शिशिरातल्या दुपारी

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

खूप दिवस झाले लिहून. कधी सुचायचं तेंव्हा वेळ नसायचा. आणि आता लिहायचंच म्हणून बसलं की मग सगळी पाटी कोरी. ते काल घडलेलं, आज सकाळीच अनुभवलेलं सगळं धुक्यागत विरळ होत जायचं. लख्ख उन्हात आज आणि आत्ता घडणारं वास्तव दिसायला लागायचं ज्यात काहीच सापडायचं नाही सांगण्याजोगं. सगळं कोरडं, शिशिरातल्या दुपारीसारखं. इतकं की वाटायचं हेच सत्य. या पलिकडं कुठला ऋतू, कुठलं वर्तमान असूच नाही शकत. शिशिरातली झाडं पाहिली की कसं वाटतं, हॅं या झाडांना कधी बहर थोडाच येणार आहे. संपलीच आता ही. तसंच विचारांचं होतं कधी कधी. शिशीर उलटतो. झाडं आपल्या धर्माला अनुसरून पुन्हा बहरतात. पण त्या शिशिरातल्या दुपारी सगळ्या ब्रह्मांडात तेवढं एक सत्य असतं आपल्या साठी.
जिएंनी म्हटल्यासारखं आत्ता पूर्ण सत्य वाटणारी गोष्ट कालांतरानं सत्य नाही हे तर समजतंच पण सत्य पूर्ण हाती लागेल असंही नाही. ते तुकड्यातुकड्यांनी सामोरं येतं, सापेक्ष तर असतंच. तुमच्या साठी त्या क्षणी जे सत्य असेल ते.. इ.इ.
ते एक असो. तर अशा खालावलेल्या मन:स्थितीत किती दिवस गेलेत कोण जाणे. लिखाणच नव्हे तर एकूणच कुठलीही गोष्ट करण्याबाबतीत हे मुळातच आता का करावं यापासून सुरूवात.
माणूस डोंगर का चढतो? यासारखे निरर्थक प्रश्न आणि त्यांची माहित असलेली त्याहून अर्थपूर्ण उत्तरं.
आता या नंतर काही चांगलं लिहीता येणार आहे का हा अजून एक आणि काही प्रश्न विचारतानाच आपण आपल्याला वाटणारी, गृहित धरलेली उत्तरं ऐकायची नकळत अपेक्षा करतो तसं नकाराकडं बरंच झुकलेलं उत्तर तयारही असतं त्या शिशिरातल्या दुपारी.
काहीतरी चांगलं अनुभवताना आता यावर लिहीता येईल बरं. असं स्वत:ला तिथल्या तिथं बजावायला अन टोकायलाही मी कधी सुरूवात केली कळलं नाही. त्याचं आता हसू येतंय. शिवाय नंतर जेंव्हा लिहायला बसले तेंव्हा गाडं एका पॅरावर अडून बसायला लागलं. मग त्या रेटारेटीत अजूनच वैताग यायला लागला. अजून एक म्हणजे नको त्या वेळी एकदम भराभर सुचायला लागायचं कुठल्या तरी विषयावर. या नको त्या वेळा म्हणजे कॉनफरन्स कॉल्स, मीटींग्स, मित्रमैत्रीणींशी गप्पा, रिपोर्टीज काहीतरी प्रॉब्लेम्स घेऊन आलेत. मग अशा वेळी ब्लॅंक चेहरा, शून्यात बघणं. आणि इतर लोक आधी ’काही होतंय का तुला?’ वगैरे काळजीत. नंतर ती हल्ली अशीच ट्रान्समधे असते वगैरे कन्क्ल्युजनला आलेले.
तर हे सगळं टाळण्यासाठी, सुचलं की एक दोन वाक्यात लिहून ठेवायचं असं ठरवलं. हाताशी वही, पेन तर असतंच. पण मग लिहायच्या वेळी ते रेफर करावं तर त्या स्टार मार्क्ड 'IMP' टिपांमधून काही बोध व्हायचा चान्सच नाही. हे त्यावेळी का महत्वाचं वाटलं असावं याचा हनुवटीला बोट टेकवून विचार. (पूर्वीच्या ललना पत्र लिहीताना हनुवटीला पेन्सिल/पेन टेकवून विचार करायच्या. आता त्याची जागा कीबोर्ड बडवणार्‍या बोटांनी घेतलीय. आरंट वी गोईंग ग्रीनर? )
बर्‍याच दिवसांनंतर एखादी खोली स्वच्छ करण्यासाठी उघडावी. केवळ तेवढ्या हालचालीनंही आतल्या धुळीच्या कणांनी कल्लोळ माजवावा. दाराच्या फटीतून आत आलेल्या तिरीपेनं त्या कणांना सोनेरी करून टाकावं. आतली जाळ्या जळमटं जरीच्या जंजाळागत झगमगावीत आणि आता हे सगळं स्वच्छ करावं की नाही अशा विचारात थबकून जावं तसं काहीसं. जे जाणार, नाहीसं होणार हे कळतं ते जास्तच सुंदर दिसतं डोळ्यांना.
पण ती खोली उघडायचाही कंटाळा आलाय. कंटाळा , वैताग हाच मुळात माणसाचा स्थायिभाव असावा. बाकी मग नैसर्गिक उर्मींनी ज्या काही हालचाली करायला भाग पाडाव्यात तेवढ्या आपल्या कराव्यात नाईलाजानं. असं वाटतं खरं.. त्या शिशिरातल्या दुपारी.
सगळं ठाम पण नेगेटिव्ह. काही चांगलं, पॉझिटिव्ह असलं तरीही त्याकडं पाठ वळवून निघून जावं असंच वाटत रहातं त्या वेळी. तसं करतेही मग मी. नाहीतरी पाठीमागे का होईना, कुठंतरी काही चांगलं घडावं. त्या सिक्वेन्सचा माझ्यापुरता शेवट तरी मला न सुचणार्‍या एखाद्या लिखाणाच्या तुकड्याच्या वैतागात होऊ नये. आपण पहात उभे असताना, वर्षेच्या सकाळीची पुन्हा अचानक ती शिशिरातली दुपार होऊ नये माझ्यासाठी.
आता काही सृजन चेतवणारं समोर घडत असलं -- पाऊस बिऊस, तारेवर बसलेला एखादा नाजूक पिवळ्या पंखांचा पक्षी, संधिप्रकाश, निगुतीनं उघड्यावर भाकर्‍या आणि जवळजवळ सगळाच संसार करणारी एखादी हौशी पुरन्ध्री, शाळेपेक्षा बस राईडचा निखळ आनंद साजरा करत शाळेत निघालेली तीनचार क्युट पोरं, -- तरी मी खिडक्यांचे ब्लाईंडस लाऊन टाकते, फ्रेंच विंडोजचे पडदे सरकवते. दारं घट्ट बंद करून टाकते, त्या बाजूला घेऊन जाणारे आवाजही नकोत. तो फ्रस्ट्रेशनचा प्रवासच नको मुळात.
आत्ताही लिहीतेय ते हे सगळं तुम्हाला सांगण्यासाठी. सहजच.

मनात काही पाय झाडते,
जनात येण्या धडपडते.
काय करू पण त्याला,
वेळ चुकीची सापडते,
शिशिरातली दुपार...
बरेच काही रोजच घडते,
किती नवे कानावर पडते,
मी सरसावून बसते आणिक
सगळे गाडे तिथेच अडते.
शिशिरातली दुपार...

हेही सृजन नाही तर सहजच..

विषय: 
प्रकार: 

सुरेख.सेमपिंच. भरीस भर म्हणुन नुसताच ब्लॉक, आत रायटरच नाही अशी द एम्पर्र्स न्यु क्लोथस सारखी शंकाही येते मला कधी कधी.

वाचत गेले तशा झरझर ओळी आठवत गेल्या....

आताशा असे हे मला काय होते, कुण्याकाळचे पाणी डोळ्यात येते
आणि
सुखा नाही चव, लव वठलेली आहे
दु:खा नाही भार, धार बोथटली आहे.
आणि
बरे जाले देवा, निघाले दिवाळे

सन्मी, कवितेसाठी आले होते शोधत.....क्लासच!
अर्थात त्याआधीचही क्लास आहेच पण मला मात्र कविता पोचली!

सुंदर ! असा मोठा ब्रेक घेतल्यानंतर असे काही अप्रतिम लिहिणार असशील तर वरचेवर ब्रेक घेत जा.

खूप दिवस झाले लिहून. कधी सुचायचं तेंव्हा वेळ नसायचा. आणि आता लिहायचंच म्हणून बसलं की मग सगळी पाटी कोरी. ते काल घडलेलं, आज सकाळीच अनुभवलेलं सगळं धुक्यागत विरळ होत जायचं. लख्ख उन्हात आज आणि आत्ता घडणारं वास्तव दिसायला लागायचं ज्यात काहीच सापडायचं नाही सांगण्याजोगं. सगळं कोरडं, शिशिरातल्या दुपारीसारखं. इतकं की वाटायचं हेच सत्य. या पलिकडं कुठला ऋतू, कुठलं वर्तमान असूच नाही शकत. शिशिरातली झाडं पाहिली की कसं वाटतं, हॅं या झाडांना कधी बहर थोडाच येणार आहे. संपलीच आता ही. तसंच विचारांचं होतं कधी कधी. शिशीर उलटतो. झाडं आपल्या धर्माला अनुसरून पुन्हा बहरतात. पण त्या शिशिरातल्या दुपारी सगळ्या ब्रह्मांडात तेवढं एक सत्य असतं आपल्या साठी.>>>>>>>>

कित्ती खरं खुरं आणि पोटातलं Happy माझ्या मनातलंच वाटेल इतकं जवळचं Happy

काय बोलावं पामराने!!!
Happy


नाहीसं होणार हे कळतं ते जास्तच सुंदर दिसतं डोळ्यांना.

----/\------

सही!!

लिहील्यावर इकडे आलेच नव्हते वाटतं परत. आता अनेक महिने झालेत तरीही वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रियांबद्दल मनापासून आभार.
रैना, फार छान ओळी आठवल्यास.