भाटमळ वाडी -भाग १ आणि भाग २

Submitted by शब्दमेघ on 2 April, 2008 - 05:08

भाटमळ वाडी -भाग १ ....

गाडी ने करकचून ब्रेक दाबला.. अन मी भानावर आले, गेले २ तास कसे गेले कळाले ही नाही लअगबगीने एस.टी बाहेर पडले .. अगदी चीटपाखरू पण दिसत नव्हते बाजूला.

किती तरी दिवस फक्त ठरवत होते माझ्या माहेराला जायचे म्हनून .. आज तो योग आला होता . रानातल्या वाटेने तशीच चालत वस्तीकडे निघाले.

"वस्ती ..? वस्ती जेथे माणसे राहतात काही ही झाले तरी आपले पाळेमुळे सोडत नाहीत ती वस्ती .. हं, स्वताशीच मनात खिन्न हसून मी मलाच पुन्हा पुन्हा सांगत होते.

हळूच मागे पाहिले, तर कोणीच नव्हते .. माझ्या सावलीखेरीज, अन ती ही काळीकुट्ट पडली होती कदाचित भुतकाळातील गोष्टींच्या प्रभावामुळे.. पण तरीही उगाच त्या गोष्टींचा पुल बांधताना माझ्याच अस्तित्वाशी ती संबंध सांगत होती.

मंद वाऱ्याची झुळूक, शेतातिल ज्वारीची सळसळणारी पाती, मोगऱ्याची फुले, तळ्याकाठची निरव शांतता अन हळूच तीला भेदून उडत जाणारा तो पक्षांचा थवा .. हं सगळ्या कलप्ना, आता सगळे वाऱ्यावरती विरून गेल्या सारखे वाटत आहे.पण ..माझ मन आजही त्या पुर्वीच्या पाउलखुणा शोधतय...

आज पंधरा वर्षांनंतर येथे आले आहे.. सगळे बदलून गेले आहे . माझ माहेर .. माझ घर .. १९९३ सालच्या भुकंपामध्ये सार सार उध्वस्त झाल .. भाटमळ वाडी मराठ्वाड्यातील खिल्लारी जवळ फक्त ५ कि.मी. अंतरावर असणारी एक छोटीशी वस्ती असणारी वाडी.

मी येथे येवून बराच वेळ झाला पण काहिच ओळखू येत नाहिये मला .. हा अता वाडी पुन्हा उभी राहीली आहे एक्दम नटून पण पहील्या सारखा बाज दिसत नाहीये

वर्षांनुवर्षे सातत्याने जमीनीत पाय रोवून आपल्या अस्तित्वाची पीढ्यान पीढ्या साक्ष देणारे ते वडाचे झाड .. आता तिथे नाहीच आणि पिंपळाच्या झाडावरील मुंजबाने ही अता भीतीने कधीच पळ काढला आहे तेथून. त्या उध्वस्त खुणा मात्र अजून तशाच आहेत .. ते पडके वाडे अजून साक्ष देतायेत त्या संहाराची अन ती ओसाड चावडी हसती आहे माझ्या कडे बघून..

थोडीशी पुढे चालली तर शेजारिल झोपडीवजा घराच्या अंगणात आजाराने जाय्बंदी झालेले आजोबा दिसले..चेहरा ओळखीचा वाटला म्हणून थोडे पुढे गेले अजून ...

नाना $$ मनाने मनातल्या मनात आनंदाने हंबरडा फोडला .. हो आनंदाने ..आनंद मग तो क्षणीक का असेना स्वर्ग सुख देवून जातो.. पण नानांची केवीलवाणी अवस्था पाहून हाच आनंद क्षणभंगूर ठरला ..

" या अंगणात पाउल टाकल परत तर तंगड मोडील " हे नानांच वाक्य आठवल . सरकण डोळ्यासमोरून ते चित्र काळाला भेदून डोळ्यासमोरून निघून गेल.

तितक्यात शेजारून आवज आला.. कोण .. ? कोण हाय तिकड ..कुनास्नी शोधून राहिलात... ?

क्रमशा :

भाटमळ वाडी .. भाग २ (गोदा)

गोदा $$ .. भान हरपून मी मोठ्याने हाक मारली .. मी.. मी.. माझ्या तोंडातून आनंदाच्या भरात पुढचे शब्द येईनात

माहेराची माझी एक जीवाभावाची मैत्रीण गोदा माझ्या पुढे उभी होती, अंगावर नववारी ..आता काळाने कमी झाले असतील पण तरीही तो केसांचा अंबाडा, तो कणखर आवाज ही अजून तसाच होता ..

तेव्हड्यात, राधाक्का $$ असे म्हणत गोदा माझ्या कडे धावतच आली, १५ वर्ष झाली आम्ही भेटून, तो जुना काळ म्हणजे काही मजा औरच होती .. गोदा शेजारच्या राजुदादा बरोबर लग्न करून नाना पवार यांची सून म्हणून आली होती, ती आली आणि एका वर्षात माझे हात ही बाबांनी पिवळे केले .. म्हणजे आमची मैत्री १ वर्षभराची .. पण अजूनही ते दिवस आठवले ना तर अंगावर रोमांच उभा राहतो ..

" पण .. हातात असलेले फुलपाखरू उडाले की मागे उरतात ते रंग,फक्त रंग आणि ते ही फिकट , तसाच हा काळ .. तो ही असाच पटकन निघून गेला आठवणींचे रंग मागे ठेवून "

अर्रर्र टिंग्या .. कोण आलया बघ .. आत्या आलीया तुझी आत्या ! गोधडी आण आतून .. असे गोदाचे मोठ्या आवाजातील शब्द काणी पडल्यावर माझी विचारांची शृंखला पुन्हा खंडीत झाली ..

राधाक्का आज इतक्या दिसांनी .. अन अस अचानक ..? काय तुम्ही पण ? इतकं का परकं करायचं आम्हासनी, येणं तर सोडा पण साध टपाल बिपाल तरी धाडायचं कधी मधी ..

अर्रर्र टिंग्या आण की बिगीबिगी, थांबा हा पाणी देते रांजणातलं .. मला तर तुम्हास्नी पाहून काय करावं आण काय नाय हेच सूचना बघा ..

टेव्हड्यात टिंग्यान गोधडी हांथरली.. आणि तो बाजूला उभा राहिला ... १४ - १५ वर्षाचा टिंग्या , त्याला कुठली ही आत्या हेच कळले नाही म्हणून हळूच तो माझ्या कडे बघत होता मधून मधून.

राधाक्का काय चाललं हाय तुमचं ?.. आमचं तर बघा हे अस सगळीकडे पसारा अन सारखं हे काम .. अस म्हणत गोदा बोलत होती पण तरीही माझी नजर शेजारील पडक्या वाड्यावर जात होती मधून मधून ..

तुझं कस चाललंय गोदा ? अन नानां ना काय झालंय ? मी विचारले..

राधाक्का काय सांगायचं तुम्हास्नी ३ वरीस झाल्यात म्हातारं अंथरुणाला धरून हाय.. ह्यास्नी अन माइस्नी जाऊन १५ वरीस झाली तेव्हा पासून म्या अन म्हाताऱ्यानं काय काय नाय सोसलं ..पण आता हा एकुलता एक आधार पण आता तुटतोय ..

अजून मनगटात जोर हाय म्हणून चाललंय पण राधाक्का , " मूठ .. कितीही बळ असलं ना मुठीत तरी ही उणीव वाटते आपल्या मानसाच्या हाताची.. मायेच्या आधाराची .."

आता काय बोलत राहिलीया मी .. बस्सा हा मी च्या करून आणते ..अस म्हणत गोदा उठली ..

अग गोदा राहूदे मला माझं गाव बघायचं आहे .. ते घर ते शेत सगळं पाहायचे आहे ..मग येते मी .. मला चैन पडत नाही ये सगळं आपलं एकदा पाहायचं आहे ..

अहो काय बाकी राहिलं आहे आता, ते पडकं वाडं आणि ती ओसाड शेतं काय पाहायचं त्यास्नी ...थांबा च्या ठेवला आहे .. टिंग्या येईल बरोबर तुमच्या दाखवायला .. आता इतक्या दिसानी आलाय तर १०-५ दीस राहून जायच काय ..गोदा ने आपल्या तालात मला सांगितलं ..

अग मी तर एकाच दिवसा साठी आली आहे .. बरोबर कपडे पण नाहीत माझ्या कडे.. मी गोदास बोलली ..

आता कापडाच काय घेऊन बसलात माझी आहेत की म्हस पडलेली .. आता काय आईकणार नाही मी तुमचं ..

आता निवांत च्या प्या आणि वस्तीवरणं एक चक्कर मारा .. तो पर्यंत म्या मस्त कोंबडं कापते ..

आता गोदा काही ऐकणार नाही हे मला कळलेच होते ..

नाना, ओ नाना कोण आलया बघा रामा देशमुखाची पोर राधा आलीया राधा ..

कोण ? कंपन स्वरूपातील आवाजाने नानांनी गोदाला पुन्हा विचारले ?

आता काय म्हाताऱ्याला आयकायला कमी येत राधाकका ..

अहो राधा, देशमुखाची पोर .. गोदे ने ओरडून नानांना सांगितले.

नाव ऐकल्याबरोबर नानांनी उठण्याचा प्रयत्न केला ..

नाना नमस्कार करते, हा हा उठू नका नाना मी बसते येथे तुमच्या शेजारी. काय झालं आहे नाना ? मी कळत असूनही उगाच प्रश्न विचारला. नानांच उभं आयुष्य कष्ट करण्यातच गेलं होते .. आणि आता ही केविलवाणी अवस्था . बघवत नव्हत नानांकडे.

काय पोरी वय झालं आता , मी काय उडेल बलप हाय आता कधी उडल याचा बी नेम नाय..

मी गोंधळून गप्प बसले. दोन मिनिट दोघेही गप्पच राहिलो.

पोरी का गप्प बसलीयस, चालायचंच .. " काळाच्या प्रवाहात आयुष्य वाहत जात अन या प्रवाहात शरीर रुपी अंगरख्याची लक्तरं होतात .. म्हातारपण हे आत्म्याच्या उच्छादी पणाला शाप असतं पोरी "

ए टिंग्या इकडं ये .. आत्यास्नी च्या दे येवडा.. अस म्हणत गोदाने गुळाचा चहा टिंग्याजवळ दिला.

काय, नाव काय तुझं ? मी टिंग्याला विचारले .

टिंग्या ..

अरे खरे नाव काय आहे ते सांग ना ..?

युवराज , टिंग्याने सांगितले.

वा ! काय मस्त नाव आहे रे तुझे .. बरं युवराज आता की नाही मला आपली वाडी दाखवण्यास येशील ना तू ?

हो , येईल की वाटल्यास शेजारच्या मण्याला पण घेऊ का आपल्या बरोबर , माझा मैतर आहे .

हो चालेल की .. तू कितवीत आहेस ?

आता आठवीत आहे .. टिंग्या उत्तर देतच मण्याला बोलावयाला पळाला ..

वाडी .. माझे घर.. ते शेत .. मनात आठवणींची सुकलेली पाने पुन्हा आवाज करू लागली ..

आत्या, चल गं .. तुला वाडी दाखवतू मी ..

पहिलं शाळेत जाऊ .. मण्याने टिंग्या ला सुचविले .

नको आपण पहिल्यांदा ह्या शेजारच्या पडक्या वाड्या कडे जाऊ या ...

आणि मी तिकडे वळले ...

क्रमशः

---------------------- गणेशा

गुलमोहर: 

छान सुरूवात आहे.
पण भाग १ आणि २ का केलेत ते समजलं नाही. अर्थात कथा पूर्ण झाल्यावर कळेल म्हणा!

छान...

पहिला भाग मी "मनोगत.कॉम" वर वाचला आणि इथे पहिला व दुसरा दोन्ही भाग वाचायला मिळाले.
पुढच्या भागाची वाट पहातेय..

गणेशजी, कथेचा फ्लो छान आहे. पण जिथे प्रत्यक्ष संवाद येताहेत, तिथे ते कृत्रिम वाटत आहेत.. उदा: आधी सर्व संवादांमध्ये ग्राम्य भाषेत बोलणारे ना, एकदम "" काळाच्या प्रवाहात आयुष्य वाहत जात अन या प्रवाहात शरीर रुपी अंगरख्याची लक्तरं होतात .. म्हातारपण हे आत्म्याच्या उच्छादी पणाला शाप असतं पोरी " "असे पुस्तकी वाक्य बोलले. "मूठ .. कितीही बळ असलं ना मुठीत तरी ही उणीव वाटते आपल्या मानसाच्या हाताची.. मायेच्या आधाराची"" हे वाक्य देखील राधाच्या बाकीच्या संवादांच्या तुलनेत फार शहरी वाटते.

छान .. निवांत वाचते दुसरा भाग

धन्यवाद ,

आणि आपन म्हनता आहात तसे शहरी टाइप चे वाक्य आले आहे नांनां ना पण गोदाचे " मूठ हे वाक्य मिइ बदल केले होते .. पन ते येथे देता आले नाही

मूठ .. कितीही बळ असलं ना मुठीत तरी ही उणीव वाटते आपल्या मानसाच्या हाताची.. मायेच्या आधाराची .."

हे स्वगत वाक्य वाटते .. म्हनुन येथे बदल केला होता , कारण ग्रामिण लोक सहसा स्वगत बोलत नाहीत.

" मूठीत किति हि बळ असलेना तरी राधाक्का बघा उनिव जाणवते आपल्या मानसाच्या हाताची.. मायेच्या आधाराची .."

असे लिहिले आहे येथे पोस्त नहि करता आले ..

आणि हे वाक्य

काळाच्या प्रवाहात आयुष्य वाहत जात अन या प्रवाहात शरीर रुपी अंगरख्याची लक्तरं होतात .. म्हातारपण हे आत्म्याच्या उच्छादी पणाला शाप असतं पोरी

हे वाक्य खरे तर राधा कडे देनार होतो .. पन या कथेत नानांचा रोल खुप कमी आहे .. त्यांच्या छोट्याश्या व्यक्ति रेखेत
येथे जास्त काहिइच नाहि, तरिहि लक्तर हा शब्द ग्रामिण भाशेत हि आहे पण शरीर रुपी अंगरखा हा शब्द शहरी वाटत आहे .. पण त्या ऐवजी मी शरिराची असा प्रयोग केला पण जे सांगाय्चे होते ते येत नव्हते ...

तरिहि विचार करेल नक्किच .. हि माझी फक्त दुसरीच कथा आहे .. आपल्या येणार्या प्रत्येक अश्या रिप्लाय मुळे माझे विचार करण्याचे मार्ग विस्तारत आहेत ..

धन्यवाद

------------------------- आपला गणेशा

चांगली चालली आहे कथा.

गणेशा छानच रेखाटले आहे भुकंपानंतरचे चित्रण. छान गुंफुन ठेवले आहे कथेत. 'खिल्लारी' कि 'किल्लारी' गावाचे नाव.
तसेच 'अंगावर नववारी' यात नऊवारी असे असायला हवे. ६वार, ९वार असे साड्यांचे, पातळांचे प्रकार मला माहित आहेत.
जर हे चुकिने टाईप झाले असेल तर सोडुन दे. पण खरोखरच माहित नसेल तर जाणकार स्त्रीयांकडुन माहित करुन घे.
'वार' हे एक लांबी मोजण्याचे साधन आहे. >> मी काय उडेल बलप हाय आता कधी उडल याचा बी नेम नाय.. >> या तुझ्या वाक्याने या गंभीर वातावरणातही मला हसु आले. अगदि बरेचसे ग्रामीण शब्द चपखल पेरले आहेस. पुढचा भाग लवकर येऊदे.

नववार बरोबर आहे. नव्वार जास्त चपखल. बोली भाषेत नऊवारी फार क्वचित वापरला जातो.

धन्यवाद अजु़क्का. मला हा ग्रामीण शब्द माहित नव्हता. गणेशा, पुढचा भाग लवकर टायपायचे कष्ट घ्या.