रडं

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

मी एक अत्यंत खमकी बाई आहे. सहसा धीर (धूर नव्हे) सोडत नाही. आमचे बाबा नेहमी आमच्याविषयी 'मुली खंबीर आहेत' असे म्हणतात आणि आई आम्हाला 'पाषाणहृदयी' म्हणते. पण तरी काही घटना, प्रसंग, कोणाची नुसती आठवण, फोनवर ऐकलेला आवाज ह्या गोष्टी अशा असतात की कितीही दात-ओठ खाल्ले तरी डोळे जुमानत म्हणून नाहीत. माझा एक मित्र नेहमी म्हणायचा Everybody has a weak moment. असे अशक्त क्षण अनेक येतात आयुष्यात. कधी तेव्हढ्या पुरतं वाईट वाटणं असतं तर काही प्रसंग काही म्हणता पाठ सोडत नाहीत. कित्येकदा विस्मयात पडावं असं आपण वागतो. आपल्या स्वत:च्याच व्यक्तिमत्त्वाविषयी, जडणघडणी विषयी शंका यावी असं. पुन्हा असं वागायचं नाही ठरवूनही आपण असे वेड्यासारखे का वागतो कळतच नाही. हे असच काहीसं...

शिक्षण संपल्यावर मी नोकरी शोधायला म्हणून माझ्या मोठ्या बहिणीच्या घरी ठाण्याला जाऊन राहिले होते. त्या दरम्यान एकदा ह्या नवरा-बायकोत एकदम कडाक्याचे भांडण झाले. तेव्हा मला नवरा-बायको मधले भांडण हे काहीतरी गंभीर प्रकरण वाटायचे. दुसर्‍या दिवशी पहाटे जिजा नागपूरला निघून गेले. तिथे त्यांचे काही महत्त्वाचे काम होते. बहिणीला आदल्या दिवशीच जरा बरे वाटत नव्हते, रात्रीतून ताप चढला. बायकोला बरे नसल्यावर नवर्‍याने (किंवा नवर्‍याला बरे नसल्यावर बायकोने) महत्त्वाची बिझिनेस टूर सोडून घरी थांबायचे असते असा एक गैरसमज तेव्हा होता. ह्या सगळ्या प्रकाराने मला खरोखर फार अस्वस्थ वाटत होते. काय करावे समजेना. आई-बाबांशी बोलल्यावर बरे वाटले असते पण त्यांना काही सांगू नकोस असे बहिणीने सांगितले होते. मग मी तिला नाश्ता वगैरे करून दिला. भाच्याचे आवरून त्याला ड्रायव्हरबरोबर खेळायला सोडले. आणि भाजी आणायच्या निमित्ताने घराबाहेर पडले. तिथे जवळच एक टेलिफोन बूथ होता. घरी फोन लावला तर बाबांनी उचलला. बाबांचा आवाज डोळ्यांनी कसा ऐकला कोण जाणे, रडं आवरेनाच. कसं बसं "बॅबॅ स्वॅतीचे अ‍ॅणि जिजँचे भँडण झॅले अ‍ॅणि जिजॅ निघून गॅलॅ...तुम्ही या ना इकॅडॅssssssss" एवढं रडत रडत बोलले आणि मग रडतच राहिले. झालं, आई-बाबा दुसरे दिवशी सकाळीच निघून ठाण्याला आले. तोपर्यंत जिजा पण परत आले. ते बिचारे सासू-सासर्‍यांना घरात बघून जाम घाबरले. मग संध्याकाळ पर्यंत सगळे खुलासे, दिलजमाई होऊन आम्ही मस्तपैकी बाहेर जेवायला गेलो. प्रकरण अर्थातच मी रडून गोंधळ घालण्या इतके काही गंभीर नव्हते. ह्या सगळ्या मुक्कामात बाबा मात्र मला 'ये आंसू मेरे दिल की जबान है..' गाणं म्हणत चिडवत राहिले. (जिजांची चहाडी केल्याबद्दल त्यांनी कधी ही माझ्यावर राग धरला नाही हे विशेष.)

ठाण्याला जायच्या आधी मी श्रीरामपूरला राहूनच नोकरी शोधत होते. बरोबरीच्या इतर मित्र-मैत्रिणींत अनेकांच्या नोकर्‍या सुरू झाल्या होत्या, काहींना कॉल आले होते. मला एक तर श्रीरामपूरला राहून वॉक इनला जाता येत नसे. पोस्टाने अर्ज पाठवून त्याची कोणी दखल घेतली नव्हती. पुण्याच्या एक दोन चकरा करून बरेच ठिकाणी अर्ज देऊन झाले होते पण त्याचा काही उपयोग नसतो हे फार उशीरा समजले. निकाल येऊन दोन-तीन महिने झाले होते. एव्हाना डेस्परेट होऊन मी सरकारी नोकर्‍या (DRDO, BARC), बँकांमधली IT संबंधित पदं अशा ठिकाणी अर्ज करायला सुरुवात केली होती. ह्या संस्थांमध्ये नोकरीचा अर्ज पाठवायचा म्हणजे अर्जासोबत मार्क शीट इत्यादीच्या अटेस्टेड फोटो कॉपी जोडाव्या लागत. गावातल्याच एका शाळेचे मुख्याध्यापक गॅझेटेड ऑफिसर होते. मी सगळी कागदपत्रं घेऊन त्यांच्या ऑफिसमध्ये गेले. सरांचा कशावरून तरी ताल गेला होता, समोरच्या व्यक्तीला रागावत होते. मी त्यांना निरोप पाठवला आणि वाट बघत बाहेर थांबले. आधी त्यांनी खूप वेळ आत बोलावलेच नाही. बोलावल्यावर आत गेले आणि मी कशासाठी आले हे सांगतच होते तर सगळ्यांच्या देखत अचानक ते माझ्यावर मोठ्याने ओरडले, "जा, देत नाही सही. येतात तोंड घेऊन नोकर्‍या शोधायला" आणि इतरही बरीच अपमानास्पद बडबड केली. तिथे उभा असलेला शिपाई तेव्हढ्यात म्हणाला "सर अहो ह्या आपल्या आवटीसाहेबांच्या कन्या". पण सर काही ऐकायच्या मन:स्थितीत नव्हते. त्यांनी मला निघून जायला सांगितले. मी इतकी अचंबित झाले. सरांचे बाबांकडे येणे-जाणे होते. ज्यांना कमीत कमी एकशे एक वेळा चहा-पाणी दिले त्या सरांनी माझा असा चारचौघात अपमान का करावा तेच कळेना. संतापाने नुसती थरथर कापत मी कशीबशी घरी गेले. बारा वाजले असतील. आई स्वयंपाकघरात ओट्यापाशी पोळ्या करत पाठमोरी उभी होती. माझी चाहूल लागल्याबरोबर आई "गरम गरम जेवून घे. भूक लागली असेल" असं म्हणाली. आईचे मायेचे शब्द, शाळेत सगळ्यांदेखत झालेला अपमान, त्याचा राग, दु:ख, इतक्या दिवसात साधा एक कॉल न आल्याने वाढत चाललेले फ्रस्ट्रेशन आणि अपराधीपण ह्या सगळ्याची इतकी दाटी झाली मनात. आणि मग सगळे एकदमच डोळ्यांवाटे बाहेर पडले. माझे रडू आवरल्यावर बाबांनी काय झाले ह्याची खात्री केली आणि सरांना फोन केला. बाबांनी फोन केल्यावर अर्थातच चुटकीसरशी काम झाले. पण सर त्या दिवशी असे का वागले मला आजतागायत कळलेले नाही.

नोकरी मिळायची काही राहिली नाही. तेव्हा कंपनीतर्फे बांद्रा रेक्लेमेशनमधे राहायला फ्लॅट मिळाला होता. तिथे काही मोजकी कुटुंबे वगळल्यास आम्ही बहुतेक सगळे बॅचलर्स. एकाच ऑफिसामध्ये काम करायला आणि एकाच बिल्डिंगमध्ये राहायला असल्यामुळे तिथे सगळ्यांशी छान मैत्री झाली होती. दीड-पावणे दोन वर्ष तिथे काढल्यावर अचानक ती संस्था भारत सरकार अनुदानित दुसर्‍या एका संस्थेत विलीन करण्याची टूम निघाली. नव्या संस्थेत आपल्याला ठेवणार की काढणार ह्याची वाट न बघता आम्ही सगळ्यांनी नोकरी शोधायला सुरुवात केली. तेव्हा एकाला कुठे पोझिशन आहे कळले की खटपट करून आम्ही सगळ्यांचे रेझुमे तिथे पाठवायचो. ह्याच पद्धतीने आम्हाला सगळ्यांना तेव्हा भारतात नुकतेच ऑफिस थाटलेल्या एका प्रसिद्ध कन्सल्टिंग कंपनीतून कॉल आले. मी वगळता बहुतेक सगळ्या कंपूला शनिवारी बोलावले होते. ते सगळे ऑफर घेऊनच घरी आले. दुसर्‍या दिवशी मी गेले. रिटन टेस्ट, अ‍ॅप्टिट्यूड टेस्टनंतर दोन टेक्निकल इंटरव्हिव्युज् असा कार्यक्रम होता. टेक्निकलमध्ये नेमकेच मला जावा स्विंगवर प्रश्न विचारले. मी आधीच्या प्रोजेक्टवर सगळं काम जावा स्विंगमधे केलं होतं. तेव्हा नवीन असलेला ड्रॅग आणि ड्रॉप कंट्रोल (oh yeh, I am an old woman) वापरून एक फक्कड GUI बनवला होता. त्यामुळे टेक्निकल राउंड अपेक्षेपेक्षा चांगला झाला. राहता राहिला एच आर राउंड. शेवटी फायनल राउंडाला पोचलेल्या सोळा उमेदवारांपैकी मी आणि एक मुलगा असे दोघेच राहिलो होतो. आम्हाला टोकन्स दिले होते त्यामुळे पुढचा नंबर कोणाचा लगेच कळत होतं. पण आम्हाला आत पाठवणार्‍या बाईने काय गडबड केली आणि माझा नंबर असताना त्या दुसर्‍या मुलाला आत पाठवलं. तो पण ऑफर घेऊन बाहेर आला. मी आत गेले. तिथे एक गृहस्थ गंभीर चेहर्‍याने बसले होते. त्यांनी एच आर इंटरव्हिव्यु घेतला, मी विचारलेल्या शंकांची उत्तरं दिली. आणि मग शांततेत त्या दिवशीच्या सर्व जावा पोझिशन्स संपल्याचे सांगितले. हा जॉब मिळणार ह्याची मला इतकी खात्री वाटत होती की त्यांनी सांगितलेय ते नीट माझ्या डोक्यातच शिरले नाही. त्यांनी पुन्हा तेच सांगितले आणि परत एखादी पोझिशन ओपन झाली तर मला नक्की बोलावतील असे आश्वासन दिले (असं सांगायची एचआरवाल्यांची पद्धतच असते). मी निमूट धन्यवाद दिले आणि उठून चालू लागले. त्या बाईवर भयंकर चीड येत होती. माझी काही चूक नसताना हाताशी आलेला जॉब न मिळाल्याचे दु:ख तर होतेच पण सगळी गँग (ज्यात माझा नवरा, तेव्हाचा बॉयफ्रेंड पण होता) ह्या प्रतिष्ठित कंपनीत नोकरी करणार आणि मी मात्र नाही ह्याचे भयंकर वाईट वाटत होते. बाहेर येऊन टॅक्सी घेतली. गाडी जशी कंपनीच्या आवाराबाहेर पडली तसे मी ह्या आवारात पुन्हा येणार नाही अशा जाणिवेसरशी जे काही रडू फुटले. सगळ्या रस्त्याने रडत-रडत घरी गेले. घरी गेल्यावर सगळा ग्रूप विचारायला आला, सगळ्यांदेखत मी पुन्हा रडारड केली. खरं तर सहा महिन्यांनी परत अप्लाय करता आले असते पण तेव्हा कशाचे इतके वाईट वाटत होते कळलेच नाही. असो, आठ-पंधरा दिवसांनी त्या कंपनीच्या एच आरने फोन करून एका अर्जंट पोझिशनसाठी ऑफर दिली आणि मग सगळाच आनंदी-आनंद झाला.

ईशानच्या जन्माच्या वेळी मदत म्हणून बहीण आणि आई इथे आल्या होत्या. त्या दोघी माझ्या ड्यू डेटच्या पंधरा दिवस आधीच इथे पोचल्या होत्या. त्यामुळे ईशान झाल्यावर अगदी पहिल्या तासापासून आई बरोबर होती. ईशान तीन महिन्याचा होता तेव्हा मी आणि आई बरोबरच भारतात गेलो. तिथे मी पाच महिने होते. सुरुवातीचे तीन आणि हे पाच असे आठ महिने आईनेच त्याला अंघोळ घातली. सकाळी उठल्यावर, संध्याकाळी, दिवसभरात वेळ सुटेल तसा तो आईकडेच असायचा. भात वगैरे खायला लागला ते पण आईच्याच हाताने. इथे होतो तेव्हा त्याचा पाळणा आईच्या रूममध्येच होता. ह्या सगळ्या काळात आईने माझे लाड भरपूर केले. माझ्या आवडीचं गोड-धोड, माझ्या आवडीच्या भाज्या. माझं शिक्षण संपल्यावर पहिल्यांदाच इतकं निवांत घरी राहणं होत होतं. आमच्या किती तरी गप्पा व्हायच्या. आईच्या लहानपणाच्या, आई लग्न करून सासरी आली तेव्हाच्या, आणीबाणीच्या वेळच्या, आईच्या बाळंतपणाच्या, आमच्या लहानपणच्या. हे असं आठ महिन्याच मोठं बाळांतपण करवून ईशानचं जावळ, बारसं सगळं उरकून आम्ही (एकदाचे) अमेरिकेत परत आलो. आल्यावर जरा वेळाने मी सहजच ईशानला आईच्या रूममध्ये घेऊन गेले. आईचं इथेच राहिलेलं काही सामान- ज्यात तिच्या विणकामाच्या सुया होत्या- समोरच पडलं होतं. इथे पाळण्याला म्युझिक प्लेयर सहसा असतोच. आई इथे असताना ईशानला पाळण्यात ठेवून त्यातल्या गाण्यांच्या बरोबर गुणगुणायची. इतक्या दिवसांनी ते गाणं ऐकल्यावर ईशानची काही रिअ‍ॅक्शन येते का बघायला म्हणून मी प्लेअर ऑन केला. ते संगीत कानावर पडलं तसं एकदम आईबरोबर व्यतीत केलेले सगळे दिवस फेर धरायला लागले. लहानपणी मी सतत आईच्या आगे-मागे असायचे. अभ्यास पण स्वयंपाकघरात बसून करायचे. आई दुपारचं काही शिवणकाम करत असली की मी तिथे मशीनच्या खडखडाटातच पाठांतर करायचे. मला असलेल्या सगळ्या शंका आईलाच विचारायचे. कधी तरी मी आता मोठी झाले असं मलाच वाटायला लागलं आणि आईचं बोट सुटलं....ते आता इतक्या वर्षांनी हाती धरलं होतं. मी आई झाल्यावर पुन्हा प्रत्येक अडल्या-नडल्याला आईचाच आधार होता...पण तिला सोडून मी इतक्या लांब निघून आले होते...पुन्हा एकदा माझं मलाच सगळं बघायचं होतं, एकटीने !!! मला तर ईशानला साधी अंघोळ घालायची सुद्धा येत नव्हती आणि आईशिवाय एवढं मोठं आईपण कसं निभावणार होते मी ? असं इतकं काय काय मनात येत होतं. ईशान चांगला खुदुखुदू हसत होता आणि मी आसवं गाळत होते.

.....तशी मी एक अत्यंत खमकी बाई आहे बरं का Happy

प्रकार: 

वा मस्त लिहिलयस.. Happy

बाकी तुझ्या सारखी भांडकुदळ बाई रडताना फारच विनोदी दिसत असेल हां.. !!! Proud

वर आणल्याबद्दल धन्यवाद पन्ना. कारण नाहीतर हा छान लेख मिस झाला असता.
खमक्या सिंडे मस्त लिहिलयस अगदी.
मी पण तुझ्याचसारखी खमकी आहे बरं का! Wink

>> कित्येकदा विस्मयात पडावं असं आपण वागतो. आपल्या स्वत:च्याच व्यक्तिमत्वाविषयी, जडण घडणी विषयी शंका यावी असं.

खरं आहे.
छान लिहिलंयस. Happy

मस्त लिहीलस!
तुझ्या आईला भेटायचे खुप दिवसांपासून मनात आहे. लवकरच भेटेन.
आई चिरोटे कधी करते गं? नेमके तेव्हा गेले की मज्जाच मज्जा.

सिंडे, चांगलं लिहिलं आहेस. आता पुढच्यावेळी तुझ्या खमकेपणाच्या कथा लिही. Happy

बाकी तुझ्या सारखी भांडकुदळ बाई रडताना फारच विनोदी दिसत असेल हां..
>> Lol खरं आहे. भांडतानासुध्दा ती विनोदीच दिसते.. Proud

Pages