क्लीनबोल्ड

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

तशी ही काही पहिलीच वेळ नव्हती. पुर्वीही असं झालय. पण हा अनुभव कालचाच आहे. म्हटल शेअर करावा.
परवा रात्री जेव्हा विरारला पोहोचला तेव्हा एका जुन्या मित्राचा फोन आला.
"कुठे आहेस ? "
"आत्ताच उतरलोय विरारला."
"स्वागतवर ये पटकन." स्वागत म्हणजे एक साध, सरळ, कळकट, मळकट चहाचं दुकान. सध्याच्या दिवसात परवडणारं, हक्काचं असं मिटींगपुरतं ठिकाणं. साखरेचे भाव पहाता काही दिवसात तेही परवडेल की नाही ही नवीच शंका !
पोहोचलो. मित्रवर्यांबरोबर एक बुटकेसे गृहस्थ उभे.
"हाच तो." मी दचकलो. "लेखक आहे." शिवी घातल्यासारखं वाटल क्षणभर. "मायबोलीवर लिहीतो." नशीब त्याला नेमकी जागा माहीत होती. हस्तांदोलन झालं.
"काय विशेष ? " हा प्रश्न फक्त हे समजून घ्यायला की आपल्याला एवढ्या तातडीने का बोलावलयं. पण तो प्रत्येकाला उमगतोच असं नाही. 'कॉमन सेन्स इज नॉट कॉमन ऑलवेज.'
"काही नाही. हे आले होते. म्हणून म्हटल तू जवळपास आहेस का ते पहावं." या वाक्यावर मी काय प्रतिक्रिया देणार ? दहा मिनिटात घरी पोहोचतो असं गृहमंत्र्यांना नुकतचं कळवलं होतं. त्यामुळे अर्ध लक्ष तिकडे. आधीच उशीर झालेला.
"मग मी निघू ? " मी शेवटचं शस्त्र आधीच उपसलं.
"थांब रे. एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचय. तुम्ही बोला." मित्राने त्या सदगृहस्थाला इशारा केला.
"तुम्हाला ते नागपुरचं प्रकरण माहीत असेलच. सामुहिक हत्याकांडाचं." त्याने अणूबाँब टाकला. मी नंदीबैलासारखी मान डोलावली.
"त्यावर चित्रपट काढायचाय."
"तो संवेदनशील विषय आहे. त्यावर चित्रपट शक्य नाही. शासन परवानगी देणार नाही."
"ते माझ्याकडे लागलं. तुम्ही म्हणाल त्या परवानग्या देतो. त्याची काळजी करू नका. कस आहे साहेब, विषय ताजा आहे. लोक पैसा द्यायला तयार आहेत. तुम्ही फक्त लिहायचं बघा." त्याने खिशात हात घातला आणि मला पटकन तो साईनिंग अमाऊंट देतो की काय अशी शंका वाटली. त्याने रुमाला काढून तोंड पुसलं.
"पण मला त्याच्यी जास्त माहीती नाही."
"मी आहे ना. मी तुमची गाठ घालून देतो सगळ्यांशी. आख्खं चार्जशीट देऊ तुम्हाला चारशे पानांच. विक्टीमची तुमच्याशी गाठ घालून देतो. वोला, अजून काय पाहीजे ? "
"जागा पहावी लागेल. गावात जावं लागेल. भाषेचा अंदाज घ्यावा लागेल. आरोपींशी बोलावं लागेल. त्यांची बाजू समजून घ्यावी लागेल. त्यांच्या वकीलाशी बोलावं लागेल. " एवढे सगळे 'लागेल' मी एका दमात सांगितले. मी आता त्यात गुंतत होतो की फाटे फोडत होतो, ते मलाही कळेना.
"ते माझ्याकडे लागलं. आरोपींचे वकील काल माझ्याबरोबर होते." माणूस एकदम कसलेला होता.
"हे बघा, यामुळे कोणाच्या भावना दुखावतील हे सांगता यायचं नाही. सबुरीने घ्यावं लागेल. मागे संतसुर्य तुकारामांवरील पुस्तकानेच केवढा गदारोळ झालेला. मी पुस्तक वाचल तर मला त्यात काही आक्षेपार्ह आढळलं नाही."
"तू ते वारकर्‍यांच्या दृष्टीकोनातून वाचलं नसशील." इति मित्र.
"ते खरय. मी माझ्याच दृष्टीकोनातून वाचलं."
"ते काय घेऊन बसलात ? त्यात काही खर नाही. मी सांगतो तुम्हाला. तुम्ही ते (क्षक्षक्षक्ष) यांचे पुस्तक वाचा. तुकोबांचा खून झालाय हे स्पष्ट लिहीलय."
"तसा संदर्भ वाचलाय म्हणा मी रवींद्र ठाकूरांच्या 'व्हायरस' मध्ये." इति मी. आपल्यालाही बरीच माहीती आहे हे लेखक म्हणून दाखवणं गरजेचं आहे असं कुणीतरी नुकतचं माझ्या कानावर घातलं होतं.
"मग ? "
"पण हा प्रोजेक्ट फार मोठा आहे. साधारण दोन्-अडीच तरी लागतील." इति मित्रवर्य.
"त्याची काळजी करू नका. त्याचा बंदोबस्त होईल. बरं दुसरं एक काम आहे. शाहु महाराजांवर शासनानं बनवलेला चित्रपट म्हणजे तद्दन खोटेपणा आहे. आपल्याला त्यावर जनजागृती करायला हवी."
"म्हणजे?" बुचकळ्यातला मी.
"आपण नवा चित्रपट बनवायचा." काट्याने काटा काढतात हा तसला प्रकार वाटला मला.
"मी तुम्हाला पुस्तक देतो. पुस्तकाच काय ? त्यांच्या वंशजांच्या घरीच जाऊ आपण. शाहु महाराजांना भेटलेली माणसं हयात आहेत. त्यांना भेटू. बोला, काय करायच ? " आता मात्र मला समोरच्याबद्दल फारच आदर वाटायला लागला होता.
"हाही संवेदनशील विषय आहे." इति मी.
"ह्याच बजट पण दोनपर्यंत तरी जाईल." इति मित्र.
"पैशाचा प्रश्नच नाही. त्याच्या वंशजांकडून मिळेलच. नाहीतर गायकवाडांकडून घेऊ."
"कोण गायकवाड ? " इति एक मुर्ख मी.
"रजनीकांत. साऊथचे स्टार. ते नात्यातले आहेत ना त्यांच्या." मला त्याचक्षणी 'आखरी रास्ता' चित्रपटामधल्या अंधारात चाचपडणार्‍या त्या लहान मुलाचा सीन आठवला. माझ्या अज्ञानाची ही परिसीमा होती. वाचन वाढवायलाच हवं.
"मग ठरलं तर. उद्या तुम्ही माझ्या भावाला भेटा. तो तुमची फायनान्सरशी गाठ घालून देईल. शिवाय आपल्याला लवकरच एक लावणीचा जंगी कार्यक्रम इथे करायचाय."
"इथे ? " पुन्हा तोच मुर्ख मी.
"मग. बर तुम्ही नेमकं काय लिहिता मायबोलीवर ? "
"रहस्यकथा." डोळ्यासमोर ३० - ४० प्रतिसाद असलेला मी. "तसा मी अभ्यास केल्याशिवाय काही लिहीत नाही. कालच मी कॉफर्ड मार्केटच्या पोलिस मुख्यालयात गेलेलो..."
"तुमचं पोलिसात काही काम असेल तर सांगा. कमिश्नर साहेबाबरोबर बोलू. त्यात काय ? ते सांगतीलच तुम्हाला पाहीजे ते." एक बेशुद्ध होत असलेला मी.

रितसर घरी पोहोचलो आणि उशीरा येण्याबद्दलचे नेहमीचे 'मधूर वार्तालाप' झाले.
"तुला कळत नाही कसं ? दोन संवेदनशील विषयांवरच्या चित्रपटांचं लिखाण करायचयं मला. उद्या मिटींग आहे."

दुसर्‍या दिवशी एका महत्त्वाच्या कामासाठी सासुरवाडीला जाणं झालं.
"जेवूनच जा आता." सासरेबुवा.
"नको. एक महत्त्वाची मिटींग आहे. जायलाच हवं."
"अरे मटण आणलय. बिर्याणीचा बेत आहे."
"तरी नको. जायलाच हवं" बिर्याणीवर पाणी सोडलं. समोर दोन महत्त्वाचे प्रोजेक्ट होते. साडेबाराची मिटींग. अंधेरीला पोहोचलो. तिथून मग शोधाशोध. शेवटी एकदाची ती इमारत सापडली. फोनाफोनी झाली.
"दहा मिनिटात येईल. बँकेत गेलाय. पैसे काढायला." वाट पहात बसलो. पुन्हा फोन.
"सबवेजवळ पोहोचलाय." पुन्हा वाट. समोरच्या हॉटेलातली वर्दळ वाढली. भर दुपारी एखाद्या हॉटेलसमोर उभं राहून वाट पहाणं म्हणजे....
पुन्हा फोनायच्या आतच कालच्या सदगृहस्थाचा फोन.
"फायनान्सरला घेऊन निघालेत मुंबईहून. दहा मिनिटात पोहोचतील." एव्हाना दोन वाजले होते.
"काहीतरी खाऊन घेऊया." मग 'खाणकाम' उरकलं. तोच फोन आला. आम्ही पुन्हा इमारतीपाशी.
"ही पडणार तर नाही ना ? " एक शंका.
"म्हाडाची नोटीस तर दिसत नाही. चला वर जाऊन पाहू." शेवटी आम्ही एकदाचे त्या सदगृहस्थाच्या भावाकडे पोहोचलो. आत नवीन मराठी चित्रपटांचे दोन आणि भोजपुरी चित्रपटाचे सतराशे साठ पोस्टर्स होते. मी धन्य.

"सॉरी. बराच उशीर झाला. बोला काय काम काढलत ? " अनपेक्षित प्रश्न.
"आम्ही सिनेमा काढायचा ठरवलाय. फायनान्ससाठी गाडी अडतेय. सध्या पंधरा लाख हवेत." हे सगळं नवीनच होतं. मी आता शांत बसायचं ठरवलं.
"कुठे रिलिज करणार सिनेमा ? "
"महाराष्ट्रात."
"पण नेमका कुठे ? "
"थियेटरमध्ये."
"कोणत्या ? "
"सनसिटी, भारतमाता, प्लाझा."
"कोण करणार ? "
"युएफओ."
"त्यांच भारतमाताशी घेणंदेणं नाही."
"ते सगळं डिस्ट्रीब्युटर बघतील. आपलं काम आहे सिनेमा बनवणं" या सगळ्या संवादात मी नेमका कुठे आहे तेच मला कळेना.
साधारण तासाभराच्या चर्चेनंतर ....
"शाहु महाराजांच्या चित्रपटाचं काय ?"
"दादा बोलला वाटत तुम्हाला ? कालच मिटींग झाली त्यांच्या नातवाशी. पण त्यांचा मुड ऑफ असल्याने विषय राहीला. करतोय मी ते नंतर. "
"आणि नागपुरच्या हत्याकांडाचं काय ? "
"ते पण बोलला दादा ? राजदत्त करताहेत तो सिनेमा. शुट सुरु होईल आता." मला हसावं की रडावं तेच कळेना.

"मला वाटलं होता एवढा बिग बजेट सिनेमा मिळेल करायला. पण..हरकत नाही. पंधरा लाख देतोय ना तो. दुसरा सिनेमा काढू. " इति मित्रवर्य.
"अरे पण, या सगळ्यात मला का गोवलसं ?"
"अरे, तुला मिळाला असता ना लिहायला ? मी म्हटलं तुझं भलं होईल. तिथे मायबोलीवर लिहून तुला काय कवड्या मिळताहेत ? " एक सच्चा मित्र.

कालच मी कानाला खडा लावलाय. तुम्हाला दिसणार नाही तो. मी लिहीतो हेच मुळी आता कोणालाच सांगायचं नाही. फक्त हिला आता काय सांगू हा प्रश्न मात्र आहेच. कारण ती काय म्हणणार ते मला पुरतं ठाऊक आहे ....
"वन मोर फेदर इन युवर कॅप."

खेळाडू क्लीनबोल्ड झाला की 'बदक' का दाखवतात ते मला काल कळलं.

विषय: 
प्रकार: 

"हाच तो." मी दचकलो. "लेखक आहे." शिवी घातल्यासारखं वाटल क्षणभर.
Lol
कौतुका! तुला लई लई शुभेच्छा Happy

>>तिथे मायबोलीवर लिहून तुला काय कवड्या मिळताहेत ? " >> Angry
कवड्या सुद्धा मिळत नाहीत म्हणून सांग तुझ्या मित्राला.. Proud
त्याच्यापेक्षा अमूल्य काहीतरी मिळतंय ते पहायला सच्चे आणि आतले डोळे हवेत म्हणावं त्याला.

बाकी बदक म्हणल्यावर तु टोपीत पिस खोचून त्रिदेवच्या 'ओये ओये' गाण्यावर
नाचत जाताना डोळ्यासमोर आलास. Lol

दक्षे उगीचच डोळे वटारू नकोस..... बाहेर येतील Wink
कौत्या, तुला काही तसंही हे नवीन नाहीचेय..... काही वेगळं झालं असतं तरच नवल वाटलं असतं Proud

>>>मला त्याचक्षणी 'आखरी रास्ता' चित्रपटामधल्या अंधारात चाचपडणार्‍या त्या लहान मुलाचा सीन आठवला. माझ्या अज्ञानाची ही परिसीमा होती.>>कौतुक राव नशीब नेमका सीन आठवला Wink

तू ते वारकर्‍यांच्या दृष्टीकोनातून वाचलं नसशील." इति मित्र.
"ते खरय. मी माझ्याच दृष्टीकोनातून वाचलं.">>>> Proud
छान लिहीलयस कौ.शि. आम्ही वाचून क्लीनबोल्ड.

सही....