दुसरा व्यसनांपासून चार हात लांब तो म्हणतो लहानपणापास्न व्यसनांचे दुष्परीणाम बघतोय, मी नाही त्या वाटेला जाणार.

सेम सिच्युएशनमध्ये दोघांच्याही रिअ‍ॅक्शन्स १८० अंशात होत्या. जे घडतय ते चुकिचं होतं हे दोघांनाही जाणवत होत, पण परिस्थितीशी झुंजायचा निर्णय घेणं ही आंतरीक इच्छा.

उगमः प्रोफाईलमध्ये सापडेल. Happy

सावली, खुप विचार केलाय.
आपल्याकडेच नाही, इंग्रजी कवितात सुद्धा असेच असते, मी माझ्या लेकीला, लहानपणापासून, निसर्गाची माहिती देत असतो. त्याने तिचे सामान्य ज्ञान खुपच वाढलेय. तिला असल्या गोष्टींची कधी गरजच वाटली नाहि.

नीतीमत्तेच्या गोष्टीपण आता जून्या झाल्या. वागणूकीतून शिकवण देणे जास्त चांगले.

<<इंग्रजी कवितात सुद्धा असेच असते>>
हो ना. jack and jill या लहान मुलांच्या बडबडगीतात पण ते दोघे टेकडीवरुन खाली घरंगळ्त गेल्याचे आणि त्यांना भरपुर लागल्याचे उल्लेख आहेत. हे असे का , असा प्रश्न मला नेहमीच पडतो

सेम सिच्युएशनमध्ये दोघांच्याही रिअ‍ॅक्शन्स १८० अंशात होत्या. जे घडतय ते चुकिचं होतं हे दोघांनाही जाणवत होत, पण परिस्थितीशी झुंजायचा निर्णय घेणं ही आंतरीक इच्छा. >>>very true

छान मांडलयस मामा Happy

संस्कार. पण ते रैना म्हणते तसे सर्व संस्कार (फक्त 'चांगल्या' संस्कारांऐवजी).
रैना, कुवत असते. ती मेंदुमुळे. तो मेंदु डि.एन.ए. मुळे बनला असतो, पण त्यातील बारीक/डीटेल्ड स्ट्रक्चर हे त्यावरील अनुभवांच्या आघातांमुळेच घडते.

शेवट नसलेल्या गोष्टी सांगाव्या. किंवा मल्टीपल शेवट असलेल्या, आणि त्यांना विचारावे की कोणता शेवट योग्य आहे, आणि का. त्यावर आपले मत किंवा 'न्यायनिवडा' नाही द्यायचा. 'विनी द पूह' सारखी नॉनसेन्सीकल पुस्तके सर्वोत्तम.

आजकालच्या गोष्टींमध्ये चांगले-वाईट हे खूप ब्लॅक-व्हाईट असते. याबद्दल किर्तीमुखाच्या जन्माची गोष्ट सांगता सांगता हाईनरीच झीमर यांनी खूप छान टीका केली आहे: Myths and symbols in Indian art and civilizaton PP 175-184 ('लुक इनसाईड' मध्ये 'kirttimukh' शोधा - १० पैकी ९ पाने वाचता येतील)

मुलं ही तथाकथित संस्काराने घडतात ? मनुष्यप्राणीही? की त्यांना त्यांची एक जन्मजात कुवत असते, आंतरीक समज असते, झेपही ?

हो, माझ्या मते मुले ही कुवत जन्मापासुनच घेऊन आलेली असतात. मला सख्खी-चुलत भावंडे बरीच आहेत आणि त्यामुळे गेली १०-१५ वर्षे भरपुर लहान मुलांशी खुप जवळुन संबंध आलाय. एकाच आईबाबांची एकाच परिस्थितीत वाढलेली मुले अगदी लहानपणापासुन वेगवेगळे ट्रेट्स दाखवताना मी पाहिलीय. यात संस्कारांचा भाग जवळजवळ नाही. उलट संस्कार करुन आपण त्या ट्रेट्सना मुद्दाम वेगळे वळण लावायचा प्रयत्न असे मला वाटते. पण मुले मात्र त्यांना जितके वळायचेय तेवढेच वळतात. एकाच वेळी दोन मुलांवर सारखे संस्कार केले तरी त्यांच्यावर होणारा परिणाम वेगवेगळा असतो.

रैना,आऊटडोअर्स ,कविता,असुदे,दिनेशदा ,सूर्यकिरण ,मृदुला, aschig,साधना धन्यवाद Happy
रैना तु म्हणतेस तस सगळ काहि लिमिट्स मधे पण गरजेचे असते. अर्थातच याच साठि मी हि अशाच बर्‍याच गोष्टी दखवते, सांगते तिला म्हणुन्च त्या सिड्या हि क्वचित बघितल्या जातात, त्याहि २.५ वर्षे झाल्या नंतर. मी या अशा गोष्टी सांगते ते तु म्हणतेस तस संस्कृती वैगेरे माहिती व्हावि म्हणुन. पण या गोष्टी सांगताना मला डोक्याला हा त्रास होतो. मलाच पट्त नाहित त्या.
हिंसा वैगेरे दाखवायची नाहि, त्याबद्द्ल बोलायचे नाहि असे मी करत नाहि. अन्नजिवनसाखळी मधे मोठे मासे , छोटे मासे, वाघ जंगलातील प्राण्यांना खातो हे सगळ तीला सांगते मी. हे निसर्गातल सत्य आहेच , आणि ते दिनेशदा म्हणतात तस निसर्गातुन देता येत. वाघ इतर प्राण्यांना का खातो तर त्याचे तेच अन्न आहे. देवबाप्पाने ते ठरवले आहे म्हणुन हे उत्तर द्यायला मला काहि वाटत नाहि. म्हणजे सगळे गोड गोडच सांगते तीला असहि नाहि.
पण तरिहि निसर्गातल्या या सत्यामधे वर मी लेखात सांगितलेल्या गोष्टि बसत नाहित अस वाटत. तु अस केल नाहिस तर देव रागवेल आणी शिक्षा करेल हि तीला भिती घालायला आवडत नाहि. आपल्या कितितरि गोष्टी हेच सांगतात नाहि का? वाईट न वागण तीच्या मनाला आतुन वाटलेल असायला हव. जेव्हा हे आपण कसल्यातरि भितीपोटी ते करायला लावतो तेव्हा शक्य होईल तेव्हा ती बंधन झुगारण्याचा विचार होतो. म्हणुनच कायद्यातुन पळवाटा काढण्यात पटाईत होतो.
पंचतंत्र पं.विष्णु शर्माने लिहिल त्या राजकुमारांसाठि. आपण ते त्याच संदर्भाने वाचायच तर तीला कादंबरि म्हणाव लागेल, आणि अख्ण्ड वाचाव लागेल नाहि का? पंचतंत्रमधिल गोष्टी आपण सुट्या सुट्या वाचतो किंवा मुलांना सांगतो. तात्पर्य सुद्दा सांगतो. मग तेव्हा हाच राजकुमारांसाठिचा संदर्भ राहिल? यातल्या गोष्टीना तात्पर्य आहेत याचा अर्थ ते तात्पर्य वापरण्यात याव असाहि विचार आहे. <<पंचतंत्र म्हणजे खरोखर Practical Guide to survival in the big bad world.>> पण आपण का म्हणतोय हे big bad world आहेच म्हणुन? मी वर दिलेल्या पंचतंत्रमधल्या गोष्टीचि काय तात्पर्य काढायची? जग वाईट आहे म्हणुन तुमच्या फायद्यासाठि कोणालाहि वापरुन घ्या? आणी तुम्हाला कोणि अस वापरु नये म्हणुन सदैव तयार रहा?
आपणच मुलांना सांगतोय का की हे जग फार वाईट आहे, तुम्हिहि जशास तसे वागा? आपण लहान मुलांच्या संवेदना बधिर करतो का?

<जगण्यासाठी लागणारं शहाणपण हे आपल्याला पूर्वी घडलेल्या चुकां वाचूनच मिळेल.> हो नक्कीच पण सगळ्याच गोष्टींमधे हे अस शहाणपण नाहिये. ससा , कासवाची गोष्ट चांगलीच आहे की. सशाच आभाळ पडणारि गोष्ट पण चांगली आहे की. पण मी दिलेल्या वरच्या उदाहरणामधे हा शहाणपणा फारसा सापडला नाहि मला.
आडो हो अग खुप विचार होतोच, काहि इलाजच नाहि बघ.
बघ तु सांगितलेल तात्पर्य. जर शंकर अविवेकी होता तर तो देव कसा? (माफ करा माझा देवावर पुर्ण विश्वास आहे, पण देव अविवेकी नसावा अस वाटत)

<<शेवट नसलेल्या गोष्टी सांगाव्या. किंवा मल्टीपल शेवट असलेल्या>> हो स्वत: रचलेल्या किन्वा अशा अनेक गोष्टि आपण सांगु शकतोच. मी हि सांगते.

काहि वागणे जन्मजात येते तर काहि संस्कारानि येते हे मला पटते. पण
मी वर लिहिलेल्या या भागात - "फक्त स्वतःची तुंबडी भरणे. कायद्यातून पळवाटा काढणे. घरात कचरा काढून मागल्या खिडकीने फेकून देणे, मग तो दुसऱ्याच्या दारात पडला तर त्याच तो बघून घेईल असे वाटणे. देवळातल्या , बसच्या रांगेत उभ न रहाता रांग तोडून धक्के मारून पुढे घुसणे........ हे सगळे वागणे जन्मजात असते??"
जर हे वागणे जन्मजात कुवत घेउन आलेले असते तर ते सगळ्याच जगात नेहेमीच दिसले असते.
जर हे वागणे संस्कारांनि येते तर ते आपल्या (आपल्याच अस नाहि म्हणत आहे मी. आपल्या का अस आहे हे) देशात का दिसते? आपण आपल्या मुलांना संस्कार करायला कमी पड्तो म्हणुन का? मग आपण हे बदलु शकणार नाहि का? वर मी लिहिलेले सगळे मुद्देहि याच साठि होते. हजारो वर्षाचा इतिहास असलेल्या आपल्या संस्कृतिमधल्या गोष्टी सांगुनहि जर असेच वागणे असते तर आपण त्या गोष्टी सांगताना चुकतोय आणि कुठेतरि बदल करायची आवशक्यता आहे अस वाटत.

ताक. कदाचित लेखाच नाव चुकलय माझ. माफ करा. बदलाव का?

मूळ लेख आणि त्यावरच्या प्रतिक्रिया वाचून माझा तर जाम वैचारिक गोंधळ उडालेला आहे. Uhoh

चिऊकाऊच्या गोष्टीचा मी माझ्या परीने फडशा पाडला. सावलीने पुढे मांडलेले मुद्दे खरंच विचार करण्याजोगे आहेत. मनातला गोंधळ शांत झाला की सूचेल काहितरी मग नीट प्रतिसाद देते. :शांत:

मुलांना काय शिकवावे, काय गोष्टी सांगाव्यात हा खरंच डोकेखाऊ विषय आहे! त्यात मुलांना एकीकडे दुसर्‍याला मारणं वाईट/ इजा करणं वाईट सांगायचं आणि मग पौराणिक गोष्टींमधली हिंसा, मारधाड यांना आपल्या परीने कलाटणी देत बसायचं....

मला आठवतंय, माझ्या वडीलांनी लहानपणी मला तेवढ्याचसाठी कोणत्याही ''संस्कार'' गोष्टी सांगितल्या नाहीत. ते तर त्यावेळी पक्के कम्युनिस्ट/ सोशालिस्ट विचारांनी भारलेले होते. त्यामुळे ते मला पोस्टाच्या पेटीची, बँकेची, दूर दूर असलेल्या गावांची, बाहुलीची किंवा एस.टी. बसची गोष्ट सांगायचे! Proud गंमत म्हणजे मलाही त्या गोष्टी अतिशय रंजक वाटायच्या. आईनेही गोष्टी सांगितल्या नाहीत. ज्या काही गोष्टी मी ऐकल्या त्या आजीने सांगितलेल्या व एका मैत्रिणीच्या आईने सांगितलेल्या. त्या सगळ्या गोष्टी भुताखेताच्या, लबाड कोल्ह्याच्या, कपटी लांडग्याच्या नाहीतर प्राणीविश्वाशी निगडित असत. माणसांच्या गोष्टीही कधी असायच्या त्यात, पण त्यातील पात्रे अगदी ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट असत.

जे काही ''संस्कार'' व्हायचे ते आजूबाजूच्या वातावरणाने, मोठ्यांच्या वागण्यातून झाले. गोष्टी हा फक्त रंजनाचा एक मार्ग होता. त्यातून ''शिकायचे'' वगैरे फारसे अभिप्रेत नसावे. बहुतेक सर्व पौराणिक गोष्टी मी वाचूनच काढल्या. कोणीही मला त्या गोष्टी सांगत बसले नाही. वाचून त्या गोष्टी जाणताना ''अमरचित्रकथा'' व ''चांदोबा''चा खूप उपयोग झाला.

आईवडीलांनी गोष्टीची पुस्तके त्यांच्या चॉईसची आणताना कायम शैक्षणिक मूल्ये असलेली, माहितीची, विज्ञानावर आधारित, चरित्रात्मक किंवा अगदी नॉन सेन्सिकल कॅटेगरीमधली आणली. मात्र, मला पुस्तकांचा चॉईस असला की मी जादू, पर्‍या, राक्षस वगैरेच पुस्तके निवडायचे हा भाग निराळा! आणि पुढे पुढे मला जेवढी पौराणिक पुस्तके मिळाली तेवढी सगळी अधाशासारखी वाचून काढली. ती वाचताना आपण काही अमानुष, हिंसक वगैरे वाचतोय असेही वाटले नाही. त्या त्या काळची असेल तशी पध्दत, असेच वाटायचे. त्या गोष्टींचा वर्तमानाशी संबंध लावायच्या भानगडीत कधी पडले नाही.

तेव्हा मला वाटतं, आपण ह्याविषयाबद्दल फार काळजी करत बसू नये. मुलांचा स्वभाव नितळ, सर्वकाही पटकन स्वीकारणारा असतो आणि कित्येकदा ती नकोशा गोष्टी विसरूनही जातात. त्यांना सभोवताली काय चाललंय, खरं जग कसं असतं ह्यापासून फार जपण्याचा प्रयत्नही त्यांना कधी कधी तोट्याचा ठरु शकतो. माझ्या एका भावाने त्याच्या चिमुरडीला गोष्टी सांगायचा वेगळाच मार्ग अवलंबला आहे. त्यालाही प्रत्येक पौराणिक गोष्ट सांगताना तिला वेगळी कलाटणी देणे अवघड वाटायचे. तो आता त्याच्या लेकीला शरीराचे सारे अवयव, ग्रह-तारे, प्राणी, पक्षी, विज्ञानातील शोध वगैरेंच्या गोष्टी सांगतो. संतांच्या, समाजसुधारकांच्या, देशभक्तांच्या, शास्त्रज्ञांच्या व थोर विचारवंतांच्या गोष्टीही अधून मधून पेरत असतो. त्याचे म्हणणे त्याची मुलगी स्वतःच्या टर्म्स वर जे काही वाचायचे आहे ते वाचेल व त्यातून काय तो योग्य अर्थबोध घेईल. हिंसा ही वाईटच, परंतु कधी कधी स्वतःच्या जीवाच्या रक्षणार्थ किंवा समुदायाच्या भल्यासाठी तिची पुष्टी होऊ शकते हा बोध तिला स्वतःच्या अनुभवानेच येईल.

पंचतंत्र वाचून दाखवताना मला पण हाच प्रश्न पडला होता. थोडा विचार केल्यावर लक्षात आले कि मी ह्या गोष्टि कधी वाचल्या ? मला त्या तेंव्हा खटकल्या का ? मी सानियाच्या वयाचा असताना साधरणतः काय वाचत होतो नि काय बघत होतो ह्याचा विचार केला कि ह्या प्रश्नांचा उलगडा होत जातो. अगदी देनिसच्या गोष्टि सारखे हलके फुलके पुस्तक देखील वाचायचे एक मानसिक वय असते, त्याआधी तसे प्रयत्न कितपत यशस्वी होतील हे त्या मूलाच्या adopt करण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे.

तेव्हा मला वाटतं, आपण ह्याविषयाबद्दल फार काळजी करत बसू नये. मुलांचा स्वभाव नितळ, सर्वकाही पटकन स्वीकारणारा असतो आणि कित्येकदा ती नकोशा गोष्टी विसरूनही जातात. त्यांना सभोवताली काय चाललंय, खरं जग कसं असतं ह्यापासून फार जपण्याचा प्रयत्नही त्यांना कधी कधी तोट्याचा ठरु शकतो.
अनुमोदन....

अरुंधती.. किती मोदक देवू ग तुला.. असा स्वच्छ विचार नाही करता येत .. आई म्हणून खूपच जास्त विचार केल्या जातो .... आधी मी सावली आणि रैना मध्ये अडकले होते अजूनही अडकायला होतं ..पण डोक्यात द्वंद चालूच राहते.. आपण परफेक्ट आई बाप म्हणून आहे का कि चूक व्हायला नको का माहिती नाही ..

नेहमी विचार पण केला जातो .. कि कुठल्या सांगाव्या .. .विचार करून डोक्याचा भुगा झाला होता. पण तू म्हणतेस तसा आम्हाला हि कोणी गोष्टी नाही सागीतल्या.. चांदोबा नाही तर विक्रम वेताळ.. एवढंच काय ते आठवतंय.. टोम न जेरी पण होते सोबतीला चारली चाप्लीन.. महाभारत आणि रामायण चालू असताना मी शाळेत होते.. काही हिंसक वगैरे वाटले नाही .. काही तरी नवीन शिकतोय, एक बाजू वाईट आणि एक चागली.. एवढा अर्थ घेवून बाकी काय तेसोयीस्करपणे बाजूला ठेवलं होतं

आता मी उगाच माझ्या प्रतीने अर्थ लावून त्याच गोष्टी अती रंजक करून सांगते का ..किवा त्यांच्या मनात ठासते का असा हि वाटतं कधी.. त्यांना नको त्या वयात खूप समज आणून देतो का ..असे वाटायला लागले
म्हणून आज काल फार फिरवून गोष्टी सांगत नाही .. जशा आहेत तशा सांगते.. किवा त्यांना जे आवडतं पक्षी प्राणी , आज बाजूला जे बघतो त्या बद्दल सांगते.. गोष्टी सांगणे हा त्यांच्या सोबत वेळ घालवायचा ... एक संवाद चालू राहावा .. त्यांना तीच गोष्ट सांगायला लावणे हा एक नवीन उद्योग म्हणजे ते काय घेतात त्यातलं त्यांना काय मजेशीर वाटतं .. हे फ़क़्त ऐकून घेते

छान विषय - आणि लिहिलंही छान आहेस सावली..
सगळ्यांच्या प्रतिक्रियाही छान..
मध्यंतरी ह्याच विषयावरनं घरात चर्चा चाललेली.. एका गटाचं मत होतं टॉम आणि जेरी हिंसक म्हणून ते बघणं योग्य नाही.. मला असं वाटतं की लहानपणापासून ते बघूनही मी कुणाच्या डोक्यात कधी तवा घातला नाही की मधे पाय घालून कुणाला पाडलं नाही! म्हणजे ते खोटं आहे, खर्‍या आयुष्यात असं करायचं नसतं हे तारतम्य मुलांमधे असतं.. (किंवा माझ्यामधे होतं Wink )
पण हेच मुळात हिंसक मुलगा असेल तर? माहित नाही त्याला ते सगळं 'करून पहावं' असा मोह होईल का! पण कदाचित मुल हिंसक असेल तर हे सगळं न बघताही ते तसंच वागू शकतं. ओळखीच्यातल्या एकांचा मुलगा हिंसक आहे - त्याला लहान बहिण झाली. घरच्यांनी सांगितलेलं की 'तुझ्याशी खेळायला बाळ आणतोय' तर हा मुलगा त्या मुलीचा कान पिरगाळून तिला मारून म्हणतो 'खेल.. खेल.. देखो खेलती नही है'.. असे बरेच भयानक प्रकार तो करतो - मला वाटतं त्याला काही बघायची गरजच नाहिये.. ते त्याच्यात इन्बिल्ड आहे (आणि त्याला ट्रीटमेंटची गरज आहे)
तसच पंचतंत्र किंवा इतर गोष्टी वाचल्यानं कुणाला फसवावसं वाटलं किंवा कुणाचा गैरफायदा घ्यावासा वाटला असंही झालं नाहिये. (आणि ही पुस्तकं वाचण्याआधीच 'निरागस' म्हणण्यासारखा नसलेला उद्योगही केलेला ( लहानपणच्या उद्योगात पहा Wink )- पण आईबाबांच्या सांगण्यातून-वागण्यातून ते चूक असलेले कळले- आणि पुन्हा तसं काही कधी करावसही वाटलं नाही )
त्यामुळे पुस्तकं वाचून/गोष्टी वाचून काही होईल असं मला तरी वाटत नाही.. हां, आता दृकश्राव्य माध्यमांचा कसा परिणाम होईल ते काही सांगता येत नाही!
---------------------
मग कधितरि वाटत यामधेच तर आपल्या प्राप्त स्थितीची मूळ नाहीत ना?
फक्त स्वतःची तुंबडी भरणे. कायद्यातून पळवाटा काढणे. घरात कचरा काढून मागल्या खिडकीने फेकून देणे, मग तो दुसऱ्याच्या दारात पडला तर त्याच तो बघून घेईल असे वाटणे. देवळातल्या , बसच्या रांगेत उभ न रहाता रांग तोडून धक्के मारून पुढे घुसणे. रस्ता साफ करायची जबाबदारी तर राहूच द्या पण त्यावर कचरा "न" टाकायची जबाबदारी सुद्धा आपली नाही असे वाटणे.
>> असं वागणार्‍यातली किती लोकं ती पुस्तकं वाचत असतील? मला वाटतं आजूबाजूचं वागणं मुलं बघतात आणि ती शिकतात.. प्रसंगानुसार आईबाबा खोटं बोलत असतील तर मुलही खोटं बोलायला शिकतील.. माझ्या जिम इन्स्ट्रक्टरचा तीन वर्षाचा मुलगा तेव्हापासूनच एक्झॅक्टली इन्स्ट्रक्टरचं अनुकरण करायचा.. मेहुणा कविता करतो/अ‍ॅक्टिंग करतो - तर त्याची ५-६ वर्षाची मुलगीही करते..
आपल्या देशातली हजारो/लाखो लोकं जर असं बेजबाबदार पणे वागत असतील तर त्यांची मुलंही तेच शिकतील - आणि मग कदाचित मुलांचे मित्र/मैत्रिणीही!
अमेरिकेत गेलेला भारतीय माणूस समोर आलेल्या अनोळखी माणसालाही अभिवादन करणं.. मागून येणार्‍या माणसासाठी दरवाजा धरणं - असे अनेक चांगले वाईट प्रकार आत्मसात करताना दिसतो.
हेच जर मी नुसतं वाचलं की 'मागून येणार्‍या माणसासाठी दरवाजा धरणं ही चांगली गोष्ट आहे' तर कदाचित मी ती आत्मसात करणार नाहीही- पण जिवंत उदाहरण फरक घडवून आणतं..
-------------
त्यातही वर असुदेनं म्हटल्यासारखं असं वाचून/बघुनही काय शिकायचं किंवा काय नाही हे शेवटी मुलांच्या मुळ स्वभावावरच असेल!
(आणि आत्ता थांबवू शकता- पण थोडं मोठं झाल्यावर सदासर्वकाळ टीव्हीवर दिसणार्‍या हिंसक हिंदी चित्रपटांचं काय करणार?)

अगदी पटणारं लिहिलंयस सावली. प्रतिसाद सुद्धा छानच.

थोडं मोठं झाल्यावर सदासर्वकाळ टीव्हीवर दिसणार्‍या हिंसक हिंदी चित्रपटांचं काय करणार?>>>>>>>

त्याच्याही खूप आधी कार्टून नेटवर्क वरची हिंसक, एकमेकांवर कुरघोडी करणारी, दुसर्‍याला झालेल्या त्रासापासून आनंद घेणारी कार्टून्स तरी मुलांवर कसले संस्कार करतात??? Sad

हम्म, हा नर्चर व्हर्सेस नेचरचा तिढा कधीच सुटणार नाही.
माझ्या मते सर्वच गोष्टी जरा तारतम्याने आणि थोड्या कमी चिकित्सकपणे पाहायल्या हव्यात. उंबरठ्याला मारल्याने मुलांवर आपली चूक दुसर्‍यावर लादण्याचे संस्कार होतात वगैरे मला 'फार फेच्ड' वाटते. तेवढी विचारशक्ती त्या वयात (१-१.५ वर्षे) असते का?
हिंसा, असूया, लोभ इ. या वाईट गोष्टी आहेत ही माणसाच्या सोशल सिस्टीमनी आणलेली तत्वे आहेत आणि ती आवश्यकच आहेत. पण हे सगळे 'दोष' आपल्यात व्यक्ती म्हणून जेनेटीकली कमी अधिक प्रमाणात असतातच. ते नाकारुन, दाबून ठेवण्यापेक्षा त्यांना उत्तम प्रकारे कसे हाताळावे याचे शिक्षण महत्वाचे.
खरं जग कसं असतं ह्यापासून फार जपण्याचा प्रयत्नही त्यांना कधी कधी तोट्याचा ठरु शकतो.>>> पूर्ण अनुमोदन, असा प्रयत्न तोट्याचा ठरतोच.

"राक्षस वाईट आहेत म्हणून त्यांना मारून टाकायचं हे आपल्याला पटतं. राक्षस म्हणजे वाईट प्रवृत्ती हेहि आपल्याला जाणवत, पण ते समजावून सांगणे मला फार कठीण वाटत. मी तरी सध्या सगळ्या राक्षसांना पळुन लावतेय. पण हे कितवर करणार?"
हे मी टीकेच्या दृष्टीने लिहित नाही, फक्त निरीक्षण : भारतीय संस्कृतीतल्या सगळ्या गोष्टींमागे प्रारब्ध असते, अमक्या राक्षसाचा तमक्या देवाकडून वध म्हणजे त्याच्या कर्मांची फळे आणि त्याचा उद्धार सुद्धा.
देवाबद्दल असं काही बोललं तर पाप लागेल असं म्हणून गप्पही केले जाते ना.
मृत्यूची तीही कुणी मारल्याने येणार्‍या मृत्यूची ओळख मुलांना आजकाल खूप लहानपणीच होते. टीव्ही हे मुख्य कारण. कितीतरी लहान मुलांनी २६/११ ची दृश्ये पाहिलीच असतील ना. मुंगी, चतुर अशा कीटकांना त्रास देताना मुलांना कल्पना असते का पण?
"कुठल्या कुठल्या देवांचे काही ठराविक गोष्टी केल्या नाहीत म्हणून रागावणे आणि शाप देणे कसे काय चांगले आणि समर्थनकारक?"
हे फक्त लहान मुलांनाच का, मोठ्यांना पण नाही का सांगितले जात.

संस्कारापेक्षा शिक्षणासाठी गोष्ट सांगणे आणि संस्कार वर्तनातून बिंबवणेच योग्य, नाही का?

अरुंधती,असामी,ashuchamp,प्रित,नानबा,मंजिरी,आगाऊ, भरत प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
बहुतेक बऱ्याच जणांच्या मत अस दिसतंय कि "आपण ह्याविषयाबद्दल फार काळजी करत बसू नये. मुलांचा स्वभाव नितळ, सर्वकाही पटकन स्वीकारणारा असतो आणि कित्येकदा ती नकोशा गोष्टी विसरूनही जातात." "या गोष्टी आपल्यालाला खटकल्या नाहीत म्हणून आताच्या मुलांना सांगायला काहीच हरकत नाही."

विचार करा आपण लहान होतो तेव्हा आपल्या जीवनावर आईबाबाशिवाय आणखी किती लोकांचा प्रभाव होता. मामा मामी , मावश्या , आत्या, आज्जी, आजोबा शेजारी सगळेच. आणि टीव्ही आणि अशा हिंसक गोष्टी आपण किती प्रमाणात "पहात" होतो? आपण यातलं बरचस साहित्य स्वतहून वाचत होतो, म्हणजे जरा मोठेच होतो. स्वतहून वाचताना त्यातला न आवडलेला भाग न वाचण, नकोशा भागाला स्कीप करण, हेही करत असणार आणि काय बरोबर काय चूक याच तारतम्यहि असाव बऱ्याच जणांकडे.

पण आत्ता मुल लहान असतानाच आपण त्या सिड्या घेतो आपल्याला अस वाटत कि वा किती छान संस्कार होणार आता.बाळ टीवीसमोर बसल कि झालं. पण त्यातलं ती हिंसा आत्तापासून दाखवून आपण लहान मुलांच्या संवेदना बधिर करतो का? आपण हि हिंसा लहानपणी बघितली नव्हती, ऐकली होती फक्त. तीहि कुठल्या वयात हे खरच आठवत नाही मला.
हिंसा आणि निसर्ग नियम या मध्ये फरक आहे. माणसांनी,देवांनी स्वताच्या इच्चेपोटी कोणाला मारण आणि वाघाने हरणाला भूकेपोटी मारण हे मला तरी वेगळ वाटत.

<<आपल्या देशातली हजारो/लाखो लोकं जर असं बेजबाबदार पणे वागत असतील तर त्यांची मुलंही तेच शिकतील - आणि मग कदाचित मुलांचे मित्र/मैत्रिणीही!>> अनुमोदन. म्हणजे "फक्त" गोष्टीमधून नाही तर प्रत्यक्ष बघूनसुद्धा मुल शिकतात. पण गोष्टी म्हणजे एक साधन म्हणून वापरता येतीलच ना? जर आपल्या गोष्टी मधून आपण पुराण इ. इ. च्या गोष्टी सांगतो आणि मुलाना देवाधर्माचे ज्ञान द्यायचा प्रयत्न करतो. जगात टिकाव लागावा म्हणून प्रयत्न करतो तर दुसऱ्या माणसाना माणसासारख वागवाव,समाजात रहाताना सामाजिक भान (फक्त स्वतःची तुंबडी भरणे. कायद्यातून पळवाटा काढणे. घरात कचरा काढून मागल्या खिडकीने फेकून देणे, मग तो दुसऱ्याच्या दारात पडला तर...इ. सारख्या गोष्टी न करण्याच) ज्ञान देता येईलच ना.

<<मुलगी स्वतःच्या टर्म्स वर जे काही वाचायचे आहे ते वाचेल व त्यातून काय तो योग्य अर्थबोध घेईल. >> त्यासाठी सुद्धा एक बेस निर्माण करावाच लागेल. काय अर्थबोध घ्यायचा किंवा नाहीच घ्यायचा हे ठरवायला सुद्धा काही एक संवेदनक्षमता, कॅपेबिलीटी असायलाच हवी.
<<आणि आत्ता थांबवू शकता- पण थोडं मोठं झाल्यावर सदासर्वकाळ टीव्हीवर दिसणार्‍या हिंसक हिंदी चित्रपटांचं काय करणार?>> तुम्ही लहानपणीच मुलाचा अ‍ॅटिट्युड,आवडनिवड याला योग्य वळण लागाव अस काही केलत तर कदाचित हे बघू नको ते बघू नको हे मुलाना सांगाव लागणारच नाही. ते आपला आपण निर्णय घेतील. अर्थातच आईबाबाच सदासर्वकाळ हे चित्रपट बघत असतील मुलाकडून वेगळी अपेक्षा ठेवता येणारच नाही.

<<उंबरठ्याला मारल्याने मुलांवर आपली चूक दुसर्‍यावर लादण्याचे संस्कार होतात वगैरे मला 'फार फेच्ड' वाटते. तेवढी विचारशक्ती त्या वयात (१-१.५ वर्षे) असते का?>>
जर गर्भातल्या बाळावर संस्कार होण्यासाठी लोक श्लोकांच्या सिड्या विकतात आणि घेतात.कधीकधी तर बाळ गर्भातही येण्यापूर्वी पंचकर्म आणि गर्भसंस्कार करतात.तर त्या वेळी गर्भाचे वय काय असते?
अहो १ ते १.५ वर्षाचे मुल नुसत बघून आणि ऐकून बोलण शिकत.आपण नवीन देशात नवीन जागेत गेलो आणि तिथली भाषा येत नसेल तर काय त्रास पडतो आपल्याला. बाळाला तो त्रास पडत नाही कारण त्याचा मेंदू तेव्हा अतिशय संवेदनक्षम असतो.त्याची विचारशक्ती असते आणि बघितलेली ऐकलेली प्रत्येक घटना त्याच्या पद्धतीने समजून घेण्याचा त्याचा प्रयत्न असतो.ती बघितलेली ऐकलेली प्रत्येक घटना त्याच्या मनावर परिणाम घडवत असते.तुम्हाला ते मुल त्यावेळी हे सगळ बोलून दाखवू शकत नाही पण परिणाम हा होतोच होतो. इथे तुम्हापैकी कोणाला कदाचित (कदाचीत म्हणतेय मी.) माहीत नसेल तर सांगते लहान मुलाकडे (वय ३ महिने ते ३ वर्ष) जगातल्या कुठल्याही भाषेतले कुठलेही उच्चार स्वीकारायची क्षमता असते. मग आजूबाजूला बघून ऐकून ते बाळ हवे तेच उच्चार कसे करायचं हे स्वताच ठरवत.बाकीचे उच्चार करण्याच कसब ते मोठ होताना विसरून जात म्हणूनच आपल्याला एक्सेंट चा प्रोब्लेम येतो मोठेपणी. माफ करा जरा विषयांतर वाटत असेल तर.

तर मला म्हणायचं कि अशा आतापर्यंत आपण वाचत ऐकत असलेल्याच गोष्टी सांगून जर आपल्या देशात खूप जणाना सामाजिक भान येत नसेल तर आपण त्या गोष्टी सांगताना चुकतोय आणि कुठेतरि बदल करायची आवशक्यता आहे अस मला सारख वाटत.
हा बदल कोणी एकटी करून चालणारच नाही. आपण आपल्या पुढच्या पिढीमध्ये हे संस्कार जाणीवपूर्वक घालण्याचा प्रयत्न करू शकतो ना?

हे खूप लहान मुलांबद्दल झालं . पण टीनेजर्स चंगळवादाच्या आहारी जाताहेत त्याबद्दल काय करता येईल? आपल्याला रोज दिसणारी पेपर टाकणारी, दुकानातून सामान, हॉटेल मधून जेवणाची डिलिव्हरी करणारी आपल्याच वयाची मुले पाहून काय वाटते मुलांना? माझ्या एका मैत्रिणीची १८ची मुलगी तिला तू मला जन्म दिलायस तर माझ्या मागण्या (गरजा नव्हे ) तू पूर्ण केल्याच पाहिजेस असे तिला सांगते. पैसे कसे आणायचे, पुरवायचे हा तुझा प्रश्न आहे हेही वर.

भरत हे कदाचित आईबाबानि, नातेवाईकानी (न) केलेल्या संस्काराचे फळ असु शकते. काहि वेळा वर कुणितरि आधिच म्हटल्याप्रमाणे कुवतचा भागहि आहेच पण फक्त तेवढेच नाहि.
कोणत्याहि माणसाला एका दिवसात एका प्रसंगात बदलणे शक्य नाहि. म्हणुनच माझा हे लिहायचा प्रयत्न आहे.
अगदि लहान असतानाच हे संस्कार जाणीवपूर्वक घालण्याचा प्रयत्न करणे हे मला वाट्त याच उत्तर आहे.
त्या मुलीला योग्य रितिने समजावयाचि गरज आहेच, पण कदचित तिच्या आइबाबा ना स्वतला हि कुठेतरि बदलाव लागेल.
आपल्याला रोज दिसणारी पेपर टाकणारी, दुकानातून सामान, हॉटेल मधून जेवणाची डिलिव्हरी करणारी आपल्याच वयाची मुले पाहून काय वाटते मुलांना?>> आपण या बद्द्ल संवाद चालु केला, काहि वाटायला हव अस नेहेमी जाणवुन दिल तर नक्किच काहितरि वाटेल. मुल असतातच संवेदनक्षम.

छान चर्चा. मला यात (संस्कार देण्यात) अजुनतरी काही अनुभव नाही. पण दिनेशदा, अरुंधती, नानबा यांचं पटतं. मलाही पंचतंत्र, पुराण, देव-दानव या काल्पनिक गोष्टिंपेक्षा ग्रह-तारे, निसर्ग, विज्ञान, समाजसुधारक, देशभक्त, शास्त्रज्ञ व विचारवंतांच्या गोष्टी सांगणे आवडेल. तसेही गोष्टीपेक्षा आजुबाजुला पाहुन मुलं जास्त शिकत असतील (संस्कार घेण्याच्या प्रदिर्घ अनुभवावरुन असं वाटत!!) शाळेत शिकवतातच की सिग्नल कसे पाळावेत... पण मुलांबरोबर जाताना पालकच सिग्नल मोडत असतील तर मुलं सिग्नल का पाळणार?

>> आपण चुकलो कि देव रागावतो म्हणून आपण चुकीच वागायचं नाही?
मला वाटतं, देवाला यात आणण्यापेक्षा Do not do it to others what you would not have others to do to you हे सुत्र समजाउन सांगणं शक्यतो चांगलं (आणि सोप्प... असा माझा अंदाज). अगदी लहान मुलाला हे कदाचित कळणार नाही (पण तेवढ्या लहान मुलाला काल्पनिक देव तरी थोडाच कळत असेल!!)

>> आपल्या डी.एन.ए.मध्ये हे लिहिलेले असते?? कि आपल्यावर झालेल्या संस्कारांचा हा परिपाक आहे?
अर्थात दोन्ही महत्वाच... रेस मधे कार आणि चालक दोघांना तेवढचं महत्व!

>> बघितलेली ऐकलेली प्रत्येक घटना त्याच्या पद्धतीने समजून घेण्याचा त्याचा प्रयत्न असतो.
इथे "त्याच्या पद्धतीने" यातच सगळं आलं... लहान मुलांची आकलन क्षमता चांगली असते, पण जे दिसतं त्यातं वैचारीक विश्लेषण ते योग्य पद्धतीने करु शकतात का? (प्रामाणिक प्रश्ण)

<<मुलगी स्वतःच्या टर्म्स वर जे काही वाचायचे आहे ते वाचेल व त्यातून काय तो योग्य अर्थबोध घेईल. >>
<<<<त्यासाठी सुद्धा एक बेस निर्माण करावाच लागेल. काय अर्थबोध घ्यायचा किंवा नाहीच घ्यायचा हे ठरवायला सुद्धा काही एक संवेदनक्षमता, कॅपेबिलीटी असायलाच हवी.>>>>

हे थोडे ब्रेनवॉशींग सारखे झाले. काय अर्थबोध घ्यायचा हे समजायला ते समर्थ असतात. सर्व मुले समान अर्थ अर्थातच लावणार नाहीत. पण त्याचमुळे आवश्यक असलेली वैविध्यता येते. पुन्हा प्रत्येकाची परिस्थीती वेगळी असल्याने वागणुक समान होण्याची शक्यता बरीच कमी. संस्कार हे फक्त लहान्पणीच होतात असे नाही. कोणत्याही वयात शिकता येते. आणि तसे करता येते हे त्यांना समजावणे हा ही एक संस्कार झाला. काय शिकायचे पेक्षा कसे शिकायचे हे शिकवणे जास्त महत्वाचे ठरु शकते.

हे खूप लहान मुलांबद्दल झालं >> मला खूप प्रामाणिक पणे वाटतं कि हेच वय असतं ह्यामर करायचं बेस पक्का केला तर अशी वेळच येणार नाही .. १ -१२ मध्ये जेवढे लक्ष देवून तुम्ही शिकवाल आणि वाढवाल तर पुढे ते बरेच निर्णय घेताना डगमगणार नाही .. किवा एक संवाद नेहमी करता राहील जो माझ्या आई वडिलांमध्ये आणि माझ्या मध्ये नव्हता.. नव्हता म्हनण्या पेक्षा त्याचं स्वरूप लहान होतं..

काहि वेळा वर कुणितरि आधिच म्हटल्याप्रमाणे कुवतचा भागहि आहेच पण फक्त तेवढेच नाहि.>>> खूप चुकीची पाऊले नाही टाकली पण अगदी सगळं सुरळीत झालेअसही मी नाही म्हणणार.. छोट्या गोष्टींवरून तान तणाव घायचा कि नाही हे प्रत्येकाच्या क्षमतेवर आहे हे अगदी बरोबर आहे .. ती माझ्यात नव्हती .. त्यामुळे मी तरी खूप स्ट्रगल केले आहे .. स्वतः विरुद्ध स्वतः .. खुपदा झाले आहे तेव्हा अजून काही तरी मला मिळाले असते तर नक्कीच मी खूप वेळ नसता घालवला ( हि माझी तक्रार नक्कीच नाही .. पण काही गोष्टी बाबतीत मी काय केले पाहिजे होते हे आता विचार करताना , शोध घेताना नक्कीच वाटते कि मोठं कोणी त्या वेळेत तशा प्रकारे माझी अवस्था जाणून सांगणारं हवं होतं )
ह्या जाणिवेतूनच मला वाटतं हे सगळे विचार माझ्या तुमच्या डोक्यात आता येतात.. कि मी डोळे उघडे ठेवून माझ्या मुलांना कसे गाईड करेल.. त्यात गोष्टी हा आधार घेतला जातो !!

प्रामाणिकपणा
संवेदनशीलता
तडजोड आणि ह्यासारखे बरेच गुण आपण पूर्णतः शिकवू नाही शकत.. ते आचरणातून यायला पाहिजे ते खरच ..इथे एक गोष्ट अजून येते .. (हे खूप लहान मुलांबद्दल नाही ).. खोटं कधी तरी बोललेलं सगळ्यांच्या हिताचा असतं.. हे कळायला मात्र ते मोठे पाहिजे किवा तुम्ही समजावून द्यायला पाहिजे कि का हे बरोबर आहे .. तुम्ही अशा वेळेस गप्प बसला तर मात्र नक्कीच तयार राहा परिणामकरता ..

"या गोष्टी आपल्यालाला खटकल्या नाहीत म्हणून आताच्या मुलांना सांगायला काहीच हरकत नाही.">>> नाही नाही सावली असं मी खचितच म्हणणार नाही . .. आताच्या मुलांना खूप माध्यम आहेत शिकण्याचे एवढे त्या वेळेस नव्हते .. आणि सगळं साधा सोपं होतं.. म्हणूनच आपण चर्चा करतो आहे
त्यात काही घरांमध्ये हे शक्यच नव्हतं..प्रश्न विचारायची बिशादच नव्हती.. किवा विचारल तर चूप रहा जास्त बडबड करू नकोस.. किवा शांतता.. ह्यावरून मोठे झाल्यावर आपण आपले अर्थ काढून घेतले किवा काढायला वेळच मिळत नाही आपण पुढे पळत राहतो. पण ह्या उत्तरांवर बरीच वागणूक ठरते..

गणपतीची गोष्ट सांगताना त्याचं धडापासून कापलेलं डोकं कधी दिसला नव्हतं आपल्याला..ते आता सीडी मध्ये दिसत. हा इफेक्ट मिसिंग होता त्यामुळे एवढा परिणाम झाला नसावा.. तो इफेक्ट गाळून त्याच गोष्टी .. शंकर जय बाप्पा होता म्हणून त्यांनी हि केला असं सांगण्यापेक्षा .. जसं आहे तसं मी सांगते.. आधी मी बराच समजावून सांगायची कि शंकर भगवान कि असं का केला.. वगैरे वागिरे..
कारण नकळत आपण बाप्पाला डिफेंड करत असतो.. मी तरी तो प्रयत्न केला .. कारण मला वाटले ..नाही.. मी ह्या गोष्टी सांगितल्याच पाहिजे .. नाही तर कळणार कसं आता हि सांगते पण प्रमाण कमी केलय

किवा कोल्हा लबाड का असतो.. लबाड नावाची एक वृत्ती असते.. ती कळावी म्हणून मी ती गोष्ट सांगते.. कारण शाळेत पण असं बरेचदा होत तेव्हा त्यांना रीलेट करता आलं तर फळ मिळालं

(हे सगळं अर्थात माझ्या आत्ता पर्यंतच्या अनुभवावरून तयार झालेले मत.. )

प्रित aschig सॅम धन्यवाद Happy
<लहान मुलांची आकलन क्षमता चांगली असते, पण जे दिसतं त्यातं वैचारीक विश्लेषण ते योग्य पद्धतीने करु शकतात का?> सॅम मला वाटत अगदि छोटि मुल आपल्या सारख विश्लेषण करत नाहित. जे दिसत ते तस स्विकरतात. तसच वागायच असत अस मनात नोट करतात. त्याच्या मागचे सगळे अर्थ शोधत नाहित. पण २ ते ३ वर्षाची मुल हे करु शकतात. अस माझ्या मुलीच्या अनुभवावरुन मी सांगते. साध उदाहरण देते. तिचि शाळा चालु केली आठवड्यातुन दोन दिवस. शाळा इंग्लीश. आणि तिला आजिबात कळत नव्हत. आम्हाला आधी वाटल एवढ्या लहान मुलांना काय फरक पड्तो, खेळायला मुल असली कि झाल. ती पहिल्या दिवशि आनंदाने गेली पण नंतर (२/३) आठवडे रडुन गोंधळ. उद्या शाळेत जायच या विचाराने आदल्यादिवशी सकाळ पासुनच. आम्हि खुप काय काय समजवल्यावर एक दिवस तीने काय सांगाव? म्हणे तिच्या टिचरला वाटत कि हिला इंग्लिश येत, म्हणुन ते हिच्याशि खुप बोलतो. पण खरतर हिला काहिच येत नाहि. आणि अस येत नाहि ते टिचरला माहित नाहि म्हनुन हिला रडु येत. मग आम्हि तिला समजावल की टिचरला माहितेय तुला येत नाहि ते. तुला अजुन बोलता याव म्हणुन ते तुझ्याशि जास्त बोलतात. खरतर आम्हि हे टिचरला सांगितलेल पण ते इंग्लिश मधुन असल्याने तिला ते कळल नव्हत. ते हि तिला समजावल. त्या दिवशि पासुन शाळा आवडायला लागली!
हि संकल्पना आणी हा विचार करण कठिण नाहि का? पण ३ वर्षाच्या मुलिने तो केला. म्हणुन मला वाटत की मुल त्यांच्या पद्धतीने विश्लेषण करतात. ते बरोबर आहे कि नाहि हे बघायचे काम आपलेच आहे. कदाचित आमच्या घरि संवाद नसता, कींवा तीचि संभाषणक्षमता हे आम्हाला सांगायचि नसति तर तीला शाळा न आवडति होण्याचा धोका होता ना.

हे ब्रेनवॉशींग नाहि. अर्थबोध घ्यायचा असतो, आपण पाहिलेली ऐकलेली घटनेबद्द्ल तुलनात्म्क विचार करायचा असतो हे शिकवायला नको का? नाहितर मुल ढिगभर रद्दिहि वाचतील पण त्याने त्यांच्या ज्ञानात काहि फरक पडणारच नाहि. कारण वाचल्यावर त्यातुन काहि शिकायच असत हेच माहित नाहि. हे माहिति करुन देणे, घरात संवाद चालु करणे हा बेस आहे मला. अर्थबोध घ्यायचा हे समजायला त्याना समर्थ बनवणे हाच बेस.
<<संस्कार हे फक्त लहान्पणीच होतात असे नाही. कोणत्याही वयात शिकता येते>> मला वाटत शिकण आणि संस्कार थोडे वेगळे आहेत. संस्कार ->अ‍ॅटिट्युड. एखाद्या गोष्टीला कस रिअ‍ॅक्ट होता ते. शिकण म्हणजे नॉलेज. मोठेपणि जाणिव पुर्वक संस्कार करता येतीलहि पण ते फार कठिण असाव.

<<काय शिकायचे पेक्षा कसे शिकायचे हे शिकवणे जास्त महत्वाचे ठरु शकते.>> अगदि बरोबर

प्रित चांगली पोस्ट. बाप्पाला डिफेंड करायच प्रमाण कमी केलय ते चांगलच आहे.
मला सुद्धा तसेच काहि विचार अपेक्षित आहेत जे आपल्याला सगळयांनाच उपयुक्त ठरतील

वरचे दिनेशदा, अरुंधती, नानबा यानि म्हटल तस ग्रह-तारे, निसर्ग, विज्ञान, समाजसुधारक, देशभक्त, शास्त्रज्ञ इ. गोष्टी सांगणे हा हि उत्तम पर्याय आहे.

गोष्टीमधला ससा मरण वाचवण्यासाठी खोट बोलतो ते चालत पण घरात आईशी मार वाचवण्यासाठी खोट बोललेलं चालत नाही. यातला फरक कसा आणि कधी समजावून द्यायचा?

सावली,
तुमच्या अशा वरील अनेक उदाहरणांनी तर खरंच सगळ्यांना विचार करायला लावलं...
मला वाटतं बाहेरुन केल्या जाणारया संस्कारापेक्षा जन्मजात गूण/डी.एन्.ए. याचा पगडा खुप असतो ..
गावाकडे आपण जर पाहिलं तर मुलांना शिकवणं तर दुरच पण वेळेवर (साधं जेवण जे असेल ते) खायला प्यायला तरी किती मिळतं तरी यातुन पण कित्येक मुलं चमकतातच ना !

माझा मुलगा ४ वर्षांचा आहे......कुठलीही गोष्ट पाहिली,ऐकली की आधी " का रे ?" हा प्रश्न ठरलेला असतो. कधीकधी खूपच तारांबळ उडते उत्तरं देताना..........एकीकडे वाटतं,खरी उत्तरं द्यायला हवीत ( प्रयत्न हाच असतो !) पण कधीकधी वाटतं, सगळंच खरं पेलवेल का ह्या वयाला ?
बर्‍याच दिवसांपासून एका प्रश्नावर गुळमुळीत उत्तर देऊनही त्याचं समाधान झालेलं नाही.
" पिल्लांना मारू नाही ना. मग शंकरबाप्पा हत्तीच्या पिल्लाचं डोकं का कापायला लावतात ....तेही झोपलेल्या पिलाचं ?"
उत्तर सुचत नाहीए. तुमच्यातले बरेच जण ह्यातून गेले असतील ना. प्लीज सुचवाल का?

Pages