सोबत

Submitted by दाद on 28 August, 2008 - 19:32

नवीन घर, नवीन माणसं. एकदा ह्या सगळ्यातून गेलेय तरी मनाची चलबिचल तीच. गेली काही वर्षं सगळं आपलं आपण करायची सवय. इथे नोकर-चाकर आहेत... त्यामुळे करवून घ्यायचं इतकच.

बाबा! नेहमीसारखे फिरून आल्यावर आणि बागेतला फेरफटका झाल्यावर, चहा करतात. आपला पहिला चहा घेऊन गॅलरीत झोपाळ्यावर येऊन बसतात. मग पेपर वाचन. सुनीलचा ड्रायव्हर नेहमी प्रमाणे येऊन देवाची फुलपुडी समोरच्या टेबलावर ठेवतो. स्वयंपाकाच्या बाई येतात, त्यांनाच जे काय सांगायचं तेच.... आत्तापर्यंत बाबा सांगत होते.
बाकी घरची काम निर्वेध चाललीयेत.

सुनील माझा आहेच... पण फक्तं तेव्हढ्या बळावर जे त्याचं आहे ते सगळं माझं म्हणू शकत नाही ना? तो हक्क हळू हळू मिळवायचाय... हक्कं नंतर आधी विश्वास.

गेली चारेक वर्षं घरात जे चालू आहे, त्याला धक्का न लावता...
त्यातच... एक नवीन सून म्हणून मला सामावून जायचय, माझ्या मुलीसकट.
चिन्नूची, आपल्या चार वर्षांच्या पिल्लाची आठवण होऊन तिचा जीव गलबलला. नवीन घरात एकदम बावरून जाईल म्हणून तिनंच तिला आप्पांकडे ठेवली होती. रात्री जायची तिथे.
उद्याला घेऊन यायचय तिला.

अत्ताशी कुठे आठवडाच होतोय. बाबांचं बीनाताईंशी किती सख्य होतं ते कळायला फार लांब जायला नको. सुनीलने मोकळेपणाने, विश्वासाने सांगितलही सगळं. आणि डोळ्यालाही दिसतच आहे की.
कितीही मनाला समजावलं तरी, कुठेतरी आपलं आपल्यालाच बीनाच्या तुलनेत बघायला लागतो आपण. आपली ही कथा तर ह्या घरातल्यांचं काय?
दुसरी सून म्हणून एक स्वतंत्र, निर्लेप, स्वच्छ कोपरा ठेवला असेल का बाबांनी, आपल्यासाठी, त्यांच्या अंगणात? जिथे आपण आपल्या स्नेहाचं रोप लावू शकू? प्रेमाने दोघं मिळून वाढवू? की वारंवार बीनाच्या तुलनेची कुर्‍हाड चालवून छाटत रहायचं? खुरटं ठेवायचं? एक शोभेचं बोन्साय?

आणि आपली चिन्नू? तिचं काय? सुनीलशी जमतं तिचं छानच. सुनीलला आहेच ती नॅक. पण......

’मानसी..... मानसी, आंघोळ झाली माझी.... चहाला येतोय गं’, उंच स्वरात सुनीलने मारलेल्या हाकेने ती सावध होत खिडकीपासून दूर झाली.
नुस्त्या विचारांच्या वावटळीत भिरभिरण्याचा हा गेल्या अनेक दिवसांतला पहिला प्रसंग नाही.

आपले आप्पा घेतात आपल्याबरोबर कितीही वेळा, चहा. बाबा घेतील?....
’बाबा, मीही चहा घेतेय, सुनीलबरोबर. तुम्ही घेणार ना माझ्याबरोबर घोटभर?’ मानसीने बाबांना विचारलं.
*********************************************************************************
बाबा विचारातून बाहेर आले की अजून गुरफटले त्यांचं त्यांनाच कळलं नाही.
चहा?
’बाबुजी चाय गरम?’

समोर ठेवलेली बकुळीची फुलं, त्यांनीच नेहमीच्या सवयीने वेचून आणलेली. बीनासाठी! त्यांच्या पहिल्या सुनेसाठी.... आता तिच्या फोटो साठी.
दिवाणखान्यातल्या त्या मोठ्ठ्या फोटोसमोरून जाताना, आत्ताही बीना हाक मारेल असं वाटून त्यांच्या घशात दाटून यायचं.
’बाबुजी, चाय गरम?’.

अनेकदा सांगूनही हट्टाने त्यांना बाबुजी म्हणणारी सुनीलची बायको, त्यांची सून, बीना.... अहं! त्याची पहिली बायको... आपली पहिली सून.
वीणा! मुलगी मराठीच पण तिकडे दिल्लीत वाढली त्यामुळे हिंदीचा गंध सगळ्यालाच. तिच्या ’बाबुजी’वर कडी म्हणून त्यांनी तिचं बदललेलं नाव - वीणा.

कुण्या देशीच्या पाखरासारखी येते काय, आपल्या अंगणात वावरते काय, आपल्या वसू नंतर ह्या घराला घरपण देते काय, बाळाची चाहूल लागून सार्‍या घरावर मोहर चढतो तोच, कसल्यातरी विचित्र आजाराचं निमित्त होऊन भरल्या संसारातून उठून निघून जाते काय... उण्यापुर्‍या पाचेक वर्षांचा सहवास. मागे उरतं ते केविलवाणं झालेलं घरटं, एकमेकांना सावरत आला दिवस साजरा करणारे बाप-लेक.

आपली ही अवस्था तर सुनीलच्या मनाची कल्पना करवत नाही. पण सावरला तो ही. आयुष्य आहे म्हटल्यावर भिरकावून देता येत नाही, सहजासहजी. आपण खूप मुली सुचवल्या, नातेवाईकांनीही प्रयत्नं केले. पण सुनील बधला नाही..... पण एक दिवस मात्रं...

बाबांना आठवलाच तो दिवस. कधी नव्हे ते सुनीलने त्यांच्याशी वाद घातला होता. त्याआधी बीना असायची त्याला दटावणारी, बाबांच्या बाजूने त्याच्याशी भांडणारी.... त्यादिवशी मात्रं ....

खरतर आपल्याला आनंद व्हायला हवा होता... असे कसे आपण....

****************************************************************************************************
असा कसा विचार करू शकतात बाबा? इतकं बिथरायला झालं काय त्यांना? मानसीचं दुसरेपण नडतय? मग मी? मी तरी कुठे प्रथमवर?

कबूल! मावश्या, आत्यांनी मुली सुचवल्या, मित्रांनी इथे-तिथे जुळवायचा प्रयत्नं केला, बाबांनी काय कमी प्रयत्नं केले! पण बीनाने इतकं भरभरून दिलं होतं की, तिच्यानंतर नकोच वाटलं. पुन्हा मांड मांडायचा, येता जाता दुसरीची तिच्याशी तुलना करणार मन, नकळत.
दुसरं लग्नं ही बीनाशी प्रतारणा की नाही माहीत नाही पण हिचं काय? जसे सर्वार्थाने बीनाचे झालो, तसे हिचे होऊ शकू?

नाही! आपल्याच्याने आता परत घर मांडणं होणार नाही!
अनेक वर्षं मनाने हाच कौल दिला, पुन्हा पुन्हा दिला. बीनाच्या जाण्याचा सल होता तोवर तरी. कधीतरी मनाने ऍक्सेप्ट केलं असावं... सुंदर पूजेची कशी आठवण सुद्धा दरवळते तसंच काहीसं. पूजा संपली म्हणून भक्ती, प्रेम थोडच संपतं?

कधीतरी ऑफिसच्या वार्षिक पार्टीला भेटलेली मानसी. आपापल्या कुटूंबियांना, मित्र-मैत्रिणींना घेऊन आलेले बरचसे इतर सगळे अन त्यात उठून दिसणारे आपण दोघे. आपण एकटेच अन मानसी तिच्या तीन वर्षांच्या चिन्नू बरोबर. सुरुवातीला थोडे वेगळे पडलो इतरांपासून, मग गप्पा सुरू झाल्या, आणि रंगल्याही.
पहिल्याच भेटीत किती सहजपणे आपण तिला आपल्याबद्दलच्या अनेक गोष्टी सांगितल्या ह्याचं घरी परतल्यावरही कितीतरी वेळ आश्चर्य वाटत राहिलं. स्नेह जुळला, योगायोगाने आपल्याच प्रोजेक्टवर काम करायला आली, मानसी.

नवर्‍याचा आकस्मिक मृत्यू, त्या धक्क्याने जुन्या मताच्या सासू-सासर्‍यांनी संबंध तोडणं, हाय खाऊन आईचा मृत्यू, वडीलांची तिच्यावरची जबाबदारी, मुलीचं संगोपन.... ही कहाणी आपल्याशी शेअर करतानाही तिचं ते जपून तरीही सहज सरळ वागणं, तिचा वेळेला खंबीर तरी मृदू स्वभाव.... हे सगळं कळता कळता कधी गुंतलो आपलं आपल्यालाच कळलं नाही.

कळलं तेव्हा हेही लक्षात आलं की आपलं मन साफ आहे, स्वस्थ आहे. मानसीत गुंतूनही बीनाशी प्रतारणा वगैरे वाटून काळीज कातरत नाहीये. कुठेतरी शांत, समाधानानी वाटतय, इतकं खरं!
हाच कौल मानून एक दिवस मानसीला विचारलं. तिच्या डोळ्यातला आनंद भरभरून गालावर उतरताना पाहून वेडावलो. आपल्या बाबांची खात्री होतीच, तिच्या वडिलांची, आप्पांची हरकत असणार नाही हे कळल्यावरच घरात बाबांकडे विषय काढला.

बाबांची प्रतिक्रिया बघून मात्रं काय म्हणावं कळेना. जमेल तितकं, जमेल तशा शब्दांत समजावत राहिलो, त्यांचे आक्षेप आपल्यापरीने खोडत राहिलो पण....
’इतरांनी सुचवलेल्या इतक्या प्रथमवर मुली असताना, एक मूल पदरात असलेली मुलगीच कशाला?’, ह्याच्या पासून सुरूवात झाली.
मग ’तिच्या वडिलांचं कोण बघणारय?... इथे आणणारेय त्यांना?’ असल्या आक्षेपांमधून ते शेवटी , ’तुला काय? तू घराबाहेर! ती आणि तिची मुलगी घरात माझ्यासोबत जास्तं असणारेत. मला काय वाटतय त्याच्या विचार करणारच नाहीयेस का तू?’ इथपर्यंत येऊन पोचले.

’बाबा, ह्याच्यापेक्षा मला जास्तं समजावता येणार नाही तुम्हाला. मी अजून काही बोलणं म्हणजे.... तुमचा अपमान होईल असं... काहीतरी बोललं जाईल.... तुम्ही.... तुम्ही, जेऊन घ्या’, एव्हढं बोलून मनस्ताप, चीड, घुसमट ह्याच्यातून मन बाहेर काढून शांतपणे विचार करण्यासाठी उपाशीच घराबाहेर पडलो. अचंबित, किंचित दुखावलेले बाबा घरी सोडून... बीना गेल्यावर पहिल्यांदा.

बाबांची तीच तीच वाक्यं डोक्यात घोळत राहिली.
असे काय वागतायत बाबा? एक मूल पदरात म्हणजे काय? ह्याला काय अर्थ आहे? मानसी आणि चिन्नू दोघी घरात रहाणार, त्यांच्या बरोबर. मग त्यांनाच सोबत नाही का? तरी हल्ली बोलूनही दाखवतात, करमत नाही, थकायला होतं म्हणून. दोनच्या दोन टकली घरात आता. कसं करमेल? येऊन जाऊन दादू माळी काय तो वावरतो घरात.
मी बाहेर दिवसभर, कधी कधी बाहेरगावीही आठवडा-आठवडा. कसं करमेल ह्यांना एकट्याला?

दादूने एका बाजूला घेऊन सांगितलंही होतं आपल्याला. बाबा एकटे असले की कधी कधी रडतात, बीनाच्या फोटोसमोर बसून.
’सून म्हणून आली आणि पोरगी म्हणून गेली रे’ असं म्हणून दादूकडेही ते पहिल्या पहिल्यांदा रडल्याचं त्यानं सांगितलं होतं. दादू बागेचं काम करायला आला की त्यांच्या सोबतीला बसायचा बराच वेळ. 'इथेच पथारी टाक तुझी', असं शेवटी आपणच सांगितलं त्याला. तेव्हढीच घराला अजून थोडी जाग.

बीना होती, तेव्हा नव्हती का सोबत? तेव्हा तर बीना माहेरी जाणार म्हटलं की किती चिडचिड करायचे? वीणेला आण बाबा परत, काय ती इथेच वाजूदे... असा धोशा चालायचा. तिच्या बाजूने भांडायचे माझ्याशी.
किती जमायचं तिच्याबरोबर! मीसुद्धा किती बिंन्धास्त होतो! काही काळजी नव्हती घराची. ते दोघं मिळून... तिला बाबांची अन बाबांना तिची सोबत.....

************************************************************************************
सोबत!

कोण कुणाच्या सोबत असतं? आपली वसू गेल्यावर किती एकटे पडलो आपण? तरी नाही म्हटलं तरी बराच झाला संसार.
ह्याच्या संसाराची रांगोळी मात्रं रंग भरायच्या आधीच विस्कटली. कसं काढणार आहे आयुष्यं पुढे कुणास ठाऊक?

अनेक वर्षांच्या सवयींची मोडतोड... एकदा नाही दोनदा झाली. घरातलं बाईमाणूस हातातलं काम टाकून गेलं तरी अपुरं वाटतं तिथे.... भरला संसार टाकून गेलं तर घर किती आणि कसं मोडतं! ज्याचं त्यालाच कळतं.
आधी वसू, मग बीना!
प्रत्येक वेळी उठलो, कसेतरी सावरलो. नव्याने घडवल्या सवयी.... आता थकलोय आपण. ही मांडामांड, मोडतोड, पुन्हा सुरूवात, नवीन वाटा.... नको वाटतं.

मानसी, तिची मुलगी.... सुनीलचीही मुलगीच होणार ती अन मग आपणही आपली नात म्हणायची.
कसं असतं इतकं लहान मुल आसपास वावरणं? आपली विद्याताई म्हणते तसं सहन न होणारं, सगळी शांतता ढवळून काढणारं, वाभरं? की.... बीनाच्यावेळी आपण कल्पना केली होती तसं कापसाच्या हातांचं, कुरळ्या जावळाचं, कोवळ्या पालवीचं?

बीनासारखी कुठे मिळणार मुलगी दुसरी? दुसरी कुणीतरी तरी मुलगी 'बीना' असू शकेल काय? ही त्याला आवडलीये हे महत्वाचं नाही का? मानसीच का नको?
घेऊया जुळवून मानसीशी, तिच्या मुलीशी, तिच्या वडिलांशी...... ते तरी ह्या वयात कुठे आश्रमात रहातिल?
त्यांचीही अवस्था आपल्यासारखीच... उलट अधिक हल्लक.

किती दिवस राहिले आता आपले? मुलासाठी, त्याच्या सुखासाठी वेचायचे नाही तर कशासाठी?
किती मूर्ख मी? असा कसा वाट्टेल ते बोललो त्याला?

************************************************************************************

सोबत! बीनाची!

आपण जितकी गृहित धरली तितकीच बाबांनीही नाही का धरली? कसं लक्षात आलं नाही आपल्या?

आपल्याला सावरणारं माणूस, ज्याच्यावर आपण विसंबून रहतो... विश्वासतो, त्याच्या असण्याची बीजं, वावरण्याची मुळं आपल्या आयुष्यात खोलवर रुजलेली.... असं... सवयीचं, आपलं माणूस...
अचानक... अगदी अचानक उठून निघून जातं.
तिनं जाते म्हणणं नाही, आपण निरोप घेणं नाही.

सावरणारे सगळे दोर तोडून झुलत्या पूलासारखं, कुणी पाय ठेवायलाही धास्तावेल असं टांगलेलं आयुष्यं...
आपण किती कोसळलो! घरातल्या तिच्या खाणा-खुणा टाळण्यासाठी, घराबाहेर घराबाहेर किती राहिलो. मन रमवायला, फुंकर घालायला किती सायास पडले आपल्याला.

आणि बाबा? ते किती खचले असतील? दुहेरी दु:ख आणि तिहेरी पेच. मुलाच्या संसाराची लागलेली वाट, जीव लावता लावता चटका लावून गेलेली लेकीसारखी सून, मुलाला दु:ख होईल म्हणून त्याच्या समोर आपलं मन नाही दाखवायचं....

बापरे, बाबा सुद्धा किती किती गुंत्यातून गेलेत. ह्या वयातही संभाळलं त्यांनी स्वत:ला. आई गेल्यावर कोसळले पण बीना गेल्यावर जास्तं हल्लक झाले. वयाचा परिणाम!
बीना नसल्याची सवय होतेय.... ती एक चाकोरी घडतेय तोच, आपण पुन्हा आयुष्यं ढवळतोय त्यांचं. आपण जसे नवा मांड मांडायला कचरत होतो, तसेच ते ही धास्तावले असणारच ना मनातून.
ही नवीन येणारी मुलगी, ते सुद्धा एका लहान मुली बरोबर. शिवाय बरोबर स्वत:चे वडील.
आपलं जमेल का तिच्याबरोबर? कशी असेल?
आपण आणि तिचे वडील ह्यातलं निवडावं लागेल तिला कधी?
काय अपेक्षा घेऊन येणार ती? आपल्या वागण्याला बीनाचा संदर्भ नसला तरी लावला जाईल का, अन असला तर टाळला जाईल का?
जितकं निर्लेप सख्य बीनाबरोबर जमलं तसं हिच्याबरोबर जमेल?
आपल्याकडून तिची अन बीनाची नकळत तुलना होत राहिली तर? त्यातून कसं बाहेर पडणार?

मानसीला भेटेपर्यंत, तिला कळून घेईपर्यंत हे आणि असलेच प्रश्नं होते ना आपले! असल्याच शंकांचं दडपण येऊन कचरत होता ना आपण?

तेच प्रश्नं बाबांचेही नाहीत का? तोच प्रॉब्लेम बाबांचाही नाही का?
उलट त्यांचं अधिक नाजुक, अधिक हळवं... जराशा धक्क्याने लवंडुन सांडेल असं भावनांनी.... काठोकाठ गच्चं भरल्यासारखं?
छ्छे!

************************************************************************************************
बाबा! आप्पा!
कसं जमवणार आहोत आपण? ह्या दोघांचं जमेल? त्यांना जोडणारा एकच धागा- मी. माझीच अजून तशी बाबांना सवय नाही, मग आप्पांची कशी होईल? किती जीवांची फरपट होणार आहे आपल्या सुखापायी?

आपल्यामते बरोबर म्हणून सोडवलेली गणितं अजून प्रश्नं घेऊन का येतात? का, आयुष्याचं गणित संपूर्णपणे कधीच सुटत नाही? एक गाठ सोडवण्याच्या प्रयत्नात एकतर दुसरी गाठ तरी बसते किंवा धागाच तुटून हातात येतो.
मी, आप्पांची मुलगी, बाबांची सून. कशी जमवणार ही कसरत? आत्ता चिन्नूला फक्तं आप्पांची सवय आहे. बाबांशी जमेल तिचं? तिची बडबड, हुंदडणं, हट्टं.... चालेल बाबांना? सोसवेल?
घरातलं मूल डोळ्यांसमोर मोठं होताना बघणं वेगळं आणि दुसर्‍याचं.... दुसर्‍याचं मूल आगंतुकासारखं घरात आणून वसवणं....
बाबांनी त्यांचं हे घर सोडून दूर गेलेलं, सुनील काय पण मलाच पटणार नाही... पण मग तशीच वेळ आली तर..... आप्पांना आश्रमात जायला सांगायला जीभ धजावेल आपली?

’काळजी करू नकोस, होईल सगळं नीट’ असं म्हणताना सुनीलचा स्वर हलतो की आपल्यालाच तसं वाटतं?
त्याच्या निखळ प्रेमाचा आधार मिळूनही आपल्याला असं उसवल्यासारखं का वाटतय?

उद्या सुनीलकडच्या सगळ्या नातेवाईकांना बोलावलय.... माझी, चिन्नूची आणि आप्पांची सगळ्यांशी एकदा ओळख. बीनाचे पपाही येणारेत. दारात मांडव घातलाय, सगळीकडे उत्साह, लगबग आहे, चिन्नू, आप्पा आत्ता येतील.... मनातलं मळभ दडवून साजरं करायला हवं. हे माझ्या घरचं पहिलं कार्यं.

************************************************************************************
बाहेर मांडवात वर्दळ अगदी ओसरलीये. आलेले सगळे नातेवाईक मानसीला भेटून, सुनीलचं अभिनंदन करून गेलेत. मानसीचं साधं, सरळ वागणं सगळ्यांनाच भावलय.
’आता सहकुटूंब, चिन्नू, आणि आप्पांसहीत आमच्याकडे यायचं हं’, असा सगळ्यांचाच आग्रह झालाय.
अगदी बीनाचे पपाही आलेत आवर्जून. नुस्ता आशिर्वादच दिला नाही तर, मानसीला, दिल्लीला तिच्या नव्या माहेरी येण्यासाठी गळही घातलीये.

आतलं काहीतरी आवरून बाहेर येणार्‍या मानसीला सुनील दिसला. ओसरीच्या खांबाला टेकून उभा, कुठेतरी एक टक बघत.... त्याच्या नजरेचा वेध घेताना मानसीला दिसलं ....

चिन्नू बाबांच्या मांडीवर बसल्या बसल्या थकून त्यांच्या छातीवर डोकं टेकून झोपलीये, नुस्त्या पेटीकोटवर. तिला थंडी वाजू नये म्हणून बाबांनी त्यांची शाल गुंडाळलीये तिच्याभोवती. आप्पा तिची कल्पना साडी हातात घेऊन बसलेत आणि बीनाच्या पपांच्या हातात जपून धरलेलं तिचं गळ्यातलं, बिंदी, कानातलं असलं सगळं आहे. तिघंही खूप दिवसांनी भेटलेल्या जिवलग मित्रांसारखे गप्पांमध्ये दंग आहेत. मध्येच एकमेकांना हळू बोलण्यासाठी, हसण्याविषयी सुचवतायत, चिन्नूची झोपमोड होऊ नये म्हणून.

नकळत भरून आलेले डोळे पुसण्यासाठी उठलेल्या तिच्या हातालाच धरून सुनीलने तिला जवळ घेतली..... आणि समोरचं दृश्य नजरेत अपार साठवून घेत, तिच्याकडे न बघताच म्हणाला, ’मानसी, मगाशी चिन्नूला माडीवर जायचं होतं तेव्हा... सोबत कोण कोण गेलं, माहितीये?’

समाप्त

गुलमोहर: 

सुंदर भावविश्व.. नात्यातली गुंतागुंत छान रंगविलीस आणि मग गुंता हळूवारपणे सोडविलास पण!
छान गोष्ट..

मस्त लिहिलयं नेहमीप्रमाणेच.. ह्या वेळची शैली वेगळी आहे.. आवडली.. Happy

दाद, किती गं सुरेख लिहीतेस! सुंदर भाषा, पात्रांची वैचारिक बैठक आणि मनाचे खेळ सहजपणे समजतील अशी.
लिहीत रहा.

"सुंदर" किती घालमेल त्या जीवांची आणि तितकाच मोकळा श्वास खुप छान मांडणी केलीय.
सुंदर.............

छान झालीये सोबत.... फक्त अजुन थोडं काहीतरी हवं होतं असं वाटलं... Happy

सु रे ख !!!

-प्रिन्सेस...

सगळ समोर चालु आहे अस वाट्त होत

खुपच छान

रेश्मा

अशी कथा संपुच नये असं वाटतं.
सारे श्रेय दाद तुम्हाला
सुंदर कथा.
अप्रतिम.

धन्स, खरच. सगंळ्यांचेच.
मंजू, तू सांग गं खरच काय कमी वाटतय ते. मग मीही सांगेन. मला कल्पना आहे कुठे गोष्टीत एकच भाग रंग न भरता कोरा राहिल्यासारखा वाटतोय ते. एक गंमत म्हणून खरच सांग. मला आवडेल.

व्वा शलाका...मस्त कथा आहे.....काय सुंदर लिहिलंस...लेखन शैली तर एकदम उतकृष्ट..शिवाजी सामंतांची "मृत्युंजय" कादंबरी आठवली ह्या शैलीवरुन...

दाद, तुझी कथा कधी संपूच नयेसं वाटतं.. म्हणून मी तसं लिहिलं गं.. Happy

तुझ्या शब्दांतली एकपानी कथा वाचून समाधान होत नाही.. हे म्हणजे मेजवानीची भूक लागली असताना स्टार्टर्स दिल्यासारखं वाटतं..

दाद, खूपच मस्त आहे कथा. मला शेवट आवडला. अगदी थोडक्यात येणार्‍या समाधानी आयुष्याची कल्पना दिलीस.

मानसी ह्या घरात रहायला येणार म्हणुन तिचे विचार तसेच आधीच त्या घरात राहणारे म्हणुन सुनील व त्याचे बाबा ह्यंचे विचार मांडले आहेत. पण मानसीच्या बाबांना काय वाटते आहे ह्या बदलाविषयी ते यायला हवे होते का ? त्यांच्यासाठी तर किती मोठा बदल आहे उतारवयात मुलीच्या (दुसर्‍या) सासरी जावुन रहायचे. असे आपले मला वाटले. ह्यात गोष्टीला नावे वगैरे ठेवण्याचा हेतु नाही Happy

आमच्या गावात असे एक कुटुंब होते. ती सुन माहेरी निघाली की सासरे रडायलाच लागायचे. एकदा तर ती ट्रेनमधे बसलेली परत आली. एकदा बहिणीचे लग्न म्हणुन तयारीला गेली तर २-३ दिवसांत सासरे हजर. मी पण करतो लग्नकार्यात मदत पण मला माझ्या मुलीवाचुन करमत नाही. मग नातु झाल्यावर तर विचारुच नका. दुर्दैवाने सगळ्याला नजर लागावी तसे एक दिवस त्यांचा नातु घरामागच्या पाण्याच्या हौदात पडुन गेला. सासरे आणि ही सुन दुखःने अक्षरशः वेडे झाले. आता ते गावात आहेत की नाही कल्पना नाही.

दाद अप्रतिम.. छान टीपलेयस हिंदोळे भावनांचे.. खूप आवडलं..

शलाका, सुरेख भावचित्रण. तुझ्या कथांमधली व्यक्तिमत्व इतकी समंजस असतात ना! तशी खर्‍या जगात पण इतक्या मुक्तपणे आढळली तर किती छान होईल.

दाद , कथा अप्रतिम !!
.
.
.

****************************
Happy Blush Proud Lol Biggrin Rofl

मंजू, आता काय म्हणू? धन्स गं.
सिंडरेला, किती म्हणजे किती स्पॉट ऑन?
वाचणार्‍याला हे असं वाटू शकतं असं मला वाटलं होतं. सगळ्यांचं आलय, आप्पांचं काय? पण खरं सांगायचं तर मी ही कथा फक्तं बाबांच्या दृष्टीकोनातून लिहायचं ठरवलं. मग ते पूर्णं करायला, सुनीलचंही मनोगत आलं.... आणि ते पूर्णं करायला थोडीशी मानसी....

घरात रहायला एक नवीन माणूस येणं ही एक मोठ्ठी घटना आहे. साधा रूम मेट घ्यायचा तर आपण किती चिकित्सा करतो. नवीन बाईमाणूस घरात येणं ह्यात घरातल्या थकल्या जीवाला किती anxiety असेल नाही? स्वतः सुनीलला सुरूवातीला त्याच कारणासाठी हो-नाही होतय.
बाबांच्या जीवाची घालमेल हाच जीव आहे ह्या कथेचा. पण ज्या पद्धतीने मी लिहिलीये त्यामुळे त्यात 'भोक' दिसतय Happy
असो...
सिंडरेला धन्स गं. मजा आली तुझा "नेमकेपणा" वाचून... जियो!

सुरेख भाव्-विश्व..

दाद मस्तच.. तुझी शैली तर काय झकासच आहे...

आणि एक एक उपमाही किती सुंदर आणि चपखल

    ================
    हीच शोकांतिका तुझी माझी
    काच शाबूत पण चरे होते

      -वैभव जोशी यांचा गझल अल्बम ’सोबतीचा करार’!
      प्रकाशन सोहळा : १ सप्टेंबर
      एस. एम. जोशी हॉल, पुणे

      नेहमिप्रमाणे मश्तच!! Happy
      हल्लक हा नवा शब्द कळला.

      अतिशय उत्तम ! खरच खुप सुन्दर जमुन आलय सगल.

      अगं किती काळजाला हात घालणारं लिहितेस दाद. अन् तरीही ते वास्तववादी असतं. हा बॅलन्स संभाळणं तुलाच जमो जाणे.. Happy शैली तर नेहेमीप्रमाणेच अप्रतिम....

      अरे वा माझा अंदाज बरोबर आहे की Happy

      तर मी ही कथा फक्तं बाबांच्या दृष्टीकोनातून लिहायचं ठरवलं. मग ते पूर्णं करायला, सुनीलचंही मनोगत आलं.... आणि ते पूर्णं करायला थोडीशी मानसी....
      >>> सोबत ही जशी बाबांची गरज आणि विवंचना आहे तशी ती बाकी तिघांची पण आहेच. नियतीने जरी मानसी/सुनील ह्यांच्यावर आघात केलाय तरी तरुण वय, फिरुन मनासारखा जोडीदार मिळालेला अशात चार्-दोन गोष्टीं कमी-जास्त झाल्या तर ते सांभाळून घेतील. खरा प्रश्न आहे तो बाबा आणि अप्पांना. त्यातही अप्पांचे माप थोडे रितेच आहे. नाही म्हणायला बाबा आपल्या परिवारात राहणार आहेत, त्यात त्यांचे घर्/आंगण्/माळी/स्वयंपाकाच्या बाई/असतील तर दोस्त-मंडळी हे सगळे पण येतातच की. अप्पांना मात्र हे सगळे सोडुन यायचे आहे. त्यातही शास्वती (हा शब्द चुकलाय का ?) नाही. मुलीच्या नव्या घराला आपण मानवु का ? आपल्याला ते नवे वातावरण मानवेल का ? नाहीच जमले तर मग वृद्धाश्रम ? मुलीला/नातीला सोडुनही जावे लागेल. ह्या सगळ्यासाठी थकल्या मनाची तयारी करणे किती अवघड गेले असेल त्यांना. म्हणुन मला आपले अप्पांचेही मनोगत यायला हवे होते असे वाटले.

      आणि चिमुकली ? Happy

      खूप खूप आवडली कथा. चिमूकल्यांना तर फारच जपावे लागते.

      सिंडरेला, अगदी अगदी कबूल.
      पुन्हा ठिय्या मारून लिहावी म्हणतेय. फक्तं ठिय्या मारायला काही ग्रह आणि इतर बरीच नक्षत्र एकत्र यायला लागतील तितकच काय ते.
      त्याची शाश्वती ( Happy ) देता येत नाहीये. पण जमेल तेव्हा नक्की प्रयत्नं करेन. आणि तुझ्या सुचना विचारात घेऊन, अर्थात.

      अरे हो..... गणपती बाप्पा मोरया!

      Pages