जोगवा

Submitted by मीन्वा on 28 September, 2009 - 02:11

कालपर्यंत रस्त्यावर देवीचा मुखवटा हातात घेऊन भंडारा लावून घ्या म्हणून येणार्‍या बायकांबद्दल तसं काहीच वाटत नव्हतं. कधी भंडारा लावून घेतला नाही म्हणून एखादी / एखादा शिव्याशाप द्यायचा त्याकडेही दुर्लक्षच केलं होतं. आज मात्र यापुढे तसं करु शकेन का? असा प्रश्न पडला तो 'जोगवा' हा नवा सिनेमा पाहील्यामुळे. सिनेमा जोगत्या आणि जोगतीणींबद्दल, त्यांच्या आयुष्याबद्दल जी माहीती देतो ती अर्थातच धक्कादायक आहे. याआधी असं काही असेल असा विचारही केला नव्हता.

चित्रपटाची कथा तायप्पा आणि सुलीची कथा आहे. या दोघांना एकाच दिवशी देवीला सोडलं (कसा शब्द आहे हा...? एका माणसाला देवीला सोडलं.. Sad ) जातं. या दोघांचं देवीशी लग्न लागतं ते वेगवेगळ्या कारणाने. अर्थातच दोघांनाही हे स्वीकारणं जड जातं. मग त्यांची या नविन पंथामधे मिसळून जाण्याचा प्रयत्न करताना होणारी ससेहोलपट, त्यातही नाच गाण्याच्या मेळ्यात कधी रमणं, शेवटी ह्या जगण्याला अर्थ नाही हे कळल्यावर बंड करुन उठणं हे सगळंच एक प्रेक्षक म्हणून आपल्याला खिळवून ठेवतं. चित्रपटाचा शेवट हॅपीज एंडीग्ज आहे पण खरं म्हणजे तो मनाला पटत नाही. "गड्या हे काय खरं नाही" असं मनात आल्याशिवाय रहात नाही..

सिनेमात काय आवडलं?
१. सर्वच कलाकारांचा अभिनय. उपेंद्र लिमये जोगत्या झाल्यावर स्वतःच्याच घरी जोगवा मागायला जातो हा प्रसंग उत्कृष्ट.
२. कॅमेराचा वेळोवेळी केलेला वापर सुंदर आहे.
३. अजय - अतुलचं संगीत सुंदर.

सिनेमात काय खटकलं?
१. सुलीच्या डोक्यात जट निघते आणि तीला जोगतीण केलं जातं या प्रवासात तिचे आईवडील कोसळत नाहीत? आपण आपल्या लेकराला लहानाचं मोठं केलं. डोक्यात जट सापडल्यावर तीच्यावर जोगतीण बनण्याचं संकट येईल हे माहीत असेल तर एखादी आई जट सापडली हे लपवायचाच प्रयत्न करेल असं वाटलं. किंवा जरी तीने हे सांगायचं ठरवलं तरी तीचा जीव पिळवटून नाही का निघणार..? सिनेमात आईवडील असे काही कोसळले नाहीत. तेच तायप्पाच्या आईवडीलांबाबतही..
२. चित्रपटाचा शेवट जरी आशादायी आहे तरी तो प्रत्यक्षात उतरवता येईल असं वाटलं नाही. तायप्पा आणि सुलीने बंड करणं आणि एकमेकांशी लग्न करायचा निर्णय घेणं. पण खरंच असा एकादोघांना बंड करुन यश मिळवता येईल यावर विश्वास ठेवणं अवघड जातं.

रच्याकने: काल कुठुन अवदसा आठवली आणि प्रभात मधे हा सिनेमा पहायला गेले. चित्रपट संपला तेव्हा शिजून बाहेर आले. भयंकर प्रकार आहे प्रभातला सिनेमा पहाणं हा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अश्विनी, माझं गाव आणि आजूबाजूची गावं मी लहानपणापासून बघत आलो आहे. पण लोकांच्या तेव्हाच्या आणि आताच्या मानसिकतेत काही फरक पडला आहे असं मला वाटत नाही.

सिनेमासाठी खालील पुस्तके संदर्भ म्हणून वापरली आहेत.
राजन गवस लिखितः
चौंडकं
भंडारभोग
अजून एका लेखकाची "दर्शन" ही कथा. मला वाटतं "चारुता सागर" (श्री. भोसले.) हे नाव होतं लेखकाचं. आधी लेखिकेचं वाटलं आत्ताच गुगलमधे कळलं की ते लेखक आहेत. टायटल फार भरभर सरकली त्यामुळे नाव वाचून लक्षात ठेवता आली नाही. अजून एका पुस्तकाचाही उल्लेख आहे बहुधा टायटलमधे.

राम, अजूनही जोगतीणी होतात का तेवढ्याच प्रमाणात??? हो होतात मी यल्लम्माच्या यात्रेत पाहिले आहे.
मीनु, एका वेगल्या विषयावर चर्चा सुरू केल्याबद्दल धन्यवाद.

अश्विनी, मला नाही वाटत प्रमाण कमी झाल असेल,:( कारण मागे सौंदती देवीला (कर्नाटकात) जाण्याचा योग आला होता तिकडे अजून भरपुर जोगते जोगीणी दिसत होत्या.

एखाद्या मुलीला जोगतीण बनवले म्हणजे बाकीच्या कुटुंबाला देवीचा आशिर्वाद मिळतो असे मानले जायचे>> अगदि आणि त्यामुळेच आईचा जीव पिळवटून नाही निघणार.

जोगवा बघायलाच हवा.

सौंदती देवी म्हणजेच यल्लम्मा का?

ह्म्म्म्म्म. सगळ्याच जोगती जोगतीणीची मानसिक अवस्था कुचंबणेची होते की काही जण्/णी आहे त्या स्थितीत खुष देखिल असतात?

सद्दा, सौदंत्ती म्हणजेच यल्लम्मा देवीचे स्थान.

मिनू, डोक्यात भुंगा सोडलायस गं !

सौंदती देवी म्हणजेच यल्लम्मा का? >> सौंदत्ती हे गावाचं नाव. तिथे असलेल्या डोंगरावर येल्लम्मा देवीचे देऊळ आहे. याची कथा खूप इंटरेस्टींग आहे. येल्लम्मा म्हणजे रेणुका. जमदग्नींची पत्नी आणि परशुरामाची आई.

जमदग्नींनी रेणुकामातेचा वध करायची आज्ञा आपल्या पुत्रांना दिली. पहील्या चार मुलांनी नकार दिल्यावर धाकट्या परशुरामाने आईचं मुंडकं (हो हाच शब्द वापरलाय खूप ठीकाणी) उडवलं. त्यानंतर तीच्या एका मुंडक्याची हजारो मुंडकी होऊन सर्व दिशांना पसरली. हे जोगते आणि जोगतिणी म्हणजे तीच असा समज आहे. जट सापडणं म्हणजे देवीचा कौल मिळाला की ही ती देवी आहे. मग ती बाई / पुरुष देवीशी लग्न लावून देवीचा मुखवटा / मुंडकं घेऊन दारोदारी भंडारा लावत फिरतात आणि जोगवा मागतात. जोगवा मागून ते स्वत:च उदरभरण करतात. पुरुष जोगत्यांना देवीचा अवतार असल्याने साडी नेसून बाईप्रमाणे रहायचं असतं.

नंदू सिनेमा पाहून असं वाटलं की सुरुवातीला प्रत्येकाची अवस्था कुचंबणेची, संतापाची असते. कालांतराने सामाजिक दबावाला बळी पडून ते लोक परीस्थितीचा स्विकार करायचा प्रयत्न करतात. काही यशस्वी होतात आणि काही अयशस्वी. अयशस्वी होतात ते आत्महत्या करुन यातून सुटका करुन घेतात. परीस्थितीचा स्विकार करण्यासाठी व्यसनांचा आधार घेतला जातो. दारु पिऊन धुंद व्हायचं दु:खाचा विसर पाडायला अशापैकी. (माझं सगळं ज्ञान 'जोगवा' सिनेमावर आधारीत.)

पण मिनू, जट सापडणे आणि जोगती होणे याच्या संबंधाबद्दल पण काही आख्यायिका आहे का? ही जट वेगळ्याप्रकारची असते की नेहमीसारखीच असते? जर जोगती जोगतीणी म्हणजे देवी आहे असे मानले जाते तर त्यांना प्रचंड आदराने वागवले गेले पाहिजे नेहमीच, ते तर नाही होत !
लोकांना कळलं पाहिजे की हे जोगती/जोगतीणी ज्याअर्थी फ्रस्ट्रेट होतात, दारु पितात त्याअर्थी हे लोक्स देवी नाहीत. देवी काय दारु पिईल?

अगं साधीच जट वेगळं कसलं काय. केसांना तेलपाणी न केल्याने होणारी साधी जट. पण एकदा का ती सापडली की ते ती पक्की करतात केसांना कंगवा न लावून. वडाचा चीक आणि भंडारा (हळद असावी) लावून.

जर जोगती जोगतीणी म्हणजे देवी आहे असे मानले जाते तर त्यांना प्रचंड आदराने वागवले गेले पाहिजे नेहमीच, ते तर नाही होत !>>हो हा प्रश्नही सिनेमात उपस्थित केलेला आहेच. त्यांना आदराने वागवलं जात नाहीच त्यांचा फक्त उपभोग घेतला जातो.

पण एकदा का ती सापडली की >>>> अगं जट तर बायकांच्या डोक्यात नेहमीच होतात व आपण रोजच त्या विंचरुन केस नीट राखतो. मग तिथल्या सगळ्याच बायकांच्या डोक्यात पण नेहमीच होत असतील नॉर्मल जटा. मग फक्त काहीच जणांच्या जटेचा एवढा बाऊ का केला जातो? वर कुणीसं म्हटल्याप्रमाणे गरीबीमुळे मुलांना निदान जोगती/णी बनवून दोनवेळचं खायला मिळावं म्हणून तर असं केलं जात नसेल? तिथल्या श्रीमंतांच्या घरात कुणी जोगती /ण होतात का?

माझ्यातर रोजच होतात केसात जटा

माझ्याही होतात. कुरळे केस असल्यावर अजून काय होणार... Sad

मीनू, खरंच डोक्याला भुंगा लावालाहेस तू... शांतपणे पहायला हवा सिनेमा.

मी सध्या सुभाष भेण्डेंचं 'होमकुंड' वाचते आहे. त्यातही गोव्यातल्या कलावंतिणींचा, सेवेकरी भाविणींचा असाच अस्वस्थ करणारा उल्लेख आहे. बरं झालं निदान ह्या प्रथा तरी बंद झाल्या.

जट तर बायकांच्या डोक्यात नेहमीच होतात >>> अरे केसाचा गुंता होणं आणि जट यात फरक आहे! Happy जट वेगळी दिसते, मुळापासून खालपर्यन्त घट्ट गुंतलेली बट म्हणा हवं तर्.ती बहुधा अस्वच्छता अन केसांची निगा न राखणे यामुळेच होते. अर्थात बहुधा हे सुखवस्तू श्रीमन्त घरात घडत नसणार!
एकदा अशी जट आली की मग चीक अन भंडारा वगैरे अन कधी न धुणे यामुळे सगळेच केस खराब होउन अजून अनेक जटा किंवा पूर्ण केसांचीच एकत्र एक जट तयार होते! घाणेमुळे ती भयंकर जड होते, इतकी की बर्‍याच जोगतीणींना पाठीचे वगैरे विकार सुरु होतात त्यामुळे, शिवाय घाणीमुळे केसात उवा, किडे, अळ्या, जखमा, इ. इ. आणखी त्रास वाढतातच. अवचटांनी जट सोडवण्याचे कार्य करणार्या काही कार्यकर्त्यांच्या मुलाखती पण घेतल्यात "धार्मिक" पुस्तकात. त्यात हे डीटेल वर्णन आहे. इतकं सुन्न व्हायला होतं हे वाचून Sad

या दशहतीचा मला आलेला अनुभव बघा.
ज्यावेळी झुलवा नाटक नविन आले त्यावेळी त्यात सुकन्या कुलकर्णी, सयाजी शिंदे,
प्रतिभा अमृते, गौरी केंद्रे भुमिका करत असत. या नाटकाचा शेवट फ़ारच प्रभावी होता.
यात नायिका, देवीचे मुखवटे भिरकावून देते, हळद उधळते, पिसारा चुरगळते, व
स्वत:च्या लेकीला, यातून मुक्त करुन, शिकवण्याचा निर्धार करते. सुकन्या हा प्रसंग
अतिशय सुंदररित्या सादर करत असे.
हे नाटक संपल्यावर, नाटकातले कलाकार पदर पसरुन मदत मागत असत. जिथे
प्रबोधनाची गरज आहे, तिथे या नाटकाचे प्रयोग करता यावेत, म्हणुन हि मदत
मागत असत. त्यावेळी, माझी आई, सुकन्याला म्हणाली होती, असे देवीचे
मुखवटे भिरकावणे बरे नाही ( प्रत्यक्ष नाटकात, नायिकेची आई, हे बघून नदीत
जीव देते. )
पुढे जन्मगाठ, नावाच्या नाटकात, सुकन्या घेरी येऊन धाडकन पडते, असा प्रसंग
होता. या नाटकातील नमूआजीच्या भुमिकेतील लालन सारंग, आपला हात झटकन
तिच्या मानेखाली धरत. पण एका प्रयोगात, लालन सारंगच्या ऐवजी दीपा श्रीराम
भुमिका करत होत्या. त्याना हात द्यायला जरा उशीर झाला, आणि सुकन्याच्या
अंगावर नाटकाचा सेटच कोसळला. पुढे बरेच दिवस, तिला उपचार घ्यावे लागले.
हि बातमी वाचून, मला आईने, त्या नाटकाची आठवण करुन दिली होती.

दिनेश माझ्या ओळखीत एक काकू होत्या. त्यांनी नीना कुळकर्णीची एल आय सीची जाहीरात पाहीली त्यात ती विधवा दाखवली होती. पुढे तीचा नवरा गेला तेव्हा त्या म्हणल्या की तीने तशी जाहीरात केली म्हणून तीचा नवरा गेला. मी अवाक. असो याचा इथे काही संबंध नाही वरच्या तुम्ही सांगीतलेल्या प्रसंगावरुन आठवलं इतकंच.

मी पाह्यला जोगवा. या संदर्भाने बरंच वाचलं होतं आधीच. अनिल अवचटांचा तो मोठ्ठा लेखही वाचला होता त्यामुळे माहीती होती. पण मला सिनेमा त्या दृष्टीने भडक आणि वरवरचा वाटला. बाकी तपशीलात काही लिहीत नाही.

मी एकलेल्या जुन्या जाणत्या म्हतार्‍या लोकांकडून एकले की नुसती जट झाली म्हणूनच नाही देवीला सोडत. गरीब घरात बर्‍याच मुली पैदा झाल्या तर देवीचा कोप वगैरे अंधविश्वास मग देवीला वहाली की चम्तकार होइल असा समज. खरे तर ती वाहीलेली मुलीकडून पैसे मिळतात ना. प्रथेच्या नावाखाली एक शरीर धंदाच असतो. जट अस्वच्छतेचेच कारण आहे.
ह्यांचे देवी अंगात येणे वगैरे नाच बघून एकदा मी टरकले होते पुर्ण. काय भितीदायक नाचतात. डोक्यावर लाल कुंकू फासलेले,हातात कधी दिवे इथून तिथे पळणे,ओरडणे... भयानक सर्व.
बर्‍यापैकी आतील भागात अजुनही चालते वाटते कर्नाटकात,गोव्यात वगैरे. हे नुसते एकुन आहे मी तेव्हा उगीच वाद नकोत. Happy

मीनू, हे तु 'गप्पांचं पान' केलं आहेस का? आधीच्या पोस्ट्स वाहून गेल्यात. चांगली चर्चा अन मुद्दे होते त्यात अनेकांचे. Sad

डोक्यात जट सापडणे म्हणून हिच्यामध्ये देवी आहे अशी अंधश्रद्धा लोकामध्ये अजूनही आहे. (फार लांब कशाला??? मुंबईच्या ट्रेनमधे या जोगतीणी फिरताना दिसतात.)

जट होणे म्हणजे केसाचा एक घट्ट (कंगव्याने न सोडवता येणारा) गुंता असतो. बर्‍याचदा केसाम्धे तेल धूळ घाम हे सर्व एकत्र येऊन जट तयार होते. एकदा ही जट सापडली की ती "जातेय" का हे बघितले जाते (तेव्हा बहुतेक केस विंचरत नाहीत) आणि मग नंतर ती मुलगी देवीला सोडली जाते. कधीकधी "नवस" म्हणूनदेखील मुलाला/मुलीला देवाला सोडले जाते तेव्हा जट तयार होण्यासाठी डोक्यात उंबराचा चिक घालतात. नवस म्हणून बायका फक्त लिंबाची पाने घालून देवी दर्शनाला देखील जातात!!

मुलगे जोगते असल्यावर साडी नेसत नाहीत मात्र र्त्याना "देवीला" सोडले असएल तर त्याचे लिंग कापून त्याना स्त्रीसारखे वागावे लागते (चुभूदेघे)

ब्राह्मणेतर जातीमधे या अंधश्रद्धेचा जास्त पगडा आहे. माझ्या आईच्या घरची कुलदेवता यल्लम्मा आहे पण आमच्याकडे ही प्रथा नाही!!! तसेच, आम्ही जोगतीणीना देवीचा अवतार मानत नाही (माझ्या आजीने एका यात्रेत जाताना मला सांगितले होते)

प्रथेच्या नावाखाली एक शरीर धंदाच असतो.>> जोगतीणी शरीर धंदा करत नाहीत. किंबहुना त्याच्या त्या भल्यामोठ्या जटेमुळे त्याना रोजची दैनंदिन कामे करणे देखील शक्य नसते. जोगतीणीचा आर्थिक कमाई हे "जोगवा" मागूनचे होत असते.

>जोगतीणी शरीर धंदा करत नाहीत><<

उघडरित्या शरीरधंदा करत नसल्या तरी चोरीछुपे देवाच्या नावाखाली हेच चालते. नाहीतरी उपभोग घेतले जातातच त्यांचे. काही तर उपजिवीका म्हणून चोरून हेच करतात असेच एकले आहे.

मला वाटते जोगवा ह्या मूवीत पण असेच काही दाखवले आहे. ज्यांनी मूवी पाहिला त्यांनी हेच सांगितले.

झुलवा शब्दाचा अर्थ काय?

झुलवा म्हणजे लग्न करणे kind of जोगतीणी आधीच लग्न झालेल्या पुरुषाशी झुलवा लावतात आणि मग लग्नाच्या बायको प्रमाणे राहतात.

This movie was screened in the Bay Area last week. I found it too loud and ordinary. Upendra Limaye and Mukta Barve have done a good job but nothing extra-ordinary.

At present, looks like one must say only good words about Ajay-Atul. Except one song in this movie, the background score was so loud that at times, the dialogs were not audible!

The producers/director should be credited for handling a very difficult, unusual subject. It is certainly a risk but to me, it is also an indication that people want to try something new.