चला चला गावाकडे पळा...भाग-१

Submitted by kunjir.nilesh on 13 May, 2010 - 05:09

उन्हाळ्याच्या सुट्टी लागली रे लागली की .....ह्युरे चला चला गावाकडे पळा....बालपणीचा हा आनंद आजही तितकाच ताजा आणि सच्चा वाटतो.... आपण कितीही मोठे झालो ना तरीही त्या आठवणी अजुनही तश्याच्या तश्या मनाच्या कोपर्‍यात घर करून असतात...असेच काही क्षण माझ्या आठवणीतले... कदाचित ते तुम्हाला तुमचेही वाटतील...

बाबांनी तिकीट बुक केले हे समजताच बॅग भरायला सुरूवात होते.. सापशीडी, बॅटबॉल, छोट्या छोट्या गाड्या, भातुकलीची खेळणी सार काही जमवायला लागतो आपण... कपड्यांची बॅग कोणाकडे ही असू देत पण खेळण्यांची बॅग मात्र आपल्याला आपल्याच हातात हवी असते... काका मामा ची मुले आपल्या बरोबर येणार यामुळे आपली स्वारी जास्तच खुशीत असते....

एसटी स्टॅंड ला जावुन उभे राहीले की, 'बाबा आली का गाडी' हा प्रश्न कमीत कमी ५० वेळा विचारून होतो...गाडी आली की धावत धावत जाउन खिडकी पकडायची....गाडी कधी चालू होते यासाठी ड्रायव्हर कधी येतो याकडेही बारीक लक्ष असते...

गाडी चालू झाली की आपल्या जिवात जीव येतो... रस्त्यावरची उलटी पळणारी घरे, दुकाने पाहून खूप गंमत वाटते....
रात्रीचा प्रवास म्हणजे त्यावेळी एक पर्वणीच असते....गाडीने मुंबई सोडली की आई लगेच आपल्या अंगावर स्वेटर चढवते.. बाहेर पाहणारे आपण आता नकळत हळूहळू डुलकी खावू लागतो.... आईच्या कुशीत झोप कधी येते समजत पण नाही...

बेटा उठा उठा ... बघ बघ घाट आलाय... आपण लगेच डोळे चोळत चोळत बाहेर पाहतो.... बाहेरचा परिसर पाहून आपण हे सारे आवाक होऊन पाहत असतो....सोन्याची दुनिया असल्याचा भास असतो तो...कोणता तरी उत्सव आहे का हा??? क्षणभर प्रश्न पडतो मनाला... चारही दिशा काळोखाने भरलेल्या, आकाश नीर्भ्र आणि मध्येच खोलवर पिवळी पिवळी तोरणे जी लांब लांब पसरलेली दिसतात... थोड्याच वेळात पुढे बोगदा येतो त्यातून जाताना आपण जमिनिखालून जातोय की काय असाच काहीसा अनुभव येतो... बोगदा संपला तरी मागे वळून वळून तो दिसत नाही तो पर्यंत त्याला न्याहाळत राहतो...

सारा सारा आनंद डोळ्यात सामावून स्मित हास्य घेऊन पुन्हा आपण आईच्या कुशीत निजतो... नेहेमी तहान भूक लागल्यावर रडणारे आपले पिल्लु सार सार विसरून शांत झोपलेले पाहून आई मिठीत घेऊन गोड गोड मुका घेते....

सकाळी थंड वार्‍याची झुळुक अंगावर शहारा आणते... गाढ झोपेत असलेलो आपण स्वतः जागे होऊन खिडकीतून बाहेर डोकवू लागतो. आजूबाजूला पडलेले धुके आणि त्यातून पूसटशी दिसणारी हिरवीगार झाडी असा नयनरम्य परिसर पाहून डोळे दिपून जातात.

गाडी स्थानकावर येऊन थांबते... बाबा आवाज देतात बेटा चला उतरायचे आहे... पुन्हा खेळण्यांची बॅग हातात घेऊन आपण खाली उतरतो... बस स्थानकावरच्या हॉटेल मध्ये बाबा घेऊन जातात... कोण कोण काय काय खाणार??? असे विचारताच एक एकाची फर्माईश सुरू होते.... कोणाला गरमागरम भजी हवी असते...कोणाला बटाटा वडे, समोसे...तर कोणी मिसळ वर ताव मारतो...सर्व खाऊन झाल्यावर गरमागरम कटिंग चहा पिऊन सारे तृप्त होतात...

त्यापुढचा प्रवास जीपने होणार असतो... जवळजवळ १२/१३ माणसे असूनसुद्धा त्याचा ड्राइवर जायला तयार नसतो.... साहेब अजुन ४ सीट होऊदेत मग हलवतो गाडी... गाडी म्हणजे जणू कोंबड्यांचा खुराडा होऊन जातो... अजुन ४ सीट बोलून ६ जण गाडीवर स्वार होतात... ड्राइवर गाडीच्या अर्धा बाहेर जाउन गाडी कसा चालवतो हे त्याचे त्यालाच माहीत... कच्या रस्त्यावरून जाताना गाडीपेक्षा माणसाचेच पार्ट जास्त हलतात....या सार्‍या गर्दीमध्ये आपले लक्ष मात्र बाहेरच असते... गावाकडची वाट आपल्याला साद घालत असते.... आंब्याची, चिंचाची झाडे दिसायला हळूहळू सुरूवात झालेली असते... या पुढच्या २० मिनिटांच्या प्रवासात आपण विचारण्याच्या आतच आई आपल्याला 'आता आलेच हा आपले गाव' असे कमीत कमी १०/२० वेळा बोलून मोकळी होते...

गाडी गावच्या फाटकापाशी येऊन थांबते... बाहेर येताच आपण २ मिनिटांच्या अंतरावर वसलेल्या आपल्या छोट्याश्या गावाकडे हसरी नजर फिरवतो.... गावातले मंदिर आणि त्यावर फडकणारा भगवा झेंडा, जुनी कौलारु घरे, आणि लालसर मातीत न्हाहून निघालेली पायवाट, हिरवी पिवळी झाडे....सारे सारे आपल्या स्वागतासाठी सजले आहेत की काय असा भास होतो...
क्रमश:

पुढील भाग वाचण्यासाठी http://nkunjir.blogspot.com/ येथे क्लिक करा

गुलमोहर: