फोटोशॉप - १.बेसिक पेंटिंग

Submitted by अवल on 6 April, 2010 - 23:35

( या लेखात फोटोशॉप सी एस २ चा विचार केला आहे. वेगळ्या व्हर्जनमध्ये काही बदल असू शकतात. पण थोडे शोधले की सापडते. हा लेख फोटोशॉपमधील बेसिक पेंटिंगची अगदी प्राथमिक माहिती देणारा आहे. बर्‍याचदा नवीन सामान्य माणसाला येणार्‍या अडचणी सोडवण्याचा हा प्रयत्न आहे. यातील सगळ्याच गोष्टी नेटवर सापडतीलच, पण मराठीतही त्या सापडाव्यात म्हणून येथे लिहिते आहे. )

१. प्रथम फाईलमध्ये जाउन न्यू यावर क्लिक करा. एक नवी खिडकी उघडली जाईल त्यात नाव, प्रीसेट, .... असे पर्याय असतील. यात प्रथम फाईलचे नाव द्यावे. मग प्रीसेट मध्ये अनेक पर्याय आहेत, त्यातील तुम्हाला हवा तो निवडा, किंवा कस्टम आहे तोच ठेवा. खाली त्याचे तपशील आहेत, पैकी आता तात्पुरता महत्वाचा आहे तो कलर मोड. यात आर जी बी आहे ना एवढे तपासा. आणि ब्याकग्राऊंड कन्टेन्स यात व्हाईट हा पर्याय आहे ना ते पहा. नसल्यास तसे करा. आता ओ के वर क्लिक करा.

२. आता एक पांढरा स्क्रीन येईल हा तुमचा मूळ कागद ज्यावर तुम्हाला पेंटिंग करायचे आहे. आता त्यातील फाईअल, एडिट ,.. वगैरेच्या पुढील विन्डो या पर्यायावर क्लिक करा. त्यातील लेअर (पर्याय क्र. १३ ), ऑप्शन ( पर्याय क्र. १५ ) आणि टूल्स ( पर्याय क्र. २१ ) यांवर बरोबरची खुण आहे ना ते पहा. नसल्यास त्यावर क्लिक करा बरोबरची खुण येईल. या तीन खिडक्या आपल्याला चित्र काढायला आवश्यक अशा आहेत.

३. आता तुमच्या समोर तीन खिडक्या आहेत एक - मूळ चित्रासाठीचा पांढरा कागद. दोन - चौकोन्,बाण, जादूची छडी असे शंभर एक पर्याय असलेली टूल्सची खिडकी. तीन - लेअर, चॅनल, पाथ यांची खिडकी.

४. सुरुवातीला टूल्सच्या खिडकीतील सर्व पर्याय नुसते हाताळून पहा. त्या आयकॉनवर क्लिक केले की त्यातले जास्तीचे पर्यायही दिसतील. उदा. पहिल्या तुटक चौकोनावर क्लिक केले की तुटक रेषांचा चौकोन, गोल, उभी पट्टी, आडवी पट्टी दिसतील. हवा तो पर्याय त्यावर क्लिक करून मिळवा( उदा. चौकोन घेतला). आता पांढर्‍या कागदावर या अन क्लिक दाबून धरून माऊस हवा तेवढा हलवा. तुटक चौकोन तयार होईल. असेच सर्व पर्याय पहा. ( सर्व पाहण्याचा कंटाळा येऊ शकतो. मग हे संशोधन थांबवा, अन पुढे जा Happy )

५. जर तुम्ही केलेल्या " संशोधनाने" पांढर्‍या कागदावर काही अ‍ॅब्स्ट्रॅक्ट तयार झाले असेल अन ते फार "प्रेशस " नसेल तर त्या पांढर्‍या कागदाची खिडकी बंद करा. पुन्हा नवी फाईल उघडा. मदत लागली तर वरचा क्र. १ परत वाचा ( तेव्हडीच जरा रिव्हिजन Happy )

६. आता खरे चित्र काढू.
टूल्स खिडकीतील ब्रश घ्या. ( म्हणजे काय ? हे काय तुम्ही एक तर वरचा क्र. ४ चा अभ्यास अजिबात केला नाही किंवा तुम्ही फारच बुवा विसराळू ) म्हणजे टूल्स्च्या खिडकीतील आठवा पर्याय. टूल्सची खिडकी तुम्ही नीट पाहिलीत तर तुमच्या लक्षात येईल की त्यात ६ उपगट आहेत. तर त्यातल्या दुसर्‍या गटात उजवी कडचा पहिला पर्याय म्हणजे आपला ब्रश.
या ब्रशवर क्लिक केल्यावर फाईल, एडिट,... च्या खाली एक नवा टूलबार आला असेल. तिथे पहा. यात ११ पर्याय आहेत. पैकी दुसरा पाहू. जिथे Brush आणि एक आकडा आहे तेथे पाहू. तिथे एक बारीकसा त्रिकोण दिसेल त्यावर क्लिक करा. मास्टर डायमिटर , हार्डनेस आणि खाली वेगवेगळ्या आकाराच्या ब्रशेसचा स्क्रोल बार दिसेल.
मास्टर डायमीटरने ब्रशचा आकार तुम्ही ठरवू शकाल. इथे आपण २० px चा ब्रश घेउ( म्हणजे मास्टर डायमीटरच्या पुढच्या चौकोनात 20px असे लिहू/किंवा तिथल्या स्क्रोलबारने 20px चा ब्रश घेऊ )
आता हार्डनेस १००% ठेऊ.
[हेच दोन्ही पर्याय तुम्ही खाली दिलेल्या ब्रशच्या स्क्रोलबारचा वापर करूनही निवडू शकता.]

आता मोड येथे नॉर्मल, ओपॅसिटी-१००%, फ्लो - १००% असे ठेवू. ( यांचे उपयोग नंतर बघू )

७.आता मूळच्या टूल्सच्या खिडकीमध्ये पुन्हा येऊ. तेथे पाचव्या उपगटात एकात एक मिसळलेले दोन चौकोन आहेत. मागचा चौकोन बॅकग्राउंडचा आहे अन पुढचा ब्रशच्या रंगासाठी आहे. मागचा आहे त्याचा रंग पांढरा आहे, कारण सुरुवातीला आपण >>>ब्याकग्राऊंड कन्टेन्स यात व्हाईट<<< असे सांगितले होते. ( पहा क्र. १ )
पुढच्या चौकोनात काळा रंग असेल. किंवा शक्य आहे की तेथे दुसरा कोणताही रंग असेल. आता त्या पुढच्या चौकोनावर क्लिक करा. एक नवी खिडकी उघडेल- कलर प्लिकर नावाची. डावीकडे मोठा चौकोन , मग एक उभी पट्टी अन उजवी कडे तपशील अशी ही खिडकी आहे. यातील उभ्या पट्टीकडे पाहू. यात सर्व रंग आपल्याला दिसतील. त्यातील हिरव्या रंगावर क्लिक करू. आता डावीकडच्या चौकोनात हिरव्या रंगाच्या सगळ्या शेडस आल्या. त्यातील आपल्या आवडीची शेड सिलेक्ट करू.

८.आता खरी रंगवायला सुरवात करू. कारण आता आपल्या हातात ब्रशही आहे अन तोही रंगात बुडवलेला. आता मध्यात डावी कडून उजवी कडे सलग एक थोडी उखिरवाखिर रेष काढू. कागदाचे आता दोन भाग झाले. वरचे आकाश, अन खालची गवताळ जमीन.
आता टुल्स्मधील जादूची कांडी घ्या. फाईल, एडिट ,... यांच्या खाली नवा टुलबार येईल. यातील अँटी अलाइज आणि कॉन्टीज्युअस यांच्या पुढील चौकोनात बरोबरची खुण आहे ना ते तपासा. नसल्यास तेथे क्लिक करा. मग आपल्या चित्रातील हिरव्या रेषेच्या खालच्या पांढर्‍या भागात जादूच्या कांडीने क्लिक करा. खालचा पांढरा भाग सिलेक्ट होईल. आता Alt दाबून Del दाबा. खालचा भाग हिरवा होईल. आता न विसरता सिलेक्शन घालवण्यासाठी Ctrl दाबून C दाबा.

९. आता आधी लेअर्स म्हणजे काय ते पाहू.
आपण ट्रेसिंग पेपर वापरतो. जर एका कागदावर फक्त गवत काढले, मग एका ट्रेसिंग कागदावर डोंगर काढले, दुसर्‍या ट्रेसिंग कागदावर झाडे काढली, तिसर्‍या ट्रेसिंग कागदावर घरे काढली, चवथ्यावर पक्षी, पाचव्यावर सुर्य अन सहाव्यावर प्रकाश. समजा हे सगळे ट्रेसिंगपेपर अतिशय पातळ आहेत, अगदी ट्रान्सपर्न्ट आहेत, अन हे सगळे एकावर एक ठेवले. होईलना एक चित्र तयार? अन समजा पाचवा अन सहावा मी बदलला. सुर्याऐवजी चंद्र अन त्याचा प्रकाश टाकला तर दुसरे चित्र तयार. समजा त्यात आणखीन एक नदीचा ट्रेसिंगपेपर टाकला, अजून एक नवे चित्र. कौलारू घरांच्या ट्रेसिंगपेपर ऐवजी उंच इमारतींचा ट्रे. पे. टाकला , नवे चित्र. आहे ना मज्जा ? हीच मज्जा या फोटोशॉपमध्ये लेअर्स देतात.

आता हे लेअर्स कुठे आहेत ? तुमच्या स्क्रिनवर पांढरा कागद, टूल्सची खिडकी आणि तिसरी खिडकी आहे ती या लेअर्सची. आता पर्यंत तेथे एकच लेअर आहे.कारण नवा लेअर तुम्हाला निर्माण करावा लागतो.
प्रत्येक वेगळ्या निर्मितीसाठी नवा लेअर तयार करा.
लेअरच्या खिडकीत अगदी खाली उजवी कडे एक कचर्‍याचा डब्बा ( ट्रॅश बीन म्हटलं तर कळल बगा तुम्हाला )दिसेल. त्याला लागून डावीकडे छोटा चौकोन आहे त्यावर क्लिक करा. झाला नवीन लेअर तयार. आता तिथे फक्त पांढरे, अ‍ॅश चौकोन दिसत असतील. तिथेच उजवीकडे Layer 1 असे आहे तेथे डबल क्लिक करा अन त्याला नाव द्या, जसे Sky. प्रत्येक लेअरला नाव दिले की नंतर तो लेअर शोधणे सोपे जाते.
लेअरवर काम करताना एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागते ती म्हणजे आपण नक्की कोणत्या लेअरवर काम करतो आहोत याकडे नीट लक्ष द्यावे लागते.ज्या लेअरवर आपण काम करतो आहोत तो लेअर हा लेअरच्या खिडकीत डार्क निळा दिसतो, त्यावरून आपल्याला कळते, आपण नक्की कोठे आहोत.

१०. तर आता आपण Sky या लेअर वर आहोत. इथे आकाश करायचे आहे. फोटोशॉपमधली एक मजा आता आपण शिकूयात. इथे आकाश तेही ढगांसह करणे अगदी सोपे आहे.
टूल्समधील पाचव्या उपगटातील दोन चौकोनांकडे पुन्हा जाउ. तिथे आता मागे पांढरा अन पुढे हिरवा रंग आहे.
पुढच्या चौकोनावर क्लिक करून तेथे आकाशी निळा रंग सिलेक्ट करा. ( मदत हवी तर क्र. ७ पहा) आता मागचा चौकोन सिलेक्ट करा. त्यात डार्क निळा किंवा काळसर निळा रंग सिलेक्ट करा.
आता वरच्या फाईल, एडिट,.. च्या टुलबारवरील फिल्टर यावर क्लिक करा. अन त्यातील रेंडर ( १३ वा पर्याय) यावर कर्सर न्या. त्यातील क्लाउड्स हा पहिला पर्याय सिलेक्ट करा. तुमचे आकाश तयार आहे.
पण हे काय आपली हिरवी जमीन कोठे गेली?
घाबरू नका.

११. लेअरच्या खिडकीत आकाशाच्या छोट्या खिडकीच्या डावी कडचा डोळा आहे त्यावर क्लिक करा. आता आकाश दिसेनासे होईल अन जमीन दिसू लागेल. आता खालच्या लेअरवर ( जिथे बॅकग्राउंड असे लिहिले आहे त्यावर) क्लिक करा ( म्हणजे आता तुम्ही त्या लेअरवर काम करू शकाल). पुन्हा जादूची छडी घ्या. अन आता वरच्या पांढर्‍या भागावर क्लिक करा. अन तो सिलेक्ट झालेला पांढरा भाग डिलिट करा( डिलिटचे बटण दाबा ). पुन्हा सिलेक्शन घालवण्यासाठी Ctrl + C दाबा.
लेअरच्या खिडकीत, या लेअरला नाव द्यायचे राहिलेच. ते आता देउयात. आता त्याला बॅकग्राउंड असे नाव आहे. त्या ऐवजी त्याला Ground असे नाव देउ. त्या बॅकग्राऊंड या नावावर डबल क्लिक करा. एक नवी खिडकी उघडली जाईल New layer म्हणून तेथे Ground असे नाव द्या.अन ओ. के. वर क्लिक करा.
आता हा ग्राउंडचा लेअर उचलून Sky च्या वर ठेवा. अन स्कायच्या डोळ्याच्या ठिकाणी पुन्हा क्लिक करा. आले ना तुमचे आकाश परत अन तेही जमिनी सकट.

१२. आता याच पद्धतीने डोंगर, नदी, पक्षी, घरे, झाडे या प्रत्येकासाठी नवे लेअर्स तयार करा.

आता ही फाईल तुम्हाला हव्या त्या ठिकाणी सेव्ह करा. सेव्ह करताना ती psd फाईल म्हणूनच सेव्ह करा. जेव्हा तुमचे चित्र पूर्ण मनासारखे होईल तेव्हाही ही फाईल प्रथम psd म्हणून सेव्ह करा, अन मग पुन्हा jepg किंवा तुम्हाला हव्या त्या टाईप मध्ये सेव्ह करा. याचा फायदा असा की जेव्हा तुम्हाला यात बदल, अ‍ॅडीशन , फरक करावा वाटेल तेव्हा या psd फायलीत तुमचे सर्व लेअर्स सुरक्षीत असतील. अन ते तुम्ही बदलू शकाल.

हा लेख लिहिता लिहिता काढलेले चित्र :
basic copy.jpg

फोटोशॉपमध्ये सांगण्यासारखे प्रचंड आहे. ही केवळ बारिकशी झलक आहे. आपल्याला आवडले तर अजून लिहीन. माझा यातील अनुभव फारतर वर्षाचा. त्यामुळे काही चूक झाली तर सांभाळून घ्याल Happy

गुलमोहर: 

अगं, परवाच कोणाच्यातरी विपुत वाचले तु लिहिणार आहेस म्हणुन. लगेच तुला लिहिणार होते की नेकी और पुछ पुछ मे मत रह जाना... आम्ही वाट पाहतोय. मी बरेच दिवस फोटोशॉप शिकायचे शिकायचे असे घोकतेय, पण वेळ काढुन बसणे होत नाहीये. आता तु लिहितेसय तर त्या निमित्ताने शिकले जाईल..

अजुन वरचे वाचले नाहीय. घरी जाऊन वाचेन कारण वाचता वाचताच करुनही बघायचेय.. फोटोही कसे बदलायचे ते लिही... (वर लिहिलेस की नाही ते माहित नाही, पण तुला आठवण रहावी म्हणुन टाकतेय :). मागे तु एक फोटो टाकलेलास एकाच फ्रेममध्ये अस्त होणारा सुर्य वेगवेगळ्या पोझीशन्समध्ये, तो फोटो मजा जाम आवडलेला. तसा स्वतः बनवायचाय. कसे जमवलेस ते सांग.)

आरती, मी एक पहिलीच धडपड केली आहे तुझा मस्त लेख वाचून Happy अजून पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत!
बादवे, psd फाईल jepg मधे कशी सेव्ह करायची? Uhoh

अरे वा मस्त जमलय की. आता चेहर्‍याच्या आतला पांढरा भाग जादूच्या कांडिने सिलेक्ट कर अन रंगांच्या वरच्या चौकोनात स्किन कलर घेउन Alt + delete मार. म्हणजे अजून छान दिसेल.

आरती अजून वाचला नाही लेख पूर्ण.. पण खूप धन्यवाद हे सुरु केल्याबद्दल. Happy
मघे तू दिलेली लिंक होती ती पण भारी होती... ती वर चिकटवना जमलं तर..

अरुंधती आता चेहर्‍यात मानेची डेफ्त आणि गालांचा उठाव दिसण्यासाठी बर्न टूल आणि डॉज टूल वापरून बघ.एक्स्पोजर अगदी कमी ( ९ किंवा ११ ) ठेव.

आरती, थांकु थांकु....बघते करून आता तू सांगितल्याप्रमाणे! काल ते वेगवेगळे ब्रश वापरून मी स्प्रे मारून एक पेंटिंग करण्याचा व्यर्थ प्रयत्न केला. तितके नीट झाले नाही! पण आज पुन्हा बघणार करून!! Happy
तू त्या वरच्या मडमेला छान मेकअप केलास गं! Proud आता तू दिलेल्या टिप्स वापरून पहाते!!

एक छोटासा प्रयत्न माझाही...

sunset.jpg

तीन वेगवेगळ्या लेयर्स आहेत. पहिल्या लेयरमध्ये अर्धा भाग सिलेक्ट करून नेव्ही ब्ल्यु वापरलाय, पाण्याचा थोडा फिल येण्यासाठी फ़िल्टर मधील ब्रश स्ट्रोक्स हे ऑप्शन वापरले आहे. दुसर्‍या लेयरमध्ये डोंगर आणि तिसरीमध्ये आकाश व मावळता सुर्य...... ! आकाशातील रंग स्प्रेड करण्यासाठी ब्लरचे ऑप्शन वापरलेय.

छान माहिती. धन्यवाद.
एमएस ऑफिसच्या "पेंट"मध्ये मी खूप धडपडलो आहे. आता इथंही लुडबूड करणं आलंच !

Happy