हाफ राईस दाल मारके - क्रमशः - भाग १८

Submitted by बेफ़िकीर on 25 May, 2010 - 05:58

पराकोटीच्या सावधपणे केलेल्या नेत्रपल्लवीमुळे दिपू अन काजलचे रहस्य अजून रहस्यच होते. संशय फक्त समीरला यायचा पण तो केव्हाच वडाळा भुईच्या एका ढाब्यावर कामाला लागलेला होता. बाकी रामरहीम ढाब्यावर दिपू सकाळी नऊ ते रात्री दहा किंवा दुपारी तीन ते पहाटे तीन असा कामाला असायचा.

ज्या ज्या वेळि यशवंतला रिलीव्ह करायला काजल चिवड्याच्या दुकानात यायची तेव्हा दिपू बाहेर चकरा मारायचा. पण बर्‍याचदा गल्ल्यावर पद्या असल्यामुळे काजलकडे बघण्याची हिम्मत व्हायची नाही. उगाच आपला जाऊन यायचा अन जमली तर एखादी नजर टाकायचा.

रात्री खिडकीतून रोज दहा वाजायच्या सुमारास मात्र दोघे एकमेकांकडे डोळे भरून पाहायचे. त्या पाहण्यातच दिवस सार्थकी लागायचा.

नाश्त्याच्या वेळेला अबूचे जोक्स अन झरीनाचाचीचा भांड्यांचा आवाज यात अन सगळ्यांच्या सान्निध्यात असताना फार तर पाच सहाच वेळा पाहता यायचे. नंतर दिवसभरात कितीही प्रयत्न केले तरी नुसते एकमेकांना एकमेक जाता येता दिसायचे तेवढेच!

मात्र, या गुप्ततेचा परिणाम असा झाला होता की प्रेमाची तहान अन तीव्रता वाढूच लागल्या होत्या. महिन्यातून एखादवेळेला काजल सगळ्या खोल्यांच्या मागच्या अंधार्‍या जागेत मिनिटभर यायला तयार असायची. मग दिपू अन ती एकमेकांना कडकडून भेटत असत. मात्र काही सेकंदातच काजल त्याला दूर सारून दुसर्‍या बाजूने खूप लांबून वळसा घालून ढाब्याच्या एकदम बाहेरच पडायची. आणि दिपू काहीच झाले नसल्याच्या थाटात इकडे तिकडे बघत पुन्हा ढाब्यावर यायचा.

ती सतत तेथे येते नाही यावरून दिपू चिडायचा अन ती हसायची. पण केवळ असे भेटणेच पुरेसे नाही हेही दोघांना माहीत होते. त्यांना ओढ लागली होती कधी आता पुन्हा काजलच्या लग्नाचा विषय सिरियसली निघतो. कधी ती निराश असल्यासारखे दाखवत आलेल्या मुलासमोर जाणारच नाही असे म्हणते, कधी एकांतात सीमाकाकू तिला विचारते की तुझ्या मनात कुणी आहे का अन कधी ती हळूच सांगते की दिपू तिला आवडतो.

कोणत्याही मेकअपशिवाय काजल सुंदर दिसते याची सीमाकाकूला कल्पना होती. तिला आपल्या मुलीचा कोण अभिमान वाटायचा. अती जपायची ती मुलीला. अन यशवंत आणखीनच! इतकी सगळी मुले असतानाही काजलबाबत कुणाच्याही मनात तसले विचार आले नाहीत याचे दोघांनाही समाधान वाटायचे.

लाल रंगाची साडी आणल्याला आता तीन महिने झाले होते. पण एकदाही तिला ती नेसून दिपूला दाखवता आली नव्हती. कारण तसा प्रसंगच येत नव्हता.......

..................... आला... तोही आला...

खरे तर चाचाच्या लग्नाचा पंचविसावा वाढदिवस ढाब्यावरच केला असता तर योग्य ठरले असते. पण.. त्याच्या बायकोचे असे म्हणणे होते की सगळीच फंक्शन तिकडे केली तर नाशिकमधील आपल्या घराच्या आजूबाजूला राहणार्‍यांना बोलावणे कधी होणार! इतकी वर्षे आपण इथे राहतो, तुम्ही कायम ढाब्यावर असता.. मग आमचे त्यांच्याशी स्नेहसंबंध जुळतात, वेळेवेळेला हे लोक मदतही करतात काही लागले तर.. आपण यांनाही सहज येता येईल अशा ठिकाणी एखादा कार्यक्रम करायला नको का??

आणि एके रात्री घनघोर चर्चेनंतर ठरले...

चाचा, अबू, यशवंत, सीमा, काजल, प्रदीप, वैशाली, बाळू, मनीषा, अंजना, झिल्या अन रमण..

इतक्या लोकांनी एका मिनी बसमधून नाशिकला जायचे.

ढाब्याचा प्रमुख काशीनाथ!

काशीनाथ, विकी, दादू, दिपू, मन्नू अन साखरू तसेच वैशालीची सासू या लोकांनी ढाब्यावरच राहायचे.

एकटा काशीनाथ भटारखान्याला पुरेसा होता. विकी हा झिल्याचा नेक्स्ट असल्यामुळे तो गल्ल्यावर व मन्नूला चिवड्याचे दुकान सांभाळण्याचा अनुभव असल्यामुळे तो दुकानावर!

दादू, दिपू अन साखरू यांनी एक दिवस खिंड लढवायची ऑर्डर्स घेण्याची अन सर्व्ह करण्याची!

काय वाट्टेल ते झाले तरी दिपूचा नंबर काही मिनी बसमधे लागत नव्हता. दिपूने अनेक कारणे व उपाय सांगीतले. सगळे रस्से आदल्या रात्रीच करून ठेवू, मलाही नाशिक बघायचेच आहे, उद्या कुठे इतकी गर्दी होणार आहे.. अंहं! कुणी ऐकेचना! काजल मात्र त्याचे ते प्रयत्न पाहून गालातल्या गालात हसत होती.

ती हासत आहे हे पाहून तो आणखीनच चिडत होता.

मग दिपूने विविध नावांवर कसे फुल्या मारणे जरूरीचे आहे याचा पाढा वाचून पाहिला.

पद्यादादा जायेंगा तो गल्ला कौन देखेंगा.. विकी किधर बैठा हय आजतक गल्लेपे

नाही पचली कल्पना!

झिल्याकोतो रयने दो ना.. हम सब नये हय...

नये? नये या उल्लेखावर चाचा सोडून सगळे हसले. सात वर्षे झालेला मुलगा नवा कसा??

रमणचाचाको जगह हय क्या??

तर म्हणे भरपूर जागा आहे. मग मला का नाही नेत च्यायला..

धड कुठलं नाव रद्दही होत नाही अन आपली वर्णीही लागत नाही हे त्याला समजून चुकलं!

मै सेपरेट ऑ क्या? जीपमे??

तू यायचंच नाहीयेस तर सेपरेटचा काय प्रश्न आहे अन न्यायचं असतं तर बसमधूनच नेलं नसतं का असं पद्याने विचारलं!

म्हणे न्यायचंच नाहीये..

भयंकर वैतागला दिपू! त्यात मधेच एकदा काजलने 'बीस सालके उपरके सब जारहे' असे वाक्य टाकून त्याच्या जखमेवर मीठ चोळले. खाऊ का गिळू असा तिच्याकडे पाहात होता तो.

कशात लक्षच लागेना! शेवटी एकदाचे रात्रीचे दहा वाजले. सगळेजण उद्या सकाळी सहाला निघणार! दिपूने खिडकीतून काजलच्या खिडकीकडे पाहायचे नाही असे ठरवले. तरी लक्ष जात होतेच. तेवढ्यात ती तिच्या खिडकीत आली. तिला समजले की हा आत्तापर्यंत इकडेच पाहात होता, आपण आलेले पाहिल्याव्र आता पाहात नाहीये. दिपूने पटकन नजर वळवल्यावर त्याला तिच्या हसण्याचा आवाज ऐकू आला. पुन्हा त्याने पाहिले तर ती तोंडावर हात ठेवून खुसखुसत होती.

वैतागात असताना झोप न आल्यामुळे रात्रभर तळमळत असलेला दिपू कुणीतरी दार वाजवले तेव्हा उठला. बाहेरून झिल्या ओरडत होता. 'ओय दिप्या... उठे.. ल्येका गाडी आलीय.. हम चल्या सब'

चल्या तर जा की? मला कशाला सांगताय? एकतर नेत नाही. त्यात काजलला घेऊन जातात. मी नाही उठणार!

बाहेर बराच गलका चालला होता. हे रत्न अजिबात गेलं नाही तिकडे! बस आलेली होती. उगाचच गोंधळ चालला होता. मधेच कुणीतरी येऊन याच्या दारावर थापा मारून जात होते. एकदा तर काजलच आली. तिने बाहेरून हाक मारली.

'मै चली दिपक.. रातमे नय तो कल सुभा मिलेंगे.. बर का???'

पंधरा मिनिटांनी गलका थांबला. बस निघून गेल्याचा आवाज आला. मग हे उठले अन आज बरेच दिवसांनी ओढ्यावर आंघोळ करून आले. काशीने मस्त चहा केला होता. दादू, मन्नू अन साखरू उगाचच 'आता ही बस किती वाजता नाशिकला पोचेल' यावरून महाराष्ट्राच्या हमरस्त्यांच्या कंडिशनची चर्चा करत बसले होते.

दहा वाजता तुरळक गिर्‍हाईक चालू झाले तेव्हा काशीच्या हातांना तुफान वेग आला. दिपू उगाच इकडे तिकडे फिरून ओर्डर्स घेत होता.

आणि अचानक सव्वा दहाला काशीने दिपूच्या हातात एक बासुंदीची वाटी ठेवत म्हणाला...

काशीनाथ - ये ले.. फ्रेश बनाया.. जा.. काजलको देके आ.. अकेली हय.. कुछ खायी नय होएंगी सुबयसे...

इक ना इक दिन ये कहानी बनेंगी.. तू मेरे सपनोंकी रानी बनेंगी...
इक ना इक दिन ये.. कहानी...

ढिंपाक ढिपांग.. ढिंपाक ढिपांग..

आज फिर जीनेकी तमन्ना हय.. मरनेका इरादा हय.. सब हय...

अत्यंत उदासवाणा, काजलकडे जायचा कंटाळा आला आहे असा चेहरा करून दीपकराव हातात बासुंदी घेऊन काजलच्या दारात पोचले.

च्यायला.. गेलीच नाही? का?

दार वाजवल्यावर आतून कडी काढून काजल पुन्हा दाराकडे पाठ करून खाली बसली अन स्वतःचाच उजवा गुडघा चोळत बसली. चोळताना 'आई गं.. आई गं' करत होती.

दिपू - क्या हुवा??
काजल - आ... आ.. आई....
दिपू - अरे क्या हुवा क्या??/
काजल - मरी मय... आईईईई आईई... आईगं..
दिपू - गिरी क्या?? ओ काशीचाचा...
काजल - आ... आई..

सगळा स्टाफ अन वैशालीची सासू पाच मिनिटात जमा झाले. 'डबा काढताना स्टूल घसरले अन मी आपटले, गुडघ्यातून प्रचंड चमका निघतायत' हे काजलने स्पष्ट केल्यावर वैशालीच्या सासूने तिच्या गुडघ्याला काहीतरी लावून दिले. त्याचा परिणाम उलटाच झाला बहुधा! काजल आणखीनच ओरडायला लागली. आता करायचे काय? सगळे तर निघून गेलेले... लीडर काशीनाथ होता...

काशी - मौसी.. आप इसको लेके हय ना?? पिंपळगावको जावो.. उधरच दवापानी करो.. यहा हम कुछबी करते रहेंगे और इसपर कुछ अलगच असर गिरेंगा तो??

अशा रीतीने मावशी शेवटच्या क्षणी कटाप करण्यात येऊन आशिक दीपक अण्णू वाठारे अन माशुका काजल यशवंत बोरास्ते यांना एका शेअर जीपमधे बसवून देण्यात आले. अर्थातच, काजलला 'कसेबसे' बसवले कारण ती किंचाळतच होती. सकाळची पावणे अकराची वेळ असल्यामुळे जीपच्या पुढच्या सीटवर एक टोपीवाला म्हातारा अन मधल्या सीटवर दोन बायका होत्या इतकेच प्रवासी! हे दोघे मागच्या सीटवर बसले. किंचाळत काजलने मुसमुसून रडायला सुरुवात केली. जीपमधील लोकांनी काहीतरी व्हर्बल व हर्बल उपाय सांगीतले. पण तेवढ्यात जीप सुरू झाली.

आणि केवळ दहा मिनिटांनी तिच्याकडे भेदरून पाहणार्‍या दिपूकडे बघत काजलने एक मस्त...

.... डोळा मारला..

कितना हसी हय मौसम.. कितना हसी सफर हय..
साथी हय खूबसूरत.. ये मौसमकोबी खबर हय...

या आक्रंदणार्‍या मुलीच्या वेदना अचानक कशा थांबल्या यावर जीपमधे चर्चा झाली. तेव्हा काजल लाजून मागच्या सीटच्या खिडकीतून मागे जाणार्‍या रस्त्याकडे तर या चर्चेवर आपण काय बोलावं या गोंधळात दिपू जीपच्या पुढच्या काचेतून येणार्‍या रस्त्याकडे पाहात होते.

आणि पिंपळगावला त्या दोघांमधले कुणीच उतरले नाही. उलट ते गेले वडाळी भुईच्या दिशेने..

आणि.. दिपूला आस्मान ठेंगणे झाले होते. ज्या बुद्धीचा आपल्या अभिमान वाटतो ती काजलच्या बुद्धीपेक्षा फारच कमी आहे हा साक्षात्लार त्याला झालेला होता.

आणि मुख्य म्हणजे.. निदान रात्रीचे आठ वाजेपर्यंत तरी आज काजलचा भरपूर सहवास मिळणार होता व तोही तिच्याच शक्कल लढवण्यामुळे हेही त्याला समजले होते.

मात्र आता.. काजल त्याच्या नजरेशी नजरच मिळवत नव्हती. आणि.. तो तिचा चेहरा सोडून दुसरे काही पाहातच नव्हता.

वडाळी भुई बसस्थानक! कोपरा अन कोपरा माहीत होता दिपूला वडाळी भुईचा! अन काजलला वडाळी भुईला एक शंकराचे देवस्थान आहे इतकेच माहीत होते. तिला त्या देवळात एकदा दिपूबरोबर जायचे होते. ते देऊळही दिपूला माहीत होते. पंचाईत एकच होती. तिथे तुकाराम, कांबळे, पंक्चरवाला कुणी नेमके भेटले अन आग्रहाने घरी नेले तर अवघड होणार होते. कारण हे दोघे आले होते व मुलीला काहीच वेदना होत नव्हत्या हे पुढेमागे समजले तर मोठा प्रश्नच निर्माण झाला असता. त्यामुळे स्थानकातून केवळ क्षणार्धात दिपूने काजलला बाहेर काढले व एका शेअर रिक्षात बसले. तरीही, त्या स्थानकावर काजलसारखी मुलगी बघायला मिळाली म्हणून अनेकांचे डोळे विस्फारलेले होते.

शेवटी एकदाचे शंकर मंदिरात पोचल्यावर दोघांनी नमस्कार केला अन काजल म्हणाली..

काजल - चल अब.. वापस जाते..
दिपू - कायको?? (इतकी सुवर्णसंधी अशीच सोडायची?)
काजल - म्हंजे? घेतलं की दर्शन??
दिपू - मी कुठे घेतलं?
काजल - का?
दिपू - तुझं...
काजल - हं! माझं काय दर्शन घ्यायचं? रोजच्व्ह घेतोस की??
दिपू - जवळून..

एकाचवेळेस सुखावणारी पण लाजवणारी कल्पना होती ती! काजलच्या चेहर्‍यावर दोन्ही रंग एकाचवेळेस आले. दिपू बघतच राहिला.

काजल - चल चल्ल.. रिक्षेत बसू..
दिपू - ह्यों घाटके उपरसे भोत अच्छा दिखता.. तेरेको दिखाता मय .. चल..
काजल - अब कुछ नय.. सब राह देखरहे होएंगे.. चल जल्दी..
दिपू - दस मिनीट लगते.. चल्ल..

सरळ तिचा हात धरून दिपूने एका टेकाडाकडे जायला सुरुवात केली. आजूबाजूच्या प्रौढ बायका ते दृष्य पाहून नाक मुरडत होत्या. म्हातारे डोळे वटारून पाहात होते तरुण मुली 'आपण अशा का दिसत नाही' याचा विचार करत होत्या. रिक्षेवाले अन काही टवाळ माणसे डोळे मारून एकमेकांकडे पाहात होती. तरुण पोरे दिपूच्या भाग्याचा हेवा करत होती.

दहा मिनीटे कसली? घामाघूम होत अर्ध्या तासाने एका उंच टेकडीवर ते आले. हिरवीगर्द झाडे होती. टेकडीवरून वडाळी भुईचा परिसर तर मस्त दिसतच होता पण मागच्या बाजूला खाली जमीनीवर एक तळे होते ते तर वरतून सुरेखच दिसत होते. थंडगार वार्‍याने शीण नष्ट झालेला असताना दोघेही ते तळे बघतच बसले.

पाच दहा मिनिटांनी आता उतरूयात असे काजल म्हणत असताना दिपू एका झाडाखाली 'दमलो' असे म्हणून बसला. मग तिनेही विचार केला. अशी वेळच मिळत नाही. निदान पोटभर गप्पा तरी माराव्यात.

काजल - थक गया इतनेमे?
दिपू - मस्करी मत करत जा.. (ती हसू लागली.)
काजल - मस्करी नय.. मैबी थक गयी हय..
दिपू - पानी लेके आना चाहिये था..
काजल - नीचे जाके पियेंगे ना..
दिपू - तू गयी क्यों नय?
काजल - अब पूछ रहा हय.. आपल्याला देवळात येता यावं म्हणून..
दिपू - तो कालच क्यों नय बोली??/
काजल - तुझ्या चेहर्‍यावरून कुणीपण ओळखलं असतं.. भानगड हय करके..

दुपारचा दिड वाजला होता. पण अजिबातच ऊन नव्हते. उलट गार वार्‍यामुळे किंचित थंडीच वाजावी अशी परिस्थिती होती.

काजल - परसो बाबा कय रहे थे.. लडका देखरहे करके..
दिपू - तू..
काजल - अं? क्या?
दिपू - अबी.. बोल देंगे क्या सबको??
काजल - नही दीपक..
दिपू - कायको?
काजल - तू गुस्सा नय करेंगा ना?
दिपू - अंहं!
काजल - देख.. पयले तो उमरमे मै बडी हय.. उसके बाद हम खातेपीते घरके है.. तू मेरेसे उमरमे दो साल कमबी है और अभी अबी तेरा पगार...
दिपू - लेकिन.. मै छोटा हय तबबी तू..
काजल - मै करतीच ना प्यार.. मै कहा नही बोलती हुं??
दिपू - तो बतानाच पडेंगा ना? नही तो वो लोग तेरी शादी ठहरायेंगे..
काजल - ते तर हायेच.. आणि.. मीपण फार वेळ लांबवू नय शकणार...
दिपू - मग?
काजल - तरी.. रुकना तो पडेंगाच..
दिपू - लेकिन.. अचानक लडकेवालोंको लेके आगये तो???
काजल - मै बी भोत रोती रातमे..
दिपू - रोती हय?
काजल - रात रात भर रोती हय मै...
दिपू - कायको??
काजल - अगर.. हमारी शादी नय हुवी तो..??
दिपू - ऐसे कैसे नय होंगी?? मै भगाके ले जाऊंगा.. तेरेको..
काजल - ऐसा मत बोल..
दिपू - मतलब??
काजल - दुनिया सोपी नस्ती..
दिपू - म्हंजे?
काजल - असे भगाके ले जाके शादी करेंगे तो तेरेको भोत मारेंगे.. मै देख नय सकेंगी..
दिपू - कौन मारेंगे?? किसलिये??
काजल - मेरे बाबा.. गाववाले.. सब..
दिपू - का पण?
काजल - वो जातमेच शादी करते है..
दिपू - जात? उसमे हम लोगां क्या करसकते? अलग अलग जात हय तो???
काजल - दो साल तो रुकनाच पडेंगा दिपू..
दिपू - तेरा प्यार हयच नय.. दो सालमे तो कई बार तेरे लिये लडकेवाले लायेंगे वो...
काजल - ऐसा मत बोल दिपू..
दिपू - तो दो साल कायको??
काजल - दो सालमे तू पैसा जमा करेंगा? एक छोटा कमरा बी लेले भाडेसे.. तो मै कुछ बोल सकेगी..

विचारात पडलेल्या दिपूच्या कपाळावरील घर्मबिंदू काजलने ओढणीने पुसले अन त्याच्या केसांतून हात फिरवला.

दिपू - ढाबेपे.. घर हयच की?
काजल - वो तेरा नय..मुलाचे स्वतःचे घर नको काय?
दिपू - मेराच हय..
काजल - अंहं! चाचानी दिलंय राहायला.. उद्या नोकरी सोडली तर नय मिळणार राहायला तिथे?
दिपू - नोकरी?
काजल - मग? नोकरीच करतोस की तिथे..!
दिपू - पण.. नोकरी.. छोडेंगा कैसा मै?
काजल - दुसरी बडी मिली तो लोग पयलेकी छोड देते..
दिपू - मै तो सोचच नय सकता ढाबा छोडनेका..

दिपूच्या तोंडातून फार महत्वाचे वाक्य बाहेर पडले होते. या ढाब्यावर त्याला निवारा अन प्रेम मिळाले होते. त्याची तुलना मिळणार्‍या पगाराशी होऊच शकत नव्हती. अन ते प्रेम त्याला तेव्हा मिळालेले होते जेव्हा त्याच्या स्वतःच्या आईने तेच प्रेम नाकारलेले होते.

गार वार्‍याने काजलचे सोनेरी केस भुरभुर उडत होते. एका हाताने केस सावरून एका हाताने ती गवताची एक काडी घेऊन नकळत दिपू - काजल असे गवतावरच लिहीत होती. दिपूचे तेथे लक्षच नव्हते. पण.. गवतावर अक्षरे उमटतात थोडीच? काजल आपली अक्षरे लिहून मनातच हसत होती.

काजल - कल काशीचाचा कय रहा था.. मेरे जितनी सुंदर लडकीच नय देखी..

काजलने हसत हसत विषय बदलला.

दिपू - तो?? उसमे क्या? नयच देखी?
काजल - तुने कबी नय कहा..
दिपू - क्या?
काजल - मै कैसी लगती??
दिपू - तू...
काजल - बोल ना...
दिपू - अच्छी लगतीय..
काजल - बस? सिर्फ अच्छी?
दिपू - मतलब.. अब.. सब कैसे बोलेंगा मै?
काजल - आहाहाहाहा.. लडका होके मेरेसे जादा शरमाता तूच हय..हय की नय??
दिपू - शरमानेका क्या हय उसमे? अब तू पुरीच तो अच्छी लगती तो क्या क्या बतानेका??

काजल खळखळून हसायला लागली.

काजल - पुरीच मतलब?
दिपू - यहांसे यहांतक..
काजल - कहांसे?
दिपू - ये.. तेरे बालसे.. तेरे पैर तक..
काजल - तो फिर रय क्या गया?
दिपू - तो मै वहीच तो बोल रहा.. तू पुरीच अच्छी लगतीय..

काजल पुन्हा हसायला लागली.

दिपू - सारखी हसते काय गं वेडी बाई असल्यागत?

आता काजल अधिकच जोरात हसू लागली.

काजल - तेरेको याद नय आती मेरी?? रातमे? ... और ढाबेपे?
दिपू - आती की..
काजल - तो? बात क्युं नय करता आके?
दिपू - यशवंत चाचा पिटेंगे..
काजल - रातमे खिडकीमे क्युं खडा रयताय?
दिपू - ऐसेच.. हवा आती..

आता दोघेही हसायला लागले.

दिपू - तू कायको खडी रयतीय??
काजल - ऐसेच.. हवा आती करके..

काजल - चल.. जाते अबी..
दिपू - अबी तेरे पैर की दवा हुवी नय..
काजल - कौनसा दवाखाना बोलनेका पिंपळगावका?
दिपू - अबूबकर क्लिनीक..

दोघेही पुन्हा हसायला लागले.

काजल - कल मां कय रही थी.. दिपूने लायी साडी क्युं नय पयनी
दिपू - हां.. मै बी वहीच पूछनेवाला हय..
काजल - कधी नेसणार? लग्नात नेसेन..
दिपू - कुणाच्या?
काजल - माझ्याच..
दिपू - तुझ्या म्हंजे? अपनीच शादी होनेवाली हय ना?
काजल - ह्यं.. ऐसे बावळटसे कौन शादी करेंगा..

हे म्हणून काजल पळत सुटली. दिपूही तिला पकडायला धावत सुटला. बर्‍याच वेळाने एका झाडापाशी ती दमून थांबली. आपण बरेच आत आलो आहोत याचे दोघांनाही भान होते. पण ही टेकडी सुरक्षित होती. इथे भीती काहीच नव्हती.

दिपूने धाव्त येऊन तिला धरले अन गदागदा हलवले..

दिपू - मै बावळट हय?
काजल - नय.. नय.. नय.. अरे.. आ.. छोड.. छोड मेरेको..

दिपूने तिची वेणी धरली होती. काजलने अलगद वेणी सोडवून घेतली अन हसत झाडाच्या बुंध्यापाशी बसली.

काजल - कितना छेडता है.. लडकी को ऐसा छेडना अच्छा नय..
दिपू - तू कुछबी बोलती हय वो चलता है क्या?
काजल - ई.. ये क्या है??
दिपू - किडा है.. चल.. वो पेडके नीचे बैठते..
काजल - अबी जाते है दिपू... भोत देर होगयी..
दिपू - नय.. फिर तू छे मयने बात बी नय करती..
काजल - मै तेरेको हसती हय तो मेरेसे क्युं बात करना चाहता है??
दिपू - बावळट हय तो बावळटसेच बात करेंगा ना?

आता काजलने त्याला धपाटे मारले.

काजल - कल क्युं हस रहा था नाश्तेपर?
दिपू - अबू कुछबी बोलता..
काजल - चाचा हसेच नय क्या कबी?
दिपू - अब देख... मेरेको आकेबी सात एक साल हुवे होएंगे.. सामने तो नय हसते..
काजल - सामने मतलब?
दिपू - अबू कयताय की वो अकेले अपने कमरेमे जाके रातमे हसते हय..

काजलची हसून हसून मुरकुंडी वळली.

दिपू - कितना सुंदर हसतीय तू??
काजल - कितना?
दिपू - एक बार हस ना और...

पुन्हा काजल हसू लागली.

काजल - चल अब.. सब काळजीत असतील..
दिपू - वहा जाके क्या करनेका हय..
काजल - क्यों?? अंजना मिलेंगी ना...
दिपू - ह्या..
काजल - तेरेको वोच अच्छी लगतीय ना?
दिपू - वेडी झाली का?
काजल - बाळूदादाची मुलगी किती गोडय नय?
दिपू - मेरेको दिखाईच नय देती..
काजल - क्यों?
दिपू - मनीषाताईके गोदमे रयतीय और वो आचलसे ढाकके रखती उसको..
काजल - सारखं पीछे कशाला बोलवतोस मला?
दिपू - मग? भेटतच नय तू..
काजल - अब मै आनेवालीच नय हय पीछे.. कुणी पाहिलं तर??
दिपू - असे कसे पाहिल? मी तर म्हणतो रोज एकदा तरी यायला पाहिजे..
काजल (वेडावून दाखवत) एकदा तरी यायला पाहिजे.. आई बडवेल मला.. कळलन तर..
दिपू - कुणाला नय कळत..
काजल - कशाला भेटायचं पर?
दिपू - मला..
काजल - हं..
दिपू - .....
काजल - बोल ना...
दिपू - ... अच्छा लगताय..
काजल - (खुसखुसत) .. क्या??
दिपू - तेरे पास आना...
काजल - बस??
दिपू - और..
काजल - और क्या??
दिपू - किस लेना..

काजल जोरजोरात हसायला लागली.

काजल - तेरेको कहासे पता चला हा शब्द??
दिपू - वो.. पद्या बाळ्या का मजाक कर रहा था तब सुना..
काजल - जवान लडकीका ऐसे किस नय लेते..
दिपू - जितनी चीजे अच्छी लगतीय वो नय करनेकी.. फिर कायको प्यार करनेका??

काजलने हसत मान फिरवली.

दिपू - उधर क्या देखतीय?? मै क्या पुछ रहा??
काजल - मालूम हय ना?
दिपू - क्या?
काजल - तू बावळटेस ते..??
दिपू - आता खरच मारेन हां??
काजल - बावळट्टच आहेस..
दिपू - का???
काजल - अगर अच्छा लगता हय तो...
दिपू - क्या?? बोल ना?? एक तो खुद नय आती.. और अब हस रही हय..
काजल - बावळट..
दिपू - दुबारा बावळट मत..
काजल - अबी तो इधरच हय ना मै???

ही आपल्याला हिचा किस घ्यायला प्रवृत्त करत आहे हे दिपूला समजले तेव्हा काजल पळत पळत आणखीन दूर गेली होती. मग दीपक अण्णू वाठारे घाईघाईत उठले अन धावत तिच्या मागे निघाले. पुन्हा बरेच आत गेल्यावर तिला पकडण्यात दिपूला यश आले. मात्र यावेळेस ती खाली बसली नाही. दिपूने उभ्याउभ्याच तिला कवटाळले.

घमघमत्या केसांचा स्पर्श नाकाला झाला तशा दिपूला गुदगुल्या झाल्या. त्याने आपल्या दोन्ही हातांनी तिला सर्व शक्ती पणाला लावून मिठीत घेतले. तिच्या सायीसारख्या गालावर ओठ टेकवले तेव्हा तिची मिठीतून सुटण्याची धडपड चालूच होती. मात्र दिपूचे ओठ तिच्या ओठांवर रुतल्यावर ती धडपडही संपली.

ते प्रदीर्घ चुंबन आवरते घेतल्यावर दिपूने तिला खाली बसवले तेव्हा ती विस्कटलेल्या केसांमुळे अधिकच छान दिसू लागली होती.

दिपू - तू.. मेरीच रहेंगी ना काजल.. किसीसे शादी मत करना.. हां??

काजलने त्याच्या छातीवर डोके टेकवले. दिपूने पुन्हा तिचा चेहरा वर करून तिच्या डोळ्यात पाहिले.

मिठी किंचित सैल असली तरी तशीच होती. काजलचे डोळे झुकले...

दिपू - बोल ना.. बोलती क्युं नय?
काजल - तेरी हयच ना मै? फिर बोलनेका क्या???
दिपू - किसी औरसे शादी नयना करेंगी??
काजल - अंहं! कबी नय..
दिपू - मेरेको छोडेंगी नही ना?
काजल - .. नय...
दिपू - कसम?
काजल - तेरी.. तेरी और मेरी.. अपने प्यारकी कसम.. दिपू.. लेकिन.. तूबी नही छोडेंगा ना मुझे?
दिपू - मै छोडेंगा तो मर जायेंगा मै..
काजल - ऐसा मत बोल..
दिपू - लेकिन.. चाचाने तेरी शादी तय की तो...??
काजल - .. तो.. जिस दिन शादी पक्की होयेंगी.. मै और तू...
दिपू - क्या?? बोल ना??
काजल - जहासे होंगे.. किधरबी भाग जायेंगे..
दिपू - फिरसे बोल??
काजल - भाग जायेंगे हम..
दिपू - तू .. मेरी हय ना?
काजल - .. हं.. और तुम मेरे..

तब्बल पंधरा मिनीटे तसेच बसल्यानंतर अन दोघांनाही एकमेकांच्या मनातील भावना स्पष्टपणे समजल्यानंतर ...

तिच्या निकटच्या सहवासाने..

आधीची शुद्ध प्रेमाची भावना हळूहळू लोपत दिपूच्या मनावर वासना पसरू लागली...

दिपूने ती गुदमरून जाईल इतकी चुंबने घेतल्यानंतर हळूहळू तिच्या कमीजच्या बटणांकडे हात सरकवला.

खाडकन भानावर आलेली काजल उठून उभी राहिली. आपली ओढणी अन केस सावरेपर्यंत तिला दिपूने पुन्हा खाली खेचली..

आणि मग.. त्याच्या वाढत्या आवेगासमोर तिच्या नकळतच ती शरण जाऊ लागली..

आज.. दिपूला एकदाही अंजनाची आठवण आली नाही..

युगानुयुगे स्त्री व पुरुष कोणत्या आकर्षणाने एकमेकांकडे ओढले जातात याचे प्रत्यक्ष ज्ञान आज दोघांनाही मिळाले होते. तो प्रसंग पार पडल्यानंतर कित्येक मिनिटे ते तसेच पडून होते. बराच वेळ झालेला आहे, आपल्याला तहान लागलेली होती.. काहीही आठवत नव्हते.. एक वेगळीच तहान भागली होती..

काजल सुस्तावल्यासारखी पडून दिपूच्या डोळ्यात डोळ एघालून पाहात होती. दिपू तिला मिठीत घेऊन कुठेतरी शुन्यात पाहात होता. दिपूच्या चेहर्‍यावर 'आपण चूक केली' असे भाव होते तर काजलच्या चेहर्‍यावर 'आपल्या आवडत्या व्यक्तीला आपण आपले सर्वस्व अर्पण केल्याचे' समाधान! तिला हे नक्की माहीत होते.. तिने जर ठरवले असते तर दिपू पुन्हा ढाब्यावर पोचेपर्यंत तिला हातही लावू शकला नसता. पण आज त्या वातावरणात तिनेही दिपूची मनापासून साथ द्यायचे ठरवले होते.. किंबहुना तसे तिला ठरवावेवेसेच वाटले होते..

एकमेकांच्या शरीराचे गंध, ऊब अन ओढ संपतच नव्हती. दिपू पुन्हा तेच करायला लागणार अशी चिन्हे दिसू लागली होती.. मात्र.. हाफ राईस दाल मारकेचा आत्तापर्यंतचा सर्वात वाईट प्रसंग त्यावेळेस घडला...

शिव्या देत अचानक एक टोळके तिथे आले.. त्यांनी दिपूला उचलून उभा केला अन त्याला बडवायला सुरुवात केली....

त्यातील एकाने मात्र काजलच्या गालावरून हात फिरवला. तिचे सगळे लक्ष दिपूकडे होते. त्याला मारू नये म्हणून ती मधे पडली. तिच्या लुसलुशीत शरीराला धरून तिला बाजूला करताना त्या टोळक्याने आपली घाणेरडी वासना पूर्ण करून घ्यायचा हीन प्रयत्न केला.

कितीही प्रयत्न करून ते टोळके त्यांना सोडत नव्हते. शेवटी काजल धावत टेकडिच्या उताराकडे निघाली. दहा मिनिटांनी तिला तीन माणसे दिसली. ती घाईघाईत तिच्याबरोबर आली तेव्हा त्या टोळक्याने दिपूला जवळपास अर्धमेले केलेले होते... दिपू होता म्हणूनच टिकला होता.

त्या माणसांनी टोळक्यातील एकाला विचारले.. काय चालले आहे? का मारताय??

जो सर्वात मोठा होता तो म्हणाला..

"..... इतनीसी उमर हय.. ये उमरमे पहाडीमे जाके सो रहे एक दुसरेके बगलमे.. कल क्या रहेंगा वडाळू भुईका.. धंदाच चालू होयेंगा यहांपर.. ये विशाल को पुछो.. क्या बे विशाल??"

बोलणारा मुलगा विजू होता......

काजलच्या गालाला हात लावणारा विशाल...

आणि... तिला धरून बाजूला करताना तिच्या अंगाशी खेळणारा होता समीर.. राम रहीम ढाब्याचा समीर..

वडाळी भुईच्या चौकीवर रामरहीम ढाबा व चाचा अतिशय नीट माहीत असल्यामुळे गावातील एक माणूस व त्या दोघांना पकडणारे समीर, विशाल अन विजू यांच्याबरोबर दिपू अन काजलला ढाब्याकडे एका जीपमधे बसवून पाठवून देण्यात आले.

नाशिकची बस चक्क सातलाच आली होती. यांची जीप साडे सातला पोचली. सगळेच काजलच्या काळजीने हैराण झालेले होते.. बाळू अन पद्या पिंपळगावला धावले होते.. रमणने येणारी प्रत्येक गाडी अन प्रत्येक गिर्‍हाईक आज नाकारले होते. सगळेजण गेटवरच थांबले होते. अगदी झरीनाचाची अन तिचा मुलगासुद्धा! चुकून भुलोबाला तर आले नाहीत ना विचारायला त्यांच्याकडे कुणीतरी गेले होते त्यात त्यांनाही ते समजले होते.

आणि जीपमधून त्यांना उतरवत असताना विजू ढाब्याच्या गेटवर असलेल्या सगळ्यांना उद्देशून म्हणाला..

संभालो लडकी को.. इसके साथ टेकडीपर नाटक कररही थी.. दोनो प्यार की गेम गेम खेल रहे थे.. हमारेको उस दिन तुम लोगां मारा ना.. हम अच्छे घरके लोगां हय.. ये लडका वैसा नय.. लडकीको बरबाद कर देता था ये.. हमने बचाया.. जाते हम..

मनीषा थक्क होऊन विजूकडे पाहात होती. अंजना थक्क होऊन दिपूकडे...

आणि बाकी सगळेच दिपू अन काजलकडे...

त्या पोरांना थांबवून विचारण्याचीही बुद्धी कुणाला झाली नाही...

आणि खाडकन यशवंतचाचाने दिपूच्य अकानसुलात भडकावली.. आधीच मार खाल्लेला दिपू खाली आपटला.. इतर पोरांपासून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणे काजलला शक्य होते.. आपल्याच बापापासून त्याला कसा वाचवायचा.. आणि तिने दिपूच्या मदतीच्या अपेक्षेने मान मागे वळवून स्वतःच्या आईकडे, सीमाकाकूकडे पाहिले.. त्याक्षणी सीमाकाकूने काजलच्या गालावर जोरदार चपराक मारली..

काजलने त्यातही स्वतःचा रुमाल पटकन खाली पडलेल्या दिपूकडे फेकला... त्याने त्यातही तो हातात धरला..

काजलला सीमाकाकू आत ओढत नेत होती..

सगळे दिपूकडे आश्चर्याने पाहात होते..

आणि सर्वांसमोर स्वतःच्या पोरीची नाचक्की झालेला यशवंत जाताना गणपतचाचाला रडक्या सुरात.म्हणत होता..

"आजच आपके अमीतसे काजलके शादीकी बात निकाली गणपतभाई आपने.. हमको तो जैसे स्वर्ग मिलगया वो सुनके.. देखो मेरी किस्मत.. आजच मेरी बेटीने इझ्झत तबाह करके रखदी मेरी"

गुलमोहर: 

कथेला भयानक वळण आलेय.......पुढे दिपक आणि काजलचे काय होईल.............

अरे व्वा काय वेग आहे, एकदम भन्नाट............................
काय होणार आता या दोन प्रेम पाखरान्च.
कसा निभाव लागणार या दोघान्चा??????????
पुढचा भाग वाचण्यासाठी उत्सुकत आहोत.
जरा लवकर.
पण तब्बेतीला जपा आणि मगच लिहा.
सुरेख.
अतिशय उत्तम.
अप्रतिम.
अजुन काय लिहावे आपल्या लिखाणबद्दल तेवढे कमिच आहे.
पु.ले.शु.

Parat Gift Rumal?????????????????