गोविंदा

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

रात्री १२.४०ला कृष्णजन्मोत्सव साजरा झाला की सूर ऐकू येतात ते...
गोSSSविंदा रे गोSSSपाळा... यशोदेच्या तान्ह्या बाळा,
घरात नाही पाणी घागर, उतानी रे गोपाळा...
आला रे आला, गोविंदा आला...

आपले सगळेच सण आनंद, उत्साह, प्रेमाचा संदेश देणारे... प्रत्येकाची मजा वेगळी, साज वेगळा... मग गोपाळकाल्याचा सणही त्याला कसा अपवाद असणार. एकजूटीचा संदेश देणारा हा खेळ बघायला खूप मजा येते...

पहाटे लवकरच सगळे गोविंदा ग्राममंदिरात (मुंबईतील) एकजूट होतात... दुधादह्याची हंडी
ग्रामदेवते समोर बांधली जाते. तिला झेंडूची फुलं, काकडी, केळीं बांधून सजवली जाते. पुजा, गार्‍हाणे आटोपल्यावर ती हंडी फोडली जाते. फुटलेल्या हंडीचा काला करून सगळ्यांना वाटला जातो. मग गोविंदा पथकाचे मास्तर सर्व गोविंदाना मार्गदर्शन करतात. मास्तरांच्या नेतृत्वाखाली गोविंदा पथकाचे मार्गक्रमण सुरू होते. जवळच्या विभागातल्या मानाच्या हंड्या फोडण्याचा कार्यक्रम पार पडला की सगळे पथक ट्रक, टेम्पो, बस मधे बसून उपनगरातील लोणी लुटायला पसार होतात...

पुर्वी म्हणजे १९८०-८५ पर्यंत गोविंदा पथके जवळच्या भागातील हंड्या फोडत. त्यावेळी ट्रक, टेम्पोचे लाड पुरविण्या इतपत पथकाकडे आर्थिक पाठबळ नसे. तेव्हा बैलगाडीतून कृष्ण, बलराम, राधा, पेंद्या यांची मिरवणूक निघे... गल्लीबोळातून येणारे पाण्याचे फुगे मिरवणूकीचा खरपूस समाचार घेत. बैलगाडी समोरील बँड पथक गोविंदाची नेहमीची धून वाजवताना दिसत. सगळे गोविंदा फेर धरून रस्त्यावरून नाचत, खेळत हंड्या फोडत... पण गोविंदा आता राजकिय झालाय, त्याला लाखोंच लोणी लागलयं. पुर्वीचा ५ ते ६ थरांचा गोविंदा काल चक्क ९ थरांचा झाला.

ठाणे वर्तक नगर मधे काल ९ थरांचा विश्वविक्रम करण्यात आला... तळाच्या थराला ६+२, दुसर्‍या थरला ५+१, तिसर्‍याला ४+१, चौथ्याला ३, पाचव्याला २ आणि त्यावर एकेरीत ४ जण असा मानवि मनोरा माझगांवच्या 'ताडवाडी गोविंदा पथकाने' रचला. तसाच पर्यंत्न जोगेश्वरीच्या 'जय जवान' गोविंदा पथकानेही केला. पण शेवटच्या थरावरील मुलीला वार्‍यापुढे नमते घ्यावे लागले, तेव्हा उपस्थीत हजारो प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. ही जिवघेणी स्पर्धा लाखो प्रेक्षक दुरदर्शन वरून मध्यरात्री पर्यंत पहात होते.

गोविंदा पथकांना या स्पर्धेतील जोखमीची काळजी असते आणि म्हणूनच १ - २ महिना आधीपासूनच त्यांची पुर्वतयारी सुरू होते. वरच्या थरातील लहान गोविंदासाठी खास ट्रेनिंग आयोजीत केले जाते. Balancing सोबतच उंचीची भिती घालवण्यासाठी
तरण तलावात २० फुटावरून उड्या मारणे, दोरी वरून चालणे इ. प्रकारांचा सराव करून घेतला जातो. मनोधैर्य स्थिर राखण्यासाठी ध्यानधारणेची मदत घेतली जाते. बहुतांश गोविंदा हे व्यायामशाळेतील कसलेल्या शरिरसौष्ठवाचा पुरेपूर उपयोग करतात.

थर कोसळून होणार्‍या दुखापतीची चिंता न करता हे गोविंदा अथक प्ररिश्रम करत असतात. त्यांची ही अखंड मेहनत, जिद्द, शिस्त या लोकप्रिय खेळाला corporateचा दर्जा प्रात्प करून देते.

आला रे आला... गोविंदा आला...
GD1_035.jpg

प्रकार: 

तू रिल सोडून.. मटा किंवा लोकसत्तामध्ये नोकरी धर रे....
==================
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणांत येती सरसर शिरवे क्षणांत फिरुनी ऊन पडे

मराठी मनगटातील रग "टिकवून" धरायला या अशा परम्परागत खेळान्चा उपयोग होतो! Happy
या हन्ड्या बघताना ज्यान्च्या अन्गावर रोमान्च उठत नाही ते जगावेगळे
काल टीव्ही वर दहीहन्डी उत्सवात जितेन्द्रला मराठी बोलताना पाहिले! Happy
इन्द्रा, तू होच रे आता पत्रकार, फ्रीलान्सिन्ग वाला! Happy
...;
आपला, लिम्बुटिम्बु

इंद्रधनुष्य,
छान लेख लिहीलायंत तुम्ही... Happy आणि फोटो ही सुंदर आहे.
.
गोविंदा पथक म्हणजे? निव्वळ दहीहंडी फोडण्यासाठी कमर्शियलाईज्ड ग्रुप... असं म्हणताय का तुम्ही? याबद्दल मी पहील्यांदाच ऐकते आहे. जनरली गल्लीतली मुलं/मुलीच ही हंडी फोडतात. पण मुंबईत तुम्ही म्हणता तशी सिस्टीम असावी..
.
दक्षिणा...

इन्द्रा, मस्त रे एकदम!!

तू म्हणतोस तसं खरंच प्रशिक्षण देत असावेत. कारण काल ठाण्यात वर्तकनगरला महिला गोविंदांची हंडी पाहिली. ६ थरांचा मानवी मनोरा त्यांनी रचला होता. त्यात शेवटच्या थरातलं पिल्लु अर्थात सगळ्यात उंचावरचं, पाच वर्षांची होती. ती ५ व्या थरावरच्या मुलीच्या खांद्यावर इतकी सहज आणि घट्ट पाय रोवून बसली होती, नजरही अगदी स्थिर, चेहर्‍यावर कुठेही भितीचा लवलेश नाही. आणि वर पोचल्यावर सलामी दिल्यावरही खाली उतरेपर्यंत परत आपली तिच्या खांद्यावर घोरपडीसारखी रुतून बसली. खरंच सुरेख एकदम.
पण काल गोविंदा पथकाच्या प्रतिक्रिया ऐकल्या त्यावरून तरी असं वाटलं की ह्या उंचच उंच हंड्यांची स्पर्धा संपली पाहिजे. ४० फुटापर्यंत मर्यादा ठेवण्याची सक्ती करायला हवी.

दक्षिणा, हे तुझ्यासाठी...

इंद्रा सही! मुंबापुरीची लय आठवण येते.

इंद्रा छान लिहिल आहेस.
पण कधी कधी मनात येत ,गोविंदाचे मुळ स्वरुप लोप पावत चालले आहे.
केवळ राजकिय वर्चस्व सिद्ध करण्यासाठी गोविंदा पथकांना उंच हंड्या लावुन त्यांचे कौशल्य सिद्ध करायला लावणे पटत नाही.
जिवावर उदार होवुन हंडी फोडणारे गोविंदा आणि शेवटच्या थरावर हंडी फोडण्यासाठी उभी राहिलेली ५ व ६ वर्षांची मुले बघितली कि जिवाचा थरकाप उडतो.
त्याच बरोबर पाण्याचा होणारा अनावश्यक आणि अनिर्बंध वापर हे देखिल दुष्काळी महाराष्ट्राला शोभत नाही.
अश्या प्रकारचे गोविंदा बघुन आजच्या पिढीचा या उत्सवाकडे बघण्याच दृष्टिकोन देखिल पुर्वीच्या पिढी पेक्षा वेगळा होत चाललाय.
असो हे आपले माझे वैयक्तिक मत .
बाकी आपले सगळेच सण अत्यंत आनंद देणारे आहेत हे मात्र नक्की.
जय हिंद!
जय महाराष्ट्र!

सही रे इंद्रा.. सगळं जुनं आठवलं..
बंड्या मारुती, बाल गोपाळ, लालबाग, उमरखाडी, ताडवाडी ह्या मडंळाच्या हंड्या बघत बघत आम्ही मोठे झालो..
व्यायामशाळेच्या गोविंदा बरोबर मी तेव्हा जात असे.. २००१ मधे तिथे होतो मी तेव्हा आम्ही सात थर लावले होते.. आणि तीन एक्के.. जवळ जवळ २ महिने कसून सराव करायचो आम्ही.. रात्री दमून कामावरून आलो तरी सराव हवाच.. तर ह्या २००१ च्या आमच्या दही हंडीचे व्हिडीयो शूटींग करून ठेवलेय मी.. तेव्हा मी गिरगावातल्या खोताच्या वाडीच्या गोविंदा बरोबर असायचो.. पन्नास हंड्या फोडल्या असाव्यात एका दिवसात.. दुसर्‍या दिवशी खांदे जाम.. पण गणपती तोंडावर तेव्हा रजा तर नाहीच उलट गणपतीच्या तयारी सुरु.. Happy

तोलाचा आणि वजनाचा वेगळा सराव असायचा.. आणि दहीहंडी जवळ आली की स्कॉट (खांद्यावर वजन घेउन बैठका) मारायला एकच गर्दी व्हायची सगळ्यांची.. सगळ्या मेहनतीची एक झिंग असते.. आणि आता एकदम व्यावसायिक झालय.. गोविंदा पथकात कोण कुठल्या थरावर हे आधीच ठरवलेल असतं आणि आळीपाळीने विश्रांती देत बदली गोविंदा सुद्धा तयार ठेवायलाच लागतो. वरती शक्यतो लहान मुलगा असणंच सोप्प पडतं.. सगळा कारभार शिट्टीवर.. शिस्तबद्ध..

मी ९ थरांचा, ४ एक्क्यांचा कालचा ताडवाडीचा गोविंदा शोधला यू ट्यूब वर पण नाही मिळाला, पहायला मिळेल का कुठे?

उपास, हे एक्के म्हणजे काय?

एकदम सहि इंद्रा....
मलापण हे "एक्का" प्रकरण समजल नाहि...

उपास... सही सही
परळ, करिरोडचे बालविर, कोळकेश्वर प्रसिध्द होते. तसाच कुर्लाचा अंबिका आता कोसळला आहे... Sad
एका वर एक असे तीन एक्के(single थर) लावण्याची प्रथा अंबिकानेच सुरू केली होती.

दक्षिणा... राजकीय व्यक्तींच्या परिस्पर्शाने गोविंदा पथके कात टाकू लागली आहेत... मागील वर्षापासून त्यांचा विमा केला जातो. पण त्याचा किती जणांना किती फायदा होतो हा मुद्दा वेगळा...

मंजू... मुलिंच्या गोविंद्यात तू का नाही सामिल होत... म्हणजे तीन एक्के आरामात लागतील :p

गोविंदाचे मुळ स्वरुप लोप पावत चालले आहे. जयमहाराष्ट्र खरयं... आज काल DJ, Laser lights आणि celebrities तालावर गोविंदांचे पाय थिरकतात...

राज्या, चिन्नू, हिम्या, लिंब्या धन्यवाद Happy

हे हे इन्द्रा, जल्लां मी सामिल झाले तर मला सर्वात खालच्या थराला ठेवतील, 'पाया मजबूत तर इमारत शाबूत' ह्या उक्तीप्रमाणे.... त्यात कसला आलाय थरार.... जमिनीवरची इमारत दिसते सगळ्यांना, जमिनीच्या खालचं कुठे काय दिसतं?? मग ३ काय ५ एक्के का लागेनात.... Proud

मंजू.. माझ्या इथे ती लिन्क उघडत नाही. ऍक्सेस डिनाईड येतोय... Sad
(Thanks to our net) Angry

होय रे होय उपास, उमरखाडी व ताडवाडी मंडळांसाठी आम्ही आमचे पाण्याने भरलेले फुगे राखून ठेवायचो. फक्त हे सगळं बघण्याच्या नादात आम्ही गॅलरीच्या कठड्यावरून किती वाकायचो आठवलं की वाटतं असे कसे आपण येडचॅप होतो Sad

अगं अश्विनी चालायचच.. ते दिवसच तसे असतात.. मंतरलेले.. Happy
वर इंद्रा म्हणाला तसं, एक्के म्हणजे एकावर एक.. मधल्यावर प्रचंड दडपण असतं पण.. तोल आणि वजन दोन्ही उचलायचं म्हणजे.. आणि सात थरांच्यावर हंडी असेल तर वार्‍याचा खूप फरक पडतो.. काही वेळा नीट बांधली नसेल हंडी तर दोरी आणि हंडी वार्‍याने हेलकावे खात हलत रहातात..
सगळ्यात त्रासदायक म्हणजे वरती शेवटचा गोविंदा हंडी जवळ पोहोचत असताना फुग्यांचा जोरदार मारा सहन करावा लागतो.. कुठेतरी कळलं पाहिजे लोकांना कधी फुगे मारायचे ते.. Sad
ती नऊ थरांची क्लीप नाहीच मिळाली मला कुठेही..

इंद्रधनुष्य आणि उपास आभार. किती दिवसांनी (वर्षांनी) ते दिवस आठवले. गिरगाव आणि लालबाग-परळ एव्हढे नसले तरी दादर एरियात बर्‍याच दहीहंडी बांधलेल्या असायच्या. विजयनगरची (दादर स्टेशन जवळील) त्यावेळी सर्वात उंच वाटायची.

अजुन एक विचित्र आठवण ह्या दिवसाची म्हणजे टि,व्ही. वर दहीहंड्यांचे चित्रीकरण बातम्यात दाखव्त असताना केबेलवर साजन लागला होता. मला आणि मित्राच्या आठ वर्षाच्या मुलाला दहिहंड्या बह्गायच्या होत्या आणि मित्राला माधुरी कोणाला मिळते(सलमान की संजूबाबा) हे बघायचे होते. चेनेल बदल्यावर त्याच्या मुलाने जो काय रडून गोंधळ घातलाय.....

अरे तलावपाळी विसरलास का?
आणि आमच्या पुण्यनगरीतील बाबू गेनू. क्या बात है. ईकडे राहुन साला जिंदगी घटवतोय आम्ही लोक. यावेळेस बातम्यात कुठे तरी उर्मीला देवी पण आल्या हे दाखवले.

उपास... ९ थराच्या हंडीचा फोटो काल मटाच्या मुंबई वृतांत होता...
केदार, mbhure... या बघा काही लिंक्स...

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3400247.cms

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3395404.cms

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3395398.cms

हे भयंकर आहे, ताबडतोब राजेशला फोन करून याबद्दल विचारायला हवं. हि साईट वर्ल्डवाईड बघितली जाणार आहे रे इंद्रा. काहीतरी अ‍ॅक्शन घे.