'मदर्स डे!' च्या निमित्ताने...

Submitted by dreamgirl on 1 July, 2010 - 08:15

खरं तर 'मदर्स डे!' च्या निमित्ताने... हा लेख लिहीला होता.. उशीरा पोस्टतेय.. जरूर वाचा... आपल्या प्रतिक्रियांच्या आणि सूचनांच्या प्रतीक्षेत...

मे महिन्याचा दूसरा रविवार - 'मदर्स डे!'

'सातच्या आत घरात' मध्ये मकरंद अनासपुरेच्या तोंडी एक वाक्य आहे, "मदर्स डे, फादर्स डे असे जिवंतपणीच आईबापाचे दिवस कसले घालता रे...?"

मदर्स डेच्या निमित्ताने एक घटना आठवली... तेव्हा मी मुंबईत नवीन होते, नुकतीच नोकरीला लागलेले... अंधेरीमध्ये एका आज्जींकडे पी. जी. म्हणून राहायचे. ती पूर्ण सोसायटीच म्हातार्‍यांनी भरलेली. का तर त्यांच्यापैकी बर्‍याचजणांची मुले अमेरिका आणि इतर देशांत स्थायिक आणि इतरेजन पुण्यात! त्यांच्या बायकांचं या म्हातार्‍यांशी पटायचं नाही...मग म्हातार्‍यांची रवानगी जुन्या घरांत. आपण नाही का नको असलेल्या पण टाकून देणे जीवावर येणार्‍या वस्तू अडगळीच्या खोलीत टाकतो... तस्संच.

तर तेव्हा दर रविवारी कपड्यांचा धोबीघाट काढणे हे आमचं नित्यनेमाचं काम! घराच्या बाहेर छोटीशी कॉमन बाल्कनी होती. दर रविवारप्रमाणेच एका रविवारी मी त्या बाल्कनीत उभी राहून बाहेर ओले कपडे पिळत होते... आतून आजी ओरडल्या...'अगं गधडे, कपडे बाहेर पिळू नको, खाली पाणी पडेल कोणाच्यातरी अंगावर!" त्या धांदलीत खाली पडलेला कपड्यांचा क्लीप आणायला मी दडदडत खाली उतरून आले आणि क्लीप उचलायला खाली वाकले तो... माझ्या समोरच्या बाल्कनीत सुरकुत्यांनी भरलेलं एक मुटकुळं बसलं होतं; मी पिळलेल्या कपड्यांच्या पाण्याचे उडालेले शिंतोडे पूसत... मी दोन मिनिटं ओशाळून तिथेच थबकले...

जेमतेम पाय मुडपून झोपू शकेल एवढं बाकडं, तिथंच पिण्याच्या पाण्याचं भांडं, अर्धवट जेवलेलं खरकटं ताट आणि त्या पसाऱ्याचाच जणू भाग असलेलं ते मुटकुळं.... घराचं दार बंद! मग या आजींचं मुटकुळं असं बाहेरच्या लाकडी बाकड्यावर का?

वर येऊन आमच्या आजींना विचारलं तर त्या करवादल्या,"त्यांच्या बोडख्या सुनेला सासूची अडचण होतेय. घरात घाण करते म्हातारी म्हणून बाहेर टाकलेय..." आजींची बडबड सुरू झाली तमाम सूनवर्गाला शिव्यांची लाखोली वाहत...

खरंच का आईची एवढी अडचण होते??? काय वाटत असेल त्या माऊलीला? असल्या करंट्या मुलाला जन्म देण्यापरीस वांझोटी राहीले असतं तर बरं? की सोबत नाकारून पुढच्या प्रवासाला गेलेल्या वैकुंठवासी नवऱ्याला आणि त्या वैकुंठनरेशाच्या नावाने कडाकड बोटे मोडत असेल? की दैवाला बोल लावत सुरकुत्यांच्या जाळ्याआड मिचमिच्या डोळ्यांनी मूकपणे नुसतीच आसवं ढाळत असेल? कोणास ठाऊक!

सर्वच बाबतीत पाश्चिमात्यांचं अंधानुकरण करणारे आपण 'मदर्स डे'ला वगैरे का नाव ठेवतो? त्यांचं निदान बरं, एक दिवस तरी आईला तिच्या आईपणासाठी धन्यवाद देतात...आपल्यासारखं नाही, अडगळीत टाकून 'दिवस घालताना' मगरीच्या अश्रूंनी डोळे ओले करण्यापलिकडे काही करत नाही...(काही अपवादही असू शकतील पण दुर्दैवाने ते प्रमाणही अपवादात्मकच आहे...)

लहानपणी 'माझी आई' या विषयावर सानेगुरूजींचे दाखले देत भरभरून निबंध लिहीणारे आपण आणि बायकोला खूष करण्यासाठी तिच्याशी भांड भांड भांडणारेही आपणच! लहानपणी चिमुकल्या हातांनी तिच्या गालांवरचे अश्रू पुसणारे आपण आणि पुढे भावाभावांच्या प्रॉपर्टीत आईला वेठीला धरून तिला रोज अश्रू ढाळायला लावणारेही आपणच! 'मी मोठ्ठा झाल्यावर तुझी सगळी स्वप्नं पूर्ण करेन' असं म्हणून तिच्या डोळ्यांत स्वप्नांचे इमले बांधणारे आपण आणि मग मोठ्ठ झाल्यावर विमानाने भुर्रर्रर दूरदेशी उडून जाऊन 'प्रोजेक्ट्समधून सुट्ट्या मिळत नाहीत'च्या नावाखाली तिच्या डोळ्यांना चातकासारखी वाट पाहायला लावणारेही आपणच!

आठवतोय तिच्या आईपणाचा सोहळा, तुम्ही जन्माला आल्यावर तिने साजरा केलेला? कसा आठवणार? तेव्हा तुम्ही 'नकळते' होतात ना... नऊ महीने आपल्या उबदार कुशीत आपल्या रक्तामांसावर वाढवून, अतीव प्रसवकळा सहन करून एका 'टॅहँ'च्या आवाजाने धन्य होउन 'आईपणाचा उत्सव' एका आनंदभरल्या निश्वासाने आणि डोळ्यांतील कौतुकभरल्या चमकेने नि:शब्दपणे साजरा करणारी ती आई! काय नसतं त्या डोळ्यांत? आई झाल्याचा आनंद, बाळाच्या कौतुकाची चमक, बाळाची काळजी आणि अपार प्रेमाची स्निग्धता!

बाळाच्या प्रगतीसाठी धडपडणारी आई, त्यांच्या पालनपोषणासाठी जीवाचे रान करणारी आई, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून तळमळणारी, प्रसंगी मेणाहूनही मऊ ह्र्दयाला वज्रादपि कठोर करणारी आई...

लहानपणी माझा एक फार आवडता सुविचार होता... 'गुलाबाचे काटे तसे आईचे धपाटे'...! अर्थ वगैरे कळण्याचं ते वय नव्हतं, फक्त धपाटे लक्षात राहायचे... पण आता आठवते ते मी रडून झोपल्यावर मारलेल्या वळांवरून अलगद हात फिरवून स्वत:शीच रडणारी आई, मी रागाने जेवली नाही तर स्वत: अन्नाचा कणही पोटात न ढकलणारी आई, माझ्या परीक्षेला आदल्या दिवशीपासून पेपराला जाईपर्यंत ओठ निळेजांभळे होईपर्यंत उत्तरं वाचून दाखवणारी आई....

आई म्हणजे सानेगुरूजींची संस्कारशाळा, आई म्हणजे खंबीर आधारवड, आई म्हणजे कवी माधव ज्युलीयनची वात्सल्यसिंधू आनंदघन कविता - उत्साहाने सळसळणारी... आई म्हणजे चैतन्याची पालवी - सदैव बहरलेली, आई म्हणजे निखळ मैत्री, आई म्हणजे अखंड काळजी...

आई म्हणजे मेणबत्ती...! झगमगणार्‍या दुनियेत अस्तीत्व न जाणवणारी, म्हणून अडगळीत टाकून दिलेली... आणि दिवे गेले, अंधार पडला की शोधाशोध करून मिळवलेली गरजेपुरती वस्तू! तरीही स्वत: आयुष्यभर परिस्थितीची झळ सोसून, जळून झिजून, वेदनांचे कढत अश्रू ढाळून मुलांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी प्रकाश देणारीसंजीवनी म्हणजे आई! आई म्हणजे आत्मा आणि ईश्वर यांचा संगम!

अधिक महिन्याचे वाण घ्यायला माहेरी गेलेले...पाटावरून ताटावर आणि ताटावरून अंथरूणावर असं अक्षरश: माहेरपण भरभरून उपभोगलं. तेव्हा अचानक त्या ओळी आठवल्या,"लेकीला माहेर मिळावं म्हणून माय सासरी नांदते"... क्षणभर वाटून गेलं, हे उपकार फेडण्यासाठी तरी, आई व्हावी मुलगी माझी, मी आईची व्हावी आई!"

आईचा उत्साह ओसंडून वाहत होता. जेवायला खायला नवनवीन गोडधोड काय करू म्हणून...
खरंच, "आईविना माहेर, पतिविना सासर,
पाखरांविना रान, भासे किती भेसूर..."
आई अचानकच भावूक झाली. रात्रभर जागून लिहीलेली कविता दाखवत होती... म्हणाली,"मी काही तुमच्याइतकी चांगली लेखिका वा कवयित्री नाही. वाटलं ते लिहीलं..."

माझे जीवनगाणे

आयुष्यभर सगळ्यांची मने राखताना माझे गाणेच राहून गेले
आणि मग आलेल्या चिमुकल्यांचे करताना तर माझे गाणेच वाहून गेले
चिमुकल्यांसाठी स्वतःला घरटयातच कोंडून घेतले
त्यानंतर मन भरारी मारणेच विसरून गेले
चिमुकल्यांना मात्र भरारी मारता यायला लागल्यावर
'आपल्या आईला भरारीच मारता येत नाही' म्हणून हसू आले
आणि अशा तर्‍हेने माझ्या आयुष्याचे जीवनगाणेच संपून गेले
--- सौ. सुचित्रा सतिश वडके

'तिची कविता' आपली स्वप्नं आपल्या मुलांसाठी स्वप्नंच ठेउन मुलांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी धडपडणार्‍या तमाम आईवर्गाची प्रातिनिधीक कविता वाटली मला... वाचता वाचता टचकन डोळ्यांत पाणी आलं.
आपण आईला किती गृहीत धरत जातो नं, विसरूनच जातो, तिचीही काही स्वप्नं असू शकतात, तिचीही काही मतं, आवडीनिवडी असू शकतात...

हळव्या आईचे प्रेमास्वरूप वात्सल्यसिंधू, संवेदनाशील रूप आढळते तसेच खंबीर आधारवडाचे रणरागिणी रूप पण आढळते. आपल्या फुलासारख्या मुलीला सासुरवास होतोय म्हटल्यावर मेणाहूनही मऊ असणारं आईचं ह्रदय वज्रादपि कठोर होतं. एखाद्या खंबीर ढालीसारखं मुलीचं रक्षण करण्यासाठी ती सज्ज होते.

माय म्हणजे काय असते
दुधावरची साय असते
लंगड्याचा पाय असते
एक हक्काचं ठिकाण असते... म्हणूनच कदाचित इंग्रजीतल्या "My"ला 'माय' म्हटलं जात असावं.

मम्मी, ममा, मॉम रूपं पालटली तरी आणि मुलांची माया काळानुरूप, गरजेनुरूप बदलली तरी आईची माया तीच राहते. म्हणून तर म्हणतात ना आईसारखे दैवत सार्‍या जगतावर नाही. म्हणून श्रीकारानंतर शिकणे 'अ आ ई'

विशेष नोंद : आज हा लेख मदर्स डे निमित्त असला तरी मदर्स डे पुरताच मर्यादित नाहीये (म्हणून मुद्दामच मदर्स डे होऊन गेल्यावर देतेय) नाहीतर आज 'विश' करायचं आणि उद्या विषारी बोलायचं त्याला अर्थ नाही. जर आजपर्यंत आईला 'गृहीत' धरलं असेल तर आजपासूनतरी तिचा विचार करा... तुमचा विचार करता करता ती स्वतःचा विचार करणंच विसरून गेली असेल कदाचित....

गुलमोहर: 

अरे वा! आई बाबा दोघांनाही सारखाच न्याय दिलायस गं... आता वाचते!!!! Happy
आणि नाही नाही म्हणता आज एकदम किती पोष्टी तुझ्या!!! व्हायच्या नाहीत एका दिवसात वाचून!!!
पण झक्कास एन्ट्री मारलीस हं 'लेखन' मधे. पु.ले.शु. Happy

सानी धन्यवाद! त्याचं श्रेय तुम्हालाच... Happy
माहीत नाही जमलंय की नाही ते... साशंकच आहे...

कारण विपूत पोस्टेन उद्या... धबाधब लेख का पोस्टले ते... Wink

dreamgirl, काय प्रतिसाद देउ, ते म्हणतात ना घरातल्यांचि किंमत कळायला, घराच्या बाहेर पडाव लागतं.... आणि ति किंमत, लग्न झाल्यावर कळाली...
तुझ्या मनातल वाचुन, अगदी माझ्या मनातुन उतरुन कागदावर आलयं असा वाटतयं!!!
रडवलस खुप !!! आधि आई, पप्पांना फोन करते..., तेव्हाच जरा बरा वाटेल...

ड्रिमगर्ल,
आज मान अभिमानाने ताठ झाली आहे, की मी कुठल्या हिर्‍याला अजाणतेपणी लिहिण्याचा आग्रह करत होते हे लक्षात आल्याने...
वाटलं नव्हतं गं तू इतकं सुंदर लिहित असशील...
खरोखर त्रास दिलास... मी म्हणाले होते, त्या अर्थी नाही... खुप वेगळ्या... सेन्सिबल अर्थाने...
रडवलंस बाई आज... आधीच कळलेला अर्थ तू चपराक मारून वळवून दिलास... धन्य आहेस.
बेफिकीरांची वाचक शोभतेस खरी... वा!
तुझ्या विपुची वाट पाहतेय...
आणि तू परत आहो-जाहो सुरु केलंयस मला... काय हे???

आज माझ्या माऊलीला आणि तिच्या माऊलीला (आजी) जादूची झप्पी द्यावीशी वाटतीये. पण प्रॅक्टिकली शक्य नाहीये... फोन वरच द्यावी लागेल.... Sad

नो कमेंट्स की आई बाबांना सोडून मुले/मुली दूर का रहातात.

पण आईच्या कुशीची उब वादातीत आहे. आईशी संबंधित असलेले हळूवार लेखन छान आहे.

बादवे, माझ्या मुलीला माझ्याशी बांधून घालण्यापेक्षा तिच्याशी मला बांधून घ्यायचे ठरवलय मी सध्यातरी. अरे, माझ्या आईकडून शिकले का मी हे? Happy

जर आजपर्यंत आईला 'गृहीत' धरलं असेल तर आजपासूनतरी तिचा विचार करा... >>>> Happy आणि हे आईबाबतच नाही प्रत्येकच गृहित धरलेल्या बाबत योग्य ठरेल अस वाटल

लेख बराचसा हळूवार. तुझ्या भावना लख्ख सांगणारा Happy पण तरिही बराचसा एकांगी. एकांगी अशासाठी वाटला कारण आईपण/ भावना जपण ह्या बरोबरिने जे दुसरं समिकरण "मला जाणवलं" त्या दृष्टीने एकांगी वाटला. अर्थात प्रत्येकाचे अनुभव वेगळे असं मानून देखील त्याच "जनराईज्ड" अशा स्वरुपातलं स्टेटमेंट जे लिखाणातून डोकावतय ते एकांगी वाटल (मला कदाचित नीट मांडता नसेल आल की एकांगी म्हणजे काय ते.अर्थात तो माझ्या मांडणीचा दोष. त्याकरता बरिच मोठी पोस्ट टाकावी लागेल बहुतेक :P)

मला पुन्हा एकदा "Vantage Point" सिनेमाची आठवण झाली. त्यात प्रेसिडेंटच्या असॅसिनेशनचा प्रयत्न/ ती घटना वेगवेगळ्या परस्पेकटिव्हने दाखवलेय. घटना एकच पण ती प्रत्येकाच्या नजरेने कशी असेल, त्यावेळची मानसिक स्थिती, इतर परिस्थिती, वय, हेतू वगैरे वगैरे गोष्टी ह्यातील फरकामूळे एकच गोष्ट किती वेगळ्या पद्धतीने जगली जाते/ घेतली जाते त्याची कहाणी आहे ती.

स्टिल लाईफ ड्रॉईंगचा तास चालू आहे. एकच वस्तू, पण समोरुन बघणारा वेगळी चितारेल, बाजुने (side profile) बघणारा समोरुन बघणार्‍यापेक्षा वेगळी चितारेल. वरुन बघत असेल एखादा तर त्याला ती अजून वेगळी दिसेल. म्हणजे जो ज्या पोझिशनला आहे, जो ज्या अँगलला आहे त्याप्रमाणे त्याच चित्र असेल. आणि कोणतही एक चित्र चूक नसेल तसाच तुझा लेख चूक निश्चित नाही पण तू बघत असलेला एक अँगल चित्रात दाखवणारा म्हणून एकांगी अस म्हंटल मी. चूक नक्कीच नाही पण त्याला नक्कीच वेगळे अँगल असणार.

बादवे, माझ्या मुलीला माझ्याशी बांधून घालण्यापेक्षा तिच्याशी मला बांधून घ्यायचे ठरवलय मी सध्यातरी. >>>जाजू अगदी अगदी Happy

आई म्हणजे सानेगुरूजींची संस्कारशाळा, आई म्हणजे खंबीर आधारवड, आई म्हणजे कवी माधव ज्युलीयनची वात्सल्यसिंधू आनंदघन कविता - उत्साहाने सळसळणारी... आई म्हणजे चैतन्याची पालवी - सदैव बहरलेली, आई म्हणजे निखळ मैत्री, आई म्हणजे अखंड काळजी...

आई म्हणजे मेणबत्ती...! झगमगणार्‍या दुनियेत अस्तीत्व न जाणवणारी, म्हणून अडगळीत टाकून दिलेली... आणि दिवे गेले, अंधार पडला की शोधाशोध करून मिळवलेली गरजेपुरती वस्तू! तरीही स्वत: आयुष्यभर परिस्थितीची झळ सोसून, जळून झिजून, वेदनांचे कढत अश्रू ढाळून मुलांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी प्रकाश देणारीसंजीवनी म्हणजे आई! आई म्हणजे आत्मा आणि ईश्वर यांचा संगम! >>>

खूप सुंदर लिहिलयं, जाम आवडलं. Happy

ड्रीमगर्ल, लेख मला आवडला
कवितानं जे सांगितलं त्यावरून एक आठवलं:
आमच्या शेजारी एक कुटुंब रहायचं - त्या काकांची पहिली बायको गेलेली - त्यांचा एक मुलगा होता..
मग त्यांनी दुसरं लग्न केलं - काकांच्या आईनं(मुलाच्या आजीनं) त्या मुलामधे आणि नवीन आईमधे कधीही चांगले संबंध तयार होऊ नयेत ह्याची काळजी घेतली.. परत त्या काकू आणि काकांनाही एकमेकांकरता कधीच वेळ मिळू नये ह्याची खबरदारीही त्या घ्यायच्या..
बराच काळ काकूंचा मानसिक छळ केल्यावर त्या आजी आजारी पडल्या - आणि मग काकूंच्या हातात सत्ता आली.. तोपर्यंत काकूंचीही उमेदीची वर्ष संपत आलेली.. मग सत्ता हातात आल्यावर 'ह्या जन्मीचं ह्याच जन्मी' फेडून घेतलं त्यांनी आजींकडून..
आम्ही पहिल्यापासून सगळं पाहिलेलं म्हणून आम्हाला दोन्ही बाजू कळल्या.. ज्यांनी नंतर पाहिलं असेल त्यांना वाटलं असेल 'म्हातारीला छळतेय सून'

अर्थात लेखात जे मांडलय ते सरसकट सगळ्यांना लागू होत नसलं तरी असं वागणारे लोकही असतात..

सानी, अश्विनी, जाईजुई, कविता, सूर्यकिरण, नानबा... सर्वप्रथम धन्यवाद!

सानी, अश्विनी, माझा नवरा कडाक्याचा भांडला आईंशी (नेहमीच भांडत असतो, आणि त्याचं पर्यवसान सासूबाएंच्या रडण्यात होतं) त्याला त्याच दिवशी हा लेख वाचायला दिला. ढसाढसा रडला... त्यानंतर तो भांडलेला अजून तरी आठवत नाही (पुन्हा भांडला तर पुन्हा देईनच वाचायला Happy )

चूक नक्कीच नाही पण त्याला नक्कीच वेगळे अँगल असणार. >> नक्कीच वेगळे अँगल असणार, नाही आहेतच. मला जाणवलेली बाजू मी उतरवली... मला दुसरेही अँगल्स पडताळून पाहायला हवे होते ...अगदी बरोबर! तटस्थपणे वाचताना मलाच जाणवलेलं तो लेख बराचसा एकांगी झालाय... फक्त मुलगा-सूनेला दोष देण्याइतपत एकांगी झालाय.

कविता, नानबा, जाजू मी अशाही बर्‍याचशा सूना पाहील्या आहेत की ज्यांना सासूने खूप त्रास दिला असूनही तिच्या शेवटच्या काळात त्यांनी तिचं खूप केलंय अगदी लहान मुलासारखं पॉटी साफ करण्यापासून सर्व! अशीही काही मुले आहेत ज्यांच्यासाठी आई हेच सर्वस्व आहे, अगदी लोकांनी ममाज बॉय म्हटलं तरीही... त्यांच्या धाकामुळे त्यांच्या बायकाही सासूला व्यवस्थित सांभाळतात. एकदा वाटलं हेही लेखात नमूद करावं, त्यांचाही गौरव झाला पाहीजे...

ज्यांनी नंतर पाहिलं असेल त्यांना वाटलं असेल 'म्हातारीला छळतेय सून'>> बरोबर असं वाटणं. पण वर लिहील्याप्रमाणे मला वाटलं हा लेख मुलांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी. सगळ्यांनाच. आजपर्यंत मीही माझ्या आईला गृहीत धरत आलेय. त्याचीही खंत मी व्यक्त केलेय.(पण खरंय की ती खूपच लिमिटेड शब्दांत. )

माझ्या मैत्रीणीची आई, आमच्या बाजूच्या काकू, माझी मावससासू... अशी काही उदाहरणे पाहीली... मैत्रीणीच्या आईला मोठा मुलगा आणि सून आहेत, सूनेशी त्यांचं पटत नाही (खटके तर सगळ्याच सासवासूनांचे असतात.. कारण सासू - सारख्या सूचना, सून - सूचना नको Happy ) पण तिने स्पष्ट सांगितलं मी आईंना सांभाळणार नाही. मैत्रीणीचं लग्न जमत नाहीय म्हणून ती सध्या आईबरोबर भाड्याच्या घरात राहते. वडील ७ वर्षांपूर्वी वारले. भावाने तिला सल्ला दिला, लग्नाचं बघ आणि आईला आश्रमात ठेव. तिची आई फ्रस्ट्रेशनची शिकार झालेय की मुलीचं लग्न झाल्यावर आश्रमात राहावं लागेल. पर्याय नाहीय.

काकूंचा मुलगा त्यांच्या घरी येत नाही पण त्याच सोसायटीमध्ये भाड्याने फ्लॅट घेऊन राहतो. तो घरी आला की सून माहेरी जायची धमकी देते. त्या काकू खाष्ट आहेत. मान्य, पण एकुलत्या एका मुलाने आईला भेटूही नये ही अपेक्षा जरा जास्त गैर वाटत नाही?

मावससासूला दोन मुले. यजमान नाहीत. मोठी सून नोकरी करते, धाकटी करत नाही. दोघांचीही मुले ती सांभाळते(कधी कधी अंघोळ, शी शू शाळेत नेणं आणणं, मुलांचे, नातवांचे डबे... सगळं!) दोन्ही मुले वेगवेगळ्या फ्लॅत्स मध्ये राहतात. मावससासू वेगळ्या फ्लॅटमध्ये राहते. काही दिवसांपासून मावससासूचा फ्लॅट कोणाला मिळणार यावरून वादावादी चालू आहे. तिला दोघेही टोचून बोलतात, ती रडते. मोठ्या सूनेने डिक्लेअर केलं जर तो फ्लॅट नाही मिळाला तर मी तिला सांभाळणार नाही. संबंध तोडून टाकेन. (तीच यांच्या मुलांना सांभाळते)

वरील तिन्ही उदाहरणात मुले प्रॉपर्टीचा विषय आला की गोड बोलतात. साम दाम दंड भेद करून त्यांना ती हवेय.

मग वाटलं, प्रॉपर्टी हवी, आईला बघू शकत नाहीत? कारणं वेगवेगळी असू शकतील. मग वर सांगितलेल्या उदाहरणातील सूनांसारखं त्या सासूला का सांभाळू शकत नाहीत?

नानबा, त्या काकूंना त्रास दिला सासूने मान्य, खूप त्रास दिला. त्रागा होतो, चूक नसताना त्रास दिला की. पण एकाने गाय मारली तर दुसर्‍याने वासरू मारणे हा न्याय होत नाही. मुलेही चुकतात, त्रास देतात. त्रागा करतात, आया काय बोर्डिंगमध्ये पाठवत नाहीत लगेच. मग त्यांना आश्रमात का? म्हणून हा लेख फक्त आणि फक्त त्या मुलांसाठी (एकांगी) झालाय ज्यांना आपल्या आईचं ओझं झालंय...

पण कविता छान सुचवलंस, मला दुसर्‍या अअँगल्स्नेही विचार करून पुन्हा जरूर लिहायला आवडेल हा लेख. मी नक्की लिहेन. सुचनांबद्द्ल मनापासून आभार.

बादवे, माझ्या मुलीला माझ्याशी बांधून घालण्यापेक्षा तिच्याशी मला बांधून घ्यायचे ठरवलय मी सध्यातरी. अरे, माझ्या आईकडून शिकले का मी हे? >> जाजू, छान लिहीलं आहेस. मी ही तेच करेन मला मुलगी झाली तर... Happy धन्यवाद.

सर्वांचे आभार. तुमच्या सुचनांनी सुधारणेला वाव मिळतो, प्रतिक्रियांनी उत्साह वाढतो... अजूनही काही सूचना असल्यास नक्की नक्की कळवा. धन्यवाद! Happy

ड्रिमगर्ल अग लेख नको बदलुस. लेख चांगला लिहिलायस. फक्त त्यात तू जास्त इन्व्हॉल्व झाल्यामुळे तुला त्रयस्थ म्हणून नाही लिहीता आला. अस माझ पण होतं. पुन्हा वाचताना जाणवतं अरेच्चा! हा अँगल लक्षातच नाही आला. Happy आणि ते vatage point वालं उदा. स्वतःला बिल्कूल लावून मोकळी होऊ नकोस. ते थोडसं लाऊड थिंकिंग पण होतं असही असत हे मला पटत चाललेलं तुला सांगताना केलेलं.

प्रत्येक व्यक्तिची react होण्याची पद्धत वेगळी असू शकते. तुझा मुद्दा ideal पण दरवेळी ideal होणं जमतच अस नाही. प्रयत्न प्रामाणिक असावेत हे महत्वाचं.

कोणीच कधीच पुर्णपणे ब्लॅक & व्हाईट नसतं इतकच मला वर म्हणायचं होतं.

बाकी वर नानबाने जे उदा. दिलय किंवा तू दिलयस त्यातल्या कोणाचीही बाजू न घेता येव्हढच म्हणेन त्या त्या वेळी जे सहज शक्य झाल तशी त्यांची reaction झाली. बळी तो कान पिळी ह्या न्यायाने. (चूक्/बरोबर न म्हणता फक्त लिहीतेय) म्हणूनच त्या त्या वेळीच योग्य शब्दात व्यक्त होण हे महत्वाचं.

माझ्या ओळखीतल्या एक बाई आज एकट्या रहातायत कारण त्यांनी पुर्वी नवर्‍याला आई की मी अशी निवड कर असे सांगितलं. मुलं मोठी होत आलेली. नवर्‍यांनी दोन घर घेऊन प्रश्न तात्कालिक मार्गी लावला. आता त्या बाईंचा मुलगा, सून आजे सासुबाईंना बरोबर घेऊन रहातात. ह्या बाईंना सोबत रहायला ना करत नाहीत पण रहाशील तर आजी बरोबर रहा नाहीतर एकटी तुझी तुझी रहा म्हणून सांगतात. घरा बाहेर त्यावरुन ह्या नातसुनेला टोमणे ऐकावे लागतात सासुला एकटी टाकली म्हणून.

लेख आणि त्यावरच्या प्रतिक्रिया, दोन्ही खरंच विचार करण्यासारखे! एका घरात चार विभिन्न प्रवृत्तींची माणसे जेव्हा एकत्र येतात तेव्हा भांड्याला भांडे लागतेच! त्यातून नाईलाज म्हणून नव्हे तर स्वेच्छेने, आवडीने संबंध चांगले ठेवणारे, जोपासणारे, आणि आपुलकीने वागणारे लोक दुर्मिळच होत चाललेत. आई-मुलाचं नातं खरं तर जितकं दाट तितकं इतर कोणतंच नातं असू शकत नाही. त्या जोडलेल्या नाळेची आठवण करुन देणारा लेख! Happy पु. ले. शु.

रेशमा, अरूंधती, कविता, वर्षा धन्यवाद...फक्त त्यात तू जास्त इन्व्हॉल्व झाल्यामुळे तुला त्रयस्थ म्हणून नाही लिहीता आला. >> सही सही ओळखलंत Happy जरा नाही जास्तच झाले मी इन्व्हॉल्व म्हणून बाकीचे मुद्दे नजरेआड झाले.

प्रत्येक व्यक्तिची react होण्याची पद्धत वेगळी असू शकते. >> अगदी खरंय... व्यक्ती तितक्या प्रवृत्ती... आपण सल्ले देणार. ज्याच्यावर गुजरलं त्यालाच त्याचं सुखदुखः माहीत. तुम्ही सांगितलेला शेवटचा किस्सा... ह्म्म... नाण्याची दुसरी बाजू... करावे तसे भरावे. दोन्ही बाजू माहीत असणारे म्हणणार करावे तसे भरावे. माझ्यासारखी नाण्याची एकच बाजू बघणारे म्हणणार नातसुनेने सासुला एकटी टाकली Happy

कोणीच कधीच पुर्णपणे ब्लॅक & व्हाईट नसतं इतकच मला वर म्हणायचं होतं.>> एकदम पटेश. आपण सगळेच ग्रे शेड वाले... मी माझ्या व्यक्तिरेखेतच लिहिलेय मी कधी चांगली तर कधी वाईट आहे... परिस्थितीनुसार वागणारी.. Happy

खुप आभार आवर्जून लिहील्याबद्दल. खरं तर मुद्देसूद पटवून दिल्याबद्दल Happy

माझ्या माऊलीची माऊली...अतिशय कर्तबगार. अशिक्षित पण एकदम शार्प कामात. तिची एक एक तत्वज्ञानं ऐकत राहावीशी वाटतात. आजोबांची मिल बंद पडल्यावर त्यांनी एकदम हाय खाल्ली. आज्जीने उभारी घेतली. गवताचे भारे वाहून त्यातून येणार्‍या तुटपुंज्या पैशावर आपली मोठ्ठी पिलावळ पोसली. पिलावळीची पिलावळ पण तिनेच पोसली. प्रत्येक नाववंडाला आमच्या आज्जीसारख्या प्रेमळ आणि हुशार आजीचा सहवास लाभला. म्हणून आम्ही खुप भाग्यवान मानतो स्वतःला. आजीच्या सगळ्या मुला-मुलींना वेगवेगळ्या वेळी बाळं झाली त्यामुळे प्रत्येक बाळाला आमच्याच आज्जीने सांभाळलं.
इतकं केल्यानंतर ह्या आजीचं म्हातारपण सुखात जावं की नाही? लेकींना जाण आहे. पण मुलांना नाही, सुनांकडून काय वेगळी अपेक्षा ठेवणार? लेकी प्रेमाने ठेवून घेतात पण आजीला मुलांची ओढ. जावयाच्या घरी राहायचे नसते अशा आपल्या जुन्या चालीरीती आहेत ना? मुले कर्तव्य म्हणून पोसतात, नाही असं नाही. पण त्यात प्रेमाचा ओलावा नाही. सगळा कोरडेपणा. आजी दु:खी असते...काय करावे या परीस्थितीवर, समजत नाही Sad

Sad खरंय सानी, कधी कधी आपलंच नाणं खोटं असेल तर या बाहेरून आलेल्या मुलींना दोष देण्यात काय अर्थ? मायेचा ओलावा आतून असावा लागतो, नसेलच तर कोरडं कर्तव्य करून काय फायदा?