ब्रेल लिपीतली पुस्तकं

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

माझ्या लहानपणी आमच्या घरासमोर ताईआत्या राहायच्या. लग्न झाल्यानंतर सहा महिन्यांतच नवर्‍यानं त्यांना माहेरी आणून सोडलं. त्यांचं माहेर तसं श्रीमंत. मोठा भाऊ डॉक्टर. पण ताईआत्या मात्र बंगल्याच्या आऊटहाउसात राहायच्या. ताईआत्या उत्तम कविता करत. संध्याकाळी आई ऑफिसातून घरी आली की ताईआत्या घरी येत. त्यांना सुचलेली कविता आई त्यांच्या वहीत त्यांना उतरवून देई. ताईआत्यांना लिहिता वाचता येत नसे. त्या अंध होत्या.

पुढे मग मी त्यांचा लेखनिक बनलो. त्यांना दिसत काही नसलं तरी त्यांच्या संवेदना अतिशय तीक्ष्ण होत्या. खूप सुंदर बोलायच्या त्या. त्यांचं हे बोलणं, त्यांच्या कविता एका डायरीत मी लिहून घेत असे. ताईआत्यांनी एक-दोन कविसंमेलनांतही कविता वाचल्याचं मला आठवतं. एकदा महनोर, पाडगावकर अकोल्याला आले होते, तेव्हा त्यांनीही ताईआत्यांच्या कवितांचं कौतुक केलं होतं. मी पाचवी सहावीत असेन तेव्हा ताईआत्यांचा नवरा त्यांना परत घेऊन गेला. अचानक त्याला ही उपरती का झाली, हे काही कळलं नाही. ताईआत्या कशा आणि कुठे आहेत, हेही नंतर कळलं नाही.

तीन वर्षांपूर्वी अकोल्यातल्या कै. काकासाहेब ठोंबरे वाचनालयात अंध वाचकांसाठी एक स्वतंत्र कक्ष सुरू झाला. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मी आणि आई गेलो, आणि तिथे ताईआत्या भेटल्या. त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर त्या परत अकोल्याला आल्या होत्या. भावाशी संपर्क नव्हताच. आपल्या १३-१४ वर्षांच्या मुलाबरोबर त्या अकोल्यातच एका खोलीत राहत होत्या. ताईआत्या गावातलं घर सोडून अकोल्यात आल्या त्यामागे एक कारण होतं. त्यांना ब्रेल लिपी शिकायची होती. त्यांच्या लहानपणी अकोल्यात अंधशाळा नव्हती. सामान्य शाळेत कोणी उभंही केलं नाही. ताईआत्या लिहावाचायला शिकल्याच नाहीत.

अकोल्यात आल्यावर त्या आधी अंधशाळेत गेल्या. संस्थाचालकांनी नियमावर बोट दाखवून त्यांना हाकलून लावलं. 'आता चाळीशी उलटली तुमची.. आता शिकून काय करणार?' हे वर ऐकवलं. ताईआत्या गप्प बसल्या. काही दिवसांनी योगायोगानं त्यांना मेंढकी सर भेटले. मेडिकल कॉलेजात प्रोफेसर असलेल्या मेंढकी सरांना ताईआत्यांनी आपली ब्रेल शिकायची इच्छा सांगितली. सरांनी ब्रेलमधल्या पुस्तकांची चौकशी केली, आणि सरांना लक्षात आलं की एकवेळ गुलबकावलीचं फूल मिळेल, पण ब्रेलमधली पुस्तकं मिळणं महाकठीण. अकोल्यात अंधशाळा असूनही अकोल्यात ब्रेलमधली पुस्तकं उपलब्ध नव्हती. सरांनी मग मुंबईला National Association of Blind, म्हणजे NABशी संपर्क साधला. भारतातल्या अंधांची काळजी घेणं, हे या संस्थेकडून अपेक्षित आहे. तीन-चार महिने पत्रव्यवहार करूनही सरांना संस्थेनं उत्तर पाठवलं नाही.

मग मेंढकी सरांना कोणीतरी संजय सरांबद्दल सांगितलं. हे संजय सर अकोला महापालिकेच्या सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत मोबाईल शिक्षक होते. अकोल्यातल्या (सुदृढ मुलांच्या) पाच शाळांतील ७-८ अपंग मुलांना शिकवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. संजय सरांच्या मदतीनं मग मेंढकी सरांनी वाचनालयात अंधांसाठी वेगळा कक्ष स्थापन केला. पुस्तकं जमवण्यास सुरुवात केली.

वाचनालयात स्वतंत्र विभाग सुरू झाला खरा, पण सहा महिन्यांत केवळ २०-२५ पुस्तकं गोळा करता आली होती. NABकडे सतत पाठपुरावा करूनही पुस्तकं मिळत नव्हती. मुळात त्यांच्याकडे मराठी पुस्तकं नव्हतीच. बहुतेक सगळी पुस्तकं हिंदी किंवा इंग्रजी. त्यातही बहुतेक सगळी वैद्यकिय किंवा धार्मिक विषयांना वाहिलेली. ही पुस्तकं वाचली जातील, असं NABला का वाटलं कोणास ठाऊक. पुण्याच्या अंधशाळेनं त्यांच्याकडची काही जुनी पुस्तकं पाठवली. तेही याहून अधिक काही करू शकत नव्हते, कारण त्यांनाही नवीन पुस्तकं मिळवणं खूप अवघड जात होतं. परिस्थिती खरंच खूप बिकट होती.

पुस्तकं मिळवण्यासाठी आणि एकंदर परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी त्यावेळी मी काही अंधशाळांत जाऊन आलो. पुस्तकांची वानवा सर्वत्र होती. आनंदवनातल्या शाळेत तर १९७८नंतर एकही नवीन मासिक किंवा पुस्तक (अभ्यासक्रमाबाहेरचं) आलं नव्हतं. अकोल्यातल्या शाळेत १०० अंध मुलं शिकतात. त्यांच्यासाठी एक मोठं कपाट भरून पुस्तकं होती फक्त. यांत अवांतर पुस्तक एकही नाही. पुण्यातल्या शाळांत काही अवांतर पुस्तकं आणि मासिकं होती. पण तीही जुनी. ब्रेलमधली पुस्तकं सामान्य पुस्तकांप्रमाणे टिकत नाहीत. एका पुस्तकाचं आयुष्य जास्तीत जास्त तीन-चार वर्षं. वाचून वाचून पानांवरचे अक्षरांचे उंचवटे गुळगुळीत होत जातात. त्यामुळे सतत नवीन पुस्तकांची निकड असते.

ही पुस्तकं छापून वितरीत करण्याची जबाबदारी NABची आहे. पण पुस्तकं नियमितपणे छापली जात नाहीत. मराठी तर नाहीच नाही. कोणा देणगीदारानं पुस्तकं छापून घेतलीच तर तर बहुतकरून 'ज्ञानेश्वरी', 'तुकारामाची गाथा', 'गुरुचरित्राची पोथी' अशी पुस्तकं छापली जातात. अंधांना धार्मिक पुस्तकं भेट देण्याचं डबल पुण्य मिळत असावं कदाचित. पण शाळकरी मुलांना या पुस्तकांत काय रस? त्यांना आवडतील अशी, त्यांना सभोवतालची जाणीव करून देणारी, त्यांच्यातल्या संवेदना विकसित करणारी पुस्तकं त्यांना कधी मिळतच नाहीत. अर्थात अभ्यासक्रमात नेमलेल्या पुस्तकांचीही फार बरी स्थिती नाही. अभ्यासक्रम बदलला की २-३ वर्षं नवीन पुस्तकं शाळांना मिळत नाहीत. पुस्तकं मिळतात तेव्हा नवीन अभ्यासक्रम येण्याची वेळ झालेली असते.

वीस-पंचवीस वर्षांपूर्वी सुनीताबाई देशपांड्यांनी स्वतःहून NABला उत्तम मराठी पुस्तकांची यादी नेऊन दिली होती. त्यांनी स्वतः लेखकांची व प्रकाशकांची परवानगी घेतली होती. त्यानंतरही ती पुस्तकं छापली गेली नाहीत. सुनीताबाईंनी मग देणगी देऊन त्या यादीतली काही पुस्तकं छापून घेऊन स्वतः महाराष्ट्रातल्या अंधशाळांना दिली होती. नंतर मात्र या पुस्तकांच्या प्रती काढल्या गेल्या नाहीत. गेल्या काही वर्षांत तर NABनं पुस्तकं छापणं बंदच केलं आहे. आता ध्वनिमुद्रिका काढल्या जातात. पण शिक्षकांना हा प्रकार आवडत नाही. मुलांना ध्वनिफिती ऐकून विषय नीट समजत नाही, असं शिक्षकांचं म्हणणं आहे. शिवाय ध्वनिफीत ऐकताना त्या विद्यार्थ्याचं लक्ष आहे की नाही, हे कसं कळणार? विद्यार्थ्याला ती ध्वनिफीत परत ऐकायची असेल तर? वाचनामुळे बोटांतील संवेदना विकसित होतात. ध्वनिफितीमुळे हे कसं जमणार? अशा अनेक अडचणी आहेत आणि म्हणून शिक्षकांनी या ध्वनिफिती नाकारल्या आहेत. पण NAB मात्र इमानेइतबारे या फिती शाळांनी विकत घ्याव्यात म्हणून त्यांच्या मागे लागत असतं.

यातून मग आम्ही ब्रेल शिकावं ही कल्पना पुढे आली. ब्रेल शिकून प्रत्येकानं वर्षभरात निदान एक पुस्तक लिहिलं तरी खूप, असा विचार केला आणि मी, ताईआत्या आणि मेंढकी सरांनी ब्रेल शिकायला सुरुवात केली. आठवडाभराने अजून दोघंतिघं आमच्यात सामील झाले आणि आमचा शिकवणीवर्ग सुरू झाला. महिनाभरानंतर पुरेसा सराव झाला असं वाटल्यानं मी ब्रेलमध्ये पुस्तक लिहायला घेतलं. लता मंगेशकरांचं 'फुले वेचिता'. यातली भाषा सोपी आहे, शिवाय मुलांना, मोठ्यांना लताबद्दल आकर्षण. म्हणून हे पुस्तक निवडलं. लतादिदींनीही लगेच परवानगी दिली. दोन महिन्यांत हे पुस्तक लिहून झाल्यावर दिदींनी या पुस्तकासाठी खास प्रस्तावनाही लिहून दिली.

त्यानंतर मी 'कोट्यधीश पुलं' आणि पुलंनी लिहिलेली काही व्यक्तिचित्रं ब्रेलमध्ये लिहिली. सुनीताबाईंनी 'यापुढे भाईच्या किंवा माझ्या कोणत्याही पुस्तकासाठी परवानगी मागायची गरज नाही' असं सांगून न मागता प्रस्तावनाही लिहून दिली. आज ही तिन्ही पुस्तकं अकोल्याच्या अंधशाळेत आहेत. आमच्या ग्रुपातल्या इतर मेंब्रांनीही सामान्य ज्ञानाची, गणित व विज्ञानाची काही पुस्तकं लिहून ग्रंथालयाला दिली. गेल्या दोन वर्षांत संजय सरांनी जवळजवळ १५ लोकांना ब्रेल लिपी शिकवली आहे. आणि त्यांच्या या विद्यार्थ्यांनी एकूण २३ पुस्तकं लिहून ग्रंथालयाला दिली आहेत.

पण दुर्दैव असं की ग्रंथालयात पुस्तकं असूनही अनेकांना ही ब्रेलमधली पुस्तकं वाचताच येत नाहीत. कारण आता वाचनाची सवयच उरलेली नाही. बोटांच्या टोकांनी उंचवट्यांचा वेध घेत ब्रेलमधली अक्षरं वाचली जातात. ही संवेदना निर्माण करावी लागते. त्यासाठी भरपूर सराव लागतो. वाचनाची सवय सुटली की ही संवेदनाही नष्ट होते. त्यामुळे पुस्तकं उपलब्ध करून देणं अधिक गरजेचं झालं आहे.

आपण कशाप्रकारे मदत करू शकतो?

१. मुंबई, दिल्ली येथील NABच्या कार्यालयांत ब्रेलमधील पुस्तकं विकत मिळतात. ही पुस्तकं विकत घेऊन आपण शाळांना देऊ शकतो. एखाद्या पुस्तकाची एकच प्रत एखाद्या शाळेला दिली तरी हरकत नाही.
भारतातल्या प्रत्येक मोठ्या शहरात व जिल्ह्याच्या ठिकाणी NABचं कार्यालय आहे. हे कार्यालय शोधून, तिथल्या कार्यवाहांना जागं करून त्यांच्यातर्फे पुस्तकं मागवता येतील. अभ्यासक्रमातील किंवा अभ्यासक्रमाबाहेरची पुस्तकं शाळांतील ग्रंथालयांना देता येतील. या पुस्तकांची किंमत अतिशय कमी असते.

NABच्या कार्यालयांत (मुंबईतील) अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या विषयांतील आकृत्या, फलक इत्यादी विकत मिळतात. किंमत अगदी माफक असते. हे असे (खास अंधांसाठी तयार केलेले) तक्ते शाळांना देता येतील.

२. 'किशोर'सारखी मासिकं किंवा 'कालनिर्णय' ब्रेलमध्ये उपलब्ध आहे. किंमत वीस-पंचवीस रुपयांहून अधिक नाही. ही प्रकाशनं आपण अंधशाळांना भेट म्हणून देऊ शकता.

३. आपल्या ग्रंथालयात ब्रेललिपीतील पुस्तकांचा एक वेगळा कक्ष स्थापन करू शकता.

४. ब्रेललिपीत पुस्तकाची एक प्रत छापायला साधारण २००-४०० रुपयांचा खर्च लागतो. पुण्यातील हडपसर येथील अंधांना व्यावसायिक शिक्षण देणार्‍या संस्थेत किंवा आनंदवनातील अंधशाळेत पुस्तकं छापण्याची सोय आहे. आपण निदान एक प्रत छापण्याचा खर्च जरी दिलात तरी बरीच मदत होऊ शकते.

५. अनेक अंधशाळांत विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण दिलं जातं. उदाहरणार्थ, आनंदवनातील अंधशाळेतील विद्यार्थी उत्कृष्ट भेटकार्डं बनवतात. कोथरुडमधल्या मुलींच्या अंधशाळेतील विद्यार्थिनी मेणबत्त्या, लोणची, चटण्या, पापड अशा वस्तू तयार करतात. दर्जा उत्तम असतो. या वस्तू आपण विकत घेऊ शकता.

६. पुण्यातील अंधशाळांची माहिती http://puneblindschool.org/ या दुव्यावर मिळू शकेल. कोरेगाव पार्कातील अंधशाळेत महाराष्ट्रातील अन्य अंधशाळांचे पत्तेही मिळू शकतील. या संकेतस्थळावर आपण त्यांना कशाप्रकारे मदत करू शकतो, याबद्दल लिहिलं आहे.

७. NABतर्फे मदत करायची असल्यास http://www.nabindia.org/howcanyouhelp_support_empowerment.htm इथे सविस्तर माहिती मिळू शकेल.

८. आपल्या माहितीतील संस्था, इमारती अंधांना, अपंगांना सोयीच्या वाटतील यासाठी प्रयत्न करणे. पुण्यात 'यशदा'चा अपवाद वगळता कुठेही ब्रेललिपीत सूचना नाहीत. सर्व कार्यालये, नाट्यगृहं, चित्रपटगृहं, मोठ्या इमारती, मॉल्स यां ठिकाणी ब्रेललिपीतील सूचनाफलकांसाठी आपण आग्रह धरू शकता.

९. सर्वांत महत्त्वाची मदत आपण स्वतः ब्रेल लिपी शिकून करू शकतो. ब्रेल लिपी शिकणं अवघड नाही. साधारण महिन्याभरात नियमित सरावानं मराठी व इंग्रजी ब्रेललिपी आत्मसात करता येते. ब्रेलर (म्हणजे ब्रेल लिपीसाठीचा typewriter) किंवा ब्रेलची पाटी आणून आपण घरच्या घरी एखादं पुस्तक ब्रेलमध्ये लिहू शकतो. यामागचा चांगला हेतू ध्यानी घेऊन लेखक, प्रकाशकही आनंदाने परवानगी देतात.

पुण्यात अशी पुस्तकं लिहिणारी, लिहून घेणारी काही मंडळी आहेत. अंध विद्यार्थ्यांना योग्य तो मोबदला देऊनही काही संस्था अशी पुस्तकं लिहून घेतात. पुण्यातल्या कानिटकर आजी अनेक वर्षं हे कार्य करत आहेत. मराठीतील अनेक उत्तमोत्तम पुस्तकं त्यांनी अशाप्रकारे अंध विद्यार्थ्यांकडून ब्रेलमध्ये रुपांतरित करून घेतली आहेत. या उपक्रमामुळे अंध विद्यार्थ्यांचंही अर्थार्जन होतं. विंदांचे तर बहुतेक सर्व काव्यसंग्रह कानिटकर आजींमुळे ब्रेलमध्ये आले आहेत. प्रत्येक काव्यसंग्रहाच्या प्रकाशनासाठी विंदा स्वतः पुण्यात येत. मुलांना कविता वाचून दाखवत. शिवाय निम्म्या प्रतींचा खर्च स्वतः देत असत.

यामुळे अजूनही एक फायदा होतो. ब्रेलमध्ये छापखान्यातून पुस्तकं छापून घ्यायची असल्यास त्या पुस्तकाची एक मूळ ब्रेलप्रत तयार लागते. त्यावरून मग पुढच्या प्रती छापता येतात. आपण जर स्वतः ब्रेलमध्ये पुस्तक लिहिलं किंवा लिहून घेतलं तर मग त्यावरून जास्त प्रती छापून घेता येतील.

आठवड्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी, आवडलेले लेख, कविता असंही ब्रेलमध्ये लिहून आपण शाळांना देऊ शकतो.

१०. तामिळनाडूतील काटपाडी या गावी ब्रेलर विकत मिळतात. एका ब्रेलरची किंमत १२००० - १४००० रुपये असते. नाशिक व मुंबईतील NABच्या कार्यालयांत, तसंच देहरादूनच्या अंध कल्याण संस्थेत पाटी विकत मिळते. एका पाटीची किंमत ६०-२०० रुपये असते. या पाट्या आपण अंधशाळांना भेट म्हणून देऊ शकता.
परदेशात उत्तम ब्रेलर मिळतात. असं एखादं ब्रेलरही शाळेला देता येईल.

११. मॉड्युलर इन्फोटेकसारख्या संस्थांनी ब्रेलमध्ये पुस्तकं छापण्यासाठी नवीन तंत्रं विकसित केली आहेत. देवनागरी किंवा रोमन लिपीतील पुस्तकांची पानं स्कॅन करून त्यांचं ब्रेललिपीत रुपांतर केलं जातं. हे तंत्र थोडं महाग आहे. जर शक्य असेल तर हे प्रिंटर व सॉफ्टवेअर आपण एखाद्या शाळेला भेट म्हणून देऊ शकाल. जेणेकरून अंध विद्यार्थी पुस्तकं छापून अर्थार्जन करू शकतील व पुस्तकंही उपलब्ध होतील.

आज भारतात अंधांची संख्या प्रचंड असूनही त्यांच्या कोणत्याही समस्येकडे लक्ष दिलं जात नाही. ब्रेलमध्ये सूचनाफलक नसतात, पुस्तकं नसतात. संजय सरांसारख्या शिक्षकाला अनेक महिने पगारही मिळत नाही. फार थोडी अंध मुलं शाळेत जातात. गरीब घरांतील अनेक अंधांचा नशिबी भीक मागणं हाच एक पर्याय उरतो. थोडे प्रयत्न केले तर कदाचित या परिस्थितीत बदल घडवता येईल.

प्रकार: 

खुप चान्गला उपक्रम . परदेशात उत्तम ब्रेलर मिळतात >> कुठे मिळु शकतील हे कळले तर पुढ्च्या भारत वरित घेउन जाता येतिल.

वा! खूपचं छान माहिती मिळाली चिन्मय आणि एकदम कळकळ जाणवली अंध लोकांबद्दल, त्यांच्यासाठी काम करणार्‍या लोकांबद्दल. सिंगापुरात कुठे ब्रेलर आणि अन्य उपकरणे मिळतात का याची माहिती मिळवतो.

अकोल्याला संत तुकाराम दवाखाना जिथे आहे त्याच्यापुढे आहे ना हे अंध विद्यालय? शाळेत असताना एक शिबीर भरले होते या शाळेत. रात्रभर मुक्काम केला होता. मागे दोन वर्षापुर्वी जेंव्हा भेट दिली तर ही शाळा एकदम ओसाड वाटली होती.

नवीन दिशा दाखवल्याबद्दल धन्यवाद.. नक्कीच काहीतरी करता येईल.

स्पर्श सिनेमात आपला स्वाभिमान दुखावलेला अनिरुद्ध नेमका हेच प्रश्न विचारतो की आजवर ब्रेलमधे किती पुस्तकं लिहिल्या गेलीत.. कितीजण अंधाबद्दल विचार करतात.

ब्रेल पाटी शालेय साहित्याच्या दुकानात मिळते का? आपलं आपण शिकता येतं का? यात वेळ मिळेल तसं काम करायला नक्की आवडेल.

(कुणाला फायदा होत असेल तर, या दृष्टीने माहिती म्हणून सांगतेय की मी ज्या संस्थेशी संलग्न आहे त्यांची एक शाखा आहे अनिरुद्धाज बँक फॉर ब्लाईंड्स - इथे केजी ते १० वी पर्यंतची इंग्रजी, मराठी माध्यमातील टॉकिंग बूक्स मोफत मिळतात. विद्यार्थ्याने ब्रेल शिकणे अत्यावश्यक आहे पण कानावर अभ्यास, पुस्तकात दिलेले पडावे म्हणून ही टॉकिंग बूक्स असतात. विविध शाळांनाही ती नेहमी मोफत दिली जातात तसेच कुणाला घरी अभ्यास करण्यासाठी हवी असतील तर तसा अर्ज दिल्यास अभ्यासक्रमातील सर्व विषयांचा CD सेट दिला जातो. हे सर्व गिफ्ट म्हणून असते. चार्जेस नाहीत. रेकॉर्डींग वगैरे volunteers करतात सेवा म्हणून. त्यातून कुणाला मदतीची इच्छा असल्यास स्वेच्छा निधीत पैसे देऊ शकतात, पण मोबदला म्हणून काहिही घेतले जात नाही. माझ्या ऑफिसमधल्या मैत्रिणीच्या मुलासाठी मी आणून दिला होता हा सेट. फक्त अभ्यासक्रम बदलला तर नविन पुस्तके येईपर्यंत थोडे थांबावे लागते कारण पुस्तके आल्यावर रेकॉर्डींग होते.)

चिन्मय,
वर लेखात उल्लेख केलेली मराठी पुस्तकं कुठल्या ब्रेल लिपीत/पध्दतीत आहेत? माझ्या माहितीत "भारती-देवनागरी" ही एक ब्रेल पद्धत मराठी साठी वापरतात? यात अजून काही पोटभेद आहेत का?

हे मी लिहिलेलं तुला वाचता येते आहे का? काय लिहलंय?
bharati-braille.png

हे नीट जमलं असेल तर आपण इथे मायबोलीवरच काही सुविधा विकसित करू शकू. म्हणजे एका खिड्कीत मराठीत Type करायचे आणि दुसरीकडे braille दिसत जाईल. याचा पुढचा टप्पा म्हणजे braille printer ला जोडले तर नवीन पुस्तके छापणे सोपे जाईल. वर ११. मधे लिहल्याप्रमाणे ते तितके खर्चिक राहणार नाही. आणि मुख्य म्हणजे ज्यांना ब्रेल येत नाही असे अनेक लोक यासाठी मदत करू शकतील.

वेबमास्टर,

हे वाचता येतंय..

'मायबोलीशी नात सांगणार या जगभरचया पाऊलखुणा' Happy (जोडाक्षरांसाठी वेगळी खूण असते Happy )

ही सोय उत्तम आहे. हल्ली अशी प्रिंटर्स मिळतात. आपण म्हणता त्याप्रमाणे ब्रेल शिकायची गरज राहणार नाही. आणि पुस्तकंही लवकर छापून मिळतील.

अनेक धन्यवाद अजय. Happy

ऑ, मला तर काहीच वाचता आलं नाही. मला शिकायचंय आणि त्याचा योग्य तो उपयोगही करायचाय Happy
अजय, तुमची कल्पना चांगली आहे. अंमलात आली तर खूप काही करता येईल.

कशाप्रकारे मद्त करता येईल याचे पर्याय खूप आवडले चिनूक्स.
अजयची कल्पनाही उत्तम. अश्या वेळेस नुसतं टंकलेखन करुन जास्त लवकर प्रकाशित करता येईल.

<ब्रेल पाटी शालेय साहित्याच्या दुकानात मिळते का? आपलं आपण शिकता येतं का?>

ब्रेलची पाटी NABच्या नाशिक , मुंबई इथल्या कार्यालयांत मिळते. आणि देहरादूनच्या संस्थेत. ही पाटी वेगळी असते. यात प्रत्येकी सहा छिद्रांचे असे एका ओळीत ठरावीक आयत असतात. टोच्याच्या मदतीनं या पाटीत कागद अडकवून लिहायचं असतं.

आपलं आपण कदाचित शिकता येईल. अक्षरं कशी काढायची हे आंतरजालावरून समजून घेता येईल. पण मार्गदर्शन असलेलं उत्तम.

धन्यवाद चिनूक्स Happy

मी आधी ऑफिसमधल्या मैत्रिणीला विनंती करुन पहाते ती पाटी आणून दाखवण्याची म्हणजे अंदाज येईल. मला वाटतं वरळी ला आहे नॅब.

अजयची कल्पना ग्रेट आहे. मी पण टायपुन देईन.
कशाप्रकारे मद्त करता येईल याचे पर्याय खूप आवडले चिनूक्स.>>>>>. अनुमोदन.

तुमची कळकळ पोहोचली. मी एल वी प्रसाद आय इन्स्टिट्युट साठी स्वयंसेवक म्हणून काम केले आहे. तिथे ही ऑडिओबूक्सच मागतात. तामिळनाडूतून ब्रेल टाईपरायटर मागविण्याकामी मी मदत करू शकेन. पहिले पत्ता शोधते.

अंध व्यक्तींना सुगंधाचे ब्लेंडिन्ग, अगरबत्ती रोल करणे , साबण वडी तयार करणे अशी कामे जमतील.

अजयनी मांडलेली कल्पना एकदम मस्त. असं जर चालणार असेल अन प्रकाशकांची परवानगई असेल तर मी पुस्तकांचं टंकलेखन करू शकते. इतरही मदत करायला आवडेल. थोडा विचार करून लिहिते त्याबद्दल.

खुप छान उपक्रम आहे.

मलाही वाटलं होतं, की आपण जी पुस्तकं वाचतो त्यांपासुन अंध व्यक्ती वंचित असतात.
त्यांना आपल्याला मिळणारा आनंद कसा मिळु शकेल??
ब्रेल लिपीची पुस्तकं जास्ती लवकर खराब होतात असही समजलं होतं...

मी कशी/काय मदत करु शकीन माहित नाही. पण जरुर विचार करणार आहे.
इथे जपानमधे काय परिस्थिती आहे हेही बघिन.

तुर्तास शुभेच्छा!

ताक. वर कोणीतरी लिहीलंच आहे.... चिनुक्स फार चांगल्या उपक्रमांचा विचार करत असतो.
मी मा.बो. वर येऊन फार कमी दिवस झालेत, पण तरीही हे लक्षात आलंच. शुभेच्छा चिनुक्सला!

सर्वांचे आभार Happy

पुस्तकाचं टंकलेखन मायबोलीमुळे बरंच सोपं होऊ शकेल. मात्र छपाईचा खर्च हा मोठा असतो. ब्रेलमधल्या पुस्तकांचा आकार मोठा असतो. जाड कागद वापरावा लागतो, आणि पानांची संख्या नेहमीच्या संख्येपेक्षा तिपटीनं तरी जास्त असते. त्यामुळे या खर्चासाठी जर हातभार लागू शकला, तर उत्तम.

चिन्मय.. खूप चांगली माहिती दिलीस.
अजय म्हणाले तसं मायबोलीवर अशी काही सोय करता आली तर टंकलेखनात हातभार लावता येईल.

उत्कृष्ट माहिती.

माबो.वर जर टंकलेखन केले जाणार असेल तर छपाईला नक्की हातभार लावणार.

चिन्मय, ब्रेलर काय असते? म्हणजे इथे (अमेरिकेत) शोधुन किंमतीचा अंदाज घेऊ शकेन.

खूप चांगली माहिती. चिन्मय तुझे मनापासून कौतुक वाटते. कोणत्याही बाबतीत काहीही हातभार लावायला मनापासून आवडेल.

मायबोलीतर्फे योगदान देण्याची कल्पनाच अतिशय स्तुत्य आणि अभिनंदनीय आहे.

सुनिधी,
ब्रेलर म्हणजे ब्रेल लिहिण्यासाठीचे typewriter. पर्किन्सची ब्रेलर उत्तम समजली जातात.

http://www.perkins.org/nextgeneration/ या दुव्यावर अधिक माहिती मिळू शकेल.

भारतात पर्किन्सची ब्रेलर काटपाडीला बनवली जातात. त्याची माहिती http://www.worthtrust.org.in/ProductionCentre.aspx#Braillers या दुव्यावर मिळेल.

ब्रेलची पाटी अशी दिसते -

braille_clip_image012.jpg

ही पाटी उघडते.. या दोन पडद्यांच्या मध्ये कागद ठेवायचा आणि बरोबरच्या टोच्याने लिहायचं. लिहिताना उजवीकडून डावीकडे लिहायचं (म्हणजे टोचे मारायचे) म्हणजे वाचताना डावीकडून वाचता येतं.

अजय म्हणतो तसं जर चालणार असेल अन प्रकाशकांची परवानगई असेल तर मी पण पुस्तकांचं टंकलेखन करू शकते. इतरही मदत करायला आवडेल. तसं कळवा.

चिन्मय /अजय अशी सुविधा (इथे लिहून, प्रिंट करणे) होत असेल तर सुपंथ पण ह्याला आर्थिक मदत करेल.
एकुनच "मायबोली युजर्स" तर्फे ही पुस्तकं आपल्याला त्या संस्थाना देता येऊ शकतील. पु लं ची सगळी पुस्तकं आता प्रताधिकारमुक्त आहेत. ट्राय म्हणून एक दोन पुस्तकं आपण जर प्रिंट केली तर त्यापरती चांगली गोष्ट कोणती?

चिन्मय तू असे पुस्तक प्रिंट करायला साधारण किती खर्च येईल ह्या बद्दल माहीती काढून ते लिहू शकशील का?

केदार,
पुलंची पुस्तकं प्रताधिकारमुक्त नाहीत. त्यांचे हक्क आयुकाकडे आहेत. नाटकांचे प्रयोग करण्यासाठी केवळ परवानगीची आवश्यकता नाही. Happy

पुस्तकाची एक प्रत छापायला कमीत कमी २००-३०० रुपयांचा खर्च होतो. पुस्तकाच्या पानांची संख्या जर जास्त असेल, तर खर्च तेवढा वाढतो. पुस्तकाच्या अनुपलब्धतेमागे हा खर्च हेही एक कारण आहे. वर लेखात व एका प्रतिक्रियेतही मी याबद्दल लिहिलं आहे.

पुस्तकाचं टंकलेखन करणं ही एक पायरी झाली. पुस्तकाच्या पन्नास प्रती छापून वितरीत करण्यासाठीचा खर्च (महाराष्ट्रात ५०-५५ अंधशाळा आहेत, म्हणून) सहज पंचवीस हजारांपर्यंत जाऊ शकतो.

चालेल.

अजय सुविधा देतील असे म्हणाले आहेत, बरेच लोक लिहायला तयार आहेत. (मुख्य वेळखाऊ काम). माझ्यामते २५,००० सह्जी उभे राहतील. सुपंथ ह्यातील अर्धे देईल. उरले १२,५००. इथे बर्‍याचजणांनी आर्थिक मदतीची तयारी देखील दाखविली आहे. एक पुस्तक करुन बघू. त्यातून शिकता येईल.

तू ह्या बाबतीत वेळ आणि साधारण खर्चाचा एक प्रोजेक्ट प्लान तयार कर. Happy तो इथे मांडल्यावर खरा अंदाज येईल. त्यानुसार लिहीणारे पानं आणि खर्च करणारे खर्च विभागुन घेतील. त्यानुसार पुढचे ठरवता येईल. प्लान केला नाही तर अनेक योजनांप्रमाणे सर्व उत्साही लोक जसे उत्साहात हो म्हणतात व नंतर ते बाजूला राहून जाते तसे होऊन जाऊ नये म्हणून खर्च किती येतो ते विचारले. Happy

धन्यवाद केदार Happy

नवीन पुस्तक लिहिण्यापेक्षा अगोदर लिहिलेल्या एखाद्या पुस्तकाच्या प्रतीही काढता येतील. कारण ब्रेलमध्ये लिहिणं थोडं वेगळं असतं. उदा., केदार हा शब्द लिहायचा असेल, तर तो 'केदार' असा न लिहिता 'क ए द आ र' असा लिहावा लागतो. जोडाक्षरं असली तर अर्धं अक्षर दाखवण्यासाठी वेगळी खूण असते. ब्रेलमध्ये शुद्धलेखन तपासणंही किचकट असते. सराव नसताना लगेच टंकलेखन केलं तर चुका होण्याची शक्यता अधिक.

जर खरोखर आर्थिक मदत मिळणार असेल, तर मी लगेच चौकशी करतो. मात्र हे काम मला सध्या तातडीनं करणं शक्य नाही. एप्रिल-मेनंतरच मी याबाबत काही हालचाल करू शकेन. तोपर्यंत तू म्हणतोस त्याप्रमाणे मी हडपसरच्या संस्थेत बोलून ठेवतो. खर्चाबद्दल सविस्तर माहिती इथे लिहितो.

जर मायबोलीकरांकडून आर्थिक साहाय्य मिळणार असेल, तर आपण पुस्तक इथे न लिहिणं अधिक योग्य. कारण पुस्तक छापणार्‍या संस्था अंध विद्यार्थ्यांकडून पुस्तकाची मूळ प्रत लिहून घेतात. या कामाचे त्यांना पैसे मिळतात.

अरे ! चिनूक्सला मी सुपंथमार्फत निधी मिळवता येईल का असं केदारला विचार म्हणून सांगायला आले तर ऑलरेडी केदारनेच विषय काढलाय Happy असं सुपंथचं कार्यक्षेत्र विस्तारलं तर माबोकरांकडून अजून निधी सुपंथकडे वळवला जाईल.

पूर्ण वाचलं नाही नंतर वाचते. आमच्या घराजवळच अंधशाळा आहे. ब्रेलमधली पुस्तकं वापरुन वापरुन गुळगुळीत होतात आणि मग अंधांना वाचता येत नाहीत. मग या भागातले बरेच लोक त्या अंध मुलांना पुस्तकं (नेहेमीची ) वाचून दाखवायला जातात जेणे करुन ब्रेलची पुस्तकं कमी वापरावी लागतील आणि जास्त काळ चालतील.

Pages