ल्हानपण देगा देवा !

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

साधारण महिन्याभरापुर्वी पूर्वीचे दिवस आठवताना केलेले हे असंबद्ध लिखाण. असे म्हणण्याचे कारण, कितीतरी विषयांवरून कोलांट्या उड्या मारल्या आहेत मी.. Happy

आज मी खरंतर कम्प्लीट वेगळ्या विषयावर लिहायला बसले होते. पॅशन्स, आवडीनिवडी , माझी नाटकं, ऍक्टींग, डान्स, बॅडमिंटन, थ्रोबॉल.. हे सगळं आठवता शाळा आठवली.. मग अर्थातच माझे लहानपण असा आवडता विचार सुरू झाला.. मनातल्या मनात विचार करायचा कंटाळा आला, एकट्यानेच किती बडबडायचे ना? त्यामुळे म्हटलं (खोटा/व्हर्चुअल का असेना) कागद बराय. निदान मोनोलॉगच्या ऐवजी डायलॉग्स होतायत असे तरी वाटेल.
आज मी अगदी दिल खोलके स्मृतीरंजन करणार आहे. (हे मराठी साईट्स वाचून काय भलतेच शब्द आठवतात.. स्मृतीरंजन कस्लं आलं डोंबलाचे!) असो.
मला किती लहानपणचे आठवतंय असा खेळ करून पाहायची इच्छा झाली एकदम. बहुतेक बालवाडी. अभिनव शाळेत मी होते. तो मरूनीश लाल युनिफॉर्म, फुग्याच्या बाह्या, पांढरे मोजे, लाल वेल्क्रोचे शूज, भरपूर पावडर लावलेली चब्बी चब्बी गालांची मी व डोक्यावर पांढरा हेअरबॅंड व मोगर्‍याचा गजरा, हातात लालच प्लॅस्टीकची जाळीजाळीची डब्याची (स्टीलचा, डबलडेकर डब्बा! Happy ) व वॉटरबॉटलची पिशवी.. हे तयार होणे, तो सगळा युनिफॉर्म, तो घ्यायला गेलो होतो ते डेक्कनवरचे पूर्ण पोषाख, शाळेत शूज घ्यायला गेलो असताना माझ्या अवाढव्य पायाचा साईझ पाहून पहिलीतल्या मुलाचे शूज मला देणे. सर्व आठवतंय!! कसलं क्युट! तेव्हा आमचा गृप फोटो काढलेला देखील आठवतोय. तो तर महा गोड आहे. इथे द्यायचा मोह होतोय. Happy
childhood memoriesसगळ्यात उजवीकडची खालच्या रोमधली मी. Happy [टॅग करणार्‍याने फारच चित्रकला केलीय त्याबद्दल सॉरी! पण माझ्याकडचा फोटो सापडणे फार मुष्कील आहे.. ]
असो.. तेव्हाच्या प्रगतीपुस्तकावरचे शेरे मला अजुन आठवतात. आठवतात म्हणजे मी वाचते ते. अजुनही जपुन ठेवलंय ते. वेल, त्याला प्रगतीपुस्तक म्हणणे फारच रखरखीत आहे. इतकं गोड पुस्तक आहे ते. मी मोगरा ग्रुपमध्येच होते वाट्टं. बाईंनी लिहीले होते की ही फार मिक्स होत नाही, एकटीच खेळत असते. सर्व वार, आकडे, रंग ओळखू येतात. Happy सगळ्यांसमोर येऊन गाणी म्हणणे आवडत नाही. बुजते फार. थोडक्यात मोकळी होत नाही पटकन. तेव्हढं पाहा असं पालकांना सांगितले होते. Happy मला कमाल याची वाटते, की त्या बाईंनी माझा स्वभाव किती परफेक्ट ओळखावा? मी अश्शीच आहे! तेव्हाही मी मुलांच्यात जाऊन खेळण्यापेक्षा एकटंच चित्र रंगवणे, नाहीतर चिकटकाम करणे अशा गोष्टीत इंटरेस्ट घ्यायचे. पुढेही जरा तसेच. अभिनव मध्ये मी ६ वी पर्यंत होते. माझे मित्र-मैत्रिणी म्हणजे - माझ्या शेजारीच बसायच्या म्हणून दिप्ती,बेला मैत्रिणी व एकाच कॉलनीत राहयचो म्हणून आया एकत्र शाळेत पाठवायच्या त्यामुळे झालेले मित्र - ओंकार किशोर. बस्स.. :| बाकी सर्वांशी बोलत बिलत असीन मी. पण तेव्हा मला मैत्र यांच्याशीच वाटायचे. तसे आजूबाजूला बसणारे देखील माझे फ्रेंड्स होते. माझा मैत्रीचा पल्ला कधीच एक-दोन बेंचेसच्या पलिकडे का गेला नाही हे मला उमगत नाहीये! पण तसं आठवायला गेलं तर मागच्या बेंचवर बसणारा स्कॉलर जंगम(जंगम तू हे वाचत असशील बहुतेक! Lol ) त्याच्या शेजारी कोण बसायचे आठवत नाही. पण आम्ही एका तासाला जोक्सचे पुस्तक वाचत बसलेलो आठवतंय. किंवा हात फ्रॅक्चर झालेला राजे. अभिनव व पुढे गरवारेला देखील सेम वर्गात , मागच्याच बेंचवर बसाणारा आल्हाद, जबरी लंगडी खेळणारी स्नेहा, प्राची व दिप्ती नावाच्या असंख्य मुली, एकाच रिक्षेतली माझ्यासारखेच कुरळे केस असणारी पुजा, देविका, सायली दिप्ती या जिवाभावाच्या मैत्रिणी, चब्बी गालांची स्वाती, एक(की दोन) ट्विन्सही होत्या नाव विसरले.. .. कितीतरी.. [ अजुनही मला अभिनवचे क्लासमेट्स दिसले की वाटतं मला ओळखत तरी असतील का ते? पण ओळखतात हे ऐकून अजुन मजा वाटते!] हा फोटो पाहून हे सगळे आठवले.. अवघडे ब्वॉ..
अभिनवचे दिवस फार सही होते. आमच्या कॉलनीतले सगळेच अभिनवला जायचे. त्यामुळे धमाल होती. सकाळी सगळे एकाच फाटक बाईंकडे इंग्लिशच्या क्लासला जायचो. मी,ओंकार,किशोर,बॅडमिंटन चॅम्प विशाखा , माझी बर्थ डेट शेअर करणरा सुरजित, आणि गरवारेची सावनी.. सकाळचा क्लास झाला की घरी येऊन जेवून दुपारी १२ ला शाळेला निघायचे. मी ओंकार किशोर चालत जायचो. ते दोघं अगदी जिवश्च कंठश्च मित्र. कदाचित मला मधेच आईने त्यांच्या बरोबर पाठवण्याने वैतागलेही असतील! पण २-३ वर्षं गेलो एकत्र आम्ही. रस्त्याने गप्पा मारत, उड्या मारत शाळेला जायचे. थोडं मोठं झाल्यावर तर मला आठवतंय Lol शाळेपाशी आल्यावर आम्ही रस्ते वेगळे करायचो. बाकीची मुलं हसू नयेत म्हणून.. लोल काहीही वागायचो तेव्हा! ..
नंतर शाळा बदलली. व गरवारेला आले. इथे कॉलनीतलीच ती सावनी मैत्रिण झाली. दोघी सायकलवरून जाऊ-येऊ लागलो. शाळेच्या आधी संस्कृतचा क्लास. सावनीला संस्कृतचा तिरस्कार म्हणता येईल इतपत राग. मला आवडायचे पण टाईमपास जास्त प्रिय! मी रितसर क्लासची फी भरून वगैरे तो बुडवून तिच्या घरी टाईमपास करत बसायचे. :O नंतर अर्थातच समजले आईला. जबरी ओरडा बसला. व एकदाची जाऊ लागले रेग्युलर. [ आणि अर्थातच संस्कृत अजुन आवडू लागले! ती सुभाषितांची वही आत्ता इंडीया ट्रिपला मुद्दाम शोधून घेऊन आले.. ]
नववीच्या दरम्यान माझ्या शालेय मैत्र जीवनात एक पोकळी आली. सावनीला दुसरी मैत्रिण सापडली. व मी एकटी. केवळ एकच मैत्रीण जीवाभावाची करण्याची सवय महागात पडते हे तेव्हा समजायला हवे होते. पण समजले तर काय ना! चुका कशा होणार! प्रचंड एकटी पडले होते मी. [यात सावनीचा दोष अर्थात नाही. तो माझाच. ] पण मग नववी हे वर्ष फार विचित्र गेले. थोड्या काइंड ऑफ टवाळ बॅक-बेंचर्स मुलींशी मैत्री करून मी अभ्यासाचे खोबरे केले. ते मला किती महागात पडले हे केवळ मलाच माहीत ! पण झाले खरे तसे. पण नशीबाने नववी संपता संपता मानसी मैत्रीण झाली [म्हणजे तीने स्वत:हून ओळख करून घेतली म्हणूनच. नाहीतर मी तेव्हढीच बुजरी तेव्हाही होते.. ] मानसी मैत्रिण झाली ती झालीच.. अजुनही आम्ही घट्ट मैत्रिणी आहोत!
थोडा अभ्यास हळूहळू ट्रॅकवर येऊ लागला. व दहावीत अगदीच फजितवाडा होण्यापासून वाचले.
ही मानसी मला कशी भेटली बहुतेक मी मागे लिहीले होते. आमची मैत्री मायकेल जॅक्सनमुळे झाली! दोघींना (व बहुतेक आम्हा दोघींनाच) तो आवडायचा. व त्याच गाणी/कॅसेट्स/अल्बम्सची देवाण घेवाण करताना आमची मैत्री वाढली. केवळ जॅक्सन आवडतो या कारणामुळे तीनी मला भेटल्याच्या दुसर्‍याच दिवशी डेंजरस या अल्बमची ओरिजिनल कॅसेट आणून दिली होती! वॉव! हे म्हणजे सर्वात प्रेशस गोष्ट.. कशी काय माहीत नाही पण आमची मैत्री खूप टिकली. अजुनही.. किती वेगळ्या आहोत आम्ही. एकही विचार सारखे नाहीत म्हटले तरी चालेल! ती बरीच बंडखोर, खूपशी मॅच्युअर्ड, प्रॅक्टीकल तर मी बर्‍यापैकी कॉन्झर्व्हेटीव्ह, कंप्लिटली चाईल्डीश, इम्प्रॅक्टीकल व अती इमोशनल. धमाल होती.. रोज भांडायचो ! रोज ते मिटायचे. एकदा तर फालतू कारणावरून भांडल्यावर नंतर ती सॉरी म्हणायला आली -ते पण शाळेच्या ग्राऊंड समोरच्या प्लॅटफॉर्मवर आणि मी तीला माफ करायला तिला हसत हसत थोबाडीत मारली होती! शाळेतल्या सर्व मुला-मुलींसमोर.. अजुनही ती तो अपमान विसरली नसेल.. :)))
हे आजचे असंबद्ध लिखाण शेवटी मानसी पुराणावरच येऊन थांबतंय असं दिसतंय. पण विचार केला तर ते तसंच आहे. ती माझी खरी पहीली जिवाभावाची मैत्रीण. शाळा - मैत्रीणी म्हटलं की तीच आठवते मला काय करू मी! Happy मला वाईट वाटते की मी पहिलीपासून गरवारे मध्ये नव्हते किंवा ती अभिनव मध्ये नव्हती. शाळेतला काळ सही असतो. तो नेमका आम्हाला १-१.५ वर्षंच मिळाला.. पुढे १०वीला आम्ही एकाच क्लासात नाव टाकलं. सिरियस्ली अभ्यास कसा करयचा हे बरचसं तिच्यामुळे कळ्लं. नाहीतर अस्मादिक जरा ’लक’ या गोष्टीवरच अवलंबून. एकदा वाचायचे व सोडून द्यायचे. परिक्षेत आठवेल ते आठवेल! तिच्यामुळे थोडा सिरीयस्ली अभ्यास केला. वेल थोडाच! त्याउलट मीच तिला अभ्यास सोडून फोनवर गप्पा मारायची सवय लावली ! Happy अव्याहत गप्पा - बाबांनी फार पेशंस दाखवला त्या काळात! दर महिन्याचे फोनचे बिल पाहून नुसती मान हलवायचे !! त्या आमच्या गप्पा नंतरही चालू राहील्या पुढे १०-१२ वर्षं!! व नंतर मी लग्न करून USAला आले. किती रडली ती.. Sad
ओह गॉड.. इम्पॉसिबल आहे हे.. का अशी स्थित्यंतरं होतात माहीत नाही.. आत्ताच्या ट्रिपला मी २ महिने भारतात होते. पण आम्ही दोघी केवळ २ वेळाच भेटू शकलो. Sad दोघींची लग्न.. सासर.. जबाबदार्‍या.. uh.. या सगळ्या प्रकरणांमधून मैत्री तशीच ठेवणं किती अवघड आहे! अर्थात मैत्री राहतेच हो.. पण ते रेग्युलर बोलणं, गप्पा, बरोबर टवाळक्या करत फिरणे ! कसं शक्य होणार काय माहीत..
असूदे.. म्हातार्‍या झाल्यावर फिरू एफ्सी रोडवर.. त्यात काय एव्हढं!
Cheers to childhood and friendship !

प्रकार: 

कसे साजरे-गोजिरे चेहेरे असतात या लहानपणीच्या फोटोंत! Happy छान लिहिलंयस बस्के. आठवणींची खूप गर्दी झाल्याचं जाणवतंय. Happy

>>>>मृ, विशाल तुझ्यासोबत शिकत होते हे माहीत नव्हतं.
केदार, विशालच काय, पण फारेंड, स्वाती, पूनम, सिंडी पण होत्या! Proud

अगं कित्ती गोड लिहिलंयस!
आमचीही एक मस्त गँग होती.....सहा जणींची....पाचवीपासूनची. त्या थ्री इडियटस मधे पाण्याच्या टाकीवर पोस्ट एज्युकेशन भेटण्याची एक तारीख आहे ना तशीच आम्ही पण एक तारीख ठरवली होती. ती मी विसरले. आमच्या गँगच्या लीडरला ती आठवते. आता कळलं ना की ती का लीडर होती आणि मी नव्हते! पण ती तारीख गेली तेव्हा आम्ही सगळ्या जस्ट मॅरीड होतो . त्यावेळच्या पद्ध्तीप्रमाणे जरा लवकरच लग्ने झालेली.........सासरी अ‍ॅडजस्ट करत...हात पाय मारत......चाललं होतं सगळ्यांचं! कुणाची जस्ट डिलिव्हरी झालेली..............
पण शाळेत असताना वाटलं नव्हतं की ही तारीख इतक्या लवकर येऊन जाईल म्हणून! जसं तेव्हा ते घराचं अंगण, शाळेचं ग्राऊंड किती मोठं वाटायचं पण नंतर ते अगदीच छोटं वाटायला लागतं.
तर आम्ही पहिल्यांदा पूर्णपणे मोकळेपणाने आणि जरा वेळ काढून केव्हा भेटलो माहितीये? ग्रूपमधल्या सगळ्यात पहिल्या लग्नात. अर्थातच जिचं सर्वात आधी लग्न झालं होतं तिच्या मुलाच्या लग्नात. आता मात्र आम्ही जेव्हा वाटेल तेव्हा भेटतो आणो धमाल करतो. आता सर्वांच्या मुलांचे पहिले राउंड कंप्लीट झालेत. दुसर्‍या राउंडलाही सुरवात झालीये.
आणि हो आम्ही कधीकधी फिरतो "एफ्सी रोडवर"! पण बस्के तुला सांगते ...लेडीज सायकलवर मैत्रीणीबरोबर कॉलनीत नॉनस्टॉप डबलसीट चकरा मारताना जेवढी मजा येत असे तेवढीच अजूनही येते बरं का!
नहीssssssssssssssssssssss!इससे मेरा क्या होगा कालिया.........! मन भरा नही. लगता है हम और भी लिखूंगा इस विषयपर! बहुत कुछ याद आ रहा है!

फोटो मस्त बस्के. अगदी मनापासून कोणतेही एडीट्स न टाकता लिहिलंयस न? Happy
मानुषी, तुमचंही पोस्ट गोड. अशी मैत्री टिकावी खरंच, टचवूड.

Happy
तो फोटो किती सही आहे..!
(माझेही काढून बघायला हवेत आता. पण दहा-पाच नावांच्या पलीकडे आठवणार नाहीत, चेहेर्‍यांवरून कितीही आठवून बघितले तरी. :()

साजिर्‍या, काय उपयोग आहे आता तूझे फोटो काढून ? वेगळा दिसत असशील आता. Proud

भन्नाट लिहिलय. एव्हढ्या सगळ्या आठवणींच्या गदारोळात सुसूत्र लिहायला सुचणं कठीण आहे नाही ?

बस्के, मस्त गं! सध्या तुझ्याकडे असलेल्या वेळेचा छान उपयोग करते आहेस असे लिहुन आणि जल्फ्रेझी सारखे पदार्थ करुन! मजा कर.

छान लिहीलय, लहानपणीच्या आठवणींवर कित्तीही बोललं अथवा लिहीलं तरी त्या संपत नाहीत अथवा त्यांचा कंटाळा येत नाही.

>>लहानपण देगा देवा ! शाळा, अभ्यास असली संकटे दुरच ठेवा !<< Happy

अरे धन्यवाद सगळ्यांना! मी खूपच, पूनम म्हणते तसे अजिबात एडिट न करता मनात येईल ते लिहीले. व तसेच टाकले इथे. Happy
फोटो त्या आमच्या 'मोगरा' गटाच्या प्रगतिपुस्तकावर आहे. तो मी ऑर्कुटवर टाकला व आम्ही जे संपर्कात होतो त्या सर्वांनी आठवतील तितकी नावं शोधली मुलांची..

मानुषी तुम्ही पण लिहा नक्की! हा विषयच तसा आहे,राहवणार नाही! Happy

तुझ्या वर्णनावरून मला प्रिया तेंडुलकरनं कुठल्या तरी पुस्तकात लिहीलेलं आठवलं तिच्या जेजे मधल्या कमर्शियल आर्टस (बहुतेक तपशील बरोबर असावेत) च्या दिवसांचं.
मस्त लिहीलंय. खरंच हे किती आठवलं तरी कमीच.
असं अनएडिटेड वाचायला मजा येते.

बस्के, मस्तच Happy शाळेच्या दिवसांची आठवण करून दिलीस.
माझी पण अशीच एक जिवाभावाची मैत्रिण आहे लहानपणी आम्हाला दिवसातून कितीही वेळ भेटलो तरी चैन पडत नसे. केजी ते १० वी एकत्र होतो आम्ही पुढे ती आणी मी वेगवेगळ्या कॉलेजला गेलो Sad पण आता कायमचे एकत्र Proud माझी सख्खी जाऊ आहे ती आता. त्यामूळे उलट आता भारतात गेले की जास्त वेळ कुचाळक्या करता येतात Wink Happy

आईशप्पत! बस्के, तू माझ्याच शाळेत होतीस की! ज्युनिअर आहेस अर्थात तू मला. पण याच सगळ्या ताई होत्या मला शिकवायला!! मंगल ताई, लता ताई , रजनी ताई, उषाताई सगळ्यांना फोटोत एकत्र बघून कसलं मस्त वाटलं !! Happy

हो पूनम वत्सला
वरची पोस्ट पाहिलीत ना! आता लिहितेच. अरे काय काय गंमती जंमती आहेत..........आम्ही मैत्रिणी भेटणार हे कळल्यावर माझी मुलं विशेषतः मुलगा म्हणतो, (खूप सीरियस चेहेरा करून), " आई, माहिती आहे तुम्ही शाळेत असल्यापासूनच्या मैत्रिणी आहात....पण आता तिथे शाळेत असल्यासारख्या वागू नका. कारण आता तुमची मुलंही शाळेत नाहीयेत."
पण त्यालाही मनातून छानच वाटत असते.......!

मैत्रेयी.. तू पण शाळेत जात होतीस? वाटत नाही Proud

बस्के... मस्त आहे लेख.. त्या ताई अजूनही शिकवत असतील?

हो देसाई.. मी तर ऐकले मंगलताई मुख्याध्यापिका झाल्यात!
आमच्या वर्गाला त्याच होत्या. पण मी गेले नाही भेटायला कधी त्यांना नंतर. कारण शाळेत असताना काहीतरी विचित्र खुन्नस ठेऊन मी त्यांना कधीच नमस्कार/ग्रीट केला नाही! Uhoh आगाऊच होते मी..

Pages