आझाद-ए-हिंदी

Submitted by हेरंब ओक on 19 March, 2010 - 17:29

http://harkatnay.blogspot.com/2010/02/blog-post_22.html

"मराठी माणूस भुताला भित नाही तेवढा हिंदीला भितो" असं पुल म्हणतात ते फक्त ८०-९० च्या दशकापर्यंत लागू होत असावं (असं मला आपलं वाटतं) कारण त्यानंतर आलेल्या 'खाना'वळ, सिप्पी, चोपडा, बच्चन, जोहर, कपूर, मेहता, सिन्हा, खन्ना यांच्या कृपेने आपल्या पिढीचं ऐकीव आणि बोलीव (??) हिंदीचं ज्ञान निदान एवढं तरी सुधारलं की अगदी अटलजींच्यासारख्या हिंदी कविता किंवा भाषणं ठोकता आली नाहीत तरी 'उपरसे धाडकन पड्या, बुचकळ्या, बुड्या' वाल्या हिंदीतून आपण नक्कीच बाहेर पडलो आणि कामकाजापुरतं हिंदी बोलणं, हिंदी चित्रपट यंज्वाय करणं हे मात्र आपण नक्की करू लागलो.

तर इतकी वर्षं इतके चांगले (वाईट जास्त) हिंदी चित्रपट बघूनही काही काही अगम्य हिंदी/उर्दू शब्दांचे अर्थ मला अगदी अलिकडे उमगले आणि ब-याचशा शब्दांनी माझं बालपण पोखरून ठेवलं होतं (अर्थात चित्रपट पहातानाच्या तीन तासांच्या आयुष्याविषयी बोलतोय मी). आणि एवढे अतर्क्य शब्द लेदर जॅकेट घालून बाईक वरून उंडारणारा हिरो असो वा फाटक्या चिंध्या घालून बसलेला रस्त्याच्या कडेचा भिकारी असो दोघेही इतक्या सारख्या सहजतेने वापरायचे की ते बघून तर मला त्यांचे वंशज अफगाणिस्थान, इराण, इराक, कतार असल्या कुठल्यातरी कट्टर उर्दू/अरेबिक भाषा बोलणा-या देशांतले असावेत असं वाटायचं. थोडाफार विनोदाचा भाग सोडला तरी खाली दिलेल्या उदाहरणातलं एकही उदाहरण हे उगाच विनोदनिर्मितीसाठी तयार केलेलं नाही. यातले प्रत्येक शब्द, वाक्य, विधानं मला लहानपणी, शाळेत/कॉलेजात असताना, आणि काही काही अगदी गेल्या ३-४ वर्षांपूर्वीपर्यंत अगदी जेन्यूईनली गोंधळवून टाकायचे. तो चलो डोकावते है बॉलीवूड हिंदी मे..

शुक्रिया : हिरो नेहमी हिरोईनला शुक्रिया म्हणायचा. मला वाटायचं हिचं नावच शुक्रिया असावं. आपली सुप्रिया तशी यांची शुक्रिया. 'पार्टनर' मध्ये वपुंना "असं गवतासारखं सगळीकडे उगवलेलं जोशी आडनाव हे किरणचं आडनाव असायला नको" असं वाटायचं तसंच मलाही प्रत्येक चित्रपटामध्ये वेगळ्या असणा-या नायिकांचं नाव एकच का असा प्रश्न पडे. पण तो नायकही तिला एकदा शुक्रिया म्हणायचा आणि नंतर पुढच्या सीन मध्ये हेमा, रीना, सीमा असं काहीतरी म्हणायचा तेव्हा मला वाटायचं की शुक्रिया हे पाळण्यातलं नाव असावं आणि तिला ते आवडत नसल्याने तो तिला तिच्या आवडत्या अशा दुस-या एखाद्या नावाने हाक मारत असावा. (यावरून आठवलं, वेंकट हे नाव तेलुगु भाषिकांमध्ये एवढं कॉमन आहे की माझा मित्र म्हणायचा की हैद्राबादमध्ये रस्त्यावरून चालताना १० खडे मारले तर त्यातले ८ वेंकट नावाच्या व्यक्तीला लागतील.)

बादल : असंच अजून एक इंटरेस्टिंग प्रकरण म्हणजे बादल. तर बादल हे यांच्या प्रत्येक ड्युएटमध्ये असायचंच. अगदी प्रामाणिकपणे सांगतो बादल म्हणजे मला वादळ वाटायचं त्यामुळे मला हे कळेना की च्यायला यांना हा वादळ प्रकार एवढा रोमँटिक का वाटावा. अर्थात मला वादळ/बादल प्रकार नीट कळत नसला तरी रोमँटिक म्हणजे काय हे माहित होतं. एतद्देशीय भाषांपेक्षा आंग्लभाषेचं विशेष प्रेम आणि आकलन म्हणा किंवा (जरा जास्तच) लवकर आलेली समज म्हणा. जे काय असेल ते. आपल्याला कारणांत शिरायचं कारण नाही

कुमार : आता कुमार हा हिंदी शब्द नाही हे माहित्ये मला पण पूर्वी हिंदी चित्रपटात चमकणारे हे असंख्य कुमार पाहून मला कुमार हे सुद्धा कपूर, खन्ना, सिन्हा सारखं एक आडनावच वाटायचं. लहानपणी एकदा एका मित्राच्या मित्राने त्याची ओळख 'मी कुमार'अशी करून दिली तेव्हा त्याला "तू पिक्चर मध्ये काम करतोस का?" आणि "तुझं (नक्की) नाव काय? कुमार हे तर आडनाव झालं" असले (आता मुर्खासारखे वाटणारे) प्रश्न विचारण्याची अनिवार इच्छा मला झाली होती.

फसाना-अफसाना : मला आधी हे दोन वेगळे शब्दच वाटायचे. अर्थाच्या नावाने अर्थातच बोंब होती. पण नंतर कळलं की यमक आणि गाण्याची चाल जुळवण्यासाठी हा शब्द शिताफीने कुठेही कसाही वापरू शकतो. आणि तरीही अर्थ तोच राहतो. वा वा.

समा-आसमा : इथे एक गडबड झाली. मी तो वरचा 'फसाना-अफसाना'वाला नियम इथेही लावून बसलो. म्हंटलं नसेल जुळत यमक कधीकधी म्हणून बदलत असतील हाही शब्द. पण बदललेल्या शब्दाने (माझ्या दृष्टीच्या) अर्थाची मात्र नुसती वाट लागायची. तर इथे हे सांगणं क्रमप्राप्त आहे की मला दोन्ही शब्दांचा अर्थ आकाश (आसमा) असा वाटायचा. त्यामुळे 'समा है सुहाना सुहाना'मध्ये 'आकाश इतकं छान छान का असावं' असा मला प्रश्न पडायचा. अर्थात सुहाना म्हणजे छान हा पण इतर असंख्य अर्थांप्रमाणे मी ढोबळ मानने काढलेलाच अर्थ होता.

शमा-परवाना : आता हे शमा आणि परवाने. गाणी ऐकून साधारण वाटायचं की ही शमा म्हणजे कोणीतरी महान सुंदरी असावी आणि तिच्यामागे लागणा-या सगळ्यांना परवाना म्हणत असावेत. पण कोण होती ही एवढी महान बया ते काही कळत नसे. जळणं बिळणं माहित नव्हतं त्यामुळे कोण ही शमा जिच्यामागे एवढे परवाने पागल होतात असं सारखं वाटायचं. पण नंतर शमा म्हणजे ज्योत आणि परवाने म्हणजे त्या ज्योतीवर झेपावणारे पतंग (किडे. मांजावाले पतंग नव्हेत) हे कळल्यावर तर माझा अपार हिरमोड झाला होता हे अजूनही त्या शमेच्या प्रकाशाएवढं लख्ख आठवतंय.

हसीन किंवा हसीना : हे प्रकरण म्हंजे आपण हसतमुख म्हणतो त्या टायपातलं हसणारा/री (न म्हणजे रा, ना म्हणजे री) असावं असं नेहमी वाटायचं मला. आणि 'हसीन कातिल' म्हटलं की चाकूचे सपासप वार करून झाल्यावर किंवा धडाधड गोळ्या उडवल्यानंतर त्या प्रेताकडे बघून खदाखदा हसणारा पिसाट खलनायक वाटायचा मला.

मांग : मुख्य म्हणजे "हमारी मांगे पुरी करो" मुळे सगळा गोंधळ झाला या शब्दाबद्दल. त्या 'खून भरी मांग' च्या पोस्टरवर दिसणारी डॅशिंग रेखा आणि त्याच सुमारास वाचलेलं 'कमलाकर नाडकर्णी' यांचं त्या चित्रपटावरचं 'मगर मगर' वालं जबरी परीक्षण वाचून तर मला रेखाने का बरं असल्या भयंकर मगरींच्या रक्ताबद्दलची मागणी केली असावी असं (चित्रपट बघण्यापूर्वी) वाटायचं. (चित्रपट बघितल्यानंतर नाडकर्णींबद्दलचा आधीच असलेला आदर अजूनच वाढला.)

दिवार-दिवाल : दिवारला दिवाल हा एक प्रतिशब्द आहे असं सांगणा-या आमच्या एका मित्राला आम्ही "तो चुकीचा शब्द आहे. अशुद्ध असेल" असं सांगितलं होतं. एखाद्याचं अशुद्ध हिंदी मी (त्या काळी) शोधून त्याला दाखवून द्यावं हे म्हणजे फार होतं. त्याने काय किंमत केली असेल माझी देव जाणे .

मौसम : हे एक भारी प्रकरण होतं. 'आया प्यार का मौसम' किंवा 'मस्तीभरा मौसम' असं सारखं सारखं ऐकून मी माझ्याहून वयाने मोठ्या असलेल्या एका मित्राला (आणि त्यामुळे साहजिकच त्याला माझ्यापेक्षा जास्त माहिती असेल या अपेक्षेने) "मौसम म्हणजे काय रे (भाऊ) ?" असं विचारलं होतं. आणि तो कदाचित नुकताच टीव्हीवरच्या 'मौसम की खबरे' बघून आला असावा त्यामुळे त्याने चटकन उत्तर दिलं "मौसम म्हणजे हवामान". झालं. मला कित्येक दिवस कळेना प्रेमाचं हवामान, मस्ती मजा करण्याचं हवामान म्हणजे नक्की काय बुवा? मग 'मस्तीभरा मौसम' म्हणजे हिवाळा असावा बाबा अशी मी आपली माझी समजूत करून घेतली. कारण हिवाळा हा अतिशय उत्साहवर्धक ऋतू आहे हे तेव्हाच्या सामान्य विज्ञानाच्या पुस्तकात होतं आम्हाला.

बरसात-बारिश : आता एकाच पावसाला दोन दोन नावं का बरं देतील असं विचार करून मी, उगाच, माझ्याच मनाने, कोणालाही न विचारता बरसात हे जरा भारदस्त वाटत असल्याने बरसात म्हणजे आपला मुसळधार टाईप पाऊस आणि बारिश म्हणजे रिमझिम पाऊस असे अर्थ काढले होते.

**-ए-** : दर्द-ए-दिल, दीदार-ए-यार , दिल-ए-नादान, ऐलान-ए-जंग, शेर-ए-हिंदुस्तान, रुस्तुम-ए-हिंद या अशा 'ए' वाल्या ('ए' ग्रेड वाल्या नाही हो) शब्दांचा अर्थ अजिबात कळत नसे. आणि त्यामुळे दुखण्याचं हृदय, बघणारा मित्र, हृदयाचं वेडेपण, सिंहाचा हिंदुस्तान हे असले अर्थ निघत. कालांतराने मला कळलं की 'ए' या छोट्या अक्षरात एवढी ताकद आहे की तो संपूर्ण शब्द उलट वाचायला भाग पाडतो. त्यानंतर त्या शब्दांचे खरे अर्थ कळायला लागले. मग मला लक्षात आलं की लोकांना शेरो-शायरी, गजला-बिजला एवढ्या का आवडायच्या आणि मला त्या का आवडायच्या (वाचा कळायच्या) नाहीत.

चमन, गुफ्तगू : चमन म्हटलं की चमन-गोटा आणि गुफ्तगू म्हणजे काहीतरी अदृश्य बिदृश्य होणं असावं हे असे अर्थ डोक्यात एवढे भिनले होते की या शब्दांचे एवढे नाजूक, कोमल अर्थ असतील हे मूळ अर्थ कळल्यावर पटेचना. (डंब-शराझ खेळताना तर गुफ्तगू पिक्चर आला की आम्ही त्याचा अक्षराच्या अर्थाप्रमाणे अभिनय करून दाखवायचो. म्हणजे दोन बोटं उभी करून दाखवायचो आणि मग पाहिलं आणि शेवटचं अक्षर सेम आहे असं सांगायचो. :P)

धडकन, चष्मेबद्दूर : या दोन शब्दांचे अर्थ माहित असले तरी त्या शब्दांच्या उच्चारांमुळे विचित्र किंवा विनोदी असेच जास्त वाटायचे. धडकन म्हणजे धाडकन वाटायचं आणि चष्मेबद्दूर म्हणजे ढापण्या किंवा चष्मिस वाटायचा.

ढल : 'ढलना' म्हणजे मावळणे हे कळेपर्यंत मी ते "ढल गया दिन, हो गई शाम" वालं गाणं चक्क "जल गया दिन, हो गई शाम" असं म्हणायचो. मला 'ढल' चा अर्थ माहित नसल्याने ते 'ढल' बरोबर ऐकूनही मला वाटायचं की आपण काहीतरी चुकीचं ऐकत असू आणि म्हणून मी तो 'ढ' चा 'ज' करून टाकायचो.

रैना, रूत : रैना म्हणजे रात्र आणि रूत म्हणजे ऋतू हे कित्येक रात्री आणि ऋतू सरले तरी माहित नव्हतं..

प्रियकर/प्रेयसी : (याला हिंदी शब्द काय बरं?? असो. बाय द वे, ईसवी सन १९९० नंतर जन्माला आलेल्या समस्त जनांनी समजण्यास सोपे जाण्यासाठी येथे बॉयफ्रेंड/गर्लफ्रेंड असे वाचावे.) : आता त्या प्रियकर/प्रेयसीला किती ते शब्द . जानु, जाने जहां, जाने जनाना, हमसफर, हमदर्द, शहेखुमा, जानम, सनम, जाने जिगर, यारा (यार माहित होतं) , दिलदार, जानेमन.. बापरे बाप.

बरखा, घटा, बहार, वादिया : या शब्दांचे नक्की आणि अगदी अचूक अर्थ खरं तर मला अजूनही माहित नाहीयेत. माहिती आहेत ते फक्त अंदाजे अर्थ.. आणि तसेही हे सगळे शब्द गाण्यांतच येतात म्हणा. त्यामुळे नाही कळले नीट तरी विशेष बिघडत नाही. पण तरीही "बहारो फुल बरसाओ" म्हटलं की फुलं कोण टाकणार किंवा "ये हसी वादिया" म्हटलं की नक्की छान काय आहे? (हसी म्हणजे हसणारा नव्हे.. विसरलात?), "काली घटा" म्हणजे नक्की काळं काय किंवा "बरखा बहार " (बोंबला दोन्ही शब्दांची बोंब आहे) म्हणजे काय बरं हे असे प्रश्न मला अजूनही पडतात. ज्यांना या शब्दांचे अचूक अर्थ माहित असतील त्यांनी कमेंटात टाका, जे माझ्यासारखे समदु:खी असतील आणि अजूनही (म्हणजे इतकी वर्षं झाल्यावरही या अर्थी नव्हे तर अनेक/खूप याअर्थी ) कित्येक शब्दांचे अर्थ माहित नसतील त्यांनीही कमेंटा, कोणीतरी उत्तर देईलच :)...

'एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ' किंवा हिंदीतच सांगायचं झालं तर 'मुझे लेके साथ चल तू, युंही दिनरात चल तू, संभल मेरे साथ चल तू, ले हाथोंमे हाथ चल तू, ओ साथी चल SSSSSS '

ताजा कलम (हा मूळ शब्द हिंदीत असला तरीही त्याचा योग्य अर्थ सगळ्यांनाच माहित असल्याने गोंधळ उडणार नाही) : मी जे वर दिलेल्या अनेक शब्दांचे मला बरोबर वाटलेले अर्थ दिलेले आहेत त्यातले अगदी सगळेच्या सगळे नाहीत तरी काही, बरेचसे अर्थ चुकले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे हसून झाल्यावर त्याचे योग्य अर्थ टाकलेत तरी चालेल.

गुलमोहर: 

Happy
वटवटा, तुझं हिंदी तर माझ्यापेक्षा ब्येस आहे रे भाऊ..... मी माझ्या (अ)ज्ञानाचे दिवे पाजळले तर ते कत्लेआम वगैरे काहीतरी होईल! Lol
नंद्या Uhoh बरखा आणि बाहर? मी अजून गोंधळात, बुचकळ्यात पडण्याअगोदर वाचवा रे मला कोणीतरी! Proud

हाण तिच्या मारी... Wink

वटवटा, तुझं हिंदी तर माझ्यापेक्षा ब्येस आहे रे भाऊ....>>> शेम टू शेम हिअर बर्का अकु...
आम्ही सोलापूरात वाढलेलो त्यामुळे खास सोलापूरी-हैद्राबादी ढंगाचं हिंदी बोलायचो.... तुमना तो कुचीच समजनेकुच नै आईंगा ऐसा Proud

अहो हे तर साधे हिंदी शब्द झाले. पण "सजदे तुम्हारी राहपे करती है कैकशाँ" हे ऐकून पुरी तीस वर्षे इतका चकरावून गेलो होतो की विचारू नका!
हे सजदे कोण आणि ते कैकशाँ करतात म्हणजे काय?
शेवटी मायबोली आली, नि दिनेशदांनी याचा अर्थ समजावून सांगितला.

आनखी अनेक शब्द म्हणजे, इंतकाम, इकरार, इफ्तदा, इबादत, इनायत, इत्तेफाक, इम्तेहाँ इ. इकारादि शब्द म्हणजे काय? बहुधा स्कूल ला इस्कूल म्हणणार्‍या लोकांची भाषा असावी असे वाटते.

जुफ्तजूं?

पण आजकाल मात्र लोकांचे हिंदी, उर्दू इतके सुधारले आहे की त्यांना मराठी कवितांऐवजी उर्दू कविताच अधिक आवडतात असे वाटायला लागले आहे.

वटवट्या Happy अप्रतीम जमलंय.

हिंदी भाषा इतकी समृद्ध असताना उगीचच उर्दू शब्द ठासून भरायचे पूर्वी, आताही भरतात, पण आता इंग्रजी शब्द घुसलेत जास्त.
एखादा न्यायाधीश निकाल देताना जेव्हा "ताझिरात-ए-हिंद के तेहेत..." वगैरे जड काहीतरी म्हणायचा, तेव्हा वाटायचं निकाल देतोय का निकाल लावतोय Proud

छान लेख, बादवे उर्दू ही १००% भारतीय भाषा आहे..... आणि भारत व पाकिस्तान सोडून दुसरीकडे कुठे ती बोलली जाते हे मला माहिती नाही...

http://en.wikipedia.org/wiki/Urdu

Happy अनेक उर्दू शब्द चित्रपटात ऐकायल मिळतात, जर त्याचवेळी अर्थ कळाला नाही तर आपल्या मनासारखा अर्थ लावल्यावर अनर्थ होउ शकतो. Happy

चष्मेबद्दूर बद्दल पु.ल. नी 'असा मी...' मध्ये पण असेच म्हटलय Happy

बाकी चित्रपटात येणारे या उर्दू शब्दांचा छान आढावा.

अम्या, दुसरा सोर्स मंद्या.. कुठच्या तरी साईटवरच्या गप्पागोष्टीत रिलायबली कळलं असणार ह्याला! Proud

वटवट Happy

सत्यवान, मजा आली वाचताना. संगे मर्मर याचा अर्थ मला साथ साथ मरना, असाच वाटायचा पुर्वी.

महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातले (बाटवलेले) मुसलमान, हट्टाने उर्दू बोलायचा प्रयत्न करतात. ते ऐकले तर अजूनच मजा येते. यु म पठाणांच्या काहि कथेत अशी भाषा येते,
बच्चांदाकी याद आतीया नव्हं, मुजेबी आतीया, अपने नसिबमे अल्लामियाँ ने उनका सुकच नई लिक्का, तो किसे कैते ? (कथा, जितराब )

कोल्हापूरात, एका बाईने, एका माणसाला ओरडून सांगितले होते, जाने वकुत आने होना.

काय असेल याचा अर्थ ?

जाताना येऊन जा ...