सोहळा..... एका जीवनाचा (भाग १)

Submitted by अ. अ. जोशी on 10 April, 2010 - 14:57

सोहळा.... एका जीवनाचा

पुण्यापासून नगरकडे जाताना शिक्रापूर - शिरूर रस्त्यावर गणेगांव फाट्याला वळले की भुईगावात एक मारुतीचे पडके मंदिर दिसेल. भारताला पारतंत्र्यातून मुक्त करावे म्हणून कितीतरी वर्षे या मारुतीचा आशीर्वाद घेणार्‍यांनी, याचा मंदिरीय जिर्णोद्धार न केल्याने आणि कोण करणार हा प्रश्न असल्याने ग्रामस्थांनी "पडक्या मारुती" असे नामकरण करून हा प्रश्न कायमचा निकालात काढला. इतक्या वर्षांत कधीही लेप न दिल्याने ही मारुतीची मूर्ति गणपति, म्हसोबा, म्हाळसाई अशा कुठल्याही नावाने खपली असती. स्वातंत्र्यासाठी 1935 ते 1947 या 12 वर्षांत या मारुतीसमोर इतके नारळ फोडले गेले असतील की त्यांचा हिशोब केला तर दोन-तीन मंदिरे सहज बांधून झाली असती. महान क्रांतिकारक आबाजी धुमाळ यांना इंग्रजांकडून मार बसल्यावर ते बराच काळ बेशुद्धावस्थेत होते. ते याच गावातले. त्यांना शुद्धीत आणण्यासाठी या मारुतीसमोर ग्रामस्थांनी साकडे घातल्यावर सरळ, सोपा, बहुमूल्य, बहुउपयोगी अशा रेकी उपचाराच्या सहाय्याने उभ्या उभ्याच मारुतीने आबांना शुद्धीत आणले असा गावातील काही अभ्यासकांचा दावा आहे. खरेतर, आबाजी धुमाळ हे इंग्रजांसमोर गेले होते का ? हेही कुणाला माहित नाही. मात्र, पडक्या मारुती नवसाला पावतो हे खरे ! या पडक्या मारुतीची ख्याती दूरवर पोहोचली आहे.

पडक्या मारुतीपासून उजवीकडे साधारण 4 किलोमीटरवर खरपुसवाडी आहे. खरपुसवाडीत महिला सरपंच असल्याने निर्मलग्राम योजनेत सर्व घरांनी सहभाग घेतला. महिला सरपंचाचे धनी गावातील पैलवान असल्याने आणि आजपर्य़ंत त्यांनी केलेल्या सक्रीय बाहुकार्यामुळे, दुसरा कोणता पर्यायही ग्रामस्थांजवळ नव्हता. जो शेतात सकाळचे विधी करण्यास बसेल त्याचा त्याच अवस्थेतील फोटो काढून सरळ चावडीवर लावला जाईल अशी महिला सरपंचाची धमकीच होती. त्यामुळे गावच्या कारभारात कधीही लक्ष न घालणारेही उगाचच चावडीवर चकरा मारायचे. कुजबुजत बसायचे..

"काय हो? लागला का फोटो?" सखारामने घाईघाईने विचारले.
"कुणाचा? तुमचा की काय..?" प्रकाश म्हणजे अवलियाच. तो कुणाला सोडेल तर शपथ !
"अहो, नाही हो...! फोटो लागतोय की काय म्हणून मी अजून गेलोच नाही. लागलाय का कुणाचा?" सखारामने आपल्या घाईची नेमकी अडचण सांगितली.
"अजून तरी नाही बुआ.." पेपरातून तोंड काढून लाल रंगाची पिंक रस्त्याच्या कडेला जाईल इतपत जोरात टाकत बबनराव म्हणाले आणि पुन्हा पेपरात डोके खुपसले.
"अन लागतोय कशाला ? त्या फोटोग्राफराला कुठे जायचे असा प्रश्न पडलाय." शशीने कारणमीमांसा केली.
"का...हो?" सखाराम.
"आहो...! त्यानी कुठं बांधलंय अजून..?" पुन्हा शशी.
"काय?" सखाराम.
"शौचमंदिर हो..." पुन्हा एकदा पेपरातून डोके काढून, आपल्याला न विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याच्या सवयीमुळे, बबनरावांनी पाजळली.
" अहो, बबनराव, शौच----मंदिर नसते. त्याला शौचालय म्हणतात." प्रकाशने माहिती दिली.
"शौचालय..? " कधी नव्हे ते गण्याने तोंड उघडले.
"त्यात आश्चर्य काय? अहो, जसा हिमालय तसे शौचालय...! काय ?" प्रकाशने सर्वांच्या डोक्यात प्रकाश पाडण्याचा प्रयत्न केला.
"हां.... याचा अभ्यास फार दांडगा आहे बरं का !" शशीने आपला अभ्यास मांडला.

अशा चर्चांना ऊतच आला होता गावात. तसे शौचालय फारच कमी लोकांनी बांधले होते. तरीही, चावडीवर येणार्‍या आणि प्रत्येक भिंत तपासणार्‍या उत्साही कार्यकर्त्यांची चांगलीच निराशा होत होती. अजूनपर्यंत एकही फोटो लागला नव्हता. खरेतर, येणारा दुसर्‍याचा नाही तर स्वत:चाच फोटो लागलेला नाही ना? याची खात्री करण्यास येत होता. बर्‍याच जणांनी फोटोग्राफरबरोबर व्यवस्थित फिल्डींग लावली होती.

खरपुसवाडीच्या थोडे पुढे, म्हणजे साधारण 2-3 किलोमीटरवर तिरगांव नावाचे गाव आहे. या तिरगावात आज कसलीतरी गडबड आहे. म्हणजे तसे हे बडबडीचे गाव म्हणून प्रसिद्ध आहेच. तिरगावाचे वैशिष्ट्य सांगावं तितकं थोडं!

अख्ख्या पंचक्रोशीत गावच्या वेशीवर कमान असेल तर ती तिरगावलाच. ग्रामस्थ हे फार अभिमानाने सांगतात. ही कमान म्हणजे तिरगावच्या शिरपेचात तुरा असल्यासारखाच होता. कारण, मुख्य रस्त्यावरून जाताना एवढी एकच कमान.... आणि त्यात नाव 'तिरगाव' !

तिरगाव हे नाव कसे पडले याचीही आख्यायिका आहे. राम-लक्ष्मण हे सीतेच्या शोधार्थ निघालेले असताना वाटेत ही जागा लागली. त्यावेळी इथे कोणतीही वस्ती नव्हती. मात्र, शोधकार्यात अनेक राक्षस या ठिकाणीच आडवे आले. येथील जमीन काळीशार असल्याने हे राक्षस दिसत नसत म्हणे. त्यामुळे त्यांची वसतीस्थाने शोधणे हे एक अवघड आणि बहुधा अशक्य वाटणारे काम होते. एकदा एक राक्षस लक्ष्मणाला दिसला. मात्र, तो राक्षस अचानक कुठे गायब झाला ते कळले नाही. काही वेळाने पुन्हा एक राक्षस त्याच ठिकाणी दिसला. लक्ष्मणाला शंका आली की इथेच त्यांचे वसतीस्थान असावे. रामाला बोलावून हे दाखवावे. पण हे लक्षात कसे राहणार? या जागेवर काहीतरी खूण करायला हवी. म्हणून त्याने एक बाण तीव्र इच्छेने त्या जमिनीत मारला. त्याबरोबर जमीन हलायला लागली. सर्व राक्षस पटापट बाहेर दिसू लागले आणि लक्ष्मणाच्याच अंगावर धावून गेले. लक्ष्मणाने सर्वांचा नायनाट केला. रामाला हा पराक्रम ऐकून फार बरे वाटले. मात्र, तो रोवला गेलेला तीर काही केल्या निघेना. तेंव्हा रामानेच लक्ष्मणाला सांगितले की जर या ठिकाणी कधी वस्ती झाली तर त्याच्या नावात 'तिर' असेल. म्हणून हे तिरगांव....! बोला, पंढरीनाथ महाराज की जय !

राम-लक्ष्मणाशिवाय कोणीही तिसरे हजर नसलेला हा प्रसंग ग्रामस्थ फार आत्मियतेने सांगतात.

तिरगांव हे केवळ 250 घरांचं गाव. परंतु किमान 25 किलोमीटरच्या रस्त्यावर दुसरे इतके मोठे गाव नसणे हेही तिरगांवचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. तिरगावचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 250 घरे असताना गावची लोकसंख्या ग्रामस्थांनी कधी 1500 च्या खाली येऊ दिली नाही. इतक्या मोठ्या गावात माणसे कमी असणे हे ग्रामस्थांना कमीपणाचे वाटायचे. 'हम दो, हमारे दो' वगैरे सांगणार्‍यांना या गावातल्या लोकांनी 'हम दो, हमारे दो और दो' असे सांगून पिटाळून लावले होते. त्यांचे म्हणणे, डुकरांची वाढती संख्या कमी करा. माणसांची नको. एकदा तर काही शिक्षिका शहरातून खास या कामासाठी या गावात पाठविल्या होत्या. त्यावेळी महिलांची भेट घेणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे, त्यांना 'फॆमिली प्लॆनिंग'चे महत्व समजावून सांगणे असे उपक्रम होते. दोन शिक्षिका सुरेखाताई तिरगावकरांना भेटायला गेल्या. नमस्कार, पाणी वगैरे झाले. आणि गप्पा सुरू झाल्या....

"बोला बाई, काय काम काढलं इतक्या लांबवर ?" सुरेखाताईंनी विचारलं.
" म्हटलं तुम्हाला मुलं किती?" एका शिक्षिकेनं एकदम विषयालाच हात घातला.
" एवढं विचारायला इतक्या लांबवर ?" सुरेखाताईंचा प्रश्न.
" हं.. केवळ इतकं नाही. मुलं किती सांगा तर.... मग सांगते." दुसर्‍या शिक्षिकेनं बाजू सावरली.
" मला...... म्हणजे बघा.... चिमी पहिली बरं का ! रा......घु दुसरा, श्याम्या तिसरा, लगोलग....बाबू..."
"लगोलग? म्हणजे..?" पहिल्या शिक्षिकेला धीर धरवेना.
" म्हणजे काय आहे की चिमी, राघू आणि श्याम्या यांच्यात दोन-दोन वर्षांचे अंतर. श्याम्या आणि बाबू यांच्यात अंतर फक्त वर्षाचे. म्हणजे तशी घाईच झाली म्हणा. पण, पुढे नाही होवू दिली." पदर सावरीत फार अभिमानानं सुरेखाताई म्हणाल्या.
"म्हणजे? अजून... तुम्हाला..... मुलं....?" पहिल्या शिक्षिकेची बोलतीच बंद व्हायची वेळ आली होती. ती जरा या क्षेत्रात नवखी असावी. दुसरी मात्र आश्चर्याने, पण शांतपणे ऐकत होती.
"होय तर ! इतक्यात होतंय होय गावात..?" शिक्षिकेचा अडाणीपणा दाखवीत सुरेखाताई म्हणाल्या. "बाबूनंतर दोन वर्षांनी बाळ्या आणि अडीच वर्षांनी शारदा..." निश्चिंत झाल्याप्रमाणे सुरेखाताई म्हणाल्या.
"म्हणजे एकंदर तुम्हाला 6 मुलं..." हुश्श करीत पहिली शिक्षिका म्हणाली.
"होय" सुरेखाताई.
नंतर फॆमिली प्लॆनिंग म्हणजे काय? ते कशासाठी करावे? दोनच मुले का? सरकारचे धोरण, घराचा - गावाचा पर्यायाने देशाचा यात फायदा कसा? अशा सगळ्या गोष्टी नीटपणे समजावत दुसरी अनुभवी शिक्षिका बोलत होती.
"आता झालं ते झालं. आपल्या मुलांना, मुलींना, सुनांना हे महत्व पटवून द्यायला हवे." दुसरी शिक्षिका निर्धाराने बोलत होती.
सुरेखाबाई अचानक म्हणाल्या..."काय खुळ्या की काय तुम्ही?"
इतकावेळ बोलल्याने आवंढा गिळू पाहणार्‍या दुसर्‍या शिक्षिकेला सुरेखाबाईंच्या या प्रश्नाने ठसकाच लागला.
"किती जमीन आहे आमची माहिती आहे काय? ती राबायची कोणी? दोन पोरं झाली. त्यात एक पोरगी. म्हणजे हाताशी फक्त एकच लागणार. उरलेलं काय सरकार देणार आहे होय? आम्ही पोसतोय आमच्या पोरांना. सरकारकडे नाही गेलो अजून. घरचा गडी असला की काम कसं 'झिपाक' होतं." झिपाक असा शब्द कोणत्याही बोलीभाषेत नाही. मात्र, हल्ली टीव्हीवरच्या रिऎलिटी शोजमुळे निरनिराळे निरर्थक शब्दसुद्धा गावपातळीवर अर्थवाही होतात. त्यातलाच हा शब्द 'झिपाक'. झिपाक म्हणजे नेमके काय हे कुणालाच नाही सांगता येणार. पण काहीतरी छान, सुंदर, उत्तम असे असावे.
एकंदरीत, सुरेखाबाईंचं लॉजिक पाहून दोन्ही शिक्षिका गप्प झाल्या. हळूहळू विषय बदलत त्यांनी काढता पाय घेतला. तिरगावात बहुतेक ठिकाणी हाच अनुभव येत होता. फॆमिली प्लॆनिंग म्हणजे फॆमिलीने जगावे कसे याचा आराखडा असेल तर जेवढी जमीन त्याप्रमाणे गडी तयार व्हायला हवेत असेच सर्वांचे मत होते. आमच्याकडे चार, आमच्याकडे सहा असे लोक अभिमानाने सांगत होते. एकाठिकाणी तर सखुबाईंशी असा संवाद झाला की काय बोलावे हेच शिक्षिकांना कळेना.
"सात मुले आहेत तुम्हाला?"
"हो"
"एवढं कसं केलंत तुम्ही?"
"त्यात काय?"
"नाही म्हणजे हा त्रास...? मिस्टरांना बोलला नाहीत ?"
"काय?"
"हेच की आणखी मूल नको म्हणून?"
"मी कशाला? तेच म्हणाले की पुरे म्हणून. तेंव्हा थांबलो. शेवटी सगळं बघायलाच हवं की !"
"अहो, पण सात म्हणजे...?"
"मग !" सखुबाई जरा लाजतंच म्हणाल्या.

कोठेही या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. आता, सुनांना वाटेत गाठून धडे द्यायचे असे मोहिमेतल्या लोकांनी ठरवले. एका सुनबाईला सांगितले देखील. तर ती गुश्श्यातच म्हणाली, " आत्ता कुठे दोन झालीत तर लगेच आलात होय शिकवायला..? अजून घट्ट आहे म्हटलं मी..!" म्हणजे हा वारही खालीच गेला होता.

या मोहिमेतील बहुतेकांना पंचक्रोशित हाच अनुभव आला. 'दो हो या और हो, पण हे गाव नको' अशीच मोहिमेची अवस्था झालेली होती. बहुतेक घरात पाणी आणणारी मुलगी किंवा सून ही तिसरी, सहावी वगैरे होती.

सरकारने आणलेली निर्मलग्राम योजना अशीच रखडली होती. निर्मलग्रामच्या मिटींगच्या वेळचा प्रसंग:
योजनेची माहिती आणि महत्व सांगणारा अधिकारी अत्यंत आत्मविश्वासाने बोलत होता....

"बंधूंनो, आज समाजाला निर्मलतेची आवश्यकता आहे........ काळ पुढे जात आहे. आपण का मागे रहावे. आपल्या बायका, मुली, सुना टमरेलं घेऊन फिरताना आपल्याला वाईट नाही वाटंत?..."
मध्येच एकाने तोडलं "त्यात काय वाटायचंय? इतरांच्या तशा आपल्याही..."
त्याला मध्येच तोडत "हेच..हेच म्हणायचे आहे मला." असे होईल याचा अंदाज असल्याने अधिकारी लगेच म्हणाला "आपल्याला वाटले पाहिजे. इतरांना नाही वाटले तरी.. आपल्याला वाटले पाहिजे. आम्ही तुम्हाला संडास बांधून देऊ. सरकारची तशी योजनाच आहे. संडास बांधले की तुम्हाला शेतात जावे लागणार नाही..."
त्याचे म्हणणे मध्येच तोडत एक जण म्हणाला "पण....."
त्याच्या बोलण्याकडे लक्ष न देता अधिकारी बोलत राहिला "रात्री अपरात्री महिलांना पायपीट करावी लागणार नाही. शेतात काही प्राणी असतात. काही झाले म्हणजे..?" इतके बोलून अधिकारी थांबला. मात्र हे शेवटचे त्याचे बोलणे ग्रामस्थांना पटलेले दिसले. कारण, मागच्याच वर्षी साप चावून गीता नावाची नववधू गेली होती. याची तीव्रतेने आठवण होत गीताच्या घरच्यांनी ताबडतोब होकार दिलेला होता. त्यांचा होकार ऐकून इतर ग्रामस्थांनीदेखिल एक एक करून होकार दिला. एवढे होऊनही निर्मलग्राम नाहीच झाले शेवटी.

तर, असे हे तिरगाव आणि तिरगांवकर ! तिरगाव इतके प्रसिद्ध झाले की आजूबाजूची गावे, खुणा, रस्ते तिरगावपासून किती किलोमीटरवर आहेत हे सांगितले की काम व्हायचे. आता तर, पडक्या मारुती म्हणजे तो तिरगावजवळचा ना? असे प्रश्नही लोक विचारायला लागलेत. इतकी तिरगावची ख्याती झाली आहे. तिरगाव, तालुक्यात आणखी प्रसिद्ध व्हायला कारणही तसेच घडले. तिरगावचा सदानंद उर्फ सदा हा तालुक्यात सातवीच्या परिक्षेत पहिला आला. पाचही भावंडांच्यात तो सर्वात हुशार होता. तो तालुक्यात पहिला आल्याने पंचक्रोशीत पेढे वाटले गेले. सत्कार समारंभ झाले. त्याला पुढील शिक्षणासाठी हातभार लागावा म्हणून सर्वात प्रथम हातभार लावला तो आप्पांनी. आप्पा तिरगावकर यांनी.

आप्पा म्हणजेच श्रीराम हनुमंत तिरगावकर. तिरगावातील बडं प्रस्थ. त्यांना विचारल्याशिवाय एकही गोष्ट होणार नाही तिरगावात. केवळ तिरगावात नाही तर पंचक्रोशीत काहीही वेगळे करायचे झाले तरी आप्पांचा सल्ला घेतला जायचा. त्यांच्या दबदबा आणि अधिकारापेक्षा त्यांना असणारी समज आणि अचूकता यामुळे लोक आकर्षित व्हायचे. मोठमोठे पुढारी देखील पंचक्रोशीत इतरत्र पाय ठेवायच्या आधी आप्पांना भेटायचे. असे हे आप्पा तिरगावकर. यांच्याच एकसष्ठीच्या सोहळ्याची जोरदार तयारी चालली होती गावात.

आप्पा मात्र शांत आहेत. तयारी पहायला गावचे भजनी मंडळ, सर्वसुख महिला मंडळ, श्री गणेश तरूण मंडळ अशी मंडळे उत्सूक आहेत. आप्पांचा सोहळा म्हटल्यावर कोण पुढे नाही येणार ? आता, आप्पांसारख्या ज्येष्ठ-श्रेष्ठ व्यक्तीचा एकसष्ठी सोहळा म्हणजे त्याला वेगवेगळे अधिकारी, पुढारी येणार, आप्पांची जुनी दोस्त मंडळी येणार, पाहुणे येणार. या सर्वांची व्यवस्था कशी ठेवायची यावर विचार करण्यासाठी मंडळी जमली. त्यातील एक बुजुर्ग अण्णा म्हणाले...
"सर्वांची व्यवस्था त्यांच्या इभ्रतीला शोभेल अशी उच्च दर्जाची हवी."
"सर्वांची म्हणजे कोणाची...?" हा भाबडा प्रश्न गणेश तरूण मंडळाशिवाय कोणाचा असणार?
"अरे, सर्वांची म्हणजे जे पुढारी, अधिकारी वगैरे येणार आहेत ना त्यां..ची..." अण्णा नेहमीप्रमाणेच समजुतीच्या स्वरात म्हणाले. 28 वर्षे शाळामास्तर होते ते. त्यामुळे शेवटच्या 'त्यांची' वर अण्णांनी दिलेला जोर "आता गप्प बसा..." असे सांगणारा होता हे बहुतेकांना सहज कळले.
"पण अण्णा, या पुढार्‍यांना कळणार कसे की आपण इतका मोठा कार्यक्रम करीत आहोत? त्यासाठी आप्पांच्या पाट्या टाकायला नकोत का?" अण्णांचाच विद्यार्थी पेपरात वाचल्याने माहीत झाल्यामुळे मोठ्या धैर्याने म्हणाला.
"अरे xxx, पाट्या ला-वा-य-ला असे म्हणतात. असू देत. तरी याचा आपण सर्व मिळून विचार करू. बोला, कोण घेणार जबाबदारी?" अण्णांनी उत्साहाने विचारले.
त्यावर काहीच घडले नाही. सर्वजण 'आ'वासून अण्णांकडेच बघत होते. कारण, गेल्या 20-22 वर्षांत असा कोणताही सोहळा अख्ख्या पंचक्रोशीतही झाला नव्हता.
"अरे कोण घेणार जबाबदारी...?" अण्णांनी पुन्हा विचारले. पण हुप्प. काहीच हालचाल नाही.
"अरे, हात वर करा ज्यांना पाहिजे त्यांनी..." अण्णा जरा रागातच म्हणाले.
अण्णांच्या अनुभवाचा आणि वयाचा मान राखून सर्वांनीच हात वर केले.
"अरे, सर्वांनी हात वर करून कसे चालेल. प्रत्येकाने कामे वाटून घेतली पाहिजेत. एकच काम सर्वांनी करून चालणार नाही. काहींनी हात खाली करा बघू..."
एकमेकांचा अंदाज घेत काही हात खाली आले.
आता, वर राहिलेल्या हातापैकी एकाला अण्णांनी विचारले "तू काय करणार..?"
"काय करणार...?" भाबडेपणाने त्यानेही विचारले.
"अरे, काय करणार म्हणजे पाटीसाठी तू काय करणार?"
"कसली पाटी?"
अण्णा वैतागलेच. तरी शांत राहण्याचा प्रयत्न करीत बोलले "अरे, कसली पाटी काय? आप्पांची पाटी लावायची असे ठरले ना मगाशी? का---य---?"
"हां, ठरले की. मग लावेल की कोणीतरी..." तोही तितक्याच शांतपणे म्हणाला.
"कोणीतरी..? मग तू कशाला हात वर केला होतास...? अरे...." अण्णांना यापुढे काय बोलावे तेच कळेना.
तो मात्र अगदी शांतपणे म्हणाला "तुम्हीच म्हणला नव्हता का की, काहींनी हात वर करा काहींनी खाली करा... मग मी वर ठेवला हात माझा."
इतरांनाही समजावण्याच्या आणि त्यांचे अनुमोदन घेण्याच्या तयारीने त्याने मान हलवीत आजूबाजूला बघितले. मात्र, वर झालेले बहुतेक हात काय करायचे हे न समजल्याने किंवा इतका वेळ वर ठेवल्याने दुखत असल्यामुळे निम्मे-अधिक खाली गेले होते. तरीही जे दोन-चार उरले होते ते तरूण, तडफदार दिसत होते. काही करण्याची इच्छा त्यांच्यात अण्णांना दिसली. आणि आता पाटीचे काम वसंत उर्फ वश्या, हेमंत उर्फ हेमू, जयंत उर्फ टिंकू आणि जगन्नाथ उर्फ जग्या अशा चौघांकडे सोपविण्यात आले.

पाटीसाठी नेमके काय करावे लागते हे चौघांपैकी तसे कोणालाही माहीत नव्हते. मात्र, टिंकू त्याच्या मामाकडे शहरात बर्‍याचवेळा गेला असल्याने त्याला थोडेफार माहीत होते. त्यामुळे पाटी शिलेदारांचा तोच म्होरक्या बनला.
त्याने तिघांनाही सांगितले " हे पहा, पहिल्यांदा हे लोक माप घेतात..."
अचानक मधेच हेमू हसायला लागला. "मा--प-- त्याचा काय उपयोग?" हा प्रश्न ऐकून टिंकूचा चेहरा वाकडा झालेला पाहून जग्या मधे पडला. जग्याने हेमूला समजावले.
पुन्हा टिंकू म्हणाला "आडवे किती आणि उभे किती असे माप घ्यायचे. त्या आधी आपल्याला जागा शोधायला लागतील पाट्या लावण्यासाठी..."
"जागा काय..... रग्गड आहेत." आत्तापर्यंत शांत असलेला वश्या म्हणाला "पहिली जागा वेशीवर. पहिले तिथेच टांगू.."
कपाळावर हात मारीत टिंकू म्हणाला "वेशीवर लावू म्हणावे..."
"दुसरी जागा मी सुचवितो. पाण्याची टाकी. ती उंच आहे. आपण लावलेली पाटी कोणालाही दिसेल" हेमूने सुचविले.
"वा ! फारच छान कल्पना..!" हायसे वाटल्यासारखे टिंकू म्हणाला.
अशा पद्धतीने 7-8 जागा नक्की झाल्या.
तरीही काहीतरी राहिले आहे असे वाटून कपाळाला आठ्या पाडून जग्या म्हणाला " काय रे ! या सगळ्यात आप्पांचे घर कोणते हे कसे समजणार ? तेथेही पाटी पाहिजेच की एखादी !" हे म्हणणे मान्य करून पुढील गोष्टींसाठी मंडळी म्हणजे चौकडी विचार करायला लागली. निरनिराळ्या देवळांच्या पाट्या बनविणारा शेजारच्याच गावात होता. त्याच्याकडे उद्याच जाऊन मजकूर देऊ असे ठरवून त्यांची बैठक संपली.

इकडे अण्णांनी बर्‍यापैकी कामाचे वाटप केले होते. फुले-हार-सजावट महिला मंडळाकडे सुपूर्द केली होती. बाकी व्यवस्थेत कोणतीही कसर राहू नये यासाठी इतर सर्वांनी तयार रहावे असे स्वत:च ठरवून ती बैठक संपवली होती.
आता पुढे सर्व व्यवस्थित पार पडणार की तिथेही गोंधळ होणार हे देवालाच ठाऊक. असे मनातल्या मनात म्हणत अण्णांनी स्वत:भोवतीच चकरा मारल्या आणि निर्धास्त झाले.

क्रमश:

गुलमोहर: 

पहिलाच भाग आहे हा. नेमकी कथा लक्षात येत नाहीये. पण लिखाण चांगले आहे. मात्र, निवडलेला बाज थोडा विनोदाकडे झुकणारा असल्याने आणि विषय दिलखेचक नसल्याने तुमची कसोटी लागणार बुवा... तुम्ही निभावून न्यालच म्हणा.
तो लक्ष्मणाचा बाण - त्याचे पुढे काय झाले याचे एक्स्प्लनेशन आले नाही.
भाग थोडा छोटा वाटतो आहे. ठीक आहे दीर्घकाळ चालेल.

** फक्त या सोहळ्यावरच लिखाण आहे की आणखी काही सांगणार आहात? (हे उगाचच विचारले. राग मानू नका.) बाकी तुमचे लिखाण 'झिपाक' आहे. पुलेशु.

सर्व वाचकांना धन्यवाद..!
कथा केवळ विनोदी अंगाने जाणारी नाही हे पुढे कळेलच. आप्पा तिरगावकर यांच्याबरोबर इतरांच्याही जीवनाचा सोहळा पुढे पहायला मिळेल. फक्त सोहळा या शब्दाचा अर्थ बदलत जाईल.
सन्तू यांच्या टिप्पणीनंतर केवळ सोहळा हे नाव न देता पूर्ण नाव दिले आहे.