फणसाची रस्सा भाजी

Submitted by प्रीति on 5 April, 2010 - 15:26
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

मसाल्यासाठी-
अ.
१ वाटी सुकं खोबरं
१ इंच दालचिनीचा तुकडा
४-५ लवंगा
५-६ मीरी दाणे
एक चमचा जीरे

ब.
२ वाटी कोथिंबीर
आलं-लसुण पेस्ट १ ते ११/२ चमचा
एक मध्यम कांदा भाजलेला

१/२ वाटी तेल
१ मध्यम कांदा बारीक चिरुन
१ चमचा गरम मसाला
तिखट, मीठ आवडीनुसार
तेजपान २-३
२ ते २१/२ वाटी पाणी
अर्धा छोटा फणस चिरुन

क्रमवार पाककृती: 

फणस चिरणे जरा अवघड काम असते. विळी आणि हाताला तेल लावतात, पण मला इथे मिळालेला फणस बिलकुल चिकट नव्हता. बिया असतिल तर त्याचं कव्हर काढुन टाकायचं.
हा चिरलेला फणस


क्रमांक 'अ' मधील गोष्टी भाजुन घ्याव्यात आणि गार झाल्यावर मिक्सरमधुन बारीक करुन घ्याव्यात. आता त्याच भांड्यात 'ब' मधील जिन्नस टाकुन बारीक पेस्ट शक्यतो पाण्याशिवाय करुन घ्यावी.

आता कुकरमधे तेल तापऊन त्यात तेजपान, कांदा परतुन घ्यावा. कांदा ब्राऊन झाला की त्यात पेस्ट परतुन घ्यावी, तिखट, मीठ, हळद घालावी. तेल सुटले पाहिजे.

आता त्यात चिरलेला फणस चांगला परतुन घ्यावा, गरम मसाला घालावा आणि पाणी घालावा.

२ शिट्ट्या करुन घ्याव्या. भाजी तयार.

वाढणी/प्रमाण: 
४-५ माणसे
अधिक टिपा: 

ह्याची ग्रेव्ही ब्राऊन होते. हिरवी पाहिजे असल्यास तिखटाएवजी हि.मिरची घालणे आणि कोथिंबीर अजुन जरा जास्त. ग्रेव्ही लाल भडक पाहिजे असल्यास कोथिंबीर न घालता धने घालणे. शिट्ट्या जास्त झाल्यास जास्त शिजलेली भाजी चांगली लागत नाही. टीनधला फणस पण वापरता येईल पण परत मग कुकरमधे शिजवायची गरज नाही.

माहितीचा स्रोत: 
बेसिक रेसिपी सासुबाई, माझे त्यात बदल.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त वाटते आहे रेसिपी. अशी करून पाहिली पाहिजे. (तेल मात्र बरंच दिसतंय शेवटच्या फोटोत.)
एरवी मी अगदी साधी तिखट/मीठ/गूळ/गोडा मसाला घालून करते.

धन्यवाद, अगो आणि स्वाती.
टिनमधला फणस वापरायचा तरी पाणी न घालता २-३ शिट्ट्या काढाव्या लागतात.>> मला वाटलं छोल्यांसारखं हे पण शिजलेलच असेल, मी वापरलं नाही कधी.
ह्यात तेल बरचं असतं Happy

प्रीती, तुम्ही भाजीच कुकरमधे शिजवताय त्यामुळे मग आधी निराळा शिजवून नाही घेतला तरी चालेल टिनमधला फणस. नाहीतर मात्र उकडून घ्यायला लागतो. Happy

पुण्याला देसाई बंधू आंबेवाल्यांकडे मिळतो तो फणस शिजवावा लागत नाही.. शिजवलेलाच असतो.. )

आंबेवाल्यांकडे फणस ऐ ते न च (तरीच फॉल-पिकोवाल्यांकडे आंबे मिळतात)

प्रीति, भारीच दिसतेय भाजी. मला सायोची रेसिपी पण करुन बघायचीय. ही पण रांगेत.