वर्षाविहार २०१० : दवंडी !!

Submitted by ववि_संयोजक on 8 June, 2010 - 00:34

पी.सी. ऑन करून आय-डी-१नं त्याच्या पुढ्यात बसकण मारली. तिचा नवरा आणि मुलगा आपापल्या कामाला निघून गेले होते. आता दिवसभर माबोवर टवाळक्या करायला ती मोकळी होती. तिनं माबोचं मुख्य पान उघडलं. लॉग-इन करण्यापूर्वीच तिचं एका गोष्टीकडे लक्ष गेलं. जागची उठून ती तडक फोनच्या दिशेला धावली. आधी आय-डी-२ ला फोन लावावा की आय-डी-३ ला? की परदेशात असलेल्या आय-डी-४ला विपू किंवा मेल करावी हेच तिला उलगडेना.
कॉल-लॉगमधे आय-डी-३चा नंबर दिसल्यावर तिनं आधी तिलाच फोन लावला.
माबोच्या मुखपृष्ठावर असं काय दिसलं आय-डी-१ला, ज्यामुळे तिनं तडकाफडकी आय-डी-३ ला फोन लावला?

----------

आठ वाजले होते. रोजच्याप्रमाणे आय-डी-३ला निघायला उशीर झाला होता. स्वतःची पर्स आणि दुपारच्या जेवणाच्या डब्याची पिशवी काखोटीला मारून आणि पाठीवर दप्तर लावलेल्या मुलीचं बखोट दुसर्‍या हातानं पकडून ती घाईघाईत घराबाहेर पडली. मुलीच्या शाळेच्या नव्या वर्षाचा आज पहिला दिवस होता. आज ८.१७ची फास्टही चुकणार बहुतेक या विचारासरशी कंटाळत, रेंगाळत चालणार्‍या मुलीच्या अंगावर ती खेकसणार इतक्यात तिचा फोन वाजला. कपाळावर सतरा आठ्या घालत, नाही त्या वेळेला फोन करणार्‍याला मनातल्या मनात हजार शिव्या मोजत तिनं पर्समधून फोन बाहेर काढला. आय-डी-१चा फोन होता. आदल्या रात्री झोपण्यापूर्वी अर्धा-पाऊण तास गप्पा मारूनही आता पुन्हा आय-डी-१ला काय सांगायचंय ते तिच्या लक्षात येईना. एकीकडे मुलीला शाळेच्या बसमधे चढवत तिनं फोन घेतला. ‘ब्रेकिंग न्यूज’च्या थाटात आय-डी-१नं तिला माबोच्या मुखपृष्ठावरच्या त्या गोष्टीबद्दल सांगितलं. ते ऐकलं मात्र आय-डी-३चा चेहरा झरझर बदलला. डोळ्यांत निराळेच भाव प्रकटले. बसच्या खिडकीतून डोकावणार्‍या मुलीला टाटा करायचंही भान तिला उरलं नाही. आता जी मिळेल ती ट्रेन, पण ट्रेनमधे चढल्यावर कुणाकुणाला फोन करून याबद्दल सांगायचं याचा ती विचार करायला लागली.
असं काय सांगितलं तिला आय-डी-१नं ज्यामुळे तिला ८.१७च्या फास्टचाही विसर पडला?

----------

सकाळची पहिली मिटींग आटोपल्यामुळे आय-डी-४ आता जरा निवांत होता. चहा घेता घेता त्यानं माबोला लॉग-इन केलं. आज एकच नवीन विपु दिसत होती. त्यानं विपुचं पान उघडलं. आय-डी-१नं माबोच्या मुखपृष्ठावरच्या त्या गोष्टीबद्दल कळवलं होतं. शेजारीच तिची नेहमीची दात विचकणारी स्मायली हजर होती. ‘तुला नाही, टुकटुक!’ टाईपचंही काहीतरी लिहिलेलं होतं.
ते वाचून आय-डी-४ स्वतःशीच गालातल्या गालात हसला. आपण अजूनही कसं सगळ्यांना मामू बनवून ठेवलंय या विचारानं त्याला गुदगुल्या झाल्या.
असं काय कारण होतं की ज्यामुळे आय-डी-१ची विपु वाचूनही आय-डी-४चा चेहरा झरझर बदलला नाही? त्याच्या डोळ्यांत निराळेच भाव प्रकटले नाहीत?

----------

ट्रेनमधे जंप करून पलिकडच्या दरवाज्याजवळ उभं रहायला जागा पटकवल्यावर आय-डी-३नं आधी आय-डी-२ला फोन लावला. आय-डी-१ कडे आय-डी-२ चा नंबर नव्हता म्हणून तिनंच त्याला आधी फोन करायला सांगितला होता.
सकाळची पहिली मिटींग आटोपल्यामुळे आय-डी-२ आता जरा निवांत होता. तो चहा घेत असतानाच त्याचा फोन वाजला. स्क्रीनवर आय-डी-३चं नाव पाहताच त्याला फोनचं कारण लक्षात आलं. पाच मिनिटांत दुसर्‍यांदा तो गालातल्या गालात हसला आणि अगदी ऐटीत त्यानं ‘हॅलो’ म्हटलं. ट्रेनच्या आवाजाच्या वर आवाज चढवत आय-डी-३नं आय-डी-१चा निरोप म्हणजेच माबोच्या मुखपृष्ठावरच्या त्या गोष्टीबद्दल त्याला सांगितलं. आपण अजूनही कसं सगळ्यांना मामू बनवून ठेवलंय या विचारात गुरफटल्यामुळे त्याच्या तोंडून "हो! आय-डी-१नं सांगितलं मला आत्ताच..." असं निघून गेलं आणि त्यानं जीभ चावली. ते ऐकून आय-डी-३चा चेहरा बावळट झाला. ती संभ्रमात पडली. तिच्या शेजारी उभी असलेली बाई तिच्याकडे विचित्र नजरेनं पहायला लागली.
आय-डी-३नं सांगितलेल्या गोष्टीऐवजी स्वतः केलेल्या यडपटपणामुळेच आय-डी-२चा चेहरा झरझर बदलला. डोळ्यांत निराळेच भाव प्रकटले.

----------

अर्ध्या तासांत पुन्हा आय-डी-३ चा फोन आलेला पाहून आय-डी-१ ला आश्चर्य वाटलं. आय-डी-२ आणि आय-डी-४ चा काहीतरी घोटाळा आहे हे कळताच दोघींनी बाकीच्या सगळ्यांना माबोच्या मुखपृष्ठावरच्या त्या गोष्टीसोबत हे ही सांगायचं ठरवलं.
आता तर त्या दिवशी अजून मजा येणार होती. आय-डी-२ ऊर्फ आय-डी-४ ला सगळे मिळून धुणार होते. डुप्लिकेट आय-डी बनवून सगळ्यांना व्यवस्थित गंडवणार्‍या आय-डी-२ ऊर्फ आय-डी-४ कडून सगळे जोरदार पार्टी कबूल करवून घेणार होते.

आय-डी-२ ऊर्फ आय-डी-४ चं पितळ उघडं पाडायला कारणीभूत ठरली होती ववि-२०१० ची दवंडी! आपण वाचलंय म्हणजे इतरही त्याबद्दल वाचतीलच हे लक्षात न घेता आय-डी-१ आणि आय-डी-३ सर्वांना त्याबद्दलच फोन करत सुटल्या होत्या.

मंडळी, तुम्हालाही कदाचित त्यांचा फोन येईल. पण आम्ही त्यापूर्वीच तुम्हाला सांगतो -

यंदाचा मायबोली वर्षाविहार आहे १८ जुलै २०१० यादिवशी.
यू.के.’ज रिसॉर्ट (U. K.'s Resort), खोपोली इथे !!!

तेव्हा आय-डी-२ ऊर्फ आय-डी-४ला धुवायला तुम्हीही येणार ना?

वर्षाविहाराच्या इतर सविस्तर माहितीसाठी http://www.maayboli.com/node/16976 हे पहा.
यंदाच्या मायबोली-टीशर्ट च्या सर्व माहितीसाठी http://www.maayboli.com/node/16873 हे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी सुद्धा येणार ! अंकल किचन रेसॉर्ट .. मस्त आहे. अष्टविनायकातल्या एका गणपती जवळचं ठिकाण. महडचा गणपती. , जवळच बघण्यासारखा मठ म्हणजे गगनगिरी महाराजांचा मठ अन प्रसिद्ध असलेला zenith वॉटरफॉल सुद्धा इथेच आहे जवळ. शीळ फाट्यावरून कर्जतला रोड जातो तिथून तर अप्रतीम दॄष्य दिसतं समोरच्या डोंगरांगाचं .. अगदी दुधाचे कुंभ त्या पर्वतावर ओतल्यासारखे ! तेव्हा मस्त center point place. मी अन माझ्याबरोबर एक नक्की !

लाडकी, असं नको करुस हे ठिकाण पुणे-मुंबई दोन्हीच्या मध्यवर्ती आहे. खोपोली पासून अगदी जवळ. बोरिवली पासून २.५ तास फार्फार तर. तू येच Happy

मी पहिल्यांदाच येते आहे. येवु का? कारण मी बघितल बर्यापैकी सगळ्यांचे ग्रुप्स आहेत. आम्हाला तुम्ही आपले म्हणाल का? Happy

लाडकी ह्या ठिकाणाहून बर्‍याच सोयी आहे ट्रान्सपोर्टेशनच्या..
एक मात्र खरं आहे, खोपोलीमधे भन्नाट पाऊस पडतो .. अगदी वेड्यागतं.
गुब्बी आपला अंताक्षरी ग्रुप आहेच की.. आपलं काय म्हणायचं त्यात .. कळपात शिरलं की आपोआप कळपाची होऊन जातात मेंढरं.

कविता... बघुयात... कारण गेल्या वर्षी सकाळी ५:०० ला सुरु झालेली माझी सहल रात्री १२:०० ला संपली होती... आणि माझ्यामुळे बिचार्‍या योगीला (योरॉक्स) मिरारोड दर्शन करत करत १:०० वाजता पोहचावे लागले होते... Sad

मस्त दवंडी Happy मी सुद्धा असंच आय्.डी. ६ ला दोनदा प्रत्येकी १५-२० मि. फोनून पकवलं आणि तिच्याकडून आय्.डी. ७ आणि ९ चे फोन नं मिळवले Proud

गुब्बी, असं काय गं ! अगं इथे दिसायला जरी वेगवेगळे ग्रुप्स, वाहती पानं, गावांच्या गप्पा दिसल्या तरी सगळे एकच आहेत. तू बिन्धास्त ये.

धन्स. मी नक्की येणार, पुण्यातुन कोणकोण येणार आहे रे??? सुकि, दक्षे, मंदार तुमचा काय रिप्लाय नाय. Proud

का गं नीरजा? कर की काहीतरी अ‍ॅडजस्ट. मला नेहमी आपण बसमधे केलेल्या धमालीची आठवण येते. तसेच "कृष्णउडी"ची पण Proud

कृष्णउडी..... Rofl
आत्ता एकदम आठवलं... ही ही ही!!
देखेंगे पण बहुतेक नाहीये जमण्यासारखं. खूपच जर तर आहेत गं... नाहीतर मी आलेच असते ना.

अरे वा आली का दवंडी... मस्त... Happy

गुब्बी,काळजी करू नकोस.. पुण्यातुन २०-३० लोकं तरी असतातच दरवर्षी.. आणि वर्षाविहार हा सर्व मायबोलीकरांसाठी असतो कोणा एखाद्या ग्रुपसाठी नव्हे.. त्यामुळे सर्वजण एक होऊन याचा आनंद घेत असतात... तू बिनधास्त ये.. तू नक्की एंजॉय करशील... Happy

नी, येण्याचा पूर्णतः प्रयत्न कर गं...

Pages